'स्वतः'च्या मुलांचे फोटो सोशल साईट्सवर प्रकाशित करणेबाबत

Submitted by पियू on 14 January, 2016 - 08:34

नमस्कार..

नुकतेच जवळच्या नात्यात दोन छोट्या बाळांनी जन्म घेतला. टेक्नॉलॉजीच्या युगात जन्म घेतल्याने अर्थातच जन्मल्या क्षणापासुन त्यांचे असंख्य फोटो घेतले (काढले) गेले. त्यांचा प्रत्येक क्षण कॅमेरात बंदिस्त करण्याचे कौतुक अगदीच स्वाभाविक होते आणि आहे. पण यानंतर ते फोटो कुठे आणि कसे पब्लिश करायचे यावर बराच विचार विनिमय आणि काथ्याकुट करण्यात आला. मायबोलीकरांची या विषयावरची मते जाणुन घेण्यात रस वाटला म्हणून हा धागा.

फेसबुकसारख्या साईटवर अगदी बाळ जन्माला आल्याक्षणी त्याचा फोटो शेअर करणारे आईवडील आहेत तसेच वर्ष-वर्ष किंवा कधीच न करणारेही.

फोटो शेअर न करणारे पालक बरेचदा पुढील कारणे देतात.

१. सुरक्षितता:

मध्यंतरी फेसबुकवर एक पोस्ट फिरत होती. (कदाचित अजुनही व्हायरल असेल). "तुम्ही तुमच्या मुलीचा फोटो कौतुकाने शेअर करता नी जगाच्या पाठिवर कुठेतरी मुलांची खरेदी-विक्री करणारे त्याच फोटोचा वापर करुन तुमच्या मुलीचा सौदा करत असतात. तो सौदा पक्का झाला तर तुमच्या मुलीचे कधीही अपहरण होऊ शकते." या आशयाची. आता यातले खरे खोटे माहित नाही. परंतु सुरक्षितता हा आजच्या काळातला सगळ्यात मोठा कन्सर्न आहे जो पालकांना आपल्या पाल्याचे फोटोज शेअर करण्यापासुन परावृत्त करतो.

२. दृष्ट लागणे:

आजकालच्या काळात असे काही कोणी मानत नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. बहुतेक ज्ये.नांचा क्र. १ पेक्षा या कारणासाठी फोटो शेअर करण्याला विरोध असतो हे निरीक्षण आहे. हाही मुद्दा ज्ये.नांच्या दृष्टीने 'सुरक्षितता' मध्येच येतो. काही वेळा मुल १ वर्षाचे किंवा सव्वा महिन्याचे वै. झाले कि या कारणासाठीचा विरोध निवळतो. माझ्याच काही समवयस्क मैत्रीणिंनी देखिल या कारणाने सव्वा महिन्याचे झाल्यावर फोटो पब्लिश केले आहेत.

३. चाईल्ड पोर्नोग्राफी (याला काहीतरी इंग्रजी नाव आहे कदाचित):

मी हे/असे थेट कारण कोणाही पालकांकडून ऐकले नाही. पण फोटोंना मॉर्फ करुन त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता हेही एक कारण कदाचित असू शकेल.

४. खाजगीपण जपणे:

काही लोकांना आपले/ आपल्या आयुष्याचे खाजगीपण जपावेसे वाटते. असे पालक स्वतःचेही फोटोज शेअर करत नाहीत आणि आपल्या मुलांचेही. इन जनरल स्वतःची प्रायव्हसी/ प्रायव्हेट स्पेस जपणे या कारणासाठी पालक आपल्या मुलांचे फोटो (किंवा स्वतःविषयीही काही अपडेट) शेअर करण्याचे टाळतात.

फोटो शेअर करणारे पालकः

१. सुरक्षितता:

- हा मुद्दा काहीजण मान्य करतात आणि मित्रपरीवारापुरते (लिमिटेड पब्लिकसाठी) फोटोज शेअर करतात. तरीही एकदा फोटो आंतरजालावर आले कि त्यांच्या लिमिटेड व्ह्युजची खात्री देता येत नाही हे वास्तव आहे. Sad

- काहीजण त्या फेसबुकच्या पोस्टवर "या हिशोबाने तर आयुष्यभर पाल्यांचे फोटोज कुठेच टाकायला नकोत. मुलींचे तर नाहीच नाही. वयात आल्यावरही नाही आणि वाढती गुन्हीगारे बघता कदाचित तिच्या लग्नानंतरही नाही. त्यापेक्षा आत्ताच शेअर करु" असे म्हणतात.

