देशांतराच्या कथा (१): अमेरिकेतील भारतीयांचा इतिहास

Submitted by निकीत on 7 May, 2015 - 06:12
indians on komagata maru

अमेरिकेत आज सुमारे ३० लाख (~ १% लोकसंख्या) भारतीय वंशाचे लोक राहतात; उत्पन्न आणि शिक्षणाच्या बाबतीत सर्वाधिक यशस्वी स्थलांतरित म्हणून भारतीय ओळखले जातात. ते तसे का आहेत हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे; ह्या लेखात मी भारतीय लोक अमेरिकेत कसे स्थिरावले याचा थोडक्यात आढावा घेणार आहे. अमेरिकेमध्ये भारतीय स्थलांतराचा इतिहास सुमारे १५० वर्ष जुना आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक नसते. स्थलांतर खऱ्या अर्थाने वाढलं ते १९६५ नंतर आणि त्याबद्दल आपण अनेक माध्यमातून वाचत / ऐकत / पाहत आलो आहोत. पण साधारण १८८० ते १९६५ हा प्रवास मोजक्याच भारतीयांचा असला तरी संघर्षपूर्ण आहे. सध्या तरी मी याच कालखंडासंदर्भातील मांडणी करणार आहे.

अमेरिकेतील पहिल्या भारतीय माणसाचा उल्लेख १६२० सालात आढळतो - कोणी "टोनी" नावाचा हा भारतीय इसम व्हर्जिनियामध्ये जॉर्ज मेनेफी नावाच्या एक बड्या जमीनदाराकडे कामाला होता (बहुतेक गुलामच). त्यानंतर १७६८ मध्ये व्हर्जिनिया मधील पेपरात एका मालकाने दिलेली "इस्ट इंडीयन" गुलाम पळून गेल्याची जाहिरात सापडते. १७८० मध्ये "मद्रास मॅन" नावाचा व्यापारी (खरे नाव माहित नाही) मॅसेच्युस्सेट्स मध्ये आला होता असाही उल्लेख आढळतो. पण असे १-२ उल्लेख वगळता १८२० पर्यंत अमेरिकेच्या इतिहासात भारतीय स्थलांतरित फारसे दिसत नाही.

१८५७ मधील एका पुस्तकातील कॅलिफोर्निया मधील सोन्याच्या खाणीत काम केलेल्या "हिंदू" माणसाचे चित्र (बहुधा कॅलिफोर्नियामधील भारतीयांचा सर्वात जुना दस्तावेज):
Hindoo.jpeg
स्त्रोत: हचिंग्ज कॅलिफोर्निया मॅगझिन १८९९.

१८८६ मध्ये मीर खान नावाच्या भारतीय हकीमाला लायसन्स नसताना काम केले म्हणून अटक करण्यात आली असाही उल्लेख आहे.
mier khan.jpg
स्त्रोतः अल्टा डेली कॅलिफोर्निया, १८ ऑक्टोबर १८८६.

स्थलांतर - १८२० पासून पुढे (मुख्यतः कॅलिफोर्निया)
अमेरिकेत भारतीय स्थलांतराला सुरुवात झाली पश्चिम किनाऱ्यापासून. १८२० च्या आसपास भारतातून काही शीख लोक पहिल्यांदा कामाच्या शोधात उत्तर अमेरिकेत - कॅनडा मधील व्हानकुवर येथे आले आणि तेथे मुख्यतः शेती आणि लाकूड उद्योगात काम करू लागले. साधारण १८९० पर्यंत त्यांची संख्या अगदीच कमी होती पण त्यानंतर मात्र ती हळूहळू वाढू लागली. लवकरच त्यांचाविरुद्ध स्थानिक गोऱ्या लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि तो इतका शिगेला पोहोचला की भारतातून येणारी जहाजे स्थानिक लोक व्हानकुवर बंदरामध्ये येऊच द्यायचे नाहीत. याची सर्वात (कु)प्रसिद्ध केस म्हणजे मे १९१४ मध्ये कॅनडात येऊ पाहणारे "कोमागाटा मारू" जहाज. सुमारे ३७६ भारतीय असणारे हे जहाज स्थानिकांनी सुमारे तीन महिने बंदराबाहेरच ताटकळत ठेवले आणि अखेरीस जुलै महिन्यात ते जपानकडे (आणि नंतर भारताकडे) माघारी फिरले.

