मार्च महीण्यातले रणरणते उनं..गावातला आठवडी बाजार गच्च फुललेला होता..लग्नसराईचे दिवस असल्यानं सगळ्याच दुकानवजा पालावर आजुबाजुच्या खेड्यावरील बाया,माणसे,मुला-मुलींची गर्दी मावत नव्हती..ज्या मुलींची लग्न ठरलेली होती त्या मैत्रिणीसोबत कटलरी-स्टेशनरी च्या दुकानावर 'नकपालीस',मेंदीकोण,पावडर,लाली,चमकी,बिंदी,'भारी'चे सेंट,हातरुमाल,छोटे आरसे घेतांना मध्येमध्येच वेड लागल्यागत खुदकन हसत होत्या..या सगळ्यामध्ये बिचार्या दुकानदाराची त्रेधातिरपिट उडत होती..
यावेळेस जनासेठच्या कपड्याच्या दुकानात बरीच गर्दी होती..लगनसराईचा भरपुर माल वाढवलेला होता..पातळे,साड्या,परकर,रुमाल,टोप्या,लुगडे,पिस व काही रेडीमेड कपड्यांनी दुकान खचाखच भरले होते..दोन नोकरांना दम नव्हता..मध्येच जनासेठही, ''बाई,कपडा पाह्य हात लावून..गादीपेक्षा नरम लागते का नाही..पोलिस्तर थोडीच हाये ते'' अशी वाक्य फेकत मध्येच ''रामराम हो पाटील..या काय दाखवू?? अशी आवभगत करीत होते..
रामकिसन हलवाई अन त्याची बायको गरमागरम जिलेबी-भजे काढण्यात गुंग होती..बाजारात थकली-भागली माणसं तिथच पालात बसून त्यावर ताव मारीत होती..भट्टीवर रामकिसन असल्यानं त्याच्या टकलातून येणारा मार्चचा पावसाळा तो राहून राहून त्याच्या ओल्यागच्च झालेल्या लाल रुमालाला पुसत होता..समोरच्या तंबाखुवाल्या सदाला केव्हाची भूक लागली होती..भजे-जिलेबी बघून मन कातावत होतं..पण बहुदा टकलावरच्या थेंबानी कढईत मारलेली उडी त्याच्या लक्षात आली असावी म्हणुन गरम झालेल्या बिसलरीतले दोन घोट बळेबळे त्याने घशाखाली टाकले..
अफजलमामू 'पानssपानss' म्हणुन नागेलीच्या पानावर पाणी शिंपून गिर्हाईक करत होता..मध्येच गोल टोपी काढून डोक्यात आलेला घाम टोपीनेच टिपत होता..कांदे-बटाटे-लसणवाले ठोक बेपारी गणीभाईने निवांत पुण्यनगरी चाळत मध्येच मिल्टनच्या बाॅटलमधले थंडगार पाणी घशात ओतले..व समोरुन गळ्यात पत्र्याची पेटी अडकवून पान -तंबाखु,खर्रा,पुड्या इ.माल ठेवून चालत्या-बोलत्या पानटपरीला म्हणजे माधाला हाळी देवून दोन 'कलकत्ता,ज्यादा तंबाखु,बारीक शुप्यारी,किमाम मारके' पानाची ओर्डर देवून डोक पेपरात घुसवल..त्याचे चार-चार नोकर गिर्हाईक करतांना घालमेलीस आलेले होते..
अशीच 'बेपारी' लाईन सोडून पलिकडच्या शेतकर्यांच्या लाईनी होत्या..खताच्या रिकाम्या पोत्यावर माल टाकलेला,काहींचा टोपल्यात वर पाल नाही पण काहींच्या मोडक्यातोडक्या छत्र्या,काहींच्या डोक्यावर फडके..व तेलाच्या रिकाम्या झालेल्या पंधरा लिटरच्या कॅनला ओलं फडकं बांधून जिवाचा बाजार सुरु होता..
लख्या..जेमतेम नऊ-दहा वर्षाच पोरगं..उन्हानं म्हणा की जन्मतःच म्हणा,काळाठिक्कर चेहरा..कैक दिवसात अंघोळ-तेलपाणी न मिळाल्याने राठ झालेले केस..हातापायावरचा मळ दुरुनही स्पष्ट
लक्षात येईल इतका..अनवाणी..खाकी हाफपॅन्ट..मागून बरोबर फाटलेली..करदोड्याने टाईट केलेली..शर्ट दोन्ही बाह्यावर फाटलेला..आणि त्याच्यासारखाच मळका..डोळे सतत भिरभिर..हातात कसलीशी एक छोटी डब्बी...आणि अशा अवतारात ही मुर्ती अवघा बाजार पायाखालून घालत होती..माय याच्या जन्मासोबत वर गेलेली..एक मोठी बहिण गुदस्ता लग्न झालेली..बिचारी मनासारखा हुंडा देता आला नाही म्हणून गरीबाघरी पडलेली..अन लग्नाच कर्ज,अवकाळी पावसानं खचलेल्या 'बा' दोन महिण्यापूर्वी फाशी घेवून 'मायला' भेटायला गेलेला..याच्या बापाची उरलीसुरली दोन ऎकर चुलत्यांनी कांगावा करून हडपलेली..त्यामुळे 'आपलं' म्हणावं अस कुणी नसलेला हा 'लख्या' ,मिळेल तस खात,मिळेल तस पित..जगत होता..
