बुधी कॅम्प मध्ये सकाळचा चहा पिऊन आम्ही निघालो. सर्वच यात्री उत्साहात होते. फार तर १०० मिटर चाललो नाही की छियालेख चढाई लागते. ही एकूण चढाई ३ किमी आहे. त्या चढाईबद्दल आधी पासून ऐकले होते. तिची उंची गुगल अर्थ ११२०० फुट दाखवत आहे, पण जेंव्हा जीपीएस द्वारे मोजली तेंव्हा ती ११९०० फुट दाखवली होती.
३ जुलै बुधी ते गुंजी
एकुण अंतर १८ किमी (खरेतरे २० असावे)
बुधी १०३०० फुट
गुंजी १०५०० फुट
एलेवेशन गेन: ४४४५ फुट
एलेवेशन लॉस : ४२७६ फुट
आजचा रस्ता
आणि एलेवेशन
आजच्या एलेवेशन मॅप मध्ये अनेक तीव्र चढ उतार दिसतील. पण तरीही आज सकाळी ज्या एलेवेशन वरून निघणार होतो साधारण त्याच एलेवेशनला पोचणार होतो. एलेवेशन गेन (आणि लॉस) ऑलमोस्ट ४५०० फुट असणार होते. आज आमच्या ग्रूप मधी पायी चालणारे सर्व ( श्याम, पराग, भीम आणि मी) सोबत होतो.. चढाई करताना थोडेफार थकल्यासारखे नक्कीच वाटते. त्याचे कारण नंतर कळाले. आम्ही ऑलमोस्ट १२००० फुटांपर्यंत चढलो (वर गेल्यावर जी पी एस १२००० दाखवत होते.) आणि परत उतरलो. KMY प्रमाणे बुधी ८९०० फुट दाखविले आहे. पण गुगल अर्थ १०३०० दाखवत आहे. आणि KMY चे आकडे बर्यापैकी चुकीचे आहेत त्यामुळे मला तरी ते १०३०० बरोबर वाटते. आणि बुधी ८९०० असेल तर आम्ही आधी १२००० (छियालेख टॉप) पर्यंत जाऊन मग परत १०५०० ला आलो.
गप्पा मारत मारत आम्ही वर चढत असताना एकदा अचानक विश्रांतीसाठी थांबल्यावर असे दृष्य दिसले
तेथील एका खडकावर लिहिलेले "फुलोंकी घाटी"
छियालेख चढून आल्यावर जिथे टॉप आहे तिथेच नाश्त्याची सोय केली होती. तेंव्हा केवळ ६:४५ झाले होते. बरंच लवकर आल्यामुळे मग तिथे टंगळमंगळ केली. थोडे पुढे गेल्यावर इथे एक पोस्ट आहे. आता तुम्ही इनर लाईन मध्ये जाता, बॉन्ड्री पासून जवळ, म्हणून आमचे पासपोर्ट वर तपासन्यात आले आणि आमच्या नावाची इन्ट्री केली गेली.
तिथून थोडे पुढे आपण एका टेबलटॉप वर येतो. तेथील दृष्य इतके सुंदर आहे की बास !
ह्या फोटोत एकाचवेळी विविध कलर दिसत आहेत.
हा टेबल टॉप उतरून झाल्यावर लगेच गर्ब्यांग नावाचे गाव लागते. ह्या गावाचे वैशिष्ट्य असे आहे की ते " गाव सिंक" होत असल्यामुळे त्याला सिंकिंग व्हिलेज असेही म्हणतात. इथे अनेक हॉटेल होती आणि परागचा पोर्टर म्हणत होता की समोसा खाऊ, पण आम्ही काही वेळा पूर्वी जरा जास्तच खाल्ल्यामुळे इथे काही घेतलं नाही. ऑन हाईंडसाईट मला ते नंतर लक्षात आले की, "त्याला खायचा आहे, त्या निमित्ताने आम्ही बसलो तर त्याला विश्राम होईल आणि पैसेही आम्हीच देऊ" मग येताना आम्ही ही कसर भरून काढली आणि गर्ब्यांग मध्ये यथेच्छ ताव हाणला.