- आपण आंतरजालावर फोटो टाकले नाही तरी इतर कोणी ते टाकणारच नाही किंवा आपली मुले १००% सुरक्षितच असतील असे सांगता येत नाही. त्यामुळे कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला हरकत नाही.

२. दृष्ट लागणे:

काहीजणांचा यावर अजिबात विश्वास नसतो. अंधश्रद्धा आहे म्हणून सोडून देतात.

३. पोर्नोग्राफी किंवा फोटो मॉर्फ करुन त्यांचा गैरवापर हे लहान मोठ्या कोणाच्याही बाबतीत होऊ शकते. त्यामुळे हे कारण शेअर करणार्‍यांना फारसे अडवु शकत नाही.

४. नातलग आणि मुलांचे कौतुक:

परगावच्या नातेवाईकांशी, मित्रमैत्रीणींशी पाल्याच्या गमतीजमती शेअर कराव्याश्या वाटतात. पाल्याच्या कौतुकाचा भाग म्हणून त्यांच्या अचिव्हमेंट्स इत्यादी शेअर करावेसे वाटते म्हणून फेसबुकवर फोटो टाकले जातात.

तर असे दोन्ही बाजुंकडचे वेगवेगळे दृष्टीकोन ऐकायला मिळतात. अजुन मी कोणाचीही पालक नसल्याने या प्रसंगात मी असेल तर काय.. किंवा माझ्यावर वेळ आली तर मी कसे वागेन इ. विचार करत नाही. परंतु या गोष्टीला अजुनही काही पैलु/ मतमतांतरे असू शकतात ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
तर तुम्ही तुमच्या पाल्याचे फोटो सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करता का? का (कारण)?

ठळक टिपा:

१. हा धागा "स्वतःच्या मुलांचे फोटो स्वतःच शेअर करण्याविषयी" आहे. कृपया इतरांच्या मुलांचे फोटो शेअर करण्याविषयी (मग ती मुले अनाथ का असेनात) इथे चर्चा करु नये. त्या विषयावर पुरेशी चर्चा जिप्सी यांच्या धाग्यावर झालेली आहे.

२. इथे कोणाही मुलांचे फोटोज शेअर करणार्‍या किंवा न करणार्‍या पालकांचे मतपरिवर्तन करणे हा हेतु नाही. केवळ सर्वांची मतमतांतरे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने काढलेला आहे. पाल्यावर अंतिम हक्क केवळ आणि केवळ पालकांचा असतो. त्यामुळे प्रत्येक पालकच्या मताचा आदर आहे. (व या धाग्यावर केला जावा). कृ.गै.न. ___/\___

३. या धाग्यावर स्कोर सेटलींग, राजकारण आणि संबंधित लाथाळीला जागा नाही. त्यासाठी इतर राजकारणी धागे शोधावेत. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे म्हणजे इथं बॅचेलर मेंबर्स ना थारा नाही म्हणायचा का ?

असो,
माझ्या भाच्या भाचीच्या बाबत बोलते..
मध्यंतरी मी इथ माझ्या भाचीचे फोटो टाकले होते त्यावर सर्वांनी ते काढून टाकण्याच्या सल्ला दिला म्हणुन मी काढून टाकले.. आता भाचा १ वर्षाचा झालाय पण त्याचे फोटो कस्काय सोडुन इतरत्र कुठेही टाकले नाही.. का अस काही कारण नाही पण इतक्यात थोपू नको वाटत.. हरेक गोष्ट काय शेअर करायची म्हणुन.. सहसा कुणीतरी सोबत असल कि फोटो शेअर करते..एकट्याचे नाही.. पुढेमागे करेलही..
घरचे एकदम लहान बाळांचे फोटो इतरांना दाखवायला नको म्हणतात..नजर लागणे या गोष्टीची भिती.. आणि प्रत्येक गोष्ट सार्वजनिक करणे सुद्धा नको असते म्हणुनही..

