प्रवास

Submitted by ज्योति_कामत on 28 March, 2014 - 02:56

बरेच दिवसांनी नवर्‍याबरोबर रेल्वेने एका छोट्या प्रवासाला निघाले होते. आदल्या दिवशीच पुण्याहून बसने परत आले होते आणि तत्कालमधे रिझर्व्हेशन करायलाही जमलं नव्हतं. तीन साडेतीन तासांचा प्रवास आहे, जाऊ जनरलमधे बसून म्हटलं आणि निघालो. स्टेशनवर पोचलो तर गाडी अर्धा तास लेट असल्याचं शुभवर्तमान कळलं. मग तिकीट काढून जनरलचा डबा समोर येईल अशा बेताने प्लॆटफॉर्मवरच पेपर टाकून मस्त बैठक मारली. रूळ क्रॉस करणार्‍या बर्‍याच मंडळीचं निरीक्षण करून झालं. एक पाणचट चहा पिऊन झाला. शेवट अर्धा तास उशीरा येणारी गाडी एक तास उशीरा येऊन प्लॆटफॉर्मला लागली. जनरलच्या डब्यात आधीपासूनच उभे असलेले लोक पाहिले आणि हे आपलं काम नव्हे याची खूणगाठ बांधत स्लीपरच्या डब्याकडे धाव घेतली.

४/५ डबे मागे चालत गेल्यावर एका डब्यात एक अख्खं बाक रिकामं दिसलं. टीसी येईपर्यंत बसून घेऊ म्हटलं, आणि काही मिनिटांतच टीसीसाहेब अवतीर्ण झाले. आमच्याकडे जनरलचं तिकीट आहे आणि फरकाचे पैसे भरून बर्थचं तिकीट दिलंत तर उपकार होतील असं सांगताच त्यांनी इतर काही बिनापावतीचे इ. सूचक वगैरे न बोलता पावती फाडून हातात ठेवली आणि बर्थ क्रमांक १,२ वर बसा म्हणाले. आता अधिकृतपणे आमच्या झालेल्या सीटखाली हातातली बॅग टाकली. चपला काढून पाय वर घेऊन मांडी ठोकली आणि अंग सैल सोडलं.

तिकिटाचा यक्षप्रश्न सुटल्यानंतर कंपार्टमेंटमधल्या इतर मंडळींकडे आपसूकच लक्ष गेलं. समोरच्या सीटवर एक टिपिकल मंगलोरी 'पेढा' आणि त्याची नवथर बायको बसले होते. खूपच तरूण दिसत होते. दोघांची चेहरेपट्टी आणि ठेवण बरीच एकसारखी. बहुधा जवळच्या नात्यातले असावेत आणि आता नवपरिणीत. ते त्यांच्या विश्वात अगदी गुंग होते. बायको लहान मुलासारखी लहान सहान हट्ट करत होती आणि पेढ्याला त्यात फारच मजा येत असावी असं दिसत होतं. त्यांचं कन्नड बोलणं थोडफार कळत असलं तरी मी कळत नसल्याचा आव आणला.

त्यांच्या बाजूला सगळ्यात वरच्या बर्थवर एक माणूस डोक्यावर पांघरूण घेऊन गाढ झोपला होता. सात साडेसात वाजता इतका गाढ कसा काय झोपला हा म्हणून विचारात पडले. पलिकडच्या सीटवर एक पोरगेला दिसणारा उंच तरूण बसला होता. थोड्याच वेळात त्या सीटवर एक कुटुंब येऊन बसलं आणि हा पोरगा आमच्या सीटवरच्या राहिलेल्या तिसर्‍या जागी सरकला. माझ्या नवर्‍याने त्याच्याशी जरा हसून बोलायला सुरुवात केली तसा तो घडाघडा बोलायला लागला. कारवारला नेव्हीत आहे, २० वर्षांचा आहे, पश्चिम बंगालमधे कलकत्त्याच्या पुढे कुठेतरी गाव आहे आणि अचानक सुटी मिळाल्याने निघालो आहे. इ. माहिती त्याने पहिल्या ३ मिनिटांत सांगून टाकली. त्याच्याकडे पाहताच हा एवढासा दिसणारा मुलगा नेव्हीत आहे या गोष्टीचं खरंतर हसूच येत होतं. पण त्याने लगेच एसीची नेव्हीसाठी काढलेली तिकिटेच काढून दाखवली. कारवार-मुंबई, मुंबई-कलकत्ता आणि तिथून आणखी पुढे कुठेतरी जायची तिकिटं. मात्र कन्फर्म्ड तिकीट नसल्याने त्याला एसीतून बाहेर काढले होते म्हणे. माझा नवरा त्याच्याशी आणखीही गप्पा मारत होता. मी खिडकीतून बाहेर नजर टाकली. झाडे घरे हळूहळू काळोखात गडप होत होती.

