अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग २)
सर्व मराठी भषिकांना तुकोबाच अगदी जवळचे, आपल्या नात्यातलेच का वाटतात -
१] बुवांनी त्यांच्या अभंगातून जी उदाहरणे दिली आहेत ती मुख्यतः संसारातीलच आहेत.
२] बुवांचे अभंग हे फार विद्वतप्रचुर भाषेतील नसून आपल्या बोली भाषेतील आहेत.
३] बुवा त्यांच्या अभंगातून कधी कधी जे कोरडे आपल्यावर ओढतात तेही आपल्याला अज्जिबात लागत नाहीत कारण - अरे कारट्या, छळवाद्या - म्हणून उच्चरवाने करवादणारी माऊलीच त्या लेकराला जशी स्वतःच्या मांडीवर घेऊन त्याचे लाड करते - तसेच बुवांचे प्रेम, आंतरिक कळवळा हेच कायम आपल्याला जाणवत असते.
४] बुवा जेव्हा त्यांच्या दोषांबद्दल बोलतात, स्वतःची निर्भत्सना करतात तेही आपल्यासारखेच - अगदी मनमोकळे ..
५] कृत्रिमता, ढोंग, बुवाबाजी यांचा आपल्याला कसा मनापासून तिटकारा असतो अगदी तस्साच तो बुवांच्या अभंगातून प्रकट होत असतो ...
फक्त काही ठिकाणीच बुवा आपल्यापेक्षा फार उंचीवर आहेत हे जाणवते - त्यांची विठ्ठलभक्ति, त्याकरता केलेला सर्वस्वाचा त्याग आणि क्षणोक्षणी आपल्या मनाला पारखणारे बुवा आकाशापेक्षाही उंचच उंच आहेत हे मात्र जाणवतेच ..
अशा बुवांची वाणी आपल्या मनाला कायम निर्मळताच प्रदान करते याचे एकमेव कारण - "ती वाणी" प्रत्यक्ष विठ्ठलच बोलतो आहे - असे जे बुवा म्हणतात त्याची आपल्यालाही खात्रीच पटलेली असते....
--------------------------------------------------------------------------------------------------
५१] या चि नावे दोष | राहे अंतरी किल्मिष
- आपल्या अंतरात जर काही लोभ, मत्सर, वासना असतील तर तेच दोष
५२] नम्र जाला भूता | तेणे कोंडिले अनंता
नम्रता हा संतांचा विशेष गुण. त्यामुळे भगवंत त्यांना सहजसाध्य होतो.
५३] आशाबद्ध तो जगाचा दास | पूज्य तो उदास सर्वजना
- आशाबद्ध पढिक पंडितापेक्षा बुवांसारखे निस्पृह संतच आपल्या कायम स्मरणात रहातात.
५४] तुका म्हणे नाही चालत तातडी | प्राप्त काळघडी आल्याविण
-बुवांचे अतिशय मोलाचे वचन - सबुरी, धैर्य हा फार मोठा सद्गुण आहे.
५५] जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति | देह कष्टविती उपकारे
- सूर्य जसा जगावर सहज उपकार करत असतो तसा समाजातील सद्भाव हा संतांमुळेच असतो.
५६] तुका म्हणे हरिच्या दासा | शुभ काळ अवघ्या दिशा
- अजून एक मोलाचे वचन. हरिदासाला सर्व काळ, सर्व ठिकाण हे पवित्र, शुभच वाटते.
५७] तुका म्हणे मना पाहिजे अंकुश | नित्य नवा दिस जागृतीचा |१५३६|
-बुवांच्या जीवनाचे सारच यात आले आहे - भगवत्कृपा ती हीच.
५८] मुलाम्याचे नाणे | तुका म्हणे नव्हे सोने
- वरवर मुलामा दिलेली गोष्ट कधीतरी उघडकीला येतेच, भोंदूगिरी फार काळ टिकू शकत नाही.
५९] पोट लागिले पाठीशी | हिंडविते देशोदेशी
- आपणा सर्वांचाच अनुभव...
