ओला अमिगोस! मेक्सिको! भाग - २

Submitted by दैत्य on 7 January, 2015 - 04:40

नमस्कार मित्रांनो!
पहिल्या भागातल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! ह्या दुसर्‍या भागात मुख्यत्वानं 'चिचेन इत्झा' ह्या माया लोकांच्या महत्वाच्या गावाबद्दल आणि माझ्या वाचनात आलेल्या त्यांच्या संस्कॄतीबद्दल थोडं लिहायचा प्रयत्न करणार आहे.

पहिल्या भागासाठी लिंकः
http://www.maayboli.com/node/52178?page=1#new

माया संस्कॄती -
माया संस्कॄतीचा कालखंड साधारण इसवीसनाच्या साधारण १५०० वर्षं पूर्वी पासून ते स्पॅनिश साम्रज्यवादी योद्धे ( Conquerors or Conquistadores) येईपर्यंत म्हणजे इ.स.१५५० पर्यंत असावा असा कयास आहे. ह्यातला बराचसा इतिहास दगडांवर कोरलेला आणि काही 'कोडेक्स'- म्हणजे गुंडाळलेल्या कागदपत्रांमध्ये सापडतो. माया लोकांबद्दल वाचताना पहिल्यांदा लक्षात ठेवावं लागतं म्हणजे त्यांचा कालखंड,अनेक अंधश्रद्धा, चालीरिती, नरबळी देण्याच्या प्रथा आणि सापांमार्फत केलेली मॄत्यूची भितीयुक्त पूजा. म्हणूनच आजच्या कालखंडातले मानवी आयुष्याबद्दलचे निकष लावले तर मागच्या लेखात लिहिल्याप्रमाणे माया लोक भयावह आक्रमक वाटतील.
माया लोक काही अंशी मूर्तीपू़जक होते असं म्हणायला हरकत नाही. त्यांची विश्वाची संकल्पना म्हणजे दिवसा सूर्य हा देव असतो आणि रात्री तोच सूर्य पाताळात जातो म्हणून प्रत्येक गुहा किंवा डोह म्हणजे पाताळात ( Underworld ला दुसरा कोणता शब्द आहे माहित नाही.) जाण्याचं प्रवेशद्वार!
त्यांचे मुख्य देव म्हणजे-
१. कु-कुल-कान (Ku'kulkan) - हा देव म्हणजे पिसारा असलेला चालता-बोलता आणि उडू शकणारा साप! चिचेन इत्झा मध्ये ठिकठिकाणी (घरांबाहेर, देवळांबाहेर, किल्ल्याभोवती) ह्याचा चेहेरा नाहीतर तोंड उघडलेला साप दिसतो. 'कु-कुल-कान' हा प्रत्येक घराण्यांच्या पूर्वजांचं प्रातिनिधित्व करतो. हिंदू धर्मातल्या कथांमध्ये कसे पातालद्वाररक्षक नागदेव असत, ते आणि पूर्वजांचं पितर ह्या दोन्ही भूमिका एकत्र केल्या तर 'कु-कुल-कान' च्या कामच्या स्वरूपाची जाणीव होईल! ह्याचं प्र.चि इथे देत आहे.

From Mexico
प्रचि १: कु-कुल-कान अर्थात पातालरक्षक-आकर्षक मायावी सर्प-पितर-देव ! (हे मी त्याच्यासाठी तयार केलेलं संस्कॄत नाव! Wink )

