माबोकरांच्या सोबत सायकलींग सुरू करून चार महिने उलटले होते. या दरम्यान अमित M आणि केदारच्या सल्ल्यावरून माझ्याकडच्या रणगाडा सायकलला "जय महाराष्ट्र" करून एक अत्यंत हलकी व अद्ययावत अशी हायब्रीड प्रकारातली "मेरीडा" सायकल विकत घेतली.
एक दोन वीकांत सोडले तर किरण, अमित M, केदार दिक्षीत, वर्धन, पिंगू आणि सुधाकर यांच्यासोबत नियमीतपणे सायकलींग सुरू झाले...
पुणे-लोणावळा (~१०० किमी)
पुणे-सातारा (११० किमी)
पुणे-महाबळेश्वर (१२० किमी)
पुणे-खेड शिवापूर-कोंढणपूर-सिंहगड घाट-पुणे (७० किमी)
पुणे - वारजे - पानशेत - डोणजे - पुणे (७० किमी)
पुणे - पानशेत - कादवे घाट - वेल्हे - पाबे घाट - डोणजे - पुणे (८० किमी)
पुणे - बोपदेव घाट - सासवड - पुरंदर पायथा - पुणे (९० किमी)
पुणे - शिरवळ - पुणे (८० किमी)
आणि मी धडपडून गाजवलेली कोकण राईड
..या राईडही यशस्वीपणे पूर्ण झाल्या.
सायकल पंक्चर होणे, पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन होणे व त्यामुळे पायांमध्ये क्रँप्स येणे, टळतळीत उन्हात सायकल चालवताना होणारे त्रास.. या सर्वांचा अनुभव घेणे सुरू होतेच..!
कोकण राईड मधून पूर्ण बरे होण्यास तीन आठवडे गेले व पुन्हा जोमाने सायकलींग सुरू केले.
३१ ऑगस्टला झालेल्या शिरवळ राईड दरम्यान सुधाकरने आणखी एका आव्हानात्मक गोष्टीबद्दल सांगितले...
७ सप्टेंबरला पुणे-पांचगणी-पुणे ब्रेवेट (उच्चारी "ब्रेवे") आहे आणि त्याने नांव रजिस्टर केले आहे. यालाच BRM असेही म्हणतात "BRM = Brevet des Randonneurs Mondiaux"
अधिक माहिती विचारली असता २०० किमी अंतर १३.५ तासात सायकलने पार करायचे आहे आणि या वेळचा रूट पुणे-पाचगणी-पुणे असा आहे हे कळाले.
"चल की... तुला जमेल सहज.. एकदा ट्राय तर कर" असे सुधाकरने त्याच्या खास ष्टायलीत सांगीतले. (सुधाकर हा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतलाच आहे पण एखाद्या अट्टल मार्केटींग वाल्याने याच्या पायाशी बसून कन्विंसींगचे धडे घ्यावेत असे बिनतोड मुद्दे मांडतो. )
"नाही.. माझी तितकी तयारी नाहीये",
"अरे घाटातच मला खूप वेळ लागेल"
असा माझा बचाव सुरू झाला. पण त्या दिवशी आणि नंतर दोनेक दिवस सुधाकरने व्यवस्थीत पाठपुरावा केला. थोडा गंभीरपणे विचार केल्यानंतर लक्षात आले की, पावसाळा ही सायकलींगसाठी उत्तम वेळ आहे आणि रस्ता ओळखीचा आहे. पुणे ते शिरवळ रस्ता चढउतारांच्या दृष्टीने माहिती झाला होता. मे महिन्यात केलेल्या महाबळेश्वर राईड दरम्यान पुणे ते पांचगणी रस्त्याचा एलेव्हेशन ग्राफही काढला होता. त्या ग्राफचा नीट अभ्यास केला.
या ग्राफवरून लक्षात आले की, पुणे ते पांचगणी दरम्यान कात्रज, खंबाटकी आणि पसरणी घाट सोडले तर बाकी पूर्ण रूट हा उताराचा आहे त्यामुळे जाताना घाट सोडले तर अन्य काही टेन्शन नव्हते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे पांचगणी हा रस्ता सायकलवाल्यांशी ताम्हिणी घाटासारखा चेष्टा करत जात नाही. सरळ तर सरळ रस्ता आहे (ताम्हिणी घाटात निव्वळ चढ उतार आहेत. सलग चढ किंवा सपाट रस्ता अशी भानगड नाहीये!)
मंगळवारी माझे रजिस्ट्रेशनचे नक्की झाले आणि आणखी एक सुवार्ता कळाली - जेथे रजिस्टर करायचे आहे ती वेबसाईट एरर देत आहे. अनेक ठिकाणी फोनाफोनी करून नांव नोंदवले व रजिस्ट्रेशन फी रविवारी BRM च्या दिवशीही भरता येईल असे कळाले.
आता पूर्वतयारी सुरू केली.
सर्वप्रथम BRM चे एकंदर स्वरूप कसे असते त्याची माहिती मिळवली.
