(हा जुना लेख आहे, बर्याच वर्षापूर्वी ब्लॉग वर लिहीला होता.माझी काय वाट्टेल ते होईल ची घरातली कॉपी हरवली, आणि माहेरी गेल्यावर परत पूर्ण वाचले त्यामुळे आठवणी ताज्या झाल्या.याचे मूळ इंग्रजी पुस्तक दुर्मीळ साहित्य आहे आणि अमॅझॉन वर १६००० ला आहे.(एक पेपरबॅक एडिशन २००० ला आहे पण त्यावर क्लिक केल्यास ती फ्रेंच आहे असं दिसतं.) काही वेळा आपल्या स्वत:च्या व्हॅल्यूज, उसूल, आदर्श इंग्रजी वर्णमालेतली शेवटची दोन अक्षरं आहेत असं जेव्हा जेव्हा वाटते तेव्हा हे पुस्तक वाचते आणि खूप रिफ्रेश व्हायला होतं. जर कथा उघड झालेली आवडत नसेल तर हा लेख पुढे वाचू नका, स्पॉयलर अॅलर्ट.)
पुस्तक : काय वाट्टेल ते होईल!
लेखक : पु.ल.देशपांडे
माहिती :मूळ जॉर्ज व हेलन पापाश्विली यांच्या 'एनिथिंग कॅन हॅपन' या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद
--------------------------------------------------------------
अनुवाद वाटतच नाही इतक्या सहजसुंदर भाषेत पु. लं. नी लिहिलेली ही एका अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या जॉर्जियन माणसाची आत्मकथा.
जॉर्जियामधल्या लहानश्या खेड्यातून फक्त पडेल ते काम करण्याची तयारी आणि जगण्याचा उत्साह एवढंच भांडवल घेऊन एका ग्रीक बोटीने जॉर्जी आयव्होनिच अमेरिकेत प्रवेशतो. किनाऱ्यावर पोहचण्याआधीच या माणसाने खाण्यापिण्यात आपल्याजवळ असलेले तुटपुंजे पैसे संपवलेले. बोटीत शिरलेला एक टोप्या विकणारा जॉर्जीची नवीकोरी रशियन फरटोपी घेऊन त्याला बदल्यात एक डॉलर आणि दुसरी 'अस्सल अमेरिकन' टोपी देतो. 'अमेरिकेत गुजराण होण्याइतका पैसा' असल्याशिवाय अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी नाही. पण नोटांचे एक बंडल भाड्याने देणारा त्यांच्यातलाच एक माणूस जॉर्जी ला भेटतो आणि हे नोटांचे बंडल दाखवून झाल्यावर परतीच्या बोलीवर एक डॉलर भाड्याने घेऊन जॉर्जी अमेरिकेत प्रवेश करतो आणि अमेरिकेत आल्याआल्या परदेशी असल्याचा पुरावा असलेला आपला पासपोर्ट फाडून टाकतो.
जॉर्जीचा अमेरिकेतील मार्ग खडतर आहे. त्याची आपल्या देशात वाखाणली गेलेली कौशल्ये, म्हणजे तलवारींना धार लावणे आणि चाबकाच्या चामडी मुठींवर नक्षीकाम करणे, यांना अमेरिकेत स्थान नाही. मित्र झुराबेगच्या मदतीने त्याला एका उपाहारगृहात बश्या-ग्लासे विसळायची नोकरी मिळते. पण पहिल्याच दिवशी धांदरटपणाने सर्व ग्लास फुटल्याने मालकीण त्याला नोकरीवरून जायला सांगते. ती निघताना त्याला देणार असलेले पाच डॉलरही जॉर्जी बाणेदारपणे नाकारतो. 'मी काम केलंच नाही तर पैसे कशाला घेऊ' म्हणून तो परत रिकाम्या पोटी आणि रिकाम्या खिशाने बाहेर पडतो. रात्री बाकावर झोपलेला असताना त्याच्यासमोर बंद पडलेली एका अमेरिकनाची गाडी तो चालू करून देतो आणि हा मनुष्य त्याला त्याच्या गॅरेजात नोकरी देतो.
