Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 14:18
नमस्कार!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पाचा उत्सव म्हटलं की आपल्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. आपल्या आवडत्या गणरायाचं स्वागत, पूजा-अर्चा, आरत्या, प्रसाद आणि शेवटी निरोप असं सगळं आपण दरवर्षी करीत असतो. त्या गणोबाचं आणि आपलं अगदी अतूट नातं असतं. त्याच्या संदर्भात आपल्या कितीतरी आठवणी निगडीत असतात. आठवतं का, किती लहानपणापासून गणपती बाप्पाच्या उत्सवात आपण कसे रंगून-दंगून जात होतो? त्या आठवणींना उजाळा देण्याकरीता हा उपक्रम. तुमची गणेशोत्सवातली एखादी जुनी खास आठवण किंवा कुठल्या गणेशमंडळांवर काम करताना घडलेल्या काही गंमतीशीर गोष्टी आमच्यासोबत शेअर करणार? चला तर करा सुरुवात.
खास आठवणी किंवा गंमती इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळ्यांच्याच आठवणी भारी....
सगळ्यांच्याच आठवणी भारी.... एकसे एक!
कॉलेजला असताना पुण्यातले हे
कॉलेजला असताना पुण्यातले हे सगळे गणपती रात्र रात्र फिरुन बघायचो.... आणि एकदा नाही तर दोन दोन तीन तीनदा... कधी कॉलेजमधल्या मित्रांबरोबर, मग रुममेट्सबरोबर एक दिवस, एक दिवस पुण्यातली सगळी भावंडे मिळुन असे अनेक राउंड्स व्हायचे.
कॉलेजच्या तीन वर्षात तर अनंत चतुर्दशीला संध्याकाळी बाहेर पडायचे ते दुसर्या दिवशी सकाळी बाजीराव रोडवरच्या गणराजला नाश्ता करुनच रुमवर परत!
आताश्या गेल्या काही वर्षात अजिबात म्हणजे अजिबातच जाणे झालेले नाहीये देखावे बघायला!
माझ्या लहानपणच्या गणपतीच्या
माझ्या लहानपणच्या गणपतीच्या आठवणी फार काही भन्नाट वगैरे नाहीयेत....साध्याच आहेत पण फार फार आवडीच्या आहेत.
८९-९० चा काळ असेल तो... चौथीत वगैरे होतो मी.... आणि बाबांच्या सरकारी नोकरीमुळे इस्लामपूरसारख्या छोट्याश्या गावात रहायचो
तिथे आमचे दर एका गल्लीत असते तसे "दि न्यू बाल गणेश मंडळ" होते... श्रावण चालू झाला की गावातल्या कुंभारवाड्यात मंडळाच्या गणपतीचा पाट नेवुन दिला जायचा.... मग गणपतीच्या आधी पंधरावीस दिवस आमची खरी तयारी सुरु व्हायची....आमच्यातलाच एखादा हायस्कुलात जाणारा दादा पावतीपुस्तक छापुन आणायचा... कुठे दोन रुपये, कुठे पाच रुपये असे गोळा करत फिरायचो.... आमच्या गल्लीत एक सहकारी दूध डेअरी होती, ते लोक जरा त्यातल्या त्यात भरभक्कम वर्गणी द्यायचे.... मग एक दिवस सगळे बसुन देखावा कुठला करायचा ते ठरवायचो.... मग त्या हलत्या चित्रांसाठी घराघरातली जुनी चित्रमय कॅलेंडरे जमवून आणायचो.... त्यातली पौराणिक चित्रे कापून मग त्याला मजबुती द्यायला मागच्या बाजुने एखादे जुने तगड कापून चिकटवले जायचे.... त्या पौराणिक चित्रात पण द्रोणागिरी उचलुन आणणारा हनुमान किंवा कालियामर्दन करणारा कृष्ण अश्या चित्रांना जास्त डिमांड असायची.... मग त्यांना पाठीमागुन न दिसणार्या तारेच्या मदतीने जोडून ते मंडपाखाली बसून व्यवस्थित हलवता येतील अश्या रितीने ठेवले जायचे....मग त्याच्या बाजूने तरटाचे डोंगर किंवा मेणकागद अंथरुन पाण्याचा तलाव वगैरे बनवला जायचा.