कोमागाटा मारू जहाज आणि त्यावरील भारतीय:
komagata maru.jpgस्त्रोत.

कॅनडा मधून पिटाळले गेलेले भारतीय कामाच्या शोधात मग अमेरिकेचा पश्चिम किनार्यावर आले. सुरुवातीला त्यांनी ओरेगन आणि वाशिंग्टनच्या लाकूड, शेती आणि रेल्वे उद्योगात काम केलं आणि त्यानंतर १८९० च्या दशकापासून ते मोठ्या संख्येने कॅलिफोर्निया मध्ये येऊ लागले आणि इकडे हळूहळू आपला जम बसवायला सुरुवात केली.

१८९९ साली सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल मध्ये आलेली एक बातमी:
0_2.jpg स्त्रोत.

१९०० सालातील शीख कामगारः
Rrwork5-c.jpgस्त्रोत.

भारतीय येथे येण्याआधीपासूनच कॅलिफोर्नियात चीनी आणि जपानी कामगार मोठ्या प्रमाणावर आले होते. त्यामुळे स्थलांतरितांविरोधात इथे आधीच असंतोष होता. मग कॅनडा मध्ये जे झालं त्याचीच पुनरावृत्ती अमेरिकेतही होऊ लागली. भारतीयांविरोधात विरोधात दंगली झाल्या; जाळ्पोळी आणि मारहाणी झाल्या. त्याचबरोबर त्याना प्रचंड वंशभेदाचा सामना करावा लागला. त्वचेच्या रंगामुळे तर अर्थातच पण त्याच बरोबर त्यांचे कपडे, वास, सवयी यामुळे सुद्धा. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बरीच भारतीय मंडळी आफ्रिकन अमेरिकन आणि मेक्सिकन लोकांबरोबर राहिली आणि त्यांच्यातच मिसळले. भारतीय स्थलांतरित हे मुख्यतः अविवाहित पुरुष असल्यामुळे अनेकांनी त्यांच्याशी लग्नेही केली. अर्थातच लपून छपुन. कारण इंटररेशियल लग्नांवरहि कायद्यानुसार बंदी होती - पण मेक्सिकन स्थलांतरित अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आल्यानंतर (साधारण १९२० नंतर) मात्र चित्र थोडे पालटले - कारण भारतीय आणि मेक्सिकन दोघेही ब्राउन! या काळात अनेक भारतीय-मेक्सिकन लग्ने झाली आणि त्यांनी मारिया सीता हर्नांडेझ, होजे अकबर खान वगैरे अत्यंत इंटरेस्टिंग नावे असलेली मुलेही जन्माला घातली !

एंजल आयलंड:
एशियन लोकांच्या स्थलांतरामध्ये सॅन फ्रान्सिस्को बे मध्ये असलेल्या एंजल आयलंडचं एक महत्वाचं स्थान राहिलं आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर येणाऱ्या परदेशी नागरिकांचा एंजल आयलंड वर इमिग्रेशन चेक होत असे. तिथे डिटेन्शन सेंटर सुद्धा होते. गंमत म्हणजे या डिटेन्शन सेण्टर मध्ये डिपोर्टेशन रेट होता जवळजवळ ३० ते ४०%! इतर ठिकाणी (विशेषतः पूर्व किनाऱ्यावरील एलिस आयलंड येथे) हाच रेट १ ते २% च होता. १९१० ते १९४० च्या दशाकात अमेरिकेत येऊ पाहणारी जवळ जवळ सर्वच भारतीय कुटुंबे एंजल आयलंडवर ठेवली गेली. भारतीयांबरोबरच मुख्यतः इथे राहिले ते म्हणजे चायनीज आणि जपानी. अत्यंत वाईट सुविधा असलेल्या या डिटेन्शन सेण्टर्स मध्ये डिटेनीजना अनेक दिवस राहावे लागे. अशा वेळी अनेक डिटेनिज भिंतीवर आपल्या कविता आणि कथा कोरत असत. त्यामधून त्यावेळच्या परिस्थितीची कल्पना येते. एंजेल आयलंड वरील बिल्डिंग्ज मध्ये आजही त्या कविता तशाच सापडतात. कितीतरी गोष्टी तर लिहिल्याच गेल्या नसतील.

