सुख म्हणजे दुसरे काय असते ?

Submitted by विशाल कुलकर्णी on 27 November, 2014 - 04:48

माझं समुद्राचं वेड, त्याच्याशी असलेलं नातं तसं खुप जुनं आहे. अगदी सातवी आठवीत असल्यापासुनचं. अगदी सुरुवाती-सुरुवातीला, सकाळच्या वेळी समुद्राच्या कुशीतून हळुवारपणे वर येणार्‍या किंवा त्याच्या मिठीत सामावून जाणार्‍या, मालवणार्‍या दिनकराचे दर्शन हा खरेतर मुळ हेतु असायचा. आणि मग एकदा का सुर्योदय अथवा सुर्यास्त होवून गेला की तेव्हा कुठे त्या समुद्राकडे लक्ष जायचे....

जसं तारुण्याचे वेध लागले तसे सुर्यनारायणाची ओढ कमी व्हायला लागली. एखाद्या विरही प्रियकराच्या ओढीने किनार्‍याकडे धाव घेणारा सागर, एखाद्या दंतहिन बाळाच्या निरागस हास्याप्रमाणे भासणार्‍या त्याच्या फेसाळत्या लाटांचं आवेशात किनार्‍याकडे झेपावून मग हळुच माघार घेणं , आता जास्त आवडायला लागलं होतं. पण तरीही जेव्हा जेव्हा समुद्र आवडला तेव्हा तेव्हा तो का कोण जाणे? पण एकतर सकाळचा असायचा अथवा संध्याकाळचाच...
कारण त्या सहस्त्ररश्मीच्या अनेकविध रंगाचे पदर लेवून तो यायचा तो केवळ सकाळी अथवा संध्याकाळीच. कदाचीत लहानपणापासून 'उन्हं चढायच्या आत परत या रे' किंवा 'उन्ह केवढं आहे, जरा उतरु दे, मग जा म्हणे समुद्रावर' या आणि अशा सुचना ऐकतच मोठे झालेलो असल्यामुळे सागर भेटायचा तो सकाळचा किंवा संध्याकाळचाच.

मग नोकरीधंद्याच्या निमित्ताने भारताबाहेर फिरणे व्हायला लागले. कधी मॉरिशस, तर कधी बाली, कधी हॉलंड तर कधी ऑस्ट्रेलिया... पण या अशा ठिकाणी भर दुपारच्या उन्हात सुर्यप्रकाश अंगावर घेत किनार्‍यावर पडून राहणारे समुद्रवेडे भेटायला लागले आणि असं लक्षात आलं की...

अरेच्च्या दुपारचा समुद्र सुद्धा तितकाच मनोहारी असतो...

प्रचि १

प्रचि २

पर्थचा स्क्रारब्रोचा समुद्रकिनारा नेहमी नवनव्या रंगकळा दाखवतो मला. गेल्या वर्षी त्याने निळाईचा अनुभव दिला होता. यावेळी निळ्याबरोबरच चंदेरी वर्खाची जादु अनुभवायला मिळाली ....

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

नुकतीच, म्हणजे अगदी गेल्या दोन आठवड्यापूर्वीच पर्थची एक चक्कर झाली. तिथे नोव्हेंबर म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात . सकाळी साडे चार, पाच वाजल्यापासून लक्ख उजेड पडायला सुरूवात होते . एके दिवशी उठून सकाळी सहा-सव्वा सहा वाजता समुद्रकिनारा गाठला.

खालील फोटोतील समुद्राकडे जाणारी पायवाट मला खुप आवडते. ही पायवाट दोन टप्प्यात विभागलेली आहे. तिचा पहिला टप्पा एका टेकाडावर वरच्या दिशेने चढत जावून संपतो आणि तिथून पुढे जणुकाही प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करत समुद्राच्या दिशेने उताराला लागतो....

प्रचि ६

वर जावून प्रकाशाच्या दारात जिथे पायवाट संपते, तिथून सुरू होतो पायवाटेचा दुसरा टप्पा, निळ्या समुद्राच्या दिशेने...
प्रचि ७

प्रचि ८

पायातले शूज लेसने एकमेकाशी जखडून कंबरेच्या पाऊचला अडकवतो आणि मग अनवाणी पायाने त्या पांढर्‍या शुभ्र रेतीत, घोट्यापर्यंत पाय रुतवीत मी किनार्‍यावर येवून पोचतो. पायवाटेवरून खाली किनार्‍यावर उतरले की माझा नेहमीच गोंधळ उडतो. आता कुठल्या दिशेला जायचे कारण कुठेही जा, आपण त्या बाजुला का गेलो नाही असे राहून राहून वाटायला लागते. मग अर्ध्यातच मागे वळून त्या दिशेला लागायचे. परत लगेचच मागच्या बाजुचा , दिशेचा किनारा खुणवायला लागतो Wink

प्रचि ९

कधी-कधी त्या सागरापेक्षा त्याच्या किनार्‍यावर दुरवर पसरलेल्या त्या पांढर्‍या रेतीतून पाय रुतवत चालणे जास्त मजा देवून जाते...