मंडप म्हणजे तरी काय तर बुरुडाकडून आठ दहा मजबूत कळक आणून त्याची चौकोनी फ्रेम बनवली जायची... मग जवळच्या वखारीतुन पाच सहा नेटक्या फळ्या आणून त्याचा बेस बनवला जायचा.... वर ताडपत्री आणि कडेने लोकांच्या घरातुन मागून आणलेल्या बेडशीट्स .... हा मंडप बनवायाला मात्र मोठे लोक बर्यापैकी मदत करायचे.... मग आमच्या घरच्या आडव्या टेपरेकॉर्डर वर ताई दादा लोक देखाव्यातले संवाद रेकॉर्ड करायचे आणि मग तो टेप मंडपाच्या खाली ठेवून रिवाइंड आणि प्ले करत बसायचे.... घरातल्या टेबल लॅम्पला जिलेटीन पेपर लावून लाइट इफेक्ट्स दिले जायचे आणि मग एकदा सगळे जागेवर लागले की त्या मंडपाच्या खाली बसून त्या देखाव्याच्या तारा ओढायला आमच्या बच्चे कंपनीची चढाओढ सुरु व्हायची
गणपतीचे दहा दिवस घरात पाय टिकायचाच नाही.... गॅलरीतुन आईच्या दहा बारा हाका झाल्यावर मग कुठे रात्री उशिरा स्वारी घरी परतायची
बाप्पांच्या विसर्जनाची मिरवणूक पण जोरात असायची.... एका ओळखीच्या फळवाल्याची हातगाडी एका दिवसापुरती उधार आणली जायची.... मग आख्खी दुपार ती झिरमुळ्या लावून सजवण्यात जायची.... मग जसे जसे लोक जमतील तसे गुलालाची उधळण करत "पुढच्या वर्षी लवकर या" च्या गजरात बाप्पाला निरोप दिला जायचा.... भडंग आणि वाटली डाळ हा हमखास प्रसाद असायचा!
मग मात्र पुढचे काही दिवस जाता जायचे नाहीत... रिकामे रिकामे वाटायचे
किती भारी दिवस होते ते.... कुठलाही बडेजाव नाही, कसली प्रसिद्धी नाही, ना कुणी अध्यक्ष आणि ना कुठला मोठेपणा.... साध्या सुध्या लोकांचा साधासुधा उत्सव!
मस्त आठ्वणी! स्टेजचा किस्सा
मस्त आठ्वणी! स्टेजचा किस्सा लयच भारी!
अमा सान्गितलेली खेळणी सगळी आठवली, ही नन्तर नाशिकल कालिकेची जत्रा भरते त्यातही मिळायची,
प्लॅस्टिक्चे बटणावाले प्राणी आठवतायत का कूणाला? एक बटण दाबले की जिराफ एक पाय दुमडायचा दोम्ही बाजुने दाबले की पार उन्मळुन झोपायचा, पिसाच्या टोप्या, एक ढुमकही मिळायच.
आमच्यासोसायटिचाच गणपती फार जोरदार असायचा, १० दिवस वेगवेगळ्या स्प्र्धा असाय्च्या, शेवटल्या दिवशी बक्षिस सभारभ, डान्स कॉपीटिशन, सन्गित खुर्ची असाय्ची,
घरचा १० दिवसाचा गणपती , त्यात उभ्याच्या गौरी , रात्र रात्र जागुन केलेल्या विविध आरासी ...भन्नाट दिवस असाय्चे ...शाळेत तर जावसच वाटायच नाही
मस्त आठवणी सगळ्यांच्या.
मस्त आठवणी सगळ्यांच्या. नीरजा, ढोल ऐकताना खरंच काय वाटतं ते लिहीता आलं नाहीये अजून.
आताच मी मस्तपैकी हिराबाग, नातूबाग, चिमण्या, निंबाळकर,.हत्ती गणपती अशी चक्कर मारून अाले. माझ्या दुर्दैवाने व लोकांच्या सुदैवाने दहालाच आवाज बंद झाले होते. आता उद्या पुन्हा जाणार डॉल्बी डिजीटल, इस्टमन कलर बघायला.
वरदा, निंबाळकरपाशी तुझी जाम आठवण आली. मल्हारी मार्तंड देखावा केलाय. केपी, तू म्हणतोस तसा तो घोडा बहुतेक प्रेक्षकांत येतो. हिराबागेला भयानक कालिकामाता पाहून मुले किंचाळायला लागली.
