हा चित्रपट मी खुप आधी दुरदर्शनवर पाहिला होता एका पावसाळी शनिवारी, काल असाच एक शनिवार होता अन मुख्य म्हणजे मी बंगालात होतो, तेव्हा हा नितांतसुन्दर प्लॉट परत आठवला, मी हा प्रयत्न फ़क्त त्या कलाकृतीच्या आठवणी जागवायच्या म्हणुन करतोय, पात्रांची नावे, अभिनेत्यांची नावे, अगदी फ़िल्म चे नाव हि मला आठवत नाहिए पण कथा पुसटशी आठवते आहे, तिची मागे केलेल्या “बुल दे सुफ़” अन “ दगडाच्या सुप सारखी ही एक भावनिक पुनर्बांधणी, कशी वाटते नक्की सांगा”
तोतोल चा पुल : एका बंगाली चित्रपटाची कथा, भावांतरीत
पुर्व बंगालात “बिक्रमपुर” नावाचा जिल्हा आहे, आता तिथे बांग्लादेश आहे, मेघना अन पद्मा नद्यांच्या दोआबात वसलेला हा जिल्हा आहे अन इथे इतर ही छोट्या छोट्या पुष्कळ नद्या आहेत, अश्याच एका कालिंदी नावाच्या छोट्या नदीतिरी वसलेल्या कालिपुर गावात घडलेली ही एक गोष्ट आहे. गाव तसा छोटेखानीच जास्त पसारा नव्ह्ता गावचा, एक काली मंदिर त्याच्याच ओसरीत भरणारी प्रार्थमिक शाळा, अन मंदिराच्याच खोलीत पुजारी चट्टोपाध्याय सोबत राहणारे मास्टर बिभुती डे ह्यांना सगळे गाव “मास्टर बाबू” म्हणत असे, पहिली ते पाचवी अशी ही शाळा मास्टर बाबू स्वतः सांभाळत असत. गावचे तसे बरे होते, गरजे पुरता घमघमाट सुटणारा अरवा तांदुळ पिके, कालिंदी मधे जाळे फ़ेकता गरजेपुरती मासळी पण मिळत असे, रोहु कतला वाम इत्यादी भरपुर मासे होते कालिंदीच्या पोटी, सकाळ संध्याकाळ घंटेचा मधुर स्वर गावाला पावित्र्य देत असे. खड्या आवाजात परवचे म्हणणारी मुले गावाच्या भविष्याची ग्वाही देत असत.
अश्या ह्या शांत अन कथेत शोभेल अश्या सुंदर गावाला एकच त्रास होता, गावाच्या पुर्वेला, उत्तरेला अन दक्षिणेला शिवार, शिवारापलिकडे तीनही दिशांना दाट जंगल होते, कलकत्याला जाणारा मुख्य लोहमार्ग अन महामार्ग होते पश्चिमेला अन मधेच वाहायची ती कालिंदी, कालिंदी वर पुल नव्ह्ता तशी कालिंदी जास्त खोल किंवा धोकादायक नव्ह्ती लोकं तर सुकी धोतरे सुतळीने डोईवर बांधुन नदीपल्याड जात अन तिकडे तेच धोतर परिधान करुन कामावर जात, अन बाकी गावात एकच नावाडी होता , त्याचे नाव होते बिभास मंडल, त्याला सगळे प्रेमाने “बि्भा दा” म्हणत असत, साधारण ६२ वर्षांचा बिभा दा हा विधुर होता, तसेच त्याचे मुलगा अन सुन ही कॉलरा ने निवर्तले होते, आपल्या नदी किनारच्या खोपटीत बिभा दा, अन त्याचा नातु तोतोल राहात असत, तोतोल काही त्याचे खरे नाव नव्ह्ते तर बंगाली पद्धतीने ठेवलेले डाकनाम उर्फ़ टोपणनाव होते, खरे कोणाला आठवायचे ही नाही!!! सगळा गाव त्याला तोतोल म्हणुनच ओळखत असे, त्याचे मित्र बिभा दा ला “तोतोल चे दादाभाई” असे ओळखत असत, लांब वाश्याने नाव रेटता रेटता बिभा दा कितीतरी वेळा प्रवासी मंडळीस कौतुकाने तोतोल कसा कविता पाठ करतो, त्याला आपण कलेक्टर कसे बनवणार हे सांगत असे, सातआठ वर्षाचे ते निरागस पोरच बिभा दा च्या जगण्याचे कारण होते. प्रवासी नेणे आणणे ह्यात बिभा दा ला खुप घबाड होते असे नाही पण तांदुळ, तेल , मीठ, डाळ, मसाला इत्यादी मिळत , कलकत्याहुन आलेल्या जीवन बसु वाण्याच्या गोणी अलिकडे आणल्यावर. मासळी तर घरापुढे लागेल तितकी होतीच. असाच एक दिवस सकाळ सकाळ कौशिक पाल धावत आला होता अन बिभादा चे दार जोरजोरात वाजवत होता…
“बिभादा, दार उघडा जल्दी करा बिभादा”
“कोण रे कोण आहे तो?? “ बिभा दा ने झोपेतच विचारले,
“दादा मी कौशिक पाल, अहो माझ्या पत्नीस फ़ार बरे नाहीए हो”
तशी बिभादा झटकन उठला , तोतोल ला उठवले अन दार उघडले
“काय झाले पाल मोसाय??”
