कडाह प्रशाद

Submitted by देवीका on 1 March, 2016 - 20:42
kadah prasad
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पाव किलो जाडी कणीक; इथे रवाळ कणीकच अपेक्षित आहे. बारीक रवा नाही.
पाव किलो साजूक तूप. ते सुद्धा ताजं असेल तर उत्तम
पाव किलो साखर. मी रॉ ब्रॉउन शुगर घेतलीय. मला आवडते म्हणून.
कणीकेच्या तिप्पट पाणी मोजून घ्या.

फक्त तीन पदार्थ घेवूनच करायचे आहे. इथे कौशलय ढवळण्याचे आणि किती धीर आहे तुम्हाला त्यावर आहे.
सगळं छान जमले तर मस्त मऊ लुसलुशीत होतो. नाहितर कितीही तूप टाकले आणि नाहि भाजले तर चिकट, तूपकट आणि गोड मिट्ट गोळा होतो.

क्रमवार पाककृती: 

हा प्रसाद मला खूपच आवडतो. गुरुद्वारत गेले की, मूठभर प्रसाद पटकन खालला जातोच.
हि पाककृती एका पंजाबी मैत्रीणीच्या कृपेने गुरुद्वारा किचन मध्ये जावून बघायला मिळाली गेलया आठवड्यात. ज्यांना डायटची चिंता असेल त्यांनी पुढे वाचू नये. Happy

प्रसादाचा शिरा जसा वेगळाच लागतो तसेच इथे गुरुद्वारा मधला कडा हा एकदमच चवीष्ट लागतो. ती चव आणि सात्विकता येत नसली तरी आपण पुर्ण मनाने, कोणाशी न भांडता बनवावा. Wink

सुरुवातीला पातेले ठेवले की गुरु मंत्र म्हटला जातो. किंवा तो म्हणतच कडा बनवला जातो. आता सगळ्या गुरुद्वारात म्हणतात का? असाच कडा बनवतात का? ह्याची उत्तर नाहियेत. पण हि मी बघितलेली आहे तशी देतेय.
------------------------------------------------------
आम्ही (खाणारी चौकडी) 'हावरट' असलयाने, मंत्र वगैरे न म्हणता, सरळ कामाला लागले.

तर अशी कृती,
१) एका पातेलयात कणीकेच्या तिप्पट घेतलेले पाणी उकळायला ठेवावे. उकळी आली की आच मंद करून चालू असू द्या.
२) दुसर्‍या पातेलयात, साखर वितळवायला घ्यावी. ती जशी पुर्ण वितळली की गॅस बंद करून ,त्यात बाजूच्या पातेलयातले अर्धे उकळते पाणी घालावे.
३) एका पसरट परातीत, तूप टाकून वितळले की कणीक घाला. एकदम मध्यम आचेवर ती सतत परतत रहावी. रंग हा गव्हाळ आला पाहिजे. जसे कच्चे गहू दिसतात. अजिबात करपवू नका.
४) खमंग वास सुटला की, आच कमी करा. आता आधी साखरेचे पाणी एक डाव घालून ढवळावे. मग नुसतेच गरम पाणी घालून ढवळावे. मग परत साखरेचे पाणी. परत गरम पाणी. परत साखरेचे पाणी
असे दर दोन तीन मिनिटाने करत रहावे. मात्र कालथा हा वरून खाली, खालून वर मग गोल गोल फिरत राहिला पाहिजे. पाण्याचा गॅस हा मंद चालूच पाहिजे. असे करत पुर्ण साखरेचे पाणी व साधे पाणी संपेपर्यंत ढवळत रहावे. एकेक दाणा फुलवत ढवळ्त रहावे.
५) गॅस बंद करून झाकण ठेवून दहा एक मिनिटाने खायला घ्यावा.

वाहे गुरु की फतेह, वाहे गुरु का खालसा!