जॉर्जीच्या या आत्मचरित्रात त्याने अनेक नोकऱ्या धरलेल्या आणि सोडलेल्या दाखवलेल्या आहेत. हा माणूस कोणत्याही अडचणीने आणि अपयशाने खचला नाही. जॉर्जीला गॅरेजात नोकरी देणारा माणूस काही कारणाने त्याच्या गावी निघून गेला. मग जॉर्जीने प्लॅस्टरचे साचे बनवणाऱ्या छोट्या कंपनीत नोकरी धरली. ही नोकरी सुटण्याची कथा मोठी मजेशीर. जॉर्जीच्या शब्दातच सांगायचं झालं तर 'पेंटरसाहेबांनी मला उंटाचा ठसा करायला सांगितला. हा उंट अगदीच गायीसारखा दिसत होता. हे असलं येडंबिद्रं जनावर बनवायची मला अगदीच शरम वाटायला लागली. म्हणून मी इकडेतिकडे अदलाबदल करून त्याला जरा उंटांत आणायला गेलो. पेंटरसाहेबांनी हे पाहिलं. आपण लंडन, प्यारीस, ड्रेसडेन या गावांतल्या शाळांतून चित्रकलेचं शिक्षण कसं घेतलं हे सांगायला सुरुवात केली. आता जाताजाता माझा प्वाइंट इतकाच होता की या गावांत उंट राहत असल्याचं मी कधी ऐकलं नव्हतं. झालं! आम्हाला तिथूनही नारळ मिळाला.' पुढे जॉर्जीची एका गोंदाच्या कारखान्यात नोकरी, तिथून इंग्रजी येत नसल्याने त्याला मिळालेला डच्चू, नंतर एका लाँड्रीत मिळालेली,विशेष न आवडणारी पण पोटापुरते देणारी नोकरी अशा अनेक नोकऱ्या धरसोड करून जॉर्जी शहरेही बदलत राहतो.
स्वाभिमानी पण प्रेमळ, क्वचितप्रसंगी बिलंदर पण बहुतेकदा शक्यतो सत्याची कास धरणारा जॉर्जी आयव्होनिच मनाला भिडतो. जॉर्जीला पोट भरण्यासाठी नोकरीची गरज आहे. पण त्यासाठी त्याला दुसऱ्याचे पाय ओढायचे नाहीत.संपावर गेलेल्या कामगारांना 'काम तुमच्याशिवाय चालू आहे' हे दाखवून जेरीस आणण्यासाठी जॉर्जीला आणि इतर मोजक्या परदेशी माणसांना मिस्टर ब्लॅक नावाचा कारखानदार जवळजवळ दुप्पट रोजावर ठेवतो. इंग्रजी न कळणाऱ्या जॉर्जीला हे आपल्या रशियन सहकाऱ्यांकडून नंतर कळते.'मी स्वखुशीने नोकरी सोडून जात आहे' असे पत्र साहेबाकडून मागायला तो साहेबाकडे जातो. साहेब त्याला 'संपवाले बाहेर गेल्यावर तुला मारतील' अशी भीती दाखवतो. जॉर्जीचे त्यावर उत्तर 'एखाद्याची मी बायको चोरली..पैसे, पोरं चोरली तर तो मला रस्त्यात थांबवून जाब विचारेल. पण एखाद्याची चाकरीच चोरली तर हे सगळंच चोरल्यासारखं आहे. तो मला बडवेल नाही तर काय करेल? मर्द असला तर असंच करेल.'
फुले तोडत नसतानाही मित्रांनी फुले तोडली आणि हा फुले हातात घेऊन उभा म्हणून जॉर्जीला शिपाई पकडतो आणि कोर्टात बोलावणं येतं. इतर कामगार मित्र एक दिवसाचा पगार बुडेल म्हणून कोर्टात न जाता दंड पाठवून देण्याचा सल्ला देत असतानाही 'मी गुन्हा केलेला नसताना केला का म्हणू' म्हणून जॉर्जी कोर्टात जातो.जज्जाने विचारल्यावर पाठ केलेलं एकमेव इंग्रजी वाक्य पण चुकीचं बोलतो. 'नाकबूल,युवर ऑनेस्टी!' म्हणतो. जज्जाने 'जॉर्जियात असताना कोणाचा खून, चोरी वगैरे केली आहे का?' 'खून ना, शेकड्याने केलेत. नंतर मोजणं पण सोडून दिलं' असं बेधडक उत्तर देतो. आणि जज्ज बुचकळ्यांत पडल्यावर 'कामच होतं आपलं,साहेब. दिसला जर्मन की घाल गोळी. सैन्यात होतो मी.' असे सांगतो. जॉर्जी प्रामाणिक आहे.लाच देऊन गोष्टी गुंडाळण्याऐवजी तो पैसे गेले तरी बेहत्तर, पण स्वतःचं निरपराधीत्व पटवून देण्याला जास्त महत्त्व देतो.