माझा विचार म्हणाल तर वर्षाआतील बाळाचे फोटो थोपू वर टाकणे मला तरी पसंत नाही..कस्काय वर जरा जास्त प्रायव्हसी असते म्हणुन तिथ चालु शकेल..तरीही तिथेसुद्धा काही दिवसाम्च्या/ महिन्याच्या बाळाचे फोटो शेअर करणे नकोच..

अरे म्हणजे इथं बॅचेलर मेंबर्स ना थारा नाही म्हणायचा का ?

>> असं काही नाही गं. तुला सल्ला देणार्‍यांनी काय विचार केला हे जाणून घेण्यासाठी हा धागा.
आणि तुझ्या केसमध्ये बाळाच्या आईबाबांना काही हरकत नसावी म्हणून. अन्यथा तू ते फोटो इथे टाकुच शकली नसतीस ना. इथले कोणी सल्ला देवो किंवा न देवो.. कारण शेवटी बाळ त्यांचे तर अंतीम निर्णयही त्यांचाच. त्यामुळे त्यांची (बाळाच्या आईबाबांची) मते काय आहेत ते महत्वाचे.

आपल्या घरातले लग्न/कार्य/समारंभाचे फोटोचे अल्बम आपण नाक्यावरल्या "पब्लिक लायब्ररीत" नेऊन ठेवाल काय?
उत्तर जे येईल, त्यानुसार आपल्या फोटोंचे फेसबुकावर प्रदर्शन मांडायचे का, ते ठरवता येईल.

ऑनलाईन पब्लिश करणे, शेयर करणे याला हरकत नाही. पण ते शेयरिंग नातेवाईक, मित्रमंडळी (खरेखुरे रियललाईफ) इ. मधे लिमिटेड ठेवणे गरजेचे व शक्य आहे.

मॉर्फिंग लहानांच्या बाबतीत घडणे व मोठ्यांच्या बाबतीत घडणे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. अज्ञान (लहान) व्यक्तिकडे त्याविरूध्द आवाज उठवणे किंवा त्या पलिकडे जाऊन सुरळित आयुष्य जगणे ह्यासाठी आवश्यक भावनिक-मानसिक कौशल्य, पैसा इ साधने उपलब्ध नसतात. तेव्हा त्याबद्दल बेदरकारी नसावी.

मला वाटतं , प्रत्येकाला यातले धोके माहित असतात , तरीही काही जण शेअर करतात.
त्यामुळे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं मला वाटतं , म्हणजे प्रत्येकाच मत वेगवेगळ असतं .

माझं मत विचाराल तर मुलांचेच काय मला स्वताचे फोटो पण शेअर करायला आवडत नाही.
मी असलेले फोटोज अपलोड केलेत तर मला टॅग करू नका , अशी माझी स्पष्ट सूचना आहे , मित्र-मैत्रिणी नातेवाईकाना.
लेकाचे फोटोज पण फार क्वचितच शेअर करते मी. त्यात मुख्यत: सुरक्षेपेक्शा "माझं खाजगी आयुश्य" हा विचार जास्त असतो. जवळच्या मित्र-मैत्रिणीं व्यतिरिक्त कलिग्ज , ईतर काही ओळखीची लोक वगैरे असतात फ्रेण्डलिस्ट मध्ये . आणि त्यान्च्या सोबत माझे खाजगी फोटोज , घरातल्याचे फोटोज शेअर करायला आवडेलच असं नाही.
माझा एक कलिग , त्याच्या आयुश्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या क्षणाचे फोटो काढून अपलोड करतो.
आता त्याचा मुलगा ३ वर्शाचा आहे , मुलगा जन्माला आला त्याच्या दूसर्या तिसर्या दिवसापासून त्याच थोपु वर अकाऊन्ट आहे .

"तुम्ही तुमच्या मुलीचा फोटो कौतुकाने शेअर करता नी जगाच्या पाठिवर कुठेतरी मुलांची खरेदी-विक्री करणारे त्याच फोटोचा वापर करुन तुमच्या मुलीचा सौदा करत असतात. तो सौदा पक्का झाला तर तुमच्या मुलीचे कधीही अपहरण होऊ शकते."