खाण्याची घाई असलयाने फोटो नाही. पण घरी परत केला तर काढेनच फोटो.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.
अधिक टिपा: 

-साखर कमी आवडत असेल तर तशी आवडीप्रमाणे घ्या.
-पाणी एकदम ओतू नये. कणीक गोळा होइल. पाणी उकळतं घ्या.
-जितकी ज्यास्त खमंग परताल, तितकी ती मोकळी शिजेल.
-आपलया शिर्‍यासारखे ह्यात वेलची वगैरे नसते. पण तुमची आवड असेल तर वेलची, बदाम काप टाका.
-तूपाची कंजूषी नको. Happy
-जाडसर कणीक नसेल तर पाणी कमी लागेल, नाहितर चिकट गोळा होइल. नाहिच मिळाली जाडी कणीक तर, पाणी कणीकेच्या ३/४ घ्या. पण तूपाची कंजूषी नकोच(पुन्हा सांगतेय). Happy
-पाणी कमीही नको आणि ज्यास्त सुद्धा. चिकट पेस्ट नाही होण्याकरताच हळू हळू साखर-पाणी व पाणी क्रम टाकावा. हेच कौशलय. आधी पातळ वाटेल व जरा वेळाने निवलयावर मस्त सरसरीत, मोकळा लागेल. नाहितर चिकट, तूपकट गोड मिट्ट बुळबुळीत गोळा होइल जर कणीक नीट भाजली नाही आणि ढवळले नाही तर.

जाडी कणीक - कणीक एक वाटी असेल तर, पाणी (तीच वाटी वापरून) तीन वाटी
बारीक कणीक(चपातीची कणीक) - एक वाटी कणीक, अडीच वाटी पाणी.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्म्मम!!!!!!!!! यम्मी.......... लहानपण , सरदार,पंजाबी मैत्रीणींमधेच गेल्याने कडा प्रशाद म्हंजे जीव कि प्राण होता ( तेंव्हा)त्यावेळी डायेट फियेट भान्गड नव्हती ना.. Wink
ते सात्विकते बद्दल म्हटलंस ना ते एकदम खरंय.. गुरुद्वार्‍या च्या परशादा ची चव घरी येत नाही..

आभार.
खरंच.. अप्रतिम चव लागते या प्रसादाला. खुप मन लावून बनवतात तो. मी अनेक देशात खाल्ला आहे, सगळीकडे तीच चव असते.

आमच्या गावी आमचा मित्र आहे सतवीर सिंह ओबेरॉय त्याची म्हातारी आजी लैच जब्राट बनवत असे कडा प्रसाद गुरुपुरव किंवा गुरुनानक जयंतीला आम्ही पोरे जात असू गुरुद्वार्यात कार्यकर्ते म्हणून तुम्ही म्हणता तसेच असते कडा प्रसाद करायची पद्धत मन्त्र म्हणून मग सुरुवात करतात ! सतव्याची आजी जेव्हा हातात कडा प्रसाद देई तेव्हा पार ढोपरा पर्यंत तूप ओघळल्याच्या आठवणी आहेत आमच्या Happy

तूफ़ान लोकं, तुफान धर्म, तुफान प्रेम, तुफान मैत्री अश्या आठवणी आहेत सरदार बांधवांच्या आमच्या मनात

मस्तय. फोटोपण टाका.

एका पसरट परातीत, तूप टाकून वितळले की कणीक घाला. एकदम मध्यम आचेवर ती सतत परतत रहावी. >> हे कळलं नाही. परात डायरेक्ट गॅसवर ठेवली नाहीये कधी. का खोलगट तवा घ्यायचा?

कधी खाल्ला नाही हा प्रसाद. Sad आता मात्र तळमळ होतेय.

पाककृती मस्त. फोटो असता तर चांगल वाटलं असत. खुप खटाटोपीची असल्यामुळे करता येणार नाही. पण एखादा गुरूद्वार्‍यात जाणे झाल्यास प्रसादाचा लाभ घेता येईल.

कधी खाल्ला नाही हा प्रसाद. Sad आता मात्र तळमळ होतेय. +११११११११११

काय हे, थोडा धीर धरुन एक फोटो तरी काढायचा.

रवाळ कणिक कुठे मिळेल?

एका पसरट परातीत, तूप टाकून वितळले की कणीक घाला. एकदम मध्यम आचेवर ती सतत परतत रहावी. >> हे कळलं नाही. परात डायरेक्ट गॅसवर ठेवली नाहीये कधी. का खोलगट तवा घ्यायचा? >>> याचंही उत्तर द्या.

