'संकेत' कथेचा या आधीचा पहिला भाग - http://www.maayboli.com/node/56790
____________________________________
तर ही फक्त सुरुवात.
त्या दिवशी पेडणेकरांसोबतची ती मिटींग मी आटोपतीच घेतली. शेवटपर्यंत तो निळा शर्ट, शाईचा डाग, चमकते डोळे, कागदाची पुडी आणि ती तीन मडकी.... सगळे तिथेच होते. माझ्या शेजारी, अवती-भवती, आत-बाहेर...
मिटींग संपवून मी जातानाही ते सगळे तिथेच होते. पण मी निघाले. मनाला दरडावलं... मन हिरमुसलं. मग मनाला कडेवर घेऊन... मी निघाले. एक नव्यानं भेटलेली बोचरी, काटेरी पोकळी कडेवर हिरमुसून बसलेल्या मनाला वेढा घालत होती... लहानसहान बुडबुडे एकत्र येऊन एक पोकळ अवकाश निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. पण मला कसे कळावे? संसर्ग झालेला होता...
माझ्या रस्त्यात त्या दिवसापासून अचानक कुठूनश्या उगवलेल्या मातीच्या मडक्यांच्या हारी, रांजण, माठांचे अडथळे चुकवत, ओलांडत, भेलकांडत, फुटक्या खापरांच्या तुकड्यांपासून तळपाय जपत घरी पोचले. कुलूप उघडून आत गेले. मनाला कडेवरून उतरवून मोकळं सोडलं आणि त्याला पुन्हा उधळलेलं पाहून जरा बरं वाटलं. हं....
आबा म्हणायचा... "ह्ये मन ल्हानग्या पोरावानी असतंय बग इंदे. त्यास्नी बांदून तर ठेवावं लागतंय पन अश्या तरेनं की त्याला तर मोकळंच वाटलं पायजेल. आपलं लक्ष हाय याचा त्याला धाक असायला हवा पन त्रास वाटाया नगं. न्हायतर ते बिथरतंय. आन बिथरलंकी मंग शहान्यासुरत्या मानसाचं माकड करतंय."
आबा हे असलं काय काय सारखंच सांगत असायचा. आम्ही तिघी भक्तीभावानं ऐकत रहायचो. कधी कळायचं, कधी काहीच कळायचं नाही. काही न कळल्याचे भाव चेहर्यावर आले की आबा आम्हाला हसून जवळ घ्यायचा आणि म्हणायचा.... "काय बी कळालं न्हाय तरी हरकत नाय पोरींनो. पण हे शबूद मात्र ध्येनात र्हाउद्यात. कदितरी गरज पडंल तवा सवताहूनच कळंल तुमास्नी मी काय बोलत हुतो त्ये... मला इसरलात तरी चालंल. माजं बोलनं इसरू नगा कदी."
आबाचा आवाज कधी कधी बोलता बोलता मधेच जडशीळ व्हायचा. कधी कधी मधेच तो मळक्या सदर्याच्या बाहीला डोळे पुसायचा. आम्हा तिघींनाही मग गोंधळल्यासारखं व्हायचं. त्यापेक्षा "ए टवळ्यांनो..." करत आमच्या मागे काठी घेऊन धावणारा आबा बरा वाटायचा.
आबा व्यवसायानं कुंभार होता. चिखलाला आकार देऊन मडकी बनवायचा. चाकावर फिरणार्या चिखलाच्या गोळ्याला गरगर फिरवत वर उचलायचा... गोल करायचा... कधी त्यावर नाजुकशी नक्षी सुद्धा उमटवायचा. मी, कावू आणि गोदी डोळे फाडून निरखत रहायचो आबाच्या हाताची किमया. एकदा कावूनं विचारलं त्याला... "तुला कसं काय कळतं रं आबा... एवढ्या मोठ्या चिखलाच्या ढिगार्यात कंचे कंचे आकार लपलेले हाईत त्ये?" आबा हसला आणि मंग डोळे मोठ्ठाले करून, हाताची बोटं आमच्या तिघींच्याही डोळ्यांसमोर नाचवत म्हणाला, "जादुगार हाय म्या. सगळं समजत असतंय मला. कळ्ळं?"
खरंच आबाला सगळं कळायचं. अगदी आरशातल्या प्रतिमेसारख्या तंतोतंत एकमेकींसारख्या दिसणार्या आम्ही तिघी बहिणी. तिळ्या. एकवेळ कावू जरा नीट पाहिली तर वेगळी ओळखू यायची. पण मी आणि गोदा तर अगदी एकाच साच्यातून काढल्यासारख्या...! पण आबाला बरोब्बर कळायचं... इंदू कोण, कावू कोण आणि गोदा कोण!