ही घटना खरी आहे मी क्राइम पेट्रोल मध्ये ह्या घटनेवरचा एपिसोड पाहिलाय
सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोल मध्ये फेसबुकवर टाकलेल्या फोटोंचा गैरवापर करून गुन्हे घडल्याच्या अनेक केसेस दाखवल्या गेल्यात
आमच्या घरी कुणीच कुठल्याही सोशल साईटवर कधीच फोटो टाकत नाही

ही घटना खरी आहे मी क्राइम पेट्रोल मध्ये ह्या घटनेवरचा एपिसोड पाहिलाय
सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोल मध्ये फेसबुकवर टाकलेल्या फोटोंचा गैरवापर करून गुन्हे घडल्याच्या अनेक केसेस दाखवल्या गेल्यात>> बापरे, वाचून पोटात गोळाच आला, मी आपली टाकतेय फोटो मुलीचे चेपुवर.
पण कस्काय काय आणि चेपू काय, कुठेही फोटो टाकले कि ते कुठेतरी सेव होतातच. इमेलच त्यातल्या त्यात सेफ असेल.

फोटो शेअर न करणे यातील २ क्र. मधे मी येते Sad
आई आणि काही जवळची मित्रमंडळी यांना क्र. २ मधे तथ्य वाटते , मी त्यांच्या भावनेचा आदर करून विशेष फोटो चे.पू वर टाकत नाहि.
ह्या व्यतीरीक्त, जास्त फोटो, उठसूठ प्रत्येक एवेंट्चे फोटो टाकायला अजिबात आवडत नाही, कारण प्रायवसी भंग होते असे वाटते.
दर दिवशी फोटो आणि लोकेशन अपडेट करणार्यांचा वैताग येतो.
काही वर्षांपूर्वी, १ जणीने मला अनफ्रेंड केले, कुठून तरी कारण कळाले, की ती रोज फोटो, अपडेट वगैरे टाकते, पण मी दिवाळी, नवीन वर्ष वगळता फारसे लाईक आणि प्रतिसाद देत नाही, मग अशी मैत्रिण काय कामाची? म्हणुन तिनी अनफ्रेंड केलं! Happy
देव अशा इम्मॅचुअर लोकांना सद्बुद्धी देवो,आणि प्रमाणाबाहेर सोशल मिडिया वापरणार्यांना ही जमिनिवर आणो!

पियु, तुम्ही मांडलेले मुद्दे रास्तच आहेत.
मी फक्त दुसरी बाजू मांडते. शेअर करण्यातले तारतम्य आणि पॅरानॉईया यातील सीमारेषा आपली आपण ठरवावी हे मान्यच.
मला पॅरानॉईड दृष्टीकोन तत्वतः मान्य नाही. रस्त्यावर रोज अपघात होतात म्हणून आपण रस्त्यावर चालायचे थांबवतो, की मुलांना रस्त्यावर चालू देत नाही ?
म्हटले तर प्रत्येक गोष्टीत धोके आहेत. हाँ आता लोकं अतिअपडेट करतात हे मान्यच. पण दोन्ही बाजूंनी अतिरेकच आहे एकुणात.

असो. मी करते फोटो शेअर. थोडेफार अपडेटस लिहीते.