माझा पोर्टर संतो राम छियालेख चढून येई पर्यंत सोबत होता, तिथून पुढे जा असे म्हणाला आणि आलाच नाही. त्याची तब्येत बिघडली होती त्यामुळे तो परत सिरखाला त्याच्या गावी गेला. पण मला हे गुंजीला आल्यावरच कळाले. माझे सामान तसेही घोड्यावर होते आणि पोनी हँडलर गुमानसिंग पाठीमागून येत होता.
आम्ही गर्ब्यांग सोडून पुढे आल्यावर परत चेकिंग झाले. छियालेख झाल्यावर गुंजी पर्यंत मोस्टली स्ट्रेट रस्ता आहे. इतका की चालायला बोअर होतं. कारण वळणावळणाची आणि चढाची सवय झालेली असते.
ह्याच रस्त्याने नाविढांगपर्यंत छोटा कैलास म्हणजे आदि कैलासची यात्राही असते. जी लोकं ५ कैलासाला जाता त्यांना पंच कैलासी असे म्हणले जाते ( रादर तेच म्हणवून घेतात.) इतकावेळ मी कैलासी, कैलासी असे लिहितो आहे, मला वाटलं कोणी विचारेल की कैलासी म्हणजे काय? तर जी लोकं कैलासला जातात ती स्वतःला कैलासी म्हणवून घेऊ शकतात. ( सर्टीफाईड बाय लॉर्ड शिवा ! )
ह्या फोटोमध्ये मध्यभागी जो पर्वत दिसत आहे, तोच आदिकैलास !
आदिकैलासाचे आणखी एक दर्शन !
कुठल्यातरी गावी जेवण केले आणि पुढे निघालो. फ्लॅट, मोटारेबल रोडवर चालताना बोअर होत होते, तितक्यात आम्हाला आदिमाय आणि आदिबाप ह्यांनी निसर्ग निर्मिती कुठल्या ठिकाणी केली असेल ते ठिकाण, त्या बाणासहित दिसते आणि आम्ही परमोत्साहात तिथे निदान पाणी तरी पिऊ म्हणून थांबलो.
हेच ते ठिकाण ! अगदी दिलाचे चिन्ह आणि बाण पण ! शिवाय पाणी, डोंगर आणि दर्या. मग निर्मिती सुचली नसेल तरच नवल !
अजून खूप तंगडतोड केल्यावर शेवटी एकदाचा आम्हाला हा ब्रिज लागला. तो पार केला की कॅम्प असे सांगण्यात आले.
पण कसचे काय? तो पार केला की परत चढ ! मग तो पार केला आणि आम्ही गुंजी मुक्कामी पोचलो.
गुंजीपासून पुढे खूप जोरात हवा चालते. इतकी की डोंगरात पण विन्ड इरोजन मुळे शेप्स फॉर्म झाले आहेत.
कॅम्पवर आम्ही नेहमी प्रमाणे आधी पोचलो. तिथे एक मस्त रूम होती. आठ बेड आणि मुख्य म्हणजे बाथरूम, आणि संडास त्याच रूम मध्ये ! श्याम, भीम, मी आणि परागने इथे सामान ठेवलं न ठेवलं इतक्यात पार्वते आला. त्याला समाजोपयोगी काम करण्याची भारी हौस. प्रत्येक गोष्टीत नाक खूपसायची सवय ! मग त्याने फर्मावले की ही रूम आपण बायकांना देऊ. खरे तर गुंजी मध्ये दोन दिवस हॉल्ट असल्यामुळे नवराबायको एकत्र असलेल्यांना एकत्र राहायचे होते. पण पार्वतेने फनीला कन्विन्स केले. (फनी तितक्यातच पोचला होता.) आणि आमची रवानगी समोरर्या खोलीत झाली ! पुढे त्यातील अर्ध्या बायकांनी आम्हाला नवर्यासोबत न राहू देणारे तुम्ही कोण? असे म्हणून पार्वते आणि फनीला बोल दिले पण ही माणसं कोणाचं ऐकतील तर शपथ !
