ड्रॅगनच्या देशात १२ - शांग्रीलाची लामासरी आणि गुईलीनमधले निसर्गाचे चमत्कार

Submitted by इस्पीकचा एक्का on 18 December, 2014 - 00:49

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

सहलीचा अकरावा दिवस उजाडला. गुईलीनला जाणारे विमान सुटण्याची वेळ दुपारी दोन वाजताची होती. गाइडच्या म्हणण्याप्रमाणे हॉटेलवरून बारा वाजता निघाले तरी चालण्यासारखे होते. म्हणजे न्याहारीनंतर चांगले अडीच तीन तास मोकळे होते. काल फिरताना बघितलेली शांग्रीलाची टेकडीवरची लामासरी इटिनेररीमध्ये नसल्याने राहिली होती. लांबून तर इमारत छान दिसत होती. आतापर्यंत शांग्रीलाचे सगळे रस्ते पाठ झाले होते त्यामुळे एकटाच बाहेर पडलो आणि लामासरीच्या दिशेने चालू लागलो.

लामासरीच्या आवारात शिरलो आणि हॉटेलमध्ये लोळत न पडण्याचा निर्णय केल्याचा आनंद झाला. कारण नाहीतर एका प्रेक्षणीय स्थळ बघायचे राहिले असते. शांग्रीलात सगळेच इतके सुंदर आहे आणि शिवाय सोंगझानलीन लामासरी सारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणामुळे ह्या लामासरीचा नंबर इटिनेररीत आला नव्हता असे दिसते !

ही लामासरी शांग्रीलाच्या एका टोकाला एका टेकडीवर बांधलेली आहे. ही सोंगझानलीन लामासरीच्या सात वर्षे अगोदर १६६७ साली बांधलेली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात येथे एक मोठा उत्सव असतो. त्यांत इथल्या स्थानिक देवतेचे ८.५ मी X ५.२ मी आकाराचे एक रेशमाच्या भरतकामाचे चित्र बनवतात आणि भक्तांच्या दर्शनासाठी ठेवतात. शांग्रीलातही गांवदेवतेचा उत्सव सण साजरा करतात हे ऐकून मजा वाटली.

या लामासरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिचे गोल फिरणारे भलेमोठे धम्मचक्र. हे शांग्रीलात फिरताना बऱ्याच लांबूनही दिसते. मी याच्यावरूनच या लामासरीचा माग काढत काढत येथे आलो होतो !

साधारण १००-१५० मीटरचा चढ आहे. पण वर आल्यावर आजूबाजूचे मनोहर दृश्य पाहून सगळा शीण नाहीसा होतो. आवारात फिरता फिरता लामासरीच्या लामा जानसेन याची ओळख झाली त्यांनीही भारतीय चेहरा बघून अगत्याने कोठून आलो वगैरे चौकशी केली. त्यांचे भारतात काही काळ वास्तव्य होते त्यामुळे थोडे हिंदी आणि बरेचसे इंग्लिशमध्ये संभाषण झाले. नंतर मुख्य इमारतीशेजारच्या छोट्या पठारावरच्या भव्य धम्मचक्राकडे गेलो. टेकडीखालून भासते त्यापेक्षा हे चक्र बरेच मोठे आहे.

सोनेरी रंगाच्या चक्रावर बौद्ध धर्माची चिन्हे तर होतीच पण तेथील जनजीवन, कला आणि इतिहास याचेही चित्रण होते. हे प्रचंड चक्र फिरविण्यासाठी कमीतकमी वीसएक जण लागतात !

मी बराच वेळ फक्त फोटो काढतो आहे याचे निरीक्षण केल्यावर या आजीबाईंनी मला अक्षरशः हाताला धरून चक्र फिरवायला हातभार लावायला भाग पाडले !

सकाळच्या वेळेचे सोने झाले असे म्हणत टेकडीच्या पायऱ्या उतरून खाली आलो तर लामासरीच्या प्रांगणातले हे खास युन्नान तिबेटी पोशाखांचे दुकान समोर आले.

.

हे लोक त्यांच्या निसर्गासारखेच रंगीबेरंगी व मोहक नक्षीचे कपडे वापरतात. अगदी रोजच्या कपड्यांतही गुलाबी, लाल, निळा आणि पिवळा या रंगांचा कलापूर्ण वापर सर्रास दिसतो.

रमत गमत परत हॉटेलकडे निघालो. वाटेत भाजीवाले आपल्याकडल्यासारखेच रस्त्याच्या कडेला दुकान लावून बसले होते. रसरशीत ताजी भाजी बघून फोटो काढले... आता ते शाकाहारी मंडळींना दाखवून खूश करीन म्हणतो ! +D

.