Audax Club Parisien (ACP) हा १९०४ साली पॅरीस येथे स्थापन झालेला फ्रेंच सायकलींग क्लब जगभरात Randonneuring / Audax ही हौशी सायकलपटूंची लांब अंतरे कापण्याची स्पर्धा आयोजीत करतो. सायकलपटूंनी ठरावीक अंतर ठरलेल्या वेळेमध्ये पूर्ण करणे आवश्यक असते. कोणत्या ठिकाणी थांबे घ्यायचे, कोणत्या प्रकारची सायकल चालवायची, सोबत जायचे कि एकेकट्याने जायचे हे सर्व मुद्दे सायकलपटूंच्या मर्जीवर असतात. "कोणत्याही प्रकारची लबाडी न करता आवश्यक अंतर वेळेमध्ये पार करणे" इतकेच अपेक्षीत असते.
Audax Club Parisien (ACP) चा लोगो
आणखीही आवश्यक माहिती कळाली.
१) BRM किंवा ब्रेवे ही रेस नसते. पहिला / दुसरा असे नंबर नसतात तर ठरावीक अंतर ठरलेल्या वेळेमध्ये कापणे महत्त्वाचे असते. त्यामुळे एका अर्थी ही स्पर्धा नसली तरी आपली स्वतःची वेळेशी स्पर्धाच असते.
२) BRM च्या सुरूवातीला आपल्याला एक "ब्रेवे कार्ड" दिले जाते व त्यावर सुरूवात, शेवट आणि कंट्रोलपॉईंट्स वरील मंडळींकडून नोंद करून घेणे आवश्यक असते.
३) BRM चा रूट ठरलेला असतो आणि त्या रूटनेच प्रवास करणे आवश्यक असते.
४) इतर कोणत्याही प्रकारचा सपोर्ट घेण्याची परवानगी नसते.
५) सायकलची कोणत्याही प्रकारची दुरूस्ती / बिघाड / पंक्चर या कारणांनी वेळेमध्ये सवलत मिळत नाही. ठरलेल्या वेळी आपण कंट्रोल पॉईंटवर पोहोचू शकलो नाही तर स्पर्धेतून बाद केले जाते.
६) सोबत रिफ्लेक्टीव वेस्ट (ते रस्त्यावरचे कामगार अंगात घालतात तसले), सायकलचे लाईट्स (२०० किमी पेक्षा जास्तीच्या अंतराला बॅटरीज / सेलचा जादा जोड) आणि हेल्मेट सक्तीचे असते.
आता माझी तयारी सुरू केली.
१) सायकल उत्तम स्थितीमध्ये होती, तेलपाणी आणि ब्रेक रबर इतकेच काम करणे आवश्यक होते त्यामुळे ते काम शनिवारी करावयाचे ठरवले.
२) पुणे-पांचगणे एलेव्हेशन मॅप कायमस्वरूपी नजरेसमोर राहिल अशी सोय केली. मोबाईल स्क्रीन सेव्हर, ऑफिसचे डेस्क, घरी अनेक ठिकाणी प्रिंटाऊट्स चिकटवून टाकल्या. "२०० किमी अंतर कापायचे आहे आणि इतका इतका चढ चढायचाच्च आहे" हे स्वतः स्वतःवरच बिंबवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला.
(यामध्ये पहिला सुळका कात्रज घाट, दुसरा सुळका खंबाटकी घाट आणि तिसरा पसरणी घाट आहे.)
३) जातायेता खाण्यापिण्यासाठी हॉटेलवर विसंबून राहणे शक्य नव्हते कारण - वेळेची कमतरता. त्यामुळे कमी श्रमात पोट भरेल असे आणि त्रास न होता एनर्जी टिकून राहिल असे खाद्यपदार्थ जमवण्यास सुरूवात केली. राजगिरा चिक्की, शेंगदाणा गुडदाणी, प्रोटीन बार्स आणि लेमन गोळ्या घेतल्या.
४) सायकलला आणखी एक बॉटल होल्डर बसवला.
५) अॅलन की सेट, पंक्चर किट, दोन ट्युब आणि सायकल लाईट्स चे सेल घेतले.
६) शनिवारी दोन्ही मोबाईल पूर्ण चार्ज करून घेतले आणि एका मोबाईलमध्ये मोटीवेशनल गाणी डाऊनलोड केली (रॉकी थीम, लक्ष्य, रेहमानची फास्ट बीटची गाणी, पुलंची सदाबहार कथाकथने - म्हैस आणि रावसाहेब.. असे बरेच काही) मोबाईलची एक्स्ट्रा बॅटरी सोबत घेतली.
७) सायकलचा फ्रंट लाईट पूर्ण चार्ज करून तर टेल लाईटचे सेल सोबत घेतले.
८) एक काळ्या काचांचा आणि एक पूर्ण पारदर्शक काचांचा असे दोन नवीन गॉगल घेतले.
सोबत घ्यायच्या सर्व वस्तू पाठीला सोयीस्कर असतील अशा पद्धतीने एका छोट्या सॅकमध्ये भरल्या. पाठीला सोयीस्कर म्हणजे पाठीला कोणतीही गोष्ट टोचता कामा नये. हल्ली सर्रास आढळणार्या लॅपटॉप सॅकमध्ये हा प्रॉब्लेम येत नाही परंतु मला कमीतकमी वजन सोबत न्यायचे असल्याने मी त्या प्रकारची सॅक टाळली.