  • दूरदेशी असलेल्या आईवडलांना, इतर जेष्ठ नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आनंद होतो. मुलांच्या आयुष्यात काय नवीन गंमत सुरु आहे हे पाहून बरं वाटतं. अलिकडे कुटुंबातील लग्नसमारंभानिमीत्ताने फार वर्षांनी नातेवाईकांशी भेट झाली. पण फेसबुक अपडेटसद्वारे इतकी वर्ष होऊन गेली असे वाटत नाही. तू लिहीलेस की बरं वाटतं गं असे बर्‍याच लोकांनी सांगीतले. (तुम्ही(ही) लिहा. मलाही बरं वाटत. पत्र, ईमेल, फोटो, पोस्ट वाट्टेल ते लिहा आणि संपर्कात रहा.)
  • अलिकडेच एका मैत्रिणीला थोड्या वर्षांनी भेटायचा योग आला. तरीही आमच्या मुलांचे काय सुरु आहे सध्या ते माहित होते, आणि दोघींनाही एकमेकींच्या मुलांशी गप्पा मारायला मजा आली. फोटो पाहिलेले होते, पोस्टी वाचत होतो आणि सहज पुन्हा आपसूक गोवल्या गेलो. मुलंही आमच्याद्वारे एकमेकांच्या संपर्कात आहेत.
  • कार्यक्षेत्रामुळे, बर्‍याचदा स्थलांतर करावे लागल्यामुळे मला लोकांना प्रत्यक्ष भेटणे शक्य होईलच याची शाश्वती नाही. खरंच बरं वाटतं कोणी गमती/ फोटो मधून मधून शेअर करत राहिले की.
  • तसेच फार खाजगी काही आहे असेही नाही. मुलांच्या थोड्या गमती, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांचे शाळेतले चिल्लर उपक्रम, क्राफ्ट, चित्र, नाच, गाणी, अमुक ढमुक.. यात काय मोठं आहे? पण त्यातूनच जिवाला बरं वाटतं, हे मात्र खरं. connected राहिल्याची निर्माण होते. सगळ्याच मुलांचे कौतुक वाटते. पुन्हा प्रत्यक्ष भेटताना, अरे आता कुठुन बरं सुरुवात करावी हा प्रश्न येत नाही. शेवटी तो एक गोफ आहे आणि भावबंध ही आहे.
  • मला जिवलग आणि मौल्यवान मैत्र सोशल मिडियाद्वारे गवसले आहेत. आणि यांच्याशिवाय आयुष्य फार एकसुरी झाले असते. स्नेहाला मोल नाही.
  • दूर देशातल्या भाचेपुतण्यांशी, स्नेह्यांच्या मुलांशी त्यांच्या अपडेटसद्वारे संपर्क राहतो. मजा वाटते नवीन पिढीला अनुभवायला. कधी थोडी देवाण-घेवाण होते.

असो. ही एक फेज आहे कदचित. मायबोली ही एक फेज होती तशीच. सध्या शेअर करते. नंतर कदाचित बंद करेन कोणास ठावूक. एक दिवस फोफाईल डिलीट करुन टाकेन. सांगता येत नाही.

अधन -मधन थोडेफार फोटो मित्र-मैत्रिणी पुरते शेयर करावेत.

बाकी सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोल मध्ये फेसबुकवर टाकलेल्या फोटोंचा गैरवापर करून गुन्हे घडल्याच्या अनेक केसेस दाखवल्या गेल्यात>> हे खरे आहे मी पण हे एपिसोड पाहिले आहेत.

बरे विषयाशी संबंधित आहे म्हणून सांगते. सावधान आणि क्रा.पे. ह्यावरच्या सगळ्या कथा पूर्ण खर्‍या नसतात. राईचा पर्वत करण्याचा प्रकार अनेकदा असतो. (इन फॅक्ट बरेच लेखक दिग्दर्शक हे लिहायला लागले की स्वतः भीतीच्या सावटाखाली जगायला लागतात.) पण अर्थात लेखक जर तसा विचार करु शकतो तर गुन्हेगारसुद्धा करु शकतो (भारी क्रीएटिव्ह असतात की नाही गुन्हेगार आणि भरपुर हुषार सुद्धा फक्त दोन्ही गोष्टी नको तिथे वाया जातात. असो, तर) शिवाय समजा गुन्हेगाराला सुचलच नाही तर आयडिया द्यायला ह्या सिरियल्स आहेतच. असो. हा मुद्दा नाहीच्चे.

लहान मुलांचे किंवा मोठ्यांचेही (चित्रविचित्र पोझेस मधले) फोटो शेअर करावेत की नाही हा सेफ्टीच्या दृष्टीने खुप कॉम्ल्पिकेटेड प्रश्न आहे.