टोप्यावाल्या दुकानाशी येवून तो रेंगाळला..लाल,पिवळ्या,पांढर्या किती मस्त दिसत होत्या..'मायला मोठं झालो की मी बी यक घिन अशी..''मनातल्या मनात पुटपुटत तो फोटोवाल्याच्या दुकानापुढे उभा राहिला..फोटोतल्या निसर्गात,धबधब्यात,मोठ्ठ्या घरात तो हरवून गेला..''ऎ चल रे.. हट उधर''..दुकानवाल्याचा आवाज आला अन..त्याच्याकडे जळजळीत पाहत तो पुढे,सरकला..खेळण्याच्या गाडीवरची खेळणी पाहायला..तो अगदी जवळ उभा राहीला...तो लहान हत्ती हातात घेणार तोच दुकानदाराची काठी त्याच्या हातावर बसली..हात चोळत ''ह्याच्या मा...'' पुटपुटत तो निघाला..टरबुजवाल्याने फार मोठा पाल लावला होता..दोन मिनिट तो तिथे स्थिरावला...हिरवे हिरवे,गावरान टरबुज,महिकोचे सापासारखी नक्षी असणारे संकरीत टरबुज...पाहूनच कसं थंडगार वाटत होत...निघायची ईच्छा नव्हती पण थांबुनही काही साध्य नव्हत..
फिरत फिरत तो पुढ चालत होता..पाय भाजून निघत होते..एक-एक पाय लवकर लवकर उचलून तो त्यांना आराम देत होता..गरमीने सगळं अंगाला खाज येत होती..
इतक्यात त्याच्या नाकात भजे आणि जिलेबीचा खमंग सुगंध भरला..वासाचा शोध घेत तो रामकिसनच्या दुकानापर्यन्त आला...बराच वेळ गोल गोल अढ्याची पाकात भिजलेली जिलेबी..वेगवेगळ्या आकाराचे भजे बघून त्याला कसनुसं होवू लागलं.. ''काय फायजे रं पोरा?'' रामकिसनच्या जबरी आवाजान तो दचकला..मानेनच 'काय नाही' अस सांगितल..''मंग जाय की तिकडं..हिथ का उभा ठाकलास..'?? रामकिसन डोळ्यांनी दटावत म्हणाला..
लख्या जरा रामकिसनला दिसणार नाही अशा बेतात अलिकडे आला..काहीतरी मनात ठरवल होत त्यान..तो फक्त योग्य संधी बघत होता..इतक्यात एका लुगड्यावाल्या बाईन एक पाव जिलेबी मागीतली..रामकिसनच्या बायकोने एक पाव जिलेबी मोजून तिथेच जिलेबीच्या ताटात ठेवली..अन पैशाची वाट पाहू लागली..म्हातारीने कमळाला हात घालत कमरेची पिशवी काढली..अन इतक्यात लख्याने वार्याच्या वेगाने येवून जिलेबीच पुडकं उचललं नी जिवाच्या आकांतान पळायला सुरुवात केली..रामकिसनच्या बायकोने गलका करताच भट्टीवर आडवा झार्या ठेवून रामकिसन लख्याच्या पाठी धावला...
पण लख्या कसला गावतो..दुकानाच्या रांगा ओलांडत..धक्के खात,धक्के देत...तो पळतच होता..शाळेच्या मागे पळता पळता एक भली मोठी बाभळीची फांदी ओरबाडली व ती चुकवायच्या नादात त्याचा तोल गेला..तो नेमका शेजारच्या चिखलाच्या डबक्यात...पण जिलेबीच्या पुडक्याला त्याने चिखलाचा स्पर्श होवू दिला नाही...सगळा चिखलानं बरबटलेला...हातापायाचे कोपर-ढोपर सोलून लख्या बाहेर आला...मागे कुणाचा मागमूस दिसत नव्हता..
निवांत चालत तो शाळेजवळच्या हापशीवर आला..पुडकं जवळच्या लिंबाच्या झाडाच्या सावलीत ठेवलं...हापशी एकदा हापसून तो पटकन धारेखाली बसायचा..खुप बरं वाटत होत..अगदी सगळा चिखल निघून गेल्यावरही बराच वेळ त्याचा खेळ सुरु होता...
