अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि.......

Submitted by पुरंदरे शशांक on 18 June, 2014 - 23:57

अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि.......

मध्यंतरी एक शेर वाचनात आला -

दिलके आईनेमें है तस्वीर ए यारकी
बस, जरासी गर्दन झुकायी देख ली...

वस्तुतः उर्दू काय, हिंदी काय किंवा मराठी काय - शेरो शायरीमधले मला काहीही कळत नाही- म्हणजे त्यातल्या तांत्रिक बाबी - अलामत, काफिया, मतला वगैरे. पण एखादा शेर का भावतो तर तो थेट मनालाच स्पर्श करतो म्हणून.
आता हा वर दिलेला शेर एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी म्हणत असेल का एखादा भक्त आपल्या ह्रदयस्थ भगवंतासाठी म्हणत असेल ??

प्रेमीजन जसे एकमेकांकरता अतिशय व्याकुळ झालेले असतात तसेच भक्त भगवंताकरता विव्हल. प्रेमात तहानभूक विसरायला होते इतकेच नव्हे तर आपली नेहेमीची कामे करत असतानाही सतत आपली आवडती व्यक्तीच आठवत रहाते यालाच प्रेमाची परिसीमा म्हणतात. अगदी तसेच भक्ताचे भगवंताबाबत होते.

मात्र इथे भक्ताला आता ना कुठल्या मूर्तीची गरज आहे ना कुठल्या तसबिरीची. आता तो भगवंत ह्रदयस्थच झाला असल्याने भक्ताने जरा अंतर्मुख होण्याचा अवकाश (जरासी गर्दन झुकायी) त्याचे दर्शन होणारच.... भक्ताला भगवंताचे सान्निध्य कायमच असते. या जगाच्या गडबडगोंधळात "तो" क्वचित विसरल्यासारखा, दूर गेल्यासारखा, हरवल्यासारखा होतो खरा, पण जरा अंतर्मुख होण्याचा अवकाश ..... "तो" असल्याचा केवढा दिलासा त्याला लगेच मिळतो. भक्ताला जणू ही एक छानशी युक्तिच सापडलेली असते. जरा "त्या"चा विरह झाल्यासारखा वाटला तर तो भक्त आहे त्या परिस्थितीत अंतर्मुख होतो आणि "त्या"ला लगेच पाहू शकतो, भेटू शकतो.... (भगवंताचा आठव करताना कोणाला नामस्मरण सोपे वाटेल तर कोणाला अनुसंधान तर अजून कोणाकडे अशीच काही युक्ती असेल)

या शेरात एक अजून गोडवा आहे - या गर्दन झुकायी - या ओळीतच तो अंतर्भूत आहे. जेव्हा नम्रत्वाची भाषा बोलली जाते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपले मस्तक झुकवायला लागते. कायम मान ताठ ठेव, शिर(मस्तक, डोके) नेहमी उन्नत असू दे - ही जी भाषा आहे ती अस्मिता, अभिमानाची अशीच असते. शरीराच्या सगळ्या अवयवांमधे जे कायम शीर्षस्थानी असते ते शिर- अहंकाराचे मुख्यस्थान. ते जेव्हा वाकते तेव्हा अहंकार नष्ट व्हायला, लोप पावायला सुरुवात होते.
...... आणि भक्त तर कसे असतात तर -
अखंड अगर्वता होऊनी असती | जयांची विनय हेचि संपत्ती | जे जय जय मंत्रे अर्पिती | माझ्याठायी ||
नमिता मानापमान गळाले | म्हणूनी अवचिता मीची जाहाले | ऐसे निरंतर मिसळले | उपासिती ||ज्ञा. अ. ९ -२२६,२२७||

भक्ताचा भाव कायमच असा असतो की मी कोणीही नाही. हे भगवंता, तूच आहेस केवळ. भक्ताला भगवंत सहजसाध्य आहे याचे कारण नम्रता. भक्त कायम लीन असतो, कायम सहजशरण असतो. तो म्हणतो - मी कोणी नाही, मला काही कळत नाही. भगवंता तूच माझे सर्वस्व आहेस रे..

