मनमोहक "इर्शाळ"

Submitted by Yo.Rocks on 11 March, 2015 - 23:28

पावसाचा जोर सरला की  सह्याद्रीमध्ये निसर्गाचे रंग अधिक उठून दिसतात.. वातावरण स्वच्छ बनते.. दुरदूरची डोंगररांग नजरेस पडते..  उनामध्ये हिरव्या गवताचा व पिवळ्या सोनकीचा रंग अधिक भडक वाटतो.. फुलपाखरांची उधळण होते... जणू सरत्या पावसाला प्रेमळ निरोप देण्याची तयारी सुरू होते नि ही तयारी कितपत हे पाहण्यासाठी आमचा मग एक छोटासा ट्रेकही होतो.. ! एक दिवसात पाहून येण्यास सोयीचे म्हणून ठरले 'इर्शाळगड' !

अनिरुद्धने सहज विचारले मी पटकन हो म्हटले मग सौ. रॉक्स म्हणे मी पण येणार सो आम्ही तिघेच दादर-कुर्ला करत पनवेल रेल्वे स्थानक गाठले.. सकाळचा भन्नाट नाश्ता व्हावा म्हणून अनिरुद्धने आम्हाला हॉटेल 'विसावा' इथे आणले.. पण हॉटेलमध्ये अगोदरच एका ट्रेकिंग ग्रुपची जत्रा विस्थापित होती.. अनिरुद्ध व मला हा ग्रुप कोणता हे कळायला वेळ लागला नाही.. कारण आमच्या दोघांची ओळख ह्या ग्रुपने कुण्याकाळी आखलेल्या एका ट्रेकमध्येच झालेली.. असो आम्ही असे गर्दी करणाऱ्या ग्रुपपासून कधीच निरोप घेतलाय.. हॉटेल हाउसफ़ुल्ल असले तरी 'थांबेन पण मिसळपाव खाउनच जाइन' म्हणून थांबलो.. तोच मागून अजुन एक कुठलातरी  ट्रेकींग ग्रुप गर्दी घेऊन आला ! जल्ला त्या हॉटेलची पहिल्या दोन-तीन तासांतच दिवसभराची कमाई होणार होती..

भरपेट मिसळपाव व पोहे हादडून आम्ही मार्गस्थ झालो.. खाताना कळले एक गर्दी कलावंतीण गडावर जाणार होती पण दुसरा ग्रुप मात्र इर्शाळगडावरच येत होता..! गडावर गर्दी टाळणे आता अशक्य होते.. आम्ही स्थानाकातून चौक ला जाणारी एसटी पकडली.. वाटेत डावीकडे लागणारे कलावंतीण व प्रबळगड तर उजवीकडे माणिकगड यांचे दुरूनच दर्शन घेत आम्ही चौकात पोचलो.. रेल्वेरुळ ओलांडून इर्शाळगडाचा रस्ता धरला..

- - -

अगदी हवा तसाच नजारा होता.. रस्त्याच्या दुतर्फा सोनकी व तेरड्याने  सजलेली हिरवाई व त्यावर भुणभुणारे भुंगे नि समोर दुरवर ढगांमध्ये खुपसलेली इर्शाळगडाची दोन शिंग म्हणजेच माथा ! इतका सुंदर देखावा कॅमेऱ्यात बंदीस्त करावयाचा तर नेमका अनिरुद्धच्या कॅमेऱ्याला अटॅक यावा !!

आम्ही धरलेल्या वाटेला पुढे दोन फाटे फुटले.. एक वाट डावीकडे गावात वळते तर दूसरी उजवीकडे मोरबे धरणाच्या बाजूने वळसा मारत जाते.. आम्ही गावातून जाणाऱ्या वाटेने वळलो.. गाव सोडताच खड्या चढणीची वाट सुरु होते.. सुरवातीलाच चढण नि त्यात कोंदट वातावरण होते.. हवेची चाहूल नव्हती.. साहाजिकच आमचा घामटा निघाला.. दोनेक मिनिटांनी ब्रेक घेतला जात होता.. दम घेताना पाठमागे पसरलेल्या धरणाच्या जलाशयचा सुंदर नजारा  हीच एक दिलासा देणारी गोष्ट होती !