डिटेन्शन सेंटरची इमारत:
Angel_island_lg.jpg

डॉर्मस:
Angel_Island_Immigration_Station_Dormitory_b.jpg

भिंतींवर कोरलेल्या कविता:
Since-9-months--Punjabi--text-carved-into-the-wall-of-a-main-barrack-at-the-detention-center-at-Angel-Island.jpg

स्त्रोतः विकीपीडीया.

कायदेशीर लढाई
१९१७ सालच्या इमिग्रेशन अ‍ॅक्ट मध्ये एशियाटिक देशांमधून आलेल्या स्थलांतरितांवर बंदीच घालण्यात आली. या कायद्यान्वये फक्त कॉकेशियन आणि आफ्रिकन लोकांनाच अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकत होते आणि अक्षरशः अक्षांश रेखांश काढून आशियातून होणाऱ्या सर्वच स्थलान्तरांवर बंदी घातली गेली. या कायद्याच्या अटी इतक्या जाचक होत्या की अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय मुलानादेखील अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकत नव्हते. ह्या कायद्याविरुद्ध अनेक भारतीयांनी कायदेशीर मार्गाने लढाई देण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी उल्लेखनीय केसेस म्हणजे भगतसिंग ठींड आणि दिलीपसिंग सौंद यांच्या.

भगतसिंग ठींड यांनी प्रथमच स्थलांतरासाठी कायदेशीर लढाई देण्याचा प्रयत्न केला. ठींड यांनी पहिल्या महायुद्धात अमेरिकन मिलिटरी मध्येही काम केलं होतं. पण १९२३ साली कोर्तानी त्यांच्या विरोधी निकाल दिला. ठिंड यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की भारतीय लोक हे टेक्निकली कॉकेशियनच आहेत. पण कोर्टाने कॉकेशियनची व्याख्या व्हाइट अशीच मर्यादित ठेवली.

भगतसिंग ठिण्ड (१९१८):
10_1.jpg स्त्रोत.

दिलीपसिंग सौंद हे १९२० मध्ये गणितात पीएचडी करण्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठात (बर्कली) आले. उन्हाळ्याच्या सुट्टीत पैसे मिळविण्यासाठी ते आसपासच्या शेतांवर कामे करायचे. १९२४ साली पीएचडी पूर्ण केल्यानंतर त्यांनी सरळ शेती करण्यास सुरुवात केली. पण आजूबाजूला राहणाऱ्या देशवासीयांची परिस्थिती बघून त्यांनी त्याविरुद्ध कायदेशीर मार्गाने लढत देण्याचा निर्णय घेतला.
नागरिकत्व नसल्यामुळे अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय वंशाच्या लोकांनादेखील जमिनी विकत घेता येत नसत. जमीन लीज करण्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यामुळे बहुतांश भारतीय आयुष्यभर शेतमजूर म्हणूनच काम करत असत. सुमारे वीस वर्ष सौंदसाहेब वेगवेगळ्या कोर्टात भारतीयांच्या समान नागरिकत्वासाठी लढाई देत राहिले.