ऑफिसच्या मागे एक गुरुद्वार आहे पाच मिनिटांवर पण कधी गेली नाही तिथे. बहुतेक वेळा तिथे लंगर असतो पण सगळे पंजाबीच दिसतात तिथे त्यामुळे आत जायला भिती वाटते, हाकललं वैगरे तर कारण मी तिथे काही खास दर्शनासाठी जाणार नाही तिथला प्रसाद खाण्यासाठीच जाईल Proud

लंगर मधून स्टिव्ह जॉब्स ला कधी हाकललं नाही, आपल्यासारख्या निरुपद्रवी पामरांना नक्कीच येऊ देतील Happy
मूळ प्रसाद कधी खाल्ला नाही, हा करुन पहायला पाहिजे. सोपा वाटतोय करायला.

अहाहा! मस्त!
मी भारतात कधीही गुरुद्वाराला गेले नव्हते .. युएसला गेल्यावर पहिल्यांदा टीममेट बरोबर गेले नि लंगरमधे प्रसादही घेतला .. नंतर नियमीत गेलोच! तीच चव आली आता जिभेवर Happy

धन्यवाद सर्वांना.
काहीही खटाटोप नाहिये. फक्त पेशंस हवा. तीनच तर जिन्नस हवेत.

आपण घरी गहू दळायला देतो ना, तेव्हाच जरा जाडसर दळावी. पराठे मस्त होतात रवाळ कणीकेचे. चपातीसाठी वेगळं दळून आणतो.
अमेरीकेत (असाल तर) सुटे पीठ मिळते त्यांच्या पीठाच्या आयलमध्ये, ते जाडसरच असते.

गुरुद्वारेत लोखंडी पराती असते. मी लोखंडी बुडाची पसरट कढई घेतली.

गुरुद्वारेत कधीच कोणाला हाकलत नाहित.
फोटोसाठी सॉरी. वासाने कधी खातो असे होते.:)

>>>पाव पाव किलोचा किती रेग्युलर साइझच्या वाट्या कडा प्रसाद होतो?<<

पाव किलो आम्ही चार जणात संपवला एकाच दिवसात. तुम्ही एकच मध्यम आकाराची वाटी सर्व जिन्नस मोजायला घ्या आणि करून पाहू शकता.

मागे उत्तर भारतात असताना आमच्या एक कलिग ने आणलेला सुवर्ण मंदिरातील हा प्रसाद! केवळ अप्रतिम! Happy

हा प्रसाद अजून तरी खाल्ला नाहिये Sad

सोन्याबापू, +१, सरदार बांधवांबद्द्ल खूप आदर आहे, सर्व अनुभव ही तसेच आहेत Happy

निल्सन,
गुरुद्वारांमधून कधीही कोणीही कोणाला हाकलत नाही. उत्तरेत ट्रेकिंगसाठी गेल्यावर आम्ही बरेचदा गुरुद्वारांमध्येच राहतो. इतकी सुरक्षित आणि अगत्यशील जागा दुसरी नाही. तुम्ही नि:संकोच त्या गुरुद्वारेत जा.

पाककृतीसाठी आभार. अतिशय आवडता पदार्थ / प्रसाद आहे हा.

@निल्सन साहेब

बिनधास्त जा हो गुरुद्वारा मधे कोणी नावही विचारत नाही तिथे जात धर्म आस्तिक नास्तिक दुरच!. फ़क्त शिख बांधवांच्या भावनांचा आदर राखत डोके झाकून जाल इतकी विनंती. नास्तिक असाल तर प्रसादासाठी थैंक्स म्हणून डोके टेका. तसेही गुरुग्रंथसाहेब हे एक पुस्तक आहे अन ज्ञानासमोर डोके टेकायला आस्तिक वा नास्तिक कोणालाच हरकत नसावी असे वाटते. मी जातो जेव्हा जेव्हा चांस मिळेल तसा गुरुद्वारा मधे

फक्त जैन मंदिरात हाकलतात. मी अकोल्याच्या जैन मंदिरात मंदिर बघायला गेलो होतो तर त्यांना मला फाटकावर असतानाच बाहेर घालवल. येऊ सुद्धा दिल नाही आत. खूप अपमानजनक वागतात जैन लोक त्यांच्या मंदिरात आपण गेलो तर.

शीख बंधूंचे गुरुद्वारा तर कधीही उघडेच असते. इथे तर ज्यांना रात्री झोपायला जागा नसते ती लोक सरळ गुरुद्वारामधे जाऊन झोपतात. तिथेच त्यांचे घर असते एक.

त्यांच्या शीर्‍याचा प्रसाद अतिशय मस्त असतो आणि वर दिनेश म्हणालेत तसे कुठेही जा चव तिच असते. किती छान निरिक्षण दिनेशदा तुमचे. हेट्स ऑफ!!!

