नुकतेच एका सुंदर टेड टॉकचे मराठीत भाषांतर केले. मूळ टॉक इतका सुरेख आहे की भाषांतर करताना कुठेही अडखळायला झालं नाही आणि आपल्या मराठी भाषेची गोडी आणि समृद्धी दोन्ही जाणवली. पण कोणत्याही चांगल्या कलाकृतीचे/अभिव्यक्तीचे एक परिमाण हेही असते की ती कलाकृती इतरांना प्रेरणा देते. आणि ह्या भाषांतरादरम्यान असेच झाले. ह्या टॉकशी संबंधित जे अनेक नवे विचार/पैलू डोक्यात येत राहिले ते कागदावर उतरवण्याचा हा प्रयत्न. ह्या टॉकचे निरुपण/रसग्रहणच म्हणा ना. अर्थात मूळ टॉक ऐकून हा लेख वाचला तर तो अधिक भावेल पण स्वतंत्रपणे लेख म्हणून लिहिण्याचादेखील प्रयत्न केला आहे.
आपल्या भाषणात ब्रेने ब्राऊन म्हणतात, अगतिकता ही सुखाची किल्ली आहे. तिला दाबून टाकू नका. आजच्या जगात अनेक गोष्टी आपल्याला अगतिक करत असतात. महागाई, भ्रष्टाचार, प्रदूषण, “लोकं काय म्हणतील?” ई. ई. आणि ही अगतिकता चांगली गोष्ट आहे असं कुणी सांगितलं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. पण थोडा विचार केला तर जाणवतं की हे खरं आहे. असं कसं?
माणसाला जगण्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे नातेसंबंध. ह्या संबंधांमुळेच आपल्या आयुष्यातल्या अनेक बऱ्या-वाईट घटना घडत असतात. हे संबंध जोडण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आवश्यक असते पारदर्शकता. आपण जसे आहोत तसे जगासमोर/ त्या व्यक्तीसमोर येणे. पण तसे होत नाही. कारण आपल्याला प्रत्येकाला कुठेतरी, कशाचीतरी लाज/शरम वाटत असते. आपण स्वतःच्या आदर्श व्यक्तिचित्रापेक्षा कुठेतरी कमी असतो. ही कमतरता आपल्याला अगतिक बनवते. जे वेदनादायी असू शकतं. मग आपण मुखवटे चढवू लागतो. संबंध जोडण्यासाठी/टिकवण्यासाठी आपल्यापेक्षा वेगळे वागू लागतो. आणि याचा एकच परिणाम होतो – आपण अधिक अगतिक होतो! मग हे दुष्टचक्र भेदायचे कसे? आणि कुठे? तर ते भेदायचे अगतिकतेपाशी. जी ह्या साऱ्याचे मूळ आहे. हे मान्य करून की अगतिक असणं ही एक चांगली गोष्ट आहे. हे जिवंतपणाचं लक्षण आहे. हे स्वतःशी प्रामाणिकपणे कबुल करायला हवं. मग आपल्याला आपण जसे आहोत तसे जगासमोर येण्याची लाज वाटणार नाही! एकदा का तुम्ही पारदर्शक झालात की गोष्टी सोप्या होऊ लागतील! The truth shall make you free!
आणि ह्या सच्चाईने जगणारी अनेक माणसं या जगात असतात. ब्रेने ब्राऊन त्यांना “सहृदयी” म्हणतात. ह्या लोकांनी अगतिकतेला सकारात्मक पद्धतीने स्वीकारलेलं असतं. ही लोकं इतरांवर प्रेम करू शकतात, इतरांशी संबंध जोडू शकतात कारण त्यांचं स्वतःवर स्वतःच्या अगतिकतेसकट, गुणदोषांसकट प्रेम असतं. इथे मला आठवला इंग्लिश-विन्ग्लीश! त्यात शेवटी शशी तिच्या फ्रेंच मित्राला सांगते, “जेव्हा तुम्ही तुम्हाला स्वतःला आवडत नसता तेव्हा स्वतःबद्दलच्या सर्वच गोष्टी आवडेनाश्या होतात. Thank you, मला स्वतःवर प्रेम करायला शिकवण्यासाठी, thank you for making me feel good about myself!” आपण कोणीच परफेक्ट नसतोच पण जसे असतो तसे स्वतःला स्वीकारणे हीच सकारात्मक बदलाची पहिली पायरी आहे.
