ड्रॅगनच्या देशात ०८ - जुने लिजीआंग (पृथ्वीवरचे नंदनवन) : दायान

Submitted by इस्पीकचा एक्का on 8 December, 2014 - 02:35

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

आजचा सफरीचा सातवा दिवस. सकाळी ७.३५ चे विमान पकडून लिजीयांगकडे प्रयाण केले. शियान-लिजीयांग हे अंतर विमानाने १६१० किमी आहे आणि उडून जायला २ तास ४० मिनिटे लागतात. नेहमीप्रमाणे विमानातली खिडकीजवळची खुर्ची मागून घेतली. विमानतळावरच्या चेक-ईन काउंटरवरच्या बहुतेक मंडळींना बर्‍यापैकी इंग्लिश येते, शिवाय गाईडही बरोबर असल्याने माझा विमानाची खिडकीजवळची खुर्ची पकडण्याचा छंद मी सर्व चीनभर पुरा केला. चिनी मंडळींनीही त्याला हसतमुखाने साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार !

लिजीआंग हे चीनच्या युन्नान (Yunnan) राज्यात आहे. युन्नान चीनच्या दक्षिण-पश्चिम टोकाला आहे. वरून ब्रम्हदेशाला थोडासा वळसा घालून तिबेटमार्गे युन्नानच्या आणि आपल्या अरुणाचल प्रदेशाच्या सीमांमघ्ये फारतर १०० एक किमीचे अंतर आहे. अर्थात हा भाग अत्यंत दुर्गम आहे व हे दोन भाग जोडणारे रस्ते नाहीत. तरीही भारताच्या सीमेच्या इतके जवळ आणि तेही वाकड्या वाटेने आल्याची कल्पना मजेची वाटली. युन्नान म्हणजे हिमालय पर्वताचे ब्रम्हदेशातून निघून चीनमध्ये शिरलेले पूर्वेचे टोक. हिमालयाचे सौंदर्य या भागात ओसंडून वाहत असले तरीसुद्धा हे शेवटचे टोक असल्याने पर्वतराजींची उंची ३००० मीटरच्या वर जात नाही तसेच असंख्य डोंगरदर्‍यांमुळे एक प्रकारचे प्रेशर कुकरसारखी परिस्थिती होते व हवामान तीन चार बर्फाळ महिने सोडले तर इतर वेळी गुलाबी थंडीचेच असते. उत्तम हवामान व भरपूर पाणी यामुळे हे राज्य वनस्पतीच्या विविधतेने बहरलेले आहे. चीनमधल्या ३०,००० पेक्षा जास्त वनस्पतींपैकी १७,००० पेक्षा जास्त या एकट्या राज्यात आहेत.

खालील नकाशा आंतरजालावरून साभार घेतलेला आहे.

नजर लागेल असा निसर्ग, प्राचीन महत्त्वाची ठिकाणे आणि स्थानिक जमातींचे समृद्ध लोकजीवन यामुळे हे राज्य UNESCO World Heritage Sites नी भरलेले आहे. त्यातल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना आपण भेट देणार आहोत. चला तर करूया आपण सफर या पृथ्वीवरच्या स्वर्गाची.

===================================================================

लिजीयांगला विमान उतरतानाच दिसलेल्या या नेहमीच्या चिनी छपरांपेक्षा वेगळी छपरे असलेल्या घरांनी आणि गर्द हिरवागार परिसराने आतापर्यंत पाहिलेल्यापेक्षा काहीतरी वेगळे बघायला मिळणार याची जाणीव करून दिली.

.

साधारणपणे ३० ते ४० मिनिटाच्या चारचाकीच्या प्रवासानंतर आपण विमानतळावरून जुने लिजीयांग गावाच्या (Lijiang Old Town) सीमेवर पोहोचतो. येथून पुढे वाहनांना बंदी आहे. फक्त तुमचे पाय आणि घोड्यांचे खूर यानाच लिजीयांगच्या रस्त्यावरून चालण्यास परवानगी आहे.

हे लिजीयांगचे पहिले दर्शन

या रस्त्यावरून पाचएक मिनीटात चालत हॉटेलवर पोहोचलो.