आबाला त्याहीपेक्षा जास्त बरंच काही माहीत असायचं. आम्हा तिघींची मातीखालून कुठेतरी एकेमेकींची कायमची जोडली गेलेली अदृष्य नाळ... त्याला ठावूक होती. एकीचा पाय मुरगाळला तर तिघी लंगडत चालायच्या आणि एकीलाच विनोद सांगितला तरी तिघीही हासू लागायच्या... एकाच वेळी... असं विचित्र अवघड नातं. भलतीच गुंतागुंत.
आमची आई... त्याची लाडकी लेक.... ती येणार आहे हेही आबाला आधीच समजलं होतं म्हणे. आणि ती मरणार आहे हेसुद्धा! आबा खरोखरच जादुगार!
___________________________________
रात्री उशीरापर्यंत काम करत बसले होते. तास उलटत गेले. खिडकीबाहेर गडद होत जाणारा अंधार घट्टपणाच्या सीमा गाठून पुन्हा मावळतीला लागायची तयारी करू लागला तेंव्हा कधीतरी मी भानावर आले. चुरचुरणारे डोळे आणि पाठीला लागलेली रग. हे नेहमीचंच. शेजारी आदल्या रात्री खाल्लेल्या सॅन्डविचच्या कागदाचा रिकामा बोळा तसाच पडलेला. अंग ताणून आळस देताना माझी नजर त्या बोळ्याकडे गेली आणि पुन्हा आठवली ती कागदात गुंडाळलेली तीन मडकी. मातकट, साधी, अगदी साधी!
अवघडून गेलेलं अंग अंथरुणात टाकताना माझ्याआधीच निजून गेलेल्या मनाला ओढून कुशीत घेतलं तेंव्हा त्याच्या आतलं पोकळ जाळं माझ्याही चेहर्यावर पसरलं. मी पसरू दिलं. आता त्याकडे बघायला तिथे होतं कोण? निपचित झालेलं मन काहीसं चुळबुळलं तेंव्हा त्याला कुशीत घेऊन मी एक गोष्ट सांगू लागले... ’तीन मडक्यांची गोष्ट!’
’एक असतो समाज! लहान मोठ्या कच्च्या पक्क्या मडक्यांनी बनलेला.
त्यात असतात काही घडे, काही घट, काही माठ, काही हंडे, काही रांजण आणि काही कुल्हड... सगळी मडकीच.
काही शोभेची, काही उपयोगाची, काही ओली, काही भाजून भक्कम झालेली, काही रंगवलेली, काही सजवलेली, काही भरलेली, काही पोकळ...
काही उतरंडीत मांडलेली, काही कोपर्यात... एकटीच.
आपापल्या विश्वात... आपापल्या डोहात तरंगणारी, बुडणारी.
काही खोल विहिरींमध्ये हरवलेली. काही खळाळत्या पाण्यासोबत दूर वाहत जाणारी.... धबधब्यातून कोसळून चूर होणारी... चिखलात रुतून बसलेली... वगैरे वगैरे.
काही मडक्यांना तडे गेलेले.
पुढे काय झालं.....?
एकदा... आकाश नावाचा प्रचंड, महाप्रचंड घट अचानक तडकला. तडकला म्हणजे फुटलाच! चाबकाच्या काड-काड फटकार्यांनी भले-प्रचंड तडे गेले त्या घटाला आणि खापराचे असंख्य टोकेरी बोचरे तुकडे अवकाशात उधळले. घट फुटला आणि त्याच्या आत आजवर अधांतरी कोंडलेलं वादळ मोकळं झालं. धोधो कोसळलं. बदाबदा वाहिलं. ओलं-सुकं, कच्चं-पक्कं, खरं-खोटं, नवं-जुनं... सगळं त्या वादळात सामावून गेलं. उरली ती नुसती खापरं... छोटी मोठी.
पृथ्वी नावाच्या मजबूत घागरीचं बंद तोंड जरासं किलकिलं झालं आणि सगळी फुटकी खापरं तिच्या पोटात... निपचित! निर्धास्त! आता चिंता नाही कसलीच, कधीच. आणि त्या फ़ुटक्या खापरांतच रुतून बसलेली ती तीन मडकी... छोटीशी, साधीशी... कुठे कुठे तडकलेली, पण अजुनही हट्टाने तगलेली. खापरांत रुपांतर न झालेली!’
.............. ग्लानी चढत गेली. मी, माझं मन आणि सरत आलेली रात्र... एकमेकांच्या कुशीत... निपचित... आपापल्या पोकळ्या उशाशी जपत.