एकदाचं खास रेल्वेच्या चवीचं जेवण जेवून झालं. म्हणेपर्यंत गाडी कणकवलीला येऊन थांबली. ते कुटुंब तिथे उतरून गेलं आणि आणखी दोघेजण येऊन झोपून गेले. आमच्या कंपार्टमेंटमधे एकजण येऊन हातातल्या तिकिटाकडे पाहू लागला. सगळ्यात वरच्या बर्थवर झोपलेल्या महाशयांना भरपूर हलवल्यानंतर ते उठले आणि आपल्या खिशातलं तिकीट काढून दाखवायला लागले. हा नवा आलेला माणूस म्हणे, "अहो माझं कन्फर्म्ड तिकिट आहे. तुमचं तिकीट कन्फर्म्ड कुठे आहे?" तो आधीचा म्हणतोय, "मला एसेमेस आलाय पण!" शेवटी त्याने आपला एसेमेस दाखवला. बघितलं तर Sl हे त्याने S1 असं वाचलं होतं आणि आणि त्यापुढचं S6 म्हणजे ६ नंबरचा बर्थ समजला होता. मग त्याची रीतसर S6 मधे ४८ नंबरच्या सीटवर रवानगी झाली आणि नवा आलेला त्याच्या जागी झोपून गेला.

जरा वेळाने टीसी साहेबांनी येऊन या नव्या माणसांची त्यांना झोपेतून उठवून रीतसर चौकशी केली. नेव्हीतल्या पोराला "तेरे पास कन्फर्म्ड टिकट नही है ना, अभी अगले स्टेशन पर दूसरे लोग आएंगे तब तुम्हे उतार दूंगा" असा दम भरला आणि एक डोळा मिचकावत हसले. पुढच्या स्टेशनावर स्वत: टीसी साहेबांचीच ड्युटी संपणार होती. "क्या करें साब, हम लोगों को सोने को जगह मिली तो सोएंगे, मिलिटरी के लोगों को ऐसे जागते रहने की आदत रहती है" असं म्हणत नेव्हीवाल्याने संभाषणाचे धागे विणणे पुढे सुरू केले.

समोरचा मंगलोरी आणि त्याची नवपरिणीता यांचे विभ्रम सुरूच होते. तिने खालच्या बर्थवर अनोळखी पुरुषांसमोर झोपावे हे त्याला पसंत नव्हतं, तर तिला खिडकी उघडी टाकून झोपायचं होतं. त्याने तिची रवानगी मधल्या बर्थवर केली तर १० मिनिटांतच ती तक्रार करत खाली उतरली आणि हट्ट करून खालच्या बर्थवर झोपून गेली. तिने बाजूला निष्काळजीपणे टाकलेली पर्स बघून आश्चर्यच वाटलं. थोड्या वेळाने तिच्या नवर्‍याला म्हटलं, खिडकीचं शटर बंद करा, नाहीतर कोणीतरी खिडकीतून हात घालून पर्स पळवून नेईल. त्यालाही ते पटलं आणि त्याने तत्परतेने शटर बंद केलं.

कंपार्टमेंटमधल्या बहुतेकांनी आडवं होऊन नाहीतर बसल्या जागी निद्रादेवीची आराधना सुरू केली होती. मग मी त्या सगळ्यांकडेच दुर्लक्ष करून परत खिडकीबाहेर नजर वळवली. समोर आलेल्या आकाशाच्या तुकड्यात मृग नक्षत्र सहजच ओळखू आलं. त्याच्या पोटातला बाण आणि आणि तो मारणारा व्याधही दिसला. आणखी एक ओळखीचा एम सारखा आकार दिसला. शर्मिष्ठा बहुतेक. क्षितिजाजवळ बहुधा शुक्र दिसत होता. एकदम आठवण झाली. आई हे सगळे ग्रह, तारे, नक्षत्रं, राशी ओळखायला शिकवायची.