ब्रेने ब्राऊन म्हणतात, ज्या गोष्टी तुम्हाला अगतिक करतात त्या तुम्हाला सुंदर बनवतात. मला आठवले ते बाबा आमटे, अभय बंग, नसीमा हुरजूक, सिंधुताई सपकाळ! ही समाजकार्य करणारी माणसे सदैव अगतिक असतात – अनंत अडचणी, पैशाचा प्रश्न, एकूणच विपरीत परिस्थिती. पण जर तुम्ही त्यांना विचाराल तर ह्या अगतिक करणाऱ्या गोष्टीच त्यांना काम करण्याची प्रेरणा देत असतात. त्यांच्या देखण्या हातांतून “सुंदराने गंधलेले मंगलाचे सोहोळे” घडवीत असतात! नुकतंच मी Harvard Business Review मधल्या एका लेखात वाचलं, त्यांनी जगातील सर्वोत्तम कंपन्यांमधल्या उच्चपदस्थ व्यक्तिंना विचारलं की तुम्हाला सर्वाधिक आनंद/समाधान कशातून मिळतं? उत्तर काय होतं माहित्येय? अवघड प्रश्न/समस्या सोडवण्यात! क्ष आकडी पगार किंवा य आकडी बोनसमध्ये नाही! हे वाचताक्षणीच पुन्हा क्लिक झालं! त्या अवघड समस्येतली अगतिकताच प्रेरणादायी ठरत असते! सामाजिक कार्यकर्त्यांना आणि बड्या कंपन्यांच्या उच्चपदस्थांनादेखील!
लहान मुलांकडे पाहिलं की अगतिकतेमधलं सुख कळतं! लहान असताना किती अगतिक असतो आपण! पण जसे मोठे होऊ लागतो तसे आपण अगतिकता नष्ट करण्याच्या प्रयत्नांमध्ये गुंततो. ही अगतिकता नाहीशी करण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी certain, predictable करायला जातो! ते चुकीचे आहे! त्याने जगण्यातली मजाच निघून जाते! थोडीशी insecurity, अगतिकता आपल्याला सतत सुंदर, नवीन आणि अधिक उत्तम काहीतरी करण्याची प्रेरणा देते. माझाच अनुभव. PhDच्या दुसऱ्या वर्षात माझे सगळे प्रयोग फेल जात होते. मला फार निराश वाटायचं! मला failures ची सवय राहिली नव्हती. ही अगतिकता मी खूप वर्षांत अनुभवली नव्हती. आता PhDच्या पाचव्या वर्षात कळतंय की हे क्षेत्रच असं आहे. Research ही अगतिक होऊन करण्याची गोष्ट आहे. तुम्ही अज्ञाताच्या मागावर असता आणि अपयश हा त्याचा अविभाज्य भाग आहे. आणि त्या अगतिकतेतच संशोधनाचा आनंद दडलेला असतो! जो आता मला अनुभवता येतो!
साऱ्या भौतिक अडचणींपेक्षाही माणसाला सर्वात अगतिक बनवणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे मानवी नातेसंबंध. आपल्या ज्ञानाच्या आणि ताकदीच्या जोरावर आपण एकवेळ पृथ्वीची परिवलनाची दिशा बदलू शकू पण आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनी कसे वागावे हे नियंत्रित करणे त्याहून कठीण आहे! खरे की नाही! मानवी नातेसंबंध आपल्यापैकी प्रत्येकाला अगतिक बनवत असतात. शहाणपण ती अगतिकता स्विकारण्यात आहे. माझी एक मैत्रीण आहे. १४-१५ वर्षांची आमची मैत्री! ह्या इतक्या वर्षांत तिचा मला मोजून १० वेळा देखील स्वतःहून फोन आला नसेल! दर वेळेला मीच हिला म्हणायचं, “बाई गं! कशी आहेस? भेटूया का?” एकदा मला वाटलं सारखं मीच का म्हणून असं म्हणायचं? आणि मी तसं म्हणणं सोडून दिलं! अर्थात पुढचे ७-८ महिने आम्ही आजिबात संपर्कात नव्हतो आणि माझं मन मला खात होतं! एक दिवस अचानक आमची भेट झाली! I was so happy to see her! मागचे ७-८ महिने एका क्षणात पुसले गेले. आणि माझ्या लक्षात आलं की आमची मैत्री टिकवण्याची अगतिकता मला फार आनंद देत होती! मी उगीचच माझा इगो मधे आणून त्या अगतिकतेमधलं सुख कमी करत होते. आणि आमची मैत्री या गोष्टीवर अवलंबून नव्हतीच! कारण आता गेली २ वर्षे आमची भेट, संवाद नाहीये पण मैत्री तशीच टिकून आहे! पण आपण ह्या गोष्टींचा फार इश्यू करतो. दर वेळी मीच का फोन करायचा? “मीच का?” असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर believe me तुम्ही अत्यंत भाग्यवान व्यक्तींपैकी एक आहात. तुम्ही सहृदयी आहात! आणि हे तुमचं बलस्थान आहे, कमकुवतपणा नव्हे!
