या आधी,
माझे धावणाख्यान १ - पुर्वरंग - http://www.maayboli.com/node/49304
माझे धावणाख्यान २ - शिकवणी http://www.maayboli.com/node/49334?page=1
आता पुढे चालू
सराव आणि पहिली स्पर्धा
तर डेक्कन परिसरात, माझा सराव नियमितपणे चालू झाला होता.
या सरावा दरम्यान एक पूर्णतः वेगळीच शिकवण मिळाली ती म्हणजे तोंडाने श्वास घ्यायचा याचे कारण म्हणजे फुफ्फुसांना जास्त हवा मिळते आणि दमायला होत नाही. आता हे, आत्तापर्यंत जे ऐकले शिकलो त्या पेक्षा एकदम वेगळेच होते आणि सहज जमतही नव्हते. पण मग हे व्हावे कसे? म्हणून मग आम्ही ठरवले की एकमेकांशी बोलत बोलत पळायचे. पळता पळता सलग एक वाक्य न धापा टाकता बोलता येणे हे तुम्ही कसे धावत आहात (आरामात की वेगात) याचेही निदर्शन करते.
मग काय, रोजच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होऊ लागल्या. प्रत्येकाच्या ‘दिल के करीब’ काय आहे हे ही त्यातून उमगायला लागले आणि आमच्यात एका छान असे नाते तयार होऊ लागले. आजमितीस आमच्या नात्याची वीण इतकी घट्ट आहे की खरोखर विश्वास बसत नाही की आमची ओळख होउन एक वर्ष देखील झाले नाहीये.
माझे सरावातील सातत्य टिकून रहाण्यास कारणीभूत ठरलेली, माझ्या ‘दिल के करीब’ (असणाऱ्या अनेक गोष्टींपैकी) एक महत्वाची गोष्ट अशी होती की आम्ही ज्या प्रभात रस्त्यावरून पळत होतो त्या रस्त्याशी माझे लहानपणीच जोडले गेलेले धागेदोरे! या परीसराशी माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. ज्या मी मधल्या काळात पूर्णपणे विसरून गेलो होतो.
माझी शाळा, सौ विमलाबाई गरवारे प्रशाला, मी पोहोणे शिकलो, तिथेच मागे असलेल्या टिळक तलावावर, शाळेत असताना ज्या हनुमान टेकडीवर वृक्षारोपणाकरता दर वर्षी नेमाने गेलो, ते ह्याच रस्त्यावरून..... कॉलेजात गेल्यावर ज्या टेकड्यांवर शेजार पाजारच्या लहान मुलांना सोबत घेउन पाणी घालायला जायचो, तो रस्ता मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज आणि गोखले अर्थशास्त्र संस्था ह्यांच्या मधूनच जातो.
त्या परिसरात पळायला सुरुवात केल्यामुळे लहानपणीच्या अनेकानेक नितांतसुंदर आठवणी रोज रुंजी घालू लागायच्या. त्यामुळे झाले काय की मला जवळजवळ प्रत्येक कोपऱ्यावर पावलावर इथे हे, तिथे ते असे आठवायचे आणि मग त्याबद्दल काय काय सांगू लागलो. आमच्या गृपमध्ये (बहुतांश लोकं पुण्याबाहेरचे असल्याने) मला बोलायला फार म्हणजे फारच वाव मिळायचा. मीही मग काय काय बोलत रहायचो ज्याचा मला दमसास टिकायला खूपच फायदा झाला.