गुंजीत दोन रात्र राहावे लागते. दुसर्या दिवशी तिथे परत मेडिकल होत असतं. त्याचे टेन्शन परत आदल्या दिवशीपासूनच येते. रात्री गुंजीच्या ITBP ने भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. आमच्या पैकी मी आणि सौम्याने तिथे जाणे धुडकावून लावले. पराग मात्र जावे की नको ह्या द्वंदात होता कारण त्याला जायचे होते. तेथील भजनं पण निराळी असतात त्यामुळे त्याला ती ऐकायची होती. मग हो ना करता, उशीरा शेवटी आम्ही सर्वच जण तिथे गेलो. तेथील भजनं मला कंटाळवाणी वाटली. ( आम्ही जाईपर्यंत ITBP ची भजनं बहुदा संपली, आणि आमचेच वीर, महारथी लोक गळा शेकू लागले होते.) तेथील प्रसाद आणि जेवण मात्र उच्च होतं.
रात्री मग मस्त पैकी डिस्कशनला सुरूवात झाली. आणि खूप दिवसांनंतर राजकारणावर चांगली चर्चा झाली. थोड्यावेळाने चर्चा बदलून "गाण्या"वर आणली. मी मस्त पैकी सर्वांना "शक्ती" आणि रविशंकरचा "बैरागी" राग ऐकवला. तर त्यात मी आणि सौम्या सोडून सगळे बोअर झाले. सगळ्यांनी अरे हे काय "राग, राग" खेळत आहेत अशी आमची संभावना केली. त्यावर पराग ने उतारा म्हणून " चार बोटल व्होडका" गाणे आहे का? असे विचारले. अर्थात ते गाणे मला माहितीच नव्हते. पण मुन्नी बदनाम ते जसराजचे "श्याम मुरारी गिरीधारी" अशी रेंज माझ्याकडे होती. त्यावर श्याम तर म्हणालाही, की मै तेरा फोन फेक दुंगा ये कुछ भी गाणा बजायेगा तो !!
मग भीम ने अनेक प्रश्न विचारुन विद्ध करून सोडले. तो आमच्या ग्रूप मधील प्रश्नकर्ता होता. त्याला विविध वेळेस विविध प्रश्न पडायचे आणि त्याने प्रश्न विचारला की सगळे हहपुवा व्हायचे. रात्री मग उशीरापर्यंत जागून अनेक विषयांवर गप्पा मारताना बाजूच्या खोलीतून जोरदार टक टक ऐकू आली, आणि आवाजही आली की, भई, अब सो जाओ. मग आम्ही आवरते घेतले आणि उद्याच्या मेडिकल टेस्टची वाट पाहत झोपलो.
सकाळी उशीरा उठायचा विचार केला होता पण जाग आलीच. मग परत गप्पा. ८ वाजता सर्वांना वाखान्यासमोरील जागेत जमायचे होते. तिथे आम्ही वृक्षारोपनाचा कार्यक्रम केला व आपआपल्या "व्हर्डिक्टला" सज्ज झालो. माझा नं ४ असल्यामुळे मला लगेच बोलावले गेले. माझा बिपी आणि ऑक्सिजन लेव्हल पाहून, डॉक्टरांनी "अभिनंदन" केले व मी जाण्यास "पात्र" आहे असे तेथे अनऑफिशियली सांगीतले. अश्याच सर्वांच्या टेस्ट झाल्या. एक मि. डे म्हणून आमच्या सोबत होते, त्यांचा BP २१० होता ! दोनशे दहा ! त्यांना मग परत आराम करून यायला सांगीतले. आमच्या सोबत असणार्या डॉ. बाईचा BP पण हाय होता. पण दोघांनही नंतर परवानगी देण्यात आली. २१० असतानाही तो माणूस व्यवस्थित होता हे एक आश्चर्यच ! केवळ एक जण इथे गळाले आणि आम्ही ५१ चे ५० झालो.