आज मी इथल्या गुरुद्वाराला फोन केला आणि विचारले आज लंगर आहे का तर ते म्हणालेत जो ४ पासून आहे सुरु झाले आहे. हा धागा वाचून लंगर मधे जावेसे वाटते आहे.

मी अनु, देवीका, चिनुक्स, सोन्याबापु तुम्हा सगळ्यांना धन्यवाद, मनातील शंका दुर केल्याबद्दल Happy
आता जाईन केव्हातरी पण तिकडे कडा प्रसाद केव्हाही मिळतो की खास वार वैगरे असतो.

सोन्याबापु, साहेब नाही हो मी सायबिण आहे Wink पण या विशेषणांची गरज नाही इथे मी फक्त माबोकरीण आहे आणि तुमच्याकडुन तर अजिबात नाही कारण माझ्या देशासाठी लढणारे माझ्यासाठी नेहमीच आदरस्थानी आहेत.

बी, हो जैन मंदिरातुन हाकलतात हे माहित होते म्हणुनच मन शाशंक होते. मागे राज जैन यांच्या लेखात वाचलेले की ते खरच जैन आहेत का याची पडताळणी करण्यासाठी त्यांना मंदिराबाहेर नमोकार व त्यांचे स्तोत्र म्हणायला सांगितले होते.

सह्ही लागतो हा प्रसाद. आमच्या जवळच्या गुरुद्वारातच खाल्लाय. धन्यवाद देविका!

शीख बन्धु खरेच मोठ्या मनाचे असतात. हा प्रसाद वाटताना कधीच हातचे राखत नाहीत, भरभरुन देतात. आणी हो गुरुद्वारात सारे समानच. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. ज्यानी खाल्ला नाही त्यानी जरुर आस्वाद घ्यावा.:स्मित:

गुरुद्वार्‍यात हा प्रसाद, माखी दाल ( लंगरवाली दाल ), रोटी हे कायम तयार असतात. कुठल्याही वेळी जा, ते तूम्हाला खायचा आग्रह करतातच. त्यांच्या ग्रंथसाहिबांसमोर नतमस्तक होताना, प्रसाद घेताना डोक्यावर रुमाल बांधा ( तोही तिथेच मिळतो ) एवढीच अट. प्रसाद घेतानाही दोन हाताची ओंजळ करून, गुरुसाहेबांचे स्मरण करत घ्यायचा असतो. तोही पोटभर मिळतो, हवा तर बांधूनही देतात.

त्या समाजात यासाठी दान देणारे उदंड असतात, इतर कुणी पैसे द्यावेत अशी अजिबात अपेक्षा नसते.
मी आजवर भारत, अमिरात, ओमान, केनया, अंगोला या देशात या प्रसादाचा लाभ घेतला आहे. हा प्रसाद रांधायलाही त्यांच्याच समाजातून श्रमदान केले जाते.

>>प्रसाद घेताना डोक्यावर रुमाल बांधा ( तोही तिथेच मिळतो ) एवढीच अट. प्रसाद घेतानाही दोन हाताची ओंजळ करून, गुरुसाहेबांचे स्मरण करत घ्यायचा असतो. तोही पोटभर मिळतो, हवा तर बांधूनही देतात. << +१

वेळ आणि आवड असलयास थोडी फार सेवा करावी( ताटं धुवावी, कचरा काढावा... )

ते जरा कडाह प्रशाद असं करता का ? तो कडा प्रशाद नसतो. असो.

चांदनी चौकात खरेदीसाठी जाताना आधी भेट शीशगंजला देवुन तिथे माथा टेकवुन मनोभावे १५/२० मि. घालवुन मग दोन्ही हातात तुपाने थबथबलेला कडाह प्रसाद्/प्रशाद खायला जी काही मजा यायची ती अवर्णनीयच.
दर्शनाआधी तुम्ही काउंटर्वरुन रु.१० भरुन मंदिरात अर्पण करायला प्रसाद खरेदी करु शकता, मधे गेल्यावर एक सेवेकरी त्यातला अर्धा तिथे असलेल्या पातेल्यात काढुन अर्धा प्रसाद द्रोणासहित परत करतो, वर बाहेर पडताना दरवाज्यात अजुन मिळतो तो वेगळाच. यम्मी !!!! मगच पाय पुढे निघतो.