आपण रस्त्यात चालत असताना आपल्याला माहित असतं का कोण कुठे किती क्षमतेचा कॅमेरा घेउन उभं आहे आणि आपले किंवा आपल्या मुलांचे फोटो काढत आहे की नाही. आणि त्या फोटोचं ते काय करत आहेत? टेक्नॉलॉजी वापरणं गेल्या पंधरा वर्षातच इतकं स्वस्त झालय की.... आपण घरातून बाहेरच पडू नये. इन फॅ़क्ट घरात असताना सुद्धा खिडक्यांवर पडदे लावून बसावे. नाहीतर समोरच्या बिल्डिंगमधून एखादा टेलिस्कॉपिक कॅमेरा वापरून शूट करेल आपल्या घरातल्यांचे फोटो. (मी सार्कॅस्टिकली सांगत नाहीये. आपण पदोपदी अनसेफ कसे आहोत ते सांगतेय. तेव्हा प्रत्येकाने तारतम्य वापरुन फोटो सोशल साईट्स वर टाकावेत किंवा न टाकावेत. पण नाही टाकले म्हणून आपण सेफ आहोत असा समज कोणी करुन घेउ नये.

सो ह्या प्रश्नाचं सरळ ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट उत्तर देणं कठीणे.

दीड्मांशी सहमत आहे.

आपले फेसबुक फ्रेड सर्कल सुद्धा आपल्या रीयल लाईफ फ्रेंड्सचेच असावे असे माझे स्पष्ट मत आहे. फेसबुकवर प्राईव्ह्सीचे उत्तम सेटींग्ज आहेत त्याची माहिती घेतली आणि वापर केला तर गैरवापर होण्याची शक्यता शून्य!

>>>> आपल्या घरातले लग्न/कार्य/समारंभाचे फोटोचे अल्बम आपण नाक्यावरल्या "पब्लिक लायब्ररीत" नेऊन ठेवाल काय? उत्तर जे येईल, त्यानुसार आपल्या फोटोंचे फेसबुकावर प्रदर्शन मांडायचे का, ते ठरवता येईल. <<<<<<
अगदी अगदी दीडम्या......... (या अशाच उत्तरांमुळे तुझे बाकीचे पटत नसले तरी मी तुझ्या पोस्टवर नजर ठेऊन अस्तो...)

रैना, मस्तं पोस्ट.

मला फोटो वगैरे शेअर करायला आवडत नाहीत जास्तं, पण व्हॉटसप प्रोफाईलला बर्‍याचदा प्रोफाईल फोटो बदलून लावते.
ते फक्त आपल्याच काँटॅक्ट लिस्टमधील लोकांना दिसतील असा ऑप्शन आहेच.

बाकी खूप घाबरून फोटो शेअर न करण्यात फारसं तथ्य आहे असे वाटत नाही.
हां , व्यक्तिगत निवड जरूर असू शकते स्वतःचं आयुष्य किती सार्वजनिक करावं याबद्दल.

वेलचा मुद्दा आवडला.
आपल्याला माहित नसतानाही आपले फोटो शेअर केले जात असतात.
मुलांच्या शाळेतून त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे फोटो त्यांचा फेबु अकाऊंटवर असतात.
मॅडमच्या वॉटस अ‍ॅप प्रोफाईलवर असतात.
कामाच्या ठिकाणचे फोटो बाकीची मंडळी शेअर करतात त्यात आपण असतो.
एखाद्या समारंभाच्या फोटोत असतो.
आणि खरेच रस्त्यावर जात असताना फोटो घेतले जातात, जाऊ शकतात.
मुलांना डॉमिनोज, मॅक्डोनाल्ड्स मध्ये नेल्यावर तिथला स्टाफ कौतुकाने बलून्स /कॅप इ . देऊन फोटो काढतो तेव्हा पॅरानॉईड सारखं 'ए, फोटो घेऊ नका', असं सांगणं बरं वाटत नाही.