गुंजीला ११ ते ५ मध्ये प्रचंड वारा असायचा. इतका ही त्या कॅम्प वर टाकलेल्या ताडपत्र्यांचा भयानक आवाज यायचा. दुपारी मस्त जेवण झाल्यावर बाकी झोपले. मी कुठे जायचे म्हणून गुंजी गावात गेलो. तर तिथे मला माझा पोनी हॅन्डलर गुमान सिंग भेटला. त्याने मग एका ठिकाणी नेऊन मला समोसे खाण्याचा आग्रह केला. जो मी स्विकारला. आम्ही काही समोसे खाल्ले. गप्पा मारल्या. मी परत कॅम्पवर आल्यावर एक तासाने अचानक आवाज ऐकु आले तर तिथे भांडण चालू झाली होती.
पोनी पोर्टर लोकांनी युनियन करून कॅम्पवर मोर्चा आणला कारण त्यांच्या कडे आउट परमिट नव्हते आणि ITBP त्यांना त्या परमिट शिवाय जाऊ देणार नव्हते. मग काय? जो गोंधळ झाला, होता होता मांडवली झाली आणि ITBP त्यांना आता जा, पण पुढच्या वेळी परमिट हवेच असे म्हणाली.
संध्याकाळी आम्ही (पराग, श्याम, भीम आणि मी) भटकायला बाहेर पडलो. परत आणखी एखादी टेकडी चढावी असा बेत होता तो लोकांनी हाणून पाडला. भीम अन पराग मागे फिरले. मी आणि श्याम ती पायवाट अर्धी तुडवून झाली असेल / नसेल तितक्यात थोडा थोडा पाऊस पडायला लागला. . मग आम्ही ही कॅम्प वर जाऊन चहाची काही सोय होते का ते बघितले. श्याम ने त्या किचन मध्ये एकाला पटवले व आम्हाला थोडा चहा मिळाला.
गुंजीला अन्नपूर्णा रेंजेस च्या आम्ही खूप जवळ आल्यामुळे रेंज मधील काही पिक दिसले
५ जुलै ! गुंजी ते कालापाणी ते नाभीढांग आजचा ट्रेक दोन भागात होता.
गुंजी ते कालापाणी ९ किमी
आणि कालापाणी ते नाभीढांग - ९ किमी.
गुंजी १०५०० फुट
नाभीढांग : १४०३८ फुट
एलेव्हेशन गेन : ४६५८ फुट
एले लॉस : १११८ फुट
आज गुंजीहून आम्ही भारतातल्या लास्ट कॅम्पवर जाणार होतो. तो म्हणजे नाभीढांग. इथे पार्वतीची नाभी आहे म्हणून त्या गावाचे नाव नाभीढांग. तसेच इथूनच ॐ पर्वत दिसतो. ॐ म्हणजे एका पर्वताचा आकारच (वरचा ॐ सारखा आहे) त्यात बर्फसाठला ( तो कधी नसतो? ) की ते पूर्ण ॐ दिसतं.
सकाळी जेंव्हा निघालो, तेंव्हा संतोराम नव्हता. गुमानने सांगितले की तो परत गेला. आता माझ्यासोबत पोर्टर नव्हता. केवळ पोनी. अर्थात आम्ही दोघेही घोड्यावर बसत नव्हतो. त्यामुळे आमचे सामान पोर्टर कडे नसायचे तर ते घोड्यावर बांधायचे. गुमान म्हणाला, की तोच सोबत असेल, पाणी वगैरे आणून द्यायला.
आम्ही सकाळी नेहमीसारखे निघालो तेंव्हा ११ वाजेपर्यंत नाभीढांग गाठायचे असे ठरवले होते कारण आज ॐ पर्वत दिसणार होता. त्यामुळे आम्ही थोडे स्पिडनेच निघालो.