भक्ति ही आपल्याला कायम हीन-दीन करुन टाकते असे जे अतिबुद्धिमान (?) मंडळींना वाटते त्यांच्या हे लक्षात देखील येत नाही की या जीवनात आपण सतत कोणाला ना कोणाला शरण जात असतो - मग ती परिस्थिती असो वा आपली शारिरीक अवस्था, वा अजून काही.
श्रीसमर्थ तर जरा स्वर उंचावूनच आपल्याला विचारतात -
साहेबास लोटांगणी जावे | नीचासारखे व्हावे | आणि देवास न भजावे | हे कोण ज्ञान ||
(या जगात वावरताना कोणाही लुंग्या-सुंग्याला साहेब, साहेब म्हणत लोटांगणी जातो आणि देवासमोर मस्तक वाकवायचे झाले की लगेच तुझा अहंकार जागा होतो याला काय परमज्ञानी म्हणायचे ??)

तर तुकोबा म्हणतात -
नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥१॥
हें चि शूरत्वाचे अंग । हरी आणिला श्रीरंग ॥ध्रु.॥
अवघा जाला पण । लवण सकळां कारण ॥२॥
तुका म्हणे पाणी । पाताळ तें परी खणी ॥३॥१४७५||

या साडेतीन हात शरीराच्या सुखोपभोगासाठी आपण कोणापुढेही हीन-दीन होतोच होतो; वर या शरीराला असे जपतो की बहुतेक आपल्याला अमरपट्टाच मिळालाय जणू! सतत शरीराला सांभाळणे एवढेच जीवनाचे सर्वस्व !! खरे पाहिले तर भगवत्प्राप्तीकरता या शरीरालाही काडीमोल समजणारे भक्त हेच खरे शूरवीर. भगवंतापुढे या संसाराला कःपदार्थ समजणारे तुकोबांसारखे भक्त हेच खरे बळिवंत.

असा हा नम्र भक्त साधी मान (मस्तक) तुकवून त्या परमेश्वराला आपलासा करतो ही किती आश्चर्याची गोष्ट !!
बाळाचें जीवन । माता जाणें भूक तान - असे तुकोबा जे म्हणतात त्याचा गर्भितार्थ हाच की अगदी तान्हेल्या बाळासारखा मी आहे - अजाण आणि अनन्यही - तुझ्याशिवाय मी काहीही जाणत नाही. आणि अशा तुकोबांना तो भगवंत उरीशिरी धरतो आहे - एवढी वर्षे होऊन गेली तरी हा समाजपुरुष त्यांना म्हणजेच बुवांना आपल्या मस्तकी धरतो आहे - हे कशामुळे - तर खर्‍या भक्तिमुळे ....

बस्स.. जरासी गर्दन झुकायी, देख ली -
खरं तर किती सोपं आणि तरीही किती कठीण...
संतांना ते खूप सोपं आहे आणि आपल्याला अहंकारामुळे सगळ्यात कठीण झालंय ....

हे माऊली, हे तुकोबाराया - तुमच्या पादुका डोक्यावर मिरवीत, तुमचेच अभंग -ओव्या म्हणत, गात हे इतके वारकरी दरवर्षी पंढरपूरला जात असतात - त्यांना तुमचे ज्ञान, योग वगैरे काय कळते ? पण त्यांना एकच कळते ते तुमचे निखळ प्रेम, तुमचा वात्सल्यभाव; जो या स्वार्थी जगात कोणीही देऊ शकत नाही.
ऐशी कळवळ्याची जाती | करी लाभाविण प्रीती | - हा तुमचा कळवळा सर्वसामान्यांना कळतोच कळतो.

आम्हा सर्वसामान्यांसाठी तुम्हीच सारे काही आहात..... तुमही हो माता-पिता तुमही हो, तुमही बंधु सखा तुमही हो... तो मोक्ष, ती मुक्ति तरी काय करायची आहे या प्रेमापुढे??? केवळ या नम्र, व्याकुळ भावानेच तुमच्याविषयी जरी अशी प्रीती निर्माण झाली ना तरी बस्स..... बाकी काही, काही नको ...

या शेरात म्हटल्याप्रमाणे तुम्ही या ह्रदयात येऊन रहा कसे ... मग जरा नजर आत वळवली की तुमचेच दर्शन मी सतत घेऊ शकेन .....
......पण एकीकडे हेही समजतंय की हे ह्रदय मात्र तेवढे निर्मळ नाहीये - सतत शंकाकुशंकांनी व्यग्र आहे, रागलोभ, मत्सर, द्वेष यांचाही अधूनमधून वावर होतोय त्यात... या सार्‍या दोषांनी आधीच अंतःकरण भरलेले असल्याने तुम्हाला तिथे स्थानापन्न व्हा असे म्हणायचीही लाज वाटतीये हो ...

