कडाह प्रशाद

Submitted by देवीका on 1 March, 2016 - 20:42
kadah prasad
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पाव किलो जाडी कणीक; इथे रवाळ कणीकच अपेक्षित आहे. बारीक रवा नाही.
पाव किलो साजूक तूप. ते सुद्धा ताजं असेल तर उत्तम
पाव किलो साखर. मी रॉ ब्रॉउन शुगर घेतलीय. मला आवडते म्हणून.
कणीकेच्या तिप्पट पाणी मोजून घ्या.

फक्त तीन पदार्थ घेवूनच करायचे आहे. इथे कौशलय ढवळण्याचे आणि किती धीर आहे तुम्हाला त्यावर आहे.
सगळं छान जमले तर मस्त मऊ लुसलुशीत होतो. नाहितर कितीही तूप टाकले आणि नाहि भाजले तर चिकट, तूपकट आणि गोड मिट्ट गोळा होतो.

क्रमवार पाककृती: 

हा प्रसाद मला खूपच आवडतो. गुरुद्वारत गेले की, मूठभर प्रसाद पटकन खालला जातोच.
हि पाककृती एका पंजाबी मैत्रीणीच्या कृपेने गुरुद्वारा किचन मध्ये जावून बघायला मिळाली गेलया आठवड्यात. ज्यांना डायटची चिंता असेल त्यांनी पुढे वाचू नये. Happy

प्रसादाचा शिरा जसा वेगळाच लागतो तसेच इथे गुरुद्वारा मधला कडा हा एकदमच चवीष्ट लागतो. ती चव आणि सात्विकता येत नसली तरी आपण पुर्ण मनाने, कोणाशी न भांडता बनवावा. Wink

सुरुवातीला पातेले ठेवले की गुरु मंत्र म्हटला जातो. किंवा तो म्हणतच कडा बनवला जातो. आता सगळ्या गुरुद्वारात म्हणतात का? असाच कडा बनवतात का? ह्याची उत्तर नाहियेत. पण हि मी बघितलेली आहे तशी देतेय.
------------------------------------------------------
आम्ही (खाणारी चौकडी) 'हावरट' असलयाने, मंत्र वगैरे न म्हणता, सरळ कामाला लागले.

तर अशी कृती,
१) एका पातेलयात कणीकेच्या तिप्पट घेतलेले पाणी उकळायला ठेवावे. उकळी आली की आच मंद करून चालू असू द्या.
२) दुसर्‍या पातेलयात, साखर वितळवायला घ्यावी. ती जशी पुर्ण वितळली की गॅस बंद करून ,त्यात बाजूच्या पातेलयातले अर्धे उकळते पाणी घालावे.
३) एका पसरट परातीत, तूप टाकून वितळले की कणीक घाला. एकदम मध्यम आचेवर ती सतत परतत रहावी. रंग हा गव्हाळ आला पाहिजे. जसे कच्चे गहू दिसतात. अजिबात करपवू नका.
४) खमंग वास सुटला की, आच कमी करा. आता आधी साखरेचे पाणी एक डाव घालून ढवळावे. मग नुसतेच गरम पाणी घालून ढवळावे. मग परत साखरेचे पाणी. परत गरम पाणी. परत साखरेचे पाणी
असे दर दोन तीन मिनिटाने करत रहावे. मात्र कालथा हा वरून खाली, खालून वर मग गोल गोल फिरत राहिला पाहिजे. पाण्याचा गॅस हा मंद चालूच पाहिजे. असे करत पुर्ण साखरेचे पाणी व साधे पाणी संपेपर्यंत ढवळत रहावे. एकेक दाणा फुलवत ढवळ्त रहावे.
५) गॅस बंद करून झाकण ठेवून दहा एक मिनिटाने खायला घ्यावा.

वाहे गुरु की फतेह, वाहे गुरु का खालसा!

खाण्याची घाई असलयाने फोटो नाही. पण घरी परत केला तर काढेनच फोटो.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.
अधिक टिपा: 

-साखर कमी आवडत असेल तर तशी आवडीप्रमाणे घ्या.
-पाणी एकदम ओतू नये. कणीक गोळा होइल. पाणी उकळतं घ्या.
-जितकी ज्यास्त खमंग परताल, तितकी ती मोकळी शिजेल.
-आपलया शिर्‍यासारखे ह्यात वेलची वगैरे नसते. पण तुमची आवड असेल तर वेलची, बदाम काप टाका.
-तूपाची कंजूषी नको. Happy
-जाडसर कणीक नसेल तर पाणी कमी लागेल, नाहितर चिकट गोळा होइल. नाहिच मिळाली जाडी कणीक तर, पाणी कणीकेच्या ३/४ घ्या. पण तूपाची कंजूषी नकोच(पुन्हा सांगतेय). Happy
-पाणी कमीही नको आणि ज्यास्त सुद्धा. चिकट पेस्ट नाही होण्याकरताच हळू हळू साखर-पाणी व पाणी क्रम टाकावा. हेच कौशलय. आधी पातळ वाटेल व जरा वेळाने निवलयावर मस्त सरसरीत, मोकळा लागेल. नाहितर चिकट, तूपकट गोड मिट्ट बुळबुळीत गोळा होइल जर कणीक नीट भाजली नाही आणि ढवळले नाही तर.