गुंजीपासून ट्री लाईन नाहीशी होताना दिसते. कारण १०००० + फुटांवर विरळ ऑक्सिजनमुळे झाडं तग धरू शकत नाहीत. आता जे फोटो येतील ते बहुतांश ड्राय माउंटेन लाईनचे असणार.
कालापाणीला जाताना रस्त्यात पांडव पर्वत लागतात. एका मोठ्या पर्वत रांगेचे हे पाच शिखर म्हणून पांडव पर्वत. तसेच कालापाणी इथे काली नदीचा उगम आहे. आणि तिथेच व्यास गुफाही आहे. व्यास गुफेत बसून व्यासांनी महाभारत लिहिले अशी वंदता आहे.
आजचा मॅप
आणि आजचे एलेव्हेशन
आजचा रस्ता !
आणि हाच तो पांडव पर्वत
आज आम्ही कालीच्या अगदी पात्रातून पण चाललो. आज आमच्या सोबत सोबत पार्वते होता. कालीचे पात्र इथे तेवढे रौद्र नव्हते. पार्वतेला काय वाटले कुणास ठावूक, पण तो पात्रातून नदीत गेला, डोक्यावर पाणी मारून घेतले आणि परत आला.
व्यास गुफा ! चित्राच्या मध्यभागी जो गोलाकार आकार आहे तीच गुफा !
ही गुफा अचानक येते आणि दिसत नाही. आमच्यासोबत जे पार्वते अन इतर प्रभुती होते, ते पुढे गेले, त्यांना गुफा इथे आहे हे कळाले नाही. मग मंदीरात बसल्यावर आम्ही त्यांना सांगीतले की, गुफा तर पाठीमागेच राहीली.
कालापाणी मंदीर !
ह्या मंदीरातून काली नदीचा उगम आहे असे मानले जाते. इथे आम्ही मस्तपैकी दर्शन घेतले. एक शांत घनगंभीर तरीही हवी हवीशी वाटणारी शांतता तेथे आहे.
मंदीरापाशी आम्हाला मस्त भजी देण्यात आली. जबरदस्त स्वादिष्ट, वगैरे वगैरे. ( पण एकच प्लेट) आणि त्यासोबत चहा. फिर क्या कहने ! मौज्जा ही मौज्जा !
कालापाणीला तुमचा पासपोर्ट अन व्हिजा चेक होतो. इथे तुम्हाला पासपोर्टवर ठप्पा लावून देतात की तुम्ही आता डिसिम्बार्क झाला आहात. पण गंमत म्हणजे व्हिजा हा प्रत्येकाचा नसतो, तर सगळ्या बॅचचा मिळून एकच पेपर व्हिजा असतो. त्यामुळे चुकून तुम्ही बॅच बरोबर न जाता इकडे तिकडे भरकटलात की तुम्ही, "घर के ना घाट के" इथे बराच वेळ गेला.
कालापाणीहून पुढे नाभीढांग कडे जाताना ..
आजचा रस्ता
नाभिढांग कॅम्प हाच मुळी ॐ पर्वताजवळ आहे. अगदी रूम बाहेर आले की पर्वत दिसू शकतो. पण पूर्ण ढगाळ वातावरणामुळे हवे तसे दर्शन पूर्ण दिवस झाले नाही. तसेही दर्शन सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान होते. तेंव्हा ढग क्लिअर होतात असे सांगण्यात आले होते म्हणून आम्ही लवकर निघालो होतो. पण कालापाणी येथून सर्व यात्री एकत्रच जाऊ अशी टूम निघाल्यामूळे (कारण तिथे पासपोर्ट चेक होतो आणि तो तुम्हाला लगेच मिळत नाही तर सर्वांचा एकत्र मिळतो.) आम्हाला लवकर जाता आले नाही. आणि त्यामुळेच आम्हाला ॐ पर्वताचे विशेष दर्शन झाले नाही. तरी पण ..