- - -

पहिल्याच दोन टप्प्यात पुरती दमछाक झाली.. पुढे गेलेल्या ग्रुपशी गाठ झाली तेव्हा अंतर ठेवण्याच्या निमित्ताने एक छानसा कडा पाहून मोठा ब्रेक घेण्याचे ठरवले.. चार-पाच भल्या मोठ्या खडकांची गादी असलेल्या कड्यावर एव्हाना सॅक काढून पाठ टेकवलेली.. खाली पाहिले तर गर्द हिरव्या झाडीने भरलेली खोल दरी.. वाराही नसल्याने पूर्णतः शांतता.. फ़क्त कुठून तरी वाहत्या पाहण्याचा खळखळाट कानी पडत होता.. एखाद दूसरा पक्षी त्या खोल दरिवर विहंग करत लक्ष वेधून घेत होता.. दरीच्या पल्ल्याड सहयाद्रीची पसरलेली एक भिंत आपली भव्यता दर्शवत होती.. बहुदा प्रबळगड असावा.. तिथे इर्शाळगडाच्या माथ्यावरील ढगांचे ग्रहण आता कुठे सुटत होते.. इर्शाळगडाच्या पायथ्याला अगदी खेटून असलेली छोटी वाडी दिसत होती.. इर्शाळवाडी ! अजून बराच पल्ला गाठायचाय हे लक्षात आले नि लेटस गो केले..

- - -

- - -

पुन्हा चढण सुरु.. वाडीचे अंतर नि तिथून पुन्हा माथ्यापर्यंत चढायचे हा खटाटोप पाहून स्मिताने आपण वाडीतच थांबू असे घोषीत केले.. कोंदट वातावरणात दमछाक तर सगळ्यांचीच झालेली.. पावसाने नाही तर घामाने चिंब झालेलो.. धिम्या गतीने चढाई सुरु होती.. मला सुरवातीपासूनच वातावरणामुळे त्रास झालेला शेवटी कंटाळून एका आपट्याच्या वृक्षाची 'सोन्याची' सावली बघितली नि बसकण मारली.. दोघांना पुढे व्हायला सांगितले.. पाठीवरची सॅक उतरवली नि पाणी पिऊन शांत बसून राहीलो.. काही मिनिटांतच फ्रेश वाटले नि चालू पडलो..

एव्हाना वातारवरण स्वच्छ होऊ पाहत होते.. पुढे गेलेले दोघे माझी वाट पाहत असतानाच मी त्यांना जाउन भेटलो.. पठार लागले नि समोरचा इर्शाळगड आपले नेढे दाखवू लागला... योग्यवेळी आकाश अगदी स्वच्छ झाले.. निळयाभोर आकाशात गडाचा अगदी उठून दिसत होता.. उजवीकडे माथेरानचा डोंगर अगदी स्पष्ट दिसत होता..

वाडीत पोहोचलो.. जवळपास कुठे पाणी मिळेल म्हणून एका छोट्या घरात विचारणा केली.. तोच घरातल्या मुलीने पाण्याचा हंडा समोर ठेवला.. घरात बहिण-भाऊ दोघच होते.. आम्ही दारातच शेणाने सारवलेल्या पायरीवर बसलो.. इथेच मग त्या छोट्यांसोबत गप्पा मारत थोड़ी पेटपुजा केली.. त्या घरच्या अंगणातील कोंबड्याही आमच्या खादाडी कार्यक्रमात सहभागी झाल्या व आमच्यासाठी करमणुकीचा विषय मिळाला.. ! या वाडीतल्या लोकांचे राहणीमान अगदी प्रबळगडाच्या माचीवरील वस्तीसारखे.. राशनसाठी डोंगर उतरून चौकात जावे लागते !! आपण तर नाक्यावरच्या दुकानातून काही आणायचे तरी नाक मुरडतो...असो जवळपास अर्ध्यातासाच्या वेळेत थकवा एकदम निघून गेला.. आता स्मिताही गडावर येण्यास राजी झाली.. गडावर जाउन पुन्हा येतो असे त्या छोटयांना सांगत निघालो..

आमच्या अगोदरचा ग्रुप एव्हाना वरती पोहोचलेला.. त्यामुळे आता पुन्हा आम्ही त्रिकुटच होतो..गावाच्या पुढे एक नारळाचे झाड़ नि छोटी देवळी या वाटेतल्या खुणा लागल्या.. वाट तशी ठळकच.. काही अंतरानंतर या वाटेला पुसटसा फाटा फुटून वरच्या बाजूस पाउलवाट जाते.. पण नेमके याचठिकाणी तीन-चार पुणेकरांचा ग्रुप लागला नि त्यांना हाय हॅलो करण्याच्या नादात आम्ही सरळ गेलो ! इथे कसलाही मार्गदर्शक फलक नव्हता ! आता आम्ही नकळत चुकीची वाट धरलेली.. पण काही मिनिटातच लक्षात आले.. कारण ही वाट इर्शाळगडाला उजवीकडे ठेवत अगदी सरळ जात होती.. शिवाय वरती पोचलेल्या मंडळीचा गोंगाट ऐकू येत होता..नक्कीच बिनसलेय हे लक्षात आले.. वितभर असलेली वाट ठळक होती.. पण चुकलोय हे नक्की होते.. 

