"नंदा".... नाव उच्चारताच चित्रपट शौकिनांच्या नजरेसमोर तरळतो एक भोळाभाबडा, तजेलदार डोळ्यांचा आणि पाहाणार्याला क्षणात रडविणारा तर दुसर्या क्षणाला हसविणारा एक देखणा चेहरा. अशी एक अभिनेत्री जी नेहमी चर्चेत राहिली ती एका अभिनेत्रीपेक्षाही "छोटी बहीण" या रुपात....बेबी नंदा याच नावाने....वयाच्या ७५ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला असला तरीही तिची आठवण रसिकांच्या हृदयी राहील ती तिच्या सदैव हसर्या नजरेचीच. १९५६ मध्ये पडद्यावर आलेल्या व्ही.शांताराम यांच्या "तुफान और दिया" या चित्रपटापासून सुरू झालेली तिची चित्रपट कारकिर्द नेहमी चर्चेत राहिल्याचे दिसते (हा चित्रपट तिच्या वडिलांना - मा.विनायक याना - पाहता आला नाही, प्रदर्शीत होण्यापूर्वीच विनायकरावांचे निधन झाले होते)....जरी तिने कधीही मधुबाला, मीनाकुमारी, वैजयंतीमाला, वहिदा रेहमान अशा अभिनेत्र्यांच्या पंगतीतील प्रथम स्थान मिळविले नसले तरीही.... देव आनंद, राज कपूर, शशीकपूर, राजेन्द्रकुमार मनोजकुमार, राजेश खन्ना अशा अभिनेत्यांसमोर ती कधी नायिका म्हणून तर कधी सहनायिका या रुपात चमकली. प्रसाद निर्मिती "छोटी बहन" मुळे तिचे नाव सार्या देशात झाले ते त्यातील प्रमुख भूमिकेमुळे. दुर्दैवाने ती ह्या छोट्या बहिणीचा शिक्का कधीच पुसून काढू शकली नाही. तरीही शशी कपूर आणि राजेश खन्ना यांच्या बरोबरीने केलेले तिचे चित्रपट तिच्या चतुरस्त्र अभिनयाची साक्ष देण्यास पुरेसे आहेत.
मा.विनायक यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराच्या सात मुलांपैकी नंदा सर्वात लहान अपत्य. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर नात्याने अगदी जवळचे असलेले चित्रमहर्षी व्ही.शांताराम यानी नंदाला बालकलाकार म्हणून "तुफान और दिया" मध्ये संधी दिली आणि हा चित्रपट खूपच गाजल्यामुळे नंदाचे नाव सर्वतोमुखी झाले. जरी तिची कारकिर्द तशी आघाडीची अभिनेत्री म्हणून गाजली नसली तरी ती कधीही पिछाडीला पडली नव्हती. जितके चित्रपट मिळाले तितक्यात तिने मनःपूर्वक कामे केल्याचे आढळून येईल. नंदाच्या आठवणी म्हणजे अनेक आठवणींचा गोफ आहे, ज्यात जितके सुख तितके दु:खही. पण सार्वजनिक पातळीवर विचार करताना तिच्या कौटुंबिक आयुष्याविषयी चर्चा करणेही योग्य नाही....कारण खुद्द तिने स्वतः त्या आपल्या खाजगी जीवनावरील पडदा कधी दूर केला नाही.
देव आनंदसमवेत तिने केलेले "कालाबाजार....हम दोनो....तीन देवियां" गाजलेल्या यादीत आले तर शशी कपूरची तर ती लकी हीरॉईन होती...."जब जब फूल खिले" या चित्रपटाने तर उत्पन्नाचे रेकॉर्ड निर्माण केले आणि त्यातील "परदेसियोंसे ना अंखिया मिला ना" आजही कोणत्याही प्रेमी प्रेमिकाचे आवडीचे गीत बनून राहिले आहे. ती दिसलीही होती अतिशय सुंदर या चित्रपटात. राजकपूरसमोर ती "आशिक" मध्ये चमकली तर राजेन्द्रकुमारची "कानून, धूल का फूल" मध्ये, मनोजकुमारच्या "गुमनाम" ने देखील लोकप्रियता मिळविली तर "शोर" मध्ये ती त्याची पत्नी बनली होती. राजेश खन्नाच्या "इत्तेफाक" ने त्याच्या सुपरस्टार पदावर शिक्कामोर्तब केले पण त्याच चित्रपटाची नायिका नंदा एका वेगळ्याच रुपात पुढे आली आणि लक्षातही राहिली. पुढे प्रेम रोग, आहिस्ता-आहिस्ता, मजदूर मध्ये चरित्र अभिनेत्रीच्या रुपातही ती पडद्यावर आली होती.
वहिदा रेहमान, आशा पारेख, हेलेन, जबीन यांच्याशी असलेली मैत्री हा एक खास अध्याय होता तिच्या जीवनात. विशेषतः वहिदाशी तिची असलेली मैत्री तर नंदाच्या जीवनातील एक मोठा ठेवा. आज तिचा मृत्यू झाला पण शनिवारी ती वहिदाच्या घरीच जेवणासाठी गेली होती. आज बीबीसीशी बोलताना वहिदाने ती आठवण सांगितली. त्या दोघींच्या (तसेच आशा पारेख सुद्धा) मैत्रीच्या आठवणीबाबत कधीतरी वहिदा रेहमानच लिहू शकतील. एका मुलाखतीत नंदाने स्पष्ट केले होते की त्या स्वतःच्या जीवनातील काही आठवणींना शब्दात बांधू शकणार नाही, म्हणजेच त्यावर चर्चाही त्याना नको होती. त्या क्षणांची आठवण त्याना असह्य वाटत होती....साहजिकच त्यांच्या जीवनातील तो भाग त्यांच्या दृष्टीने बंदच असणे गरजेचे वाटत होते....योग्यही असेल ते.
आपला अभिनय हेच आपले जीवन मानणार्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत शांत जीवन जगलेल्या या अभिनेत्रीच्या स्मृतीत रसिक राहील.
धन्यवाद अशोकसर वनमालाबाई=
धन्यवाद अशोकसर
वनमालाबाई= श्यामची आई खूप फिट्ट बसलंय त्यामुळे वेगळ्या भूमिकेतल्या त्या अजिबात लक्षात नाही आल्या . वनमालाबाईवर एक डॉक्युमेंटरी आहे नंतर इथून हलवली तरी चालेल.
https://www.youtube.com/watch?v=fEWbktRRIJI
जुन्या जमान्यातल्या मराठी तारकांवर आधारीत लेखमाला सुरु करता येईल का?
Pages