केनयाची खाद्यसंस्कृती

Submitted by दिनेश. on 5 February, 2015 - 06:39

( मी आधी विस्कळीत पणे लिहिलेली माहिती एकत्र करतोय, एवढेच ! )

केनया, पूर्व आफ्रिकेतला एक सुंदर देश. भारतीयांना आगदी आपला वाटेल असा. केनयातल्या अनेक शहरांत
फिरताना तूम्हाला भारतातच ( गुजराथमधील एखाद्या शहरात ) वावरत असल्याचा भास होईल. "केम छो ?"
वगैरे शब्द अगदी स्थानिक लोकांच्या तोंडूनही ऐकता येतील. १०० वर्षांपेक्षा जास्त काळ भारतीय तिथे वास्तव्य
करून आहेत.

केनयाच्या खाद्यसंस्कृतीबद्दल लिहायचे तर भारतीय प्रभावाबद्दल लिहिणे भाग आहे. पण भारतापेक्षाही ब्रिटीश
राजवटींनीदेखील त्यांच्या खाद्यसंस्कृतीवर प्रभाव पाडलेला आहे.

पण या दोन्ही परकीय शक्तींपेक्षा तिथला निसर्ग, हा घटकही तितकाच महत्वाचा आहे.
काही ठराविक पदार्थच सर्व देशातील लोक खातात असे लिहिणे धाडसाचे आहे कारण केनयाचे भौगोलिक दृष्ट्याही वेगवेगळे विभाग आहेत. पश्चिम किनार्याजवळची मोंबासा, मालिंदी शहरे, व्यापारामूळे अरबी लोकांशी
दिर्घकाळ संपर्कात आहेत. तिथे अर्थातच त्या संस्कृतीचा प्रभाव आहे. केनयाचा उत्तर भाग बहुतांशी वाळवंट
आहे. तिथे मानवी वस्ती पण फार नाही.
त्यामूळे आपल्याला विचार करायचा आहे तो नैरोबीपासून व्हिक्टोरिया लेकच्या काठी वसलेल्या किसूमू या
भागापर्यंत. केरिचो, नाकुरू, काकामेगा, एल्डोरेट अशी शहरे देखील याच पट्ट्यात येतात.

यातली नैरोबी व केरिचो ही गावे तसेच माऊंट केनया जवळचा भाग उंचावर वसलेला आहे तर बाकीचा भाग
रिफ्ट व्हॅली म्हणजेच सखल भागात आहे. कामानिमित्त किंवा इतर कारणाने भरपूर चालणे हे बहुतेक
केनयन लोकांच्या बाबतीत रोजचेच आहे. त्यामूळे ते अंगाने शिडशिडीत तरी काटक असतात.
आणि यासाठी त्यांचा आहारही तसाच पोषक पण कमीतकमी तेलातूपाचा वापर केलेला असतो.

तर आपण त्यांचे काही पदार्थ बघू.

१) उगाली

उगाली म्हणजे उकड. ( उंगा म्हणजे पिठ ) ही उकड मक्याच्या पिठाची असते. मक्याचे भरड पिठ (कोंड्यासकट )
उकळत्या पाण्यात टाकले कि उगाली तयार झाली. यात मीठ घातलेच पाहिजे असे नाही. सर्वसाधारण केनयन
लोकांचा हा रोजचा आहार. मकेदेखील शक्यतो पांढरेच असावे लागतात. पिवळ्या मक्याचे पिठ चालत नाही.
पिठ जितके उपलब्ध असेल त्या मानाने यात पाणी वापरतात. अगदीच कमी पिठ असेल तर हे पातळ पेजेसारखे
शिजवतात नाहीतर आपल्या उपम्याप्रमाणे घट्टसर शिजवतात.
पण मक्याचा वापर हा पाश्चात्य प्रभावामूळे. केनयात काही भागात कमी पावसामूळे मक्याचे पिक चांगले येत
नाही, तरी हट्टाने मकाच लावला जातो. त्यापुर्वी ही उगाली सोरघम म्हणजेच नाचणीची असे. नाचणीचे पिक
तिथे डोंगराळ भागात सहज येते. नाचणी वाट्ण्यासाठी एक खास प्रकारचा पाटा वरवंटापण वापरात असे.
सध्या नाचणी अगदी कमी प्रमाणात पिकवली जाते. नाचणी पासून काही बाटलीबंद पेयेदेखील तिथे उपलब्ध
आहेत.

