फडे

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

fadaa1.jpg

पुण्याला आमच्याकडे तीन गॅलर्‍या आहेत. एका गॅलरीत आम्ही झाडे लावलीत. कुंडीतील गाळ फरशांना चिकटून राहतो. इथली माती लाल आहे. आमच्याकडे अकोल्यात मातीचा रंग असा आहे की लगेच आठवण होते - काळ्या मातित मातित तिफण चालते. तो गाळ बघून मी केरसुनी घेतली पण केरसुनी ओलीचिंब होऊन आठ दिवस सुकवत ठेवावी लागली. एक खराटा होता त्यानीही गाळ निघत नव्हता. आई म्हणाली फडा घेऊन ये.

मी मंडईत हरेक गल्ली .. हरेक बोळ फिरलो पण कुठेच फडा मिळाला नाही. काही जणांना विचारुन पाहिले की इथे फडा कुठे मिळेल तर मुळात फडा म्हणजे काय हेच इथे कुणाला ठावूक नाकी. आमच्या शेजारी गेलो ते मराठवाड्याचे आहेत त्यांनाही हा फडा कसा असतो माहिती नव्हत. एक शेजारी रत्नागिरीचे आहेत त्यांनाही माहिती नव्हत. अनायाचे अकोल्याला जाणे झाले. गाडीतून खाली उतरत नाही तर समोरच एक फडेवाली बाई दिसली. तिला बघून खूप छान वाटल आणि तिच्याकडून तिथल्या तिथेच दोन फडे विकत घेतले. ४० रुपये जोडी.

आमच्याकडे टोपली, फडे, सुप ह्या तिन्ही गोष्टी आम्ही दिवाळीला आणि लग्नाकार्याला विकत घेतो. त्याची पुजा करुन मगच त्या वापरायला लागतो. माझी आई पोळ्या भाकरी कधीकधी वाटीभर भाजी देखील दुरडीत ठेवते. पुण्याला अशा दुरड्या मिळतच नाही.

अकोल्याहून पुण्याला मी फडे घेऊन गेलो. एका फटक्यात गाळ निघून गेला. आमच्या वरचे शेजारी कुतुहलाने हातातील फड्याकडे बघत होते. मग मी तिथल्या लोकांना फडा कसा असतो ह्याची ओळख करुन दिली.

आमच्याघरी केरसुनी हा अलिकडला प्रकार घरी आलेला आहे. अकोल्यात आम्ही फडेच वापरतो. केरसुनीचे कण कण कित्येक दिवस खाली सांडत असतात. फडा घर अंगण ओटे ओसरी नाहणी सगळ्या घराची स्वच्छतेला उपयोगी पडतो. त्यातुलनेनी केरसुनी अगदी नाजूक आहे. खरटा फक्त पाने गोळा करायचा उपयोगी आहे. असो. फडा विकत घेऊन त्याची पुजा करुन घरात लक्ष्मी आली असे म्हणतात. पण फडा हा पुलिंगी आणि लक्ष्मी ही स्त्रिलिंगी. पण तरीही फड्याला जुन्या बायका लक्ष्मी माणतात. आपण नाही का संत ज्ञानेश्वराला माऊली म्हणत तसेच आहे आहे. पण बुद्धीमान लोकांना ह्यावर विश्वास बसणार नाही. अशावेळी अंधश्रद्धाळू होणे मला आवडते. फडा घेऊन घरदार लखलख झाले मी तन मन प्रसन्न होते. दरवेळी लक्ष्मी म्हणजे पैसा सोने हेच नव्हे. मनाची शांती ही सुद्धा लक्ष्मीचीच देण आहे. पण अगेन.. हे बुद्धीमान लोकांना पटणार नाही. त्यांचे असे आहे ना की. .बळी गेलेली बकरी ही श्रद्धेमुळे बळी गेली म्हणून आंकात असतो. आणि पोटात मांस गेले की ते अन्न म्हणून गेलेले त्यांना चालते. पण दोन्ही गोष्टीमुळे शेवटी एक जीव जातो ना.. असो. ही शेवटची दोन वाक्य विसंगत जरी तरी लिहावीशी वाटली म्हणून लिहिली. मनातील फड्यानी ती काढून टाका.

fadaa2.jpg

विषय: 
प्रकार: 

फडा हा शब्द पहिल्यांदा वाचतोय. पुर्वी मुंबईला मिळायची आमच्याकडे हिला झाडू म्हणायचे आता कित्येक वर्षात पाहण्यात आली नाही. आणि हो आताही केरसुणीला झाडूच म्हणतात. Happy

आमच्या ठाण्यात तर बर्याच ठिकाणी मिळतात ह्या झाडु पण तिला फडा म्हणतात हे आज समजले. आता तर बाजारात भरपुर आल्या असतील, दिवाळी जवळ आली ना!

आमच्याकडे साळुता म्हणतात. आणि साळुता वापरून वापरून त्याचे तंतू लहान होत जाऊन/ झडून जाऊन छोटासा उरतो तो मुडगा. जड माती वगैरे लोटण्यासाठी मुडगा वापरतात.