मूळ इंग्रजी पुस्तक अद्याप वाचायचा योग आला नाही, पण पु. लं. ची भाषा इतकी खुमासदार आहे की हे अनुवादीत पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतेच. "आनाबाईशी बोलणं म्हणजे भिजल्या स्पंजाशी बोलण्यागत. जरा दाबलं की पाणी!" लग्नाच्या मेजवानीत मुसे(डेझर्ट) आणू म्हटल्यावर "मुसे बिसे ठीक आहे. मी कबाब करीन(मला वाटलं मुसे म्हणजे हरणासारखं काही तरी असेल.)" दोन बुटांना पॉलिशसाठी दोन पोरं बोलावणाऱ्या मिस्टर ब्लॅकला बघून "बरं झालं हा आठ पायाचा कोळी नाही,नाहीतर पायाशी पालिशवाल्या पोरांची पलटणच बसवावी लागली असती" "ल्यूबा तर आपलंच शेपूट आपणच तुडवलेल्या मांजरीसारखी फुसफुसत होती",जॉनकाकाच्या अंत्यसभेत "लोकांनी त्याच्या गुणाची वर्णनं करणारी भाषणं केली. जॉनकाकाला त्याची गरजच नव्हती.त्याने केलेली सत्कृत्यं त्याच्या पेटीभोवती जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर ठळक अक्षरात लिहिलेली होती.त्यांच्या मेणबत्तीच्या प्रकाशात चमकणाऱ्या आसवांच्या हिऱ्यात तोलली जात होती" हे वर्णन, "आम्हाला त्यांच्या विशाल टेबला भोवती बसण्याचा मान मिळाला आहे. हे विशाल टेबल म्हणजे अमेरिका. खूप वर्षं आम्ही त्या विशाल टेबला भोवती गोळा होऊन आमचा जो जो पाहुणचार ते करतायत त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार करीत आहो. चांगले पाहुणे म्हणून राहण्याचा आमचा प्रयत्न आहे." ही चालिकोची आणि इतर परदेशी माणसांची अमेरिकेविषयी कृतज्ञता ही सर्व वाक्ये मनाला भिडून आपल्याच मनातलं काहीतरी आपल्यापुढे आणून जातात. जॉर्जी अमेरिकन मुलीशी लग्न करायला निघतो तेव्हा त्याच्या इतर मित्रांनी त्याला दिलेले सावधगिरीचे इशारे, "अमेरिकन मुली बोजट(बजेट) बाळगतात. म्हणजे तुला काही खर्च करण्यापूर्वी त्यात मांडून ठेवावं लागतं लग्न झाल्यापासून सहा महिन्यात नुसत्या शरमेनेच खतम होशील! आणि तुझी मर्तिकाची पेटी उचलणाऱ्यांना पण जेवण मिळेल असं समजतोस? छट! फार फार तर एक कप चहा!" आणि यावर जॉनकाकाचे समजूत घालणे "त्यांनी एकमेकांना वचन दिलं आहे. जी काही नुकसानी व्हायची ती झाली आहे.फिकीर करू नकोस, बिजो बेट्या! वीस वर्षं आपली तुपली दोस्ती आहे. इथून तुटणार नाही." जॉर्जी हा माणसातला आणि माणूसवेडा माणूस आहे. "प्रत्येक कुटुंबात एक आजी हवी.त्याशिवाय घराला शोभा नाही." हे लग्न ठरल्यानंतर त्याचे आजेसासूबद्दलचे उद्गार अगदी आपल्या संस्कृतीतलेच वाटतात.
