नुकतेच श्याम मनोहर यांचे "शंभर मी" हे पुस्तक वाचले. इतके दिवस पेपरमध्ये त्यावर आधारित कार्यक्रमाची जाहिरात बघायचे आणि कधी जाऊन बघावं वाटायचं. पण सहसा असे कार्यक्रम लांब आणि संध्याकाळी उशिरा असल्याने जाणं झालं नाही. पुस्तकाबद्दलच्या माझ्या भावना संमिश्र आहेत. सुसंगत, आदि-मध्य-अंत असलेल्या कथा किवा लेख वाचायची सवय असल्याने हा प्रकार नवीन वाटला. नाविन्यामुळे वाचत राहावं वाटलं. पण तरीही अर्धवट वाटतंय. प्रत्येक लेख हा कुणीतरी "मी" आहे आणि हा "मी" त्याचं/तिचं मनोगत किवा अनुभव किवा असच काही सांगत आहे. म्हणजे दिवसातले झोपण्याचे काही तास वगळता आपल्या मनात एक संवाद सतत चालू असतो. त्या संवादाला नेहेमीच आदि-मध्य-अंत असतो असं नाही. मधेच तीनचार मस्त ओळी सलग विचार केल्यावर अचानक काही नवीन पूर्णपणे असंबध्द विचार (कुणाला "distraction" साठी मराठी प्रतिशब्द माहित आहे का?) येतो आणि संवाद थांबतो आणि दुसर्या विषयावर वळतो. तसं काहीसं वाटतंय. परंतु त्यातही काही साचेबद्ध कथेसारख्या कथा आल्यात आणि त्या मस्त आहेत. काहीना कथा असं अचूकपणे म्हणता येणार नाही, लेखही नाही पण तरीहि मस्त आहेत. एक वानगीदाखल खाली देत आहे.
पुस्तकाची संकल्पना वाचून आणि आता पुस्तक वाचून प्रयोगाबद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे. कुणी "शंभर मी"चा नाट्यगृहातला प्रयोग बघितला आहे का?
*******
सायन्स फिक्शन
माझे संस्कृतमधले नाव : अहम्
मी जड आहे. म्हणजे वैज्ञानिक भाषेत : अहम् म्हणजे मॅटर. वस्तू.
मॅटरचे, वस्तूचे एनर्जीत, उर्जेत रुपांतर होऊ शकते, असा आईन्स्टाईनचा सिद्धांत आहे.
अहम् नष्ट झाला की आध्यात्मिक स्थिती प्राप्त होते. अहम् नष्ट होणे म्हणजे अहम् चे उर्जेत रुपांतर होते. आध्यात्मिकता म्हणजे उर्जा. E = mc2 (एम सी स्क्वेर) ह्या सूत्रानुसार ही उर्जा प्रचंड असणार... आईन्स्टाईनचा सिद्धांत असा लावल्यावर एक सिद्धांत मांडता येईल. आध्यात्मिकता म्हणजे प्रचंड उर्जा... अध्यात्मात ज्ञान काहीच नसते. फक्त उर्जा असते. ज्ञान फक्त जडाचे असते.
ही सायन्स फिक्शन आहे.
इंटरेस्टिंग वाटतय पुस्तक. शाम
इंटरेस्टिंग वाटतय पुस्तक. शाम मनोहरांचं मी काहीच वाचलं नाही अजून पण वाचायची इच्छा मात्र आहे.
शुम्पी अभिप्रायाबद्दल
शुम्पी अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
शंभर मी वाचल्यावर श्याम मनोहरांच्या इतर लिखाणाबद्दल उत्सुकता होती. वाचनालयात "उत्सुकतेने मी झोपलो" बघितलं. पुस्तकात प्रस्तावनास्वरूप खालील उतारा दिलेला होता.