याच काळात इतर भागातील भारतीयांनीही (जे संख्येने फ़ारच कमी होते) वेगवेगळ्या पद्धतीने अमेरिकन सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. उदा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मदत करण्यासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फिलाडेल्फियातील लाला हरदयाळ यांनी हिंदुस्तान गदर पार्टीची स्थापना केली. त्यांनी भारताच्या स्वातान्त्र्याबरोबरच (लाल लजपत राय याच्या होम रूल चळवळीला मदत) स्थलांतराच्या प्रश्नावर देखील बरेच काम करण्यास सुरुवात केली. मुबारक अली खान (अरिझोना) आणि सरदार जगजीतसिंग (न्यूयॉर्क) यांनी राजकारणी, डिप्लोमॅट, मिडिया वगैरेंबरोबर जोरदार लॉबिंग केलं. शेवटी १९४६ साली ह्या सर्व प्रयत्नांना यश मिळाले आणि १९४६ साली कॉंग्रेसने ल्युस-सेलर कायदा पारित केला. ह्या कायद्याअंतर्गत भारतीय (आणि फिलिपिनो) स्थलांतरितांच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना अमेरिकन नागरिकत्वाचा अधिकार सुप्रीम कोर्टाने दिला. त्याचबरोबर दरवर्षी १०० भारतीयाना ग्रीन कार्ड (कायमचे स्थलांतरित असा दर्जा) देण्यासही मान्यता दिली. १९४९ साली नागरिकत्व मिळाल्या मिळाल्या लगेच दिलीपसिंग सौंद कॅलिफोर्नियात जज्ज म्हणून निवडून आले आणि १९५६ साली सेण्ट्रल डेमोक्रटिक पक्षातर्फे कॅलिफोर्निया मधून कोंग्रेसवर निवडूनही गेले. कॉंग्रेसवर निवडून येणारे सौंद हे पहिले एशियन ! सौंद यांची एक जुनी मुलाखत इथे पाहता येईल.

दिलीपसिंग सौंद तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ केनेडी आणि उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्यासमवेत:
dec07_saund1.jpgस्त्रोत.

सॅनफ्रान्सिस्को मध्ये अजूनही हिंदुस्थान गदर पार्टीचे ऑफिस जतन करून ठेवले आहे (5, Wood Street). या म्युझियमचे उद्घाटन १९७६ साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले होते.
PAGE-MEMORIAL-THE-GADAR-MEMORIAL-2.jpgस्त्रोत.

१९६५ आणि नंतर
ह्या कायदेशीर लढाईनंतरही १०० ग्रीन कार्ड कोट्यामुळे भारतीय स्थलांतरितांची संख्या फार काही वाढली नाही; १९६५ पर्यंत ही संख्या सुमारे १० ते १२,००० च होती. पण १९६० च्या आसपासच्या सिव्हिल राइट्स चळवळीचे पडसाद इमिग्रेशन पॉलिसीमध्येही पडले नसते तरच नवल होतं. १९६५ साली अमेरिकन सरकारने एक कॉंप्रिहेन्सिव्ह इमिग्रेशन कायदा पास केला. सर्व देशांमधून आलेल्या आलेल्या स्थलांतरितांना दर वर्षी समान कोटा पद्धत तेव्हा सुरु झाली जी आजतागायत चालू आहे. १९६५ नंतर मात्र भारतीय स्थलांतरित मोठ्या संख्येनं अमेरिकेत आले. १९८० पर्यंत त्यांची लोकसंख्या २ लाख झाली आणि त्यानंतर दर दशकाला ती दुप्पट ते अडीचपट होत आता ३० लाखापर्यंत पोहोचली आहे. हा सगळा पुढचा इतिहास सर्वश्रुत आहेच.
१८८० ते २०१५, we have indeed come a long long way.

वॉशिंग्टन डीसी मधील स्मिथसोनियन म्युझियममध्ये ह्या विषयावरील प्रदर्शन ऑगस्ट २०१५ पर्यंत चालू आहे (Beyond Bollywood - Indian Americans Shape the Nation). शक्य असेल तर आवर्जून भेट द्या आणि कसे वाटले किंवा नवीन काय माहिती मिळाली हे इथे जरूर लिहा.