६०] पंडित म्हणता थोर सुख | परि तो पाहता अवघा मूर्ख
- परमार्थ कळणे आणि परमार्थी होणे यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे, बुवांना आपण सर्वांनीच परमार्थी होणे अपेक्षित आहे.
६१] काय करावी ती बत्तीस लक्षणे | नाक नाही तेणे वाया गेली
-सर्व संतांना जीवनात परमार्थाचे अनन्यसाधारण महत्व वाटते. एक परमात्मप्रेम नसेल तर उदंड किर्ती, उदंड मान, अगाध विद्वत्ता यांना संतांच्या दृष्टीने काय मोल असते तेच या वचनात सांगितलंय.
६२] ऐसी कळवळ्याची जाती | करी लाभाविण प्रीती
-संतांचे सहज लक्षण.
६३] बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त | तया सुखा अंतपार नाही
- हीच मुख्य परमार्थ साधना.
६४] जाऊनिया तीर्था काय तुवा केले | चर्म प्रक्षाळिले वरी वरी
- परमार्थात अंतःकरण शुद्धता सगळ्यात महत्वाची आहे - नुसते तीर्थक्षेत्राला जाणे नाही.
६५] आमचा स्वदेस | भुवनत्रयामधे वास
- सर्व संतांचा भाव असा असतो - ते एकदेशी नसतात - सगळीकडे मीच भरुन आहे अशा भावानेच ते रहात असतात. अवघे विश्वचि माझे घर | ऐसी मती जयाचि स्थिर | किंबहुना चराचर | आपणचि जाहला ||ज्ञानेश्वरी अ. १२||
६६] आले देवाचिया मना | तेथे कोणाचे चालेना
- संपूर्ण ईश्वरशरणता
६७] नसावे ओशाळ | मग मानिती सकळ
- बुवांना आपण अजूनही का मानतो याचेच हे उत्तर.
६८] चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती | व्याघ्रही न खाती सर्प तया
- फारच मोलाचे वचन. परमार्थात सगळ्यात महत्वाचे काय असते ते नेमके बुवांनी सांगितलंय - त्याचा परिणामही सांगितलाय...
६९] कामातुरा भय लाज ना विचार
- कामातुराणां न भयं न लज्जा ...
७०] फळ देंठींहून झडे । मग मागुतें न जोडे
- एकदा आपले मन भगवंताला चिकटले की पुढे प्रपंच करीत असतानाही तिथून ते सुटत नाही.
७१] तुका म्हणे मन । तेथे आपुलें कारण
- सगळे आपल्या मनापाशी तर आहे..
७२] हालवूनि खुंट । आधीं करावा बळकट
- किती वर्षांपासून आपण हा वाक्प्रयोग करीत आहोत !!
७३] नाहीं आणिकांची सत्ता । सदा समाधान चित्ती
- सदा सर्वकाळ न भंगणारे समाधान ज्याला लाभेल त्याच्यावर कोणाची सत्ता चालणार ?
७४] बहु भितों जाणपणा । आड न यो नारायणा ।
-"मी" कोणीतरी आणि त्याजोडीला माझी बुद्धी, माझे मत हे सगळे परमार्थातले मोठेच अडथळे - ते सारे गेले की भगवंत प्रकट होतोच होतो.
७५] माझिये जातीचें मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया
- सार्वत्रिक अनुभव - चित्रकाराला दुसरा चित्रकारच भेटावा असे वाटते तर एखाद्या सैनिकाला दुसरा सैनिक भेटल्यावर समाधान वाटते...
७६] प्रजन्यें पडावें आपुल्या स्वभावें । आपुलाल्या दैवें पिके भूमि |१९९९|
- या अभंगातील पुढचा चरण असा आहे - बीज तें चि फळ येईंल शेवटीं । लाभहानितुटी ज्याची तया |
- जसे आपण वागणार तशीच त्याची फळे असणार ...
७७] कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असे
-इतरांचे गुणदोष पहाण्यापेक्षा स्वतःकडे पहायला केवळ परमार्थच शिकवतो.