माझ्या बोलण्यात, वाडेश्वर-रुपाली-वैशाली, त्यांचे पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातले महत्व, त्या दरम्यान पुण्यात जर्मन भाषेचे शिक्षण मिळायला सुरुवात होउन शंभर वर्षे झाल्याची बातमी होती तिच्या अनुषंगाने रानडे इंस्टीट्युट, अॅनी बेसंट यांची थिओसोफ़िकल सोसायटी, गोखले अर्थशास्त्र संस्था, तिची अत्युकृष्ट लायब्ररी, गोखले म्हणजे कोण? गोखल्यांचा भारत सेवक समाज, हे बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय म्हणजे जिथे शरद पवार शिकले. भांडारकर हे त्या रस्त्याला ज्यांच्यामुळे पडले ते किती महान संस्कृत पंडित होते, विधी महाविद्यालयात शिकून गेलेले कोण कोण नंतर महान झाले. फिल्म अर्कीव्हाज म्हणजेच पूर्वीचा प्रभात फिल्म स्टुडियो, कालवा कुठे होता, अमोल पालेकर, पुलं, हिराबाई बडोदेकर यांची घरे, जक्कल सुतारांनी केलेले खून त्यांची काय दहशत होती, रिगल बेकरी त्यात मिळणारे क्रीमरोल, दर्शन, टण्णू, (आमच्या शाळेपाशी त्याची बरीच झाडे असल्याने रस्त्यावर पडलेले आढळायचे. त्याच्या वरचे आवरण अगदी मऊ असते पण ते निघाले / काढले की आतला भाग अगदी टणक असतो. हा टणक भाग आम्ही एकमेकांच्या डोक्यावर मारायचो. त्याचे नक्की नाव कुणाला माहित नसल्याने ते एक विलायती फळ असून त्याचे नाव हाकारी आहे अशी अफवा अस्मदिकांनी पसरवली होती. आमच्या 'व्हॉटसअॅप'वरच्या गृपचे नाव 'हाहाकारी रनर्स' असे आहे त्यावरून हाकारी असे नाव सुचलेले).
आमचा विषय एकापासून चालू होऊन दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, तिसर्यातून आणि तो ही असा वेगळाच काहीतरी निघायचा की पहिला विषय काय होता हेच विसरायला व्हावे. अशी मजा मजा असायची. वेगेवेगळ्या आवडी असल्या तरी, प्रत्येकाला रुचेल असे बोलायला नवनवीन विषय मिळाल्यामुळे पळताना मस्त मजा यायची. अगदीच काही नाही तर सिनेमा आणि त्यातले संवाद हा एक सदाबहार आणि सगळ्यांना बोलता येईल असा हातखंडा विषय होता.
मग अशातच 'पुणे रनिंग'ची 'रन बियोंड मायसेल्फ' नावाने 'के. ई. एम. हॉस्पिटल'च्या मदती साठी एक स्पर्धा आयोजित केल्याचे कळले. माझे पहिल्याच आठवड्यात १३ किमी पळून झाले असल्याने, व नंतरही १४किमी पळून झाले असल्याने, साहजिकच मी त्या स्पर्धेत १५ किमी पळायचे असे ठरवण्यात आले. खास त्या दिवसासाठी म्हणून अजून एक गोष्ट मला सांगीतली गेली ती म्हणजे निगेटीव्ह स्प्लिट पद्धतीने धावणे. स्पर्धांमधून धावताना सहसा सगळ्यांचे असे होते की सुरुवातीस जोर जोरात पळले जाते आणि नंतर दमसास टिकत नाही. म्हणून असे करायचे की पहिले सुरुवातीचे काही किलोमीटर म्हणजे निदान दोनेक किमी अंतर सावकाश पळायचे, मग तुम्ही श्वास आणि पळण्याची लय पकडलीत की वेग अजून थोडा वाढवायचा आणि सगळ्यात शेवटचे अंतर अजून जोरात पळायचे. शेवट जोरात आणि झोकात करायचा हे मात्र नक्की.
या स्पर्धेसाठी नोंदणी करताना एक प्रश्न होता की पेसर हवा आहे का? मी लिहून ठेवले होते होय म्हणून आणि नंतर मग गृप मध्ये विचारले होते की ही काय भानगड असते. काही बांधायचे असते का बुटाला? माझ्या ह्या मूर्ख प्रश्नावर माफक हसून झाल्यावर उत्तर मिळाले की पेसर म्हणजे एक माणूस असतो. जो एका ठराविक गतीने विशिष्ट निर्धारित वेळेत धावतो.