"व्यक्तीने उलटासुलटा विचार करायची देणगी गमावता कामा नये. उलट्या विचाराला आपला स्वतःचा न् दुसर्याचाही विरोध होतो. उलटा विचार प्रस्थापितहि होऊ शकतो. तर पुन्हा उलटा विचार करून बघायचा. उलट्याचा उलटा विचार म्हणजे सुलटा विचार नव्हे. उलट्याच्या नाना तर्हा असतात. मग भीतीदायक, दुष्ट, भंपक, विचारही छानपणे हाताळता येतात. मनाचा घट्टपणा कमी होतो. मन जेव्हढे सैल तेव्हढे जीवनाचे झिरपणे अधिक."
उत्सुकतेने मी ते पुस्तक वाचायला घेतले. पण ठराविक छापाची कथेची मांडणी नसलेली हि विशिष्ट श्याम मनोहर शैली सतत वाचणे जरा कठीणच आहे. कुटुंबव्यवस्थेत राहून व्यक्तीनिष्ठ विचार करणे आणि अशा करण्यातली कुचंबना असा काहीसा प्रकार आहे. तीन कथा/निबंध/काहीतरी आहेत - "कुटुंबव्यवस्था आणि चांदणे", "कुटुंबव्यवस्था आणि फुलपाखरू" आणि "कुटुंबव्यवस्था आणि पाउस".
चांदण्यात घरातले सर्व सदस्य सारख्या विचारसरणीचे नसल्याने नव्या वेगळ्या विचारांची चर्चा करणे कसे कठीण होते ते दाखवले आहे. शहराच्या खुल्या वातावरणात कॉलेजचे दिवस एकट्याने घालवल्यावर पारंपारिक घरात सून म्हणून गेलेल्या मुलीचा त्रास.
फुलपाखरूमध्ये मोडकळीला येता येता सावरलेलं आणि एकत्रपणाचा अभिमान मिरवता मिरवता विभक्त झालेलं अशी दोन कुटुंब आणि त्या कुटुंबातले प्रौढत्वाच्या उंबरठ्यावर असलेले आणि एकमेकांचे मित्र असलेले दोन तरुण. त्या तरुणांची घालमेल, त्यांचे त्यांच्या कुटुंबीयांपासून दुरावणे फुलपाखरात आले आहे.
आयुष्याच्या उत्तरार्धात बायको निवर्तली, लग्नानंतर सासरी गेली तरी आपल्या एकट्या वडिलांची काळजी घेणारी एकुलती एक मुलगी आणि निवृत्ती आणि बायकोचा मृत्यू ह्यामुळे भरपूर वेळ हाताशी असलेला एक सदुसष्ट वर्षाचा म्हातारा. पावसात त्याला ब्रॉंकायटीसचा त्रास होतो. ते त्रासाचे दिवस इतर ऋतूत आठवतात. मुलीचं भरलेलं घराचा आनंद आहे पण तिथे गेल्यावर वाटलेलं अवघडलेपण. असं बरच काही आणि त्या पार्श्वभूमीवर त्याचं विचारमंथन पावसात आले आहे. हे प्रथमपुरुषी एकवचनी असे लिहिले आहे. शेवट लेखक "उत्सुकतेने मी झोपलो" असा करतो.
वाचून झाल्यावर माझी प्रतिक्रिया "शंभर मी" सारखीच गोंधळलेली आहे. तुमचा तुम्हीच विचार करा आणि ठरवा काय ठरवायचे असं लेखक सांगतोय. अमूर्त शैलीत काढलेली चित्रे जशी "so called" खूप काही सांगत असतात पण आपल्याला काहीच कळत नाही आणि विचार करून डोक्याचा भुगा होतो असं काहीतरी!
आपल्याला काहीच कळत नाही आणि
आपल्याला काहीच कळत नाही आणि विचार करून डोक्याचा भुगा होतो असं काहीतरी!>>>>> अगदी बरोबर! २ वर्षंपूर्वी हे पुस्तक मी वाचले होते.त्यावेळी सुंदर भाषाशैलीमुळे संपूर्ण वाचून झाले.हाती आता काही लागतेय म्हणेपर्यंत निसटूनही जात होतं.
