आनंदवनातल्या मुलामुलींशी पत्रमैत्री

Submitted by चिनूक्स on 13 May, 2014 - 00:58

बाबा आमट्यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाबद्दल नव्यानं माहिती देण्याची गरज नाही. बाबांनी वसवलेल्या आनंदाच्या या वनात अनेकांना त्यांच्या आयुष्याचं सुख गवसलं आहे. या आनंदवनात आणि महारोगी सेवा समितीच्या सोमनाथ प्रकल्पात सध्या २५० - ३०० मुलंमुली राहतात. आनंदवन हेच त्यांचं हक्काचं घर आहे.

या मुलामुलींना आनंदवनात आणि सोमनाथला प्रेम, आपुलकी, मैत्री मिळत असली, तरी बाहेरच्या जगातही त्यांचे मित्र, किंवा नातलग असावेत, अशी इच्छा आहे. याचं कारण असं की, यांपैकी काही मुलंमुली अनाथ आहेत. काहींना एकटे पालक वाढवत आहेत. काही मुलामुलींना आनंदवनातल्या रहिवाशांनी दत्तक घेतलं आहे. अनेकांच्या पालकांना त्यांच्या कुटुंबांनी कुष्ठरोगामुळे किंवा अपंगत्वामुळे घराबाहेर काढल्यानं हक्कानं आजी-आजोबा-मामा-आत्या अशी हाक मारता येईल, अशा व्यक्ती नाहीत. काहींचे पालक अंध किंवा मूकबधिर आहेत, तर काहींचे अशिक्षित. त्यामुळे पालकांशी संवाद साधणं, हीदेखील समस्या आहे. या मुलामुलींनी आनंदवनातच त्यांची नाती निर्माण केली असली, आनंदवनवासीयांनी या मुलामुलींना जिव्हाळ्यानं वाढवलं असलं, तरी आनंदवनाबाहेरची नातीही त्यांचं आयुष्य नक्कीच अधिक सुखकर, समृद्ध करतील, असं आम्हांला वाटतं.

त्या दृष्टीनं मायबोलीकरांच्या मदतीनं एक उपक्रम सुरू करावा, अशी इच्छा आहे. आपल्यापैकी अनेकांचे पूर्वी पत्रमित्र होते. उत्तम शाईच्या पेनानं आपण पानंच्या पानं भरून पत्रं लिहीत असू. आपल्या आयुष्यातल्या घडामोडी, गमतीजमती त्यांना कळवत असू.

आनंदवनातल्या या मुलामुलींचे मित्र बनून, किंवा त्यांच्याशी आजोबा-आजी, काका-मामा-मावशी-आत्या असं नातं जोडून तुम्ही त्यांना पत्रं लिहिलीत तर त्यांना खूप आनंद होईल. तीही तुम्हांला पत्रांतून उत्तर देतील. तुमचं जग आणि त्यांचं जग पत्रांच्या माध्यमातून एकत्र यावं, त्यांना आनंदवनाच्या बाहेरही आप्त आणि सुहृद लाभावेत, अशी आमची मनापासून इच्छा आहे.

सध्या शाळांना सुट्ट्या आहेत. तुमच्याशी पत्रातून संवाद साधू शकतील, अशी ५-१८ या वयोगटातली पन्नास मुलंमुली आनंदवनात आहेत. या उपक्रमात तुम्ही सहभागी होऊ इच्छित असाल, तर कृपया या बाफवर तसं लिहा. लवकरच मुलामुलींची नावं इथे आम्ही लिहू, आणि तुम्ही त्यांना पत्रं लिहू शकाल.

या उपक्रमातून तुम्हांलाही आनंदच मिळेल, याची आम्हांला खात्री आहे.

धन्यवाद.

- डॉ. शीतल आमटे, चिनूक्स (चिन्मय दामले), रार (आरती रानडे)

एक महत्त्वाचं - या उपक्रमातून तुम्ही आनंदवनातल्या मुलामुलींना आर्थिक मदत करावी, अशी अजिबात अपेक्षा नाही. तशी मदत करायची असल्यास कृपया महारोगी सेवा समितीच्या शिक्षणविभागाशी संपर्क साधावा. हा उपक्रम केवळ पत्रं लिहिण्यापुरताच मर्यादित आहे.

त्याच अनुषंगाने अजून एक. कुठलाही गैरसमज करून न घेता तुम्ही हे वाचाल अशी अपेक्षा आहे. तुम्ही लिहिलेल्या पत्रांतून मुलांच्या मनांमध्ये कुठल्याही प्रकारच्या न्यूनगंड निर्माण होणार नाही, आपल्या आईवडलांबद्दल, संस्थेबद्दल त्यांना लाज वाटणार नाही, याची कृपया काळजी घ्या. तुम्ही लिहिलेलं पत्र कदाचित तो मुलगा / मुलगी आपल्या वर्गात वाचून दाखवू शकेल, हे कृपया ध्यानात असू द्या. Happy हे लिहिण्यामागे तुमच्या भावनांचा अनादर करण्याचा अजिबात हेतू नाही. मात्र अजाणतेपणी असं होऊ शकतं, म्हणून केवळ हे लिहिलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे वाचलेच नव्हते. त्याबद्दल सॉरी.