“अहो माझी कादंबिनी घेरी येऊन पडली , वैद्य म्हणाला कलकत्याच्या डॉक्टर शिवाय पर्याय नाही, जल्दी करा नाव काढा मला पलिकडे सोडा”
बिभादा जोरात ओरडला “तोतोल बाळा बाहेर ओढलेली नाव आत लोट अन वासा तयार ठेव, कौशिक घाबरु नकोस पोरीला काही होणार नाही, तु अन मी तिला झोळी करुन इथवर आणु तु शेजारच्या सेन काकांना उठव अन सोबत घे त्यांना कलकत्याची पुर्ण महिती आहे, चल जल्दी कर”
एव्हाना कौशिक डोळे पुसत बिभादा च्या मागे धावला होता, अन साताआठ वर्षांचा तोतोल जीव लावुन ती त्याच्यासाठी मोठी असलेली नाव पाण्यात लोटायच्या उद्योगाला लागला होता, दहा मिनिटात बिभा दा , कौशिक ,सेन काका अन सेन काकांचा मुलगा परितोष चौघे कादंबिनीस घेऊन आले होते, सगळे झटकन नावेत बसले तसे बिभा दा म्हणाला,
“तोतोल डब्यात भात ठेवला आहे अन इलिश पण मी नाही आलो तर जेवुन शाळेत जा अन मास्टर बाबुं ना पण सांग दादाभाई कलकत्याला गेलेत म्हणुन, आत्ता कडी लाऊन झोप तु आत” आजारी कादंबिनी मासी पाहुन उदास झालेल्या तोतोल ने फ़क्त मान डोलवली अन माघारी वळला.
एव्हाना सकाळ झाली होती, तोतोल स्वतःच उठला, त्याने आन्हिके आटोपली अन डब्यातला भात थोडा मासळी सोबत खाल्ला, खाकी दप्तर टांगले अन शाळेत पोचला, हळुच तो ४थी च्या मुलांस गणिते घालणार मास्टर बाबूंच्या पाठीमागे जाऊन उभा राहीला, त्यांना तसे जाणवताच ते मागे वळले पाहीले ते काळेभोर टपोरे डोळे अन पिंगट केस असलेला गोंडस तोतोल उभा होता,
“ह्म्म्म तोतोल महाशय कलेक्टर व्हायचे आहे न आपण दादाभाईंसाठी तुझ्या? मग असा अभ्यास सोडुन माझ्या मागे फ़िरुन का होणार आहेस बाळा ?”