पैसे कमावायला जोडधंदा म्हणून कातड्यासाठी सोनेरी कोल्हा कोल्ही पाळणे, 'खिंकाली' बनवून विकणे,अधेमधे शोध लावणे, शेती करणे,जॉनकाकाचा सँडविच चा धंदा चालवणे, भंगारवाल्याचं दुकान काढणे असे अनेक उद्योग जॉर्जी करताना दिसतो. हा माणूस हरहुन्नरी आहे. आपल्या धडपड्या आणि सव्तःची पर्वा न करता इतरांना मदत करण्याच्या स्वभावामुळे तो कधीकधी अडचणीत सुद्धा सापडतो. डिट्रॉय शहरात सट्टेबाजारामुळे मंदी आल्यावर स्वतःची नोकरी शाबूत असूनही "इतर पोराबाळांच्या धन्यांच्या नोकऱ्या सुटलेल्या पाहून मला माझी नोकरी टिकवून धरणं पटेना.मीही सोडली." म्हणून तो भंगाराचे दुकान चालू करतो.त्याची घरमालकीण आनाबाई तिला आणि तिच्या दोन लहान मुलांना सोबत म्हणून जॉर्जीलापण शहर सोडून कॅलिफोर्नियाला यायला विनवते.आनाबाईचे वडील जॉर्जीला विश्रांती देण्यासाठी थोडावेळ ट्रक चालवतात तेही ट्रक गाळात रुतवून जॉर्जीला आणखीच अडचणीत आणतात. रेड इंडियन लोकांकडून ट्रक बाहेर काढून घेण्याच्या प्रयत्नात जॉर्जी असताना ते रेड इंडियन म्हणून त्यांच्याशी आनाबाई आणि कुटुंबीय फटकून वागतात. वाटेत प्रवासखर्चाचे पैसे कमी पडल्यावर सामान विकून सगळे पुढे जाण्याचा सल्ला नाकारून जॉर्जी आणि नादुरुस्त सामानाच्या ट्रकला एकटे सोडून इतर मंडळी पुढे निघतात. इतरांमुळे आलेल्या अडचणींवर मात करत आणि तरीही कोणाविषयी मनात कटुता न ठेवता परत इतरांना मदत करत जॉर्जीची जीवनाची वाटचाल चालू आहे.
'जॉनकाका' हेही एक आगळं पात्र. ऐंशी पंचाऐंशी वर्षाच्या आसपास वय असलेला हा रशियन एक कुशल स्वयंपाकी आहे. पण त्याला पैशाची हाव नाही. एक छोटं उपाहारगृह चालवून आणि बऱ्याच गरजू माणसांना फुकटात जेवू घालून आधार देणं ही त्याची हौस.जॉर्जीला ब्लाडिओस्टॉकमध्ये योगायोगानेच भेटलेला हा म्हातारा त्याच्या रुक्ष उमेदवारीत थोडी रंगत आणतो.अमेरिकेतही जॉनकाका आलाय म्हटल्यावर जॉर्जी त्याच्या शहरात जाऊन सर्व हॉटेलं बघून त्याला शोधून काढतो. जॉनकाका जॉर्जीच्या लग्नातही त्याला भरघोस आहेर आणि मदत करतो. चांकोसारखा अर्धवट माणूस जवळ बाळगतो. कारण चांकोला जगानं वेडा ठरवलं, दगडं मारली तरी "जग सर्वांसाठी आहे" या तत्त्वाने जॉनकाका त्याला आपल्या हाताशी घेतो.मरणाच्या काही दिवस आधी जॉनकाका धंदा विकून आलेल्या पैशातून सर्व मित्रांना किंमती भेटवस्तू घेण्याच्या उपद्व्यापात असतो. सँडविचचा धंदा जॉर्जीला सांभाळायला देऊन तो आजारी मित्र बोरीसला पाहायला निघून जातो. धंदा तोट्यात चालत असल्याचं जॉर्जीने कळवल्यावरही "येईल त्या किमतीला विकून टाका. धंदा परत उभा करता येईल पण बोरीससारखा मित्र परत नाही मिळणार" असे कळवून धंद्यावरही पाणी सोडतो."पेट्रोग्राडला आयुष्य इथल्यासारखं भरभर जात नाही" म्हणून मोठ्या शहरात आचारी बनणं टाळून छोट्याश्या शहरातच आपली खाणावळ चालवतो. जॉर्जीची बायको हेलेना हिला लग्नानंतर निरोप देताना तिच्या कानात "जॉर्जियन माणसाला वाढत असशील तर त्याच्या पानात भरपूर वाढ. तेव्हा कुठे त्याला ते बेताचं वाटेल" असा सल्ला देतो.