ही माझी पहिलीच स्पर्धा असणार होती पण बरोबर सगळा गृप असणार नव्हता. काही २१ किमी पळणार होते तर काही हैदराबादला ट्रायथलॉन मधे भाग घ्यायला गेले होते. मी आणि सुनीलने पावणेदोन तासाच्या पेसर बरोबर धावायचे असे ठरले. आदल्या रात्री लवकर झोपलो. सकाळी लवकर उठलो. आयोजकांतर्फे गर्दी टाळण्यासाठी वाहने प्रभात / भांडारकर रस्त्यावर लावावी असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे भांडारकर रस्त्यावर रहाणाऱ्या माझ्या मावशीकडे माझी गाडी लावली आणि पोचलो बी. एम. सी. सी. कॉलेजवर. खूप भारी वातावरण होते. आबाल-वृद्ध, स्त्री-पुरुष, काटकुळे–तगडे, काळे-गोरे, सगळ्या प्रकारचे धावपटू दिसत होते. आरजे होता, गाणी वाजत होती, सगळ्यांनी स्ट्रेचिंग केले आणि मैदानावरून स्पर्धा सुरु व्हायच्या ठिकाणी गेलो. तिथे असलेले एक ढोल पथक आपले काम चोख बजावत होते. एखादाच कोणी असेल ज्याने पायाने ठेका पकडला नव्हता. एक खास माहौल तयार झाला होता. त्या ढोल झांजांचा आवाज आता टिपेला पोचला होता आणि मग पहिल्यांदा २१ किमी वाल्या खेळाडूंना सोडले आणि नंतर आम्हा १५ किमी वाल्यांना.
पण ऐन स्पर्धेच्या वेळी 'सुरुवातीला सावकाश पळायचे मग वेग वाढवायचा' असे ठरलेले सगळे विसरून सुनील इतका जोरात पुढे निघून गेला की दिसेनासाच झाला. (हे सगळे त्या ढोल-पथकामुळे, त्याने मला चेव आला म्हणून मी जोरात गेलो – इति सुनील) मग मी त्याचा नाद सोडून एकटाच पळायला लागलो. मग मला पाठीवर झेंडा घेउन धावणारा एक पेसर दिसला, पण तो वेगळ्याच वेळेचा निघाला, मग पळता पळताच पावणे दोन तासात पळणारा पेसर शोधला आणि नंतरचे जवळ जवळ सगळे अंतर मी त्याच्या बरोबर धावलो. त्याला बरेच जण ओळखत होते हे त्याला अनेक लोकांनी केलेल्या अभिवादनाला बघून लगेच कळत होते. मग हळू हळू त्याच्या बरोबर बोलायला सुरुवात केली, म्हणजे बहुतांश वेळा मीच प्रश्न विचारले. त्याचे नाव उत्पल बर्मन. तो 'पुणे रनिंग'चा एक अॅक्टीव्ह सभासद आहे. त्याने, ही माझी पहिलीच स्पर्धा आहे असे कळल्यावर, मला खूपच प्रोत्साहित केले. एकदा पाणी प्यायच्या थांब्यावर मी ‘खूप पळालो आता बास’ करून थोडे अन्तर चालायच्या बेतात होतो तो माझा प्रयत्न त्याने हाका मारून, मला बोलावून घेउन, बरोबर पाळायला लावून हाणून पाडला. ह्या दरम्यान कधीतरी वाटेत सुनील भेटला आणि त्याला आमच्या बरोबर पळ असे सांगूनही तो न आल्याने, आम्ही त्याला ओलांडून पुढे गेलो.