मी तरी नक्की पत्र लिहिणार. Happy मला पत्रं लिहायला खूप आवडतं. गेल्या कित्येक वर्षात पत्रं लिहीलीच नाहीयेत.

खरंच अतिशय स्तुत्य उपक्रम. अशी संधी आम्हा साऱ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार.

पत्र लिहिणारच.. शंकाच नाही.

मला खूप खूप आवडेल कारण आजही मी माझ्या मुलींना परदेशात पोस्टाने पत्रे लिहितो.

प्लीज प्लीज मला या उपक्रमात घ्या

पत्र लिहायची कल्पना अतिशय छान आहे.

फक्त एक शंका आहे, पत्रलेखनात सातत्य असणं अनिवार्य आहे ना?

नाहीतर उत्साहानी "मी पण पत्र लिहिणार" असं म्हणून जाईन पण नंतर वेळच्या वेळी उत्तर पाठवायला नाही जमलं तर आपल्या उत्तराची वाट पाहणा-या कोणा लहानग्याचा भ्रमनिरास व्हायला नको.......

उत्तर द्यायला आणि हा उपक्रम जाहीर झाल्यानंतर सुरू करायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.
काही अनपेक्षित अडचणींवर मार्ग काढायचं काम सुरू आहे. गणपतीनंतर याबद्दल नक्की सविस्तर लिहितो. साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत हा उपक्रम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

गेल्या वर्षी जाहीर करूनही हा उपक्रम सुरू करता आला नव्हता. तो आता या वर्षी सुरू करण्याची इच्छा आहे.
अनेकांनी इथे या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यांच्याशी लवकरच संपर्क साधू. नव्यानं कोणाला नावं नोंदवायची असतील, तर ती इथे लिहू शकता. किंवा आधी नावं नोंदवलं असेल, आणि आता उपक्रमात सहभागी होणं शक्य नसेल, तर तसंही कृपया कळवा.

धन्यवाद.

माफ करा, पण पहिलाच शब्द 'बाबा आमट्यांनी' असा आहे तो वाचताना खटकतो
तोच जर 'बाबा आमटे यांनी' असा केलात तर कसे वाटेल?

चिनूक्स

मलाही सहभागी व्हायला आवडेल.
ईंग्रजीतून लिहीलेले चालेल का? माझ्या मुलीलाही लिहायची इच्छा आहे. ती ९ वर्षांची आहे.

सर्व प्रथम मी मुद्दाम कळवितो की आदरणीय स्व.बाबा आमटे यांनी आनंदवन येथे भरविलेल्या पहिल्या " श्रम-संस्कार " शिबिराचा मी ही एक शिबिरार्थी होतो.आम्ही धुळे येथून खास तेथे आलो होतो.
मी पत्रलेखनात सहभागी होणार आहेच. मला पत्रलेखनाची खुप आवड आहेच.मित्र वा नातेवाईक यांनी माझ्या पत्रांना उत्तरे देण्याचे थांबविले म्हणून माझे पत्र लेखन सध्या स्थगित आहे.
उपक्रम चांगलाच आहे. मी आजोबा म्हणून पत्र लेखन करावयास उत्सूक आहे. माझे वय ६८ वर्षे आहे.
माझे हस्ताक्षर आपण पहालच आणि आपणच कळवाल की ते कसे आहे.
लवकर प्रतिसाद द्यावा.

ज्यांना फक्त इंग्रजीतुनच पत्र लिहिता येणार आहे, त्यांच्यासाठी मी मराठीत भाषांतर करून देवू शकतो. माझ्या व्यनि वर पाठवावे. त्यांच्या नावाने मी पत्र पाठवीन. विचार तुमचे, अक्षर माझे ! !

फक्त एक शंका आहे, पत्रलेखनात सातत्य असणं अनिवार्य आहे ना?

नाहीतर उत्साहानी "मी पण पत्र लिहिणार" असं म्हणून जाईन पण नंतर वेळच्या वेळी उत्तर पाठवायला नाही जमलं तर आपल्या उत्तराची वाट पाहणा-या कोणा लहानग्याचा भ्रमनिरास व्हायला नको....... ++ 1111

मलादेखिल भाग घ्यायचा आहे.. पण महिन्यातून/वर्षातून साधारण किती वेळा पत्र लिहिणे अपेक्षित आहे??

रैना,

इंग्रजीतून पत्र लिहिता येतील का, याची चाचपणी सुरू आहे.

माणिकमोती,

अशी काही निश्चित संख्या ठरवलेली नाही. मात्र मुलांच्या पत्राला वेळेवर उत्तर न गेल्यास ती हिरमुसतील. तेव्हा थोडंफार सातत्य आवश्यक आहे. Happy

Pages