शनिवारी किरण, अमित M, केदार आणि सुधाकर या सर्वांचा सूचना आणि शुभेच्छांचा भडीमार सुरू होता. एकंदर तयारी आणि रूट विषयी आता आत्मविश्वास वाटू लागला होता.
"मला जमेल का..?" यावरून "नीट प्रयत्न केले तर नक्की जमेल...!!" असा बदल झाला होता.
रविवार उजाडला.
सकाळी पांच वाजता घराबाहेर पडलो. युनिवर्सिटी गेटपाशी ०५:४० ला पोहोचलो. १५ / २० सायकलीस्ट, त्यांना सोडायला आलेले अनेक जण, सपोर्ट व्हिईकल्स सर्वजण जमले होते. सुधाकरही लगेचच पोहोचला. ब्रेवे कार्ड ताब्यात घेणे, सायकल चेकिंग करून घेणे, सायकलला BRM नंबर लावणे, जाताना घ्यावयाची काळजी, पांचगणीमध्ये कंट्रोलपॉईंट नक्की कुठे आहे, रस्त्याची खराब अवस्था अशा अनेक सुचना दिल्या गेल्या.
ठीक सहा वाजता शिट्टी वाजली आणि आम्ही मार्गस्थ झालो.
"अरे... तू तर एकदम शाळेच्या पहिल्या दिवशी पोरं येतात तसा आला आहेस."
माझ्या नवीन रिफ्लेक्टीव वेस्ट आणि गॉगलचे सुधाकरने माप काढलेले होते.
युनीवर्सिटी, पाषाण सर्कल, बावधन असा प्रवास सुरू झाला चांदणी चौक CCD जवळून जाताना मी सुधाकरचा निरोप घेतला कारण माझी हायब्रीड सायकल डांबरी रस्ते आणि उतारावर खूप वेगाने जाते तर त्याची MTB सायकल तितका वेग पकडत नाही. (मात्र MTB चा त्याला घाटात फायदा होणार होता). मी चांदणी चौकाचा उतार उतरून हायवेला लागलो तोच माझ्या मागे धडपडण्याचा आवाज आला. एक नवीन सायकलस्वार खडीवरून घसरून पडला होता. तेथे आधिपासून हजर असलेला आयोजकांपैकी एक आणि सुधाकर त्याच्यासाठी थांबले. ते आहेतच म्हणून मी थांबलो नाही. चांदणी चौक ते वडगांव पूल या रस्त्यावर एक दोन फ्लायओव्हर सोडले तर सगळा उतारच आहे. त्यामुळे एका लयीत सायकल हाणत होतो.
दरीपूलाच्या दरम्यान एक ऑडी जवळ येवून "कमॉन कमॉन.. नाईस जॉब" असे चीअर करून गेली. नवीन कात्रज बोगद्याच्या आधी थोडे थांबून पाणी प्यायलो सॅक, लाईट्स सर्वकाही पुन्हा एकदा तपासले कारण आता मी पुढचा थांबा शिरवळलाच घेणार होतो. (अंदाजे ४० किमी) कात्रज ते शिरवळ या उताराच्या रस्त्याचा फायदा घेवून वेगात अंतर कापले तरच घाटांमध्ये जास्ती वेळ मिळणार होता.
खराब रस्ते सोडले तर बाकी काहीच अडथळे नव्हते. फारसा वाराही नव्हता. ८:३० ला श्रीराम वडापाव-शिरवळला पोहोचलो. अडीच तासात ६० किमी - नॉट बॅड!!
श्रीराम वडापाववाल्याकडे उभ्याउभ्याच एक ग्लास ताक प्यायलो. पाणी भरून घेतले आणि पुन्हा बाहेर पडलो.
शिरवळनंतर खंडाळा गावपर्यंतचा ७ / ८ किमीचा रस्ता अत्यंत ओसाड भागातून जातो. आजुबाजूला काहीही नाहीये.. त्या पॅचमधून गाडीनेही जाताना मला थोडे टेन्शन येते कारण त्या दरम्यान साधा पंक्चरवालाही नाहीये. तो पॅच व्यवस्थित पार पडला. खंबाटकी घाट दिसू लागला होता.
खंबाटकी घाटाच्या सुरूवातीला "घाट सुरू झाला ऽ ऽ" अशी आरोळी देणारा एक चढ येतो आणि नंतर चढ वगैरे काही नाही, एक दीड किलोमीटर सरळसोट रस्ता आहे. या दरम्यान एके ठिकाणी पहिला व्यवस्थित असा ब्रेक घेतला. एक एनर्जी बार संपवला. पाणी प्यायलो. दोन तीन मिनीटे विश्रांती घेतली आणि पुन्हा सायकल हाणायला सुरूवात केली. खंबाटकी घाटामध्ये तीन चार सोपी वळणे सोडली तर सगळे खडे चढ आहेत. सगळी शक्ती एकवटून घाट चढवत होतो. घाटमाथ्याच्या अगदी अलीकडे एक दत्ताचे देऊळ आहे तेथे पोहोचलो. आता आणखी एक वळण की घाट संपला.
