ढग

Submitted by Girija Pandit on 9 December, 2014 - 21:40

परवा एक माणूस ढग डोक्यावर घेऊन विकायला निघाला होता. मला बुकित बातोक MRT स्टेशन जवळ भेटला. '5 सेंटला एक कला ढग. कुठला हि घ्या' म्हणत त्याने ओझं खाली ठेवल.
छोटा ढग, मोठा ढग, काळा ढग, पंधरा ढग, बरेच ढग त्याने कच कचून बांधून ठेवले होते. त्यातूनच एक छोटासा ढग निसटू पाहत होता. वळवळून वळवळून त्याचे अंग सोलवटले होते. ढग पूर्ण काळा न्हवता... त्याची किनार काहीशी गुलाबी होती.
माझं लक्ष त्या ढगाकडे आहे असे कळताच तो गुप्पचूप बसला. ढग विकणाऱ्या माणसाच्या हि लक्षात आल. तो म्हणाला "ताई तुम्ही हा लहानुसा ढग घ्या. सकाळीच पकडलाय त्याला समुद्रावर गुलाबी होताना. आजून गुलाबी किनारीचा रंग हि उतरला नाही त्याच्या".
मी हसून पाकीट उघडले. पैसे देऊन छोटा ढग काढून घेतला. पर्स मधे ठेऊन दिला. त्याची चुळबुळ चालूच राहिली. MRT मध्ये त्याने पळून जायचा प्रयत्न हि केला पण AC असल्या मुळे तो शेजारी बसलेल्या माणसावर मुसु मुसु बरसू लागला. माणूस चिडला. 'तुम्हारा ढग काही और ले जाओ' असा चियनीज मध्ये म्हणत त्याने ढगाला झिडकारून दिले. बिचारा माझा ढग हिरमुसला. पर्सच्या आतल्या कप्यात जाऊन बसला. थोड्या वेळाने पर्स उघडली तर सांगायला लागला सिंगापोरात कोणाला पाऊस आवडतच नाही. नुसता चिक चिक करतो. कधी हि बरसतो म्हणून सगळे लोक राग राग करतात ढगांचा.
त्याच सार बोलण ऐकून घेतला तेव्हा ढग थोडा शांत झाला. आमची मग मस्त मैत्री झाली.रात्री जेवण झाल्यावर आम्ही ढगाला पुन्हा समुद्रावर सोडून आलो. सोडला तेव्हा त्याला काही कळेच ना... कावरा बावरा होऊन आमच्याच भोवती बराच वेळ गिरक्या घेत बसला. मग मीच म्हंटल.. 'जा बाबा आता... मोठ्ठा झालास कि बरस माझ्या घरावर. मला आवडतो पाऊस. पुण्यातला घरावर कधी हि कोसळणाऱ्या पावसावर मनापासून प्रेम केलय मी'.तो हसत, बागडत समुद्रावर निघून गेला.

दोन दिवस त्याची परतून यायची वाट पहिली. नाही आला तेव्हा मीच मनाला समजावलं ... हरवला असेल चुकून वाटेत. कोणीतरी भेटला असेल जुन्या ओळखीचा. बरसला हि असेल कोणाच्यातरी लाडक्या आठवणींवर.
मन सावरते तोच आईचा फोन आला. पाऊस पडतोय म्हणाली. पुण्यात. रात्री पासून एक क्षण उसंत घेतली नाही. आई इमोशनल झाली. म्हणाली डिसेंबर मधला पाऊस आवडला असता तुला.
मी हसून, डोक्याला हात लावला. पत्ता न सांगता माझं घर कसं बर सापडल असेल माझ्या ढगाला?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसाद नोंदवल्या बद्दल सगळ्यांचेच मनापासून आभार. इतका चांगला प्रतिसाद वाचून आनंद तर झालाच पण हि कल्पना,हि भावना तुम्हाला स्पर्शून गेली ह्यात एक वेगळ समाधान वाटलं. धन्यवाद Happy

Girija Pandit,

आषाढस्य मासे प्रथम दिवसेचं स्मरण झालं! Happy

हेच तुमच्या समारोपाच्या प्रश्नाचं उत्तर असावं बहुतेक!

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद.ह्या लेखाशी जोडलेली एक गम्मत: लेख पूर्ण पणे काल्पनिक होता पण काल आईला लेख वाचण्यासाठी लिंक दिली तेव्हा लेख वाचून तिने खरच पुण्यात पाऊस पडतोय अस कळवलं. कल्पनेतले ढग हि बरसतात ऐकून मज्जा वाटली Happy

अगं, मी काल पावसात भिजत घरी जाताना मनातल्या मनात या लेखाचं पारायण करत होते. एकदा मनात म्हणलंपण की खरच हिचा ढग बरसतोय की काय Proud
मग जराशी चिडले पण तुझ्यावर मग एका सेकंदात लक्षात आलं बिचारीचा लेख काल्पनिक आहे . बोलाफुलाला गाठ पडली Lol

हे खूप क्युट आहे!!! सिरीयसली एखादा चित्रकार शोधा आणि ह्याचे कॉमिकस डेव्हलप करा. Happy (आणि तस केलत तर मी कल्पना दिली म्हणून मला पहिली प्रत पाठवा Wink )

वरचे सारे मन प्रसन्न करून टाकणारे प्रतिसाद पुन्हा एकदा वाचून काढले....जाणवू लागले की ते वाचताना गिरिजा तर स्मित हास्य करीत असेलच आनंदाने, पण तिच्यापेक्षा तो गुलाबी किनारीचा ढगोबाही मनमोकळेपणाने मजेत हसत असणार !

ढगाचे सारेच वाचक चिंब भिजून गेलेले दिसतात...प्रेमाने.

अशोक मामा, +१
खरंच इतकं छान लिहिलंय! रोज वाचते मी एकदातरी आणि दर वेळी मन प्रसन्न होऊन जातं!
सीमंतिनी, मस्त चित्र!

Pages