स्पर्धेचा मार्ग बी. एम. सी. सी. कॉलेजपासून चालू होउन बालभारतीच्या इथल्या चढावरून, सेनापती बापट मार्गावरून, विद्यापीठ चौकातून डावीकडे पाषाण मार्गे चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून माघारी परत यायचा होता. जाता येताना वाटेत आमच्या 'द पुणे मॅरॅथॉनर्स क्लब'चे इतर खेळाडू दिसत होते मी तर सगळ्यांना ओळखतही नव्हतो पण आमच्या विशिष्ट टीशर्ट मुळे ते लगेच ओळखू येत व मला चिअर करत, ते आमच्याच क्लब चे सदस्य असल्याने ह्यात तसे नवल ते काहीच नाही. पण जेव्हा जेव्हा अनेक अनोळखी माणसे, स्वयंसेवक, पोलीस, मला प्रोत्साहन देत होती तेव्हा इतके मस्त वाटत होते की ज्याचे नाव ते ! ते नवरात्रींचे दिवस होते आणि चतुश्रुंगी देवळाजवळ, ठेवणीतल्या साड्या घालून, नटून थटून, तबकं घेऊन पण अनवाणी जाणाऱ्या बायका, आम्हाला प्रोत्साहित करता करता इतक्या भारावून गेल्या की त्याही आमच्या बरोबर काही अंतर धावल्या. (त्या दिवशी त्यांना देवीने नक्कीच काहीतरी खास असे वरदान दिले असणार). ते वातावरणच एकदम वेगळे असते, उत्साही आनंदी आणि रोमहर्षक असते!
अगदी मस्त पळत होतो आम्ही. सुरुवातीची पेसर सोबतची गर्दी आता घटली होती. आणि आम्ही असे परत येत असताना समोर बालभारतीची खिंड दिसायला लागल्यावर मला काय झाले कोण जाणे पण चढावर हळू होण्याच्या ऐवजी मला एकदम स्फुरण चढले आणि उत्पलला सांगून मी एकटाच सुसाट निघालो. जे निघालो ते एकदम स्पर्धेचा शेवट जिथे होते होता तिथवर धावूनच थांबलो.
आणि मला लागलेला वेळ होता 1 तास ४० मिनिटे.... म्हणजेच पेसर बरोबर धावलो असतो तर लागले असते त्यापेक्षा ५ मिनिटे कमी
असे जोरात धावत आल्याने, माझी पहिली-वहिली स्पर्धा पूर्ण केल्यामुळे नंतर मला जे काय वाटले / झाले त्याचे वर्णन शब्दात करता येणे माझ्यासाठी निव्वळ अशक्य आहे. अशक्य शारीरिक थकवा पण अतीव मानसिक समाधान इतकेच सांगू शकतो.
आता पुढचे लक्ष्य होते पुणे मॅरॅथॉन स्पर्धा, तयारी करायची होती अर्ध मॅरॅथॉन ची अर्थात २१ किमी अंतर.....आणि मी अगदी फुरफुरत होतो....
तर दिवस असे मजेत चालले होते....
पण जीवनात अशी मजा कायमच टिकली असती तर काय हवं होतं ?
क्रमशः
माझे धावणाख्यान ४ - http://www.maayboli.com/node/49523
मस्तच लिहिलंस रे ..... अगदी
मस्तच लिहिलंस रे ..... अगदी तुझ्याबरोबर धावतोय असं वाटलं ....
तिथले ढोल ताशे ऐकुन (आणि त्या
तिथले ढोल ताशे ऐकुन (आणि त्या स्पर्धेत माझ्या लेकानी आणि नवर्यानी पळायला सुरवात केली आणि तुला नाही जमणार टाइप तुक दिला ) मी धावायच अस ठरवल.
त्यानंतर्ची पुने रनिंग च्या अमनोरा तील स्पर्धेत धावले. ५ किमी.
हैला , पण मी अजून तेवढ्यावरच अडकलेय. पु मॅ ६ धावले पण मजा नाही आली.
धन्यवाद शशांक काही टायपो
धन्यवाद शशांक
काही टायपो सुधारत होतो तोवर झाले पण वाचून? सही आहे!
काही कारणाने या पुढचा भाग, या विकांताला जमणार नाहीये, त्याकरता क्षमस्वः
इन्ना, तुला नक्की जमेल
इन्ना, तुला नक्की जमेल गं...
प्रोत्साहन म्हणून अधिक प्रभावी काय ठरले होते? तु.क. का ढोल ताशे ते सांग म्हणजे तशी व्यवस्था करायला बरे
रच्याकने - मी अमानोरामधे पण धावलो होतो. प्रशांती ब्रेस्ट कँसर अवेअरनेस साठी होती ना ती रन....