देवाला नमस्कार करून बाहेर पडलो, पुढचा रस्ता चढताना एक चारचाकी जवळ आली. त्यातले डावीकडे बसलेले काका अनुभवी दिसत होते. माझ्या (अत्यंत कमी!) वेगाइतका वेग कमी करून त्यांनी चौकशी सुरू केली. कोणती इव्हेंट आहे..? कोणी ऑर्गनाईझ केली आहे..? कुठे चाललात..? परत कधी येणार..? वैग्रै वैग्रै..
मी हाफ हुफ करत कशीबशी उत्तरे देत होतो. मागच्या गाड्यांनी दंगा सुरू केल्यावर ते पटकन निघून गेले.
घाटमाथा चढताना एक पूर्ण भरलेला व अत्यंत कमी वेगाने जाणारा ट्रक समोर होता. त्याला मागे टाकण्यासाठी सायकल उजव्या लेन मध्ये घेण्याशिवाय पर्याय नव्हता, तसे केल्याकेल्या मागच्या सुसाट वेगाने येणार्या चारचाकींनी अव्याहतपणे आवाज द्यायला सुरूवात केली. मी गडबडून आणखी जास्त ताकद लावून सायकल हाणली तर दोन्ही पोटर्यांमध्ये एकदम क्रँप्स आले. तसाच धडपडत उरलेला घाट चढवला व आता घाट उतरल्यावर बघू असा विचार करून उतारावरून घरंगळायला लागलो..
ताम्हिणी घाटात उतारावरूनच धडपडण्याचा अनुभव असल्याने खंबाटकी घाट सांभाळून उतरला व त्याच लयीमध्ये वेळे फाटा पार केला. पेडल मारता मारता भरपूर पाणी प्यायला सुरूवात केली.
वेळे फाटा ते सुरूर फाटा दरम्यान दोन सायकलीस्ट खूप वेगाने पुढे निघून गेले. मात्र जाता जाता "I know its your first Brevet.. You are doing nice.. Keep it up..!!" असे सांगून, हुरूप वाढवून गेले.
सुरूर फाटा ते वाई हा नितांतसुंदर रस्ता आहे. आजूबाजूला भरपूर झाडी, शेत जमीन, गारवा आहे. वाहनांची वर्दळ असली तरी हायवेसारखी गर्दी किंवा रखरखाट आजिबात नाहीये.
१०:४५ ला वाईमध्ये पोहोचलो. पसरणी घाटाच्या आधी एक ब्रेक घेणे गरजेचे होते. वाई गावाबाहेर नातू फार्म्स नावाचे एक रिसॉर्ट सारखे ठिकाण आहे. यापूर्वी महाबळेश्वरला जाताना आम्ही येथेच थांबलो होतो. तेथे पोहोचलो. एक ग्लास गरम गरम दूध मागवले आणि चिक्की व दूध पोटात ढकलले. सुधाकरला फोनवले, तो पांच सहा किमी मागे होता.
११ वाजता मी एकट्यानेच पसरणी घाट चढायला सुरूवात केली.
पसरणी घाट हा आकाराने C सारखा दिसतो आणि या घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण घाट चढायला सुरूवात केल्यानंतर लगेचच आपल्याला घाटाचा शेवट दिसू लागतो. टेबल पॉईंट म्हणतात बहुदा त्या ठिकाणाला.
घाट एका लयीत चढायला सुरूवात केली. आता सलग ११ किमी खडी चढण होती. मी या घाटाचा प्लॅन आखताना; वाई, घाटातले पहिले मंदिर, वाटेत आणखी एक गुहा किंवा मंदिर आहे ते ठिकाण आणि शेवटी टेबल पॉईंट असे चार ब्रेक ठरवले होते, पण अचानक वाटेत मांड्यांमध्ये क्रँप्स आले. चुपचाप सायकलवरून उतरलो आणि दुसर्या दिशेला जावून दगडावर बसलो. अर्धी बाटली पाणी संपवले. हाताने मांड्यांना थोडा वेळ मालीश केले व पुन्हा सायकलवर बसलो. पाण्याचा परिणाम लगेचच जाणवत होता. मंदिर पार केले. सुदैवाने आज ऊन नव्हते. पाऊसही नव्हता त्यामुळे कमी त्रास होत होता. ठरलेल्या दुसर्या ठिकाणी पोहोचलो तर तेथे एक छोटा धबधबा वाहत होता. घामाने चिप्प भिजलेले हेल्मेट त्याच्याखाली धुतले. डोके पाण्यात बुडवले, चेहरा धुतला, ग्लोव्हज व कपडे भिजवले आणि पुन्हा एकला चलो रे...
टेबल पॉईंट यथावकाश पार पडला.. पण घाट येथेच संपत नाही. टेबल पॉईंट पार केल्यानंतर चढ संपेल असे वाटले होते पण नाही, पांचगणी मार्केटपर्यंत चढ होताच. तो चढवताना वैताग आला असला तरी मोठ्ठा घाट पार पाडला हे समाधान होते. कंट्रोल पॉईंटच्या दीड दोन किलोमीटर आधी नेमके सायकलचे पुढचे मडगार्ड निखळून पडले. ते हातात घेवूनच मार्गक्रमणा सुरू ठेवली.
शेवटी एकदा १२:५६ ला कंट्रोल पॉईंटला पोहोचलो. निम्मी BRM संपली होती, घाट वाटांची थकवणारी चढण संपली होती आणि एक अत्यंत आव्हानात्मक टप्पा पार पडला होता. सर्वात महत्वाचे म्हणजे "वेळेत पोहोचलो होतो..!!"