*****
देशांतराच्या कथा (२): भारतीय स्त्रियांचा अमेरिकेतील इतिहास : http://www.maayboli.com/node/54325
*****

अजून एक कल्पना:
मायबोलीवर अनेक देशांतील सदस्य आहेत. जर त्या प्रत्येक देशामधील भारतीय स्थलांतराचा इतिहास आपण संकलित करू शकलो तर तो एक अतिशय उपयुक्त दस्तावेज ठरेल. मराठीमध्ये माझ्या मते अशी माहिती संकलित केलेली नाही.

अधिक संदर्भ:
बर्कली साउथ एशिया लायब्ररी: http://www.lib.berkeley.edu/SSEAL/
Berkeley South Asian History Archive: http://www.berkeleysouthasian.org/
Smithsonian: Beyond Bollywood - Indian Americans Shape the Nation: http://smithsonianapa.org/beyondbollywood/
एंजल आयलंड इमिग्रेशन स्टेशन: http://www.aiisf.org/pdf/aiisf_sfChron_seAsian.pdf
मायग्रेशन पॉलिसी इंस्टिट्यूट: http://www.migrationpolicy.org/article/indian-immigrants-united-states

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार आवडला लेख. अतिशय इंटरेस्टींग.

एकदा घरातून बाहेर पडलं की घरच्यांशी संपर्कच तुटला अश्या काळात, उपेक्षेच्या, हालाखीच्या परिस्थितीत लोक कसे राहिले असतील, इथल्या प्रतिकूल परिस्थितीशी कसा लढा दिला असेल, घरच्यांकरता तळमळले असतील अश्या विचाराने अस्वस्थ होतं. १६२० ला पहिल्या माणसाचा (गुलामाचा) उल्लेख म्हणजे शिवाजी महाराजांच्याही आधी!

टण्या, तू पण छान माहिती दिली आहेस. न घर के न घाट के म्हणूनच ह्या लोकांकरता वर लिहिलंत तसं जास्तच वाईट वाटतं.

मायबोलीवर अनेक देशांतील सदस्य आहेत. जर त्या प्रत्येक देशामधील भारतीय स्थलांतराचा इतिहास आपण संकलित करू शकलो तर तो एक अतिशय उपयुक्त दस्तावेज ठरेल. मराठीमध्ये माझ्या मते अशी माहिती संकलित केलेली नाही. >> कल्पना आवडली.

हे सगळं एकत्र करायला हवं. >> +१

ह्या प्रॉजेक्टवर काम करायला आवडेल :).

टण्याने लिहिलेली लोकं ही राजा आनंदपाळच्या कालावधीत इ.स. १००० ( जो आजच्या अफगाणचा शेवटचा हिंदू राजा होता) कोंडीत सापडल्यामुळे त्यांनी पश्चिमेकडे जाणे पसंद केले असाही एक अदांज बांधला जातो. खूप वर्षे (म्हणजे आत्ता आत्तापर्यंत ) ही लोकं मुळची भारतीय म्हणून पाहिली जात नसत. आता मात्र ती भारतीय आहेत हे ऑलमोस्ट सिद्ध झाले आहे.

निकीत,

तुमचा इतिहास संकलनाचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. अमेरिका आणि क्यानडा इथल्या अर्वाचीन भारतीय स्थलांतराचा इतिहास सरळधोपट असला तरी जगात इतरत्र तशी परिस्थिती नाही. क्यारेबियन (जमैका, त्रिनिदाद), दक्षिण अमेरिका (सुरीनाम, गयाना), आफ्रिका (दक्षिण आफ्रिका, केनिया, टांझानिया, मॉरिशस), आग्नेय व पूर्व आशिया (मलय, फिजी, रियुनियन द्वीपे) या ठिकाणी इंग्रजांनी जबरदस्तीने वेठबिगार म्हणून भारतीय मजूर नेले. त्यांच्या कहाण्या करुण आहेत. Sad