ढोल ऐकताना खरंच काय वाटतं ते
ढोल ऐकताना खरंच काय वाटतं ते लिहीता आलं नाहीये अजून >>> अगदी खरंय. पण इथे असताना दरवर्षी मिरवणूकीच्या क्लिप्स मिळवून पाहातेय आणि ढोल ऐकताना काहीसं भरून येतं इतकं सांगू शकते.
सगळ्यांच्याच आठवणी अगदी
सगळ्यांच्याच आठवणी अगदी नॉस्टॅल्जीक करणार्या.
रच्याकाने - काल लेकीला ह्या धाग्याबद्दल सांगायचे होते.
मी - माबोवर "गणपतीबाप्पा आणि मी! " असा उपक्रम आहे.
लेक - भारीना! बापाबरोबर सेल्फी काढून पाठवायचा
मी -
सगळेच मस्त लिहिताहेत. आमचाही
सगळेच मस्त लिहिताहेत. आमचाही नॉस्टालजिया:-
घरचा गणपती गावी असल्याने, पहिले गणपतीतले दोन-तीन दिवस बरेचदा तिकडे जाणं व्हायचं. त्या निमित्ताने सगळे काका, चुलत भावंड एकत्र गावी जमायचो. हलशी तसं छोटंच गाव असल्याने भाजी पाल्या पासून, सगळीच खरेदी करायला खानापूरला जायला लागायचं. खचाखच भरलेल्या जीप आणि टेम्पोतून खानापूरला जाऊन स्वतःला सामानाच्या पिशव्यांसकट सही सलामत घेऊन येणे हा ही एक सोहळाच असायचा. समस्त स्त्री वर्गाने मिळून बनवलेलं फतफतं आणि उकडीचे मोदक ह्यावर ताव मारला जायचा. आजूबाजूच्यां कडे गणपती बघायला आरती म्हणायला जाणे व्हायचे. वाटेत हमखास एखाद्याला चंद्र दिसणे आणि त्याने उत्साहाने इतरांनाही दाखवून सगळ्यांनीच शिव्या खाणे हे ठरलेले कार्यक्रम असायचे. आमची पुढची लहानगी पिढीही हा कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडते आजकाल ! जवळच्या नृसिंह मंदिरा च्या आवारातल्या विहीरीत विसर्जन व्हायचं.
तिथून परत पुण्याला आलं की मुख्य आकर्षण असायचं कॉलनी मधल्या मंडळाच्या कार्यक्रमा मधली धमाल. वेगवेगळ्या स्पर्धा (....हो त्याच त्या टिपीकल... पोत्यातल्या उड्या, तीन पायाची शर्यत, लिंबू चमचा वगैरे), ग्रुप डान्स, नाटक. संध्याकाळी सगळी कॉलनी जमून एकत्र आरत्या म्हणत. घरातले सगळे गणपती बघायला जायचो. दरवर्षीचा ठरलेला कार्यक्रम असायला. कॉर्पोरेशन ला बसने जाणे. मग कसबा- जोगेश्वरी- दगडूशेठ करुन तुळशीबागेत येणे. तिकडे कावरे आयस्क्रीम आणि इतर काही काही दिसलं की आम्हा मुलांना आपण खूप चाललो असल्याने आपल्याला तहान आणि भूक लागली असल्याची जाणीव होत असे यथेच्छ हादडुन झालं की मग नातूबागेचा लायटिंग वाला गणपती, नंतर ज्ञानप्रबोधिनी जवळचा हत्ती गणपती.. एव्हाना टिळक रोड वरचे गणपती बघण्या इतपत उत्साह आणि शक्ती संपलेली असायची. तिकडचे सगळे गणपती दुसर्या दिवशीच्या अजेंड्यावर टाकून.. मग मिळेल त्या वाहनाने घरी!
नंतर कॉलनीच्या मंडळाचा सदस्य झाल्यावर अजूनच धमाल. मांडव उभारण्यापासून तोच मांडव विसर्जन करुन आल्यावर खिन्नपणे सोडवणे सगळ्यात सहभाग असायचा. मूर्ती ठरवणे, वर्गणी गोळा करणे, सजावटीचं सामान आणि ढोलाचं पान आणायला रविवार पेठेच्या चकरा मारणे हे सगळं करण्यात मजा यायची. गरवारे कॉलेजच्या मागच्या बाजूच्या घाटावर दरवर्षी विसर्जन असायचं. विसर्जन मिरवणूकी दरम्यान दरवर्षी आमचं मंडळ कमला नेहरु पार्कच्या दारात, प्रभात रोडवरच्या एका मंड्ळाच्या समोरा समोर येई. न ठरवता, दरवर्षी दोन्ही मंडळां ची शेजारी शेजारी थांबून ढोल ताशाची जुगलबंदी होत असे. त्यांचं मावळातून सुपारी देउन आणलेलं पथक असायचं, आमचे आम्हीच सगळे हरहुन्नरी ! तासभर तरी हा गजर कमला नेहरु पार्कच्या दारात चाले. आणि मग एकमेकांना दाद देत सगळे आपापल्या मार्गाने पुढे! कधी ही ह्या प्रकाराला गालबोट नाही लागले. ढोलाच्या गट्टूने आणि ताशाच्या काड्यांनी बोटं सोलवटुन निघायची. पण जाम मजा यायची.