कंट्रोल पॉईंटला पोहोचल्या पोहोचल्या आयोजकांनी माझा व सायकलचा ताबा घेतला. मडगार्ड कशाने मोडले, मी वाटेत पडलो काय वगैरे विचारपूस केली, ब्रेवे कार्डवरती शिक्का मारला, वेळ नोंदवली आणि एका रेस्टॉरंटमधील बसण्याची जागा दाखवली. तेथे पाणी, इलेक्ट्रॉल आणि केळी ठेवली होती. केळी खाता खाता पाणी भरून घेतले, इलेक्ट्रॉल पावडर पाण्यात विरघळवली तितक्यात सुधाकरही पोहोचला.
माझी खादाडी + विश्रांती सुरू असताना आयोजकांनी सायकल ठीकठाक आहे का हे पाहिले, ब्रेक तपासले. मोडलेले मडगार्ड ताब्यात घेतले व त्यांच्या गाडीतून पुण्याला नेण्याचेही मान्य केले.
सुधाकर सोबत..
आता पसरणी घाट उतरायला सुरूवात केली.
खराब रस्त्यावरून, बेशिस्त वाहनचालकांची प्रेमाने विचारपूस करत आणि स्वतःला सांभाळत घाट उतरत होतो.
"A descend is always a great reward for completing the climb" हे पूरेपूर पटत होते.
वाईला पोहोचलो आणि लगेचच सुरूर फाट्याकडे कूच केले.
वाटेत हॉटेल गंधर्व येथे छोटा ब्रेक घेतला. वर्धन भावे (सायकलींग ग्रूपमधला मित्र) वाईला काही कामानिमीत्त आला होता त्याची भेट झाली. पुन्हा पुरेसे पाणी पोटात ढकलून पेडल्स मारायला सुरूवात केली. सुरूर फाटा, वेळे फाटा, खंबाटकीचा लहानसा चढ, खंबाटकी बोगदा, नेहमी तोंडाच्या दिशेने वारा असणारा खंबाटकीचा उतार, खंडाळा वगैरे ठिकाणे मागे पडत होती. एका लयीत सायकल चालवतोय असे वाटत असले तरी प्रत्यक्षात वेग खूपच कमी झाला होता. शिरवळला पोहोचायला ०३:४५ वाजले. शिरवळ पार केल्यानंतर एका मोठ्या फूटपाथवरती जागा बघितली आणि सरळ आडवा झालो. सुधाकरशी फोन झाला होताच, तो तीन चार किमी मागे होता. तोही येवून पोहोचला.
आता मात्र प्रचंड थकवा आला होता. आणखी एक एनर्जी बार संपवला. सुधाकरही दमला होता. सकाळपासून १० तासांमध्ये १५० पेक्षा जास्त किमी सायकलींग झाले होते. फारवेळ थांबून चालणार नव्हते. त्यामुळे पुन्हा सायकल आणि आम्ही..
वाटेत दोघांचाही वेग कमी होवू लागला. सतत असलेला छुपा चढ आणि समोरून तोंडावर आदळणारा भन्नाट वारा (हेडविंड) दोघांनाही दमवत होता. "बस झाले आता.. ", "एक टेंपो थांबवूया आणि आपापल्या घरी जावूया" "कंटाळा आला राव..." अशा वाक्यांची देवाणघेवाण सुरू झाली.
नसरापूर फाटा दिसला आणि आता टोल नाका जवळ आला आहे याची जाणीव झाली. अचानक डोक्यात विचार सुरू झाले..
"सकाळपासून इतकी सायकल चालवली आहे की आता फक्त ३० / ४० किमी राहिले आहेत, वेळही हातात आहे, सुदैवाने इतक्या खराब रस्त्यांवर सायकलने उत्तम सोबत केली आहे मग आत्ता हार पत्करण्याइतका दुसरा कोणताही मूर्खपणा नसेल"
"अभी नही तो कभी नही... चलो...!" असा विचार करून सायकल हाणायला सुरूवात केली. सायकल हार्ड गिअर वर सेट केली आणि आता काहीही झाले तरी गिअर्स बदलायचे नाहीत असे ठरवून वेग वाढवला.
सहा वाजता खेड शिवापूर टोल नाका पार केला. आता मात्र प्रचंड दम लागला होता. दिवसभरात कधीतरी सायकलवरून उतरताना उजवा पाय वेडावाकडा टेकवला गेला होता त्यामुळे उजव्या पाऊलात चमक भरली होती. चालणेही जड जात होते. खेड शिवापूरला एक ठीकठाक टपरी बघितली आणि मालकाला आधीच विचारले "मी पाच मिनीटे झोपून विश्रांती घेणार आहे - विकत काहीही घेणार नाहीये, चालेल का..?" माझ्या एकंदर दमलेल्या आणि धुळीने भरलेल्या अवताराकडे बघून त्याने नकार दिला नाही आणि तेथेच असलेल्या एका बाकड्यावर अंग टाकले. पाठ टेकल्यानंतर विलक्षण समाधान मिळाले आणि लगेचच झोप आली. आजिबात डोळे न मिटता दोनतीन मिनीटे पडून राहिलो आणि पुन्हा मार्गस्थ झालो.