हेलेना ,जॉर्जीची बायकोही एका परदेशी माणसाशी लग्न करून संसारात जुळवून घेणारी. त्याच्या मित्रांचा आणि आल्यागेल्यांचा अगत्याने पाहुणचार करणारी. हुशार आणि नवीन चालीरीती शिकण्यासाठी उत्सुक असलेली. आणि विशेष म्हणजे "अमेरिकन मुलीशी लग्न करणं म्हणजे मोठी आफत पत्करणं" हा जॉर्जीच्या मित्रांचा ग्रह आपल्या अगत्यशीलतेने खोटा ठरवणारी. जॉर्जीला तिच्याविषयी वाटणारा अभिमान पुस्तकाच्या पानापानातून जाणवतो.
पुस्तकातले काही प्रसंग मजेशीर आहेत. भटारखान्यातून फुगणाऱ्या पावाच्या कणकेला बसमधल्या बाईने घाबरून रशियन माणसाने बाळगलेला बाँबगोळा समजणे, जॉर्जीने जुन्या बॅटरीतले शीसे वितळवून ते चाकाच्या सांध्यात ओतून दुसऱ्या मोठ्या गाडीचे चाक आपल्या ट्रकाला बसवणे, जमिनीच्या व्यवहारात जॉर्जीला फसवणाऱ्या दलालाला झापून पैसे परत घेण्यासाठी गेलेल्या मित्रांनी दलालाच्या भाषणाने प्रभावित होऊन स्वतःही जमिनीसाठी नाव नोंदवणे,उकाड्यात फक्त अर्ध्या चड्डीवर घड्याळ दुरुस्त करत असलेल्या जॉर्जीने शेजारीणबाई आलेली पाहून मोठ्या घड्याळात लपणे आणि घरातल्या वस्तू तिला कौतुकाने दाखवताना हेलेनने त्याच घड्याळाचे दार उघडून दाखवणे,चांकोने पाव डॉलरच्या सँडविचच्या काही खोक्यात एक एक डॉलर लपवून ठेवून विक्री वाढवणे,'बेथलेम' चा उच्चार फोनवर नीट न सांगितल्याने हेलेनच्या मैत्रिणीने जवळपासच्या सर्व गावांत जाऊन पाहणे, इलारियनचा नर्व्हस ब्रेक डाउन मारामारी केल्यावर बरा होणे इ.इ.
पुस्तकाविषयी आणखी एक विशेष म्हणजे मूळ पुस्तकातील कोट्यांचे शब्दशः भाषांतर न करता समांतर मराठी शब्दप्रयोगांतून विनोदनिर्मिती. जॉर्जी लहानपणी पाण्यात पाहिलेल्या राक्षसांच्या(?) कवट्यांविषयी सांगत असताना मिस्टर मॉकेट त्याला विचारतात: "मग तुम्ही यावर एखादा प्रबंध नाही लिहिला?" जॉर्जीला "प्रबंध" शब्द न कळून "मी कशाला त्यांना प्रतिबंध करू" असे विचारतो. पुस्तकातली खाद्यपदार्थाची नावे आणि वर्णनेही रुचकर आहेत. '(खिमा भरलेल्या करंजीसारखी)खिंकाली','अंड्याची कचोरी उर्फ पिरोष्की','नऊ थराचा बकरीच्या लोण्याचा स्कापोर्सेला केक','लसणाच्या चटणीबरोबर कबाब','चाचोबिली(टॉमेटोत शिजवलेले मटन)','मर्तिकाचा मसालेदार शिलापुलाव','संत्र्याचा रस आणि व्हिस्कीची बनवलेली 'बायलो'','अंड्याचं लोणचं','अनेस्पेंदाल','लिंबाच्या फोडी तोंडात ठेवून भाजलेला कलमाकी मासा','गाभोळीचं लोणचं','बेशे(उकडलेल्या मुळ्या घालून बनवलेली सागुती)','चुचकेला म्हणजेच पाकात घोळवून ओवलेली द्राक्षांची माळ' या पदार्थांबद्दल कुतूहल चाळवतं. तसेच "नमस्कार! युद्धात शत्रूपुढे तुमचा सदैव विजय असो!" हा एका जॉर्जियनाने दुसऱ्या जॉर्जियनाला केलेला रामरामही मजेशीर वाटतो.