ही उगाली तिथल्या भारतीयांनी पण आपलीशी केली आहे. अर्थात ती शिजवताना त्याला जिरे मिरचीची फोडणी
देतात. तिथल्या पंजाबी लोकांमधे ती दूधात शिजवून खायची पद्धत आहे. यासाठी वापरलेले पिठही रवाळ
आणि कोंडा नसलेले असते.

२) सुकुमा विकि http://www.maayboli.com/node/18358

सुकुमा विकी चा शब्दशः अर्थ, आठवडा ढकला. उगालीबरोबर बहुतेक केनयन सुकुमा विकी खातात. ही एक
पालेभाजी असते. मोहरी, कोबीच्या कुळातलीच ही भाजी आहे. हिची पाने हातभर लांब असतात. ही भाजी
तिथे सहज वाढते आणि बहुतेक घरांच्या परसात लावलेली असते.
ही पाने बारीक कापून उकडायची आणि त्यात चवीपुरते मीठ घालायचे, कि झाली सुकुमा विकी तयार.
याला फोडणीही नसते आणि त्यात मसालेही नसतात.
उगालीची हाताने पारी करून त्यात अंगठ्याने खळगा करतात आणि त्या "चमच्यात" सुकुमा विकी भरून खातात.
नोकरी करणार्या मुलींना सोयीचे व्हावे म्हणून हि भाजी आयती कापलेली तयार मिळते. यात नवा प्रकार
म्हणजे कधी कधी बारीक कापलेला कांदा व टोमॅटो टाकतात. कधी कधी मॅगी / नॉर या कंपन्यांचे तयार
क्यूब्ज टाकतात.

ही भाजी त्यांच्या साध्या पद्धतीने केली तरी चांगली लागते. आपल्या पद्धतीने डाळ, दाणे घालून केली तरी
चांगली लागते. सध्या तरी हीच भाजी म्हणजे सुकुमा विकी असे समजले जाते पण पुर्वी या प्रकारासाठी
न्येरेरे ( राजगिरा ), रताळ्याची पाने, कसावाची पाने, भोपळ्याची पाने देखील वापरली जात. सध्या स्विस
चार्ड देखील लोकप्रिय आहे.

३) बीन्स

बीन्स म्हणजे आपल्या राजमासारखे दाणे. राजम्यापेक्षा थोडे मोठे असतात आणि त्यावर थोडी नक्षी पण असते.
ही बीन्सची झाडे वीतभरच वाढतात आणि त्याला भरपूर शेंगा लागतात.

यातले दाणे तिथे ताजे किंवा सुकवलेले अश्या दोन्ही प्रकारात मिळतात. हे दाणे उकडून त्यात थोडे मीठ घालून
खातात. कधी कधी या दाण्यांसोबत मक्याचे दाणे किंवा भोपळ्याचा पालाही शिजवतात.

हे दाणे चवीला छानच लागतात. आपल्या पद्धतीने केले तर जास्तच छान लागतात. राजम्याच्या मानाने
हे लवकर शिजतात.

४) न्यामा चोमा

न्यामा चोमा म्हणजे भाजलेले मटण. हे शक्यतो बकर्याचे असते पण बाकी कुठलाही प्राणी, पक्षी खाणे
त्यांना वर्ज्य नाही. गवताळ भागामूळे तिथे तृणभक्षी प्राण्यांची पैदासही भरपूर होते.