(No subject)
मस्त
मस्त
मस्त धावते आहे लेखमालिका
मस्त धावते आहे लेखमालिका
चिमुरी तू हसत्येस हे पाहून
चिमुरी तू हसत्येस हे पाहून किती हुश्श झालं माहित्ये का?
धन्यवाद रंगासेठ आणि शैलजा !
बोलत धावता येते... मी कधी
बोलत धावता येते... मी कधी कल्पनाही केली नव्हती. मस्त लिहिलेय.
तु क केव्हाही जास्त प्रभावी
तु क केव्हाही जास्त प्रभावी असतात माझ्याबाबतीत
हो प्रशांती कॅन्सर अवेअर्नेस रन! ३ किमी च्या वळणावर हळूच वळून टाकायची प्रबळ इच्छा झाली होती. त्यावर मात करून ५ धावले , तो मोमेंट ऑफ अचिव्हमेंट होता
तोंडाने श्वास हे जमवायला पाहिजे.
खुपच मस्त! तोंडाने श्वास,
खुपच मस्त!
तोंडाने श्वास, नवीन माहिती.
मी ज्यांच्याबरोबर पळते त्या ६० वर्ष + बायका पण मस्त गप्पा मारत पळतात. आता हे टेक्नीक शिकावे लागणार.
धन्यवाद दिनेश. आणि अनेक
धन्यवाद दिनेश.
आणि अनेक धन्यवाद इन्ना, ढोल ताशे म्हणाली असतीस तर अवघड होते माझे
हर्पेन भाउ तुमच्यासोबत थोड
हर्पेन भाउ तुमच्यासोबत थोड फार धावलो पण त्यातुनसुद्धा खुप शिकायला मिळाल. बाकि तुमच्या इच्छाशक्तील त्रिवार मुजरा सलाम सगळ जरा हाफिसातला लोड कमी होउ देत मन्ग मी बी एनार परत
लेख मस्त झालाय बाकी
ग्रेटच! एकदम रंगवून मस्तच
ग्रेटच! एकदम रंगवून मस्तच वर्णन केलंय
धन्यवाद प्रीती, थोड्याश्या
धन्यवाद प्रीती, थोड्याश्या सरावने सहज जमते तोंडाने श्वास घेण्याचे तंत्र
अमित, हाफिसातला लोड हा काधी घ्यायचा असतो का? आणि घेतला तर कधी कमी होतो का तो? त्वरित चालू कर पळायला, वाट बघतोय...
धन्यवाद सई, म्हणूनच आख्यान नाव दिलंय
लढ बाप्पू ! अश्याच अनेक
लढ बाप्पू !
अश्याच अनेक शर्यतीत भाग घे आणि आम्हाला यशोगाथा सांग !
हर्पेन, आज सगळी मालीका वाचून
हर्पेन, आज सगळी मालीका वाचून काढली. मी स्वतः ह्या सगळ्यातून गेलो आहे, पण इतका छान शब्दांकन नसतं जमलं. वाचताना, मी प्रत्यक्ष तिथे तुझ्या बरोबर पळतोय असा भास झाला.
आणि तु गरवारेच्या कुठल्या बॅचचा? (मी सुद्धा गरवारेचा म्हणून विचारलं. १९८९ बॅच.)
शाळेत असताना, PYC वर बास्केटबॉल खेळायचो. तेव्हा दर रविवारी अगदी ह्याच मार्गानी (तु जे २ / ३ मार्ग सांगीतले आहेस ते) पळायला जायचो.
रच्याकने : तोंडाने श्वास घ्यायच टेक्नीक मी सुद्धा वापरतो. I know it works !
केदार, अशा अधिकाधिक
केदार, अशा अधिकाधिक शर्यतींमधे भाग घ्यायचा आहेच्चे त्यामुळे तुझ्या शुभेच्छा मोलाच्या आणि गरजेच्या आहेत
RJ - अरे वा! आणि तू पण गरवारेचा म्हणजे मस्तच की, मी ८६ ची बॅच,१०वी ब तुकडी
हर्पेन, जबरदस्त वाटलं हे
हर्पेन,
जबरदस्त वाटलं हे वाचून सुद्धा!