२. चाक किंवा चाक-मूल (Chak-mool, उच्चार- 'च्याक मूल'): हा पर्जन्यदेव (अहो, साक्षात इंद्र!) - माया लोकांसाठी पाऊस हा अतिशय महत्वाचा घटक होता आणि संपूर्ण माया समाजतल्या चतूर धर्मगुरूंनी बरेच वर्षं हवामानाबद्दल संशोधन करून पाऊस वसंत ॠतूत चालू होतो हे जाणलं होतं. पण, हे ज्ञान सर्वांना देण्याऐवजी एक युक्ती करत असत. दर वर्षी थंडी संपत आली की २० मार्चच्या (ग्रेगोरीयन कॅलेंडरनुसार) म्हणजेच वसंतसंपातबिंदू किंवा vernal equinox ( मराठी शब्द बरोबर आहे की नाही ह्याची १००% खात्री नाही!) सुमारास एक प्रचंड भव्य उत्सव साजरा करत असत ज्यात पर्जन्यदेवासाठी (खरंतर कोणासाठी कळलं असेल!) नजराणे, फळं, धान्य, पशू, स्त्रिया ( sad, but true) आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या वर्षीचा नरबळी हे गावातल्या मोठ्या पिरॅमिडच्या सर्वात उंच चौथर्‍यावर ठेवलं जाई. इथे धर्मगुरू आणि त्यांचे चेले ह्यांनाच फक्त प्रवेश मान्य होता. त्यानंतर मुख्य धर्मगुरू सगळ्यांसमोर चौथर्‍यावरच्या छोट्या मंदिरात जाऊन देवाशी संवाद साधत आणि पाऊस पाडण्यासाठी पशू आणि नरबळी देवाला अर्पण करत! काही काही जुन्या कागदपत्रांमध्ये बळीचं चालू ह्रदय हजारो लोकांसमोर काढून ठेवण्याचा विधी सांगितला आहे. हे सगळं वाचताना खूप गदगदून यायची शक्यता आहे, पण ज्या समाजात ह्या कृत्याला क्रौर्याऐवजी हौतात्म्याचं आवरण होतं त्यांच्यासाठी ही घटना म्हणजे एखाद्या उत्सवातले सोपस्कार असतील तसंच बघितलं जात असावं. पुढचं चित्र अर्थात चाक-मूल च्या मंदिराचं आहे.

From Mexico
प्रचि २ : चाक-मूल - माया-इंद्र किंवा मायेंद्र! ( विनाकारण संस्कॄत संधी!)

३. किनिच आहोऊ (Kinich Ahau) - हा सूर्यदेव- कालगणना मुख्य म्हणजे माया कॅलेंडर चंद्र आणि सूर्य ह्या दोन्हीच्या आकाशातल्या गतीवर अवलंबून होतं. माझ्या/गाईडच्या माहितीनुसार चांद्रगतीचा उपयोग दिवस आणि महिने ह्यांसाठी, तर सूर्यगतीचा उपयोग वर्षं आणि युगांच्या गणनेसाठी होता.
अवांतरः २०१२ मध्ये काही लोकांनी अशी अफवा पसरवली होती की माया लोकांनी २३ डिसेंबरला जगाचा अंत होणार हे निश्चित केलं आहे. खरंतर माया कॅलेंडर त्या दिवशी संपत होतं आणि नवीन युग सुरू होणार होतं!

४. इत्झाम-ना (Itzam'na) - हा देवाधिदेव किंवा हिंदू धर्मातल्या ब्रह्मा-विष्णू कॅटेगरी हाय-लेव्हल देव! ह्याबद्दल मला फारशी माहिती नाही.

आता वळूयात खेळांकडे! हे खेळ म्हणजे काही पोरांचे खेळ नव्हेत. 'पोक-ता-पोक' नावाचा खेळ म्हणजे विश्वोत्पत्तीची मनोरंजक गोष्ट आहे. एकदा काय झालं, की शिबाल्बा ( Xibalba- पाताळ) च्या राजानं एका पॄथ्वीवरच्या देवाचं अपहरण केलं आणि पाताळात दडवून ठेवलं. देवाचे दोन जुळे मुलगे त्याला शोधायला बाहेर पडाले. त्यांची नावं 'हून-आपू' (Hunahpu) आणि 'इक-बालान' (Xbalanqe) अशी होती. हे दोघं शोधून शेवटी पाताळात गेले तेव्हा पाताळाच्या राजानं (जो कपटी होता) त्यांना पोक-ता-पोक खेळ खेळलात आणि जिंकलात तर वडिलांना सोडू असं धमकीवजा आमंत्रण दिलं. हा खेळ अतिशय अवघड असल्यामुळे ते दोघं खेळतच राहिले. थोडक्यात म्हणजे हा खेळ हे 'चांगलं आणि वाईट ह्यांच्यातला सतत बदलणारा समतोल' ह्याचं प्रतीक आहे. माया लोक हा खेळ खरा खरा सिरियसली खेळत असत आणि त्यासाठी मोठाली प्रक्षागृहं बाधली जात.
खाली काही प्रचि टाकत आहे. चिचेन इत्झा मध्ये जगातलं सगळ्यात मोठं 'पोक-ता-पोक' प्रेक्षागॄह आहे.