या मटणालाही फारसे मीठ मसाले लावलेले नसतात. प्राण्याच्या अंगच्या चरबीमूळे त्याला भाजताना
तेलतूपही लागत नाही. स्थानिक लोकांसाठी हा चैनीचा खाद्यप्रकार आहे. बाजारातून मटण विकत
घेणे त्यांना परवडतेच असे नाही. पण गावाजवळ एखादा प्राणी मारल्यास गावकर्यांची चंगळ असते.

नैरोबीजवळ खास मटणासाठी शहामृगांची पैदास केली जाते. तसेच तिथे "कार्नीव्होअर" नावाचे रिसॉर्ट आहे.
तिथे तूम्हाला हव्या त्या प्राण्याचे मटण ( झेब्रा, रानडुक्कर, मगर, शहामृग.... ) तूमच्यासमोर भाजून द्यायची
सोय आहे.

५) कंदमूळे

रताळी, कसावा, अरारूट सारख्या कंदमूळांचे केनयात भरपूर पिक येते. रताळी आणि अरारूट हे बहुदा उकडून
खातात. तिथली रताळी आपल्या रताळ्यांपेक्षा मोठी असतात. ( सहज अर्धा, पाऊण किलो वजनाची ) एक
खाल्ले तर पोट तुडुंब भरते आपले. रताळे भाजूनही खायची पद्धत आहे.
कसावा हे सर्वच आफ्रिकेत लोकप्रिय आहे. हातभर लांब असणारे हे कंदमूळ सोलून, निखार्यावर भाजून खातात.
ते तळून खायचीही पद्धत आहे. त्यावर मीठ मसाला घालून खुप मस्त लागतं. सवय नसेल तर कसावा खाऊन
तोठरा बसू शकतो.
तसेही कसावा जमिनीखाली टिकून राहू शकते, तरी तिथे त्याचे तूकडे करून, वाळवून पिठ करून ठेवायची
पद्धत आहे. आयत्यावेळी या पिठात गरम पाणी ओतले कि ते शिजून निघते. केनयातल्या कल्पक गुजराथी
बायका या पिठाचे सुंदर चवीचे पापड करतात.

कंदमूळाचा विषय निघालाय तर बटाट्यांचा उल्लेख करायलाच हवा. बटाट्यांना तिथे आवर्जून आयरीश पोटॅटो
म्हणतात. नैरोबीच्या आसपास बटाट्याचे अमाप पिक येते आणि पोती भरभरून बटाटे नैरोबीत आणले जातात.
बटाट्याच्या चिप्स तिथे खुपच लोकप्रिय आहेत. या चिप्स मॅकडोनाल्डच्या चिप्स प्रमाणे कुरकुरीत नसतात.
पण चवदार मात्र नक्कीच असतात. चिप्स आणि सोडा ( एखादे कोल्ड ड्रिंक ) म्हणजे स्थानिक लोकांचे मधल्या
वेळचे लोकप्रिय खाणे आहे.

६) चा ( चहा )

भारताप्रमाणेच ब्रिटीशांनी केनयात देखील चहा लागवड सुरु केली. केरिचो हे साधारण उंचीवर वसलेले आहे आणि
तिथे वर्षभर पाऊस पडतो, त्यामूळे चहाच्या लागवडीसाठी योग्य ठरले. सध्या त्या गावात खुप मोठे चहाचे मळे आहेत.
"केरिचो गोल्ड" या ब्रँड नेम खाली मिळणारा चहा खुप लोकप्रिय आहे. केरिचो गावात थेट मळ्यातून चहापत्ती
खरेदी करता येते.

स्थानिक लोक भारतीय पद्धतीप्रमाणेच भरपूर साखर व दूध घालून चहा करतात. आपल्या कपांपेक्षा त्यांचे चहाचे
कप खुप मोठे असतात. तिथले भारतीय अर्थातच आपल्या पद्धतीप्रमाणे मसाला वगैरे घालून चहा करतात.
पुदीना घालून केलेला चहा देखील लोकप्रिय आहे.