.

हॉटेलवर येईपर्यंत साडेअकरा वाजले होते. तयारी करून ताबडतोप विमानतळाकडे प्रयाण केले. आज ८६० किमीचा विमानप्रवास होता. प्रथम शांग्रीला ते युन्नानची राजधानी कुनमिंग हे तासाभराचे उड्डाण, तेथे दोन तास थांबा घेऊन व विमान बदलून परत सव्वा तास उड्डाण असे करत संध्याकाळी साडेसहाला गुईलीनला पोहोचलो.

गुईलीन म्हणजे आमच्या टूर कंपनीचे शहर. येथे जरा खास खातीरदारी होईल असा होरा मनांत होता. पण विमानतळातून बाहेर पडलो तर जरा निराशाच झाली. लिजीयांग-शांग्रीलामध्ये दिमतीला चकचकीत ऐसपैस SUV होती, इथेतर एक छोटी सिडान आणि तीही बऱ्यापैकी म्हातारी ! शिवाय तिचे अंतरंगही जरासे कळकटच वाटत होते. पण साडेसहा तासांच्या प्रवासानंतर हॉटेलवर जाऊन एक वट्ट शॉवर घेण्याची प्रबळ इच्छा होती. शिवाय विमानतळावर गाईड काय करू शकला असता म्हणा. सगळे निर्णय तर टूर मॅनेजर घेते. तेव्हा पहिले हॉटेल गाठूया आणि नंतरच काय ते बोलू असे ठरवले. मात्र एक किरकोळ निषेध नोंदवून गाडीत बसलो. विमानतळापासून शहर ४५ मिनिटंच अंतरावर आहे. तीसएक मिनिटे चालल्यानंतर गाडी खोकला झाल्यासारखे आवाज करू लागली आणि चालकाने गाडी सफाईने सर्विस रोडावर घेताघेताच बंद पडली ! चालक खाली उतरून टॅक्सीला हात करू लागला. गाईड वरमून "गाडी मी ठरवीत नाही. ऑफिसमधूनच ते ठरते." वगैरे सारवासारवीची भाषा करू लागला. त्याला म्हटले, "ठीक आहे तुला दोष देत नाही पण आता हॉटेलमध्ये पोचल्यावर मी टूर मॅनेजरशी बोलू. तेव्हा मात्र हे सगळे सांग, तेथे सारवासारवी नको". त्याला दोष देत नाही म्हटल्यावर त्याची कळी जरा खुलली, म्हणाला, " हे सर्व जरूर सांगेन आणि चांगल्या गाडीची शिफारसही करेन."

हॉटेल मुख्य रस्त्यावर छान जागी होते. लॉबी आकर्षक होती. पण खोल्यांची स्थिती काही बरी वाटली नाही. एक कुबट दर्प आणि सिगारेटचा वास पॅसेजमध्ये भरून राहिला होता. खोलीमध्ये शिरलो, तिचे रूपही बरे वाटले नाही. आता खूप झाले... टूर मॅनेजरला फोन लावला आणि तुझ्याच शहरात कशी अवस्था आहे ते गाईडच्या तोंडीच ऐक म्हणून गाईडच्या हाती फोन दिला. त्यांचे चिनीमध्ये संभाषण झाले, मग फोन हॉटेल मॅनेजरच्या हाती गेला. परत ३-४ मिनिटे संभाषण. मग फोन माझ्या हाती आणि एक सवाल मला, "सर काय म्हणणं आहे तुमचं?" आता माझा रागाचा पारा चढायला लागला होता. तो ताब्यात ठेवत म्हणालो, "टूर बुक करताना स्वच्छता आणि टापटीप हे माझे निकष मी सर्वप्रथम सांगितले होते आणि तू कबूल केले होतेस. आता त्याची पूर्तता कर. अजून काय?" एवढ्यावरून आणि नकळत झालेल्या तिखट आवाजावरून तिला माझ्या मन:स्थितीची कल्पना आली असावी. पण कसलेली टूर मॅनेजरच ती. हॉटेल मॅनेजरला सांगून अजून दोन मजले हिंडवून खोल्या दाखवून घेतल्या.