मंडळाच्या गणपतीचं विसर्जन झालं की रात्री डेक्कन ला गाड्या पार्क करुन चालत चालत लकडी पुलावरुन लक्ष्मी रोडला जायचं. कुलकर्णी पेट्रोल पंपापाशी एकदा गर्दीचा भाग झालात की चालत-धक्के खात समाधान चौकात कधी पोचायचो कळायचं नाही. एव्हाना दगडूशेठ जागचा हललेलाच नसायचा. आता कुमठेकर रस्त्याने गणपती पाहात परत डेक्कन!
पिसांचया टोप्या यस्स. मी ती
पिसांचया टोप्या यस्स. मी ती पिसे फार जमवत असे वहीत ठेवून.
खूप कार्यक्रम असत. आमच्या गरवारे शाळेत मोठा पडदा दाखवून आनंद सिनेमा दाखिवला होता एक
रात्री. मिरवणूकितला जनरेटरचा आवाज झिंग जिंग अजून कानात आहे.
अरे हा! वाडीच्या अंगणात
अरे हा! वाडीच्या अंगणात किनतानं घालून आम्ही बसायचो सिनेमा बघायला. मंडळाला रंगित सिनेमे परवडायचे नाहीत त्यामुळे गव्हर्नमेंटने दिलेले (म्हणजे काय माहित नाही) कृष्ण धवल सिनेमेच दाखवले जायचे. वाडीतल्या दर्शनी भिंतीवर सगळ्या दहा दिवसांचं वेळापत्रक चिकटवलेलं असायचं. त्यात सिनेमा, सहस्रावर्तन, मंत्रजागर, अन्नकोट, किर्तन, स्पर्धा, व्याख्यान वगैरे समाविष्ट असे. हिंदी सिनेमा असेल तर फारसं कळायचं नाही. मग मधेच किनतानावरच आडवं होवून झोपी जायचं. बहुतेक करुन खूप जुने सिनेमे दाखवले जात. 'उजाला' लावला होता एकदा. त्यात "तेरा जलवा जिसने देखा, वो तेरा हो गया....मै हो गयी किसीकी कोई मेरा हो गया" आणि "याल्ला याल्ला दिल ले गया" वगैरे गाणी होती. आम्हा पोरांना 'जलवा', 'दिल' 'याल्ला' हे काय असतं माहित नसल्याने व माहित करुन घेण्यात रस नसल्याने पडद्यावर तो गोरा गोमटा माणूस नाचत असताना (तो शम्मी कपूर होता असं मोठं झाल्यावर कळलं) आम्ही एकमेकांवर कागदाचे बोळे मारण्यात धन्यता मानत होतो.
राजा परांजपेंचे सिनेमे मात्र मला कळोत वा न कळोत, बघायला आवडायचे. त्यातले राजा परांजपेच खूप आवडायचे. माझ्या आजोबांच्यात आणि त्यांच्यात कसलीतरी सिमिलॅरिटी वाटायची म्हणून असेल :अओ:.