मी वाट पुढे कुठे वर सरकते का म्हणून थोड़े पुढे गेलो नि थांबलो.. मागून स्मिता येत होती तिला थांब सांगायला वळालो तर तिच्यापासून एका पावलावर वाटेत छोटा साप आपले तोंड काढून निपचित पडलेला दिसला.. ! आधी वाटले माझा पाय पडून टपकला की काय ! पण होता जिवंत.. अनिरुद्धनेे बिनविषारी असल्याचे ओळखले.. फोटो काढणार तोच त्याने वाट ओलांडली.. ! याचेच दर्शन घडावे म्हणून वाट चुकलो बहुतेक !

माघारी फिरुन गावकरीला वाट विचारुन आम्ही आता मुख्य वाटेला निघालो.. साहजिकच चढणीची वाट सुरु झाली.. काही मिनिटातच आम्ही वरती पोचलो नि समोर इर्शाळगडची कातळभिंत उभी राहिली.. 

- - -

- - -

सोनकी- तेरड्याच्या फुलांनी वाट अगदी सुशोभित बनलेली.. या भिंतीच्या डाव्या बाजूने वाट पुढे सरकते.. आतापर्यंत गर्मीने हैराण झालेलो पण या कातळभिंतीच्या सावलीत आलो नि विलक्षण गारवा वाटू लागला..  वाटेत पुढेच बऱ्यापैंकी मोकळी जागा लागते जिथे खडकांची रास पडली होती.. इथेच पुढे आलेल्या ग्रुपच्या सॅक पडल्या होत्या व त्यांची राखण करत एकजण थांबलेला दिसला.. खरेतर तो पूर्णपणे थकला होता नि चेहऱ्यावरुन त्याचा पहिलाच ट्रेक होता हे आम्ही पटकन ओळखले.. हालतच त्याची वाईट झालेली.. इथून पुढची वाट अगदी अरुंद असणार होती शिवाय एक कातळटप्पा लागणार होता तेव्हा गर्दी नको म्हणून आम्ही शिदोरी उघडली..

पेटपूजा झाली तशी तिथेच वामकुक्षी घेण्याची हुक्की आली नि पंधरा मिनिट का होईना आडवे झालो.. पुढे गेलेला ग्रुप काही अजुन परतला नाही तेव्हा मग आम्ही पुढची वाट धरली.. तो नवख्या मात्र त्यांची वाट बघून वैतागला होता.. मित्राच्या सांगण्यावरून हा नविन बाला उत्सुकतेपोटी ट्रेकला येउन चांगलाच फसला होता.. तो गोरगोमटा उनात करपटून जल्ला लालेलाल टमाटर बनला होता ! पुढची वाट सरळ कारवीच्या तंबूत शिरत होती.. 

कड्याच्या बाजूनेच जाणारी ही वाट तंबूच्या दुसऱ्या बाजूने पडली कि डावीकडे मस्त ohlala दरी नि उजवीकडे कातळकड्यालाच हात घालणारी वाट ! इथेच सोप्पा वाटावा असा कातळटप्पा नि छोटीशी शिडी ! सोप्पा काय कठीण काय काळजी घेणे मात्र अपरिहार्य ! पण पुढे गेलेल्या ग्रुपचा नेमका इथेच गरदोळ सुरु होता.. ढिसाळ नियोजन आमच्या पटकन लक्षात आले ! जिथे कातळटप्प्याचा चढ़ सुरु होतोय ती जागाच जेमतेम दोघे उभे राहतील इतकी अरुंद.. इथे घसरणीचा छोटासा कातळकडा होता व उजवीला लागूनच पाण्याच्या दोन छोट्या टाक्या होत्या.. तर डावीकडे काही अंतरावर इर्शाळगडावरील देवीचे बिनाछप्पराचे  देऊळ कातळकडयालाच लागून होते..

