कोकणात गौरी गणपतिचा सण खूप उत्साहात साजरा केला जातो पण आमच्याकडे नवरात्र गणपती पेक्षा ही जास्त उत्साहाने साजरे केले जाते. त्याच काय आहे .... आम्ही रहायला कोकणात पण आमची कुलदेवता आहे लांब मराठवाड्यात.... अंबाजोगाईची श्रीयोगेश्वरी. आमच्या आधीच्या पिढ्या आर्थिक टंचाई आणि प्रवासाची अपुरी साधन यामुळे कुलदेवतेच्या दर्शनाला कधी जाऊ नाही शकल्या म्हणून मग लाड, कौतुक उत्सव सगळं घरातल्या देवीचचं करायची प्रथा घातली गेली असेल. या वर्षी नवरात्रात कोकणात गेले होते. तो अनुभव इतका सुंदर होता की इथे शेअर केल्याशिवाय रहावत नाहीये.
नवरात्राच्या तयारीची सुरवात एक दीड महीना आधीच अभिषेकाला लागणार्या तिळाच्या फुलांची आणि झेंडुच्या फुलांची रोपं लावुऩ होते कारण नवरात्रात या दोन्ही फुलांचं महत्व आहे. नवरात्राच्या दोन दिवस आधी देव्हारा , त्या वरची मांडवी आणि देवघराची साफ़ सफाई केली जाते. आमचा देव्हारा खूप जुना आहे १८४५ सालातला. देव्हार्यावरच्या पितळी पट्टीवर देव्हारा घडवणार्याचं नाव, माझ्या आजे सासर्यांचं नाव आणि हे साल ( वर्ष ) कोरलेलं आहे.शिसवी लाकडापासुन बनवलेला आणि कोरीव कामाने नटलेला हा देव्हारा थोडासा जरी पुसला तरी अजुन ही अगदी चमकायला लागतो. देव्हार्यावरची मांडवी ही आंब्याचे टाळे, सुपारीची शिपटं, असोला नारळ, कुर्डुच्या फुलांचे तुरे यांनी सुशोभित करतात. नवरात्रात झेंडुच्या फुलांची माळ मांडवीच्या ज्या हुकाला लावली जाते तो हुक ही मजबूत आहे ना याची खातरजमा केली जाते. देव्हार्यावर विजेच्या दिव्याच्या लुकलकणार्या माळा सोडल्या जातात. देव्हार्यातल्या देवाना उजाळा दिला जातो. पूजेची उपकरणी, नऊ दिवस अखंड तेवणारी समई घासुन पुसुन लख्ख केली जातात. उत्सवमुर्ती देवीचे दागिने ही उत्सवासाठी उजळले जातात. आमच्याकडे नऊ ही दिवस ब्राह्मण, सवाष्ण जेवायला असतात. त्यांना ही सुपारी देऊन अगत्याने निमंत्रण दिले जाते. स्वयंपाक घरात ही प्रसाद तयार करणे, इतर पूर्व तयारी करणे अशी धामधुम चालु असते. घरात एकंदरच चैतन्यमय उत्साह असतो.
पहिल्या दिवशी पहाटे उठुन , स्नान करुन मगच पुजेसाठी आगरातुन फुलं आणली जातात. पाच सहा प्रकारच्या जास्वंदी , तगर, कर्दळ , गोकर्ण , सोनचाफा , सोनटक्का , प्राजक्त , गुलाब, दु्र्वा , तुळस, बेलपत्र यांनी परडी भरुन जाते आणि देवघरात यांचा संमिश्र सुवास दरवळायला लागुन वातावरण एकदम प्रसन्न होतं .
From mayboli
From mayboli
कुर्डुFrom mayboli
सहस्र कुर्डु तुरे
From mayboli
पहिल्या दिवशी जो पूजा करेल तोच पुढे संपूर्णा पर्यंत पूजा करतो. याला घटी बसणे असे म्हणतात. सकाळी गुरुजी येऊन देवीची पोडषोपचारे पूजा ,अभिषेक, देवीचे सहस्रनाम पठण , ( त्यावेळेस तिळाची किंवा कुर्डु ची फुलं प्रत्येक नावागणिक वहातात) नंदादीप प्रज्वलन , झेंडूची माळ लावणे , आरती इ. कार्यक्रम होतात आणि नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो. समईच्या शांत प्रकाशात देवीपुढे नतमस्तक होताना तिची कृपा आपल्यावर नेहमीच राहिल या विचाराने खूप आश्वस्त वाटतं.