तिथल्या अनेक गावात गुजराथी लोकांनी स्थापन केलेली देवळे आहेत. ती देवळे म्हणजे देवाचे घरच मानतात.
आणि एखाद्या घरी जेवणाच्या / चहाच्या वेळेस कुणी पाहुणा आला तर त्याला जसे जेवल्याशिवाय / चहा
प्यायल्याशिवाय सोडत नाहीत, तसेच त्या देवळात करतात. नाकुरु मधल्या देवळातल्या पुजार्यांनी पाजलेल्या
चहाची चव मी कधीही विसरू शकणार नाही.

मसाले घातलेल्या चहाच्या पावडरी पण तिथे मिळतात. मारा मोजा नावाचा एक इंस्टंट चहा मिळतो.
गरम दुधात ही पावडर व साखर घातली, कि चहा तयार.

७) मंडाझी

सकाळच्या चहाबरोबर खाल्ला जाणारा हा एक लोकप्रिय प्रकार. केनयात थोडेफार गव्हाचे उत्पादन होते पण मोठ्या प्रमाणावर गहू आयात करतात. ( कारण ब्रेड देखील तिथे खुप लोकप्रिय झालाय )
मैदा पाण्यात भिजवून त्यात साखर टाकतात. तो किंचीत आंबला कि त्याचे मोठे मोठे गोळे करून तेलातून
तळून काढतात. ( कधी कधी पावाचे तूकडेही मैद्याच्या घोळात बुडवून तळून काढतात.) य पदार्थाचे नाव
"मंडाझी". हा चहाबरोबर गरमागरम खाल्ला जातो.
तिथे रस्त्यावर हा पदार्थ विकायलाही असतो. तसा थंड झाल्यावरही चांगला लागतो. कधी कधी हि मंडाझी
वरून साखर शिवरूनही खातात.

८) फळे

केनयात फळांचे उत्पादनही भरपूर होत असल्याने, सर्वसाधारण केनयन माणूस दिवसाला २/३ फळे खातोच.
तिथे स्वीट बनाना म्हणून केळ्याची एक जात आहे. अगदी बोटाएवढ्याच आकाराची असतात पण चवीला
खुपच छान लागतात. एकावेळी ५/६ अगदी सहज खाता येतात. ती केळी खुप लोकप्रिय आहेत.
त्याशिवाय सिझनमधे बाजारात आंब्याचे ढीग पडतात. नाक्या नाक्यावरही आंबेवाले असतात. तिथे किरमीजी
रंगाची पॅशन फ्रुट्स मिळतात. स्वादाला अप्रतिम लागतात ती. त्याशिवाय केशरी रंगाची पण पॅशन फ्रुट्स असतात.
संत्राचे दोन तीन प्रकार असतात. प्लम्स ( हे लाल आणि पिवळ्या अशा दोन प्रकारात मिळतात. ), पेअर्स,
अननस यांचे पण असे सिझन असतात. पपया वर्षभर असतात. कलिंगडाचेही ढीग असतात.

जांभळे, तुती, पेरू, सिताफळे, बोरे, फणस, अवाकाडो हेही असतातच. आता स्थानिक लिची पण दिसायला लागली आहे. डाळिंब व चिकू पण असतात.

सिझन असला तर रस्त्यात सिग्नलला भरपूर प्रमाणात फळे विकायला असतात. रस्त्याच्या कडेने, अगदी शहराबाहेरही या फळांचे ढीग विकायला असतात. फळे नैसर्गिक चवीची असतात. प्रमाणाबाहेर गोड नसतात.

या फळांचे जॅमही बाजारात उपलब्ध आहेत, क्वचित ठिकाणी रस विकायला असतात. पण जास्त करून लोक
फळांनाच पसंती देतात.

