अधिक आषाढ शुद्ध पौर्णिमा (२ जुलै)
आज मनालीला जायचे होते. मी गाडी घेऊन निघालो. हॉटेल थोडे खड्ड्यात होते. तिथून वर जाणारा चढ थोडा जास्तच होता. माझी गाडी वर चढेना. मधेच ब्रेक दाबून थांबलो तर खाली रेती असल्याने मागे घसरू लागली. म्हटल आता मेलो, मागे खड्ड्यात जाऊन पडणार. कशी बशी हाफ क्लच व ब्रेकवर गाडी थांबवून धरली होती. तेवढ्यात मागून कोणितरी गाडीला पकडले व त्याने पण जोर लावला. आता गाडी वर निघाली. म्हटल चला उजवा पाय न टेकवता गाडी वर आणु शकलो हेही नसे थोडके. थोड्या वेळाने टंडीचा पेट्रोल पंप लागला. पण आज कोणाला पेट्रोल भरायची गरज दिसत नव्हती. त्यामूळे दुरुस्तीवाहनातून पेट्रोल आणलेच नव्हते. आता एक रस्ता उजवीकडून येऊन मिळाला. तिथे पाटी होती कझा एवढे एवढे किलोमीटर. म्हणजे या रस्त्यावरून मी स्पितिच्या शेवटी येणार होतो व इथून परत आत्ताचा रस्ता करून मनालीला जाणार होतो. इथून आता परत चढ सुरू झाला. वाटेत मस्त धबधबे, झुळूझुळू वहाणारे झरे होते आणि खाली नेहमीच असणारी नदी होतीच. मी फारसा गाडीवरून उतरलो नाही कारण चालायला, उभ रहायला त्रास होत होता. पण एका ठिकाणी झऱ्याचे पाणी प्यायला उतरलो होतो. शेवटी आपल्याकडील बाटलीतील पाणी पिणे वेगळे व नैसर्गिक झऱ्याचे वेगळे. इतक मस्त स्वच्छ आणि थंड होत की क्या कहेने !
हवामान एकदम स्वच्छ होता, पाऊस, बर्फ काही नव्हत. त्यामूळे रोहतांग घाट चढायला काहीच त्रास झाला नाही. खरतर या घाटात प्रचंड त्रास होतोच होतो अस ऐकून वाचून होतो. कारण इथे सारखा पाऊस पडतो व चिखल चिखल होतो. त्यातून गाडी हमखास घसरतेच एक दोन वेळातरी, नाहीतर बर्फवृष्टीत अडकतो, नाहीतर गेलाबाजार रोहतांगला तुफान पर्यटक असल्याने दोन चार तास अडकून पडावे लागते असे बरेच ऐकले होते. हुश्श... असल कहिही न होता शिखर गाठल. तुफान गर्दी होतीच पण मधून निट वाट ठेवलेली होती वाहने जायला. आता बऱ्याच दिवसांनी आम्हाला खरे टुरिश्ट लोक दिसले. एकदा नुब्रात पाहीले होते. नेहमीप्रमाणे बर्फात लोक मजा करत होते. त्यांना खास बर्फात वापरायला म्हणून गमबूट, विमानाची दुरुस्ती करणारे घालतात तसा सदरा विजार असा एकसंध असलेला पोशाख, हातमोजे अस सगळ सामान भाड्याने पुरवणाऱ्या भरपूर टपऱ्या होत्या. बघुनच उबग आला. नेहमीच ट्रेकहून परत येताना जे वाटते ते वाटू लागले. चाललो परत त्या धबडग्यात. तिथे जराही थांबलो नाही. इथे फोटो काढायला दगडी फलक नव्हताच म्हणा. आणि मी उतरून बर्फात चालत जाणे वगैरे शक्यच नव्हते. मग जरा थोडे खाली उतरल्यावर फोटो काढले. इथून खाली सतत १८० कोनात वळत वळत जाणारा रस्ता मस्त दिसत होता. अजून थोडे खाली गेल्यावर फिरंगी लोक हवाई छत्रीने उड्डाण करत होते तिथे थांबलो. मग मात्र बराच वेळ सलग चालवली गाडी कारण मगाशी मी दोघांना म्हटले होते की मला जमल तर मनालीमधे लवकर पोचून अस्थितज्ञाला दाखवायचा आहे पाय. खूपच वेळाने एका हॉटेलमधे तद्दन पंजाबी जेवलो जसे सगळीकडे मिळते व खात्री पटली की आलो नेहमीच्या कंटाळवाण्या वातावरणात. अगदी इथपर्यंत ते भाड्याचे गमबूट, पोशाख देणारे होते. इथून मग मनाली जवळच होते, तिथे पोचलो, तो प्रसिद्ध पूल ओलांडला व विचारपूस करायला सुरवात केली हॉटेल बद्दल. थोडे पूढे जातो तर मागून आमची प्रवासी गाडी आली. ते पण पत्ताच शोधत होते. मग एकत्रच शोधत शोधत एका डोंगरावर चढत चढत शेवटी पोचलो हॉटेलला. खोली ताब्यात घेतली व आधी अंघोळ केली. खोली मस्त होती, त्याला बसायला प्रशस्त सज्जा होता, तिथून हिडिंबा देवळाची गर्द झाडी दिसत होती. ते देऊळ अगदीच अर्ध्या किलोमीटरवर होते.