____________________________________________________
आबानं आम्हा तिघींना मातीची इवली इवली खुप सारी भांडी-बोळकी बनवून दिली होती. आम्ही तिघीही गावातल्या देवळाच्या सावलीत जामदारांच्या यमी, सुधा आणि बाळीसोबत दुपारभर भातुकली खेळायचो. गुरवांचा पशा आणि देशमुखांचा रवीसुद्धा असायचा बर्याचदा आमच्यात. पशा घरातला मोठ्ठा माणूस... त्याचं सगळ्यांनी ऐकायचं. मी आणि गोदा स्वयंपाक करायचो. कावू आणि यमी बाळाला सांभाळायच्या आणि रवी-सुधा नवरा-बायको बनून आमच्याकडे जेवायला यायचे. पशा मोठ्ठ्या माणसासारखा भारदस्त आवाज काढून म्हणायचा... "ऐकलं का? पावणं आल्यात. चहा टाका. आन जेवनाचंबी बगा!"
कधी कधी भुमिका बदलायच्या. पण घरातला मोठ्ठा माणूस हा पुरुषच असायचा. तो ’माणूस’ असतो ना... बाई कुठे माणूस असते?
शाळेत बाईंनी शिकवलेलं होतं... 'man' म्हणजे ’माणूस’. ’woman' म्हणजे ’बाई’.
देवळाच्या भिंतीशी थाटलेला तो लुटुपुटूचा संसार... संसार करण्याचा सगळा अनुभव तिथवरच मर्यादित राहिला. पण त्या निमित्ताने कळलं तरी.... घर कसं असतं, कुटूंब काय असतं, नाती कशाला म्हणतात.... आणि घरातल्या लोकांत प्रेम पण असतं म्हणे.
आम्ही तिघी आणि आबा हे सुद्धा एक कुटुंबच आहे हे सुधाने आम्हाला सांगितलं. सुधा आमच्यात वयानं मोठी आणि शहाणी सुद्धा. ती म्हणाली तुमच्या चौघांचीही आडनावं सारखी आहेत आणि तुमच्यात प्रेम पण आहे. त्यामुळे तुम्ही ’कुटुंब’ आहात. आम्हा तिघींनाही जाम अभिमान वाटला होता तेंव्हा. पण पशाला ते पटायचं नाही. तो म्हणायचा आबाचं आडनाव ते आमचं आडनाव नाहीच मुळी. बापाचं आडनाव लावायचं असतं... आजाचं नाही काही... त्यामुळे आमचं खरं आडनाव वेगळं आहे आणि त्यामुळे आम्ही ’कुटुंब’ होत नाही. ’प्रेम’ वगैरेबद्दल तो काही बोलायचा नाही. पशा स्वत:ला फारच अतिहुशार समजायचा.
मी आबाला विचारलं एकदा त्याच्या गळ्यात पडून. "आबा... आमचं खरं आडनाव कोणतं रे?" तेंव्हा आबा अचानक डोलायचा थांबला. त्यानं मला मांडीवर घेऊन विचारलं... "कागं बाळा... आपलं आडनाव आवडत नाय व्हय तुला?"
"आवडायचं काय न्हाय आबा.... तो पशा म्हन्तो आपल्या बापाचं आडनाव ते आपलं आडनाव असतंय. तु तर आमच्या आयचा बाप हाईस... मग आमच्या बापाचं आडनाव काय हुतं?"
आबा थोडासा दुखवल्यासारखा वाटला. माज्या चेहर्यावरून हात फिरवत म्हणाला... "आडनावापाशी काय असतं इंदे... तुमची नावं ठेवली म्या. गावभर तुमाला समदे काय म्हून वळखत्यात? तर आबा कुंभाराच्या नाती. मग ज्याच्या नावानं जग आपल्याला वळखतं त्याचं ज्ये आडनाव त्येच आपलंबी आडनाव व्हतंय. आन आडनाव असतंय त्ये लोकास्नी दाकवन्यासाठी. च्यार लोकांच्यात तुमाला वळख यावी म्हून. साळंत संपूर्न नाव नोंदवावं लागतंय ना... म्हून. त्यायेगळा काय बी उपेग नाय बग आडनावाचा."
"पन आबा... तरिबी सांग की. आमच्या बापाचं आडनाव काय हुतं? त्याच्या नावानं का न्हाई वळखत कुनी आमास्नी?" माजे प्रश्न संपेचनात.
"कारन लाज वाटती त्या मुडद्यास्नी तुमचा बाप म्हनवून घ्याची... कळ्ळं?"