अशांना कूली वा indentured labour म्हणंत असंत. बायका आणि पुरूष वेगळे केले जात. लहान मुलेही गुलाम म्हणून कामाला जुंपली जात. जरा बऱ्यापैकी दिसणाऱ्या बाईवर ताबडतोब लैंगिक अत्याचार होत असंत. करारपत्रातली भाषा संदिग्ध असे. तसेच इंग्रजीत केलेलं असल्याने कोणाला समजतही नसे. पाचेक वर्षे झाल्यावर मजूर 'मुक्त' होई. पण असा मोकळा मजूर भारतात परतणार तरी कसा? शिवाय त्याच्या बायकापोरांची विल्हेवाट लागलेली असे ती वेगळीच. जरी भारतात परतला तरी प्रवासाचे पैसे कापून घेतले जात. पाच पाच वर्षे राबून हातात शेवटी पोकळ खोकडा पडंत असे. बरेचसे मजूर तिथेच स्थायिक होत. उपरोक्त अनेक देशांत अशा मूळ भारतीयांच्या वसाहती आहेत.

आ.न.,
-गा.पै.

वॉव! छान आहे लेख ..

अजून सगळ्या प्रतिक्रीया वाचल्या नाहीत ..

>> सौंद यांची एक जुनी मुलाखत इथे पाहता येईल

लिंक दिसत नाही .. दुरूस्त करणार का? मुलाखत बघायला आवडेल ..

दिलीपसिंग सौंद ह्यांच्याबद्दल वाचून एकदम छान वाटलं .. त्यांनां स्थलांतरीत असूनही सरकार दरबारी निवडून आले हे तर खासच .. Happy

टण्या: तुम्ही नको, प्लीज.
रोमांची माहिती वाचून आप्ल्या फासेपारध्यांसारख्या समाजाची आठवण झाली. आंबेडकर आणि गांधी या नावाच्या शाळा हंगेरीत ! फारच इंटेरेस्टिंग. यावर एक लेख लिहिच.

गामा: धन्यवाद. तुम्ही नको, प्लीज.
इतर देशांमधील भारतीयांचा इतिहास खरच भयानक आहे. त्यांना या करारामुळेच "गिरमिट्ये" ही म्हणत असत. गांधींच्या सत्याचे प्रयोग मध्ये दक्षिण आफ्रिकेमधील गिरमिट्यांची तपशीलवार माहिती आहे.

सशलः दुरुस्ती केली आहे. मुलाखत साधारण ६:३० मिनिटांनी सुरु होते.

छान माहितीपूर्ण लेख! बाकीच्या पोस्ट्स देखील माहितीपूर्ण, विशेषतः जिप्सी लोकांचे मूळ भारतीय आहे हे माहिती नव्हतं! अमेरिकेतल्या भारतीय लोकांच्या documentation बद्दल फॉर हियर ऑर टू गो मध्ये पहिल्यांदा वाचलं होतं. आता जग इतकं जवळ आलं आहे पण त्या काळी इतका सारा प्रवास करून सातासमुद्रापार येऊन वसणाऱ्या सगळ्याच लोकांचा जीन पूल खास असला पाहिजे..धाडसी आणि काटक!

@टण्या, हे रोमा किंवा रोमानी म्हणजे आपल्याकडचे लमाणी किंवा लांबाडी. रोमा शब्दाचे मूळ लमाणी या शब्दामध्ये असावे असे काही लोक मानतात. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी गाजलेल्या विनोदी इंग्लिश चित्रपट 'द पार्टी' (ह्यावर आपल्याकडे काही काळ बंदी घातली होती-भारतीयांच्या विनोदी चित्रणामुळे भारताची बदनामी झाली म्हणून.) याचा आणि अन्य अनेक गाजलेल्या चित्रपटांचा नायक पीटर सेलर्स हा रोमा होता.

इन्टरेस्टिंग माहिती. धन्यवाद, निकीत. Happy

('मीर खान' नावाचा माणूस हिंदू म्हणजे एकूण 'हिंदुस्तानातील लोक ते हिंदू' अशी व्याख्या असावी बहुधा तेव्हा.)

निकीत,
माहिती जरूर हेडरमध्ये टाक.

हाती असलेला प्रकल्प जरा आटोक्यात आला की परदेशस्थ भारतीयांच्या बातम्या आणि फोटो तुला पाठवतो.