दुपारी ब्राह्मण, सव्वाष्ण , घरातली मंडळी, प्रसादासाठी आलेली पाहुणे मंडळी यांची माजघरात पंगत मांडली जाते. निगुतीने वाढप केलेली केळीची पानं पंगतीची शोभा वाढवितात. हसत खेळत जेवणं होतात. नऊ ही दिवस कांदा लसूण विरहीत स्वयंपाक असतो. पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी रस-वडे, घारगे आणि लाल भोपळयाची भाजी, पंचमीला तांदळाच पक्वान्न जसं की मोदक किंवा घावन घाटलं, अष्टमीला पुरण हे ठरलेल असतं. इतर दिवशी मग खीर , केशरीभात ,श्रीखंड- पुरी असं काही ही करतात.
संध्याकाळी परत स्नान करुन सोवळयाने देवीची सायंपूजा करतात आणि त्या नंतर सगळयांच्याच लाडक्या आरतीच्या कार्यक्रमाला सुरवात होते. आरती साठी झांजा तर असतातच पण आमच्याकडे पेटी, तबला आणि मृदंग ही असतात जोडीला. घरातलीच मुलं वाजवतात. त्यामुळे आरत्या खुप रंगतात. नेहमीच्या आरत्या तर म्हणतोच पण एक खुप जुनं आरत्यांच पुस्तक आहे आमच्याकडे त्यातल्या ही आरत्या म्हणतो. त्यापैकी " अरे माझ्या गोपाळकृष्णा" ही कृष्णाची, " महालक्ष्मी करवीरक्षेत्री ज्योतिरुप आहे " ही महालक्ष्मीची आणि " जाहले भजन आता नमीतो तव चरणा" हे निरोपगीत माझ्या विशेष आवडीचे. आरत्यांना एक मेंबर अगदी न चुकता हजर असतो तो म्हणजे आमचा जॉनी. मुलांनी झांजा वाजवाय्ला सुरवात केली की हा ओटी आणि माजघर याच्या उंबरठ्यावर पुढचे दोन पाय टेकवून जो बसणार तो आरत्या संपल्या कीच उठणार.
ललिता पंचमीच्या दिवशी नेवैद्य संध्याकाळी असतो. संध्याकाळी ललितेच्या प्रतिमेची सत्यनारायणाच्या पूजेसारखी पूजा असते. चौरंगावर कलश मांडुन त्यावर ताम्हनात ४८ सुपार्या आणि ललितेची प्रतिमा ठेवतात आणि तिची षोडशोपचारे पूजा करतात. या पूजेसाठी इतर पूजा साहित्या बरोबर ४८ दुर्वांच्या जुड्या आणि ४८ प्रकारची पत्री लागते. आमच्या आगरातच यातील पुष्कळशी झाडं आहेत. या दिवशी संध्याकाळी सहा साडेसहालाच पंगत बसते.
अशा तर्हेने नऊ दिवस कसे जातात आणि संपूर्णाचा दिवस कधी येतो ते कळत ही नाही . संपुर्ण नवमीला असते. ते कधी दसर्याच्या दिवशी तर कधी त्याच्या आदल्या दिवशी येते . ह्या वर्षी दसर्याच्या आदल्या दिवशी संपूर्ण झाले. उत्तर पुजा झाली की नवरात्र समाप्ती होते.
पण तरीही दसर्यामुळे उत्साह टिकुन असतो. दसर्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही घरच्या वहानांसाठी , दाराला लावण्यासाठी, लहान मुलांच्या सायकलींसाठी वगैरे घरीच केले हार. ते रात्री काठीला टांगुन खळ्यात ठेवले होते, रात्री त्यावर दव पडल्यामुळे ते दुसर्या दिवशी ही छान टवटवीत राहिले होते.
