जागा
काल दिवसभर पायपिट करुन मी संध्याकाळी सात वाजता घरी जायला निघालो तर ती वेळ म्हणजे पीक आवर्सची होती. ट्रेन खच्चून भरलेली होती. इतक्या गर्दीतही मला बसायला जागा मिळाली म्हणून मला फार हायसे वाटत होते. अजून दोन मिनिटात मला पेंग येईल असे वाटत होते पण समोर एक भारतिय जोडपे नुकतेच शिरले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या दोन लहान मुली होत्या. एक प्रॅममधे बसून बडबड करत होती तर दुसरी सुस्त वाटत होती. तिने जांभळा लेग ईन्स घातला होता आणि त्यावर प्रिन्टेट कुरता होता. ती खूप गोड दिसत होती. तिला जागा देऊ की नको देऊ ह्या मन:स्थित असताना एक दोन ट्रेन स्टेशन निघून गेले. मग मी उठलो आणि त्या मुलीला जागा दिली. फेसबुकवरचे मेसेज वाचेपर्यंत ती मुलगी तिच्या बाजूला बसलेल्या एका चिनी मुलीच्या खांद्यावर डोके ठेवून झोपी गेली होती. क्षणभर मला वाटून गेले की हीला तेंव्हाच जागा द्यायची होती.
इतक्यात एक ८० च्या दरम्यान असलेले आजोबा ट्रेनमधे शिरले. ते शिरताच राखीव जागेवर बसलेला एक तरुण मुलगा उठत त्या आजोबांना बसा म्हणत होता पण आजोबा अगदी आनंदाने नाही मी दमलो नाही तू बस असे त्याला हसून प्रसन्न मुद्रेने खुणावत होते.
आयुष्यात दम खावून अर्थात आपल्याला हवे तेवढे सुख उपभोगून, पण खूप नाही, ते सुख इतरांना .. अर्थात गरजूंना घेऊ द्यावे. गरज नसेल तर त्याच्या हव्यास करु नये!