७८] साहोनियां टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहें
-छिन्नीचे घाव सोसूनच त्या दगडाला देवत्व प्राप्त होते, संतत्वाचे असेच आहे.
७९] ऐसी गहन कर्मगति । काय तयासी रडती
-आपल्या नशिबात जे काही आहे त्यावर फक्त रडतच बसला तर त्याचा काय उपयोग ?
८०] तुका म्हणे निश्चळ राहें । होईंल तें सहज पाहें
- निश्चलता हा देखील संतांचा मोठाच गुण
८१] चित्ती नाहीं आस । त्याचा पांडुरंग दास
- ज्याच्या मनात काही इच्छा / आस उरली नाही तोच खरा भक्त - प्रत्यक्ष पांडुरंग त्याचा दास होतो..
८२] तुका म्हणे देवा कांहीं बोल नाहीं । तुझा तूं चि पाहीं शत्रु सखा
- आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ||गीता अ. ६||
८३] तुका म्हणे बुद्धि । ज्याची ते च तया सिद्धि
- ज्याची जशी बुद्धी तेच त्याला मिळणार
८४] हरिभक्तीविण । त्याचें जळो शाहाणपण
- संपूर्ण ईश्वरशरणता ही परमार्थाची गुरुकिल्ली - त्यामुळे सर्व संतांना त्याचे मूल्य फारच आहे. त्यापुढे अफाट बुद्धीमत्ता, संपत्ती, मान, किर्ती हे सर्वच्या सर्व अगदी कवडीमोल वाटते.
८५] जैसा अधिकार । तैसें बोलावें उत्तर
- समोरच्याचा जसा अधिकार तशीच संतांची उत्तर देण्याची पद्धत
८६] जेविल्याचें खरें । वरी उमटे ढेंकरें
- खरी गोष्ट लपवता येत नाहीच. संत असेल तर लक्षणांवरुन कळणारच ..
८७] क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारून ॥१॥
धर्म आहे वर्मा अंगीं । कळलें पाहिजे प्रसंगीं ॥ध्रु.॥
-भुकेल्या माणसाला धर्माचे तत्वज्ञान सांगण्यापेक्षा प्रथम भाकरी देणे हेच धर्माचे वर्म आहे.
८८] भक्ति तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रम्हीं भोग ब्रम्हतनु
-किती साधी-सोपी व्याख्या केलीये बुवांनी - भक्ति म्हणजे नम्रता, वैराग्य म्हणजे त्याग आणि ब्रह्मज्ञान म्हणजे जे काही आहे ते ब्रह्मरुपच होऊन जाते...
८९] तुका म्हणे मज कळे ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य
- बुवा म्हणतात - माझ्यापाशी लबाडी उपयोगाची नाही - नुसतीच बडबड आहे का काही खरे आहे ते सारे मला कळते बरे !!
९०] वितीयेवढेंसें पोट । केवढा बोभाट तयाचा
- जागतिक सत्य एका चरणात सांगितलंय ...
९१] चाकरीवांचून । खाणें अनुचित वेतन
- फुकटचे (नुसते बसून) खाणे हे बुवांना तरी अज्जिबात मान्य नाही..
९२] निश्चयाचें बळ । तुका म्हणे तें च फळ
- निश्चय ही एकच गोष्ट अशी आहे ज्याच्यामुळे ऐहिकाचाही लाभ होतो आणि भगवंताचाही
९३] काय धोविलें बाहेरी मन मळलें अंतरीं
- किती सुंदर सांगितलंय - अगदी घासघासून आणि कितीही वेळ आंघोळ केली तरी मन शुद्ध व्हायला त्याचा काय उपयोग ?
९४] पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी
सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं देव ते चि जाले
-पायरी ही दगडाचीच आणि देवळातला देवही दगडच असतो - पण एकावर आपण पाय ठेवतो आणि एकाची पूजा करतो. तसेच भावाचेही आहे. शुद्ध भाव जो अनुभवतो तो देवच होतो.