बर्याच वेळानंतर त्याला जिलेबीची आठवण झाली..पटकन ऒलेत्या कपड्यानिशी धावत तो पुडक्याकडे आला...पाहतो तो काय...लिंबाच्या थंडगार सावलीत अर्धी अधिक जिलेबी खाऊन दोन कुत्र्यांची पुडक्यासाठी झोंबाझोंबी चालू होती..
उन्हाने आता चांगलाच जोर धरला होता...बाजार जिवांना चांगलाच राबवून घेत फुलून आला होता..!!
-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
आवडली, खूप काही सान्गुन
आवडली, खूप काही सान्गुन गेली...
मनपुर्वक धन्स.. रे
मनपुर्वक धन्स.. रे
छान कथा !
छान कथा !
छान.
छान.
आवडली.
आवडली.
कंसराज,सुसुकु,सायो आपणा
कंसराज,सुसुकु,सायो आपणा तिघाचाही दिलसे शुक्रगुजार..
आवडली. खुप छान
आवडली. खुप छान
मनापासून आभार. पलक
मनापासून आभार. पलक
अत्यंत सुरेख जमलेली कथा. कसं
अत्यंत सुरेख जमलेली कथा. कसं शब्दसामर्थ्य आहे... वाह.
शेवट वाचून..
शेवट वाचून..
......नि:शब्द
......नि:शब्द ........
लेखनशैली फारच सुंदर ....... डोळ्यांसमोर सगळं काही उभी करणारी ...
छान आहे.... बाजाराचे चित्र
छान आहे....
बाजाराचे चित्र डोळ्यासमोर उभे राहीले.....
शेवट मात्र.......अरेरे
दाद,झंपी,पुरंदरे शशांक,
दाद,झंपी,पुरंदरे शशांक, रविकांत समस्त जिवलगांचे मनपुर्वक आभार..आपनास कथा आवडली हे वाचून लिहिण्याचा हुरूप आला ..
छान आहे. वास्तववादी आहे.
छान आहे. वास्तववादी आहे. गावातील खरोखरचा बाजार वाट्तो. असेच लिहित राहा.
निशिगंध ग्रेट रे... किती
निशिगंध ग्रेट रे... किती सुंदर लिहितोस जियो बहाद्दर......
पुढील लेखनास शुभेच्छा
प्रियाजी,स्नेहनिलजी दोघींचेही
प्रियाजी,स्नेहनिलजी दोघींचेही मनापासून धन्यवाद
मस्त !!!
मस्त !!!
मस्त आहे कथा!
मस्त आहे कथा!
कथा आवडली.
कथा आवडली.
मस्त आहे कथा
मस्त आहे कथा
कथा आवडली. बाजाराचे चित्र
कथा आवडली. बाजाराचे चित्र मस्त रंगवले आहे.
पियू..... रंगासेठ....
पियू.....
रंगासेठ....
स्वाती२....
आशिका.....
अनघा.....
मान्यवर स्नेहीजनांनो तुमच्या पाठ थोपटणार्या प्रत्येक अभिप्रायासाठी सलाम...असाच लोभ असू द्यावा... !!
चित्र डोळ्यासमोर उभं करणारी
चित्र डोळ्यासमोर उभं करणारी वर्णनशैली, भाषेचा बाज उत्तम जमलंय. मस्तच. लिहीत राहा. पुलेशु.
मनपुर्वक आभार ड्रिमगर्लजी..
मनपुर्वक आभार ड्रिमगर्लजी..
चित्र डोळ्यासमोर उभं करणारी
चित्र डोळ्यासमोर उभं करणारी वर्णनशैली, >> ++
कथा आवडली.
>> चित्र डोळ्यासमोर उभं
>> चित्र डोळ्यासमोर उभं करणारी वर्णनशैली,
+१
कथा छान रंगवली आहे ..
छान कथा, कथानक .. आणि छान
छान कथा, कथानक .. आणि छान रंगवली आहे
सावली.... सशल....
सावली....
सशल....
अभिषेक..... मित्रवर्यहो __/!\__
कुणाच्याही वाट्याला लख्या
कुणाच्याही वाट्याला लख्या सारख आयुष्य येऊ नये , हृदयस्पर्शी कथा
खरयं preetiiii ji...पण समाजात
खरयं preetiiii ji...पण समाजात कैक असे लखन अजूनही सुर्योदयाच्या प्रतिक्षेत आहेत...आपल्या अवतीभवती नजर फिरवली तर बरेच सापडतील.. शोकांतिका आहे...!!
अभिप्रायासाठी धन्स..
Pages