'बन्याबापू' दाखवला होता तेव्हा 'ले लो भाई चिवडा ले ले' मात्र एन्जॉय केलं होतं कारण चिवडा काय असतो ते माहित होतं
कॉलेजला जाऊ लागल्यावर
कॉलेजला जाऊ लागल्यावर हरताळकेच्या दिवशी संध्याकाळी, हळदीकुंकवाच्या दिवशी सकाळी आणि अनंतचतुर्दशीच्या दिवशी सकाळीच आम्ही भुलेश्वरजवळच्या फुलमार्केटमध्ये जात असू. तिकडून भरपूर फुलं आणून गणपतीच्या आगमनाची आणि विसर्जनाची पालखी सजवत असू. सगळं बजेटमध्ये बसवायचं असे. मग कधी अष्टरांऐवजी हळदीकुंकवाच्या वेळेस बायकांना द्यायला गुलाब घेता आले तर आम्हाला लई श्रीमंत झाल्यासारखं वाटे
रोज २-३ मुली मिळून गणपतीसमोर रांगोळी काढत. एक वर्षं अख्खं मखर करायची माझ्यावर जबाबदारी होती. पहिल्यांदाच केल्याने जाम फे फे उडली होती. हरताळकेच्या रात्री जेव्हा ते नीट उभं राहिलं तेव्हा नि:श्वास सोडला आणि अनंतचतुर्दशीपर्यंत ते शाबूत राहिलं तेव्हा हुश्श केलं.
एकदा आमच्या वाडीच्या गणपतीचा एक दातच तुटलेला सकाळी वाडीतल्या सुरेश तांबेंना पूजा करताना आढळला. अख्खी वाडी हवालदिल झालेली आठवतेय. मग देवधर गुरुजींना बोलावून आणलं गेलं. कामत चाळीतून तसाच दुसरा गणपती आणला गेला. देवधर गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे सगळं विधीवत करुन पुढचा उत्सव नीट पार पाडला गेला.
वा वा जबरी आठवणी. ढोलाची
वा वा जबरी आठवणी. ढोलाची पने, ताशाने हात सोलवटणे, भन्नाट स्पर्धा. कसले वातावरण असते गणपतीत.
लायटींग गणपतीच्या हमखास गाण्यात थोडी भर
बिलनशी नागीण निघाली
ढगाला लागली कळ
मन डोले मेरा
जुम्मा चुम्मा दे दे
बांगो बांगो बांगो
आणी हमखास लागणारे बुजुर्गोने कहलाया के अपने पैरोंपे खडे होके दिखलाओ.. त्यातल्या ढकाक ढाकचिक ला लाईट फिरवणे हा एक वेगळा कार्यक्रम ठरत असे. आम्ही त्या नातुबागवाल्या बटणवाल्याला शोधुन काढायचो. नंतर त्यांनी सरळ त्याला वाडेश्वरच्य बाहेर एक छोट मचाण बांधुन बसवायल सुरुवात केली.
रस्त्यावरचे सिनेमे ही एक वेगळीच गंमत असे. आम्हाला नेहेमी ते मागुन बघायला आवडत. कारण नेहेमीचे हिरो हिरवीणी डावखुर्या होत असत.
नायकाचा गणपती पाण्याच्या नळातुन बोलायला लागल्यावर आणी नंतर ते दुध पिणारा गणपती आला तेव्हा धम्माल आली होती. कसल्या अफवा भारी.
एकदा बहूतेक शनिपार मित्र मंडाळानेच 'चार आण्यात दुधी हलवा' अशी जाहीरात करुन लोकांना दुधी भोपळा हल्वायला दिला होता.
या बीबीवर मुंबईकर व इतर गावातील लोक का हात साथ करत नाहीयेत?
कारण नेहेमीचे हिरो हिरवीणी
कारण नेहेमीचे हिरो हिरवीणी डावखुर्या होत असत. फिदीफिदी>>> हो हो. गुजराती साड्या नेसल्यासारखं वाटे
एकदा स्मिता पाटिलचा 'भूमिका' दाखवला होता. खरंतर पोरंटोरं, म्हातारे कोतारे, तरणे अश्या मिक्स्ड पब्लिकमध्ये दाखवण्याजोगा नाही तो. पण जो स्वस्तात मिळाला तो दाखवावा लागे. सिनेमा असेल त्या दिवशी तळमजल्यातल्या बिर्हाडांना प्यायचे पाणी जास्त भरावे लागे. पाण्याच्या बाटल्या सोबत नेण्याचा काळ नव्हता तो. तांब्या भांड खाली नेणं सोयिस्कर नसे.
केपी, मी आहे की अस्सल मुंबईकर
केपी, मी आहे की अस्सल मुंबईकर
हम बंदे है... पासून संथ
हम बंदे है... पासून संथ लयीत गोल गोल फिरणारे लाइट्स मधेमधे मांगे सबकी खैर नंतर डिरडिंग डिरडिंग ला एक चमक दाखवल्यासारखे जोरात गिरकी मारत. आणि मग नही किसीसे बैर... पर्यंत परत संथ लयीत गोल गोल नी क्षणार्धात पुढच्या 'ढँगचिटक्टिंग चिटक्टिंग ढँगचिटक्टिंग' ला जोरात नाचू लागत. आणि दे दे प्यार दे ला पोचेतो हे धुमशान...