एवढे झाल्यावर मात्र मी तिला परत फोन करून म्हटले, "तुझा माझ्या व गाईडच्या बोलण्यावर विश्वास नाही असे दिसते आहे. हे तुझेच गाव आहे. स्वतः इथे येऊन खात्री कर आणि मग बोल. तू म्हणशील तसे करू." ही मात्रा लागू पडली, पाच मिनिटात फोन करते म्हणाली. शब्द दिल्याप्रमाणे गाईडला फोन आला आणि आम्ही आमच्या बॅग घेऊन बाहेर पडलो. दुसरे हॉटेल मात्र खूपच छान निघाले... परत फोन आलाच तर आभाराचा यावा असे... गुईलीन ब्राव्हो हॉटेल. गुईलीनला भेट दिलीत तर येथे जरूर राहा.

प्रवासाच्या श्रमाने आणि टूर कंपनीने दिलेल्या धक्क्यांनी वैतागून कसेबसे जेवण केले आणि फारसा विचार न करता ताणून दिली.

===================================================================

सकाळी जाग आली आणि सहजच खिडकीकडे नजर गेली. कोणत्याही नवीन ठिकाणी हॉटेलच्या खोलीत गेल्यावर त्याच्या खिडकीतून आजूबाजूचा परिसर न्याहाळणे हा माझा छंद आहे... अगदी विमानात खिडकीजवळची जागा पकडण्यासारखाच. कारण जरा उंचीवरून त्या शहराची जरा वेगळी आणि काहीशी पारदर्शक ओळख होते. कालच्या सगळ्या गडबडीत हे खिडकी प्रकरण राहूनच गेले होते. सहजच पावले खिडकीकडे वळली आणि हे गुईलीनच्या पहाटेचे प्रसन्न दर्शन झाले...

सूर्यमहाराज अजूनही गुलाबी थंडीमध्ये धुक्याची रजई चेहऱ्यावरून पूर्णपणे काढायला तयार नव्हते. त्या अर्धप्रकाशीत वातावरणात हॉटेलजवळचे शांत तळे, त्याच्या काठावरची हिरवीगार वनराई आणि त्यांत पक्षांची चाललेली सकाळची लगबग व चिवचिवाट ! गुईलीनची आजची ओळख भावली. सहलीचा मूड पुन्हा जुळून येऊ लागला.

गुईलीनचा अर्थ गुई (Sweet Osmanthus) नावाच्या सुगंधी वृक्षांचे जंगल. अर्थातच गुई वृक्ष या नगरीत जागोजागी आहेत अगदी त्या शहराच्या चिनी नावातही... 桂林. ह्या शहराची सुरुवात ली नावाच्या नदीच्या काठावर इ. पू. ३१४ साली एका वस्तीच्या स्वरूपात झाली. तेव्हापासून आजतागायत चीनच्या अनेक सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक स्थित्यंतरांत या शहराचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यामुळे १९८१ सालापासून या शहराची गणना चीनच्या नैसर्गिक सौंदर्य व सांस्कृतिक ठेवा असलेल्या केवळ चार शहरांच्या गटामध्ये केली गेली. या गटातील इतर तीन शहरे आहेत बायजींग, हांगझू व सुजू. या चार शहरांत त्यांच्या पूर्वांपार ठेव्यांचे व निसर्गसौंदर्याचे रक्षण करण्याला प्राथमिकता आहे... आर्थिक-व्यापारी गोष्टींसह इतर सर्व दुय्यम मानावे असा कडक नियम आहे. हा नियम केवळ पुस्तकी न राहून त्याचे कसोशीने पालन केले जाते आहे हे ही शहरे फिरताना सगळीकडे स्पष्ट जाणवते.

आवांतरः यातले बायजींग शहर आपण अगोदरच पाहिले आहे, गुईलीन (त्याच्या जगप्रसिद्ध यांगशुओ काऊंटीसह) आज-नी-उद्या पाहणार आहोत व इतर दोन पुढच्या भांगांत येतीलच.

आजची पहिली भेट होती जिआंगतू (Jiangtou) नावाच्या गावाला. गुईलीनच्या बाहेर पडलो आणि शहराबाहेरच्या चीनचे दर्शन सुरू झाले.

.

.

जिआंगतू गावाची ख्याती अशी की चिनी साम्राज्यांचे अनेक पंतप्रधान या एका गावांतले होते. प्राचीनकाळी येथे शिक्षणाला इतके महत्त्व होते की ज्या कागदावर काहीही लिहिलेले आहे असा कागद जमिनीवर फेकायला मनाई होती... कारण तो पायाखाली येऊन लिखाणाचा अपमान होईल! नको असलेले पण लिखाणकाम केलेले कागद जाळून नष्ट करायला बांधलेली एक खास दाहिनी या गावात अजून जपून ठेवलेली आहे.