आम्ही नाभिढांगला पोचलो तेंव्हा चांगलीच दुपार झाली होती. फार काही विशेष केले नाही. नेहमीप्रमाणेच गप्पा टप्पा मध्ये मुख्य विषय होता तोच मुळी, उद्या सकाळी आपण लिपूलेख ( ५५०० मिटर्स) पास क्रॉस करू आणि तिबेट मध्ये पोचू ! मग लिपू वर काय करायचे, उद्या किती लेयर्स घालायचे, किती वाजता निघायचे ह्याची चर्चा सुरू झाली.
उद्या काय होणार? कारण इथेही काही लोक रिजेक्ट होऊ शकतात असे सर्वांनी यात्रा सुरू झाल्यापासून सांगितले होते.
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग १
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग २
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ३
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ५
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ६
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ७
i am first
i am first
आहाहा, सुंदर प्रकाशचित्रे आणि
आहाहा, सुंदर प्रकाशचित्रे आणि वर्णनसुध्दा.
फुलोंकी घाटीची नुस्ती पाटीच दावलीत राव, फुलांचे फोटो कुठेत?
मस्तच. बाकी शब्दच नाही.
मस्तच. बाकी शब्दच नाही.
मस्त चाल्लय वर्णन! फोटो
मस्त चाल्लय वर्णन!
फोटो झक्कास! अजुन येउ द्या.
मस्तच वर्णन.. तुम्ही दोघांनी
मस्तच वर्णन..
तुम्ही दोघांनी एखाद्या गटग मधे स्लाईड शो करायला हवा.
सही.. तुझ्या सोबत आमचाही
सही.. तुझ्या सोबत आमचाही व्हर्चुअल ट्रेक चालू आहे. ॐ पर्वताने मात्र निराश केले..
अन्नपुर्णा रेंज एकदम भारी.. मला किन्नौर कैलाशची आठवण आली.
विन्ड इरोजन मुळे शेप्स फॉर्म झाले आहेत. >>> असे शेप्स सिप्ती मधेही बरेच दिसले.
मस्त चालली आहे यात्रा/ट्रेक
मस्त चालली आहे यात्रा/ट्रेक
'हाज'ला जाणारे 'हाजी' तसे 'कैलास'ला जाणारे 'कैलासी'.....मग आता काय? कैलासी केदार आणि कैलासी पराग?
पांडव पर्वत = पंचचुली?
मध्येच मोटरेबल रोड्स कसे लागतात? कुठून कुठे जातात ते?
पोर्टर संताराम आजारी पडल्यावर ट्रेक करतच सिरखाला गेला का? तुझ्या की परागच्या लेखात वाचलं की आजारी माणसांना हेलिकॉप्टर्स पण नेतात.
छान चाललंय वर्णन.
छान चाललंय वर्णन.
हो तो पायीच परत
हो तो पायीच परत गेला.
परागच्या लेखात वाचलं की आजारी माणसांना हेलिकॉप्टर्स पण नेतात. >> हो पण सिरियस केसेस ना. गुंजी ते धारचुला असे ११०० रु फक्त मध्ये नेले जाते.
नाही ते पंचचुली नाहीत. पंचचुली तिथून जवळच (किलोमिटरने ) असणार्या मुन्सियारी ठिकाणी आहेत. मुन्सियारी एक बेहतरीन जागा आहे. आणि ट्रेक ब्रिक अजिबात नाही.
मध्येच मोटरेबल रोड्स कसे लागतात? >> आपण आता लिपू पर्यंत रोड बनवत आहोत. जेणेकरून सैन्य आणि इतर सामान युद्धकाळात पटकन पोचवता येईल. सध्या तरी गाला नंतर आपल्या सैन्यालाही (ITBP) ट्रेक करतच जावे लागते. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. अजून काही वर्षात तिथेही अगदी चकचकीत रोड तयार होईल असे वाटते.
ॐ पर्वताने मात्र निराश केले.. >> खरयं. येतानाही निराशच केले. !