मधूनमधून किंचित रिमझीम पावूस चालू होता, छान गुलाबी थंडी होती. म्हटले, वा ! प्रवासाचा मूड तर उत्तम जमलाय ! हॉटेलवर अकरा वाजताच पोहोचल्याने चेक-ईनची वेळ अजून झालेली नव्हती. गाईड म्हणाली उगाच इथे थांबण्यापेक्षा जेवून घ्या म्हणजे आपल्याला फिरायला जास्त वेळ मिळेल. मग तुमच्या ईटिनेररिमध्ये आहेत त्यापेक्षा अजून काही महत्चाची ठिकाणे मी तुम्हाला दाखवू शकेन. जास्त ठिकाणांचे दर्शन म्हटल्यासरशी मी मनात म्हटले की, "नेकी और पुछ पुछ ! ये तो अपुनका वीक पाईंन्ट हाय !!" सामान हॉटेलच्या सुपूर्द कले आणि बाहेर पडलो.

(आवांतरः टूरमध्ये येथून पुढे दहा दिवस स्थानिक लोकांना खास प्रशिक्षण देऊन बनविलेले गाईड होते. सर्वसाधारणपणे असे गाईड खूपच मनमिळाऊ होते व त्यांचा कल फक्त इटिनेररीलाच चिकटून राहण्यापेक्षा आपल्या गावांतील जास्तीतजास्त ठिकाणे दाखवण्याकडे होता. शिवाय तिथले स्थानिक असल्याने त्यांच्याकडून सखोल आणि विश्वासू माहिती मिळाल्याने सहलीत अजूनच जास्त मजा आली.)

लिजीयांगमध्ये नाशी (Naxi) अल्पसंख्य जमातीची वस्ती प्रामुख्याने आहे. गाईडही त्याच जमातीची होती. तर मग तिच्या खास शिफारशीने आम्ही एका नाशी उपाहारगृहात गेलो.

तिच्याच शिफारशीने एक खास स्थानिक पदार्थ मागवला. एका मोठ्या बाऊलमध्ये एकदम पातळ वाफाळणारे शेवयांचे सूप (clear noodle soup ) व त्याच्याबरोबर बीन स्प्राऊट्स, ऊलपात, एक प्रकारची उकडलेली चिनी पालेभाजी, फोडलेले अंडे, एक पोर्कची स्लाईस व एका बाऊलमध्ये जास्तीच्या शेवया. ज्याने त्याने आपापल्या चवीप्रमाणे पदार्थ एकत्र करून खायचे असते. गाईडने सर्व पदार्थ एकदम सुपात टाकले आणि म्हणाली असेच छान लागते. मग काय आम्हीही हर हर महादेव (मनातल्यामनात) म्हणून तिचे अनुकरण केले. सूप खरंच चवदार झाले होते.

पहाटे विमान पकडायचे असल्याने शियानच्या हॉटेलमधली न्याहरी चुकली होती, विमानातही थातूरमातूरच खाणे झाले होते. त्यामुळे त्या नवीन प्रकारच्या पोटभर सुपाने छान तरतरी आली आणि आम्ही नव्या जोमाने लिजीयांगची सफर करायला तयार झालो. सहलीला जाताना थोडे बहुत संशोधन करून नेहमीची मळलेली वाट सोडून जरा वेगळे काहीतरी बघायची माझी सवय बर्‍याचदा एकदम अनपेक्षित आनंद देऊन जाते. पुढचे सहा दिवस हे त्याचे उत्तम उदाहरण होईल. लिजीयांगच्या रस्त्यावरून चालतानाच हळूहळू त्याचे सौंदर्य नजरेत भरू लागले.

.

.

लिजीयांग हे गांव ८०० वर्ष जुने आहे. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली जलव्यवस्था हे लिजीयांगचे एक विशेष आहे. गावाच्या उत्तरेला एक ब्लॅक ड्रॅगन पूल नांवाचा डोंगरांतून वाहणार्‍या पाण्यापासून तयार झालेला तलाव आहे. तेथून एका ओढ्याने पाणी गावाच्या मुख्य चौकापर्यंत येते. चौकामधल्या दोन रहाटगाडग्यांच्या मदतीने हे पाणी सर्व गांवभर छोट्या ओहोळांनी फिरवले जाते. ही आहे लिजीयांगची प्राचीन काळापासून आजतागायत चालू असलेली २४ तास वाहत्या पाण्याची व्यवस्था !