गावात फिरल्यावर मात्र भ्रमनिरास झाला. जिआंगतू गावाची "एक जुने खेडेगाव, जुन्या काळातल्या अनेक विद्वान पंतप्रधानांचे जुनेपुराणे वाडे आणि बर्‍यापैकी निसर्ग" एवढीच ओळख पुरे आहे. बऱ्याचशा वाड्यांची सांस्कृतिक क्रांतीच्या काळात मोडतोडही केली गेली होती त्याच्या खाणाखुणा जागोजागी दिसतात.

.

.

.

.

एखाद्या चिनी इतिहासाच्या संशोधकाला ह्या गावाला भेट द्यायला आवडेल. पण माझ्यासारख्या प्रवाशाला येथे आणण्यात काही अर्थ नाही असा एक छोटासा निषेध नोंदवून गाईडला पुढच्या ठिकाणी चलायला सांगितले.

गुईलीन शहरात खूप (गुई आणि इतर प्रकारची ) झाडे तर आहेतच पण भर शहरात बऱ्याच सुळक्यासारख्या उंच टेकड्याही आहेत. मुख्य म्हणजे वर सांगितलेला १९८१ चा कायदा येण्याअगोदर, या निसर्गाच्या अजूब्यांना जमिनीच्या किंमती आकाशाला भिडत असतानाही आधुनिकीकरणाच्या नावाखाली जमीनदोस्त केले गेले नाही हे विशेष. यातली ली नदीकाठची एक टेकडी तांग राजेशाहीमधल्या (इ. ६१८ - ९०७) एका प्रसिद्ध सेनानी 'फुबो' च्या नावाने ओळखली जाते. २०० मीटर उंचीच्या या सुळक्यावरून ली नदी व गुईलीन परिसराचे विहंगम दृश्य दिसते. वर चढताना अनेक स्तरांवर छोट्या गुहा आहेत आणि त्या प्रत्येक गुहेच्या मागे काही ना काही ऐतिहासिक घटना दडलेली आहे आणि गुहांत त्या घटनांशी निगडित पुतळे व कोरीवकामे आहेत. टेकडीच्या टोकावर फुबोचे मंदिर आहे.

.

.

.

गुईलीन आणि परिसरातील डोंगर व टेकड्या चुनखडीच्या खडकांनी बनलेल्या आहेत. पावसाच्या पाण्याने व नदीच्या प्रवाहाने होणाऱ्या लाखो वर्षांच्या झिजेमुळे त्यांचे चित्रविचित्र आकारांत रूपांतर झालेले आहेत. या भागात दिसणाऱ्या विचित्र निसर्गाचे हे सोपे कारण... पण त्याची विलक्षण प्रेक्षणीयता मात्र जगात इतरत्र कोठेही आढळत नाही... आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तर चीनच्या इतर भागांमध्येही नाही. याचा उत्तम अनुभव आपल्याला यांगशुओला जाताना येईल.

पुढचा थांबा, हत्तीच्या सोंडेची टेकडी (Elephant Trunk Hill), अशाच प्रकारच्या एका निसर्गाकृतीचे उदाहरण आहे. या टेकडीची ली नदीच्या प्रवाहाने अशी झीज झाली आहे की जरा दुरून पाहिले तर एक हत्ती सोंडेने नदीतले पाणी पीत आहे असे दिसते.

बाजूला एक सुंदर बाग आहे आणि नदीच्या पाण्यात रेस्तरॉ आहेत ! फिरून दमल्यावर संध्याकाळी नदीच्या पाण्यात पाय सोडून निवांत खाणेपिणे करायला मस्त जागा आहे.

.