मन सहजच काही शे मैल आणि साडेतीन दशकांचा प्रवास करून रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पोचलं. एका साध्यासुध्या बैठ्या घराच्या अंगणात. चोपून तयार केलेलं लख्ख अंगण. त्याच्या कडेने लावलेले चिरे, आणि त्या चिर्‍यांच्या पलिकडे ओळीत लावलेली अनेक फुलझाडं आणि शोभेची झाडं. तगर, कण्हेरी, बिट्टी, कुंद, मोगरा, नेवाळी, लिली, गावठी गुलाब, वेलगुलाब, अगस्ती नाना प्रकार. त्या लहान झाडांच्या पुढे पाण्याची दगडी पन्हळ, पाण्याने भरलेली दोण, आणि माड, आंब्याची कलमं, चिकू, रामफळ, कोकम अशी मोठी झाडं. या माडांच्या मुळात सतत पाणी शिंपल्यामुळे ओलसर मऊ माती असायची आणि बाजूला दुर्वा. पलिकडे एक लहानसं शेत आणि त्याही पलिकडे बांबूचं बेट. घराच्या मागच्या बाजूलाही प्राजक्ताची श्रीमंती उधळत असायची.

अंगणाच्या छोट्या भागात पत्र्याचा मांडव घातला होता. पण आमचा वावर बराचसा मोकळ्या आकाशाखालीच असायचा. तिन्हीसांजा वडील अंगणात फेर्‍या मारत रामरक्षा म्हणायचे. कधी पडवीतल्या झोपाळ्यावर बसून रामरक्षा, अथर्वशीर्ष म्हणायचे. आई पण काम करता करता असं काही म्हणायची. त्यांच्यामागून फिरताना आम्हालाही ती पाठ होऊन गेली होती. आजही झोप आली नाही की रामरक्षा म्हणते. लगेच निद्रादेवीच्या अंगणात पोचायला होतं. रात्री नीरव शांततेत माड झावळ्या हलवत उभे असायचे. सगळी फुलझाडं पाणी पिऊन प्रसन्न झालेली असायची. जेवणं झाली की कधी मर्फीचा रेडिओ पण आम्हाला सोबत करायला त्या अंगणात येऊन गाणी गायचा. रात्रीच्या वेळी लता, रफी, तलत, अरुण दाते सगळ्यांचेच आवाज जादुई भासायचे. आईला वेळ मिळाला की ती गीतेचे अध्याय म्हणून घ्यायची आणि आकाशातले ग्रह तारेही ओळखायला शिकवायची. आता तर कित्येक दिवसांत आकाशाकडे लक्षच जात नाही. पण कधी गेलंच तर आपसूक तार्‍यांची नावं डोक्यात यायला लागतात.

त्या स्वप्नातल्या गावात पोचून मी परत एकदा लहान झाले. “आता ते गाव आणि ती माणसं राहिली नाहीत ग! सगळंच फार बदललंय” हल्लीच मैत्रीण म्हणाली होती. तिचं सासरही त्याच गावात असल्याने तिचा गावाशी संबंध राहिला आहे, आणि तोही भलेबुरे सगळेच अनुभव घेत. “असू दे ग! आता आपण तरी त्याच कुठे राहिलोय!” मी म्हटलं होतं. आणि तरीही मैत्री’ या शब्दाचा अर्थही माहित नसलेल्या कोवळ्या वयातल्या मैत्रीला जागून इतक्या वर्षांनी तिने मला आंतरजालावरून शोधून काढलंच होतं!