बाहेर फिरताना वगैरे तर 'आंटी, तुमच्या छकुल्यांबरोबर एक फोटो घेऊ का?' असे बर्‍याच अनोळखी मुलींनी आणि क्वचित मुलांनीही विचारलंय. अजूनतरी नाही म्हणाले नाही.
(मुलगी थोडी मोठी झाल्यावर म्हणावे लागेल पण! Wink )

रैना, मस्त पोस्ट +१

मी उसगावात असतानाच बरेच ट्रिप फोटो शेअर केले होते फेबुवर ..आता १-२ वर्षात फारच कमी झालयं स्टेटस अपडेट, फोटो टाकणं..
माझ्या फ्रेंडलिस्टमधील थोडी लोक तर देवळात गेलं तरी लोकेशन टॅग करतात फेबुवर.. थोडा अतिरेक आहेच

>>> आपण रस्त्यात चालत असताना आपल्याला माहित असतं का कोण कुठे किती क्षमतेचा कॅमेरा घेउन उभं आहे आणि आपले किंवा आपल्या मुलांचे फोटो काढत आहे की नाही. <<<<
वेल, हा मुद्दाही बरोबर आहे. Happy

वेल आणि साती- तुमचे म्हणणे पटले. +१
शाळेबाबत, इतर पालकांबाबत अगदी अगदी. शाळाच बर्‍याचदा फोटो टाकते.

काही मार्गदर्शक तत्वे. अजून अ‍ॅड करा लोकहो. सगळ्यांनाच उपयोगी पडतील. पियू, कृपया नंतर ती वरती चिकटवा.
- इतरांच्या (अगदी सख्ख्या बहिणीच्याही का असेना) मुलांचे फोटो त्यांना न विचारता काढू नये आणि न विचारता डकवू नये. परवानगी मागीतलेल्या लोकांनी ती सहसा नाकारली नाही, हा अनुभव आहे.
- इतरांच्या मुलांचे फोटो त्यांना विचारल्याशिवाय शेअरही करु नये. मधून मधून ज्येष्ठ नागरिकांना आठवण करुन द्यावी लागते याची. Wink
- आपली मित्रयादी कसून तपासावी. आणि दर वर्ष सहा महिन्यातून चेक करत करावी.
- नवीन व्यक्तिला मैत्रयादित समाविष्ट करायच्या आधीच नीट विचार करावा.
- त्या अ‍ॅपची सर्व सिक्युरिटी आणि प्रायव्हसी फीचर्स माहित करुन घ्यावीतच.
- मुलांना स्वतःचे अकाऊंट उघडण्याबाबतचे विचार आणि किमान वय इतर बाबींबाबत कौटुंबिक विचारविनीमय होणे गरजेचे आहे.

मुलगी थोडी मोठी झाल्यावर म्हणावे लागेल पण

>> सुरक्षिततेच्या मुद्द्यामुळे का?

माबोवरचे अनेकजण थोपुवर अ‍ॅडेड आहेत ज्यांना मुले आहेत. काहीजण आवर्जुन फोटो शेअर न करणारे आहेत आणि काहीजण करतात. पण बहुतेक मला अ‍ॅड असलेल्या कोणी इथे अजुन मतप्रदर्शन केले नाहीये. Uhoh

सो ह्या प्रश्नाचं सरळ ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट उत्तर देणं कठीणे.

>> वेल, तू तुझ्या मुलाचे फोटो शेअर करतेस का? का? आणि तुला मुलगी असती तरी हेच (करणे / न करणे) निवडले असते का?

विहीरीच्या कठड्यावर बसलेल्या लोकांना, तोपर्यंत विश्वास बसत नाही की ते विहीरीच्या कठड्यावर बसले आहेत, जोपर्यंत ते विहीरीत पडत नाहीत.

जेम्स बॉन्ड.. तिरकस बोलण्यापेक्षा आपले म्हणणे स्पष्ट शब्दात मांडले तर बरे होईल. आपला मुद्दा कळला.
परंतु तरीही.. तिरकस लिहिणे टाळा. कृपया. धन्यवाद.

मी स्वतः माझ्या मुलीचे आणि स्वतःचे फोटो शेअर करत नाही. आधी एक दोन केले आहेत तितकेच.(त्यांनी काढलेल्या आणि रंगवलेल्या चक्रम चित्रांचे करते.)
दृष्ट लागते पेक्षा 'माझ्या फ्रेंड लिस्ट मधल्या २००-३०० बाकीच्यांना काय पडलीय फोटो पाहायची आणि आवडायची' या भावनेतून शेअर करावेसे वाटत नाहीत. ज्यांना ते बघून आनंद होतो त्यांना प्रत्यक्ष भेटीत किंवा पिकासा वरुन शेअर केलेले आहेत.
कोणी टॅग केले असले तर चालते.गृप म्हणून फोटो फेबु वर आलेले चालतात.
मोठे झाल्यावर मुलीचा चॉइस आयुष्यातली प्रत्येक गोष्ट फेबु वर शेअर करणे हा असेल तर अडवणार नाही. सिक्युरीटी सेटिंग आणि संभाव्य धोक्यांची माहिती देऊण ठेवेन.