चुनखडीच्या खडकांची झीज ही जशी डोंगराचे बाह्यरूप बदलते तसेच काही ठिकाणी तो आतून पोखरून (विरघळवून) त्याच्या पोटांत एक प्रचंड गुहा निर्माण करते. अशा गुहेत वरून टपकणारा पाण्याचा थेंब जर वरच्यावर सुकला तर त्यातल्या कॅल्शियमच्या क्षाराचा एक सूक्ष्म थर छतावर साठतो. असे हजारो-लाखो वर्षे सतत चालू राहून छतापासून लोंबणारा लवणस्तंभ (stalactite) बनतो. जेव्हा क्षारयुक्त पाण्याचे थेंब खाली पडून सुकतात तेव्हा हजारो-लाखो वर्षांनी जमिनीवरून छताकडे जाणारा स्तंभ (stalagmite) तयार होतो. कधीकधी हे दोन स्तंभ एकमेकास भेटून छतापासून जमिनीपर्यंत सलग स्तंभही तयार होतो (Stalacto-stalagmite). अशीच एक गुहा गुईलीन जवळच्या टेकडीत आहे. तिचे नाव आहे: वेताच्या बासरीची गुहा (Reed Flute cave). ली नदीने पोखरलेल्या या टेकडीशेजारीच असलेल्या बासरी बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या वेताच्या बेटांवरून या गुहेचे नाव पडले आहे. २४० मीटर लांबीच्या या गुहेत लवणस्तंभांचे असंख्य आकार तयार झाले आहेत. त्यांना चिनी मंडळींनी कल्पकता वापरून Crystal Palace, Dragon Pagoda, Virgin Forest, Flower and Fruit Mountain, इ. नावे दिली आहेत. शिवाय या आकारांवर रंगीबेरंगी प्रकाशझोत सोडून त्यांचे सौंदर्य अजून खुलवले आहे. या गुहेला आतापर्यंत २०० च्यावर राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांनी भेट दिल्याचे एका पाटीवर नमूद करून ठेवलेले होते.

Stalactites

.

एखाद्या शहराच्या skyline सारखी दिसणारी रचना (stalagmites)

Stalacto-stalagmite

हा लवणस्तंभ एवढा पातळ आहे की त्याच्यातून पलीकडच्या दिव्याचा उजेड आरपार जातो.

याच गुहेत असलेले एक कासव. हे ५०० वर्षे वयाचे असल्याचा त्यांचा दावा होता. खरे खोटे चिनी देवालाच माहीत !

यानंतर संध्याकाळचा कार्यक्रम होता "Two Rivers and Four Lakes Cruise". गुईलीनच्या हद्दीतून दोन (ली व ताओहुआ / Peach Blossom) नद्या वाहतात आणि शिवाय रोंग (Banyan Tree), शान (Chinese Fir), गुई (Osmanthus Tree), व मुलाँग (Wooden Dragon) हे चार तलाव आहेत. या सर्वांना कालव्यांनी जोडलेले आहे. या सर्व जलप्रणालीच्या काठांवर सुंदर बागबगीचे, स्मृतीस्तंभ इ. प्रेक्षणीय गोष्टी बनवल्या आहेत. या सर्वांवर रात्री मनमोहक रंगाची बरसात करणारे दिवे वापरून प्रकाशझोत सोडतात. शिवाय काठांवर जागोजागी रंगमंच उभारून गुईलीनच्या कलेचे आणि इतिहासाचे प्रदर्शन केले जाते. त्याचबरोबर आजूबाजूच्या इमारतींवरही रोषणाई केलेली असते. या जलप्रणालीवरचे सर्व पूल पाच एक वर्षांपूर्वी नव्याने बांधले आहेत. त्यांत ज्यांना ऐतिहासिक महत्त्व होते ते त्यांच्या पूर्वरूपात परत बांधले पण इतर पूल जगभरच्या प्रसिद्ध (लंडन ब्रिज, गोल्डन गेट ब्रिज, इ.) पुलाच्या छोट्या प्रतिकृतीच्या स्वरूपात बनवले आहेत. हे सर्व आपण चालत फेरफटका मारतही पाहू शकतो. पण खास बनवलेल्या बोटीने हे सर्व बघत फिरण्याची मजा काही औरच असते.

क्रूझकडे जाताना टिपलेले गुईलीनचे नाईटलाईफ...

क्रूझमधली काही क्षणचित्रे... (बोटीच्या हालचालीमुळे, रात्रीच्या वेळेमुळे आणि प्रकाशाच्या झगमगाटीमुळे चित्रे तितकीशी स्पष्ट आली नाहीत याबद्दल दिलगीर आहे).

 .....................

.


.

.

.

दुसर्‍या दिवशी जायचे होते जगातल्या सर्वात जास्त विचित्र आकाराच्या डोंगरांच्या भागात. आतापर्यंत बघितले त्यापेक्षा काय वेगळे आश्चर्य बघायला मिळेल याची कल्पना करणे सोडून दिले होते. कारण आतापर्यंत तरी दर वेळेस कल्पना तोकडी पडली होती! शिवाय आज बरेच पायी फिरणेही झाले होते. सरळ निद्रादेवीच्या अधीन झालो.
र्या
(क्रमशः)

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

sundar !

मस्त!

निसर्गसौंदर्य, संस्कृती, जनजीवन... अगदी ईतिहास-भूगोल सारे काही कवर होतेय या लेखमालेत!!