==============================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
==============================================================================
आज शियांनमध्ये फिरण्याचा दुसरा दिवस. चीनमध्ये जाण्याची ओढ ज्यांच्यामुळे वाटत होती त्यातील एक फार महत्त्वाची गोष्ट आज पाहायला जायचे होते.
चीन राजघराण्याचा आणि एकत्रित चीनचा पहिला सम्राट चीन शी हुआंग (Qin Shi Huang) याच्या कर्तृत्वाची आपण मागच्या भागात थोडी चर्चा केली आहेच. याच सम्राटाने मेल्यानंतरही आपल्या दिमतीला सैन्य असावे म्हणून आपल्या थडग्यात पुरण्यासाठी भाजलेल्या मातीचे हजारो सैनिकांचे पुतळे बनवले. ते नंतर त्याच्याबरोबर, इ पूर्व २१० / २०९ साली, थडग्यात पुरले गेले. १९७४ साली शियान पासून ३५ किमी वर विहीर खोदताना काही शेतकऱ्यांना काही पुतळे सापडले व नंतर सरकारने ही जमीन ताब्यात घेऊन उत्खननाचे कामे सुरू केले आणि त्यांच्या हाती एक पुतळ्यांचे भांडारच लागले !
विशेष म्हणजे हे पुतळे साच्यांच्या साहाय्याने न बनवता प्रत्येक पुतळा हा खरोखरच सम्राटाच्या सैन्यात काम करीत असलेल्या वेगवेगळ्या सैनिकाला पुढे ठेवून बनवलेला आहे. त्यामुळे कोणतेही दोन पुतळे एकसारखे नाहीत. अजूनही त्या ठिकाणी उत्खनन चालू आहे. पुतळे मातीचे असल्याने काम फारच कौशल्याने आणि संथगतीने करावे लागते. आतापर्यंत मिळालेले आणि विशिष्ट तंत्रांनी बांधलेल्या अंदाजावरून येथे एकूण ८००० सैनिक, ५२० घोड्यांसकट १३० रथ आणि १५० घोडदळाचे घोडे आहेत. या प्रकाराचा येवढा अजस्त्र उपक्रम आजवर जगात परत झाला नाही. चीनमधल्या प्राचीन अवशेषामध्ये या आकर्षणाचा पहिला क्रमांक मानला जातो. प्रत्यक्ष दर्शन केल्यावर खूप जणांची प्रतिक्रिया अशीच होती की: " या एका स्थळाच्या भेटीने चीनची सहल यशस्वी झाली." तरी बरे आजपर्यंत फक्त निम्मे ते २/३ पुतळेच खोदून काढले आहेत. शिवाय सम्राटाच्या मूळ थडग्याला तर हातही लावलेला नाही. कारण तेथे राजप्रासाद, बागबगीचे यांच्याबरोबर पार्याने भरलेल्या नद्या व तलाव आहेत. पार्यामुळे होणारा पर्यावरणाचा र्हास न करता हे थडगे कसे खोदायचे हे अजूनही शात्रज्ञांना उमगले नाही. चला तर मातीच्या सैनिकाचे सैन्य बघायला.
येथे जाण्यापूर्वी आपल्याला हे सैनिक कसे बनवले असतील याची कल्पना येण्यासाठी एका मातीचे पुतळे बनवण्याच्या कारखान्यात नेतात. तेथे पुतळा बनवणे, त्याला भट्टीत भाजणे आणि मग रंगवणे या साऱ्या प्रक्रिया बघायला मिळतात.
नंतर अर्थात "अर्थकारण" सुरू होऊन कारखान्याच्या शोरूमची एका चक्कर होते. खरेदी करावयाची नसली तरी बरीच कलाकुसरीची कामे बघायला मिळतात.
तेथून पुढे मातीच्या सैन्याकडे निघालो. हे आहे उत्खनन क्षेत्राचे आवार.
हा आहे संपूर्ण उत्खनन क्षेत्राचे मॉडेल. यात जी बसक्या पिरॅमिडसारखी टेकडी आहे तेथे सम्राटाचे अजून न खोदलेले थडगे आहे. त्याच्यासमोर जे दोन आयत आहेत त्या ठिकाणांना सध्ध्या बरेच उत्खनन झाले आहे. इतर सर्व पांढरे ठिपके नंतरच्या सम्राटांची छोट्या थडग्यांच्या जागा दर्शवितात.