खुप छान माहितीपुर्ण लेख लिहिला ..
छान मांडला सुद्धा ..
अशा इतर देशांत झालेल्या स्थलांतरीत भारतीयांच्या लढ्या बद्दल माहिती आलेली पन आवडेल..
आणखी येऊद्या Happy पुलेशु .

निकीत... खरच स्तुत्य लेख. तु म्हणतो तश्या उपक्रमाची संकल्पनाही आवडली. मदत करायला आवडेल.

१९५५ ते १९६५ दरम्यानच्या मार्टिन ल्युथर किंग यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या सिव्हिल राइट्सच्या चळवळींमुळे इमिग्रेशन पॉलिसीवर परिणाम झाले हे खरे आहे.

पण इथे मला अजुन एक गोष्ट नमुद करावीशी वाटते की १९६५ ते १९७४ पर्यंत चिघळलेल्या यु एस व्हिएतनाम युद्धामुळे अमेरिकेत डॉक्टरांची कमतरता भासु लागली होती. व्हिएतनाम वॉरमुळे इथले बरेचसे स्थानिक डॉक्टर्स मोठ्या संख्येने तिकडे पाठ्वले गेले होते. ती कमतरता भरुन काढायला १९६५ च्या काँपिहेंसिव्ह इमिग्रेशन पॉलिसीचा फायदा झाला व भारतातुन त्या दरम्यान फार मोठ्या प्रमाणात भारतिय डॉक्टर्स अमेरिकेत इमिग्रेट झाले. (त्याच सुमारास माझा सगळ्यात मोठा भाउ १९७२ मधे रेसिडंट डॉक्टर म्हणुन भारतातुन इंटर्नशिप झाल्यावर लगेचच अमेरिकेत आला.) म्हणुन तुम्हाला दिसुन येइल की जे भारतिय १९६५ ते १९७५ च्या दरम्यान अमेरिकेत आले ते बहुतकरुन डॉक्टर्स होते.

हे पटेल लोक अमेरिकेत प्रथम कधी आले हे पण जाणुन घ्यायला आवडेल. अमेरिकेतली जवळजवळ ६० ते ७० % मोटेल्स या पटेल लोकांच्या मालकीची आहेत.

अभ्यासपूर्ण लेख. मला अशा प्रकारच्या इतिहासात खूप रस असल्याने अतिशय आवडला. प्रतिसाद ही उत्तम

नवीन प्रतिसादकांचे आभार,विशेषतः केदार आणि हिरा - चांगली माहिती दिल्यबद्दल.
मुकुंद: नेहेमीप्रमाणे मस्त प्रतिसाद.

अमेरिकेत १९६५ नंतर लगेचच डॉक्टर्स मोठ्या प्रमाणावर आले. हे सर्वच भारतीय डॉक्टर्स अतिशय ऑर्गनाईज्ड होते. अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडीयन ओरिजिन (AAPI) ही अजूनही भारतीयांची सर्वात सशक्त बॉडी आहे. १९९५ साली त्यांच्या वार्षिक संमेलनाचा कीनोट अड्रेस दस्तुरखुद्द प्रेसिडेंट क्लिंटन साहेबांचा होता. AAPI ने आत्ताही हिलरीलाच पाठिंबा दिला आहे.
सुरुवातीला आलेल्या लोकांनी फ्यामिली रीयुनिफ़िकेशनच्या कलमाखाली आपल्या अनेक बांधवांना इकडे बोलावून घेतलं (चेन मायग्रेशन). पंजाब आणि गुजरात मधून अनेक लोक हे याच काळात आणि कलमांखाली अमेरिकेत आले. भारतातील आणीबाणी, खलिस्तान प्रश्न ई. प्रॉब्लेम्सचा हातभार लागलाच.