पण आधी लगीन उजव्या पायाचे. अतुल लगेच चल जाऊया म्हणाला व आम्ही हॉटेलवाल्याकडे चौकशी करून लेडी विलिंग्डन मिशन रुग्णालयात पोचलो बाजाराजवळ माल रस्त्याच्या बाजूला. हसतमुख लोक होते तिथे. आधी अस्थितज्ञ म्हणाला काही गडबड वाटत नाहीये. कारण मी टाचेवर का होइना चालत होतो. पण म्हणाला क्ष किरण फोटो काढू. मग अतुलला त्याने चाकाची खुर्ची आणायला सांगितली. आयुष्यात पहिल्यांदा मी रुग्ण म्हणून चाकाच्या खुर्चीत बसलो. फारच हसायला यायला लागले. आणि अतुल माझी खुर्ची ढकलणार. हा हा हा... !
तिथे २ ४ शिकाऊ मुली होत्या. मग असा पाय नाही तसा ठेवा वगैरे बरच हसत खिदळत झाल्यावर क्ष किरण फोटो निघाले. मग बाहेर येऊन थोड्या वेळाने वैद्याने बोलावले व लगेच म्हणाला अस्थिभंग झालाय. म्हटल चला शंका खरी ठरली तर. मग लगेच त्याने तात्पुरते प्लास्टर घातले. आम्ही त्या प्रक्रीयेचे, खुर्चीत बसल्याचे पण फोटो काढले. आता मुंबईत गेल्यावर नेहमीचे प्लास्टर घाला अस सांगितल गेल. तिथे अजून एक आमच्याच संघामधला बाईकर आला होता. त्याला मनगटाला दुखापत झाली होती. पण नशीबाने त्याचे हाड तुटले नव्हते. आमच्यात एक माणूस तर कहर होता. त्याचे श्रिनगरला पोचायच्या आधी मांडीचे ऑपरेशन झाले होते. तरी तो आला होता, बाईक चालवली, व रोज संध्याकाळी मुक्कामी पोचल्यावर मलमपट्टी करायला त्याला २ २ तास लागत असत. कहर आहे.. जिद्द आहेच पण मी नसता बुवा केला असला उपद्व्याप !
तिथून अतुलच्या गाडीवर बसून हॉटेलवर परत आलो. द हाफ जायंटला, म्हणजे अजयला भेटलो. त्याला म्हटल मी काही आता स्पिति करणार नाहीये. आता अतुल अक्षय बरोबरच घरी परत जातो. तू काय करणारेस ते बघ. मग त्याचा पण उत्साह गेला व त्याने पण स्पिति रद्द करायच ठरवल. मी अतुल आणि अक्षय परत माल रस्त्यावर गेलो. मी तिथे सुरवातीलाच एक मोठे कारंजे आहे तिथे बसून राहिलो व हे भटकायला गेले. २ तासांनी परत आले काहिबाही घेउन. मग हॉटेलवर जाऊन जेवलो. निलेशला सांगितले चंदिगढला गाडी नेण्यासाठी कोणीतरी चालक बघ. मनालीत गाडी ट्रकमधे टाकायची सोय नाही व मंडीला आहे पण ते ११० किलोमीटरवर. त्यापेक्षा सगळ्यांबरोबरच जाऊ त्यांच जस ठरलय त्याप्रमाणे.
अधिक आषाढ कृष्ण द्वितीया (३ जुलै)
सकाळी पायाला प्लास्टीक बांधून अंघोळ केली. आता पूढे ४ आठवडे अशीच अंघोळ. जीवन बदलले होते. आपल्याला आपलच शरीर गृहीत धरायची किती सवय असते ते एकदम कळायला लागल. नाष्टा उत्तम होता, सिरिअल्स होती. मग हिडिंबा देऊळ बघायला बाईकवरून निघालो. सगळे नको म्हणत होते पण मला तस फारस काही वाटत नव्हत. पायऱ्या चढणार नाही अस म्हटल होत पण तिथे गेल्यावर रहावल नाही. खूपच मस्त परिसर आहे त्या देवळाचा. त्यामूळे गेलो वर २० २५ पायऱ्या चढून. मग पूढे जाऊन घटोत्कच मंदीर पाहील. खरतर तो फक्त पार आहे आणि दगड मांडले आहेत. मग तिथेच असलेल मस्त संग्रहालय पाहील. कोणी चिटपाखरू नव्हत तिथे त्यामूळे निवांत पहाता आल. खूपच छान गोष्टी होत्या तिथे. विशेषत:, जुन्या लडाखी ४ ५ मजली लाकडी घरांच्या प्रतिकृती होत्या. त्या अप्रतीम होत्या. मग गाड्या धुवायची टूम निघाली. म्हणून ते शोधत शोधत गेलो २ ४ किलोमीटर. तिथून परतताना वाटेत एका ठिकाणी हवा भरायला थांबलो तिथे पुण्याचा एक संघ भेटला. एकाची केटीएम ड्यूक होती ४०० सीसी. तिची सीट फारच छोटी होती मागची. इतक्या छोट्या सिटवर तो सगळ सामान कस काय लादु शकतो कुणास ठाऊक. आमच्या बरोबर दुरुस्ती गाडीतरी होती मोठी खोळ टाकायला. करतात बाबा लोक काय काय. कुच भी हो, लडाख होना मांगता !