आता फक्त शिंदेवाडीचा मोठा चढ शिल्लक होता. दम इतका लागला होता की नवीन फ्लायओव्हरवरती सायकल नेण्याचा विचारही केला नाही. सर्विस रोडने हळूहळू पुढे गेलो. पुणे - कात्रज जुना बोगदा एक्झीट नंतर सर्विसरोड वापरात नसल्याने खडी आणि दगडांचा सडा पडला होता. आता येथपर्यंत पोहोचून सायकल पंक्चर होवू नये याची काळजी करत तोही चढ चढवला
सहा वाजता टोल नाका पार केल्यानंतर माझ्या अंदाजाने कात्रजचा बोगदा यायला पाऊणे सात वाजायला हवे होते, मात्र हार्ड गिअर्सच्या मदतीने मी विश्रांती साठी थांबूनही साडेसहाला बोगद्यात प्रवेश केला. बोगद्यात ठिकठिकाणी गळणारे पाणी आणि त्यामुळे शेवाळलेला सिमेंटच रस्ता, खडी वगैरे नेहमीच्या गोष्टी वेग विलक्षण कमी करत होत्या. एकदाचा बोगद्याबाहेर पडलो. आता काहीही न करता सिंहगड रोडपर्यंत जाणे शक्य होते. तरीही घड्याळाकडे नजर ठेवून उतारावरही जोरात पेडलींग करत वेग विलक्षण वाढवला. काहीही झाले तरी ०७:३० च्या आत पोहोचणे आवश्यक होते.
वाटेत एका ठिकाणी ४० / ४५ च्या वेगाने जाणार्या आयोजकांच्याच इनोव्हाला मी कॉलर ताठ करत हॉर्न देतो तसे सायकलची बेल वाजवत ओव्हर टेक केले.
०६:४० - सिंहगड रोड फ्लायओव्हर - (ऑ..?? घड्याळ ठीक आहे का..??)
०६:५० - वारजे - (जमेल.. जमेल.. जमेल..!!!!!!)
०६:५५ - (वारज्याचा चढ संपला - आता मात्र आपण मी वेळेत पोहोचेनच..!!)
इथेही खडी आणि खड्डे असलेला खराब रस्ता होताच पण आता मी शेवटच्या पॉईंटच्या अगदी जवळ होतो. सायकलला काहीही झाले तरी साडेसातची वेळ चुकण्यासारखी नव्हती.
०७:०५ ला चांदणी चौक CCD ला पोहोचलो. BRM संपली..!!!!
शेवटचे ३५ किमी - नसरापूर ते चांदणीचौक ही अक्षरशः ड्रीम राईड होती. चढण असलेले रस्ते, वाटेत लागलेले संध्याकाळचे ट्रॅफीक, फ्लायओव्हर्स, खराब रस्ते, एक दोन ठिकाणी घेतलेली विश्रांती आणि प्रचंड थकवा आला असतानाही १७ किमी / तास हा वेग साध्य करता आला.
मी बरोब्बर १३ तासात २०९ किमी अंतर कापले होते आणि "रँडोनीयर" हा लाईफलाँग टॅग मिळवला.
पोहोचल्यावर सर्व आयोजकांनी अभिनंदन केले. मी ही सर्व आयोजकांचे मुद्दाम आभार मानले. पुणे युनिवर्सिटीपासून परत येईपर्यंत त्यांच्यापैकी कोणी ना कोणी आमच्यासोबत होते. अगदी खंबाटकी घाट, पसरणी घाटातही सपोर्ट व्हिईकल्स उभी होती. सुरूवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी न थकता सोबत केली.
माझा माझ्यासोबत जल्लोष सुरू झाला होता..!!!!!
केवळ तीन चार महिन्यांच्या किरकोळ अनुभवाच्या जोरावर हौशी सायकलींग मधला एक छोटासा पण अत्यंत महत्वाचा टप्पा गाठला याचा खूप आनंद झाला.
राईडचे स्टॅट्स,
संपूर्ण राईडचा एलेव्हेशन ग्राफ. (पहिला सुळका कात्रज घाट, दुसरा खंबाटकी घाट आणि तिसरा पसरणी घाट आहे आणि पुन्हा खंबाटकी घाट व कात्रज घाट.)
ब्रेवे कार्ड - पोहोचल्यानंतर या कार्डवर वेळेची नोंद करून घेतली.
BRM २०० मेडल - Audax Club Parisien (ACP) यांच्याकडून मला हे मेडल मिळेल.
माझ्यानंतर सुधाकर, व विजय, निरंजन हे ओळखीचे झालेले लोक्स येवून पोहोचले.
अचानक पडलेले एखादे स्वप्न खरे व्हावे तसे काहीसे झाले होते. कोणतीही विशेष तयारी न करता केवळ मानसिकदृष्ट्या कणखर राहून केलेली ही महत्वाकांक्षी राईड पूर्ण झाली. संपूर्ण राईड दरम्यान सायकलने अप्रतीम सोबत केली.
.....पण ही BRM पूर्ण झाली म्हणजे सगळी आव्हाने पूर्ण झाली असे नक्कीच नाही. आता ३०० किमी (२० तास) आणि ४०० किमी (२७ तास) या BRM आवाक्यातल्या वाटू लागल्या आहेत.
