कवितेसाठी

Submitted by भुईकमळ on 26 January, 2015 - 10:57

कवितेच्या पंढरीची
हाक बिलगून गेली
जन्म झाला वारकरी
तरी संपेना वाटुली ∥१∥

अनवाणी पावलांना
लळा काट्यांचा लावून
कविते ग तुझ्यापायी
आले पैंजणे फेकून ∥२∥

गाथा बुडाली तृष्णेत
असे घातले साकडॅ
वन्ही आषाढात पेटे
कसे टाकलेस कोडे ∥३∥

दिंडीतील रिंगणात
वारु होत उधाणले
उरातील कासाविशी
तुझा जयघोष बोले ∥४∥

तुझ्या एका स्पर्शासाठी
पाऊले ही वादळती
घाल घनचिंब मिठी
दर्वळू दे माझी माती ∥५∥

कशी येऊ चरणासी
वाहताना लोंढ्यातून
डोळ्यातील चंद्रभागा
जाऊ पाहे कलंडून ∥ ६ ∥

दिशा अबीरमाखल्या
तरी कळस दिसावा
आशयाच्या नभांगणी
पूर्णचंद्र उजळावा ∥ ७ ∥

............माणिक वांगडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुईकमळ ,खूप सुंदर वारी , इथे कविताच विठ्ठलरूप आहे आणि काट्याकुट्याची वाट दुर्गम आहे .. इथे इंद्रायणी सतृष्ण आहे आणि आषाढ जाळून काढणारा . वारीचे संदर्भ बदलून गेलेले आहेत म्हणून कदाचित शेवटी कळसाच्याही वर आशयाच्या आकाशात चंद्र आहे तो पूर्णिमेचा , पूर्तीचा, एकादशीचा नाही.

भारतीजी,खुप सुंदर समर्पक शब्दातला प्रतिसाद .तुमच्या ओळींनी आपली योग्य मार्गाने वाटचाल सुरु असल्याची ग्वाही दिली . तुमच्या या प्रोत्साहित करणारया चारच शब्दांच्या चन्द्रथेंबांसाठी माझा चकोर झालेला....खुप खुप धन्यवाद !

मस्त !! खूप आतून अनुभवता येणारी सुंदर अष्टाक्षरी
अतीशय उच्च्य काव्यात्मक दर्जा असलेली कविता खूप दिवसांनी वाचायला मिळाली तीही विठ्ठलावरती
परफेक्ट कविता परफेक्ट वारी

असे सुंदर शब्द सुचायला काय खाता तुम्ही मला काही केल्या असे सुंदर शब्द सुचत नाहीत हो
असले सुचतात

तुझी येवून जाते एक वारी आमच्या गावी
तिच्या मागून एखादा हरामी कॉलरा येतो ......

मला काही टीप्स द्या ना असतील तर Happy

धन्यवाद

मामी,मि.बी,सुशांत खुरसालेजी ,वैवकु आणि प्रमोद देव अगदी मनापासून धन्यवाद!!!तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाने या साध्याशा कवितेला पुनवआभा आलीय आणि वैवकु तुम्ही देखील कवितेचे जरा जास्तच कौतुक केलयत असं वाटून गेलं

दिशा अबीरमाखल्या
तरी कळस दिसावा
आशयाच्या नभांगणी
पूर्णचंद्र उजळावा >>>>> क्या बात है .... अगदी कळसाला पोहोचलीये रचना इथे ..... खूपच सुरेख ....