श्याम मनोहरांचे कळ, हे
श्याम मनोहरांचे कळ, हे इश्वरराव हे पुरूषोत्तमराव, उत्सुकतेने मी झोपलो आणि खेकसत म्हणणे 'आय लव्ह यू' वाचलंय.
मला त्यांची लिखाणाची शैली आवडते जाम. गोष्टी समोर मांडल्यात असंच दिसतं वरकरणी. पण त्या मांडण्यामधेही त्यांचं स्टेटमेंट आहे असं लक्षात यायला लागतं.
त्यांची नाटके प्रेमाची गोष्ट? आणि सन्मान हौस दोन्हीचे प्रयोग पाह्यले होते. प्रेमाची गोष्ट? तर दोन वेळा पाह्यलं होतं. दोन्हीही अजिबात आवडली नव्हती.
नीधप मला पण वाटलं मला त्यांची
नीधप मला पण वाटलं मला त्यांची शैली आवडतेय असं, पण तरीही मी गोंधळली आहे.
फुलपाखरू च्या कथा/निबंध/काहीतरी मध्ये त्या विलासला बर्याच वेळा "पडेल' वाटतं. "पडेल" वाटणं वाचल्यावर काहीतरी निगेटिव वाटतं पण सुरुवातीला काही वेळा ते "आनंद" वाटण्याशी समांतर आहे पण नंतर नंतर ते दुखी किवा रितं वाटण्यासाठी देखील म्हटलंय असे वाटते.
काही काही वेळा काही वाक्य उगीच परत परत लिहिली आहेत. सुरुवातीला ते छान वाटले पण मग थोडं bore पण झालं! :-o
ते रिपीटेशन ही त्यांची स्टाइल
ते रिपीटेशन ही त्यांची स्टाइल आहे. विलासला सर्व वेळेस पडेल वाटत रहाणं हे थोडसं त्याच्या सगळ्या करण्यातलं निरर्थकपण आहे. तेच तर स्टेटमेंट आहे.
स्टेटमेंटबद्दल - अगदी अगदी.
स्टेटमेंटबद्दल - अगदी अगदी.
'कळ' सोडता भाषेच्या अलंकरणापासून फटकून वागत असलेली शैली- हे मनोहरांचं वैशिष्ठ्य. 'कळ' मध्ये देखील अलंकरण आणि आशय यांच्या रूढ चौकटींच्या बाहेर पडून त्यांनी प्रयोग केले. बेसिकली, जिथे अलंकार-उपमांचा 'सोस' सुरू होतो, अगदी त्याच ठिकाणापासून तुम्ही 'मुलभूत' जे काय आहे, ते नाकारायला किंवा ओव्हरलुक करायला सुरूवात करता- असं त्यांचं म्हणणं आहे. मग हे 'मुलभूत' काहीही असो- विचार करण्याच्या पद्धतीतलं, एखादी गोष्ट लिहून काढून तिच्या दस्तावेजीकरण करण्याच्या पद्धतीतलं, ज्ञान देण्या-घेण्ञा-समजून घेण्यातलं, संशोधनातलं- अगदी काहीही. प्रत्येक गोष्टीला 'का' विचारणं, उलटा विचार करून करून बघणं- यातून मुळापर्यंत पोचता येतं असं ते म्हणतात. या अशा मुळापर्यंत पोचण्यात अलंकरण, 'मोठे' विचार, मोठी वाक्यं, मोठे परिच्छेद अडथळा आणतात- हे तर आहेच, पण हळुहळू आपल्या वागण्या-बोलण्या-लिहिण्यातही दांभिकता डोकाऊ लागते. आपल्या समाजात आणि देशात कुठच्याही गोष्टीवर मुलभूत संशोधन आणि मुलभूत ज्ञानाची निर्मिती झालेली नाही- याचं खापर ते आपल्या याच सवयीवर फोडतात. प्रत्येक गोष्ट नीट, स्वच्छ आणि 'आहे तशी' आपल्या भाषेत मांडता येऊ लागणं फार महत्वाचं आहे, सुरूवातीला ते निरर्थक वाटेल, पण त्याचा शेवट नक्की काहीतरी साक्षात्कारावर होईल- यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आणि ही गोष्ट ते अनेक वेळा अनेक कथा, नाटकं नि पुस्तकं लिहून सांगत आले आहेत.