९५] शुद्ध कसूनि पाहावें | वरि रंगा न भुलावें
- प्रपंच काय आणि परमार्थ काय वरवरच्या गोष्टीला न भुलता शुद्ध काय हे कसून पहायला नको का ?
९६] नाहीं देवापाशीं मोक्षाचे गांठोळें । आणूनि निराळें द्यावें हातीं
- सगळे परमार्थाचे वर्मच सांगितलंय यात - देव काही मोक्षाचे गाठोडे हातात आणून देणार आहे का तुझ्या ??
"बद्ध म्हणिजे बांधला | मोक्ष म्हणजे मोकळा केला |" -श्रीसमर्थ
९७] ज्याचें जया ध्यान । तें चि होय त्याचें मन
- यामुळे आपण कशाचे ध्यान करणे गरजेचे आहे हे ज्याचे त्याला लक्षात यायला पाहिजे.
९८] नाहीं घाटावें लागत । एका सितें कळें भात
- काय सुरेख उपमा दिलीये बुवांनी - भात शिजलाय का हे एखाद्या शितावरुनच कळते - सगळाच्या सगळा भात काही चाचपून बघावा लागत नाही - गुणी माणूस काय आणि अवगुणी काय लगेच लक्षात येतोच येतो...
९९] मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली
- हे बघा, इथे गूळ ठेवलाय - या आता तो खायला असे काही मुंगीच्या घरी आवताण (आमंत्रण) द्यावे लागत नाही. खर्या संतापांशी सज्जन मंडळी जमतातच...
१००] आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां
- जो काही भोग आपल्या नशिबात आहे त्याला तोंड देणे आवश्यकच आहे. देवावर त्याचा भार टाकला की आपले मन हलके होते असा भक्ताचा अनुभव.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
तुकोबांचे बोल इतके स्पष्ट आहेत की त्यावर खरे तर काहीही टिप्पणी करायची गरजच नाहीये - अशा परिस्थितीत माझे बोबडे - वेडे वाकुडे बोल सहन कराल अशी आशा बाळगतो ....
तुकोबांच्या अशा अभंग वचनांवर अजून कोणाला काही लिहायचे असल्यास स्वागतच आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/48332 गाथा - परम अर्थ एक वाक्यता - भाग १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
हाही भाग खूप आवडला!
हाही भाग खूप आवडला!
लायनरचा अर्थ दिल्याने अजुनच
लायनरचा अर्थ दिल्याने अजुनच आवडला.
खूपच छान!
खूपच छान!
अप्रतिम...!
अप्रतिम...!
खूपच छान. ह्या भागातील बहुतेक
खूपच छान. ह्या भागातील बहुतेक सगळीच वचने मला नवीन होती. धन्यवाद.
तुकोबांच्या या ओळी मराठीतील
तुकोबांच्या या ओळी मराठीतील कधीही न पुसणारी लेणी आहेत
आवडलं
आवडलं
मी तीन भाग करून वाचले. काय
मी तीन भाग करून वाचले. काय बोलू? तुम्ही छान समजाऊन सांगता म्हणून थोडं तरी आकलन होतं. आवडलं. ______/\______ तुम्हाला शशांकजी.
खुप् छान. ऐसी कळवळ्याच्ची
खुप् छान. ऐसी कळवळ्याच्ची जाती... बुवांचा आहे हे माहीत नव्हते.
खूपच छान
खूपच छान
खूप छान!
खूप छान!
सुरेख! तुकोबांच्या रसाळ
सुरेख! तुकोबांच्या रसाळ साहित्याचे मंथन करुन आम्हाला नवनीताचा लाभ करुन देत आहात त्यासाठी अनेक धन्यवाद शशांकजी!