ही आहेत मुख्य चौकातील दोन रहाटगाडगी.

त्यांच्याशेजारी आहे नाशी जमातीचे चिन्ह. चिन्हात मध्यभागी बेडूक असून त्याच्या सभोवती गोलाकारात नाशी लोकांच्या जीवनात महत्त्वाचे असलेले १२ प्राणी आहेत. जणू काही नाशी राशीचक्रच !

चौकातून पुढे एक दोनतीनशे वर्षे जुने पारंपरिक नाशी घर बघायला गेलो. संपूर्ण घर सागवान व शिसूचे बनवल्यासारखे दिसले. प्रत्येक लाकडी दरवाजा आणि भिंत अप्रतिम कोरीवकामाने सजलेली होती.

.

एका भिंतीवर मालकाच्या पूर्वजाचे ८०-९० वर्षे जुने फोटो दिसले.

त्या घरातून बाहेर पडून लिजीयांगचा फेरफटका परत सुरू केला. एखादे गांव सुंदर सुंदर म्हणजे किती सुंदर असू शकते हे जुन्या लिजीयांगला भेट दिल्याशिवाय कळणे कठीण आहे. हे फोटो आहेत जुन्या लिजीयांगच्या दायान या उपनगराचे.

.

.

.

.

.

फोटोत जे फुगे दिसताहेत ते आदल्या दिवशी नाशी जमातीचा व्हॅलेंटाईन डे सारखा एक सण होता त्याकरिता होते. पण इतर नैसर्गिक सौंदर्य मात्र नेहमीचेच आहे असे गाईडने सांगितले.

प्राचीन काळापासून लिजीयांग हे चहा व तंबाखूच्या व्यापाराचे एक मोठे ठिकाण आहे. पूर्वी नाशी पुरुष खेचरांवर चहा व तंबाखू लादून हिमालयातील दुर्गम मार्गाने तिबेटमध्ये ल्हासा येथे नेऊन विकत असत. या व्यापाराला जाऊन यायला सहा महिने लागत असत. त्यामुळे नाशी जमातीत स्त्रियांनी शेतकाम करणे, भरतकाम करणे आणि घर सांभाळणे तर पुरुषांनी ल्हासावारी करून व्यापार सांभाळणे अशी कामाची विभागणी सर्वमान्य झाली होती ती तो खडतर प्रवास थांबला तरी चालू आहे. बहुतेक कामे स्त्रियाच करतात व पुरूष जमलेतर व्यापार नाहीतर आळस करतात असा नाराजीचा सूर स्त्री गाइडकडून ऐकला. नाशी या शब्दाचा अर्थ सावळा असा आहे. सतत उन्हातान्हात काम करावे लागल्याने इथल्या बर्‍याच लोकांचा वर्ण काहीसा सावळा आहे आणि त्यावरूनच त्या समाजाला नाशी हे नांव पडले आहे.

ज्या चौकांतून व्यापारी आपली उलाढाल करीत असत व सामानाने लादलेली खेचरे घेऊन ल्हासाकडे रवाना होत असत तो हा चौक. सद्द्या त्याचा उपयोग फिरून फिरून थकलेल्या प्रवाशांना खिनभर बूड टेकवायला होतो.

तेथून पुढे आम्ही लिजीयांगच्या मध्यभागी असलेल्या सिंहटेकडीवर (Lion Hill) गेलो. या टेकडीवर एक छोटासा पण टुमदार आणि कलाकुसरीने समृद्ध असा सहा मजली पॅगोडा आहे.

.

.

पॅगोड्यावरून सर्व गावाचे मनोहर दर्शन होते. पूर्वेकडे विशिष्ट कौलारू घरे असलेले जुने लिजीयांग तर पश्चिमेकडे नवीन आधुनिक लिजीयांग दिसते. तसेच जर आकाश निरभ्र असेल तर 'जेड ड्रॅगन स्नो पर्वत' नांवाच्या नाशी समाजाने पवित्र मानलेल्या पर्वतचेही दर्शन होते. या पर्वताशी निगडित अनेक नाशी दंतकथा, कविता, नृत्ये आणि नाटके आहेत.

.