त्या ग्रुपचे पुढारीलोक्स वरती जिथे ढिसाळ शिडी लावालेला कातळटप्पा आहे तिथेच फ़क्त त्यांच्या मेंबरांसाठी फिल्डिंग लावून होते.. वरती गेलेल्ल्यांपैंकी एकेकाला खाली सोडत होते.. पण गंमत अशी की वरतून सहीसलामत सुटले तरी खालच्या अंगाला असलेला घसरणीचा आठफुटी टप्पा ओलांडताना मेंबरांची तारांबळ उडत होती.. जो तो आपापल्या स्टाइलने फरफटत उतरत होता ! नेमके इथेच कोणी खालून मार्गदर्शक म्हणून उभे नव्हते ! त्यात फारच अरुंद जागा नि मागे कारवीच्या झाडीत लपलेली दरी ! त्यांची तारांबळ व समोर खोल दरी बघून स्मिताने पण धीर सोडला.. तिला शांत करुन शिस्तीत बाजूच्या टाक्यांच्या कडेवर बसलो तर आमचे अनिबाबा मार्गदर्शक म्हणून लिडरच्या भूमिकेत शिरले !

एवढ्या अरुंद जागेत त्या ग्रुपची बरीच फलटाण वरती गेली होती.. यांना उतरेपर्यंत आम्हाला वाट बघणे शक्य नव्हते.. आतापर्यंत मार्गदर्शनाबद्दल  'थँक्स' च्या शुभेच्छा मिळवलेल्या अनिरुद्धने मग वैतागून घूसखोरी केली नी वरती जाऊन त्या पुढारीलोकांना खाली पण एकाने राहण्याची सूचना केली... नशिब नाहीतर मला वाटत होते की हा आता त्याच ग्रुपची लीडरशीप घेतो की काय..

आता आमची कसोटी होती.. अनिरुद्ध पाठोपाठ आम्ही दोघे घूसखोरी करण्यास सरावलो.. तो घसरणीचा कातळकड़ा पुढे आखूड शिडीचा कातळ टप्पा हे सगळे अंतर स्मितासाठी अवघडच होते नि जल्ला आता मी मार्गदर्शक होतो !

शिडी चढून गेलो की समोरच नेढे स्वागतासाठी.. हे नेढे तसे आकाराने छोटेच.. पण ह्या छोट्या जागेत बसून विस्तीर्ण जलाशयाचे विहंगमय दृश्य बघण्याची मजा काही औरच.. या नेढयातून बाहेर पडलोे की डावीकडून नेढयाच्या वरती जाण्यास वाट आहे.. इथेच शिंग सदृश दोन कातळ सुळके समोरासमोर आहेत.. हाच सर्वोच्च माथा ! इथल्या एका सुळक्याच्या दोन्ही बाजूने जाणारी वाट आहे.. उजव्या बाजूच्या वाटेने गेलो तर एक कपार लागते.. उलट डाव्याबाजूने गेलो तर पाण्याच्या टाक्या नजरेस पडतात..

- - -

- - -

- - -

 हे सगळे बघेपर्यंत आकाशात ढगांची भरती सुरु झाली तेव्हा अवेळी पाऊस नको म्हणून उतरायला घेतले.. 

- - -


- -  -

- - -

पुन्हा नेढयापाशी आलो तर त्या ग्रुपचे कातळटप्प्याशी लागलेले ग्रहण नुकतेच सुटत होते..आम्ही त्या ग्रुपला मागे टाकून पुढे निघालो.. गडावर पाहण्यासारखे विशेष काही नसले तरी पावसामुळे हा परिसर भलताच मोहात पाडतो.. या डोंगराच्या सोंडेवरून जाताना एक आगळाच हुरुप येतो नि याच जोशात मग माझी ट्रेकमार्क उडी होते !

पुन्हा त्या वाडीतल्या घरापाशी आलो.. पाणी पिउन फ्रेश झालो नि त्या छोट्यांना आदरतीथ्य दाखवल्याबद्दल मोबादला देऊन आम्ही निरोप घेतला.. चढताना अंगावर येणारे चढ आता उतरताना अगदीच लेचेपेचे वाटत होते ! 

संध्याकाळची वेळ झालेली नि वाटेत अवजड ओझी घेऊन चढणारे वाडीतले रहिवाशी भेटत होते... आठवडयाभरचा राशनसाठी एवढा खटाटोप..