मी तुम्हाला थोपु वर मेसेज टाकला होता, याचसंदर्भात.
जमल्यास प्लीज त्याला रिप्लाय करा ना!
चीअर्स!
लढ बाप्पू ! अश्याच अनेक
लढ बाप्पू ! अश्याच अनेक शर्यतीत भाग घे आणि आम्हाला यशोगाथा सांग ! >> +१
वाचायला एकदम मस्त वाटतेय.
वाचायला एकदम मस्त वाटतेय. अगदी तुमच्या सोबत पळतोय असे वाटते.
मस्तच रे.. हे निगेटिव्ह
मस्तच रे.. हे निगेटिव्ह स्प्लिट माझ्याकडून आपोआप होते असे मला दिसले आहे. ४५-६० मिनिटे पळताना माझी शेवटची १५ मिनिटे फारच जोरात होतात. मी ते करेक्ट करावे असा विचार करतो होतो पण आता नाही करणार!
तोंडाने श्वासवाले टेक्निक माहिती नव्हते. वाचतो जरा त्याबद्दल. मला अजूनतरी १५-२० मिनिटानंतर धाप न लागता बोलता येत नाहिये
अभिनंदन. लिहीलही मस्त
अभिनंदन. लिहीलही मस्त आहे.
धावायच्या टेकनिक्स वर एक लेख लिहा ना प्लिज
हर्पेन, तुम्ही काही आहारात
हर्पेन, तुम्ही काही आहारात बदल केले असतिल तर लिहाल का प्लिज?
हर्पेन, अरे आता क्रमशः ला
हर्पेन, अरे आता क्रमशः ला नाही करवत.. मस्त पेस आहे.. तुझं अख्खं धावणाख्याण एकदम आलं असतं तर वाचुन चक्कर येउन पडले असते.. क्रमशः मुळे जास्त दमत नाहिये मी... सो
ग्रेट आहेस तु.. शनिवारी जाता का कुठे पळायला?
हर्पेन, मस्त लिहीले आहेस.
हर्पेन, मस्त लिहीले आहेस. वाचून मलाही धावणं ट्राय करावंसं वाटायला लागलं आहे. पण अगदी खरं सांगायचं तर तूच सुरूवातीला लिहील्याप्रमाणे मी स्वतःलाच काहीतरी कारणं देत राहते की मला जमणार नाही, ५ मिनीटांतच माझी वाट लागेल वगैरे. तू लिहीलं आहेस तसं इतकं सहज पळणं खरंच शक्य होतं का? आधी काही वॉर्म अप वगैरे करावा लागतो का? सुरूवातीला थोडं चालणं थोडं पळणं असं केलं होतं का?
वा! वा! बालभारतीच्या चढावर
वा! वा!
बालभारतीच्या चढावर वेग वाढवलात हे वाचूनच दम लागला
लांब पल्ल्याचे अंतर पळताना धावपटू गप्पा मारत धावतात ही नवीन माहिती मिळाली.
काय मस्त लिहिले आहे हर्पेन
काय मस्त लिहिले आहे हर्पेन तुम्ही!! त्यात त्या प्रभात रोड परिसराचे वर्णन तर अगदी अगदी भारी!! ( बायदवे मी गरवारे ९९ची.)
बालभारतीचा चढ पळून म्हणजे अगदीच अमानविय शक्ती दिसतीय ही तर!! वाचताना फार भारी वाटले. आमच्याकडून असले कधी होईल का नाही कोण जाणे.
रमड, आपण पळूया का एकत्र? पॅन पॅसिफिक पार्कला!?
बस्के, मला चालेल. पण मला
बस्के, मला चालेल. पण मला पळायची अजिबातच प्रॅक्टीस नाही चालायची आहे फक्त.
जीवनात अशी मजा --एकदम छान .ते
जीवनात अशी मजा --एकदम छान .ते निगेटिव स्प्लिट मान्य .आख्यान वाचून वाटतंय की का नाही मरेथॉनमध्ये भाग घेतला .चार दोन नवीन ओळखी झाल्या असत्या .
Pages