पॅगोडातून जुन्या काळच्या लिजीयांगच्या गव्हर्नरचे राजभवन दिसते. तेथे आत जायला परवानगी नाही पण झूम वापरून या वैशिष्ट्यपूर्ण घराची छबी कैद करून टाकली.

पॅगोड्यावरून खाली उतरताना ध्यानात आले की अरे टेकडीच्या आजूबाजूचे सौंदर्य पाहताना काय पाहू आणि काय नको असे होऊन टेकडीवरच्या पॅगोडाच्या सभोवती असलेल्या बागेकडे लक्षच गेले नव्हते !

बागेत थोडासा फेरफटका मारत असताना तेथल्या एका मोराने केकावलीसह नृत्य करून अस्मादिकांचे स्वागत केले !

नंतर हॉटेलवर परत येऊन खोली ताब्यात घेतली. गाईड तासाभराने येते, उरलेल्या वेळात अजून काही ठिकाणे बघता येतील असे म्हणाली. हॉटेल फारच छान होते. एका प्राचीन इमारतीचा जीर्णोद्धार करून संपूर्ण ओकच्या लाकडाने बनवलेली दुमजली इमारत होती पण आत मात्र उत्तम आघुनिक सुविधा होत्या... त्या प्राचीन नव्हत्या ! हा हॉटेलचा प्रवेशमार्ग.

मस्त शॉवर, कॉफी आटपून ताजातवाना झालो तेवढ्यात बरोबर एक तासाने गाईड परत आली आणि आमची पुढची भटकंती सुरू झाली. ही भेट होती ब्लॅक ड्रॅगन पूल म्हणजे अगोदर ज्याचा उल्लेख लिजीयांगच्या पाणीपुरवठ्याबद्दल लिहिताना केला होता ते सरोवर. गावाच्या पाणीपुरवठ्यासारख्या शास्त्रीय आणि रुक्ष व्यवस्थेतही आनंददायक सौंदर्य आणण्याचा चिनी माणसाचा सोस जागोजागी दिसून आला. हा तलाव हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. या सहलीची सुरुवात गावापासून तलावापर्यंतच्या अर्धा एक तासाभराच्या सुंदर रस्त्याने होते.

.

तलावाचा परिसर बागा, एक छोटा सफेद संगमरवरी पूल, छोट्या छोट्या चिनी धाटणीच्या इमारती आणि हे सौंदर्य आरामात बसून डोळ्यांनी टिपून घेता येईल अशी जागोजागी केलेली आरामदायक बसण्याची सोय यामुळे दिवसाचा सगळा शीण दूर झाला.

.

.

.

तेथे एक ड्रॅगन गॉड (Longshen) मंदिर आहे. त्यालाही धावती भेट दिली.

परतताना एका छोटेखानी नाशी संग्रहालयाला भेट दिली. त्याच्या आवारात नाशी संस्कृतीचे प्रतीक असलेले बेडूक व १२ प्राण्यांचे वर्तूळ नदीत सापडणार्‍या छोट्या लंबगोल हिरव्या आणि पांढर्‍या दगडांचा उपयोग करून बनवले होते.

शिवाय ही एकाच झाडाच्या खोडापासून बनवलेली कलाकृती बघितली. जवळून निरखून पाहिले तर या लाकडी शिल्पात कितीतरी प्राणी व पक्षी लपलेले दिसतात !

परत येईपर्यंत बर्‍याच चालण्यामुळे थोडा शीण आला होता म्हणून लिजीयांगच्या प्रसिद्ध चहाभवनामध्ये गेलो. ही इमारतही बधण्यासारखी आहे. येथून वर पायर्‍या चढून गेल्यावर पहिल्या मजल्यावर ते चहाभवन आहे.

येथे लिजीयांगचा जगप्रसिद्ध चहा पारंपरिक पद्धतीने कसा बनवतात त्याचे प्रात्यक्षिक पाहून तो बनवलेला चहाही प्यायलो.

.