बी +१

जैनं हाकालतात बाबौ! आपल्याकडले जैन मंदिर पण हाकलते मला पण अनुभव आलाय! स्ट्रिक्टली जैन धर्मियांना प्रवेश दिला जातो!

@निल्सन सो सॉरी मॅम! मी तुम्हाला बुआ समजलो खरा! आता लक्षात ठेवेन Happy

@सगळे,

मला शिख लोकांचा मानी स्वभाव प्रचंड आवडतो , आमच्या वडिलांचे एक मित्र आहेत प्रीतम सिंह म्हणून (नाव मुद्दाम बदलतो आहे) त्यांचा एकेकाळी म्हणजे नेट किंवा मोबाइल प्रचलित नसताना एसटीडी आएएसडी अन फॅक्स चा धंदा होता प्रचंड बरकत होती, दोन मुलींची लग्ने केली त्याच जोरावर, नंतर उतरती कळा लागली इतकी की घरात दाणा येईना अजिबात मुली अन जावई बोलवु लागले जवळ सगळ्यांना तरी गेले नाहीत (गुरुकृपेने जावई सत्शील अन उत्तम मिळाले आहेत) , मुलाच्या शिक्षणाची अबाळ होऊ लागली , एकदा बाबा भेटायला गेले तर घरी चारपाई वर पडलेले होते बाबांनी विचारले काय झाले ? तर म्हणाले "यार २ दिन से अनाज खत्म हो गया था तो रोटीही नहीं खाई" आमच्या वडिलांचे हे परममित्र बाबांनाच रडायला यायला लागले त्यांनी घरी येऊन आई ला सांगितले तर आई ने भाकरी करून घेतल्या !, त्यांच्याकडे गेलो मी आई बाबा तर त्यांच्या आई ला म्हणाले ते काका "देखो बेबेजी गुरु रोटी दा इंतजाम जरूर करदा है!" पहिले मला भाकरी खायला लावली मग ते सगळे जेवले नंतर नंतर त्यांचा मुलगा माझ्याच सोबत शाळेत येऊ लागला (त्यासाठी बाबांनी मदत केली का नाही माहीती नाही कधी बोलले नाहीत) बारावी नंतर पोराने सोने केले बापाच्या भुकेल्या देहाचे ! पोराने एनडीए क्लियर केली गड़ी आज इंडियन आर्मी मधे मेजर आहे ! सिनेमावत स्टोरी आहे राव काय ती अभंग वृत्ती! कधीही हार मानायची नाही हे मला शिकवणारे गुरु म्हणजे आमचे प्रीतम अंकल! आज मुला सुनेसोबत असतात कैंटोनमेंट मधे! मागच्या सुटी मधे भेट झाली कारण ते गावात आले होते, सहज विषय निघाला तर मी विचारले

"काका घरी इतके दैन्य होते मला आठवते तर तुम्ही गुरुद्वारा मधे का नाही जेवलात?"

तर म्हणाले

"बेटे गुरु का आदेश होता है यतिमो को खिलाओ गरीबो को खिलाओ उनकी दुआ लो, न की गुरु के दरबार में खुद ही खाओ , और वैसे भी गुरु ने तेरे को और तेरे बाप को भेजा ही था ना?"!!

_____/\_____

सोन्याबापू, खरंच या मानी स्वभावाला _____/\_____

खरेतर ८ वर्ष सरदार नगर जवळ राहत होतो. पण कधी गुरूद्वारात गेलो नाही याची आज खरंच खंत वाटतेय. सरदारजींवर होणार्‍या जोक्सवरून एक फॉरवर्ड आठवलं.

दिल्लीत काही युवक फिरायला येतात. टॅक्सीमध्ये बसतात आणि पाहतात तर एक वयस्कर सरदारजी ड्रायव्हर असतो. त्याला डिवचण्यासाठी ती मुले एकमेकांना सरदारजीचे जोक सांगतात आणि मुद्दाम हसत असतात. त्यांचे उतरण्याचे ठिकाण येते झालेले पैसे चुकवून ते जात असतात. तर तो वयस्कर सरदारजी त्यांना जवळ बोलावतो आणि त्यांना एक रूपया देतो आणि बोलतो "बच्चो आप दिल्ली घुमने आए हो, अगर कोई सरदार भिख मांगते दिखे तो उसे दे देना|"

Pages