हौशी सायकलींगमधल्या थोरामोठ्यांच्या तुलनेत ही फक्त सुरूवात आहे हे ही पक्के लक्षात आले आहे. वरील फोटोमध्ये माझ्या उजवीकडे मागे हात उंचावलेला - संतोष. या पठ्ठ्याने त्या दिवशी या सिझनमधले ५००० किमी पूर्ण केले.
मागील रांगेमध्ये डावीकडून दुसरी - दिव्या ताटे. भारतातील पहिली महिला "सुपर रँडोनीयर" - (एकाच सीझनमध्ये २००, ३००, ४००, ६०० किमी अंतर यशस्वीपणे पार करणार्याला सुपर रँडोनीयर हा टॅग मिळतो.)
भेटू पुन्हा... ३०० किमी ची BRM खुणावत आहेच..!!!
रँडोनीयर - मनोज..
BRM केलीस ?? सहीये !!! माझ्या
BRM केलीस ?? सहीये !!!
माझ्या लिस्टवर आहे तो प्रकार..
धुव्वा केलस कि लेका. मस्तच
धुव्वा केलस कि लेका. मस्तच !!! अभिनंदन
"माझा माझ्यासोबत जल्लोष सुरू झाला होता " हा हा हा
हे परत परत वाचून आता मला २०० चे वेध लागलेत. खूप मजा आली वाचताना. टु सी ग्रेट हो ! तोहफा कुबूल करो
u rock man .. पुढच्या BRM ला मी नक्की ...
सहीच!
सहीच!
ग्रेटच रे.. NH4 वर जाणार्या
ग्रेटच रे.. NH4 वर जाणार्या सुसाट वाहनांचा त्रास होत नाही का सायकल चालवताना?
अरे वा! भारी!
अरे वा! भारी!
फारच छान... तुम्हाला सायकलींग
फारच छान... तुम्हाला सायकलींग मधे अधिकाधिक यश मिळो.. भरपूर शुभेच्छा...
वेल डन बॉईज. जेव्हढी छान
वेल डन बॉईज.
जेव्हढी छान कामगिरी तितकाच सुंदर रिपोर्ट. खूप खूप छान लिहीलयस रे दोस्ता.. ज्यांनी हा अनुभव घेतला नाही त्यांनाही प्रेरणा मिळेल इतकं प्रभावी लिहीलयस.
हे पहिल्यांदाच ऐकलं. पण खूप
हे पहिल्यांदाच ऐकलं. पण खूप अभिनंदन. कीप इट अप
ग्रेट! अभिनंदन
ग्रेट! अभिनंदन
अभिनंदन. आणि रिपोर्टही मस्त.
अभिनंदन. आणि रिपोर्टही मस्त. (लिहिण्यापेक्षा अजून ५० मैल सायकलींग परवडले अशी माझी अवस्था आहे!!) मला भारतातली सायकल राईड करायची आहे एकदा. विश लिस्ट् वर आहे.
एक प्रश्ण - पावसाळ्यात सायकलींग सेफ वाटते का? खास करून उतारावर ?
कम्माल.....२०० किमी.
कम्माल.....२०० किमी. पहिल्यांदाच आणि यशस्वीरित्या पूर्ण.....
लई झ्याक गड्या....तुला जोरदार सलाम....
वर्णन पण मस्त झालेय. सगळा फील उतरलाय. लगे रहो....
@ पराग - नक्की कर BRM - आणि
@ पराग - नक्की कर BRM - आणि काहीही मदत हवी असेल उदा. - BRM रूटवर सराव करणे किंवा माझ्या थोडक्या अनुभवाचा काही फायदा तर बिन्धास्त हाक मार..
@ अमित - केदारशी आत्ताच बोललो. त्यालाही BRM करायची आहे. सोबत सराव करायला लै मेंबर आहेत.(तू, केदार, पराग आणि मी)
@ टण्या - खूप त्रास होतो.. विशेषतः वाहनचालकांच्या मनोवृत्तीचा. सायकलच आहे म्हणून कट मारणे / खूप जवळून खूप जोरात गाडी नेणे वगैरे प्रकार करतात आणि सायकल सांभाळताना पुरेवाट होते.
(यावर लिहिण्यासारखे बरेच काही आहे..!!!)
@ rar - अत्यंत चुकीच्या माणसाला हा प्रश्न विचारलात तुम्ही. मी एकदा उतारावरच जोरात धडपडलो आहे.
ऑन अ सिरीयस नोट - पावसाळ्यात हायब्रीड पेक्षा MTB सायकल सेफ वाटते आणि उतार व निसरडा रस्ता यांची काळजी घेतली तर फारसा धोका नाही..
बाकी सर्व प्रतिसादकांचे आभार...!!
खुप मस्त अनुभव आहे... लिहीलय
खुप मस्त अनुभव आहे... लिहीलय पण छान ...
एकदम झक्कास, ब्राव्हो.... मी
एकदम झक्कास, ब्राव्हो....
मी पण येणार प्रॅक्टीसला..
अभिनंदन. भन्नाट अनुभव आहे
अभिनंदन. भन्नाट अनुभव आहे हा. वाचतांना मस्त वाटले एकदम.