पण एक मात्र मी जाणतो की तुम्ही माऊली ह्रदयाचे आहात - त्यामुळे मी तुम्हालाच हाक मारत रहाणार - बाकी मी काहीही जाणत नाही .....

अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि.......

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(पालखी सोहळा निमित्ताने एक चिंतन....)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान.

ज्ञानदेवांच्या हरिपाठातील, "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी | तेणे मुक्ती चारी साधियेल्या||" या ओळीतील "उभा" या शब्दातही "गर्दन झुकायी" सारखाच भावार्थ असावा !!
मस्तच !!

न लगे मुक्ती आणि संपदा, संतसंग देई सदा !
वाह, अप्रतिम ! शब्दांच्या पलिकडले अगदी सहजपणे वर्णन केलेत.

खुप सुंदर..
या शीर्षकातल्या ओळी आणि लताचा आवाज याची एवढी संगती आहे कि हि ओळ त्याच चालीत वाचावी लागते !

पण एकीकडे हेही समजतंय ....... त्यामुळे मी तुम्हालाच हाक मारत रहाणार - बाकी मी काहीही जाणत नाही
उत्तम!

शशांक _____/\______

किती सुंदर लिहिलेय. परत परत वाचावेसे वाटणारे... अजुन लिहा भरपुर..
शब्दांच्या पलिकडले अगदी सहजपणे वर्णन केलेत.>>>)साधना, महेश +१ Happy

वा वा.. सुरेखच.
जरासी गर्दन झुकायी... ह्यावरचं तुझं चिंतन... मजा आया. किती सहज प्रमाणं देतोस रे, बाबा.
मला भिडलेली अजून एक गंमत आहे ह्या शेरात...
दिल के "आईने"में.
हृदयाच्या कुण्या कप्प्यात नाही. आरशात.
अद्वैताची खूण हीच... दुसरी कडे कुठेच नाही... हृदयातही नाहीच... मी तूच आहे... 'आरशात' डोकावून बघच एकदा.
ह्यावरही होऊन जाऊद्या, शशांक. आज सकाळी सकाळी तुझा हा लेख वाचलाय... खूप खूप सुरेख.

वा ! सकाळ अतिशय चांगली केली ह्या चिंतनाने.

>या जगाच्या गडबडगोंधळात "तो" क्वचित विसरल्यासारखा, दूर गेल्यासारखा, हरवल्यासारखा होतो खरा, पण जरा >अंतर्मुख होण्याचा अवकाश ..... "तो" असल्याचा केवढा दिलासा त्याला लगेच मिळतो.

माउली म्हणतात- दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले | बाप रखुमादेवीवरे मज ऐसे केले |

पुन्हा पुन्हा वाचावेसे उत्तम लिखाण.
लिहीत रहा..

छान शशांक!

चैतन्य, अगदी अगदी!
'घनू वाजे ' मला मनाच्या ह्य. अवस्थे साठी अतिशय अ‍ॅप्ट वाटतं. लूप मधे ऐकलय ते गाणं एकेकाळी.

आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी http://www.maayboli.com/node/24591

शलाका - या तुझ्या सुरेल लेखाचीही त्यानिमित्ताने आठवण झाली. खरं आहे तुझं -

"अद्वैताची खूण हीच... दुसरी कडे कुठेच नाही... हृदयातही नाहीच... मी तूच आहे... 'आरशात' डोकावून बघच एकदा."

क्षेमालागी जीव उतावीळ माझा | म्हणवुनि स्फुरताती बाहो
क्षेम देऊ गेले तंव मीचि मी एकली | आसावला जीव राहो |

चैतन्यानेही अगदी नेमके प्रमाण दिलंय - दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले | बाप रखुमादेवीवरे मज ऐसे केले |

तुम्हा सार्‍या भगवत्प्रेमी मंडळींतून साक्षात विठोबाच भेटतोय आज ...

हरि हरि

ज्ञानोबा - माऊली -तुकाराम

जय जय विठ्ठल श्रीहरि विठ्ठल ....

शशांक, खूप सुरेख! सगळ्या कोलाहलातूनही, आपल्या अंतरात तोच नांदताहे ह्याची जाणीव परत परत होते तेव्हा जीव खरंच शांत होतो.