मोंबासा भागात काजूची झाडे आहेत. काजूची फळे सहसा नैरोबीच्या बाजारात दिसत नाहीत, पण काजूगर
मात्र असतात. मकाडामिया चा सिझन आला कि खमंग भाजलेले मकाडामिया बाजारात व रस्त्याच्या कडेने
विकायला येतात. अप्रतिम चव असते त्यांची. भाजलेले शेंगदाणे पण खुप लोकप्रिय आहेत.

त्याचबरोबर उस पण आवडीने खाल्ला जातो. उसाचा रस क्वचितच मिळतो. शक्यतो उसाचे तूकडे किंवा
गंडेरी खाल्ली जाते.

९) चपाती http://www.maayboli.com/node/34293

आपली भारतीय चपाती देखील केनयात फार लोकप्रिय आहे. तिला ते चपातीच म्हणतात. आपल्यासारखी
घडीची किंवा फुलका टाईप नसते ती. ती साधारण जाडसर असते व भरपूर तेलात भाजलेली असते.
चहाबरोबर किंवा बीन्स बरोबर ती खातात.

तिथल्या हॉटॅलमधे खिमा चपाती नावाचा पदार्थ लोकप्रिय आहे. खिम्याचे सारण भरून केलेला हा चौकोनी
पराठा तेलात खरपूस भाजलेला असतो.

अर्थात भारतीयांची संख्या भरपूर असल्याने गुजराथी फुलका व पंजाबी पराठाही केनयात सहज मिळतो.

१० ) मारु भजिया

मारु भजिया हा प्रकारही तिथे खुप लोकप्रिय आहे. हि खरे तर बटाट्याची भजीच पण बटाट्याचे अगदी पातळ
काप केलेले असतात व बेसनात भरपूर कोथिंबीर घातलेली असते.

निव्वळ अशी भजी विकणारी काही दुकाने तेथे आहेत. सोबत पिकलेला टोमॅटो किसून केलेली पातळसर
चटणी असते.

बटाट्यासोबत कांद्याची खेकडा भजीही असते पण मारु भजियाच जास्त लोकप्रिय आहेत.

११) दूध

केनयातले जंगल म्हणजे बहुतांशी गवताळ प्रदेश आहे. या प्रदेशात पूर्वापार मसाई लोकांची वस्ती आहे आणि
ते परंपरेने गायी पाळण्याचा व्यवसाय करतात. गायींचे त्यांच्या जीवनात खुपच महत्व असते, वेळप्रसंगी ते
गायींसाठी सिंहाचादेखील मुकाबला करण्यास मागेपुढे बघत नाहीत. वधूपित्याला लग्नात गायी दिल्याशिवाय
लग्नाला त्याची मान्यता मिळत नाही.

गायीचे दूध हे त्यांच्या आहारातला महत्वाचा भाग आहे. गायीचे दूध पिण्याआधी त्यात ते थोडेसे गायीचे रक्त
मिसळतात. त्यासाठी गायीच्या गळ्याला ते खास हत्याराने जखम करतात. यात गाय मरत नाही पण असे
रक्त न मिसळता दूध प्यायले तर ते बाधते असा त्यांचा समज आहे.

दूध घेऊन शहरात विकायला आणण्याचा व्यवसाय देखील काही मसाई लोक करतात. ( अर्थात त्यात रक्त
मिसळलेले नसते. ) अगदी सकस आणि भरपूर स्निग्धांश असलेले हे दूच, चवीला फार उत्तम लागते.

शहरातील कारखान्यांतून काम करणार्या कर्मचार्यांना त्या कारखान्यातर्फे रोज अर्धा लीटर दूध दिले जाते.
ते दूध ते लोक थेट पिशवी तोंडाला लावून एकादमात संपवतात. दूधाचे वितरण करणारे अनेक उद्योगही
केनयात आहेत आणि त्यांनी वितरीत केलेल्या दूधाच्या पिशव्या दिवसभर सुपरमार्केट्स मधे उपलब्ध असतात.
त्यांचा खपही भरपूर असतो.