“ते म्हणजे मास्टरबाबू, दादाभाई कलकत्याला ला गेलेत, कादंबिनी मासी ला बरे नाही न म्हणुन कौशिक काका, सेन आजोबा, परितोष दा सोबत आहेत, ते म्हणाले होते मास्टर बाबूंस सांग म्हणुन आलो”
“अरे!!! परवा तर हसरी नाचरी होती ती पोर!! काय असे झाले अचानक देव जाणे, असो!!! ते लोकं परततील त्यानंतर मी तिच्या आरामाची सोय करुन ठेवेल हो वैद्य महाराज सोबतीला घेऊन, बरे झाले मला सांगितलेस तु बाळा, अन हो संध्याकाळपर्यंत ती मंडळी येणार नाहीत , तेव्हा दुपारी तु माझ्याच सोबत जेव हो तोतोल” असे फ़र्मान सुटले
मान डोलवत तोतोल आपल्याजागी परतला अन कविता अभ्यासु लागला. मधल्या सुटीत मास्टर बाबू नी कौशिक च्या घरची चावी घेऊन त्याच्या घरी एक बेड तयार केले, सोबत आलेल्या वैद्य महाराजांनी शक्तिवर्धक काढे बनवुन ठेवले अन ते येणा-या लोकांची वाट पाहु लागले. शाळा पाचवीतल्या शिशिर दास च्या हवाली करुन, शिशिर सगळ्यांना गप बसवत अभ्यास घेऊ लागला तेव्हाच ते निघाले होते. संध्याकाळी ५ च्या सुमारास नाव परतताना दिसली कौशिक च्या आधाराने कादंबिनी झोळीत बसली तसे सगळ्यांनी तिच्या घरी गर्दी केली,
“डॉक्टर बोललेत थोडा अशक्तपणा आहे तेव्हा आराम करायला पहिजे” असे कौशिक बोलल्यावर सगळी मंडळी पांगली, त्याला काढा कुठे ठेवला आहे त्याचे जेवण कुठे ठेवले आहे हे सांगुन वैद्य महाराज, बिभादा अन मास्टर बाबू परत निघाले, काली मंदिर च्या आधीच वैद्यबुवा घरी गेले अन बोलत बोलत उरलेले दोघे मंदिर/शाळे पाशी आले. तोतोल दादाभाई पाहताच आनंदाने उड्या मारत आला अन त्यांचा हात धरला.
“ तर मी काय म्हणत होतो बिभा दा, उद्या तु मला सकाळी आठ ला पलिकडे ने, एरवी मी पोहत गेलो असतो धोतर डोई वर बांधुन, पण उद्या काही कागद्पत्रे आहेत सोबत तर तु हवासच!!! नाही का ?”
“हो बाबू मोसाय, तुम्ही या”
सकाळी तोतोल शाळेसाठी तयार झाला तसे मास्टरबाबू घरा बाहेर उभे होते, “तोतोल, नीट रहा, शिशिर दा सांगेल तसा अभ्यास कर, दंगा करु नको, मी संध्याकाळ पर्यंत येतो हो” असे ते म्हणाले, तोतोल शाळेला उड्या मारत निघाला तसे बिभादा ने नाव पाण्यात लोटली होती.
नाव पाण्यात रेटत, त्याने मास्टरबाबुंस विचारले
“आज काही विशेष आहे का बाबू ? नाही धोती पण आज खळ मारलेली आहे तुमची” चाचरत तो बोलला
“अरे बिभा दा, खास माझ्यासाठीच नाही गावासाठी होईल जर आज काम झाले तर, मी कलकत्याला कमिश्नर साहेबांकडे चाललो आहे, आपल्या गावात कालिंदीवर पुल बांधावा असा अर्ज घेऊन”
ते ऐकताच, बिभादा ला एकदम शक्तिपात होऊन घेरी आल्या सारखेच झाले, डोळ्यासमोर रोजगार जाताना अन त्याला कारणीभुत कागद आपल्या नावेतुन जात आहेत हे ध्यानी येताच, त्याला एकदम तोतोल चा चेहेरा दिसला, पण तो शांत होता, संभाषण बंद करुन त्याने नाव रेटण्यात जोर लावल्याचे मास्टर बाबूंच्या नजरेतुन सुटले नव्ह्ते
“बिभादा, मला माहिती आहे रे की तुझ्या पोटावर गदा येईल ह्याने, पण गावासाठी हे गरजेचे नाही का ??”