किती दिवसांनी हा शब्द ऐकला. छान लिहील आहे. Happy आमच्याकडे अंगण अन बाहेरचा ओटा वगैरे झाडायला फडा अन घराला केरसुणी वापरत.

छान माहिती.. कोल्हापूर भागातही असाच एक प्रकार असतो. ( बहुतेक साळुता म्हणतात त्याला ) शिवाय माझ्या आजोळी जात्याजवळचे पिठ गोळा करायला आणखी एक वेगळा प्रकार होता.

आपण शहरात बघतो तश्या नाजूक विरळ केरसुण्या ( आम्ही त्याला हिराचा झाडू म्हणतो ) कोकणात नसतात. तिथे त्या चांगल्या घट्ट बांधलेल्या आणि मजबूत असतात, पाला पाचोळाच नाही तर शेणही त्यांनी सहज साफ करता येते.

शहरातली नाजूक केरसुणी मात्र शहरातील घरे झाडण्याच्या कामाचीच. तू म्हणतोस तसे त्याचे कण कण घरभर सांडत राहतात. खास करून नवी असताना.

मस्कतमधे खजूराची मजबूत पाने एकत्र बांधून झाडू केलेला असे. त्याने रेतीत झाडले तर रेतीतला कचरा अलगद बाजूला होत असे.

साळुता म्हणतात.. झाडणी म्हणतात.

देवघर झाडायला व जाते जाडायला लहानन्झाडणी वापरतात.

छान लिहिले आहे! फडा शब्द नव्याने कळला! याचे मिनी व्हर्जन स्वयंपाकघरात आणि देवघरात असते. आमच्याकडे नारळाच्या पानांच्या शिरांपासून तयार केलेले (त्यांना हीर म्हणतात, आठवा, पु.लं. म्हैस न्हायतर हीर नाय मोडंल!) खराटे किंवा भुतारे वापरतात अंगण वै.झाडायला. माझे आजोबा स्वतः विळीवर बसून हीर काढत असत त्याची आठवण झाली!
बी, तुमच्या लेखांवर प्रतिक्रिया देताना आठवणींच्या देशी एक फेरी होते नेहमीच!

आपण शहरात बघतो तश्या नाजूक विरळ केरसुण्या ( आम्ही त्याला हिराचा झाडू म्हणतो ) कोकणात नसतात. तिथे त्या चांगल्या घट्ट बांधलेल्या आणि मजबूत असतात, >>>>> बांधणी खरंच देखणी+मजबूत असतात.

बी,
लेख मस्तच रे.

बी, लेख आवडला!

आम्ही या फडयाला 'केरसुणी' आणि केरसुणी ला 'कुंचा' म्हणतो!
पण तुला पुण्यात केरसुणी मिळाली नाही हे खरच आश्चर्य आहे! Happy

आमच्याकडे याला मोळ म्हणतात. पण याचा उपयोग जास्त करून ओसरी , देवघर वगैरे झाडायला ठिक आहे, अंगण झाडायला हीराचा खराटाच हवा. आमच्याकडे माड साफ केले की दोन तीन बायका येऊन झावळ्या घेऊन जातात आणि चांगले मजबूत खराटे बनवून देतात. खराटा बांधून त्याला सुतळी लावली की बायका एक पीळ देतात, ते बघायला फार मस्त वाटतं.

बी ने मन्डई नीट बघीतलीच नाही.:फिदी: बी खरच आमचे पुणे आता परत एकदा नीट निरखुन पालथे घाल. आम्ही याला केरसुणी पण म्हणतो. दिवाळीतच आणण्याची प्रथा आहे. तिला हळद -कुन्कु लावुन मग वापरायला सुरुवात करायची.

बी सुंदर लेख.

आम्ही ह्याला मुळोशीचा झाडू म्हणतो. डोंबिवलीत मिळतो.

कोकणात जास्त करून हिराचाच झाडू वापरतात आणि दिनेशदानी सांगितल्याप्रमाणे तो मजबूत असतो. आमच्याकडे तर पावसाळ्यात बाहेरची कामे नसतात तेव्हा हीर घरीच काढून घरीच हे झाडू करतात कारण नारळाची झाडं असल्याने आम्ही घरीच करतो ते खराटे. पूर्ण घर झाडायला तेच वापरतात. त्याला खराटा म्हणतात. मी गेले की विचारते केरसुणी नाही का? इथली सवय झालीय.

अवांतर पण नालासोपारा येथे मी राहायची तेव्हा नारळाचं झाड लावलं होतं आणि त्याचे हीर काढून मी खराटा घरी तयार केला होता.

आम्ही याला कुंचा म्हणतो. केरसुणी जरा मोठी आणि चपटी असते. लक्ष्मीपूजनात केरसुणीच वापरतो Happy
छान लेख!

वर्गात कोपर्‍यात अशा दोन झाडण्या असायच्या. रोज रोल नंबरप्रमाणे दोघानी मिळुन वर्ग झाडायचा.

Happy

आम्ही हे फडे बांबला बांधून घरातील जाळे काढायचो आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे वर्ग झाडायला सुद्धा असेच करायचो.

Pages