From Mexico
प्रचि ३ : प्रेक्षागृह किंवा स्टेडियम. कडेच्या दोन भिंतींवर दोन रिंगा लावल्या असायच्या आणि त्या रिंगामधून बॉल गेला (म्हणजेच गोल झाला की!) की खेळ थांबायचा. समोर दिसणारी छोटी इमारत म्हणजे राजाला पाहता यावं यासाठी केलेली खास जागा. Executive box!

From Mexico
प्रचि ४: इथे धर्मगुरू खेळ बघण्यासाठी बसत. ह्यांची जागा राजापेक्षा उंचावर होती, almost like a media box!

From Mexico
प्रचि ५: स्टेडियमच्या भिंतीच्या खालच्या भागात दगडात कोरलेले चेहेरे. हे कदाचित नावजलेले खेळाडू असतील असं आमचा गाईड म्हणाला. आम्ही लगेच त्याला Hall of Fame म्हटलं!

तर असा खेळाचा भाग होता. ह्याशिवायही अनेक वेगवेगळ्या इमारती आणि मंदिरं होती. प्रत्येक इमारत (स्टेडियम सोडून) पिरॅमिड आकाराची होती. जेवढी समाजातली उंची जास्त तेवढं उंच पिरॅमिड असं काहीसं गणित होतं. ही अजून काहे प्रचि. इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या की सगळं आता आठवत नाहीये, पण प्रचि बघायला चांगले वाटतायत!

From Mexico
प्रचि ६:

From Mexico
प्रचि ७ : इकडे बघाल तर नुसत्या कवट्या! 'कवट्या महांकाळ'चं घर असेल बहुतेक! Lol

From Mexico
प्रचि ८: हे अति-अगम्य आहे!

त्या दिवसानंतर 'मायेचा ओव्हरडोस' म्हणून की काय 'मुसेओ माया' (Museo Maya) -माया म्युझियमला गेलो आणि एका वटवॄक्षाच्या शीतल छायेखाली समाधिस्त होऊन 'शिबाल्बा' (पाताळ) पासून अगदी मोजक्या बोटांवर जाऊन आलो!

From Mexico
प्रचि ९: म्युझियम

From Mexico
प्रचि १०: म्युझियम परिसर

From Mexico
प्रचि ११: हाच तो वटवॄक्ष ज्याखाली आम्हांस समाधीमग्न अवस्थेत देवाधिदेव इत्झाम-ना (Itzam'na) ह्यांनी दॄष्टांत दिला व 'चिप्स अँड ग्वाकामोली' खाल्यास कल्याण होईल असा आशीर्वाद दिला! Wink

मित्रांनो, अजून खूप लिहिण्यासरखं आहे (स्पॅनिश आक्रमण, माया योद्ध्यांची शस्त्रं, आस्तेक-तोल्तेक-ओल्मेक लोक इ.इ.) तेव्हा जसा वेळ मिळेल तसं अजून पुढे पोस्टत राहीनच. काही तपशीलात चूका असल्या तर कळवा. मी इतिहासतज्ञ नाही आणि बहुतेक मला मिळालेला गाईड पण नसावा, पण थोड्या पुस्तकांमध्ये बघून मी खातरजमा केली आहे!
ह्याबद्दलच्या प्रतिक्रिया जरूर कळवा!

धन्यवाद!
-दैत्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो.. ते जिवंत माणसाचे हृदय काढत वगैरे खरे आहे. नॅशनल जिओग्राफिक मधे सचित्र लेख होता. एकंदरच नरबळी ला फार महत्व होते. नरमांसभक्षण पण करत असत.