आबाच्या आवाजाला धार चढली. मी गप्प झाले. तसा आबा परत मला जवळ घेऊन नेहमीच्या मायाळू आवाजात म्हणाला... "बाळा... कितीबी केलं तरी तुमचा आय-बाप न्हाय होऊ शकत म्या ते कळतं मला बी. मी आपलं माझ्याच स्वार्थापाई तुमा तिघीस्नी जीव लावतुय. माज्याच पापांचं थोडंतरी वझं उतरतंय का बगतुय. तुमच्याबगर जगन्याचं काई कारनच नवतं ना...! मी न्हाय बा घडवत तुमाला. तुमीच माज्या आयुष्यात आल्यापास्नं येक रुतलेलं, गंजलेलं माज्या जल्माचं चाक पुना फिरू लागलं आन या बसक्या फुटक्या आयुष्यानं पुना आकार घ्येतला. तुमचं रिन हाय बाळांनो माज्यावर. त्येवढं उतरावं म्हून येवढा लळा लावतो तुमास्नी. मी हाईतो मलाच बाप आन आय समजा. कंदितरी मोठ्या व्हाल... जग मंग तुमाला तुमच्या नावानं वळखील. तवा ह्ये आडनाव खुशाल टाकून द्या." आबाच्या डोळ्यातून टपटप थेंब माझ्या मस्तकावर पडले आणि मला मीच फार फार दुष्ट आहे असे वाटू लागलं.
आबा जे बोलला त्यातलं सगळंच मला समजलं नसेलच तेंव्हा. पण हा विषय आबाकडे पुन्हा कधीही काढायचा नाही हे मात्र ठाम ठरवलं त्या दिवशी.
नंतर नंतर आम्ही पशासोबत खेळणं घेणं बंद केलं.
_____________________________________________________
क्रमशः
_____________________________________________________
पुढ्चा भाग - http://www.maayboli.com/node/56845
खुप वेगळे आहे हे
खुप वेगळे आहे हे ले़खन..
आबाचे तत्वज्ञान चटका लावणारे..."तुमीच माज्या आयुष्यात आल्यापास्नं येक रुतलेलं, गंजलेलं माज्या जल्माचं चाक पुना फिरू लागलं आन या बसक्या फुटक्या आयुष्यानं पुना आकार घ्येतला. तुमचं रिन हाय बाळांनो माज्यावर. त्येवढं उतरावं म्हून येवढा लळा लावतो तुमास्नी. मी हाईतो मलाच बाप आन आय समजा. कंदितरी मोठ्या व्हाल... जग मंग तुमाला तुमच्या नावानं वळखील. तवा ह्ये आडनाव खुशाल टाकून द्या "
कथा माहेर दिवाळी अंकात
कथा माहेर दिवाळी अंकात वाचलेली... पारितोषिक मिळालेलं
होना? तूच ती? सॉरी लेखिकेचं नाव आठवत नाही... पण मडक्यांचा कन्सेप्ट, आबाचं साधं सरळ थेट तत्वज्ञान आणि कथानायिकेचं ठाशीव आणि वेगळ्या बाजातील पात्र फार आवडलेलं... अजून अजून जपून ठेवलेली ही कथा!!
मागच्या दिवाळीत वाचली आहे ही
मागच्या दिवाळीत वाचली आहे ही कथा. वेगळी आणि छान आहे.
आबांचे पात्र चटका लावते.
नायिका..इथेच आसपास बघितलेली आहे असे वाटते पण तरिही अनोळखी आहे.
या वेळची 'गुब्बी' ही कथा पण अशीच आहे.
अशीच म्हणजे...खर तर कथा पुर्ण आहे पण अपुर्ण आहे असे वाटत राहते, हुरहुर लावते.
काही तरी वाचायच राहिल अस वाटुन २ दा वाचल्या होत्या दोन्ही कथा.
मुग्धमानसी--आपले लेखन आवडतेय मला.
कथा संग्रह किंवा अजुन काही प्रकशित असेल तर नावे विपु कराल का?
मनःपुर्वक धन्यवाद! 'संकेत' ही
मनःपुर्वक धन्यवाद!
'संकेत' ही माझी कुठल्याही मासिकात प्रकाशित झालेली पहिलीच कथा. मेनका प्रकाशनच्या सुजाताताईनी ही कथा नुस्ती स्वीकारलीच नाही तर या कथेला पारितोषिकही दिले. लेखनाचा माझा हुरूप वाढला तो आधी मायबोलीकरांमुळे आणि आत्मविश्वास मिळाला तो या कथेमुळे! त्यामुळे ही कथा मला विशेष जवळची आहे.
या कथेवर अनेकांनी आवर्जून प्रतिसाद दिले. खूप सारे कौतूकाचे आणि काही टिका करणारेही फोन आले. ओळखीचे आणि अनोळखी अनेक वाचक मला मिळाले. त्या सार्यांची मी ऋणी आहे.
नीरा>> माझा कथासंग्रह वगैरे काही प्रसिद्ध नाही अद्याप. पण एक कवितासंग्रह आहे. त्याबद्दल खालच्या लिंकवर लिहिलेय बघ...
http://www.maayboli.com/node/49257
खुप वेगळे आहे हे ले़खन.. छान
खुप वेगळे आहे हे ले़खन.. छान