ह्या टॉकने मला दिलेली सर्वात मोठी गोष्ट अशी की मी स्वतःला हा प्रश्न विचारला की कोणत्या गोष्टी मला अगतिक करतात? पारदर्शक करतात? आणि मला दोन शोध लागले – एक नवा, एक जूना. जूना शोध असा की आपल्या माणसांच्या संपर्कात असणं ही माझी गरज आहे. आणि मी ते करत राहिलं पाहिजे कारण त्या अगतिकतेतून मला आनंद मिळतो. आणि दुसरा शोध खरोखर “Aha moment” होता. तो म्हणजे माझं लिहिणं ही माझी अगतिकता आहे, गरज आहे! माझं लिखाण मला पारदर्शक बनवतं. आणि मला आनंद देतं. माझं लिखाण माझ्या मनाचा आरसा आहे. जेव्हा मला लिहावंसं वाटत नाही तेव्हा माझं मन उदास असतं. It is the truth that makes me free and happy! मला लिहिलं पाहिजे आणि लिहीत राहिलं पाहिजे! (भले कोणी वाचो न वाचो!)
आता हे एवढं वाचल्यावर टॉक तर तुम्ही बघालच पण हा ही विचार जरूर करा की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला अगतिक करते, जी तुम्हाला अधिक पारदर्शक करेल? तिला दाबून टाकू नका. कदाचित तीच गोष्ट तुमच्या आनंदाचं निधान असेल!
TED talk चा दुवा: http://www.ted.com/talks/brene_brown_on_vulnerability
सुंदर लेख आहे. अतिशय आवडला...
सुंदर लेख आहे. अतिशय आवडला...
सुंदर लेख!
सुंदर लेख!
सुरेख!!!
सुरेख!!!
सुरेख लेख आणि सुंदर
सुरेख लेख आणि सुंदर भाषांतर...व्हलनरेबल साठी अतिसंवेदनशीलता शब्द वापरु शकु का आपण ?
अशोक मामा, झक्की व गा. पै. तुमचे प्रतिसाद ही तेवढेच अभ्यासपुर्ण व वाचनिय
लेख आणि टेड टॉक आवडले. खालील
लेख आणि टेड टॉक आवडले.
खालील चर्चा सुद्धा उत्तम.
इथे मला एक असे वाटते, vulnerability हा शब्द न्यूनगंड म्हणून वापरला गेला आहे.
हे शब्दकोशाच्या दृष्टीने बरोबर आहे कि नाही ते मला नक्की माहित नाही.
मला न्यूनगंड शब्द वापरल्यावर अर्थ लागतोय .
म्हणजे आपल्याला वाटत असत कि आपल्यात काहीतरी कमी आहे वगेरे वगेरे. कशाबद्दल तरी आपल्या मनात न्यूनगंड असतो. मग आपण जगापासून ते लपवण्याच्या किंवा लपवता येत नसल्यास स्वतःच जगापासून लपण्याच्या मागे लागतो. त्यातून मग आयुष्यात negativity येऊ लागते.
या टेड टॉकच्या मते कशाबद्दलही न्यूनगंड न बाळगता जे आहे ते स्वीकारावे, ते नॉर्मल आहे हे स्वतःला समजवावे मग जगासमोर जाण्यास अडचण वाटत नाही. मन मोकळे राहते.
एका वाक्यात सांगायचे झाल्यास ,
स्वतःला आहे तसे स्वीकारावे, कशाचाही न्यूनगंड मनात न ठेवता मजेत जगावे. बास!
असे ..
सुंदर लेख, जिज्ञासा विशषतः ते
सुंदर लेख, जिज्ञासा
विशषतः ते 'मीच का' शी रिलेट झाल्यामुळे गंमत वाटली
लेखाच्या नकारात्मक (भासण्या-या) नावाबद्दलची चर्चा पटली.
लेखाचा अर्थ जो मला समजला तो असेल (म्हणजे आयुष्यातल्या अपरिहार्यतेला सकारात्मक घेण्याविषयी ) तर 'अपरिहार्यता - सुखाची गुरूकिल्ली' हे शीर्षक चालेल असे वाटते.