From mayboli
दसर्याच्या दिवशी वहानांची , सायकलींची, पीसीची वगैरे पूजा केली जातेच पण आमचा प्रमुख व्यवसाय शेती आणि बागायती. शेतीच्या अवजारांप्रती कृतज्ञता व्यक्त करायला दसर्या सारखा दुसरा उत्तम मुहुर्त कोणता ? म्हणुन त्या दिवशी कुदळी , फावडी, विळे, कोयते वगैरे सर्व अवजारं घासुन पुसुन एका खोलीत मांडली जातात आणि त्यांचे ही मनोभावे पूजन केले जाते. हा फोटो.
From mayboli
दसर्याच्या दिवशी काढलेली रांगोळी
From mayboli
संध्याकाळी घरातले सगळे पुरुष आणि मुलगे सीमोल्लंघनासाठी बाहेर पडतात. गावच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन गावच्या सीमेवर असलेल्या आपट्याच्या पानांचं सोनं घरी आणतात . ते प्रथम देवाला वाहुन मग घरातल्या सर्वांना देतात आणि मग हा उत्सव संपतो.
असा हा दहा दिवसांचा सण उत्साहात साजरा होतो. पण उत्सव संपला की एक प्रकारचं रितेपण येतं, आणि का ते कळत नाही पण एक प्रकारची हुरहुर मात्र लागतेच...
छान लिहिलेय...
छान लिहिलेय...
प्रतिसादासाठी सर्वांचे परत
प्रतिसादासाठी सर्वांचे परत एकदा आभार.
कांडेचोर लहानपणी खूप पाहिलेत.
कांडेचोर लहानपणी खूप पाहिलेत. अंधारात त्यांचे डोळे म्हणजे बॅटरीचे झोतच वाटतात. साखरजांभाचं एक झाड होतं तिथे यांची रात्री मेजवानी सुरु असायची.
सुंदर
सुंदर
सुंदर. वर दिनेश, नंदिनी आणि
सुंदर. वर दिनेश, नंदिनी आणि इतर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे निर्मळ, प्रसन्न लेखन. सुजनतेचा प्रवाह सतत झुळझुळत असतो तुमच्या लेखनात. हे सर्व निगुतीने करणारी घरातली माणसेही तशीच असणार.
केवळ कुतूहल म्हणून एक प्रश्नः तुमच्याकडे धान्य रुजवत नाहीत का? घट बसणे ऐकले-पाहिले आहे. त्यात धान्याच्या रुजवणामध्ये मातीचा अथवा धातूचा पाण्याने भरलेला घट स्थापन करतात. घटी बसणे म्हणजे काय असते?
ममो,खूप सुंदर लेख.आदि शक्तिची
ममो,खूप सुंदर लेख.आदि शक्तिची अभिव्यक्तिच तुझ्या माध्यमातून झाली असे वाटले.त्या आदि मायेच्या सौंदर्य व आनंद लहरी तरलपणे जाणवून गेल्या.साधे सरळ सुंदर लेखन.जे सुंदर तेच शिव,व तेच सत्य.आणखी काय लिहु?शारदेच्या वरदहस्ताचा मान ठेव व अशीच आनंददयी लिहीत रहा,.
छान लेख.
छान लेख.
ममो, खूप छान लिहिता. सर्वच
ममो, खूप छान लिहिता. सर्वच फोटो खूप सुंदर आहेत.
केवळ कुतूहल म्हणून एक प्रश्नः
केवळ कुतूहल म्हणून एक प्रश्नः तुमच्याकडे धान्य रुजवत नाहीत का? घट बसणे ऐकले-पाहिले आहे. त्यात धान्याच्या रुजवणामध्ये मातीचा अथवा धातूचा पाण्याने भरलेला घट स्थापन करतात. घटी बसणे म्हणजे काय असते?>>
हिरा आमच्याकडे हीच पद्धत आहे. नऊ धान्य - ह्यामधे प्रामुख्याने मका, हिरवा हरभरा, अख्खे उडीद, मुग, तिळ, गहू, साळीचे तांदूळ, वाटाणे - ही धान्य वापरतात. मातित एकजीव करुन मधे खळ करुन त्यात कलश मांडतात. त्या कलशावरच नऊ माळा वाहतात. रोज एक अशी. देवीचा फोटो असला तर असला पण नसला तरी हरकत नाही. आपल्याकडे देवीचे अनेक रुपे आहेत.