प्रचि १०

दिवस डोक्यावर यायला लागला (इथल्या उन्हाळ्यात ती उष्णता सकाळी आठ, साडे-आठ वाजल्यापासूनच जाणवायला सुरूवात होते) की मग ब्रेक फास्टसाठी म्हणुन मी हॉटेलकडे परत फिरतो. परतता परतता सहजच किनार्‍याकडे लक्ष जाते आणि कित्येकदा असे साठी-सत्तरीचे कितीतरी तरूण सागरावर स्वारी करायच्या तयारीत सज्ज दिसतात..

प्रचि ११

ब्रेकफास्ट करुन ऑफिसला रवाना व्हायचे आणि संध्याकाळी साडे चार, पाच वाजता परत आले की फ्रेश होवून परत किनार्‍याच्या दुसर्‍या बाजू धुंढाळायला निघायचे हा माझा तिथला बहुतांश दिनक्रम असतो. अशाच एका संध्याकाळच्या भटकंतीत सापडलेला हा जादुई समुद्रकिनारा...

प्रचि १२

प्रचि १३

इथे किनार्‍यावरच एक सुरेखसे हॉटेल कम फिशपब आहे. तिथे साल्मन नाहीतर बारामुंडी ऑर्डर करायचा आणि व्हाईट वाईनचे घुटके घेत मस्त आकाशाचे बदलते रंग अनुभवत बसायचे हा माझा आवडता छंद आहे....

प्रचि १४

प्रचि १५

कंटाळा येइपर्यंत बसायचे. सोबत मोबाईलमध्ये आणि मनामध्येही ठाण मांडून बसलेला तलत असतोच...

सुख म्हणजे दुसरे काय असते ?

विशाल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व फोटो स्कारब्रोचेच आहेत पेरू ...
फक्त फोटो स्कारब्रोच्या क्लब हाऊस पासून लांब असलेल्या भागात काढलेले आहेत.

सुनिलदादा Happy
धन्यवाद !

आहाहा... डोळे नि(ळा)वाले अगदी Happy
असा स्वच्छ अनत समुग्र, सोबत स्वच्छ वाळुचा किनारा, सोबत तलत..... सगळेच कातिल रे....
खूप सुंदर फोटो. समुद्र, वाळू, ढग, सूर्य, आणि तुझी नजर सगळ्यालाच धन्यवाद ___/\___

मस्त रे विशाल!
इथला समुद्र अक्षरश: वेड लावतो.
(एकदा मला कोकणातला अनवट समुद्रही अनुभवायचा आहे.)

वा अप्रतिम, विशाल. (फोटो आणि लिखाण दोन्ही)

मलापण समुद्र खूप आवडतो तुझ्या नावाप्रमाणेच विशाल आणि अथांग, अफाट समुद्र. त्या समुद्राची गाज प्रचंड आवडते त्या पुळणीतून चालत खोल समुद्रात जायलापण आवडतं. (बाकीचे ओरडतात, जाऊ देत नाहीत).

माझ्या सासरच्या गावातला, फणसे (देवगड तालुका), समुद्र मला खूपच आवडतो. पांढऱ्या पुळणीचा(वाळू) आणि फक्त गावाच्या लोकांची सत्ता त्यामुळे कधी कधी तुरळक माणसे किंवा कोणीच नसतं. तुझ्या लेखामुळे मनाने पोचले मी तिथे. धन्यवाद.

सगळेच फोटो मस्त...

समुद्र किनार म्हटला की खर्च स्वर्ग सूख.अगदी कुणीहा बरोबर नको.फक्त आपण आणि तो समुद्र आणि त्याची गाज...

त्यात एखाद्या संध्याकाळी बियर आणि तळ्लेले मासे असतील तर.... बास...

सालं जगायली तरी जास्त काय लागते?

स्कारब्रो छानच आहे पण पुढच्या वेळेस मार्गारेट रिव्हर, ऑगस्टा ला पण फेरफटका मारा जमलं तरं. अल्बानीला जातानाचा एलिफंटा पॉईन्ट आणि बाकिच्या पॉइन्ट्सवरचा समुद्र खरचं वेड लावणारा आहे.

व्वा विशाल भाउ,

जबराट फोटु !!
सागराची अशी अथांग निळाई काय मनमोहक वाटते !!!!!!
पहिल्या ५-६ फोटोंवरचा तुझ्या नावाचा वॉ.मा. पण भारी एकदम Wink

नक्कीच पेरु !
रॉटनेस्ट आयलँड झालेय माझे, आता एकदा तुम्ही म्हणता त्या भागात सुद्धा चक्कर मारेनच Happy

मनःपूर्वक आभार मंडळी Happy

Pages