"पटेल मोटेल" ह्या विषयावर पवन धिंग्रा यांचं "Life Behind the Lobby" हे पुस्तक आहे. मी वाचलेलं नाही पण रेडियोवर त्यांची मुलाखत ऐकली होती. इथे ऐकता येईल.
धिंग्रांच्या मते ५०% हून अधिक मोटेल्स पटेल लोकांची आहेत याची तीन प्रमुख कारणे आहेत: (१) सुरुवातीला १९४०-५० च्या आसपास यांना कोणी शेतजमिनी देईनात; मोटेल मिळत होती आणि चालविणे त्यामानाने कमी खर्चिक होती, (२) पाथ-डिपेंडन्स - जर दहा गुजराती मोटेल चालवत असतील तर अकराव्याला कर्ज आणि नो-हाऊ मिळणे सोपे होते, आणि (३) इतर कुठलेच लोक कुठल्यातरी खबदाडात जाउन मोटेल चालवायला तयार नव्हते.

भारतीयांच्या अमेरिकेतील राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीचा आढावा विजय प्रशाद यांनी "The Karma of Brown Folk" या पुस्तकात घेतला आहे. अप्रतिम पुस्तक आहे. ते जरूर म्हणजे जरूरच वाचा.

सुंदर माहितीपूर्ण लेख, जरा सवडीने, परत वाचून काढावा लागेल, तर तपशील डोक्यात ठसेल.
इथे ही माहिति दिल्याबद्दल धन्यवाद.

अतिशय अभ्यासपूर्ण लेख !! अभिनंअदन

एक दुरुस्ती
विकी वर दिलेल्या खालच्या चित्रातील लिपी पंजाबी नसून जपानी आहे.

१९२९ साली अमेरिकेच्या नॅशनल ब्युरो ऑफ इकोनॉमिक रिसर्चने प्रथमच सर्व जगातील स्थलांतरांच्या ट्रेंड चा अभ्यास केला (१९२१ चे आकडे आहेत). त्यावरील International Migrations हे पुस्तक दोन खंडात इथे उपलब्ध आहे. पहिला खंड - आकडेवारी आणि दुसरा खंड आकडेवारीचा अन्वयार्थ. ९० वर्षांनंतर ते अभ्यास आणि आकडे वाचायला फारच मजा येते. तर १९२१ साली भारतीय स्थलांतरितांची विविध देशांतील (सुमारे) आकडेवारी खालीलप्रमाणे (हजारांमध्ये) :
सिलोन:६५०, मलय: ४५०
मॉरीशियस:२६०
दक्षिण आफ्रिका: १६०, पूर्व आफ्रिका: ६५
वेस्ट इंडीज: १५०, गयाना: १२५
फिजी: ६०
अमेरिका: ५, कॅनडा: १.२
ऑस्ट्रेलिया + न्युझीलंड: ४
हॉंंग कॉंंग + जपान: १.२
इंग्लंड + स्कॉटलंड: ८०
एकूण: सुमारे २१ लाख. त्यातले जवळजवळ निम्मे आशीयाबाहेर. भारताची लोकसंख्या १९२१ साली ~२५ कोटी होती.

एका मैत्रिणीने ही फारच इंटेरेस्टींग लिंक शेअर केली. सुमारे शंभर वर्षांपूर्वी एकत्र आलेल्या पंजाबी - मेक्सिकन संस्कृतीला सेलीब्रेट करण्याकरिता गेल्याच महिन्यात सॅन फ्रांसिस्कोमध्ये एक पंजाबी आणि एक मेक्सिकन असे दोन डान्स गृप एकत्र येउन त्यानी "Half and Halves" नावाचं भांगडा आणि मेक्सिकन बॅले यांच फ्युजन सादर केलं !

निकीत,

उपरोक्त लेखाबद्दल एक शंका आहे. लेखात क्यालिफोर्नियातले मेक्सिकन लोकं स्थलांतरित आहेत असं सूचित होतंय. मात्र ते आधीपासून तिथेच होते. १८४० च्या सुमारास साली क्यालिफोर्निया व टेक्सास मेक्सिकोकडून अमेरिकेने खेचून घेतले आणि सीमारेषा बदलल्या. एक आपलं खुसपट! Wink Proud

आ.न.,
-गा.पै.

Pages