अभिनंदन आणि शुभेच्छा..
अभिनंदन आणि शुभेच्छा..
अभिनंदन
अभिनंदन
मस्तच रे! सही उतरवलंयस
मस्तच रे! सही उतरवलंयस लिखाणात पण
ऑस्सम मनोज ! बघ तुला
ऑस्सम मनोज !
बघ तुला रनगाड्यावरनं बुलेट वर जाण्याऐवजी सायकल घ्यायला उद्युक्त केले त्याचा फायदा झाला. यु आर अ बॉर्न रायडर ! आता ३०० साठी अजून एक नवी रोड बाईक सायकल घेऊया.
२८ ला पुणे पाचगणी सायकल रेस आहे. मी भाग घेतला आहे, पण मी इथे ट्रॅव्हल मध्ये अडकलो आहे. ऐनवेळी कॅन्सल करावे लागते की काय असं वाटतंय. तू भाग घे.
पावसाळ्यात सायकलींग सेफ वाटते का? खास करून उतारावर ? >>
हो. फक्त गिअर कॉम्बिनेशन काय ठेवाल ह्यावरून स्पिड कंट्रोल करता येते. ते जमले की झाले. तरीपण एखाद वेळेस पडू शकतोच. मी तरी अजून पडलो नाहीये.
सहीच.. भारी अनुभव आहे.
सहीच.. भारी अनुभव आहे.
अभिनंदन "रँडोनीयर" BRMचा
अभिनंदन "रँडोनीयर"
BRMचा अनुभव फार छान लिहिला आहेस.
वाह!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
वाह!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अभिनंदन रे मित्रा.
छानच अनुभव.. आणि लेखनही !
छानच अनुभव.. आणि लेखनही !
अभिनंदन!
अभिनंदन!
वा: ! रँडोनर मनोज. हार्दिक
वा: ! रँडोनर मनोज. हार्दिक अभिनंदन. अगदी मनापासून.. मी यंदाच्याच सिझनमध्ये नासिक वाशिंद नासिक ही २०३ किमी ची ब्रेवे पूर्ण केली होती. शेवटचे ४० किमी कसा जीव काढतात ते ज्यांनी ब्रेवे अनुभवलेय त्यांनाच माहित माझ्या वेळी शेवटचे ४० किमी आणि साडेतीन तास हातात असतांना कसारा घाट ते वाडीवर्हे दरम्यान माझी सायकल ५ वेळा पंक्चर झाली (वेगवेगळ्या ठिकाणी) पंक्चर स्वतः काढायचे असते त्यांत एकूण पावणेदोन तास वाया गेले व मी अर्धा तास उशीरा पोहोचलो पण पंक्चर पटकन कसे काढायचे ते शिकलो.
काही आणखी उपयुक्त माहिती..
तुझ्या ४थ्या मुद्द्यात थोडी भर घालतो. ब्रेवेच्या नियमानुसार कुठ्ल्याही वाहनामागून हेतूपूर्वक जात राहिल्यास किंवा वाहनाला धरुन सायकल चालवल्यास आजन्म ब्रेवे मधून बंदी येऊ शकते.
छोट्या चिप्सनी टायर पंक्चर्स होतात त्यासाठी ट्युब व टायरमध्ये लायनर्स टाकावीत. पंक्चर % कमी होते.
ब्रेवेसारख्या ठिकाणी वेळेला महत्त्व असल्याने पाणी पिण्यासाठी थांबण्याचा वेळ वाचवता येऊ शकतो. पाण्याच्या बाटलीऐवजी हायड्रो कॅमल बॅग वापरावी. त्याची नळी चेहर्याजवळ सेट करावी. २० मि. ला ५ घोट मी घेत होतो. एकूण १४ लि. पाणी, २ मोठे ग्लास ताक, २ ग्लास नीरा एवढा लिक्विड इनटेक मी घेतला होता. क्रँप्स अजिबात आले नव्हते.
आणखी नंतर लिहितो...
____/\____ जबरदस्त
____/\____ जबरदस्त
Nashikchya dr mahajan
Nashikchya dr mahajan bandhunni gelya sweason madhe saglya brevet purn kelya. Evn 1200 km suddha
Ata te paris brevet n RAM chi tayari karat aahet.
Brevet n itar cycle race sathi margdarshan have asalyas te nakki kartil
Hyashivay RAM sathi te sponsons shodhat aahet can we help them??
वाट पाहतच होतो कधी माबोवर
वाट पाहतच होतो कधी माबोवर टाकतोय
मस्त वर्णन , २०० किमी बाईकवर गेल्यावरही थकवा येतो आपण सायकलवरुन केलेले दिव्य महान आहे.
अभिनंदन मनोज , छान वर्णन .
अभिनंदन मनोज , छान वर्णन .
वेल, we all inspired by Dr.
वेल,
we all inspired by Dr. Mahajan brs., 60 yrs old Mohinder uncle etc. ते वेळोवेळी मार्गदर्शनही करत असतात. या सिझनमध्ये नासिकमधून ५ सुपर रँडोनर्स व २ Maestro रँडोनर्स झालेत.
सध्या त्यांचा Race Across America साठी सराव सुरु आहे.
Pages