मनोहर नक्की काय म्हणतात ते एकच पुस्तक वाचून कळणं जवळजवळ अशक्य आहे. कळ, उत्सुकतेने मी झोपलो, हे ईश्वरराव.., खेकसत म्हणणे, शीतयुद्ध सदानंद ही सारी पुस्तकं वाचली, की मग त्यांची वरवर छोटी निरर्थक वाक्यं आपल्या वागण्या-बोलण्यावर आणि एकंदरितच आपल्या सामाजिक वागण्यावर, रोजच्या कौटुंबिक जगण्यावर सणसणीत फटके आहेत- हे कळू लागतं. आपल्या तथाकथित उपमालंकारांतल्या भाषिक सौंदर्यवाटा नाकारत 'त्याला पडेल वाटलं..' 'सेक्सने भारलेली मुलगी..' '..हे फार अध्यात्मिक होतंय..' '..हे कुठेही लिहून ठेवलेलं नाही..' 'हे कुठेतरी लिहून ठेवायला पाहिजे..' 'यलो नायटी..' 'छोटे चूक - छोटे बरोबर' अशा सोप्या वाटणार्या शब्दगटांच्या आपल्याला निरर्थक वाटणार्या पुनरावृत्तीतून त्यांना त्या शब्दाच्या अर्थांच्या पलीकडचं बरंच काही आणि ठामपणे म्हणायचं आहे हे लक्षात यायला लागतं. प्रत्येक पुस्तकातून ते स्टेटमेंट्स मांडतात तसंच आणखीही एक एक्जिनसी मनोहरी इंप्रेशन ही सारी पुस्तकं वाचून आपल्या मनात तयार होतं- तेव्हा मनोहर काहीतरी कुठेतरी थोडेफार उमगले- असा साक्षात्कार होतो. तेव्हाच आपल्या सामाजिक भाबडेपणाच्या आणि भाबड्या-दांभिक लेखनसंस्कृती असलेल्या मराठी साहित्यात मनोहर आणि त्यांचे लेखनातले प्रयोग किती महत्वाचे आहेत - हे ही कळतं...
वा राडा वा!
वा राडा वा!
साजिर्या मस्त पोस्ट.. हा
साजिर्या मस्त पोस्ट..
हा शैलीचा सोस मराठीत जरा जास्तच आहे असं मला वाटतं. हिंदी साहित्य वाचतानाही जाणवत रहातं की सरळ साध्या सोप्या भाषेत, कुठलंही अलंकरण न करता किती प्रभावीपणे लिहिता येतं ते.
फायनली मी उत्सुकतेने मी झोपलो
फायनली मी उत्सुकतेने मी झोपलो वाचलं. आवडलच.
"त्याला पडेल वाटलं' संदर्भात माझाही घोळ झालाच. मग आत्ता हा धागा परत वाचताना नी च्या पोस्ट्मुळे ते जरा क्लियर झालं.
शेवतच्या पाउस कथेतील शेवतचा परिच्छेद आणि शेवटाला नेणारं 'आणि उत्सुकतेने मी झोपलो' हे वाक्य खूप प्रभावी वाटलं.
'कळ' पण आणलं आहे. थोडा ब्रेक घेउन ते वाचणार.