“नाही नाही बाबू मोसाय, मी कसे ही करेन तडजोड पण गावाचे भले होऊ देत”
तसे मास्टर बाबू स्मित करत म्हणाले, “ बघु तुला काय काय मदत करता येईल ते करु”
“बाबू मोसाय, मला पुलाचाच चौकीदार करायला सांगा न साहेबांस, नाही गावचे भले व्हावे हे मला पण मनापासुन वाटते, पण मग तोतोल च्या शिक्षणाचे काय ? त्याला खायला काय घालु?” डोळ्यात अजीजी आणुन बिभा दा विचारत होता………..
तीन चार महिने अशीच सव्यपसव्यं, हेलपाटे, दहाप्रकारची कागदपत्रे देऊन झाली तरी काही हालचाल होत नव्ह्ती अन आला तो दिवस सुखाचा म्हणत बिभादा कसाबसा ढकलत होता, अश्यातच एक दिवस सकाळी सातलाच मास्टरबाबू आले, बिभादा चल पटकन, पलिकडे आज इंजिनियर लोकं येणार आहेत त्यांना इकडे घेऊन यायचे आहे , लगुडाघात झाल्यासारखे झाले बिभादा ला पण त्याने नाव लोटली, पलिकडे चार माणसे कसली कसली उपकरणे काळे चष्मे अन डोक्यावर पिवळी शिरस्त्राणे घेऊन उभी होती ती घेऊन परत आला तसे बिभादा घरात आला, समोर भात अन डाळ होते पण त्याची खायची इच्छाच झाली नाही, थोड्या वेळाने मास्टरबाबू अन ती माणसे परत आली, तसे नावेत बसल्या बसल्या त्यांचे संभाषण सुरु झाले
“मी काय म्हणतो बिभुती बाबू, आपण लगेच काम सुरु करु शकतो, पण तुम्ही तो तुमचा लोखंडी पुलाचा आग्रह सोडला पाहीजे, आपण मजबुत बर्मा टीक च्या बल्ल्यांचा पाया घेऊ न , पुल मजबुत असेल अगदी ट्रक जाण्या इतपत, मी हमी देतो, “
“ह्म्म्म, लोखंडी पुलास वेळ लागेल हा तुमचा तर्क तर बरोबर आहे श्रीयुत श्रीवास्तव साहेब, ठीक आहे, पुल बांधा लाकडीच”
दोनच दिवसांनी मोठाल्या बल्या, त्यांना मारायची लोखंडी रिविटे, शिसे इत्यादी सामान गावापलिकडे येऊन पडले, नाही म्हणले तरी पुल बांधायला दोन महिने जाणार होते, अन ते तरी काढू म्हणत बिभा दा कसा बसा नाव रेटत होता, ह्या सगळ्याच्या पलिकडे निरागस तोतोल सुद्धा त्याच्या वर्गमित्रांसारखा आनंदी होता अन शाळा संपली की तो पुलाचे काम बघायला जात असे.
पुलाचे काम संपले तो मे महिन्याचा शेवट होता, कालवैशाखी ची वादळे अन धो धो पाऊस यायचे दिवस ते, अश्यातच एक दिवस धुरळा उडवत मंत्री महोदयांची गाडी आली अन रिबिन कापुन पुलाचे उद्घाटन करुन गेली, आता बैलगाड्या छोटे ट्रक हे थेट गावात येत असत, जीवन बसु वाण्याच्या ही गोणी तश्याच येऊ लागल्या होत्या, अजुन बिभादा ला चौकीदारी मिळाल्याची खबर नव्हती, दोन तीन वेळा त्याने मास्टर बाबूंनी सरकारात चौकशी केली होती, पण दर वेळी उडवा उडवी चीच उत्तरे आली होती, टणक दिसणारा बिभादा आजकाल का काय महिती पण पुर्ण कमजोर होत चालल्याचे मास्टर बाबुंस पण जाणवत होते पण ते ही हतबल झाले होते. घरात तांदुळ होते पण पुढे काय एक वर्षात तांदुळ संपतील मग काय ? हा प्रश्न बिभादा ला छळत होता.
असाच, एक मंगळवार उगवला, आता नावेची गरज कोणालाच नव्ह्ती, रात्रभर तळमळत विचार करणा-या बिभादा ला पहाटे पहाटे झोप लागली होती तो अंमळ उशीराच उठला, तेव्हा तोतोल शाळेत जायला तयार झाला होता अन त्याच्या उश्याशी बसुन त्याचे चेह-यावरुन ते मायाळु पोर हात फ़िरवत होते
“दादाभाई तुम्हाला बरं नाहीए का ??”