इकडे गाडी आपली अशीच अनेक विश्वं पोटात घेऊन धावतच होती, बोगदे, डोंगर, नद्या, झाडे, घरे मागे पडत होती. कुठे बोगद्यात दिवे लागलेले असायचे तर कुठे कामगार मंडळी टॉर्च घेऊन उभी असायची. ते सगळं दिसत होतं आणि नव्हतंही. जवळच्या सगळ्या गोष्टी गाडीच्या मागे पडत होत्या, मात्र सुदूर अंतरावरचा तो तार्‍यांनी भरलेला आकाशाचा तुकडा गाडीला सोबत करत गाडीबरोबर पुढेच येत होता! आणि इतर कोणाला न सांगता मी खास माझ्या अशा एका अद्भुत प्रवासात रंगून गेले होते. आणखी एक ओळखीचा अस्पष्टसा आकार दिसला. कृत्तिका. अरे, पण या एवढ्या अस्पष्ट का दिसतायत! आता डोळ्यांना लांबचा नंबरही आला की काय! तेवढ्यात लक्षात आलं, क्षितिजाजवळ डोंगरावर दिवे दिसताहेत, त्यांच्यामुळे तिथे काळोखाचा गर्दपणा कमी झालेला होता आणि मग जरा हुश्श्य वाटलं.

लवकरच गाडीने लक्षात येईल असं एक वळण घेतलं आणि बाहेर दूरवर काळोखावर रांगोळी काढल्यासारखे प्रकाशाचे अनेक झगमगते ठिपके दिसायला लागले. माझ्या ओळखीच्या शहराचं पहिलं दर्शन! नेहमीच अतिशय सुखद वाटणारं. त्याने मला त्या स्वप्नातल्या गावाहून परत वर्तमानात आणलं. हळूहळू शहरातले रस्ते आणि त्यावरचे दिवे दिसायला लागले. गाडीने हलकेच ब्रेक लावल्याचा आणि रूळ बदलल्याचा आवाज जाणवला. सुक्या मासळीचा विशिष्ट वास यायला लागला. अनेकांना हा वास अजिबात आवडत नाही. पण माझ्यासाठी मात्र हा वास माझ्या ओळखीच्या शहराची खूण आहे. बरचसं बदललं तरी बरचसं अजूनही बदललं नाही हे सांगणारा.

हळूहळू स्टेशनचा प्लॅटफॉर्म आणि त्यावरची लोकांची धांदल दिसायला लागली. नवर्‍याने बॅग उचलली. मी किरकोळ सामान उचललं, पायात चपला सरकवल्या आणि उठून उभी राहिले. आमचा आजचा प्रवास इथेच संपत होता, पण गाडी मात्र अशीच धावत पुढे जाणार होती. मंगलोरी जोडपं, बंगाली नेव्हीवाला आणि कणकवलीचा प्रवासी याना सोबत करायला माझ्या जागी दुसरंच कोणी येऊन बसणार होतं. उद्या पुढच्या प्रवासाला लागण्यापूर्वी या ओळखीच्या शहरात हौसेने घेतलेल्या घरकुलात चार घटका निवांत घालवायच्या आहेत हा विचार थंड वार्‍याच्या झुळकीसारखा मनात आला. आणि त्या विचाराचं अभेद्य कवच मिरवीत मी गाडीत चढू पाहणार्‍या स्टेशनवरच्या गर्दीत पाय ठेवला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरती, चिनूक्स, धन्यवाद!
आरती, हो. मुंबई एक्सप्रेसच (मंगलोर-मुंबई) ती! मडगाव ते रत्नागिरी प्रवासात होते मी.

व्वा, सुंदर लिहिलंय ! चित्रदर्शी शैलीमुळे तुमच्या बरोबरच प्रवास केला ! शेवटचा परिच्छेद छानच !

ज्योति....तुझ्या प्रत्येक अक्षराने मला त्या मंगलोर-मुंबई प्रवासात प्रत्यक्ष साथ केली...जणू काही मी देखील त्यावेळी तिथेच त्या पेढ्यासोबत वा नेव्हीबॉयशेजारी बसलो आहे आणि तू आम्हा सर्वांना शर्मिष्ठा, कृत्तिका तारका कशा ओळखायच्या हे शिकवित आहेस.... प्राजक्ताची श्रीमंती...तगर, कण्हेरी, बिट्टी, कुंद, मोगरा, नेवाळी, लिली, गावठी गुलाब, वेलगुलाब, अगस्ती अनेकविध वेड लावणारे हे झाडांचे प्रकार. सोबतीला आजोबासारखे माड,.... गप्पागोष्टीसाठी शेजारी आंब्याची कलमं, चिकू, रामफळ, कोकम ही झाडे....किती सुंदर वर्णन तू सांगत आहेस आणि सोबतीला रेल्वे रुळांचा तो तालमय आवाजही.... एक देखणे चित्रच उभे केलेस तुझ्या अप्रतिम लिखाण शैलीने. कधीतरी तुझ्याकडून स्वाती आणि चित्रा ह्या तार्‍यांविषयी ऐकायचे आहे....मी स्वच्छ निळ्याभोर रात्री त्याना शोधायचा वा टिपण्याचा प्रयत्न करत असतो...पण विफल.