खडक माळ आळी ही पण गणपतीच्याच
खडक माळ आळी ही पण गणपतीच्याच काळात प्रकट होत असे. तिथला गणपती बघायचाच. तुळशी बाग मंडळाचा गणपती कायम वेगळाच व गूढ वाटे. त्या सर्व मूर्तींचा आकार वेगळाच असे. व व्हायोलेट
निळे दिवे फेकत त्यात टिकल्या चमकत. सो सो बुटीफूल इट वॉज.
अमा +१०१ नीरजा केश्वे तू
अमा +१०१
नीरजा
केश्वे तू एकटीच मुरारबाजी झाली आहेस.
केप्या, खरं सांग सगळं लायटिंग
केप्या, खरं सांग सगळं लायटिंग आलं की नाही डोळ्यासमोर? मेनली नातूबागेचं?
केपी, केश्वि, नी, अमा एक
केपी, केश्वि, नी, अमा एक नंबर! नी, नातूबागेचे लायटिंग खतरनाक. आज जाणारे बघायला. मोर केलाय लायटिंगचा.
अमा, तुबा चा गणपती लक्ष्मी. रोडला आल्यावर खरा राजा आल्यासारखं वाटतं, तिथल्याच व्यापार्यांचा गणपती ना तो! मोठ्या मनाने पहिल्या चार गणपतींना आदरपूर्वक प्राधान्य देऊन मग प्रवेश करणारा असा एखादा विनयशील पण सर्वशक्तिमान राजा वाटतो को मला. जिलब्या मारूतीही असाच प्रसन्न!
मंडईचा वर वर्णन केलेला सगळा एरिया कोळून प्यायलाय. मंडईत पंतसचिवांच्या वाड्यात दुसरं घर होतं,.आजीचं माहेर! तिकडे पडीक. अकरा मारूती कोपरा, खडकमाळ आळी,.जुन्या जाईचा सगळे गरागरा चकरा मारून बघायचो.
आपण सगळ्यांनी एकत्र जायला पाहिजे हे सगळं बघायला पुन्हा पुन्हा!
काल सगळ मोबाईल वर वाचल
काल सगळ मोबाईल वर वाचल तेव्हा पासून शिवशिवतायत बोट लिहायला.
हिराबाग चे हलते देखावे हे स्टार अॅट्रॅक्शन होतं माझ्यासाठी ! आशुडी नी केलेली कॉमेन्ट्री तर तंतोतंत
मांडव घातले की गणपतीचे वेध लागायचे. स्वारगेट ते साहित्यपरिषद ४ नं बस नी जाताना, हिराबागेच्या बंद पडद्या च्या फटींमधून डोकावून ह्या वर्षी कोणाता ह्याचे अंदाज बांधले जायचे . मग साधारण सगळे जागच्या जागी लागलेत अस पाहून शाळेतून परतताना हिराबागेच्या स्टॉप ला उतरून रितसर सर्वेक्षण :). दोन स्टॉप आधी उतरल्यानी वाचलेल्या १० पैश्यात तेव्हा ३ पानाच्या गोळ्या यायच्या .
तरीही घरून तिसर्या चौथ्या दिवशी संध्याकाळी ( सहसा बुधवार शोधून ,कारण बाबांना गुरुवारी सुटी असायची) गणपती बघायला निघायचं. नातूबाग चे नाचरे लायटिंग २-३ गाणी तरी पहायचेच. असा रुल होता. दगडूशेट ला ह्यावर्शी काय? ह्याचे पण सर्वे आधीच झालेले असायचे . सणस ग्राउंड वर त्यांचे अतीभव्य ( तेव्हा तसच वाटायच) सेट्स तयार व्हायचे.
मुर्ती म्हणून मला अखिल मंडईचा गणपती आवडायचा . मस्त बायकोबरोबर गप्पा मारत बसलेला.
प्रबोधिनीच ढोल अन बरच्या पथक फेमस होतं. पण फक्त मुलांच असायच तेव्हा. शाळेत मी आठवीत असताना , बरेच वाद , चर्चा, वाटाघाटींनंतर मुलींच पथक सुरू झाल. हे सुरू व्हायला कारणीभूत आहोत ह्याचा (जरा जास्तच अन उगाच) अभिमान वगैरे वाटायचा .खांदे ,पाठ मोडेपर्यंत प्रॅक्टीस ! ध्वज नाचवणे , ढोल वाजवणे . अहा नॉस्टॅल्जिआ.