“नाही बाळ, सहज झोपलो होतो……..” निग्रहाने उमाळा दाबत बिभादा बोलला, “तुझ्यासाठी भात उकडुन ठेवला आहे अन कमळकाकडीची भाजी करुन ठेवली आहे मी रात्रीच न्याहारी केलीस ?”
तसे मान डोलवत तोतोल शाळेत पळाला अन घरात बिभादा रडायला लागला होता. संध्याकाळी हल्ली निरागस तोतोल ने नवा कार्यक्रम सुरु केला होता, शाळेतुन आला की तो आग्रह करकरुन बिभादा ला पुलावर यायला भाग पाडायचा मग धावत पुलाच्या दुसर्या बाजुला जायचा, मग बिभादा ने ओरडायचे
“१…….२……….३ssssss”
की तोतोल धावत यायचा अन दु:खाचे कड रिचवत बिभादा त्याला कडेवर उचलुन घेत लाडाने पापा घ्यायचा. त्याच मंगळवारी संध्याकाळी मास्टरबाबू पण आले होते तोतोल सोबत शाळा संपल्यावर घरी
“मी खुप बोलणे लावले बिभादा, पण अजुन काही सुनवाई नाही, मी इंजिनियर साहेबांशी पण बोललो ते म्हणाले आहेत तुला काम मिळेल पण थोडा वेळ लागेल, मला फ़ार अपराधी भाव दाटुन येतो आहे बिभादा…..”
“अहो गावाचे भले झाले ना बास!!!! मला काय मी पिकलं पान, ह्या पोराचे भविष्यच फ़क्त चिंतेचे कारण, हां तोतोलsssssss १……..२……….३sssssssssssssssss”
धावत येणारे ते पोर पाहताच मास्टर बाबुंचे डोळे पाणावले अन निश्चयाने ते बोलले
“मी तुझ्यासाठी अन तोतोल साठी काहीतरी करेनच दा” म्हणुन ते झटकन वळले तेव्हा विमनस्क असा बिभादा तोतोल ला गुदगुल्या करत हसवत होता.
रात्री नेहेमी प्रमाणे झोपे ने बिभादा शी असहकार पुकारला होता. इतकेच काय त्याच्या मनाची स्थिती नेमकी दर्शवणारे कालवैशाखी चे घोघावते वादळ अन टपटप टपोरे थेंब पण बरसायला सुरुवात झाली होती, आगतिक झालेला दा कुशीवर वळला तसे शेजारी शांत पहुडलेला तोतोल दिसला, तसे कडेलोट झाल्यासारखा बिभादा उठुन बसला, छाती धपापत होती त्याची, तो तसाच हळुच उठला, दार सावकाश लोटत बाहेर आला, ओसरीच्या सांदडीत ठेवलेली कु-हाड त्याने हळुच घेतली अन अंधारात घुमत घुमत चालत सुटला. पुढे पुढे अजुन पुढे अंधार चालवत असल्यागत बिभादा पोचला खाली उतरु लागला पंजे चवडे, घोटे करता करता पोटरीभर पाण्यात उतरला तो समोर पुलाची जाडजुड लाकडी बल्ली होती त्यावर दातओठ खात त्याने एक कु-हाडीचा रट्टा हाणला, त्या बल्लीला त्याने काहीच फ़रक पडणार नव्हता अलबत काही बारीक झिलप्या पडल्या, ती बल्ली एकाएक खदाखदा हसल्याचा भास झाला दा ला, त्याने अजुन एक रट्टा घातला मग तीन चार पाच……….. सहावा रट्टा घालायला त्याने कु-हाड उचलली अन मागुन एक बालध्वनी उमटला…..