शेप्स सिप्ती मधेही बरेच दिसले. हो ड्राय माउंटेन रेंज मध्ये वारे खूप जोरात वाहते, त्यामुळे मनाली - लेह रोड वर पण अस शेप्स खूप दिसतात. (माझ्या त्या मालिकेत देखील काही फोटो आहेत.)
फुलांचे फोटो कुठेत? >> आम्ही तिथे पोचलो तेंव्हा सिझन नव्हता. तो एक महिन्यानंतर सुरू झाला. नंतरच्या काही बॅचेसचे फोटो पाहिले, तेंव्हा सुंदर फुलं दिसतात.
दिनेश , एनिटाईम.
मस्त!!
मस्त!!
मस्त. मीही फिरतेय सोबत.
मस्त. मीही फिरतेय सोबत.
ते ईलेवेशन वगैरे कसे दिलेत? मोबाईलची रेंज नव्हती असे आधल्या भागात लिहिलेले, मग जिपिएस, एलेवेशन वगैरे कसे काय जमवले??
जिपिएस फोन मध्ये रेंज
जिपिएस फोन मध्ये रेंज नसतानाही चालतो. डॉन कैलासी व सौम्या त्यांच्या फोन मधून आणि फनी कुमार स्पेशल .डिव्हाईस मधून रूट मॅप करत होते.
माझ्याकडे आयफोन असल्याकारणामुळे मी बॅटरीग्रस्त होतो. पण तरीही माझ्याकडे ऑफलाईन GPS डाउनलोड केले होते, त्यात को ऑर्डीनेटस आणि इतर माहिती कळते. पण मी इथे हे सर्व देताना गुगल अर्थचा वापर करतोय. त्यात एलेवेशन मॅप मिळतो.
ओके. कैलास मानसरोवर यात्रा
ओके.
कैलास मानसरोवर यात्रा ट्रेक म्हणुन करायची माझी खुप इच्छा आहे.
पण टिझर वाचल्यावर हा ट्रेक मला या जन्मात जमायचा नाही अशी भिती वाटायला लागली. आता हळूहळू पुढे जाताना कदाचित जमुही शकेल असे वाटतेय.. बघुया पुढे काय होते ते.
आपण आता लिपू पर्यंत रोड बनवत
आपण आता लिपू पर्यंत रोड बनवत आहोत. जेणेकरून सैन्य आणि इतर सामान युद्धकाळात पटकन पोचवता येईल. सध्या तरी गाला नंतर आपल्या सैन्यालाही (ITBP) ट्रेक करतच जावे लागते. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. अजून काही वर्षात तिथेही अगदी चकचकीत रोड तयार होईल असे वाटते.>>>> मला नेहमीच वाटतं की आपलं सैन्य काहीही करु शकतं.
नमस्कार केदार, सुंदर वर्णन
नमस्कार केदार, सुंदर वर्णन लिहिले आहे.
खुप काही तरी नेहेमीच्या आयुश्यात मिस करतोय ते जाणवतय. एक रिक्वेस्ट आहे, फोटो इकडेच नाही का टाकता येणार? इकडे पिकासाची लिंक अडवलेली आहे (office मधे) म्हणुन ;).
तितक्यात आम्हाला आदिमाय आणि
तितक्यात आम्हाला आदिमाय आणि आदिबाप ह्यांनी निसर्ग निर्मिती कुठल्या ठिकाणी केली असेल ते ठिकाण, त्या बाणासहित दिसते आणि आम्ही परमोत्साहात तिथे निदान पाणी तरी पिऊ म्हणून थांबलो.>> याबद्दल सविस्तर सांगा, एखादी दंतकथा वगैरे आहे का?
अप्रतिम..हा पण भाग एक नंबर
अप्रतिम..हा पण भाग एक नंबर झाला आहे.
छायाचित्रे तर दृष्ट लागण्यासारखी....
