==============================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
==============================================================================
Forbidden City बघण्यात सकाळचे जवळजवळ ३ तास गेले. तरीसुद्धा जरा अजून वेळ असता तर सगळ्या इमारती, त्यांच्यावरची कलाकुसर नीट बघता आली असती असे वाटत राहिले.
हे सम्राटाच्या प्रासादाबाहेरचे धूपदान... सम्राटाच्या मोठेपणाला साजेशे !
त्याचा आकार पाहून "पूर्वी इथे फार डास होते का ?" असे विचारल्यावर मार्गदर्शिका शांतपणे म्हणाली, "त्याबद्दल काही माहिती नाही" आणि आमचा बार फुसका निघाला. अर्थात हे संभाषण इंग्रजीतून चालले होते आणि सोप्या इंग्रजीतूनच व सरळ भाषेतच बोलावे ह्याचा प्रत्यय आला व परत परत येत राहिला. याला आश्चर्यकारक अपवाद म्हणजे युन्नान(लिजीयांग, शांग्रीला) सारखा दूरदराज डोंगराळ भाग आणि यांगत्से क्रूझमधील स्थानिक ट्रायबल [आपल्याकडे यांना अनुसूचित जाती-जमाती म्हणतात आणि चीनमध्ये अल्पसंख्याक(minorities) म्हणतात]. जास्त माहिती तेथे पोचल्यावर येईलच.
खालचा फोटो आहे संरक्षक सिंहांचा. हे चीनमध्ये जागोजागी खाजगी व व्यावसायिक इमारतींसमोर दिसतात. हे नेहमी जोडीनेच असतात. नराच्या पंज्याखाली पृथ्वीचा गोल असतो... याचा अर्थ मालकपुरुष जगभरातून संपत्ती गोळा करून आणेल. मादीच्या पंज्याखाली छावा असतो... याचा अर्थ मालकाची स्त्री ती सर्व संपत्ती सांभाळून ठेवील व घरातल्या मुलाबाळांचा नीट सांभाळ करेल. सर्वसाधारण चिनी हा असले संकेत, भूतखेत इत्यादीवर शेकडो वर्षांपासून प्रचंड विश्वास ठेवून आहे. ६०-६५ वर्षांचा कम्युनिझम आणि माओचीसमाजीक क्रांती याबाबतीत फार फरक करू शकलेली नाही. अगदी सरकारी-व्यापारी इमारतींपुढेसुद्धा हे सिंह असतात!
हे आहेत Forbidden City मधले सम्राटाचे सिंह.
अरे हो. खरी गंमत राहिलीच. सिंह हा प्राणी चीनमध्ये सापडत नाही आणि आमच्या मार्गदर्शिकेच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वी कघीही नव्हता. हा भारतीय संस्कृतीचा प्रभाव म्हणून फक्त चिन्हाच्या स्वरूपात चीनमध्ये आला आणि राजघराण्यांमध्ये मानाचे स्थान पटकावून बसला... इतका की ड्रॅगनचे तोंड खूपदा सापाऐवजी सिंहासारखेच होते... विशेषतः राजघराण्याशीसंबंधित असेल तेव्हा.
Forbidden City मधून बाहेर पडून चिनी फूट मसाज करवून घेऊन स्वर्गमंदिर (Temple of Heaven) बघायला गेलो. हे १४२० साली मिंग राजघराण्याने बांधले. याचा मिंग व नंतर चींगराजघराणी अगदी १९व्या शतकाच्या सुरुवातीस राज्यक्रांती होऊन साम्राज्य लयाला जाईपर्यंत शांतता व उत्तम पीकपाणी व्हावे म्हणून पूजापाठासाठी नियमित उपयोग करीत असत.
.
.
.
खऱ्या प्राण्यांचे बळी देण्याची प्रथा तर होतीच पण त्याबरोबर प्राण्यांचे पुतळे बनवून ते अर्पण करण्याची प्रथाही होती.
इमारतीच्या बाहेर व आतील नक्षीदार कलाकुसर बघण्यासारखी आहे.
येथून पुढे पोटपूजा करून रेशीम बनवण्याचा कारखाना (Silk Factory) बघायला निघालो. Silk factory ही तुम्हाला आवर्जून (जबरदस्तीने) दर शहरात बघावीच लागते. यात रेशीम हे चीनचे पूर्वपरंपरांगत अभिमानपूर्ण निर्यातचिन्ह आहे हे जेव्हढे खरे आहे तेव्हडाच मार्गदर्शकाचे कमिशन हाही महत्त्वाचा मुद्दा आहेच. शिवाय सर्व रेशीम ऊद्योग कम्युनिस्ट सरकारच्या ताब्यात आहे, तेव्हा त्यांना वगळून पुढे जाणे मार्गदर्शकाला तसे अशक्यच आहे म्हणा ! रेशीम कसे बनवले जाते याची माहिती मात्र छान मिळाली. फक्त ती ५-६ वेळा न मिळता फक्त एकदाच मिळाली असती तर बरे झाले असते !