मग माल रस्त्यावर जाऊन जेवायच ठरवल. आधी एका बर्गरवाल्या हायफाय हॉटेलात गेलो. पण तिथे फक्त अक्षयला खायचा होता म्हणून अपल पाय खाल्ला. मग दुसऱ्या हॉटेलात गुजराती थाळी, पंजाबी थाळी अस जेवलो. पण त्याही फारच वाईट होत्या. मग हॉटेलवर येऊन आधी स्पितिच्या नेत्याला फोन केला. म्हटल अस अस झालंय त्यामूळे माझ स्पितिला काही येण नाही आणि त्यामूळे अजय पण येत नाहीये. त्याने एक सुचवल, पण म्हटल की मिही तोच विचार केला की दुरुस्ती गाडीत बसून येऊ शकेन पण पाय दुखत असताना मजा पण येणार नाही आणि उगाच धोका घ्यायची माझी तयारी नाही. मेलो तरी बेहत्तर, हा काही माझा बाणा नाही. अर्थात हे त्याला नाही सांगितल. तो पर्यंत अजयने त्याच्या बायकोला सांगून माझ आणि त्याच विमान तिकिट बदलून घेतले होते. आता १६ तारखेला चंदिगढहून निघायच्या ऐवजी मी ६ लाच निघणार होतो. मग आम्ही फार महत्वाच्या गोष्टीसाठी, म्हणजे खरेदीसाठी परत माल रस्त्यावर गेलो. आधी सायबर कफेत जाऊन तिकिटे छापून आणली. आज मी पण बाजारात हिंडलो. आणि एक साक्षात्कार झाला. इथे आम्ही घेतलेल्या बाईक रायडींगच्या सगळ्या वस्तू खूपच स्वस्त होत्या. म्हणजे अगदी अर्ध्या किमतीत. उदाहरणार्थ, जे पायाचे संरक्षक अतुलने मुंबईत १४०० ला घेतले होते, तेच, अगदी तीच कंपनी तेच मॉडेल, तिथे ७०० ला होते. थोडक्यात काय, तर जर मनालीहून जाणार असलात लेहला तर सगळ तिथेच खरेदी करा. २ तास हिंडून झाल्यावर गाडीवर बसून हॉटेलच्या अर्ध्या वाटेवर पोचलो व मला आठवले की मी माझे जर्कीन कफेत विसरलो. मग अक्षय अतुल परत तिकडे गेले. तेवढ्यात मला स्पितिच्या नेत्याची, नितिनची बाईक दिसली पण स्वाराशी बोललो तर तो नितीन नव्हता. माझ जर्कीन चक्क मिळाल या दोघांना. मग हॉटेल व झोप. उद्या चंदिगढकडे कूच करायच होत. मगाशी निलेशने विशाल माझी गाडी चालवेल असे सांगितले होते.
अधिक आषाढ कृष्ण तृतीया (४ जुलै)
सकाळी नाष्टा केला, विशालकडे बाईकची चावी दिली. सगळ्या संघाचे एकत्र फोटो सेशन झाले . मग मी दुरुस्ती गाडीत जाऊन बसलो. बरोबर दुरुस्तीतज्ञ व चालक. गंमत अशी आहे की मी जेंव्हा लडाखला जायच ठरवत होतो, तेंव्हा मला फक्त मनाली ते श्रिनगर एवढच अंतर बाईक चालवायची हौस होती. मला जम्मु ते श्रिनगर किंवा चंदिगढ ते मनाली अजिबात इच्छा नव्हती. ते खूपच कंटाळवाणे असणार असे वाटत होते. ते नंतर खरही ठरल. आणि नशीब बघा की मी नेमके मनाली ते चंदिगढ अंतर गाडीत बसून जाणार होतो पण माझी बाईक मात्र चालवली जाणार होती. अर्थात, अस पाय मोडून तीच गोष्ट प्रत्यक्षात यायची काहीच गरज नव्हती. असो.