लेकाला लहान असताना उत्साहानी पहिल्यांदा गणपती पहायला नेल तर तोंड वाकड करून म्हणे , इन्ना , किती गर्दी आहे, एक धपाटा हाणला . सवय कर मग म्हणून दर वर्षी नेलच . उत्साह ही वाढला त्याचा. पण उसका और मेरा सेम नै . ढोल वाजताना ऐकल की रक्त सळसळणे , अन पाय आपोआप थिरकायला लागणे . ही मजा औरच. लग्नानंतर कोकणात. वाडीत ढोल ताशे घेउन प्रत्येक घरी जातात . तिथे एकदा ढोलावर हात साफ केला ३ -४ वर्षापुर्वी. दिल को सुकुन मिला
यंदा तुबा, जिलब्या मारुती,
यंदा तुबा, जिलब्या मारुती, गुरुजी तालीम, दगडूशेठ ह्यांच्या मूर्तींच्या डोळ्यांचे मुद्दाम फोटो काढले आहेत.. ते टाकीन लवकरच.. पण जो जिवंतपणा आणि मार्दव तुबाच्या मूर्तीत आहे ती कुठल्याच मूर्तीत दिसली नाही... अप्रतिम डोळे आहेत ते...
बाकी आठवणी बर्याच आहेत.. वेळ मिळाला की लिहितो...
माझ्या तर्फे एक गाणे. : आंधळा
माझ्या तर्फे एक गाणे. : आंधळा मारतो डोळा..... मग बघणार्यांच्या कमेंटस : ए तो आंधळा मारतो डोळा कुठे गेला बघ. वगिअरे.( हे मिरवणुकीत. ) एरवी हे कोणते मंडळ होते कोण जाणे.
ते ढोल वाजवण्याचं राहूनच
ते ढोल वाजवण्याचं राहूनच गेलं. अजूनही इच्छा आहे पण मग आवाजाचा आजूबाजूच्यांना होणारा त्रास, ध्वनीप्रदूषण वगैरे सगळं आठवतं आणि इच्छा राहून जाते मनातच.
हत्ती गणपतीच पण एका वर्षी
हत्ती गणपतीच पण एका वर्षी म्युझिकल फाउंटन होतं.
अन हलते देखावे मुख्य मंडळाकडून पुढिल वर्षी , लहान मंडळ विकत घ्यायचे .
इन्ना, आम्हाला तो हक्क मिळवून
इन्ना, आम्हाला तो हक्क मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद कारण प्रबोधिनीत आहे आणि मिरवणूक केली नाही असं होणं अशक्य आहे असं वाटण्याइतपत बेसिक राईट झालाय तो आता..गणपतीचे दिवस मंतरलेले दिवस असायचे. शाळेचा गणपती म्हणजे घरचाच गणपती वाटायचा/वाटतो. दरवर्षी प्रबोधिनीत विविध प्रकारे गणेशोत्सव साजरा व्हायचा. पथकशः कार्यक्रम व्हायचे. पथक म्हणजे houses त्यामुळे पाचवी ते दहावीच्या त्या त्या पथकातील मुलींची चांगली मैत्री व्हायची. दररोज कोणत्यातरी मंडळासमोर किंवा बाहेरगावी ते कार्यक्रम व्हायचे. ते ७ दिवस अभ्यासाला सुट्टी असायची! निम्मेच तास व्हायचे, निम्म्या तासांना सराव आणि दररोज आरती! शिवाय संध्याकाळी मिरवणुकीसाठी दलावर बरची नृत्याचा सराव पण सुरु व्हायचा. साधारणतः १५ ऑगस्टला पहिली रंगीत तालीम, गणपतीच्या दिवशी दुसरी रंगीत तालीम आणि गौरी जेवणाच्या दिवशी तिसरी आणि शेवटची रंगीत तालीम असायची. आठवी ते दहावीचा बरच्यांचा गट असायचा. दहावीला आल्यावर बरच्यांच्या विविध formations ठरवणे आणि बसवणे अशा गोष्टींमध्ये रोज घरी जायला ९-९:३० वाजायचे (शाळा ५ ला सुटली तरी). एकूण ६ पथकं त्यांचे तीन तीनचे दोन गट. त्या दोन गटांमध्ये कोणता गट पुढे असणार अशी स्पर्धा असायची जे रंगीत तालीमीच्या गुणांवर ठरायचे. मग दुसऱ्या गटाने आपल्या formations चोरू नयेत म्हणून त्यांना कल्पनाशक्ती लढवून नावे आणि खुणा देणे वगैरे गोष्टी चालायच्या. आम्ही आमच्या formations ना red giant, white dwarf अशी ताऱ्यांच्या वेगवेगळ्या stages ची नावे दिली होती! त्यांच्या खुणाही मजेशीर होत्या (ह्या खुणा फार महत्वाच्या असायच्या कारण रस्त्यावर नाचताना त्या गोंधळात शिट्टीची विशिष्ट धून ऐकून, ती खुण पाहून पुढच्या आवर्तनाला सगळ्यांनी एकाच वेळी नवीन formation मध्ये जाणे हे coordination त्या खुणांमुळे शक्य व्हायचे). दहावीच्या सो कॉल्ड महत्वाच्या वर्षांतले अनेक तास आम्ही ह्या formations ठरवण्यात, पथनाट्य, पोवाडे इ. सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यात घालवत होतो आणि सुदैवाने कोणालाच त्याची काळजी वाटली नाही!