हे उद्योग दूधापासून दही, लोणी, पनीर, चीज अशी अनेक उत्पादने बाजारात आणतात. त्यांना भारतीय लोकांकडून भरपूर मागणी आहे. स्थानिक लोक मात्र ताकाची मागणी करतात.

गायीसोबत, बकरी आणि उंटीणीचे दूधही स्थानिक लोकांत लोकप्रिय आहे. सुपरमार्केटमधे ते मिळतेही.
म्हशीचे दूध मात्र तिथे सहसा मिळत नाही.

गायीचा चीक हा वासरासाठीच असतो यावर त्यांचा ठाम विश्वास आहे त्यामूळे तोही बाजारात विकायला आणला
जात नाही.

१२) मझिवा लाला

दूधाला किस्वाहिली भाषेत मझिवा म्हणतात. मझिवा लाला चा शब्दशः अर्थ, झोपलेले दूध. त्याचा शॉर्टफॉर्म
म्हणून माला हा शब्द वापरतात. आपल्या दह्यापेक्षा थोडेसे वेगळे विरजण वापरून हे केलेले असते. सध्या
ते बाटलीत किंवा टेट्रा पॅकमधे मिळते आणि ते फार लोकप्रिय देखील आहे.

त्यांची पारंपारीक पद्धत मात्र किंचीत वेगळी आहे. क्रोमवो नावाच्या एका झाडाची जळकी काठी घेऊन ती
जून दूधी भोपळा कोरून केलेल्या भांड्याच्या आतल्या भागावर चोळतात. मग त्यात ताजे दूध ओततात.
हे दूध त्या कोरलेल्या दुधी भोपळ्यात २/३ दिवस तसेच ठेवतात. त्यानंतर त्यांचे मुरसीक नावाचे ताकासारखे पेय बनते.

हे टिकाऊ तर असतेच शिवाय त्यात काही औषधी गुणधर्म देखील असतात. सध्या मात्र तरूण मूलांचा ओढा
कोका कोला सारख्या पेयांकडे आहे. सर्व शीतपेयांना ते "सोडा" असा शब्द वापरतात. असा सोडा आणि बटाट्याच्या चिप्स, हे त्यांचे अत्यंत आवडते खाणे.

१३) तिलापिया

केनयाच्या समुद्रकिनारी आणि लेक व्हीक्टोरीयाच्या किनारी राहणार्या लोकांच्या आहारात माश्यांचा मोठ्या
प्रमाणावर समावेश असतो. मधल्या भागात कमी प्रमाणात सुके मासे खाल्ले जातात. पण तिलापिया हा मासा
मात्र शहरी भागात लोकप्रिय आहे. हा सहसा अख्खा तेलात खरपूस तळला जातो. संध्याकाळी रस्त्याच्या कडेला
असे ताजे तळलेले तिलापिया विकायला असतात.

ब्रिटीश पद्धतीप्रमाणे फिश अँड चिप्स खाणे पण तिथे लोकप्रिय आहे.

मध्यंतरी लेक व्हीक्टोरीयात नाईल पर्च हा मुद्दाम जोपासलेला मासा मुजोर झाला होता. त्याने बाकीचे मासे
खाऊन टाकल्याने, त्या शिवाय दुसरे मासेच उपलब्ध नव्हते. खायला बेचव असलेला हा मासा स्थानिक लोक नाईलाजाने खात असत.

१४) टस्कर बियर

टस्कर आणि व्हाईट कॅप या ब्रँड नावाने मिळणारी स्थानिक बियर केनयात खुप लोकप्रिय आहे. शुक्रवार संध्याकाळ पासून रस्त्याच्या कडेचे सर्व बार्स गर्दीने फुलून गेलेले दिसतात. सर्व चिंतांपासून मुक्ती
मिळवायचा त्यांचा हा मार्ग आहे.