पुरंदरे शशांकजी - संत साहित्य
पुरंदरे शशांकजी - संत साहित्य हा आपल्या भाषेला मिळालेला अभूत पूर्व ठेवा आहे .आपल्या संत परंपरेकडे डोळसपणे पहिले तर संतांनी समाज प्रबोधनाचे कार्य करताना आपला संदेश सामन्यातील सामान्य माणसाच्या हृदयात पोचला पाहिजे याची जाण ठेवली होती. त्यामुळे त्यांच्या संदेशात गर्भित अर्थ सखोल असला तरी त्यात सहजता गेयता व लय यांचा त्रिवेणी संगम होता.
त्यामुळे संत ज्ञानेश्वर म्हणतात -
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
तर संत एकनाथ म्हणतात -
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
संत नामदेव सांगून जातात -
माझा भाव तुझे चरणी ।
तुझे रूप माझे नयनी ॥१॥
सापडलो एकामेकां ।
जन्मोजन्मी नोहे सुटका ॥२॥
किती म्हणून उदाहरणे देणार ,आणि कोणा कोणाची म्हणून आठवण ठेवणार ?
संपूर्ण संत साहित्य हेच ज्ञानदेवे रचिला पाया ...ते तुका झालासे कळस या वाक्याची प्रचीती देते
आणि संत तुकारामांच्या लेखणीतून आलेला प्रत्येक शब्दच 'अभंग ' आहे . स्वतः तुकाराम आपल्या स्वतःच्या या शब्द सामर्थ्याकडे मात्र किती नम्रतेने पाहतात ते त्यांच्या या रचनेतून जाणवते -
आम्हां घरीं धन शब्दाचींच रत्नें ।
शब्दाचींच शस्त्रें यत्ने करूं ॥१॥
शब्द चि आमुच्या जिवाचें जीवन ।
शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥
तुका म्हणे पहा शब्द चि हा देव ।
शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥
आणि म्हणूनच त्यांच्या एकेका वाक्यात परम अर्थाचे अंतिम सत्य दडलेले आहे.
शशांकजी ,आपल्या सहज संकलनातून साकल्याने सात्विकतेचे सत्व सापडणार आहे , अधिक काय म्हणू .
शशांकजी, खूप खूप छान - जणू
शशांकजी, खूप खूप छान - जणू काही mini निरुपण..
पोट लागिले पाठीशी | हिंडविते
पोट लागिले पाठीशी | हिंडविते देशोदेशी
अतिशय सुंदर.
तुकारामगाथा कितीही वाचावी. नवनवे काही ना काही सापडतेच.
धन्यवाद.
पोट लागिले पाठीशी | हिंडविते
पोट लागिले पाठीशी | हिंडविते देशोदेशी
अतिशय सुंदर.
तुकारामगाथा कितीही वाचावी, नवनवे काही ना काही सापडतेच.
धन्यवाद.
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश |
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश | नित्य नवा दिस जागृतीचा |१५३६|
>>>
शशांककाका ,
आपण कोणतीप्रत पहाता रेफरन्सेस साठी ? मी माझ्या अॅन्ड्रॉईड्वरील प्रतीत शोधण्याचा प्रयत्न केला पण अभंग काही मेळ खात नाही
आपण कोणतीप्रत पहाता रेफरन्सेस
आपण कोणतीप्रत पहाता रेफरन्सेस साठी ? >>>>>
http://mr.wikisource.org/wiki/
सर्व तुकोबाभक्तांचे मनापासून आभार .....
जय जय पांडुरंग हरि
रामकृष्ण हरि
मुळ लेखन आणि किंकर यांचा
मुळ लेखन आणि किंकर यांचा प्रतिसाद दोन्हीही खूप सुंदर. आवडलेच _/\_
सर्व मराठी भषिकांना तुकोबाच
सर्व मराठी भषिकांना तुकोबाच अगदी जवळचे, आपल्या नात्यातलेच का वाटतात - खूप छान...
अतिशय सुंदर. धन्यवाद शशांक जी
अतिशय सुंदर. धन्यवाद शशांक जी.
मुळ लेखन आणि किंकर यांचा
मुळ लेखन आणि किंकर यांचा प्रतिसाद दोन्हीही खूप सुंदर. आवडलेच+1