सगळे डोंगर उतरून एकदाचे खालच्या गावात पोहोचलो.. या गावात बाहेरचे कोणी दिसले तर खाऊ मागायचा ही जणू सवयच इथल्या मुलांना लावलेली दिसते.. जो तो खाऊ असेल तर देना म्हणून मागत होता.. सकाळी आलो तेव्हा नि आता परत जाताना पण.. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की फ़क्त ह्यांनाच् खाऊ देऊन संपवू नका.. याउलट वरती इर्शाळवाडीत राहणाऱ्यांना मदतीची जास्त गरज आहे.. नि एवढे असूनही त्या वाडीत मात्र असा अनुभव आला नाही !

असो कधीपासून इर्शाळगड नाव फ़क्त ऐकतच होतो पण येणे झाले नव्हते.. आज झालेली भेट एकदम मस्त होती व खरच एका दिवसात ट्रेक करण्यासाठी उत्तम जागा ! अर्थात या यादगार ट्रेकची सांगता मग पनवेलला सामिष जेवण करूनच केली !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच! धन्यवाद.. सह्याद्रीचा असा मस्त नजारा आमच्याशी शेअर केल्यात त्याबद्दल. तुमच्या बरोबर मीही ट्रेक केल्याची अनुभुती आली. शेवटच्या सुळक्याचा फोटो बघुन ढाकची आठ्वण आली.

मस्तच! धन्यवाद.. सह्याद्रीचा असा मस्त नजारा आमच्याशी शेअर केल्यात त्याबद्दल. तुमच्या बरोबर मीही ट्रेक केल्याची अनुभुती आली. >>>>> अगदी. अगदी.

कसल्या स्वर्गातून वाट चालली आहेत तुम्ही. धन्य आहात! काश, हम भी होते तुम्हारे साथ!!

आता उडीबद्दल.

लीलया उडुनी गगनात |
झेप घे शिखरी यो-रॉक्स ||

यापरता आणखी काय बोलणार?

झकास....

व्वा... छान वर्णन, सुंदर फोटो. धन्यवाद.
१९९३ साली केलेला होता हा ट्रेक, तेव्हा वर जाणे जमले नव्हते, मी भितीने गठाळलो होतो.
वर जाणे काय? कड्याच्या पायथ्यापर्यंतहि गेलो नाही. पण दरवेळेस मुंबईस येता जाता हा इरसाळ वाकुल्या दाखवित असतो मला.... Proud
इरसाळ की इर्शाळ?

मस्त फोटो आणि वर्णन.

मी हा ट्रेक २०१२ साली केला होता तेही एप्रिल महिन्यात रात्री. गावातून वर जाताना एका ठिकाणी आम्ही ५ जन थांबलो होतो. अचानक हा ट्रेक ठरला होता म्हणून मी वेळेअभावी स्लीपर्स घातल्या होत्या. विश्रांती म्हणून आम्ही ५ जन एका फुटलेल्या दगडाजवळ थांबलो. माझे इतर सहकारी वर जाऊन बसले, मी मात्र बराच वेळ तिथे थांबलो होतो कारण ६ मित्र मागून येत होता. जस जसा तो जवळ आला, मी पण इतर मित्रासोबत वर बसलो आणि नुकता आलेला ६ वा मित्र माझ्या जागी.

काहीशी जाणीव होऊन त्याने विजेरी ने आत पहिले तर इतका वेळ मी जिथे मी उभा होतो तिथून फुटभर अंतरावर दगडाखाली मण्यार (comman krait) साप.
त्याने सावधपणे मागे येत आम्हाला खाली बोलावून साप दाखवला. इतका वेळ मी त्याचा पासून फुटभर लांब होते पाहून थोडा गलितगात्र झालो होतो.
पुढे वर जाईपर्यंत खाच, दगड दिसला कि पूर्ण खात्री करून बसत होतो. आजतागायत ट्रेक मध्ये मी ह्याचा पालन करत आलो आहे.

त्या दिवशी 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती'

मस्त फोटो, आणि वर्णन.
पुण्याहून येताना हा भाग ( खेकड्याच्या नांगीसारखा ) नेहमी दिसतो. ( आणि खुणावतो Happy )

तोफखान्या, ते तर बघावेच लागते, शिवाय बुट सक्तिचे.
नंतर ते कळल्यावर तुमचि अवस्था कशी गलितगात्र झाली असेल याचि कल्पना करू शकतोय.
कोकणातले काही किल्ले/परिसर विंचू/सापांच्या मुबलक संख्येकरताच प्रसिद्ध आहेत. (मला नेमकी नावे आठवत नाही मार्लेश्वर सोडून)