ह्या उत्खनन क्षेत्राचे एका वेगळेपण असे की जेथे या मूर्ती सापडल्या त्या सगळ्या क्षेत्राभोवती भिंत बांधून वर छप्पर टाकले आहे. अशा रीतीने सर्वच उत्खननक्षेत्र एका भल्यामोठ्या इमारतीनेच सुरक्षित केले आहे. उत्खनन केलेल्या प्रत्येक तुकड्याची शास्त्रीय पद्धतीने नोंदणी करून त्याच इमारतीतील एका मोकळ्या जागेवर त्याची साफसूफ करून मूर्तीची जुळणी करतात. आणि पूर्णं मूर्ती बनली की तिला तीच्या मूळच्याच जागेवर परत प्रस्थापित करतात. आपण हे सर्व इमारतीच्या भिंतींना लागून बांधलेल्या कट्ट्यावरून चारी बाजूंनी फिरून पाहू शकतो. या कल्पक आयोजनामुळे थडग्याची रचना व त्यांतील सैनिकांच्या मूर्तींची मांडणी अगदी मूळ जागेवर व मूळ स्वरूपात दिसते.
या जागेवर जमा केलेले तुकडे जोडून मूर्ती बनवल्या जातात.
आणि हे घोडे
प्रत्येक मूर्तीचा चेहरा, उंची व पेहराव (युनिफॉर्म) हे प्रत्यक्ष सैनिकांबरहुकूम बनवले असल्याने स्पष्टपणे वेगवेगळे दिसतात.
सहलीचा पुढचा टप्पा एका छोट्या शॉपिंग एरिया व उपाहारगृहातून आहे. त्याच्या प्रवेशद्वाराजवळ एका दुकानात ज्या चार जणांच्या शेतांत हे भांडार सापडले त्यापैकी एक शेतकरी बसला होता. वर भिंतीवर त्याचे चित्र आहे आणि खाली तो स्वतः: बसला आहे. त्याच्या दुकानातून १०० युवानचे माहितीपुस्तक विकत घेतले की त्यावर सही करून देत होता. याला चिनी कम्युनिस्ट कॅपिटॅलीझमचे उत्त्तम उदाहरण म्हणता येईल !
पहिल्या मोठ्या उत्खनन क्षेत्राजवळ अजून एक लहान उत्खनन क्षेत्र आहे. त्यामध्ये सैन्याची मुख्य छावणी (Head Quarter) आहे हे त्यातील मांडणीवरून व मूर्तींच्या अधिकाररपद दाखवणाऱ्या पोशाखावरून ओळखता येते.
शेजारीच एक प्रदर्शन आहे. त्यात पूर्णावस्थेत सापडलेल्या व काही विशेष महत्त्व असलेल्या मूर्ती ठेवल्या आहेत.
बसलेला धनुर्धर
बाण मारण्याच्या तयारीत असलेला धनुर्धर
अधिकारी
सेनापती
मूर्ती इतक्या बारकाईने बनवल्या आहेत की प्रत्येकाची केशरचनाही स्पष्ट दिसते.
उत्तम अवस्थेत सापडलेला संपूर्ण रथ
संग्रहालयातून बाहेर पडलो तर चीनच्या अख्ख्या सफरीत ही एकच म्हातारी बाई भीक मागताना दिसली.
आजच्या दिवसात बानपो या नावाच्या एका जागेलाही भेट दिली. येथेही उत्खननात सापडलेले ६००० वर्षांपूर्वीचे खेडे आहे. तेही त्याच्या सभोवती एका मोठी इमारत बांधून सुरक्षित ठेवले आहे. ही पुरातन वस्तू जतन करण्याची पद्धत वेगळी आणि खरोखरच innovative आहे.
हे त्या ६००० वर्षांपूर्वीच खेड्याचे काही अवशेष
आणि ते खेडे त्या काळी कसे दिसत असावे याचा संशोधाकांचा अंदाज.
परत येईपर्यंत बराच वेळ झाला. रात्रीचा शो बघायला उशिरा नको म्हणून त्वरित हॉटेलाच्या रेस्तरॉ मध्ये गेलो. वेटरने एक भले मोठे मेन्यु कार्ड आणून दिले... संपूर्ण चिनी भाषेतले. नशिबाने दर पानावर पदार्थांचे मोठे मोठे फोटो होते. पण एकाही पदार्थांची ओळख पटेना. त्या दिवशी गुरुवार होता. म्हणजे मांसाहार वर्ज्य. इंग्लिश समजणारी एकही व्यक्ती रेस्तरॉमध्ये नव्हती. वेटरमण्डळींशी खाणाखुणांची बरीच झुंज झाली. पण काही फायदा झाला नाही. शेवटी केवळ चित्रे बघून एक कोबीचा पदार्थ, एक वांग्याचा पदार्थ आणि भात सांगितला. भाताचे ठीक होते पण कोबी फक्त व्हिनेगार आणि लाल मिरच्यांमध्ये मुरवलेली होती. वांग्यांची भाजी म्हणजे बोट बोट लांब लाल मिरच्यांच्या भाजीत नमुन्यादाखल काही वांग्याच्या फोडी होत्या. दोन घास घेतले तेव्हाच ध्यानात आले की काही खरे नाही. भूकतर सॉलिड लागली होती आणि शोची वेळ जवळ येत होती. परत दुसरे काही मागविण्यासाठी वेळ नव्हता. जबरदस्तीने जेमतेम निम्मे पदार्थ खाऊन बाहेर पडलो.