जाडी कणीक - कणीक एक वाटी असेल तर, पाणी (तीच वाटी वापरून) तीन वाटी
बारीक कणीक(चपातीची कणीक) - एक वाटी कणीक, अडीच वाटी पाणी.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की करुन बघणार. गुरुद्वारातलं पवित्र, अगत्यशील वातावरण बद्द्ल अनुमोदन. आमच्या इथे गुरुद्वारामध्ये सुस्थितीतल्या लोकांना तिथली जमीन पुसताना, इतरांच्या चपलांची धूळ पुसताना बघितले आहे. आपला अहं पूर्ण विसरुन लोकं तिथे सेवा करतात.

मस्तय . हा प्रसाद मी खाल्लाय लहानपणी शेजारच्या पंजाबी कुटुंबाकृपेने. दरवर्षी त्यांच्याकडे कसलीशी पूजा असायची . बिल्डिंगामधल्या सर्व लहान मुलींना झाडून आमंत्रण असायचं . गोल गोल फिरून मुलींची पूजा करायची आणि प्रसादाच्या ताटात हा शिरा , उकडलेले चणे , आणि काहीसे पैसे मिळायचे . हा शिरा अत्यन्त गोड आणि यम्मी लागतो ! अहाहा !!
मोठे झालो आणि संपली ही मजा . Sad असो

सोन्याबापू उत्तम पोस्ट . गुरुद्वारातल मोकळेपण अनुभवलंय .

छान आहे. जायला हवं गुरुद्वारात, प्रसाद घ्यायला आणि सेवाही करायला.

मी डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील जैन मंदिरात (देरासर) गेलेय, मी एकदाच गेले. बहिण गेलीय जास्त वेळा. कोणीही आम्हाला काहीही विचारलं नाही. जैन धर्मात पण वेगवेगळे पंथ आहेत, त्यामुळे वेगवेळ्या ठिकाणचे अनुभव वेगवेगळे असतील कदाचित. आमच्यापुढे पण एक आहे जैनमंदिर छोटंसं, तिथे मात्र ओळखीच्या जैन बाईबरोबर गेले होते, तीच म्हणाली चल आत माझ्याबरोबर. अर्थात दोन्ही ठिकाणी मी एकेकदाच गेलेय.

फ्रिमॉट गुरुद्वारा मधे या प्रसादा साठी आणि गरम फ्रेश लंगर जेवायला जायचे Happy
खमंग असतो हा प्रसाद.. मन तृप्तं होतं...अमृततुल्य वगैरे शब्द याच्यासाठीच !

फ्रिमॉट गुरुद्वारा मधे या प्रसादा साठी आणि गरम फ्रेश लंगर जेवायला जायचे <<< हा प्लान खुप महीन्यांपासुन पेन्डिंग आहे, आता जायलाच पाहीजे.

काय इंटरेस्टींग रेसिपी आहे .. Happy

वर विचारलेल्या प्रश्नांमध्ये माझीही भर ..

>> पाणी कणीकेच्या ३/४ घ्या

जाडसर कणिक असेल तर तिप्पट पाणी आणि माऊ, बारीक, फाईन असेल तर ३-४ पट की तीन चतुर्थांश पट?

आधी एकदा खाऊन बघायला हवा हा कडाह प्रशाद ..

बापू, सल्लाम या अंकलना.. जोकमधले सरदार प्रत्यक्षात कधी भेटतच नाहीत.. प्रत्यक्षात भेटतात ते असेच दिलदार.

अन्जू, सगळ्याच जैन मंदिरात असे होत नाही. ज्या जैन मंदिरात पहारेकरी ठेवले असतात तिथे हे होतेच होते. ही लोक कार्ड सुद्धा मागतात मंदिराचे कार्ड आहे का? असे विचारतात. अकोल्यात कन्ट्रोल रुम जवळ एक जैन मंदिर ते फार सुरेख आणि मोठे आहे. बहुतेक दगड संगमवरी आहेत. १९७९ मधे बनवले आहे. तेंव्हा रांगोळी घरी करण्यासाठी तिथे पडलेले संगमवरी दगड्/चुरा घरी नेऊन आम्ही खलबत्त्यात तो चुरा कांडून त्याची रांगोळी करायचो. पण मंदिर आतून दिसले नाही कधी. बाहेरुन फार सुरेख दिसते. आतमधे प्रवेश देतच नाही इतर धर्माच्या लोकांना.