“दादाभाईsssssss काय करताय तुम्ही, दादाभाई काय झाले, बरे नाही का दादाभाई तुम्हाला” तसे खुनशी रक्त डोळ्यात उतरलेला बिभादा मागे वळला, तो समोर तोतोल उभा होता, अविश्वास डोळ्यात भरलेला, जणु आपल्या आज्याच्या चांगुलपणाला रागाच्या चिखलात हात घालुन शोधत असलेला…… त्याला पाहताच बिभादा हेलपाटला, कु-हाड हातुन गळुन पडली अन पायतला जोरच निघुन गेला, धडपडत त्याने त्याच बल्लीला पाठ टेकवली अन शुन्यात नजर लाऊन मटकन पोटरीभर पाण्यातच बसला….. एव्हाना तोतोल कालिमंदिराच्या दिशेने धावत सुटला होता हे बघायचे ही भान त्या शक्तिपात झालेल्या वृद्धास उरले नव्ह्ते, हे सगळे कमी म्हणुन की काय वीज चमकुन बिभा दा चे अश्रुच आभाळातुन धो धो कोसळायला लागले अन त्यालाच भिजवुन ठेवले, चांगुलपणाने परत एकदा त्याचा ताबा घेतला अन असहाय्य असा तो म्हातारा ढसाढसा रडायला लागला.
काही वेळाने त्याने मंदिरा कडे पाहीले अन बल्लीलाच पाठ टेकवुन उभा राहीला, तसे धावत येणारे मास्टरबाबू अन तोतोल दिसले, समोर येताच मास्टर बाबूंची नजर त्या कु-हाडी वर पडली अन बिभादा भकास नजरेने जणु त्यांना आपल्या फ़ाटक्या नशिबाचा जाब विचारायला लागले. चिंब भिजुनही दोघांच्या डोळ्यातले अश्रु वेगळे दिसत होते, उदासपणाचा रंग होता त्या आसवांत, मळभ दाटुनच बसले होते, अन अंधा-या ओल्या राती आपले परमप्रिय गुरुजी अन आजोबा का रडतायत हे न कळलेला तोतोल डोळे मोठे करुन निरागसपणा उधळत होता………
(लेखनसीमा/ भावसीमा) बाप्या
खूप मस्त लिहिलंय, आवडले,
खूप मस्त लिहिलंय, आवडले, काही प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहीले
छान करुन दिली आहे ओळख. सगळं
छान करुन दिली आहे ओळख. सगळं काही जणू नजरेसमोर उभं झालं ...:-)
छान कथा-पटकथा आहे सिनेमाची.
छान कथा-पटकथा आहे सिनेमाची. आणि तुम्हीही तितकीच छान ती लिहिलीय. वाचताना डोळ्यासमोर उभा राहीला चित्रपट. मध्यावर आल्यावर शेवट काय असेल हे समजून गेले पण जर तितक्याच ताकदीचा अभिनय आणि दिग्दर्शन झाले असेल तर नक्कीच एक छान कलाकृती असावी.
मस्त लिहलयं..
मस्त लिहलयं..
मी वैयक्तिक दिवाना आहे ह
मी वैयक्तिक दिवाना आहे ह
छान
छान
छान कथा-पटकथा आहे सिनेमाची.
छान कथा-पटकथा आहे सिनेमाची. आणि तुम्हीही तितकीच छान ती लिहिलीय >> +१
आवडली..
छान करुन दिली आहे ओळख. सगळं
छान करुन दिली आहे ओळख. सगळं काही जणू नजरेसमोर उभं झालं ... >>> +१००
खूप आवडली..
खूप आवडली..
मस्त लिहिलय प्रगती कधी मुळावर
मस्त लिहिलय
प्रगती कधी मुळावर येते समजत नाही
हे वाचून व्यंकटेश माडगूळकर यांच्या एका कथेची आठवण झाली
नाव आठवत नाही आता
गावात आलेल्या एका प्रवासी वाहतूक यंत्रामुळे एका घराचा कसा नाश होत्तो अस काहीस सूत्र आहे
नया दौर आवडले लिखाण आणि
नया दौर
आवडले लिखाण आणि सिनेमा. भावस्पर्शी !
सुरेखच!
सुरेखच!
सुरेख कथा.
सुरेख कथा.
सगळ्यांचे मनापासुन आभार
सगळ्यांचे मनापासुन आभार मंड़ळी
लेखन आवडले. जरा शोधून
लेखन आवडले. जरा शोधून चित्रपटाचे नाव सांगेल का़ कोणी?
