'स्वतः'च्या मुलांचे फोटो सोशल साईट्सवर प्रकाशित करणेबाबत

Submitted by पियू on 14 January, 2016 - 08:34

नमस्कार..

नुकतेच जवळच्या नात्यात दोन छोट्या बाळांनी जन्म घेतला. टेक्नॉलॉजीच्या युगात जन्म घेतल्याने अर्थातच जन्मल्या क्षणापासुन त्यांचे असंख्य फोटो घेतले (काढले) गेले. त्यांचा प्रत्येक क्षण कॅमेरात बंदिस्त करण्याचे कौतुक अगदीच स्वाभाविक होते आणि आहे. पण यानंतर ते फोटो कुठे आणि कसे पब्लिश करायचे यावर बराच विचार विनिमय आणि काथ्याकुट करण्यात आला. मायबोलीकरांची या विषयावरची मते जाणुन घेण्यात रस वाटला म्हणून हा धागा.

फेसबुकसारख्या साईटवर अगदी बाळ जन्माला आल्याक्षणी त्याचा फोटो शेअर करणारे आईवडील आहेत तसेच वर्ष-वर्ष किंवा कधीच न करणारेही.

फोटो शेअर न करणारे पालक बरेचदा पुढील कारणे देतात.

१. सुरक्षितता:

मध्यंतरी फेसबुकवर एक पोस्ट फिरत होती. (कदाचित अजुनही व्हायरल असेल). "तुम्ही तुमच्या मुलीचा फोटो कौतुकाने शेअर करता नी जगाच्या पाठिवर कुठेतरी मुलांची खरेदी-विक्री करणारे त्याच फोटोचा वापर करुन तुमच्या मुलीचा सौदा करत असतात. तो सौदा पक्का झाला तर तुमच्या मुलीचे कधीही अपहरण होऊ शकते." या आशयाची. आता यातले खरे खोटे माहित नाही. परंतु सुरक्षितता हा आजच्या काळातला सगळ्यात मोठा कन्सर्न आहे जो पालकांना आपल्या पाल्याचे फोटोज शेअर करण्यापासुन परावृत्त करतो.

२. दृष्ट लागणे:

आजकालच्या काळात असे काही कोणी मानत नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. बहुतेक ज्ये.नांचा क्र. १ पेक्षा या कारणासाठी फोटो शेअर करण्याला विरोध असतो हे निरीक्षण आहे. हाही मुद्दा ज्ये.नांच्या दृष्टीने 'सुरक्षितता' मध्येच येतो. काही वेळा मुल १ वर्षाचे किंवा सव्वा महिन्याचे वै. झाले कि या कारणासाठीचा विरोध निवळतो. माझ्याच काही समवयस्क मैत्रीणिंनी देखिल या कारणाने सव्वा महिन्याचे झाल्यावर फोटो पब्लिश केले आहेत.

३. चाईल्ड पोर्नोग्राफी (याला काहीतरी इंग्रजी नाव आहे कदाचित):

मी हे/असे थेट कारण कोणाही पालकांकडून ऐकले नाही. पण फोटोंना मॉर्फ करुन त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता हेही एक कारण कदाचित असू शकेल.

४. खाजगीपण जपणे:

काही लोकांना आपले/ आपल्या आयुष्याचे खाजगीपण जपावेसे वाटते. असे पालक स्वतःचेही फोटोज शेअर करत नाहीत आणि आपल्या मुलांचेही. इन जनरल स्वतःची प्रायव्हसी/ प्रायव्हेट स्पेस जपणे या कारणासाठी पालक आपल्या मुलांचे फोटो (किंवा स्वतःविषयीही काही अपडेट) शेअर करण्याचे टाळतात.

फोटो शेअर करणारे पालकः

१. सुरक्षितता:

- हा मुद्दा काहीजण मान्य करतात आणि मित्रपरीवारापुरते (लिमिटेड पब्लिकसाठी) फोटोज शेअर करतात. तरीही एकदा फोटो आंतरजालावर आले कि त्यांच्या लिमिटेड व्ह्युजची खात्री देता येत नाही हे वास्तव आहे. Sad

- काहीजण त्या फेसबुकच्या पोस्टवर "या हिशोबाने तर आयुष्यभर पाल्यांचे फोटोज कुठेच टाकायला नकोत. मुलींचे तर नाहीच नाही. वयात आल्यावरही नाही आणि वाढती गुन्हीगारे बघता कदाचित तिच्या लग्नानंतरही नाही. त्यापेक्षा आत्ताच शेअर करु" असे म्हणतात.

- आपण आंतरजालावर फोटो टाकले नाही तरी इतर कोणी ते टाकणारच नाही किंवा आपली मुले १००% सुरक्षितच असतील असे सांगता येत नाही. त्यामुळे कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला हरकत नाही.

२. दृष्ट लागणे:

काहीजणांचा यावर अजिबात विश्वास नसतो. अंधश्रद्धा आहे म्हणून सोडून देतात.