आभार सर्वांचे परत एकदा.
आभार सर्वांचे परत एकदा.
शोभा, आमच्या कडे ही आगरात चिकवीणीवर नाहीतर माडावर दिसतात कांडेचोर कधी कधी.
आमच्याकडे घटात धान्य पेरायची पद्धत नाहीये, हीरा. नऊ दिवस जो देवीची पूजा करणार असतो तो घटी बसलाय असं म्हणतात. उदा ह्या वर्षी मोहन घटी बसलाय वगैरे. घटी कोण बसणार याची उत्सुकता असते सगळ्याना. घटी बसलेली व्यक्तीच नऊ ही दिवस नवरात्राचे सगळे धार्मिक विधी करते. तसचं पूर्वी ह्या व्यक्तीवर खूप निर्बंध ही असत जस की ह्याने आमचा वहाळ नऊ दिवस ओलांडायचा नाही. पायात चपला घालायच्या नाहीत वैगेरे. आता कालपरत्वे काही गोष्टी कमी झाल्या आहेत तरी ही नवरात्रात पूजा रोज निदान तास भर तरी चालते त्यामुळे तेवढ बसण्याची शारिरीक कपॅसिटी असावी लागते जो घटी बसणार असेल त्याची.
मीरा, खूप छान प्रतिसाद. शारदेचा वरदहस्त तुझ्यावरच आहे असं वाटलं मनापासून तुझा प्रतिसाद वाचल्यावर
ममो, खुप प्रसन्न वाटलं लेख
ममो, खुप प्रसन्न वाटलं लेख वाचून.. मनात पुन्हा एकदा कोकणातलं नवरात्र उभं राहिलं
मस्त वर्णन इतके सोपस्कार
मस्त वर्णन
इतके सोपस्कार स्वतः करण्याची कुवत नसली तरी करणार्यांचं कौतुक वाटतं.
खूप सुंदर लेख. तुमच्या
खूप सुंदर लेख. तुमच्या लेखाबरोबर मन ही कोकणात पोहोचले.
' जाहले भजन..' हे निरोप गीत माझेही फेव्हरेट
' अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो...' ही आरती नवरात्रात खास करून म्ह्णायला जास्त आवडते.
खूप सुंदर लेख ! अगदी त्याच
खूप सुंदर लेख ! अगदी त्याच वातावरणात गेल्यासारखे वाटले. घरच्या नवरात्राची आठवण झाली. लेखनाची शैली पण छान आहे. फोटो सुद्धा सुंदर. हे वातावरण आता दुर्मिळ झाले आहे. ज्यांना अजूनही मिळते ते नशीबवान.
सुंदर लेखन!
सुंदर लेखन!
आभार सर्वांचे परत एकदा.
आभार सर्वांचे परत एकदा.
सामी, हो. ' अश्विन शुद्ध पक्षी ' ही आरती ही आवडते नवरात्रात म्हणायला. खूप छान वर्णन आहे त्यात अंबेचं
हेमाताई खुप छान लिहिलंय
हेमाताई खुप छान लिहिलंय (नेहमीप्रमाणेच) आणि फोटोही साजेशे

फुलांची रांगोळी बेस्ट
फार सात्विकसुंदर वर्णन .
फार सात्विकसुंदर वर्णन . नेहमी सारखच सडासारवणावरच्या ताज्या रांगोळीगत वृत्ती प्रसन्न करणारं लिखाण.
मस्त.
मस्त.
नेहमीप्रमाणेच मन प्रसन्न
नेहमीप्रमाणेच मन प्रसन्न करणारं लेखन! अशीच लिहीत रहा कोकणस्पेशल ....
व्वा हेमा ताई, लेख वाचुन आणि
व्वा हेमा ताई, लेख वाचुन आणि प्र.ची पाहुनच ईतके प्रसन्न वाटले..:)
तीळाच्या फुलाचे आणि कुर्ड्याचे महत्व तुम्च्या मुळे कळले..
खुप साधसच पण थेट मनापर्यंत पोचणार वर्णन...
ती फुलांची परडी, हार , अस्त्र पुजा सारेच छान.
फुलांची रांगोळी अप्रतिम..