अकरावीत आल्यावर शाळेच्या मिरवणुकीत ढोल वाजवायचा हे नक्की होतं.ढोलाच्या सरावाचे दिवस मी कधीच विसरणार नाही! अशक्य मजा यायची सरावाला जी शब्दांत सांगता येणार नाही. सलग ३-४ तास कमरेला ढोल बांधून वाजवणे हा अविस्मरणीय अनुभव असतो! दिवसरात्र डोक्यात ढोलाचे ताल आणि त्याची आवर्तनं घुमत राहायची. ढोलाच्या पानांना शाई लावणे (बोण म्हणायचो त्याला बहुतेक) आणि नंतर ती पाने सुकल्यावर दोराने घट्ट (चांगला डबलटीपल ट) ढोल बांधणे हे एक आवश्यक कौशल्य होतं. दुसरं आवश्यक कौशल्य म्हणजे गाडीवरून किंवा मिळेल त्या वाहनाने (जास्तीत जास्त) ढोल इकडून तिकडे घेऊन जाणे! एका महिन्यात हात (मनगटाची मागची बाजू) दगडासारखे टणक व्हायचे. त्या वर्षी आम्ही खूप साऱ्या गणपतींसमोर बरचीचा एक गट आणि वाद्यवृंदाचा एक गट (ढोल, ताशा आणि ध्वजासकट) असे एका तासाची प्रात्यक्षिकं करायला जायचो. ही रात्री उशिरापर्यंत चालायची. त्यावर्षी आमच्या गटाने इतर मंडळाबरोबर कसबा पेठ आणि दगडूशेठ समोर प्रात्यक्षिक केलं होतं. धन्य धन्य वाटलं होतं ढोल वाजवताना त्या दोन गणपतींसमोर!
प्रत्यक्ष मिरवणूकीच्या दिवशी एक वेगळीच शक्ती अंगात संचारली आहे असं वाटायचं. मिरवणुकीत अंतर पडू लागलं की ढोलासकट रस्त्यावरून धावणे ह्या गोष्टीचा आधी सराव करायचो नाही पण ते जमून जायचं! दोन अडीच तासांनी मिरवणूक शेवटच्या स्थानी पोचल्यावर रिंगण व्हायचं. त्यावेळी गेले दोन तास आपण वाजवत होतो त्याच्या दुप्पट उत्साहाने ढोल वाजवला जायचा. आजही ढोलाचा आवाज ऐकला की भरून येतं. आयुष्यात पुन्हा एकदा तरी ढोल वाजवायचाच आहे मला!
इन्ना, जिज्ञासा मस्तच.
इन्ना, जिज्ञासा मस्तच.
मस्त आठवणी सुरू आहेत.
मस्त आठवणी सुरू आहेत.
जबरीच लिहिलय.. सगळ डोळ्यासमोर
जबरीच लिहिलय.. सगळ डोळ्यासमोर उभं राहिलं एकदम
जि, जुग जुग जियो!! वाजवशील
जि, जुग जुग जियो!! वाजवशील नक्की पुन्हा ढोल!
वॉव पोस्ट जिज्ञासा.
वॉव पोस्ट जिज्ञासा.
Pages