३. पोर्नोग्राफी किंवा फोटो मॉर्फ करुन त्यांचा गैरवापर हे लहान मोठ्या कोणाच्याही बाबतीत होऊ शकते. त्यामुळे हे कारण शेअर करणार्‍यांना फारसे अडवु शकत नाही.

४. नातलग आणि मुलांचे कौतुक:

परगावच्या नातेवाईकांशी, मित्रमैत्रीणींशी पाल्याच्या गमतीजमती शेअर कराव्याश्या वाटतात. पाल्याच्या कौतुकाचा भाग म्हणून त्यांच्या अचिव्हमेंट्स इत्यादी शेअर करावेसे वाटते म्हणून फेसबुकवर फोटो टाकले जातात.

तर असे दोन्ही बाजुंकडचे वेगवेगळे दृष्टीकोन ऐकायला मिळतात. अजुन मी कोणाचीही पालक नसल्याने या प्रसंगात मी असेल तर काय.. किंवा माझ्यावर वेळ आली तर मी कसे वागेन इ. विचार करत नाही. परंतु या गोष्टीला अजुनही काही पैलु/ मतमतांतरे असू शकतात ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
तर तुम्ही तुमच्या पाल्याचे फोटो सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करता का? का (कारण)?

ठळक टिपा:

१. हा धागा "स्वतःच्या मुलांचे फोटो स्वतःच शेअर करण्याविषयी" आहे. कृपया इतरांच्या मुलांचे फोटो शेअर करण्याविषयी (मग ती मुले अनाथ का असेनात) इथे चर्चा करु नये. त्या विषयावर पुरेशी चर्चा जिप्सी यांच्या धाग्यावर झालेली आहे.

२. इथे कोणाही मुलांचे फोटोज शेअर करणार्‍या किंवा न करणार्‍या पालकांचे मतपरिवर्तन करणे हा हेतु नाही. केवळ सर्वांची मतमतांतरे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने काढलेला आहे. पाल्यावर अंतिम हक्क केवळ आणि केवळ पालकांचा असतो. त्यामुळे प्रत्येक पालकच्या मताचा आदर आहे. (व या धाग्यावर केला जावा). कृ.गै.न. ___/\___

३. या धाग्यावर स्कोर सेटलींग, राजकारण आणि संबंधित लाथाळीला जागा नाही. त्यासाठी इतर राजकारणी धागे शोधावेत. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळ जन्मल्या जन्मल्या त्याला उचलून मित्रांच्या घरी जा.
गुडमॉर्निंग ! हे माझं बाळ. आवडलं का ? तो हो म्हणाला की ताबडतोब दुस-या मित्राकडे निघा. त्याला बाळ दाखवा. दिवसात किमान शंभरेक चं लक्ष्य ठेवा. दुस-या दिवशी आपला कुत्रा घेऊन पुन्हा त्यांच्याकडे जा. पुन्हा तोच क्रम.

घरी फ्रीजला दांडी बसवली की गडी काढा, मित्रांकडे फिरा. सर्वांना ही बातमी सांगा.
प्रत्यक्ष आयुष्यात असे आपण वागत असू तर क्षणाक्षणाचे अपडेट्स अपलोड करण्यात मला तरी काहीही वावगे दिसत नाही. उलट वेळेची बचतच होतेय टेक्नॉलॉजीमुळे !

( एका व्हॉटस अप फॉरवर्डेड मेसेज वर आधारीत )

बाय द वे आपले बरेच फोटो आपल्या मोबाईल मध्ये असतात आणि त्याच मोबाईल मध्ये आपण बरेच अ‍ॅप्स टाकतो जे आपले फोटो अ‍ॅक्सेस करत असतात. हा धोका आपण लक्षात घेतोय का? त्याबाबत काय केले पाहिजे असं आपलं मत आहे? (हा प्रश्न जेन्युइनली विचारत आहे. सार्कॅस्टिकली नाही)

वेल, कोणतीही अ‍ॅप डाऊनलोड केली की '----(अ‍ॅपचं नाव) would like to access your photos/your contacts' असा मेसेज पॉपप होतो. त्यावर ओके आणि डोन्ट अलाऊ असे ऑप्शन्स येतात ते पाहिलेत का?

ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण फेसबूक वर रोज एक फोटो टाकणे किंवा आपल्याच जुन्या फोटोवरच्या कमेंटला उत्तर देणे, लाईक करणे असे करून दिवसातून सतत फेसबूक वर दिसत रहाणारे लोक जास्ती दिसायला लागले आहेत. सतत टाकल्या जाणार्‍या फोटो व स्टॅटस मागे खरे आयुष्य काहीतरी वेगळेच असू शकते. पण जिथे जाउ तिथे सेल्फी घेण्यासारखेच हे आहे. मध्यंतरी एक घटना वाचनात आली होती कि बाहेरगावी जाणार्‍या लोकांनी एअरपोर्ट वर आलो आता अमुक ठिकाणी पोचलो, उद्या तमुक ठिकाणी जाणार इ इतके तपशीलवार टाकले कि चोरांना घर लुबाडायला अगदी सोपे झाले! इतकेच काय पण मला फेसबूक वर एकमेकांना "हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी" "हॅपी बर्थ डे" म्हणणार्‍या नवरा बायको मंडळींची काळजीच वाटते. अ‍ॅनीव्हर्सरी, बर्थ डे (मुलांचे, स्वतःचे) जगजाहिर करू नये कारण बर्‍याच लोकांच्या पासवर्डसमधे अशा तारखा असतात. इतकेच नव्हे तर पासवर्ड रिसेट करताना विचारल्या जाणार्‍या प्रश्नात अशा तारखा विचारणारे प्रश्न बरेच लोक ठेवतात (लक्षात ठेवायला सोपे म्हणून). ज्याला तुमची आयडेंटीटी चोरायची आहे अशा माणसाला तुमच्या फेसबूक पोस्टसचा माग ठेवून अशी उत्तरे मिळवणे शक्य झाले आहे (अशा घटना सेलेब्रीटीज च्या बाबतीत घडल्या आहेत)
ज्यांना आपल्या बद्दल खरच जिव्हाळा, ममत्व असतो, त्यांच्यासाठी फेसबूक ची गरज पडत नाही. पिकासा, व्हॉटसअ‍ॅप वर पर्सनल मेसेज करून त्यांना फोटो पाठवता येतात आणि अगदी स्काईप वरून चॅट पण करता येते. आणि ते केले जातेच कारण असे लोक स्वतःहून संपर्कात रहातात व त्यांच्याशी संपर्क ठेवला जातोच. असे लोक वाढदिवसाला लक्षात ठेवून व स्व तःहून फोन, मेसेज करतात. फेसबूक वर उगाच ५०० लोक "मित्र" असतात त्यातले अनेक कोणीतरी कधीतरी एकदा भेटले म्हणून मित्र होतात. बसल्या बसल्या हातात फोन असतो व वेळ घालवायला म्हणून बरेचसे लोक इकडे तिकडे लाईक करत बसतात. तेव्हा आयुष्यात घडण्यार्‍या प्रत्येक गोष्टी साठी फेसबूक प्रदर्शन मांड्णे मला आवडत नाही. कधीतरी एखादा फोटो किंवा काहीतरी टाकणे वेगळे आणि रोज एक फोटो, काहीतरी बाष्कळ स्टेटस मेसेज टाकणे मला विचित्र वाटत.
दीड मायबोलीकरांशी अगदी सहमत. आपल्या वैयक्तिक आयुष्याचे किती प्रदर्शन मांडायचे हे ज्याचे त्यानी ठरवावे आणि मी त्यातला नाही.

वेल - सेटींग मधे जाऊन प्रत्येक अ‍ॅप चा फोटो किंवा वैयक्तिक माहितीशी संपर्क बंद करता येतो.

मी नाही टाकत फेसबुकवर माझे अथवा माझ्या कुटुंबियांचे फोटो. कधीतरी व्हॉट्सअ‍ॅपवर माझ्या निकट वर्तुळांत शेअर करते. हा माझा चॉइस आहे.
आता मुलगा त्याचं स्वतःचं फेसबुक अकाउंट ऑपरेट करण्याइतका मोठा आहे - तो टाकतो त्याचे आणि त्याच्या मित्रमैत्रिणींचे. तो त्याचा चॉइस आहे. Happy

कोणालाही - अगदी घरच्या मंडळींनाही - विचारल्याशिवाय त्यांचे फोटो प्रकाशित करू नयेत असं माझं वैयक्तिक मत आहे,.

इथे अमेरिकेततरी शाळा किंवा अन्य संस्था तुमच्या मुलांचे फोटो (ग्रूप फोटोसुद्धा) आणि इतर माहिती पब्लिकली शेअर करण्याआधी पालकांची लेखी परवानगी घेतात - आणि नकाराचा मान ठेवतात.

आमच्या एका निकटवर्तीयांच्या मुलाचा फेसबुकवर टाकलेला फोटो विचित्रपणे मॉर्फ करून अनेक लोकांना इमेल करण्यात आला, नंतर दोन वेगवेगळ्या लोकांचे फेसबुकवरचे फोटो विचित्र फोटोशॉप करून ती मेल त्यांच्या contacts मधल्या लोकांना पाठवली गेली, ही अगदी सध्याचीच घटना आहे Sad

हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकते. त्यामुळे,
१. शक्यतो फेसबुकचे अकाऊंटच न काढणे,
२. काढल्यास प्रोफाईल जितकी प्रायव्हेट ठेवता येईल तेवढी ठेवणे,
३. आपले नाव, वय, राहाण्याचे ठिकाण आणि इतर खरी माहिती फेसबुकवर न दाखवणे,
४. कोणतेही फोटो न टाकणे.
हे खबरदारीचे त्यातल्या त्यात काही उपाय आहेत.

Pages