पियु ते तुमच्या साठी नाही. नोंद घ्यावी.
असपण ताज्या ताज्या बाळाचे लवकरात लवकर फोटो काढुन कुठे ना कुठे टाकायची हौस लोकांनी कमी केली तर उत्तम.
अश्यात त्याला असल्या उपकरणांपासुन शक्यतो दुर ठेवलेले चांगलेच नाही का, तो मोबाईलचा कॅमेराचा फ्लॅश वगैरे त्रासदायक ठरु शकतो(जर वापरला असेल तर).

@ पियु - मुळात आपले कींवा आपल्या मुलांचे फोटो सार्वजनिक करण्यामागची कारणे लिहु शकाल का? जर काही व्हॅलिड कारण नसेल तर का करायचे असले काही?

तुमच्या नातेवाईकात, मित्रांमधे जर फोटोदाखवयाचे असले तर इमेल वर पाठवायचे.

मला तर काहीच कारण दिसत नाही फोटो वैगरे करण्यासाठी.

तुम्ही तुमच्या मुलीचा फोटो कौतुकाने शेअर करता नी जगाच्या पाठिवर कुठेतरी मुलांची खरेदी-विक्री करणारे त्याच फोटोचा वापर करुन तुमच्या मुलीचा सौदा करत असतात. तो सौदा पक्का झाला तर तुमच्या मुलीचे कधीही अपहरण होऊ शकते.
>>>>
हे नक्की असेच चालते का? म्हणजे मी क्राईम पेट्रोल वगिअरे नाही पाहिलेय. पण लॉजिकली हे तुलनेत कठीण वाटते. म्हणजे आधी फेसबूक फोटो उचलून कुठल्याही मूलाचा सौदा करणे आणि मग तो सौदा ठरल्यावर ते मूल अपहरण करायला जमतेय का प्रयत्न करणे. यापेक्षा जे अपहरण करायला सोयीचे आहे त्याचा फोटो स्वत:च काढून सौदा करणे, आणि सौदा जमल्यास ठरल्या प्लाननुसार अपहरण करणे सोपे नाही का?

पण तरीही सुरक्षिततेच्या द्रुष्टीने येस्स, काळजी घ्यायलाच हवी. शेअर करूच नये असे नाही, पण आपण नक्की काय माहीती शेअर करतोय याचे भान करून ठेवावे.

संभाव्य धोके एकदा जाणून घ्यावेत. त्यानंतर घाबरायचे तर किती घाबरायचे, काळजी घ्यायची तर किती घ्यायची हे ज्याच्या त्याच्या स्वभावावरच आहे..

मुळात आपले कींवा आपल्या मुलांचे फोटो सार्वजनिक करण्यामागची कारणे लिहु शकाल का?
>>>>

सेल्फी विथ डॉटर Happy
यामागचे कारण लिहायची गरज नसावी

@ पियु - मुळात आपले कींवा आपल्या मुलांचे फोटो सार्वजनिक करण्यामागची कारणे लिहु शकाल का? जर काही व्हॅलिड कारण नसेल तर का करायचे असले काही?

>> टोचा.. माझी याबाबत कोणतीही ठाम भुमिका (अजुनतरी) नाही. उलट मीच दोन्ही बाजुकडील भुमिका/ विचार/ मतमतांतरे समजुन घेण्यासाठी हा धागा काढला आहे. मला माझ्या संपर्कात असलेल्या पालकांनी पाल्यांचे फोटो शेअर करण्या किंवा न करण्याची जी कारणे सांगितली.. ती मी वर लिहिली आहेतच (दोन्ही बाजुंची).

त.टि. वर रैना यांच्या पहिल्या पोस्टीत शेअर करण्याची त्यांची कारणे त्यांनी लिहिली आहेत.

Pages