चहाची झाडे साधारणपणे एक मीटरभर (थोडेसे जमा-उणे) उंचीची झुडुपे असतात हे सर्वश्रुत आहेच. पण त्याबरोबर लिजीयांगमध्ये एक खास प्रकारचा प्युएर टी (Puer Tea) बनतो. याची झाडे बरीच उंच म्हणजे साधारपणे नीलगिरीच्या मध्यम आकाराच्या झाडाएवढी उंच वाढतात. एक खास प्रकारची प्रक्रिया करून व दाब देऊन चहाच्या पानाचे वेगवेगळ्या प्रकारचे गठ्ठे बनवतात. या प्रकारे हा चहा अगदी पंधरावीस वर्षेही टिकतो असा स्वागतिकेचा दावा होता. एक छोटा तुकडा तोडून त्याला गरम पाण्यात एक मिनिटभर ठेवून चहा तयार होतो. त्याच चहाच्या तुकड्याचा वीस ते तीस वेळा असाच उपयोग केला तरी चहाची चव तीच राहते असाही तिने दावा केला. आम्ही तीन वेळेपर्यंतच अनुभव घेतला आणि कॉफीचे शौकीन असल्याने व संध्याकाळचे जेवण आटोपून रात्रीचा शोही बघायचा असल्याने तेथून पुढे निघालो.

आता आम्ही मोर्चा वळवला एका खास पारंपरिक नाशी रेस्तरॉकडे.

हे त्याचे प्रवेशद्वार.

 नेहमीसारखेच मोठ्या चित्रांचे चिनी मेन्युकार्ड पुढे आले.

पण गाईड बरोबर असल्याने आज चिंता नव्हती ! काय खायचे हे ठरल्यानंतर फिश टँकजवळ जाऊन हा मासा निवडला.

स्वयंपाक्याने त्याचे अनेक प्रकार बनवले... मधल्या मांसल भागाची सुशीसारखी नाशी डीश, फ्राईड फिश स्कीन हा एक नवीनच पदार्थ, डोके व शेपटाच्या भागापासून चवदार सूप, आणि हो, माशाचे सारण भरलेल्या डंपलींग सारख्या पण तळलेल्या करंज्या. मस्त बेत होता.

खास नाशी पद्धतीचे खाणे झाल्याने आणि विशेष म्हणजे ते चवदार असल्याने मजा आली. येथून पुढे नाशी लोकांच्या पारंपरिक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम बघायला निघालो. या ऑर्केस्ट्राने जगभर खूप ठिकाणी प्रयोग केले आहेत... अगदी न्युयॉर्कमध्ये युनोमध्येही. परतू नवीन नाशी पिढीला या संगीतात आता फार रस राहिला नाही, त्यामुळे या वादक-गायक संघाचे अ‍ॅव्हरेज वय साठीच्या आसपास आहे ! खूप जणांचे वय अगदी ८० पेक्षा जास्त आहे. पण ते अजूनही जोमाने हा कार्यक्रम रोज सादर करतात हे विशेष.

ही आहे त्या कार्यक्रमाच्या रंगमंचाची खास नाशी पद्धतीने केलेली सजावट.

.

 आणि हा संपूर्ण कलावंत संच कार्यक्रम सादर करत असतानाचा फोटो.

संपूर्ण कलावंतांचा संच त्यांच्या रंगीबेरंगी पोशाखासह बधायला छान वाटते. एकंदरीत सर्व चिनी संगीत हे वरच्या पट्टीत व चिरक्या आवाजात गायले जाते त्यामुळे एक अनुभव म्हणून ठीक आहे पण परत परत ऐकायला आवडेल असे वाटत नाही. त्याविरुद्ध त्यांचे नृत्याचे बहुतेक सगळेच कार्यक्रम रंगीबेरंगी कलात्मक आकर्षक पोशाख, उत्तम नाचपद्धती आणि सुंदर निर्देशन यामुळे खुपच बहारदार वाटले... पुन्हा प्रसंग आल्यास जरूर बघावे असे.

थोडी आवांतर माहिती: खालच्या चित्रात एका वादिकेने दुपट्ट्यासारखे वस्त्र पुढे गाठ मारून मागे नेले आहे. ही नाशी लोकप्रथा आहे हे सांगण्याची की ही स्त्री विवाहित आहे. अविवाहित स्त्रिया तेच वस्त्र तसेच पण गाठ न मारता वापरतात. अर्थात सद्द्याची विशीपंचविशीची पिढी सर्रास शर्ट-पँट-जीन असे पाश्चात्त्य पोशाखच वापरू लागली आहे.

 (क्रमशः)

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users