चीनबाहेर म्हणजे भारतात किंवा अगदी पाश्चिमात्य देशांतही जे पदार्थ चिनी खासियत म्हणून प्रचंड प्रमाणात खपवले जातात त्यातला एकही पदार्थ चीनमध्ये पाहायला मिळाला नाही !
रात्री "The Great Chang'an " हा शो बघितला पण थिएटरामध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई असल्याने या मनोहर कार्यक्रमाचे फोटो नाहीत ह्याचा खेद आहे. पण चिंता नको. चीनमध्ये जागोजागी एकाहून एक सरस कार्यक्रम आहेत. पुढे त्यांचे फोटो येतीलच.
(क्रमशः)
==============================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
==============================================================================
मस्त, या जागेबद्दल बरेच वाचले
मस्त, या जागेबद्दल बरेच वाचले होते. छान फोटो
चीनच्या बाहेर मिळणारे चायनीज पदार्थ, चीनमधे मिळत नाहीत !
मस्त वर्णन !!!!
मस्त वर्णन !!!!
अप्रतीम फोटो आणी माहिती!
अप्रतीम फोटो आणी माहिती!
धन्यवाद ! >>> चीनच्या बाहेर
धन्यवाद !
>>> चीनच्या बाहेर मिळणारे चायनीज पदार्थ, चीनमधे मिळत नाहीत ! <<<
चीनच्या बाहेर चिनी म्हणून मिळणार्या पदार्थांपैकी एकही संपूर्ण चीनमध्ये मिळाला नाही ! तसेच चिनी जेवण फारसे तिखट नसते ही समजूत शियानमधल्या जेवणाने पूरेपूर खोटी ठरवली... तिथले जेवण अस्सल कोल्हापूरी जेवणास तोडीस तोड तिखट होते !
त्यामुळे जगभर मिळणारे चिनी कुसीन हा अमेरिकन गुर्मे लोकांनी निर्माण केलेला एक भ्रम आहे हा समज पक्का झाला.
मस्त सुरु आहे
मस्त सुरु आहे लेखमाला...
कामाच्या रेट्यामुळे तुमच्या ह्या प्रवासवर्णनातल्या प्रत्येक भागावर प्रतिसाद देणे जमत नाही.
असो,
आता मुळात जिथे वाचायलाच वेळ कमी पडतो तिथे, प्रवासाला कुठे वेळ मिळणार? पण तुमच्या ह्या प्रवासवर्णनामुळे दुधाची तहान ताकावर ,,,सॉरी, दुधाची तहान मस्त केशरी बासूंदीवर भागल्या जात आहे.
पुभाप्र.
मस्त सुरु आहे लेखमाला... अशिच
मस्त सुरु आहे लेखमाला...
अशिच सुरु राहु दे.
वा! खूप छान लिहिताय. या
वा! खूप छान लिहिताय. या टेराकोटा वॉरियर्स बद्दल बरंच वाचलं होतं. ते वाचताना नेहेमीच भूतकाळाबद्दलची एक हुरहुर लागून रहाते. धनुर्धराची मूर्ती छाने.
सर्व प्रतिसादकांसाठी आणि
सर्व प्रतिसादकांसाठी आणि वाचकांसाठी धन्यवाद !
वर्णन छान, पण मला अर्थातच
वर्णन छान, पण मला अर्थातच एकही फोटो बघता येत नाही.
आपल्या पुराणात विक्रमादित्य (की दुसरे कोणी?) याच्या एका कथेत, गरीबाघरी वाढत असलेला तो, मातीचे सैन्य तयार करून त्यात प्राण भरुन लढाईला उभे करतो अशी कोणतीशी कथा आहे... शोधावि लागेल, लहानपणी आईकडून ऐकली होती.
हाही भाग
हाही भाग मस्त!!!!!!!!!!!!
तुमच्या बरोबर आमचीसुध्दा छान सफर चालु आहे.