हे सर्व स्थानिक पदार्थ आहेत हे जरी खरे असले तरी केनयात भारतीय लोक, खास करून गुजराथी व पंजाबी
गेल्या १०० वर्षांपासून अधिक काळ वास्तव्य करून आहेत. त्यामूळे या दोन्ही प्रांतातले पारंपारीक पदार्थ,
अगदी हांडवो पासून चिवड्यापर्यंत, केनयात मिळतात. दूधाचे आईसक्रीम तर मिळतेच पण मिठायादेखील
मिळतात.
या लोकांनी चालवलेल्या देवळात सणासुदीला व गुरुद्वारात रोजचच जेवण उपलब्ध असते. ते अत्यंत चवदार
तर असतेच शिवाय वाढताना आग्रह करकरून वाढले जाते.
http://www.maayboli.com/node/25277

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख दिनेशदा! इथे इंग्लंडमध्ये एक चिवडा बघितला तेव्हा वेगळा वाटला. असा काय हा म्हणून म्हंटलं. शिवाय नेहमीच्या मराठी चिवड्याच्या दुप्पट ते तिप्पट महाग होता. बारकाईने बघितलं तर तो केनियन चिवडा होता. तर केनियात खरोखर असा चिवडा मिळतो का? Happy
आ.न.,
-गा.पै.

छान ओळख. फोटोही चालतीलच की!
न्यरेरे म्हणजे राजगिरा. पण टांझानियाचे अध्यक्ष किंवा कायसे कुणी न्यरेरे होते का?

खूप मस्त माहिती मिळाली.... Happy
जनरली प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहिती दिली - सांगितली जाते. पण तुम्ही तिथे राह्यला होता; त्यामुळेच ही पण माहिती मिळाली.

फोटो, खास खाद्यपदार्थांचे नव्हते काढले... म्हणून नाहीत.
हो गामा, त्याला "चिवडो" म्हणतात. हळद थोडी जास्त असते आणि बटाट्याच्या सळ्याही. तिथे तो फार लोकप्रिय आहे.

अपण हे जे काही लिहीत आहात ते मराठीभाषिकांवर अन् मराठी संस्कृतीवर मोठे उपकार आहेत
लेखन छानच आणि विषय माझा आवडता --खादाडी असल्याने पार गुंतून व्ह्यायला झाले
धन्स अ लॉट दिनेशदा
खूप छान माहिती पण फोटो हवेतच दिनेशदा. <<<बी +१००००००००...

ओ हो हो, केवढी माहिती दिलीये या निरनिराळ्या खाद्यपदार्थांची .... Happy

सर्व माहिती मस्त - फोटु मात्र हवेतच .... Happy

कित्ती वेगवेगळी माहिती ...
मारु भजिया नक्की करुन पाहणार .. त्या सोबत करतात ती चटणी कशी करतात ते पन थोडक्यात सांगा न दिनेशदा Happy

आपली भारतीय चपाती देखील केनयात फार लोकप्रिय आहे. तिला ते चपातीच म्हणतात. >> मस्त! याचा मला उगाचच नेहमी अभिमान वाटतो Happy

फोटो मात्र हवे होते, त्याशिवाय पाकृसंदर्भातील लेख माझ्यासारख्याला वाचायला आळसाचे होते, कितीही चांगला माहितीपुर्ण का असेना.

आभार, फोटो काढायला आता मला परत केनयाला जायला हवं. मायबोलीवर मी लिहिलंय बरंच या आधी. काही लेखांच्या लिंक्स दिल्यात वर.

टीना, पिकलेले घट्ट टोमॅटो किसून घेतात आणि त्यात मीठ, मिरची आणि कोथिंबीर घालतात. तिथे ती अशीच असते. पण फोडणीवर घालून शिजवली तर आणखी चांगली लागेल.

छान महिती!! केनिया सफारी केली तेव्हा ह्यातील काही खाद्यपदार्थ खाल्ले आहेत!! मला उगाली आणि सुकुमा फारच आवडले होते. नैरोबी मधील "कार्नीव्होअर" चा अनुभव पण खूप छान आहे!!

Pages