भाजीबाजारात अजून एक जैन मंदिर आहे तिथे मात्र आतमधे गेलो तर कुणीच अडवत नाही. तिथे जैन खाकरा वगैरे उपहाराचे पदार्थ मिळतात.

"जोकमधले सरदार प्रत्यक्षात कधी भेटतच नाहीत.. प्रत्यक्षात भेटतात ते असेच दिलदार."

किती सुंदर वाक्य दिनेशदा!

टेस्ट फॉर लाईफ खूप छान आहे. मराठीमधली पीडीएफ मस्त वाटली वाचायला. पुण्यात कुठे त्यांची घरपोच सेवा आहे का?

या धाग्यावरचे प्रतीसाद खूप आवडले.
सर्व जैन मंदिरांत प्रवेश बॅन नसावा, द्वारका ट्रिप मध्ये एक दोन जैन मंदिरात गेल्याचे आठवते.

हे जैन मंदिरांचं असं काही कधी अनुभवलेलं नाही. नुकतेच माऊंट अबूच्या दिलवाडा जैन मंदिरात सगळीकडे व्यवस्थित फिरून दर्शन घेऊन आलो. दादरच्या जैन मंदिरातही कित्येक वेळा गेलेलो आहोत. तिकडे केशर/ काजू कतली वगैरे प्रकार खूप चांगले मिळतात, ते घ्यायला कधी गेलो तर दर्शन घेऊन यायचो आम्ही. कधी कोणी अडवलेलं नाही.
गुरुद्वारात कधीच गेले नाहीये आत्तापर्यंत.

मस्त पाकृ! मणिकरण, नांदेड, अमृतसरला २ हा प्रसाद खाल्लाय ... अजुनही जीभेवर चव रेंगाळतेय... हेमकुंडला मिळणारा चहा व खिचडी वा! क्या बात! माझ्या जवळ शब्द नाहीयेत... प्रेमाने, अगत्याने खाऊ घालतात... ब्लँकेटची, गरज पडल्यास प्राणवायुची सोय .... सलाम, प्रणाम!
सोन्याबापु डोळे पाणावले ...

आहाहा! गुरुद्वारामधला प्रशाद्दा.. त्याची चवच वेगळी येते. आणि लंगरवाली दाल पण घरी बनवता येत नाही.

याला कडा म्हणतात ते त्या लोखंडी परातींवरून. आमच्याकडे घरी मात्र कडा सुजीचाच करतात शक्यतो. पण तुपाचं प्रमाण मात्र असच. लग्नानंतर पहिल्यांदा नवी नवरी स्वैयंपाकघरात येते त्यावेळी तिच्या हातून कडा करून "गोतल" करतात. गोतल म्हणजे सगळ्या भावकीला जेवण द्यायचं.१००+ जणांसाठी हा कडा करायचा होता मला. अंगणात मोठ्या गॅसवर हे भलं मोठं कढई आणि परातीच्या मधलं भांडं ठेवलं होतं. आणि मग चुलत साबा म्हणाल्या इसमे सुजीका हलवा बनाना है. माझा तोपर्यंतचा मराठी अनुभव - वाटी-अर्धी वाटी रव्याला चमचा भर त्पावर भाजून शीरा करायचा. त्या भल्या मोठ्या भांड्यात डबाभर देसी घी घालून त्यात रवा घातला त्यांनी. तो रवा चक्क तुपात पोहत होता. मला असला हलवा येत नाही हे मी तिथेच डिक्लेअर करून टाकलं. मग त्यांनी माझा हात धरून १-२ वेळा कडची फिरवली त्यात आणि माझ्या हातानी त्या रव्यात साखर टाकली. बाकी सगळं त्यांनीच केलं. आणि हो आमच्या कडच्या कड्यात किसलेलं खोबरं आणि किसमीस पण घालतात.

आता इतक्या वर्षांनी सुद्धा मला तसला हलवा जमत नाही. नवरात्रात अष्टमीला साबा कडा बनवतात तो अप्रतिम असतो.

मस्त रेसिपी!
साखर वितळवताना नुसती साखर ठेवली तर साखरेचं कॅरेमल होईल. तर ते तसं अपेक्शीत आहे का?

सगळ्यांना परत धन्यवाद.

मी नावात बदल केलाय.

जाडी कणीक - कणीक एक वाटी असेल तर, पाणी (तीच वाटी वापरून) तीन वाटी
बारीक कणीक(चपातीची कणीक) - एक वाटी कणीक, अडीच वाटी पाणी.
------
लापशीचा केला तर लापशी होइल. त्याला कडाह प्रशाद नाही म्हणता येणार. Happy

>>>साखर वितळवताना नुसती साखर ठेवली तर साखरेचं कॅरेमल होईल. तर ते तसं अपेक्शीत आहे का?<<

हो. तसेही इतका वेळ तूपात परतून, ती कॅरमलच होत असते म्हणूनच तर खमंग लागतो प्रशाद बहुधा.

