आनंदवनातल्या मुलामुलींशी पत्रमैत्री

Submitted by चिनूक्स on 13 May, 2014 - 00:58

बाबा आमट्यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाबद्दल नव्यानं माहिती देण्याची गरज नाही. बाबांनी वसवलेल्या आनंदाच्या या वनात अनेकांना त्यांच्या आयुष्याचं सुख गवसलं आहे. या आनंदवनात आणि महारोगी सेवा समितीच्या सोमनाथ प्रकल्पात सध्या २५० - ३०० मुलंमुली राहतात. आनंदवन हेच त्यांचं हक्काचं घर आहे.

या मुलामुलींना आनंदवनात आणि सोमनाथला प्रेम, आपुलकी, मैत्री मिळत असली, तरी बाहेरच्या जगातही त्यांचे मित्र, किंवा नातलग असावेत, अशी इच्छा आहे. याचं कारण असं की, यांपैकी काही मुलंमुली अनाथ आहेत. काहींना एकटे पालक वाढवत आहेत. काही मुलामुलींना आनंदवनातल्या रहिवाशांनी दत्तक घेतलं आहे. अनेकांच्या पालकांना त्यांच्या कुटुंबांनी कुष्ठरोगामुळे किंवा अपंगत्वामुळे घराबाहेर काढल्यानं हक्कानं आजी-आजोबा-मामा-आत्या अशी हाक मारता येईल, अशा व्यक्ती नाहीत. काहींचे पालक अंध किंवा मूकबधिर आहेत, तर काहींचे अशिक्षित. त्यामुळे पालकांशी संवाद साधणं, हीदेखील समस्या आहे. या मुलामुलींनी आनंदवनातच त्यांची नाती निर्माण केली असली, आनंदवनवासीयांनी या मुलामुलींना जिव्हाळ्यानं वाढवलं असलं, तरी आनंदवनाबाहेरची नातीही त्यांचं आयुष्य नक्कीच अधिक सुखकर, समृद्ध करतील, असं आम्हांला वाटतं.

त्या दृष्टीनं मायबोलीकरांच्या मदतीनं एक उपक्रम सुरू करावा, अशी इच्छा आहे. आपल्यापैकी अनेकांचे पूर्वी पत्रमित्र होते. उत्तम शाईच्या पेनानं आपण पानंच्या पानं भरून पत्रं लिहीत असू. आपल्या आयुष्यातल्या घडामोडी, गमतीजमती त्यांना कळवत असू.

आनंदवनातल्या या मुलामुलींचे मित्र बनून, किंवा त्यांच्याशी आजोबा-आजी, काका-मामा-मावशी-आत्या असं नातं जोडून तुम्ही त्यांना पत्रं लिहिलीत तर त्यांना खूप आनंद होईल. तीही तुम्हांला पत्रांतून उत्तर देतील. तुमचं जग आणि त्यांचं जग पत्रांच्या माध्यमातून एकत्र यावं, त्यांना आनंदवनाच्या बाहेरही आप्त आणि सुहृद लाभावेत, अशी आमची मनापासून इच्छा आहे.

सध्या शाळांना सुट्ट्या आहेत. तुमच्याशी पत्रातून संवाद साधू शकतील, अशी ५-१८ या वयोगटातली पन्नास मुलंमुली आनंदवनात आहेत. या उपक्रमात तुम्ही सहभागी होऊ इच्छित असाल, तर कृपया या बाफवर तसं लिहा. लवकरच मुलामुलींची नावं इथे आम्ही लिहू, आणि तुम्ही त्यांना पत्रं लिहू शकाल.

या उपक्रमातून तुम्हांलाही आनंदच मिळेल, याची आम्हांला खात्री आहे.

धन्यवाद.

- डॉ. शीतल आमटे, चिनूक्स (चिन्मय दामले), रार (आरती रानडे)

एक महत्त्वाचं - या उपक्रमातून तुम्ही आनंदवनातल्या मुलामुलींना आर्थिक मदत करावी, अशी अजिबात अपेक्षा नाही. तशी मदत करायची असल्यास कृपया महारोगी सेवा समितीच्या शिक्षणविभागाशी संपर्क साधावा. हा उपक्रम केवळ पत्रं लिहिण्यापुरताच मर्यादित आहे.