अवघड प्रश्न सोडवण्याची, एखादया ध्येयासाठी तनमनाने झोकून देण्याची, एखाद्यावर अवलंबून असण्यातली, मैत्री - नातेसंबंध जपण्याची, एखादी चौकट न तोडू शकण्यातली अपरिहार्यता - कारणे काहीही असोत.
आतुरता हा शब्द कसा राहील?
आतुरता हा शब्द कसा राहील?
सगळ्या नवीन प्रतिसादांसाठी
सगळ्या नवीन प्रतिसादांसाठी मनापासून धन्यवाद!
अगतिकता हा शब्द सर्व जागी योग्य वाटत नाही कारण vulnerable ह्या शब्दाला नेमका प्रतिशब्द मराठीत नाही. इंग्रजीत संदर्भानुसार vulnerable/vulnerability ह्या शब्दांचा अर्थ बदलत जातो मात्र मराठीत वेगवेगळ्या संदर्भानुसार त्या त्या अर्थासाठी वेगवेगळे शब्द वापरले जातात.(ही मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषांची वैशिष्ठ्ये आहेत!) अगतिक/अगतिकता वापरण्याचे मुख्य कारणे म्हणजे विशेषण आणि नाम (adjective and noun) ह्या दोन्ही रुपात सहज वापर, vulnerable ह्या शब्दात अपेक्षित अशी नकारात्मक छटा आणि सोपा,सहज कळेल असा शब्द. हा अनुवाद subtitles साठी असल्याने संक्षेपात अर्थ पोहोचणे ह्यादृष्टीने देखील अगतिक हा शब्द वापरणे सोपे वाटले.
लेख आणि चर्चा आवडली
लेख आणि चर्चा आवडली !
vulnerability - व्यक्तीच्या बलस्थानाइतकंच महत्वाचं असतं तिचं मर्मस्थान ,मला vulnerability या शब्दात मर्मावर आघात हा अर्थ दिसतो.. जो झाला की व्यक्ती कोलमडते.
हे समजून घेणं हेच एका अर्थी त्यावर मात करणं..स्वत:ला आहे तसं स्वीकारणं , स्वत:च्या मर्यादा , पराभव , शल्यं स्वीकारणं या सगळ्या अर्थच्छटा येतात या प्रक्रियेत.
खूप सकारात्मक आणि सुंदर लेख
खूप सकारात्मक आणि सुंदर लेख .. सगळे प्रतिसाद वाचनीय
प्रवण किंवा प्रवणता म्हणजे
प्रवण किंवा प्रवणता म्हणजे vulnerable किंवा susceptible. उदा: कोयनेचे पठार हा भूकंपप्रवण भाग आहे.
भारती आणि
भारती आणि सीमंतिनी....
Vulnerable बद्दल होत असलेली चर्चा आवडू लागली आहे मला. "मर्मस्थान’ चा उल्लेख योग्यच आहे याबाबतीत. युद्धनीतीत शत्रूचे Vulnerable Point शोधून काढण्यासाठी सैन्यात एखादे पथक असायचे (आजही असेलच). याचाच सरळ अर्थ असाही होऊ शकतो की हल्ला करण्यासाठी प्रतिपक्षाकडील कोणती बाजू त्यांचा "दुबळेपणा" सिद्ध करू शकेल. त्या दृष्टीने पाहिल्यास Vulnerable = दुबळेपणा ही छटा योग्य ठरले.
सीमंतिनी यानी Susceptible चा उल्लेख केला आहे....मला वाटते या विशेषणाचा थेट अर्थ "नाजूक प्रकृतीचा" किंवा "एखाद्या कारणामुळे चटकन आहारी जाणारा" असा होतो. "भूकंपप्रवण" भागासाठी susceptible adjective योग्य आहेच, पण प्रत्यक्ष भूकंप ज्यावेळी होईल त्या समयी ते पठार भुईसपाट होईल, होऊ शकेल. एरव्ही ती जागा प्रवाशासाठी नित्याची ये-जा करण्यासाठी vulnerable असणार नाही....[असे मला वाटते].
लेख आत्ता वाचनात आला.. खुप
लेख आत्ता वाचनात आला..
खुप छान लिहिलाय ..
बर्याच लोकांप्रमाणे मीच का ? सोबत जास्त रिलेट करता आले
>> प्रवण किंवा प्रवणता म्हणजे
>> प्रवण किंवा प्रवणता म्हणजे vulnerable किंवा susceptible
प्रवण म्हणजे prone, inclined towards असा अर्थ होतो. 'कार्यप्रवण' शब्द तशा अर्थी रूढ आहे.
Pages