गुरुद्वारात कधीच गेले नाहीये आत्तापर्यंत

मीही. जवळच आहे खरेतर. आता एकदा नक्की जाईन. पण लंगर कधी असतो हे विचारायची लाज वाटेल Happy साधारण १२ १ च्या सुमारास जावे आणि सुमडीमध्ये लंगर खाऊन यावे.. Happy

मस्त रेसिपी! सोन्याबापू आणि अल्पनाच्या पोस्ट्सनी आणखी बहार आणली आहे. आता लवकरच हा प्रकार थोडया प्रमाणात करुन बघणे आले!

कधीही गुरुद्वारात गेलात तर प्रशाद नक्कीच मिळेल.

लंगर हा गुरुनानक जयंतीला हमखास असतोच.

अमेरीकेत तर नेहमीच प्रशाद आणि जेवण(लंगर) असतेच. ती डाळ मिळतेच.

आता मलाही खावासा वाटतोय .
एक सरदार मित्र होता माझा , पण त्याच्याघरी नेहमी ऑथेन्टिक छोले-पूरी , आलू परोठे असे प्रकार खाल्ले आहेत.
आता कधी त्याच्या घरी जाणं झाल तर नक्की विचारेन .

मस्त पाकृ..
गुरुद्वारा मधे एकदाच गेली आहे.. नांदेडच्या..
छान वाटतं आणि प्रसाद सुद्धा आहाहा..
बापू पोस्ट छानच..

जोकमधले सरदार प्रत्यक्षात कधी भेटतच नाहीत.. >> +१

रेसिपी म्हणुन वाचणार नव्हते, पण बरं झालं पाहिली. छानसे प्रतिसाद आणि यम्मी रेसिपी मिस झाली असती.

बर्याच गुरुद्वारामधे कडाह प्रशाद खाण्याची संधी मिळाली. पण अमृतसरमधली टेस्ट अप्रतिम आणि हेवनली ! पुर्ण परिसर त्या खमंग वासाने दरवळत असतो. जेवुन गेलं असेल तरी खावासा वाटेल असला वास असतो, गुरु द्वारामधे ( फक्त अमृतसर नाही तर सगळ्याच. अगदी माझ्या घराच्या बाजुला असलेल्या छोटुश्या गुरुद्वारामधे पण) अतिशय स्वच्छता असते. सतत गुरुबाणीचा नाद, खमंग वास आणि पांढर्‍या शुभ्र कपड्यांमधले सरदारांची जा-ये, हे कोणत्याही गुरुद्वारामधं वातावरण. खरंच प्रसन्न आणि पवित्र वाटतं.

सरदारांची दिलदारी किती तरी अनुभवली, पण माझ्यासाठी चंदीगढ ते हिमाचल बाय रोड केलेला प्रवास हा अ‍ॅमेझिंग अनुभव होता. निसर्ग, पंजाब कंट्रीसाइड, हॅन्ड्सम सरदार्स Wink ....... पण माझ्यासाठी वेगळाच खास अनुभव म्हणजे रस्तोरस्ती लावलेले लंगर ( अनेकवचन लंगर्स होतं का? ).

आनंदपुर साहिबला काही उत्सव चालु होता. हजारो गाड्या भरभरुन लोक आनंदपुरला येत होते. त्या उत्सवासाठी असेल किंवा रुटीन असेल माहित नाही, पण दर २-३ किमी वर लंगर होते. लाउड स्पीकरवर मेन्यु अनाउन्स होत होता ( अगदी जहिरातीच्या टोनमधे Happy ) एवढंच नाही तर रस्त्यावर उभे राहुन, कार्स अडवुन ते आग्रह करत होते जेवायला येण्याचा. काही ठिकाणी चना, जिलेबी, इतर स्वीट्स द्रोणात भरुन कारच्या खिडकीतुन आत घुसवत होते, म्हणजे थांबायचं नसेल तरी घ्याच असा आग्रह. अगदी टोकाचा आग्रह आणि हे सगळं विना मोबदला. सतत १००-१५० किमीवर सतत खाण्याचा मारा होता. आपल्याकडे रस्तोरस्ती आणि खेड्यात पाहिलेल्या गरीब आणि उपाशी लोकांच्या आठवणीमुळे हा आग्रह अगदी निराळा आणि शॉकिंग वाटला मला. आय विश, अशी सुबत्ता देशात सगळीकडे असावी...... बाकी लक्सरीज नाहीत तरी खाण्यापिण्याच्या बाबतीत समानता यावी.

Pages