आनंदवनातल्या मुलामुलींशी पत्रमैत्री

Submitted by चिनूक्स on 13 May, 2014 - 00:58

बाबा आमट्यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाबद्दल नव्यानं माहिती देण्याची गरज नाही. बाबांनी वसवलेल्या आनंदाच्या या वनात अनेकांना त्यांच्या आयुष्याचं सुख गवसलं आहे. या आनंदवनात आणि महारोगी सेवा समितीच्या सोमनाथ प्रकल्पात सध्या २५० - ३०० मुलंमुली राहतात. आनंदवन हेच त्यांचं हक्काचं घर आहे.

या मुलामुलींना आनंदवनात आणि सोमनाथला प्रेम, आपुलकी, मैत्री मिळत असली, तरी बाहेरच्या जगातही त्यांचे मित्र, किंवा नातलग असावेत, अशी इच्छा आहे. याचं कारण असं की, यांपैकी काही मुलंमुली अनाथ आहेत. काहींना एकटे पालक वाढवत आहेत. काही मुलामुलींना आनंदवनातल्या रहिवाशांनी दत्तक घेतलं आहे. अनेकांच्या पालकांना त्यांच्या कुटुंबांनी कुष्ठरोगामुळे किंवा अपंगत्वामुळे घराबाहेर काढल्यानं हक्कानं आजी-आजोबा-मामा-आत्या अशी हाक मारता येईल, अशा व्यक्ती नाहीत. काहींचे पालक अंध किंवा मूकबधिर आहेत, तर काहींचे अशिक्षित. त्यामुळे पालकांशी संवाद साधणं, हीदेखील समस्या आहे. या मुलामुलींनी आनंदवनातच त्यांची नाती निर्माण केली असली, आनंदवनवासीयांनी या मुलामुलींना जिव्हाळ्यानं वाढवलं असलं, तरी आनंदवनाबाहेरची नातीही त्यांचं आयुष्य नक्कीच अधिक सुखकर, समृद्ध करतील, असं आम्हांला वाटतं.

त्या दृष्टीनं मायबोलीकरांच्या मदतीनं एक उपक्रम सुरू करावा, अशी इच्छा आहे. आपल्यापैकी अनेकांचे पूर्वी पत्रमित्र होते. उत्तम शाईच्या पेनानं आपण पानंच्या पानं भरून पत्रं लिहीत असू. आपल्या आयुष्यातल्या घडामोडी, गमतीजमती त्यांना कळवत असू.

आनंदवनातल्या या मुलामुलींचे मित्र बनून, किंवा त्यांच्याशी आजोबा-आजी, काका-मामा-मावशी-आत्या असं नातं जोडून तुम्ही त्यांना पत्रं लिहिलीत तर त्यांना खूप आनंद होईल. तीही तुम्हांला पत्रांतून उत्तर देतील. तुमचं जग आणि त्यांचं जग पत्रांच्या माध्यमातून एकत्र यावं, त्यांना आनंदवनाच्या बाहेरही आप्त आणि सुहृद लाभावेत, अशी आमची मनापासून इच्छा आहे.

सध्या शाळांना सुट्ट्या आहेत. तुमच्याशी पत्रातून संवाद साधू शकतील, अशी ५-१८ या वयोगटातली पन्नास मुलंमुली आनंदवनात आहेत. या उपक्रमात तुम्ही सहभागी होऊ इच्छित असाल, तर कृपया या बाफवर तसं लिहा. लवकरच मुलामुलींची नावं इथे आम्ही लिहू, आणि तुम्ही त्यांना पत्रं लिहू शकाल.

या उपक्रमातून तुम्हांलाही आनंदच मिळेल, याची आम्हांला खात्री आहे.

धन्यवाद.

- डॉ. शीतल आमटे, चिनूक्स (चिन्मय दामले), रार (आरती रानडे)

एक महत्त्वाचं - या उपक्रमातून तुम्ही आनंदवनातल्या मुलामुलींना आर्थिक मदत करावी, अशी अजिबात अपेक्षा नाही. तशी मदत करायची असल्यास कृपया महारोगी सेवा समितीच्या शिक्षणविभागाशी संपर्क साधावा. हा उपक्रम केवळ पत्रं लिहिण्यापुरताच मर्यादित आहे.

त्याच अनुषंगाने अजून एक. कुठलाही गैरसमज करून न घेता तुम्ही हे वाचाल अशी अपेक्षा आहे. तुम्ही लिहिलेल्या पत्रांतून मुलांच्या मनांमध्ये कुठल्याही प्रकारच्या न्यूनगंड निर्माण होणार नाही, आपल्या आईवडलांबद्दल, संस्थेबद्दल त्यांना लाज वाटणार नाही, याची कृपया काळजी घ्या. तुम्ही लिहिलेलं पत्र कदाचित तो मुलगा / मुलगी आपल्या वर्गात वाचून दाखवू शकेल, हे कृपया ध्यानात असू द्या. Happy हे लिहिण्यामागे तुमच्या भावनांचा अनादर करण्याचा अजिबात हेतू नाही. मात्र अजाणतेपणी असं होऊ शकतं, म्हणून केवळ हे लिहिलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या उपक्रमाचे सद्ध्याचे स्टेटस काय आहे. माफ करा पण मी आजकाल मायबोलीवर फारसा अ‍ॅक्टिव्ह नसल्याने काही माहिती नाहीये. पण या उपक्रमात सहभागी होण्याची मनापासून इच्छा आहे. धन्यवाद.

उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.

या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांची संख्या बघून अतिशय आनंद झाला आहे. मात्र समोर अनेक अडचणीही आहेत आणि त्यांतून मार्ग काढणं सुरूच आहे.

काही अडचणींमुळे आपण हा उपक्रम टप्प्याटप्प्याने पुढे नेणार आहोत. पहिल्या टप्प्यात या बाफवर नाव नोंदवलेल्या साधारण पंचवीस मायबोलीकरांची नावं मी चिठ्ठ्या टाकून निवडली आहेत. या मायबोलीकरांना मी संपर्कातून ईमेल लिहिली आहे.

ज्यांना या पहिल्या टप्प्यात सहभागी करून घेता आलं नाही, त्यांना आपण लवकरच, म्हणजे येत्या तीनचार महिन्यांत नक्की सहभागी करून घेऊ.
असा उपक्रम आपण पहिल्यांदाच हाती घेत आहोत, शिवाय याचा थेट संबंध आनंदवनातल्या मुलामुलींशी असल्यानं अनेक प्रश्न सोडवत पुढे जावं लागणार आहे. आपण समजून घ्याल, ही प्रामाणिक अपेक्षा आहे. Happy

आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.

धन्यवाद.

Fantastic!!!
I wish to participate
Regards
Vidyadhar keshav kelkar

Pages