रेशमाच्या कोशामध्ये प्रत्येक कीटक एकच सलग धागा बनवतो. दोन कीटक असलेल्या मोठ्या कोशामध्ये दोन धागे एकमेकात गुंफलेले असतात त्यामुळे त्यांचा उपयोग ते रेशीम ओढून-ताणून फक्त रजई बनविण्यासाठीच होतो. या कामासाठीही खास कसबी कामगार लागतात. एकच कीटक असलेल्या छोट्या कोशांचा उपयोग धागा बनवून तलम वस्त्रे बनवण्यास होतो. मूळ धागा इतका तलम (thin) असतो की खालील यंत्र वापरून ८ कोशांतील ८ धाग्यांना गुंफून एक धागा बनवतात व नंतरच अश्यातऱ्हेने बनलेला जाड (!!!) धागा वस्त्रे बनविण्यासाठी वापरात येतो.
आणि ही आहेत काही रेशमाची उत्पादने:
.
.
पुढचा प्रवास ग्रीष्ममहालाच्या (Summer Palace) दिशेने सुरू झाला. हा महाल शहरापासून साधारण ३० मिनिटे दूर एका तलावात आहे. एकूण आवार साधारण २.९ चौ. किमी आहे. त्यातील ३/४ भाग मानवनिर्मित "कुनमींग" नावाच्या तलावाने व्यापलेला आहे आणि १/४ भागावर राजमहाल व मंदिर आहे. तलाव खणताना निघालेल्या मातीचाच उपयोगLongevity Hill बनवण्यास केला गेला आणि त्यावर ते मंदिर बांधले. हा महाल एका सम्राटाने त्याच्या आईसाठी बांधला होता. ती जहाल स्वभावामुळे Dragon Lady म्हणून प्रसिद्ध होती. मंदिराकडे जाण्यासाठी पूल आहे पण साधारपणे ३०-४५ मिनिटे चालावे लागते. त्यामुळे आमच्या ग्रुपने बोटीने जाणे पसंत केले. खास सजवलेल्या टूरिस्ट बोटीने १० मिनीटांत जाता येते. शिवाय बोटींगची मजा घेता येते ती वेगळीच!
.
ग्रीष्ममहाल (Summer Palace)
.
देवळाच्या आवारांत एक ७५० मीटर लांबीचा Covered Walking Track बनवलेला आहे... ड्रॅगनलेडी त्यावरून पालखीत बसून रोज संध्याकाळी फेर्या मारीत असे !!! हा मार्ग मात्र त्याच्यावरच्या रंगरंगोटीमुळे बघण्यासारखा आहे. शिवाय त्याच्यावरून तुम्ही "स्वतःच्या पायाने" फेर्या मारू शकता !
हाच तो मार्ग...
.
हा एक सद्य चिनी कलाकुसरीचा नमुना
आणि हा चिनी विनोदबुद्धीचा नमुना (कॉमरेड ओबामा) !
या तलावात बहुदा जगातील एकमेव संगमरवरी बोट आहे. अर्थातच ही बोट तलावात कधीच तरंगू शकली नाही. ड्रॅगनलेडी मात्र रोज संध्याकाळी त्या बोटीमध्ये बसून चहा पीतपीत तळ्याची मजा बघत बसत असे.
हा होता आमचा टुरच्या या भागातील बहुराष्ट्रीय ग्रुप: अमेरिकन, कॅनेडियन, इंडोनेशिअन, कोरियन, जर्मन, इटालियन आणि भारतीय (मी).
संध्याकाळी हॉटेलवर परतल्यावर शॉवर घेऊन त्वरित निघालो. ७:३० चा Red Theater वर The Legend of King Fu हा शो बघायला.
बायजींगमध्ये अजिबात न चुकवाव्या अशा गोष्टींच्या यादीमध्ये या शोचा बराच वरचा नंबर लागेल. कुंगफूच्या वेगवेगळ्या करामती एका कथानकाच्या आधाराने मोठ्या नाट्यमय प्रकारे प्रदर्शित करतात. भलामोठा रंगमंच आणि जागतिक कीर्तीचे कुंगफूचे उस्ताद... ९० मिनिटे कधी संपली ते कळले नाही. या शोमघ्ये फोटो काढण्यास सक्त मनाई आहे पण संपुर्ण शोची सीडी विकत मिळते. मात्र शो संपल्यावर कलाकारांबरोबर फोटो काढून घेता येतो...
(क्रमशः)
==============================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
==============================================================================
हा भाग ही छान आहे. किती
हा भाग ही छान आहे. किती दिवसांचा टूर होता बीजिंग चा?? तिथे हूथोंग या जुन्या स्लम एरिया ला विजिट केली कि नाही??
छान! फोटो च्या माध्यमातुन
छान! फोटो च्या माध्यमातुन ड्रॅगनच्या देशाची सैर होत आहे. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत...
आवडला हा पण भाग...
आवडला हा पण भाग...
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद !
<<<किती दिवसांचा टूर होता बीजिंग चा??>>>
एकूण २४ दिवसांची सहल होती, त्यातले पहिले ३ दिवस बायजींगमध्ये होतो.
<<<तिथे हूथोंग या जुन्या स्लम एरिया ला विजिट केली कि नाही??>>>
नाही. स्लम्सच्या ऐवजी चीनच्या अंतर्गत भागांमधली दोन खेडी पाहिली. त्याचे सचित्र वर्णन पुढे येईलच.
व्वा सूंदर फोटो.
व्वा सूंदर फोटो.
सुंदर फोटो आणि
सुंदर फोटो आणि माहितीही!!!!!!!!!
मस्त फोटो.. चायना सिल्क तर
मस्त फोटो.. चायना सिल्क तर खासच. अगदी पूर्वापार प्रसिद्ध आहे ते आपल्याकडे.