त्या पिरॅमिडवर त्या सापाची सावली एका खास दिवशी सळसळत जाते, असे पण एका माहितीपटात बघितले होते.

खुप उत्सुकता आहे ते पिरॅमिडस बघायची, इथल्या फोटोतून सध्या तरी समाधान मिळवतोय..

सेवन वंडर्समधील एक म्हणून जाऊन आलो होतो चिचन इट्झाला. पण मला स्वतःला अजिबातच ग्रेट वाटलं नाही. जरा ओव्हरहाईप्ड म्हणता येईल असं (एस्पेशली तिकडे जायचा खर्च विचारात घेतल्यास).

फोटोज वगैरे बघितलेत त्यावरून भारी वाटत आले आहे चेचेन इत्झा. जायची इच्छा आहे केव्हापासून .
सायो, ते वंडर अशासाठी म्हणत असावेत की ३००० वर्षापूर्वीच्या मानाने फारच प्रगत संस्कृती - प्लॅन्ड सिटीज, मोठाल्या इमारती (ज्या अजून बर्‍यापैकी शाबूत आहेत) , ते ग्रह तार्‍यांचे ज्ञान, कॅलेन्डर वगैरे.

धन्यवाद!
@maitreyee : खरं म्हणजे फोटोजमधलं पिरॅमिड एवढं जुनं नाहीये. अजून एक गंमतशीर गोष्ट म्हणजे माया लोकांनी कधीच कोणत्याही बांधकामात धातूंचा वापर केला नाही ! सगळीकडे दगड आणि लाकूड वापरत असत. म्हणजेच मानवी उत्क्रांतीतलं 'लोहयुग' , 'ताम्रयुग' त्यांनी कधीच पाहिलं नाही असा होतो का, हे माहित नाही, पण कोणत्याही समाजाच्या प्रगतीतला हा ट्प्पा नसूनही माया लोक एवढे प्रगत (गणित आणि खगोलशास्त्र) का होते हे समजत नाही!

@सायो - माझंही काही अंशी हेच मत आहे.

खूप छान फोटो आणी माहिती.

'चिप्स अँड ग्वाकामोली' खाल्यास कल्याण होईल असा आशीर्वाद दिला... Rofl

अरे अंकोर वॅटला जाऊन या एकदा मग कळेल काय होते आपले पुर्वज आणि कसे होते तेंव्हाचे स्थापत्य. हे तर काहीच नाही. अगदी नगण्य म्हणता येईल.

फोटो फारच सुंदर आहेत..

दिनेशदा +१

मीना प्रभुंचे मॅक्सिको पर्व वाचा.....

एकदम वेगळी संस्क्रुती... त्यान्ना घोडा हा प्राणी व कडतुसे पण माहित नव्हती १५५० पर्यन्त!! येवढे जगा पासुन दूर होते. म्हणुन स्पॅनीशांचे घोड्यावर बसलेले स्वार त्यान्ना अदभुत वाटले. बंदूकांचा सामना ते लोक दगड व त्या पासुन बनवलेल्या हत्यारां नी करु पहात होते.... त्या मुळे स्पॅनीश लोक सहजगत्या विजयी ठरले... पूर्ण देशच त्यांच्या ताब्यात आला. अख्ख्या देशाचं त्यांनी ख्रिस्तीकरण करुन टाकलं....

तिकडे मला वाटलेलं अजुन आकर्षण म्हणजे फ्रिडा कोहेलो आणि दिएगो रिव्हेरा ची वेगळीच पेंटिंग्ज.... आणि म्युरल्स.... ती बघायची आहेत. ( सलमा हायेक चा "फ्रिडा" पाहिल्या पासुन तर ही इछ्छा अजुनच बळावली)

त्यांचा सांस्क्रुतिक वारसा त्यांनी छान जपला आहे. पर्यट्न चांगलेच जोर धरलेले दिसते..... (परत परत तोच विषय मनाला त्रास देतो.... आपली संस्क्रुती येवढी जुनी..... आपण काहीच जतन नाही केली.... अगदी ४०० वर्षांपुर्वीचा शिवाजी महाराजांचा इतिहास सुध्धा नाही.... केवढी ही अनास्था.....)