निघालो व बाईकर्स आणि आमचा संबंध तुटला. कोणीच दिसेना. डावीकडे व्यास नदी धावत होती. तिचा तोच २० वर्षांपूर्वी ऐकलेला धिरगंभीर आवाज ऐकून कान तृप्त झाले. २० वर्षांपुर्वी ऐकला होता तेंव्हा रात्रीच्या २ ३ वाजताच्या अंधारात ऐकला होता. तेंव्हा तो भयंकर घाबरवणारा होता. कारण आधी वाटलेच नव्हते की हा आवाज नदीचा असेल व समजले तेंव्हा भयानक वाटले होते. आत्ता मात्र दिवसा बघत असल्याने खूप मस्त वाटले ते खळाळते पाणी पाहून. कुलुला लगेच गाडी चालकाच्या नाष्ट्यासाठी थांबली. कहर म्हणजे तासाभरापूर्वीच आमचा नाष्टा झाला असुनही आमची प्रवासी वाहनातील मंडळी देखील नाष्टा हाणत होती. खाण्यासाठी जन्म आपुला ! मी काही गाडीतून उतरलोच नव्हतो. चांगला पाऊणतास पुतळा केल्यावर गाड्या सुटल्या परत एकदा. मग अचानक मला माझी बाईक दिसली. मी लगेच अतुलच्या कमेरातून विशाल व गाडीचा मस्त फोटो काढला. हा एक फोटो व नदीवरील एक दोन गमतीदार जुगाड केल्यासारखे दिसणारे पूल वगळता गाडीतून काही चांगले फोटो मिळाले नाहीत. ते अवघडच असता म्हणा. म्हणून बाईकवरून जायचे. कुठेही थांबून फोटो काढता येतो. आता औट बोगदा गेला. पलिकडे एक रस्ता डावीकडे गेला जो मी घेतला असता जर स्पितिला गेलो असतो. पण आज आम्ही उजवीकडे वळलो. मग वेगवेगळी गावे लागत गेली. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे व खूपच गावं असलेला आहे. कधी १० १५ किलोमीटरपण नव्हते निर्मनूष्य असे. फारच रुक्ष ! व आता कुलु नंतर चांगलेच उकडायला लागले होते. मी आपला डुलक्या काढत उकाड्याकडे दुर्लक्ष करत होतो. आमचा चालक भयानक चालवत होता, अगदी सगळे हिमाचली चालक चालवतात तसा. फास्ट और फ्युरिअस ! मधेच कुठेतरी त्याने चहासाठी म्हणून गाडी थांबवली पण ५ मिनिटातच निघालो. त्याने चहा प्यायलाच नाही. थांबलो होतो तिथे नदी होतीच. आणि दोन्ही बाजूला ऊंच पर्वत होते. दोन्हीकडे काही ऊंचीवर तुरळक वस्ती होती. आणि त्या दोन डोंगरांमधे, त्या दोन वस्त्यांमधे ऊंचावर एक जाडजूड तार बांधली होती. ती चक्क केबल कार होती. सामानाची वहातुक करायला. खाली नदीवर एक छोटा पूल होता झुलता पूल म्हणतात तसा. मस्त दृश्य होता. फोटो काही नीट काढता आला नाही. आम्ही कोणीच चहा न पिता निघालो. पूढे परत १० मिनिटांनी चालक थांबला व एका चहावालीच्या बाजूला जाऊन बसला. २ मिनिटातच परत आला. एव्हाना मला त्यांच्या बोलण्यावरून शंका आलीच होती, की ते काहितरी नशेचा माल शोधत आहेत. तो त्यांना त्या चहावालीकडे मिळाला व मग त्याची बिडी वळून ते पीत बसले. ती पिऊन झाल्यावर बहुधा चालकाचा उत्साह संपला असावा गाडी हाकण्याचा. कारण तो लगेच एका ठिकाणी थांबला व तिथे दुकानात गल्ल्यावर बसलेल्या मणसाशी बोलला. आता तो गायब झाला व दुकानदार चालक झाला. आधीच्या चालकाच्या जिथे तिथे ओळखी होत्या व दर १० मिनिटाला तो कोणाला ना कोणालातरी हाळी देत असे. या चालकाचे मात्र तसे नव्हते. ते बरेच झाले म्हणा, व हा चालक आरामात चालवत होता. इथे रस्त्यावर २ ३ वेळा गन घेऊन बसलेले वाहतूक हवालदार दिसले व ते चक्क लोकांना पकडत होते, पावती फाडत होते जोरात चालवल्याबद्दल. मला वाटत आमच्या प्रवासी वाहनाला पण थांबवल गेल होत.