शेती न जमल्याची जॉर्जीची कबुली पण प्रांजळ आहे."धरती ओळखते" म्हणून मेहनतीला मागेपुढे न पाहता भरपूर खपून स्वतः केलेली टॉमेटोची शेती वादळ आणि दलालांच्या व्यवहारांमुळे तोट्यात जाते तेव्हा असं का याचा विचार करताना जॉर्जी म्हणतो, "स्वतःच्या जमिनीवर आपल्या दोन हातांनी राबणाऱ्याला शेतीवर भाकरी मिळवता येऊ नये?शक्य नाही.तसं असेल तर या जगाची सुरुवातच कशी झाली? दुसरं एखादं कारण असेल.पण कोणतं कारण??" "फक्त हौस आणि दुय्यम धंदा म्हणून सुकलेली फळफळावळ आणि मोरांचं संगोपन एवढंच केलं नव्हतं" या शब्दात त्याचं शेतीच्या प्रयोगांबद्दलचं वर्णनच पुरेसं बोलकं आहे.
या साऱ्या अनुभवांतूनच जॉर्जीला अमेरिकेत पाऊल ठेवल्यावर आलेला आणि अनेक वर्षे अमेरिकेत राहून कायम असलेला अनुभव पक्का होत जातो. "अमेरिका हा असा देश आहे जिथे काहीही घडू शकतं.काहीही होईल.काय वाट्टेल ते होईल."
जॉर्जीचं आत्मचरित्र अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या आणि स्थायिक झालेल्या एका माणसाचा जीवनप्रवास रंगतदारपणे रेखाटतं. पु. लं. च्याच प्रस्तावनेतील शब्दात सांगायचं तर-
"सर्वांनी एकत्र बसून जेवावे, खावे,प्यावे,क्षुद्र भेदाभेद विसरावे,आनंदात राहावे या प्रार्थनेवरच हे पुस्तक संपते. हसतखेळत, खातपीत, माणुसकीचे साधेसुधे नियम पाळीत अवघ्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी इच्छा बाळगणारा जॉर्जी आपणा सर्वच सामान्य माणसांचे विचार बोलतो.दुर्दैवाने आजच्या जगातील असामान्यांना हे सामान्यांचे माणुसकीचे बोल कळत नाहीत. हा जॉर्जी मला आपला वाटला. म्हणून त्याच्या पुस्तकाचे हे मराठी रुपांतर मी केवळ मराठी जाणणाऱ्यांसाठी केले आहे."
दुसऱ्या देशात त्या देशाबद्दल काहीही माहिती नसताना व भाषाही येत नसताना येऊन आपला जम बसवणाऱ्या या हिकमती जॉर्जियन माणसाची कथा सर्वांनी अवश्य वाचावी अशी वाटते.
(अनुराधा कुलकर्णी)
वाचलं हे अनुवादित पुस्तक.
वाचलं हे अनुवादित पुस्तक. आव्डलं.
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
लेख सविस्तर वाचणार आहेच. पण
लेख सविस्तर वाचणार आहेच. पण याला कृपया 'वाचू आनंदे' ग्रूपमध्ये हलवा.
छान पुस्तकाची छान ओळख! यातला
छान पुस्तकाची छान ओळख!
यातला हा 'मालकिणीबरोबर जाताना रेड इंडियनांनी अडवणे ' हा भाग पूर्वी कुठेतरी, की पाठ्यपुस्तकात वाचल्यासारखा वाटतोय.
मस्त ओळख करुन दिली.. शोधायला
मस्त ओळख करुन दिली..
शोधायला हव आता.. अनुवाद..
सुंदर परिचय करुन दिला आहे
सुंदर परिचय करुन दिला आहे तुम्ही या पुस्तकाचा.