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
"उदासपणाचा रंग होता त्या
"उदासपणाचा रंग होता त्या आसवांत..." ~ बस्स, सारे सारच जणू उतरले ह्या एवढ्याशा वाक्यात. अन्य रंग फिकेच त्या आसवांपुढे. बिभादा आणि तोतोल दोन्ही चित्रे अशी काही उभी केली आहेत कथाकाराने की भोवतालची सारी स्थितीच आपला पट खुलविते आहे वाचकासमोर.
फार सुंदर लिखाण झाले आहे सोन्याबापू.....
चित्रपटाचे नाव मीच वेड्यागत
चित्रपटाचे नाव मीच वेड्यागत शोधायचा प्रयत्न कर्तोय जमेचना
चैत्राली आभार
अशोक जी, सहज सुचत गेले ते झर झर टंकत गेलो, हे सगळे एकटाकी आहे एक्स्टेंपोरेट
सहज सुचलेलेच इतके निखळ सुंदर
सहज सुचलेलेच इतके निखळ सुंदर होऊन जाते....त्याला अन्य कोणत्याही कलाकुसरीची आवश्यकता भासत नाही. बाकी मी प्रतिसाद दिल्यापासून तुमच्या मनी असलेला हा बंगाली चित्रपट शोधत आहेच. प्रयत्न करणेदेखील सुखकारक वाटत आहे मला.
"तोतोल" नाव कळीचा मुद्दा ठरू शकेल शोधासाठी.
खूप सुंदर.... चित्र
खूप सुंदर.... चित्र डोळ्यासमोर उभं करणारी कथा... न कळत डोळ्याच्या कडा ओलावून गेली...
वाह...तरल आहे प्रेमचंद
वाह...तरल आहे
प्रेमचंद ह्यांच्यासरखी शैली आहे
अतिशय सुंदर.. फारच आवडली.
अतिशय सुंदर.. फारच आवडली.
खूपच सुंदर कथा... आवडली.
खूपच सुंदर कथा... आवडली.
छान आहे. आवडली. तोतोल - कसलं
छान आहे. आवडली.
तोतोल - कसलं गोड नाव आहे
होय..."तोतोल" ऐकताना अगदी गोड
होय..."तोतोल" ऐकताना अगदी गोड वाटावे असेच नाव.
बंगाली नावे खरीच अशीच असतात. सत्यजित रे यांच्या "सीमाबद्ध" चित्रपटात शर्मिला टागोरचे नाव असते "टुटुल". तिची बहीण (हिचेही नाव असेच गोड...."दोलोन") जेव्हा टुटुलला हाक मारते त्यावेळी ते ऐकतानाच किती सुंदर आहे हे नाव असेच वाटत राहाते.
मामा, खरच गोड गोड नावं आहेत
मामा, खरच गोड गोड नावं आहेत ही.
बाकी प्रत्येक विषयावर तुमच्याकडे काहीतरी नविन सांगण्यासारखे असते
सुरेख!
सुरेख!
नताशा....धन्यवाद का कोण
नताशा....धन्यवाद
का कोण जाणे....मला तर बंगाली चित्रपट पाहाताना....वा त्या संदर्भात काही वाचन करताना त्यातील पात्रांच्या नावाकडे चटदिशी लक्ष जाते. नाव वाचताक्षणीच मनी अक्षरशः पालवीच फुटते आनंदाची. सोन्याबापू यानी लेखात दोन नद्यांचा उल्लेख केला आहे...मेघना आणि पद्मा....नद्या आहेत ह्या...तरीही नावे वाचताच त्या नद्यांची शांतताच जाणवते प्रथमतः, नावांमुळे.
"पारूल" हे देखील असेच एक फुलोर्याचे नाव. पारूल घोष या गायिकेचे (पन्नालाल घोष यांच्या पत्नी) "पपीहा रे..." हे गाणे ऐक कधीतरी, नताशा....हेच गाणे लतादिदीनी पारूलला श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे....तेही तितकेच भारून टाकणारे आहे.
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.
मस्त लिहिलेय. बंगाली
मस्त लिहिलेय. बंगाली नावांबद्दल अनुमोदन.
Pages