अचानक एका बाईकरचा फोन आला. तो म्हणाला मी इथे इथे आहे व मला गाडीत बसायचे आहे. मग पूढे १० किलोमीटरवर तो होता त्या हॉटेलपाशी थांबलो, वेफर्स, आइस्क्रीम खाले. त्याला गाडीत जागा केली व निघालो. मग वाटेत मस्त काहिबाही स्थानिक फळे खात राहिलो. एका ठिकाणी पेट्रोल भरले व तिथून निघालो तर लगेचच्याच हॉटेलसमोर माझी गाडी दिसली. पण आम्ही जोरात होतो म्हणून थांबलो नाही. नंतर कळले की थांबलो असतो तर बर झाल असत. नंतर खूप उशीरा जेवायला थांबलो. तिथून पूढे एक स्वारघाट नावाचा घाट लागला. त्या घाटाच्या अगदी वर बरीच वस्ती होती, शासकीय कार्यालये होती. ही काय उन्हाळ्यात येऊन रहायची ब्रिटीशांची जागा होती की काय कोणास ठाउक. होती मात्र खूप छान जागा. महाबळेश्वरला आल्यासारखे वाटत होते. स्वारघाट उतरता उतरता परत माझी गाडी दिसली. विशाल पण आमच्या गाडीकडेच बघत होता. त्याने गाडी ओळखली व लगेच थांबायची खूण केली. मग रस्त्याच्या कडेला थांबलो. मधेच टाकीतून पेट्रोल येत नाहीये अस म्हणाला. त्यामूळे गाडी बंद पडली एक दोन वेळा मागे. मग दुरुस्तीतज्ञाने गाडी ताब्यात घेतली. १० मिनिटांनी गाडी चालू झाली. काही पॉईंट्स साफ केले फक्त. पेट्रोलचा काही त्रास नव्हता. मग विशाल पूढे गेला. एका ठिकाणी परत आमचा गाडीवाला थांबला. आता खर तर कधी एकदा हॉटेलवर जाऊन पोचतो असे झाले होते. घामाने सकाळपासून चिकचिकाट झाला होता. पण आता आपण चालकाच्या हाती. त्याच हॉटेलमधे आमचे प्रवासी लोक पण होते. म्हणजे गाडीवाल्यांचा हा नेहमीचा थांबा होता. प्रवासी गाडी असल्याने जरा गप्पा मारता आल्या. पहिल्यांदाच प्रवासी लोकांबरोबर बसलो होतो असा. नाहीतर बाईकवर असताना गेल्या १२ १३ दिवसात त्यांच्या बरोबर असे कुठे थांबलो नव्हतो वाटेत. तिथे अर्धा तास गेल्यावर निघालो. दरम्यान अतुलचा फोन आला होता की तो हॉटेलवर पोचला आहे पण इथे कोणीच आपले नाहीयेत. म्हटल तू नक्की पांचकुवा, झिरकपूरच्याच हॉटेलमधे आहेस ना. हो त्याच काही सांगता येत नाही. पण तो म्हणाला हो तिथेच आहे, आपल्या सगळ्यांची नावे पण आहेत इथे आणि खोली पण मिळाली आहे. म्हटल ठीक आहे मग. आम्ही तेंव्हा जवळपास ६० ७० किलोमीटरवर होतो अजून. आता चंदिगढच्या खूणा दिसू लागल्या पण प्रवास काही संपता संपेना. अगदी कंटाळा कंटाळा झाला तेंव्हा कुठे चंदिगढचा मुख्य बस थांबा दिसला. म्हणजे अजून २० ३० किलोमीटर जायचे होते. थोड्यावेळाने एक मात्र झाले की चंदिगढचे खरे नियोजनबद्ध रस्ते चालू झाले. मग जरा गाडी वेगात गेली. शेवटी पोचलो एकदाचे. बरच शोधाव लागल. तुफानी उकाडा होता. पण खोलीत वातानुकूलन यंत्र होते. ते नंतर आम्हाला तिथून बाहेर पडेपर्यंत चालूच ठेवावे लागले इतके २४ तास उकडत होते. छ्या, काल पर्यंत मनालीत काय मस्त थंड होत आणि आज एकदम कुकरमधे बसल्यासारख. भोजनकक्ष पण वातानुकुलीत होता ते बरे होते. एकूण हॉटेल जरा उच्च दर्जाचे होते. निलेश म्हणाला होता की गाड्या इथेच ठेवायच्या आहेत. वाहतूक करणारे इथून घेऊन जाणारेत. पण बऱ्याच लोकांना ते मान्य नव्हते. आपल्या समोर गाडीची बांधाबांध झाली पाहीजे असा आग्रह होता. मग तो सकाळी सांगतो म्हणाला.