पुलंचं हे पुस्तक मला माहीत नव्हतं (याचं मला एक पुलं फ्यान म्हणून आश्चर्य वाटतंय खूप.)
आता हे नक्की मिळवून वाचणार.
सुरेख ओळख!
सुरेख ओळख!
सुंदर ओळख.. पुलंच्या या
सुंदर ओळख.. पुलंच्या या कामगिरीबद्दल कुठेही वाचलेले नव्हते याआधी मी.
"अमेरिका हा असा देश आहे जिथे
"अमेरिका हा असा देश आहे जिथे काहीही घडू शकतं.काहीही होईल.काय वाट्टेल ते होईल." >>
टोटली.
सुंदर ओळख.
मस्त ओळख!
मस्त ओळख!
छान पुस्तक आहे. लेखपण सुंदर
छान पुस्तक आहे. लेखपण सुंदर झाला आहे.
अरेच्चा पुलंचं पुस्तक आणि
अरेच्चा पुलंचं पुस्तक आणि माझ्या वाचनात आलं नाही, असं कसं होऊ शकतं?
शिवाय हे नावही पहिल्यांदाच ऐकतोय. ठिक आहे- तसं असेल तर मग पुस्तक शोधायलाच लागेल.
पुस्तकात काय आहे याची उत्सुकता तर आहेच; पण त्याचबरोबर नवीन काहीतरी वाचायला भेटणार याचाही आनंद होतोय.
खरी तर इथेच सगळी कथा वाचून घेणार होतो पण तुमच्या पहिल्याच दिलेल्या (जर कथा उघड झालेली आवडत नसेल तर हा लेख पुढे वाचू नका, स्पॉयलर अॅलर्ट.) या सुचनेमुळे इथे वाचायचे धाडस झाले नाही.
त्यामुळे कथा डायरेक्ट पुलंच्या शैलीतच वाचली जाईल.
मायबोलीवर (मला वाटतं तुमच्याच
मायबोलीवर (मला वाटतं तुमच्याच एखाद्या पोस्टवर) या पुस्तकाबद्दल वाचलं होतण आणि मग मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातून मिळवुन वाचलं. तिथेदेखिल या पुस्तकाबाबत विचारणा केली असतां मोठ्ठ प्रश्नचिन्ह त्या ग्रंथसेविकेच्या चेहर्यावर उमटलेलं.
पुस्तकाबद्दलंच सर्व काही वर अनुराधा यांनी लिहिलेलं आहेच. मिळवुन वाचावंच असं पुस्तक एव्हढंच म्हणेन.
पुस्तक वाचलेले नाही पण पुस्तक
पुस्तक वाचलेले नाही पण पुस्तक ऐकून माहिती आहे. स्पॉयलर अलर्ट मुळे पुढचा लेख वाचला नाही.
आता पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हा मराठी अनुवाद कोणी प्रकाशित केला आहे याची माहिती मिळेल का? पुस्तक कुठे मिळेल हे कळले तर अत्युत्तम!
परचुरे प्रकाशन. out of print
परचुरे प्रकाशन. out of print आहे.
बहुतेक परचुरे प्रकाशन चे आहे
बहुतेक परचुरे प्रकाशन चे आहे पुस्तक.
आप्पा बळवंत चौकातल्या मोठा दुकानांमध्ये मिळू शकेल.मी जयजयवंती शेजारच्या दुकानातून आणले होते २००३ साली.
पण जास्त कोणाला माहिती नसल्याने आणि पु लं च्या 'पॉप्युलर आणि पब्लिसाइझ्ड' यादीत नसल्याने हे पण आता दुर्मीळ च्या मार्गावर आहे.
ओके. धन्यवाद भ्रमर, मी_अनु!
ओके. धन्यवाद भ्रमर, मी_अनु!
पुण्यात कुठेसे आऊट ऑफ
पुण्यात कुठेसे आऊट ऑफ प्रिंटची पुस्तके मिळतात असे ऐकले आहे.
नेव्हर माईंड- कुठेतरी सापडेलच.
http://www.bookamigo.in/kay-v
http://www.bookamigo.in/kay-vattel-te-hoil-1007
इथे स्टॉक मध्ये आहे असे दाखवत आहेत.