त्याच अनुषंगाने अजून एक. कुठलाही गैरसमज करून न घेता तुम्ही हे वाचाल अशी अपेक्षा आहे. तुम्ही लिहिलेल्या पत्रांतून मुलांच्या मनांमध्ये कुठल्याही प्रकारच्या न्यूनगंड निर्माण होणार नाही, आपल्या आईवडलांबद्दल, संस्थेबद्दल त्यांना लाज वाटणार नाही, याची कृपया काळजी घ्या. तुम्ही लिहिलेलं पत्र कदाचित तो मुलगा / मुलगी आपल्या वर्गात वाचून दाखवू शकेल, हे कृपया ध्यानात असू द्या. Happy हे लिहिण्यामागे तुमच्या भावनांचा अनादर करण्याचा अजिबात हेतू नाही. मात्र अजाणतेपणी असं होऊ शकतं, म्हणून केवळ हे लिहिलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी सांगितले आहे बहुदा. मी आणि माझी 11 वर्षांची मुलगी यात भाग घेऊ इच्छितो. ती इंग्रजी मध्ये पत्र लिहू शकेल ते आणि त्याचा मी केलेला अनुवाद पाठवू. चालेल का?
तसेच, हे ही आधी लिहिले आहे पण परत विचारते. भारतातून इतर देशात पत्र पाठवायला जो खर्च येईल त्यातही वाटा उचलायचा असेल तर काय करावे? डोनेशन त्यांना डायरेक्ट द्यायचे की स्टॅम्प/पत्र पुरवायची?

वत्सला,
सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद Happy

पत्रांची पाठवापाठवी फारशी खर्चिक होऊ नये, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. त्याबद्दल लवकरच इथे लिहितो. आर्थिक साहाय्य कसं करता येईल, तेही इथे लिहितो.

खुप सुंदर उपक्रम आहे. मला आवडेल सहभागी व्हायला. इतक्या वर्षांनी पुन्हा हस्तलेखनाचा सरावही होइल. चिन्मय, नावाची यादी आणि संपर्काचा पत्ता कृपया लवकर द्या. धन्यवाद !

चिनूक्स,
मलाही या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल.

मलाही आवडेल नक्की, चिनूक्स.
ज्या मुलांना आम्ही पत्र मित्र म्हणून लिहिणार आहोत, त्यांच्याबिषयी काही माहिती मिळू शकेल का? जेणेकरून अनवधाने काही लिहिणं, सुचवणं होऊ नये. तसच काही ठोस नियम आधीच सांगण्यात यावेत.
ह्यामधे लहानग्यांच्या मनाचा विचार करूनच मी वरील सूचना करते आहे.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. Happy

असा उपक्रम सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अनेक अडचणी उद्भवू शकतात. हा विचार करून आपण सुरुवातीला तीन महिन्यांसाठी जरा छोट्या प्रमाणात हा उपक्रम सुरू करणार आहोत. या तीन महिन्यांत उपक्रमात येऊ शकणार्‍या अडचणींची पूर्ण कल्पना येऊन उपक्रम सुरळीत चालू होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर जास्तीत जास्त मायबोलीकरांना या उपक्रमात सामील होता येईल. सुरुवातीला सगळ्यांनाच उपक्रमात सामील करून घेता आलं नाही, तरी तीन महिन्यांनी मात्र उपक्रमाची व्याप्ती निश्चितच वाढवता येईल.

आनंदवनात अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात. बहुतेकांना कोणीच नातलग नाही. या ज्येष्ठांनाही मायबोलीकरांनी पत्रं लिहावीत, अशी इच्छा आहे. त्याबाबतीतही इथे लवकरच लिहितो.

पत्रं कोणाला उद्देशून लिहायची, किती लिहायची, ही सर्व माहिती येत्या काही दिवसात या बाफावर आणि संपर्कातून तुम्हांला कळवतो.

मात्र ही पत्रं फक्त इंग्रजीतून नसावीत. मुलांनी इंग्रजीत पत्रं लिहिली, तरी पालकांनी त्या पत्रांचं मराठी भाषांतर सोबत जोडावं, हे शक्य होईल का? तसं झाल्यास मुलं पत्र सहज वाचू शकतील. इंग्रजीचा अर्थ लावण्यात वेळ गेल्यास त्यांचा रस कमी होईल, असं वाटतं.

दाद,
पत्र लिहिताना काय काळजी घ्यावी, ती कोणाला उद्देशून असावीत, याबद्दल लवकरच कळवतो.

सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

मला मुलं व ज्येना असं दोघांनाही पत्र लिहायला आवडेल.

त्यांचं पण आपल्याला उत्तर येईल/येवू शकेल का? आलं तर त्यांचीही खबरबात, प्रगती, खुशाली कळेल व त्यानुसार पुढल्या पत्रात लिहिता येईल.

मलाही आवडेल यात भाग घ्यायला. लहान मुले आणि ज्येना दोघांनाही लिहेन मी पत्र. कसा भाग घ्यायचा ते क्रूपया कळवा.

मराठी सुधारतंय माझं. जमेल मलाही मराठीत लिहायला. ज्ये नां नाही तरी मुलांना नक्कीच लिहु शकेन. अधिक माहितीच्या प्रतिक्षेत.

मला आवडेल सहभागी व्हायला. मराठी , इंग्लीश दोन्ही भाषातून लिहु शकेन पत्र.
भारता बाहेर राहात असल्यामुळे पत्र पाठवण्याचा खर्च उचलू शकेन.

मला खुप लिहाय्ला आवडेल. खास करुन कुणाला चित्र्कला, सुलेखन आवडत असेल त्या विद्यार्थ्याशी / विद्यार्थिनी शी

Pages