अधिक आषाढ कृष्ण संकष्ट चतुर्थी (५ जुलै)
सकाळी एकदम आरामात उठलो. १० च्या आत खाली नाष्ट्याला जायचे एवढेच करायचे होते. त्यानुसार पावणे दहाला तिथे पोचलो. इथे पण सिरिअल्स होते त्यामूळे बरे होते. आणि माझा प्लास्टर मधला पाय पाहून तिथले सेवक मला जागेवर आणून देत होते. अर्थात, अतुल अक्षय देत होतेच. एकूण चांगली सरबराई चालू होती. नंतर माझी गाडी धुवावी अस ठरल. कारण ती मनालीत धुतली गेली नव्हती. मग माझी आणि अक्षयची गाडी घेऊन निघालो. जाऊन २ गाड्या धुवेपर्यंत अतुलला त्याची पण गाडी धुवावी अस वाटू लागल होत. आम्ही २ गाड्या धूवून मग एका मॉल मधे गेलो. कारण या दोघांना लस्सी प्यायचीच होती. मग एका कटानी नावाच्या हॉटेलमधे दहिवडे वगैरे खाल्ले व लस्सी प्यायलो. अगदीच साधारण होती. मग कोणाशीतरी बोलताना कळल की चंदिगढ मधे काही लस्सी प्रसिद्ध नाही. ते अमृतसरला. असो. तिथे जेऊन हॉटेलवर आलो. ४ वाजता बाईक द्यायला जायचे ठरले होते. त्यामूळे आता दगडांची बाग व सूखना सरोवर बघायला वेळ नव्हता. मग झोप काढून सव्वा चारला खाली आलो. निलेश म्हणला होता कोणाला तरी मी परत घेऊन येइन व तुझी गाडी घेऊन जाईन. पण मीच म्हटल मी चालवू शकेन ४ ५ किलोमीटर तर जायचे आहे. हो नाही करता करता निघालो मीच गाडी चालवत. पोचलो व्यवस्थित पण तिथे कोणीच नव्हते. मग त्यांची माणसे येइपर्यंत आम्ही नेलेले काही कपडे व काही पुठ्ठे यांनी गाड्यांचे दिवे वगैरे बांधले. मग ती लोक आल्यावर पूर्ण बांधाबांध केली. घामाने तर अंघोळ झाली होती पहिल्या १० मिनिटातच. पण एक बर झाल. आम्ही आमच काही सामान, म्हणजे १, २ विजारी, एक दोन सदरे, हातापायाचे संरक्षक, असे गाडीलाच बांधून टाकले होते. म्हणजे चरे उठण्यापासून संरक्षण आणि तेवढेच वजन कमी. हेल्मेट अर्थातच गाडीलाच बांधले होते जाता येताना. तुफान तहान लागली होती त्यामूळे थोडे तुफानी केले. म्हणजे, थम्स अप आणले होते सगळ्यांसाठी. सटासट संपले ते. मग मी निलेशच्या गाडीवरून हॉटेलला आलो तेंव्हा जवळपास ८ वाजले होते. तब्बल ४ तास मोडले या प्रकरणात. काही लोक सकाळीच नाष्ट्यानंतर गाडी करून दगडी बाग वगैरे बघून आले होते मधल्या वेळात. पण तसही आम्हाला एवढ काही उत्साह नव्हता त्या उन्हात फिरण्याचा, आणि मला जमलेच नसते चालायला त्यामूळे मी गेलोच नसतो. बाकिची मंडळी रिक्षा पकडून आली. आधी अंघोळ केली. मग जेऊन जरा अंगणात गप्पा मारत उभे रहिलो. उद्या मुंबईला जाणार, रहाटगाडगे सुरू होणार. निदान अक्षय अतुलसाठी तरी. मी घरीच असणार होतो. पण ते फक्त अक्षयलाच माहीत होते. मस्त गप्पा मारून झोपलो.
अधिक आषाढ कृष्ण पंचमी (६ जुलै)
सकाळी निवांतपणे नाष्टा केला व टक्सी केली होती ती आल्यावर निघालो विमानतळावर. तिथे गेलो तर अजून आमच्या विमान कंपनीच्या खिडक्या उघडल्या नसल्याने बाहेरील खुर्चींवर बसावे लागले १५ मिनिटे. मग आत गेलो. अक्षयचे विमान एअर इंडीयाचे होते. त्यांनी सामानाच्या वजनाचा घोळ घातला. केबिन आणि चेकिन सामानाचे एकत्रित वजन बरोबर मर्यादेत होते पण ते खोगीरला केबिन म्हणून घेउ देत नव्हते. मग शेवटी खोगीरात खोळीतले सामान भरले व खोगीर चेकीन केले. मला व अतुलला मात्र काही त्रास झाला नाही जेट एअरवेज मधे. मग दोघांची गेट्स एकच असल्याने एकत्रच जाऊन बसलो, बर्गर खाल्ला, कॉफी प्यायली. वर थोड्यावेळाने अतुलने लस्सी पण प्यायली. त्याचा काल निटसा भ्रमनिरास झाला नव्हता. त्याला अजून आशा होती. पण व्यर्थ. मग अक्षयचे विमान १५ मिनिटे उशीरा सुटल्याने आमचे गेट