ओह नाही.. फक्त रेंट साठी आहे..
शोधायला गेल्यावर देवही भेटेल!
शोधायला गेल्यावर देवही भेटेल!
हे घ्या ऑनलाईन पुस्तक-
http://www.suyashbookgallery.com/MarathiBooks/BookDetails.php?BookId=414...
आणि इथे सध्या स्टॉकमध्ये नाही, पण नोटीफाय मी येथे क्लिक केल्यावर ते उपलब्ध झाल्यावर नोटीफिकेशन मिळेल!
http://www.majesticonthenet.com/product.php?id_product=2026
मस्त ओळख !
मस्त ओळख !
धन्यवाद अन्नू, लगेच ऑर्डर
धन्यवाद अन्नू,
लगेच ऑर्डर देते..
छान ओळख करुन दिली..वाचन यादीत
छान ओळख करुन दिली..वाचन यादीत टाकते या पुस्तकाला!
सुंदर ओळख.. पुलंच्या या
सुंदर ओळख.. पुलंच्या या कामगिरीबद्दल कुठेही वाचलेले नव्हते याआधी मी. >>>+११११११
अमॅझॉन.कॉम (इन नाही) वर मूळ
अमॅझॉन.कॉम (इन नाही) वर मूळ इंग्लिश पुस्तक काहीतरी १०-१५ डॉलर ला उपलब्ध आहे. अमॅझॉन.कॉम वर रजिस्टर करताना इंडिया लोकेशन मध्ये पण आले.
पण माझा मोबाईल नंबर दिल्यावर अॅडिशनल नंबर्स रिक्वायर्ड असा काही तरी चक्रम मेसेज येऊन फॉर्म सबमिट झाला नाही.+९१ ने, ०९१ ने, नुसता, ०+नुसता असा विवीध प्रकारे देऊन पाहिला.
ईथे आहे
ईथे आहे की,
http://www.amazon.in/Anything-Can-Happen-George-Papashvily/dp/0312045247...
ईंग्रजीच आहे.
ते सुयश बुक गॅलरीमधुन कोणी ऑनलाईन मागवले आहे का? पेमेंट गेटवे कोणता आहे? विश्वासु आहे का हे दुकान?
अॅमेझॉन वर कोणताही कोड न
अॅमेझॉन वर कोणताही कोड न देता नुसताच नंबर देउन बघा एकदा. रजिस्टर करताना कुठेही करा .कॉम / .ईन वर ते सगळीकडे लागु होईल.
सगळं करुन पाहिलं.इन वर आधीच
सगळं करुन पाहिलं.इन वर आधीच आहे रजिस्ट्रेशन.नुसता नंबर पण देऊन पाहिला.
इन च्या रजिस्ट्रेशन ने कॉम ची प्रॉडक्टं खरेदी करता येतात का पाहते. माझ्या अंदाजानुसार लॉगिन केल्यावर ते आपोआप इन ला रिडायरेक्ट होईल.
सुयश बुक गॅलरीमधुन कोणी
सुयश बुक गॅलरीमधुन कोणी ऑनलाईन मागवले आहे का?>> मी आत्ताच ऑर्डर दिली..
टोटल ७ पुस्तक घेतली मी तिथुन..बरीच हवी असलेली मिळाली..
पेमेंट करताना मोबाईल व्हेरिफिकेशन साठी ऑटीपी येईना म्हणून खाली कस्टमर सर्व्हिस ला फोन लावला.. कॅश ऑन डिलीव्हरी ने मिळतील मला पुस्तक.. त्यांनी मला पत्ता मागुन घेतला आणि ऑर्डर सुद्धा कन्फर्म करुन घेतली.. येत्या एक दोन दिवसात मिळुन जातील मला पुस्तक
अग्गाऊ टाईमपास नै केला त्यांनी लगेच ऐकुन मग आणुन देतो म्हणाले..
टेक्नीकल प्रॉब्लेम आला असावा काही .. असो.. पुस्तक मिळाल्यावर सांगतेच
आत्ताच परत फोन केलेला
आत्ताच परत फोन केलेला त्यांनी.. मला आयडी प्रोव्हाईड केला ऑर्डर ट्रॅक करायला..
Pages