आमच्या कडे देखिल ९ दिवस सवाष्ण, ब्राम्हण आणि कुमारिका असते जेवायला.. रोज सव्वाष्णीला न चुकता पाच पानाचा गोविंद विडा दिला जातो.. शेवटच्या दिवशी तीची खणा नारळाने ओटी भरतात..
माझ्या जावे कडे नवरात्र असत आणी माझ्या कडे गणपती..
आमच्या कडे देखिल ९ दिवस सवाष्ण, ब्राम्हण आणि कुमारिका असते जेवायला.. धान्य फराळ असतो, म्हणजे दुध घालुन दशम्या आणि दोन भाज्या, चटण्या कोशिंबीरी, गोड, आणि पिवळा फोडणी दिलेला तांदुळ फोडणीचे वरण असा प्रसाद असतो.. शेवटच्या दिवशी वडा पुरण... रोज सव्वाष्णीला न चुकता पाच पानाचा गोविंद विडा दिला जातो.. शेवटच्या दिवशी तीची खणा नारळाने ओटी भरतात.
.
आम्ही जवळ जवळ ५ दिवस आरतीला हजर असतो..रोज सकाळी गुरुजी येतात, शप्तशतीचे पाठ होतात..
पंचमीला आमच्या कडे गोळा तांदुळ असतो, शष्टीला फुलारा करतात, अष्टमीला बायका उपास करतात, संध्याकाळी फळांची आरती असते.. ९ दिवस नुसती धाम घुम असते शेवटच्या दिवशी ५० च्या आसपास लोक प्रसादाला येतात..त्या दरम्यान कुठुन एवढे बळ येत कोण जाणे, ती शक्ती देते म्हणुन सारे काही व्यवस्थीत पार पडते.:)
सुंदर वर्णन! तुमच्या घरचं
सुंदर वर्णन! तुमच्या घरचं नवरात्र अनुभवायला मिळालं असं वाटलं. प्रसन्न आणि सात्विक... नेहमीप्रमाणेच!
व्वा सुंदर वर्णन आणि फ़ोटो
व्वा सुंदर वर्णन आणि फ़ोटो
खुप छान सांगितलयसं ममो.. वाट
खुप छान सांगितलयसं ममो..
वाट बघत होती या धाग्याची.. शेवटची सेज तर बेहद्द मस्त जमलीए..
मला पण तुझ्या घरातल्या देवीच्या आरतीत उभ राहण्याचा फिल आला
धन्स सर्वांना. सायु,
धन्स सर्वांना.
सायु, तुझ्याकडचं नवरात्राचं वर्णन वाचुन ही खूप छान वाटलं. नोकरी संभाळुन हे करण म्हणजे तुमची खरचं कमाल आहे . आमच्याकडे आम्ही पाच सहा जणी घरच्याच असतो त्यामुळे काम ही विभागल जातं. पण खरचं, त्या दिवसात कुठुन शक्ती येते कळत नाही . कष्ट नाही जाणवत हे मात्र खरं .
टीना, सायु रांगोळी आवडल्याच सांगितलत त्याबद्दल स्पेशल थँक्स. कारण तुमच त्या क्षेत्रातलं कौशल्य बघुन मी थक्क होते.
फार छान लेख . कोकणातल्या
फार छान लेख . कोकणातल्या आमच्या घरच्या नवरात्राची आठवण झाली .
खूप सुंदर लेख.!!
खूप सुंदर लेख.!!
वाचून खुप प्रसन्न
वाचून खुप प्रसन्न वाटले....त्या वेगवेगळ्या आरत्या पण शक्य झाल्यास द्याल का?
<<यातले निरोपगीत माहिती आहे, स्पेशल आरत्या मायबोली वर देता येतील का?>>> अगदी मला हेच म्हणायचे होते
या आरत्या पहिल्यांदाच ऐकतेय.... " अरे माझ्या गोपाळकृष्णा" ही कृष्णाची, " महालक्ष्मी करवीरक्षेत्री ज्योतिरुप आहे " ही महालक्ष्मीची इ.
कोकणातल्या उत्सवांत माणसाचं
कोकणातल्या उत्सवांत माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं खुलून दिसतं व तें तुम्ही फारच छान उलगडून दाखवलंय !
(No subject)
Pages