कविता येईल तेव्हा

Submitted by भुईकमळ on 1 November, 2014 - 08:01

कविता येईल तेव्हा
बदलले असेल का भोवताल
की उगवेल एकाएकी
एक लालबुंद रत्नकळी
निवडुंगाच्या काटेरी मुगुटात?

कविता येईल तेव्हा
जिवाची उलघाल करणारी
ही रणतप्त मध्यान्ह
लुप्त होईल
वाफ होऊन जांभुळल्या मेघात
निळ्या निळ्या शब्दांच्या
घननीळ पावसात
निळ्याभोर कैफात भिजलेला कागद
वाचायला देईन मी
कुंडीत मान टाकलेल्या रोपुल्याला.
येईल का पुन्हा पोपटी तेजकळा
त्याच्या त्राणहीन जगण्याला...?

ती येईल तेव्हा
समोरुन झेपावत जाईल
खुळ्या राघूंचा थवा
थोडा कर्कश्य भासणारा
त्यांचा समूहस्वर नेहमीप्रमाणे
कातरत जाणार नाही
हवेच्या पदराला
हिर्वी गिरकी घेऊन जातील
जुगलबंदीच्या ताना
आसमंत होऊन जाईल
तेव्हा नादखुळा...

कविता येईल तेव्हा
मी सोडून देईन
पुनः पुनः आरशात डोकावणं
दिसत राहील तिच्या अर्थाच्या भिंगातून
माझा सुस्पष्ट चेहरा,
डोळ्याखाली पसरत चाललेल्या सावल्या
नि स्मितरेषेत लपलेल्या नवागत सुरकुत्या

कविता येईल तेव्हा
एक मात्र नक्की होईल
वहात राहील तिच्या श्रावणसलगीने
रक्तातून नव्या अर्थांचा दरवळ
पसरत जाईल
वैराणाच्या काळजावर
उत्कट भावचिंब हिरवळ.

भुईकमळ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा... श्रावण सलगीने असे नसुन , श्रावणसलगीने असा शब्द लिहावयाचा होता..

वाह ....

भारतीताई आत्ताशी कुठे जिवात जीव आला'तुमचा अभिप्राय
वाचून.शशांकजी, अमेयजी आणि भारतीताई
खरच खूप खूप धन्यवाद.

फेसबुकवर आहात का ? काय नावाने ? इथे सांगायचे नसेल तर संपर्कातून मेल करा मला.
कवितेचे काही चांगले उपक्रम आहेत तिथे.