बदलले. आणि सरळ विमानात जाऊन बसलो असतो ते खाली जाऊन बाहेर १०० मिटर चालत जाऊन विमान पकडावे लागले. यामूळे अतुलला दोघांची खोगीरे घेऊन चालावे लगले. ती त्याने दोन खांद्यांवर दोन लटकावून नेली. माझ्या तिकिटावर जेवण लिहीले होते पण अतुलच्या नाही. त्यानुसार मला फूकट जेवण आले त्याला नाही. मी त्यातला एक कणही त्याला दिला नाही. हा हा.. विमान वेळेत मुंबईला पोचले. अतुल तिथेही काही खरेदी करायला बघत होता. पण फारच महाग असल्याने विचार सोडला. इथे बरीच मंडळी परत भेटली. फोटो काढून झाले. मग बाहेर आलो. अक्षयचे विमान दुसऱ्या टर्मिनलला येणार होते. मग त्याची वाट पहाट काहितरी कोल्ड्रिंक पीत बसलो. एक खतरी जोडपे दिसले. पांढरे टिशर्ट्स घातले होते. मुलाच्या छातीवर LO लिहीले होते व तिच्या VE. फार हसलो, काय काय हौस. आता अक्षय येइपर्यंत अतुलला धीर धरवत नव्हता. मग तो आल्यावर त्याला इकडच्या टर्मिनलला बोलावले. टक्सिवाल्यांना विचारले की एकाला ठाणे स्थानकापाशी, मला माझ्या घरी व अतुलला त्याच्या घरी असे सोडणार का तर २ जणांनी प्रत्येक थांबा वेगळा अस म्हणून १४०० रुपये सांगितले. मग अर्ध्या तासाने एक मुस्लिम चालक होता त्याने आम्हाला ७०० रुपयात सोडले. त्याला बिचाऱ्याला रोजा सोडायची घाई होती तरी अर्धा पाऊण तास उशीर होउनही नीट सोडले, जास्त पैसे घेतले नाहीत. घरी आलो तर रंगकाम काढले असल्याने घरात नुसता गोंधळ होता. पण तरी रहाता आले.
समारोप
काही दंतकथा …
१) लडाखमध्ये बुलेटच पाहीजे.…
कुठलिही १५० सीसी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेची दूचाकी पुरते. २ स्ट्रोक इंजिन असेल तर १०० सीसीही पुरतात. एक मुलगी भाड्याची यामाहा आर एक्स १०० घेऊन आली होती. मजेत खारदुंगला चढली.
२) सतत थुक्पा आणि मोमो खाववत नाही……
मला तर उलट हे दोन्ही पदार्थ फार आवडले व कधीही खाऊ शकत होतो.
३) लडाखमध्ये फक्त BSNL चालते…
सगळ्यात जास्त व्यापकता एअरटेलची होती. उलट BSNL कमी मिळत होते. आणि पंगोंग व सरचूला कोणाचेच चालत नव्हते
४) आपण एकदम तंदुरुस्त असायला पाहीजे.....
असच काही नाही प्राणवायूच्या संदर्भात बोलायचे तर. कारण अगदी धडधाकट माणसाला तो त्रास होऊ शकतो आणि कोणाला अजिबात होणार नाही तब्येत चांगली नसली तरी.
५) दुचाकी खूप लांबच्या अंतरांसाठी चालवायची भरपूर सवय पाहीजे.….
३, ४ लोक तरी असे होते ज्यांनी आधी ५०, १०० किलोमीटरच फक्त दुचाकी चालवली होती. ते सुध्ध्दा अधून मधून, रोज नाही. त्यांनी आरामात चालवली दुचाकी सगळ्या दिवशी. हेच खरय कि तुम्हाला ते करायची तीव्र इच्छा पाहीजे.
६) दुरुस्ती वाहन बरोबर आहे म्हणजे आपण काही हत्यार बरोबर न्यायची गरज नाही……
आमच्या दुरुस्तिवाहनात टायर काढायला २ मोठ्या कांब्या लागतात त्या नव्हत्या. आमच्या दुरुस्ती तज्ञाने ते माझे काम नाही म्हणून माझ्याकडे त्या गोष्टी नाहीत असच सांगून टाकल होत. त्याच्याकडे विनाट्युबच्या टायरचे पंक्चर काढायचे कीट पण नव्हते. तेंव्हा या काही गोष्टी त्या लोकांना मुद्दाम घ्यायला सांगा किंवा तुम्ही घेऊन जा. मी ते कीट नेले होते. खरतर या दोन गोष्टी सगळ्या दुचाकीना सारख्याच असतात. तरीही त्याच्याकडे नव्हत्या.
घरी आल्यावर २ दिवसात पक्के प्लास्टर घातले व आता महिन्याभराने काढून पण झाले. नुकताच मी परत माझ्या गाडीवर फ़िरू लागलो आहे. पैशांचे हिशोब पण चूकते झाले आहेत. परत आलो पण मन इथे लागतच नव्हते. तिकडचा भव्य निसर्ग सतत डोळ्यासमोर येत राहतो. खरच तिकडून परत येऊच नये असच वाटत.