प्रवास....आपला संपतो...पण रेल्वेचा कधीच नाही.... २४ तास ती धडधडत असतेच...आणि अशावेळी वर्णनाचे असले चित्र समोर आले की त्या प्रवासाचा वाचकालाही मोह पडतो.

पुरंदरे शशांक, अशोक.दा आणि अनुजा राणे धन्यवाद!

अशोकदा, कृष्ण पक्षातल्या रात्रीच्या आकाशाचं एक वेगळंच सौंदर्य असतं आणि सोबतही. किती दिवस झाले निवांत तारे बघून ते आठवायला पाहिजे. सगळी मित्रमंडळी कधीतरी नक्कीच जमू असे रात्रीचे आकाशाच्या छताखाली!

बाकी लेख उत्तम!

<< नवर्‍याने बॅग उचलली. मी किरकोळ सामान उचललं >>

यावर मात्र Strong Objection! पुरूष मंडळींनी किती काळ अन्याय सहन करायचा?

निषेध! निषेध!! निषेध!!!

समोरच्या सीटवर एक टिपिकल मंगलोरी 'पेढा' आणि त्याची नवथर बायको बसले होते. खूपच तरूण दिसत होते. दोघांची चेहरेपट्टी आणि ठेवण बरीच एकसारखी. बहुधा जवळच्या नात्यातले असावेत आणि आता नवपरिणीत. ते त्यांच्या विश्वात अगदी गुंग होते. बायको लहान मुलासारखी लहान सहान हट्ट करत होती आणि पेढ्याला त्यात फारच मजा येत असावी असं दिसत होतं.>>>>>> हे भारीच आहे!:फिदी: आवडल.:स्मित:

ज्योती खूपच सुरेख मनमोकळे वर्णन केलस प्रवासाचे. आम्ही पण मनाने प्रवास केला तुझ्याबरोबर.:स्मित:

चेतन सुभाष गुगळे, हर्पेन आणि रश्मी, धन्यवाद!
@चेतन सुभाष गुगळे, तुमचा निषेध माझ्या नवर्‍यापर्यंत पोचवते! ऐकतच नाही कधी!! Happy

ज्योताय, गेले काही माहिने जिथे पाहावे तिथे रागा, मोदी आणि केजरीवालच दिसताहेत...
त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात दोन चांगले लेख वाचनात आले. एक चिनूक्सचा 'कुसुमाग्रजांच्या नाटकांबद्दलचा' आणि दुसरा तुझा....

आवडला हे सांगणे नलगे. गेल्या तीन वर्षात तू काही लिहीलय आणि ते आवडलं नाही असं झालेलं नाहीये Happy

छान आहे.

लहानपणी सुट्ट्यांमधे कोकणात काकांकडे जायचे त्यावेळची आठवण झाली तुमच्या मनाने भूतकाळात केलेला प्रवास वाचून Happy

स्वती२, विशाल कुलकर्णी, मृण्मयी आणि मी नताशा, धन्यवाद!
@ विशल्या, त्या निवडणुकीच्या गदारोळात हा लेख वाहून जाणार की काय अशी भीती वाटली होती खरी!

सुंदर लेखन, रवींद्र पिंगे किंवा मधु मंगेश कर्णिक यांचे लघुनिबंध वाचून एक समृद्ध समाधान मिळायचे, तसाच वाचनानुभव मिळाला.

<<आई हे सगळे ग्रह, तारे, नक्षत्रं, राशी ओळखायला शिकवायची.>> या वाक्यापासून रेल्वेने जणू काही अलगद रुळ बदलावेत तसे लेखन एका वेगळ्याच पातळीला जाते. आणि त्यापुढील प्रवास म्हणजे निखळ आनंदाची वाचनयात्रा झाला.

खूप आवडलं. असं सुरेख बालपण तुला लाभलं, नशीबवान आहेस Happy

बरेच दिवसांनी तुझं लिखाण दिसलं, जरा आणखी नियमित लिहित जा ना!

Pages