फुलोंकी घाटी आणि अन्नपूर्णा रेंजचे लई कापर....
अजून मोठ्या साईजमध्ये देता आले तर पहा ना....
आणि एक छोटीशी विनंती--- बॉर्डर फ्रेम फार जाड आहे. ती कमी करता येईल का. ईतका सुंदर निसर्ग असा बांधून ठेवल्यासारखा वाटतो अशा फ्रेम मध्ये...
आणि एक छोटीशी विनंती---
आणि एक छोटीशी विनंती--- बॉर्डर फ्रेम फार जाड आहे. ती कमी करता येईल का. ईतका सुंदर निसर्ग असा बांधून ठेवल्यासारखा वाटतो अशा फ्रेम मध्ये...>>> +१
फोटो इकडेच नाही का टाकता
फोटो इकडेच नाही का टाकता येणार? >> नाही कारण इथे १५० केबीचीच मर्यादा आहे. त्यामुळे दुसरीकडे अपलोड करावे लागतात. ती सोय इथे झाली तर नक्की इथेच टाकेन.
याबद्दल सविस्तर सांगा, एखादी दंतकथा वगैरे आहे का? >>. अगं नाही. हे ते दिल अन बाण नदीत दिसले म्हणून ते लिहिले आहे. त्याचा आणि अॅडम इव्हचा संबंध नाही.
मला नेहमीच वाटतं की आपलं सैन्य काहीही करु शकतं. >> ह्या बाबत दुमत नसलं तरी,चीन साईडने लिपू पासून दोन किमीवर एकदम टार रोड आहे. आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे सारखा, तो पण कैक वर्षांपासून ! आणि तोच पुढे काराकोरम हायवेला मिळतो. काराकोरम हायवे तर प्रसिद्ध आहे. (चीन - पाक) चीनच्या सीमा चीनला आपल्या सीमेपेक्षा जास्त अॅक्सेसेबल आहेत. आपण ह्या बाबतीत खूप मागे आहोत.
बॉर्डर फ्रेम फार जाड आहे. ती कमी करता येईल का. >> दुर्दैवाने लाईट रूम ने तशी केली आहे, अन्यथा मला परत ते तिथून एक्सपोर्ट करावे लागतील अन पिकासात एडिट करावे लागतील. अपलोड मोठ्या साईज मध्ये आहे.
पण पुढच्या टूरच्या वेळी लाइट रूमची फ्रेम नाही वापरणार.
अप्रतिम,
अप्रतिम,
अप्रतिम फोटो नि वर्णन ..
अप्रतिम फोटो नि वर्णन ..
मस्त फोटोज आणि वर्णन !
मस्त फोटोज आणि वर्णन !
झकास हा पण भाग.
झकास हा पण भाग.
मस्त!
मस्त!
अप्रतीम फोटो.
अप्रतीम फोटो.
मस्त. हाही भाग खूप आवडला.
मस्त. हाही भाग खूप आवडला.
छान चालली आहे मालिका...
छान चालली आहे मालिका...
तुझ्या वर्णनात बारीकसारीक तांत्रिक डीटेल्स, to-the-point मुद्दे हे अधिक आहेत, तर परागचं वर्णन एकदम ऐसपैस, अलकट-पलकट मारून गप्पा मारल्यासारखं... दोन्हींची आपापली मजा खासच!
(दोघांच्या व्यक्तीमत्त्वांतही असाच फरक असावा काय? असा विचार आला मनात... )
मस्त .. फोटो अप्रतिम! वाचायला
मस्त .. फोटो अप्रतिम! वाचायला खुप आवडत आहे ..
एकदम भारी तात्या ! तुझ्या
एकदम भारी तात्या !
तुझ्या वर्णनात बारीकसारीक तांत्रिक डीटेल्स, to-the-point मुद्दे हे अधिक आहेत, तर परागचं वर्णन एकदम ऐसपैस, अलकट-पलकट मारून गप्पा मारल्यासारखं. >> +१
सुंदर.
सुंदर.