'विहीर"

Submitted by -शाम on 3 July, 2015 - 01:08

इथे या विहीरी कडेला उभा मी निहाळीत आहे जुन्या सावल्या
इथे रीघ लागे इथे होय झुंबड इथे रोज येती किती बाहुल्या

कुणी हासता बोलता माठ भरती कुणी लाडलाडे करी मस्करी
कुणी लागता फक्त हंड्यास हंडा शिव्याशाप देवून गलका करी

इथे होय देवाण घेवाण सारी कुठे कोण गेली कुणा सोबती
कुणाचा न आला सणाला मुऱ्हाळी उपाशीच निजली कशी कोणती

दिसे वाट माहेरची आस लागे निरोपास व्याकूळ मनबावरे
कधी भेटले जर कुणी गावचे तर खुशीनेच नेत्री झरा पाझरे

पदर खोचलेली खुळी अर्धओली बटा सावरीता हसे मंदशी
घटांच्या उतारात उतरून पाणी उरी भेट घेई कि सजणी जशी

म्हताऱ्या वडाचा जिथे पार होता तिथे मी रिकामाच टेकायचो
किती पैंजणांची किती जोडव्यांची कहाणी दुरुनीच ऐकायचो

अता सांजवेळी इथे फक्त भरते सभा कावळ्यांची जणू वादळी
अता फक्त आक्रोशते एक टिटवी विहीरीतुनी काजळी काजळी
------------------------------------------------------------------शाम

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अता सांजवेळी इथे फक्त भरते सभा कावळ्यांची जणू वादळी
अता फक्त आक्रोशते एक टिटवी विहीरीतुनी काजळी काजळी.... वाह शाम.

सुमंदारमालेतील हे आणखी एक सुंदर फूल.

मुऱ्हाळी....ऐवजी 'मुराळी' असे चालेल बहुधा.

यावरुन विदिपांचा एक शेर आठवला.

तुझा मुराळी वेशीवरुनी पुनश्च मागे फिरला पोरी
धीर नसावा होत यायला खस्तांची घेऊन शिदोरी

उत्तम गझल शाम...