प्रकर्षाने लक्षात राहिलेल्या काही गोष्टी म्हणजे
गुलमर्गचे वरून दिसणारे दृश्य व पर्वतापलीकडे पाकव्याप्त काश्मीर आहे ही जाणीव
दल सरोवरातील संधीप्रकाशातील आतील भागातील पाणरस्त्यांवरून केलेली फेरी
धुळीचा झोझिला
अल्ची गुंफा आणि तिला वेळेत गाठण्यासाठी केलेली तुफानी रपेट
सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम व इथेही वेळेत पोचण्यासाठी केलेली तुफानी रपेट
खडतर पण बर्फाळ चांग ला खिंड
सकाळचे निळेशार पंगोंगचे पाणी
लेहमधील अंधार पडला कि बंद होणारा जुना बाजार
वाटेवरील खेड्यातील गोड मुलांबरोबर द्यायच्या टाळ्या
निरव, स्तब्ध, भव्य निसर्ग
नुब्रातील रात्रीचे फिरणे
सैनिकी संग्रहालय
सरचू रात्र
छे … खरतर सगळच खूप तीव्रतेने आठवते आहे.
आणि मला तर प्लास्टर असल्याने ते निघेपर्यंत लडाख विसरणे अवघडच होते म्हणा. आता प्लास्टर निघाले आहे व तिकडून प्रत्येक हॉटेलमधून आणलेले साबण, शाम्पू नुकतेच संपले त्यामुळे आता हळू हळू इथल्या जगात जगू लागलो आहे. जो WA संघ आहे त्यावर पण सगळ्यांची हीच स्थिती आहे. मला नाही वाटत तुम्ही कधी लडाख विसरू शकता. उलट दर वर्षी तिथे जावे असे वाटते आहे. बघू पुढच्या वर्षी ती राहिलेली स्पिति खोऱ्याची फेरी होते का ते. खूप लोकांनी बरेच काही विचारले या दिवसांमधे. कसे गेलात, काय काय केलत, धोकादायक असते का, काय काय घेऊन जावे वगैरे वगैरे. मग म्हटल एक मस्त प्रवास वर्णन लिहून काढू. त्यात ही माहिती देऊ. आपल्या मायबोलीवर पण टाकू. काही वर्षांपूर्वी मी लिहिलेले असेच एक प्रवास वर्णन मायबोलीकरांना खूप आवडले होते. म्हटल कदाचित हे देखील आवडेल.
फोटो पहाण्याकरता कृपया माझ्या फेसबूकला भेट द्या. hrushikesh bhide असा शोध घ्या. पहीला मीच दिसेन.
जूले …… !
सव्यसाची
---
सर्व भाग
http://www.maayboli.com/node/55605 --- सुरवात
http://www.maayboli.com/node/55634 --- भाग २
http://www.maayboli.com/node/55652 --- भाग ३
http://www.maayboli.com/node/55678 --- भाग ४
http://www.maayboli.com/node/55692 --- समारोप
अत्ताच सगळे भाग वाचुन
अत्ताच सगळे भाग वाचुन काढले.
मस्तच वर्णन. खुप आवडले. नंतर फोटो बघेन.
छान वर्णन. सुंदर अनुभव.
छान वर्णन. सुंदर अनुभव.
सुंदर झालेत सर्व भाग.. आता
सुंदर झालेत सर्व भाग.. आता फोटो बघेन.
जुले
जुले
फोटो पाहिले केवळ अप्रतिम
फोटो पाहिले
केवळ अप्रतिम
सव्यसाची, तुमची जुन्या माबो
सव्यसाची,
तुमची जुन्या माबो वरची लेखमाला त्या वेळेस वाचली होती, खुप मजा आली होती, तो दुखःद प्रसंग वगळता,
माबो वरती फोटो देणे आता खुप सोपे झाले आहे, पिकासा वर फोटो अपलोड करून इमेज डायरेक्ट लिंक द्वारे देता येते. ऑफिस मधुन फे.बु. चा अॅक्सेस नाही त्यामुळे फोटो पहाता नाही आले.
ससा , बघतो पिकासाचे आता
ससा , बघतो पिकासाचे आता
सगळे भाग सलग वाचून काढले.
सगळे भाग सलग वाचून काढले. फोटो नसल्याने चुकल्यासारखं झालं. पण लेखनशैलीमुळे डोळ्यापुढे चित्रं उभी राहिली !
पुलेशु..
झकास लिहिले आहेस सव्यसाची !!
झकास लिहिले आहेस सव्यसाची !! प्रवास आणि शैली दोन्ही आवडले. तुझा 'एक अविस्मरणीय प्रवास' मनाला चुटपुट लावून गेला होता. अजूनही लक्षात आहे. मी मागे एकदा पुन्हा वाचण्यासाठी शोधला, पण सापडला नाही. तुला शक्य असेल तर नव्या मायबोलीवर पुन्हा प्रकाशित कर.