"नंदा".... नाव उच्चारताच चित्रपट शौकिनांच्या नजरेसमोर तरळतो एक भोळाभाबडा, तजेलदार डोळ्यांचा आणि पाहाणार्याला क्षणात रडविणारा तर दुसर्या क्षणाला हसविणारा एक देखणा चेहरा. अशी एक अभिनेत्री जी नेहमी चर्चेत राहिली ती एका अभिनेत्रीपेक्षाही "छोटी बहीण" या रुपात....बेबी नंदा याच नावाने....वयाच्या ७५ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला असला तरीही तिची आठवण रसिकांच्या हृदयी राहील ती तिच्या सदैव हसर्या नजरेचीच. १९५६ मध्ये पडद्यावर आलेल्या व्ही.शांताराम यांच्या "तुफान और दिया" या चित्रपटापासून सुरू झालेली तिची चित्रपट कारकिर्द नेहमी चर्चेत राहिल्याचे दिसते (हा चित्रपट तिच्या वडिलांना - मा.विनायक याना - पाहता आला नाही, प्रदर्शीत होण्यापूर्वीच विनायकरावांचे निधन झाले होते)....जरी तिने कधीही मधुबाला, मीनाकुमारी, वैजयंतीमाला, वहिदा रेहमान अशा अभिनेत्र्यांच्या पंगतीतील प्रथम स्थान मिळविले नसले तरीही.... देव आनंद, राज कपूर, शशीकपूर, राजेन्द्रकुमार मनोजकुमार, राजेश खन्ना अशा अभिनेत्यांसमोर ती कधी नायिका म्हणून तर कधी सहनायिका या रुपात चमकली. प्रसाद निर्मिती "छोटी बहन" मुळे तिचे नाव सार्या देशात झाले ते त्यातील प्रमुख भूमिकेमुळे. दुर्दैवाने ती ह्या छोट्या बहिणीचा शिक्का कधीच पुसून काढू शकली नाही. तरीही शशी कपूर आणि राजेश खन्ना यांच्या बरोबरीने केलेले तिचे चित्रपट तिच्या चतुरस्त्र अभिनयाची साक्ष देण्यास पुरेसे आहेत.
मा.विनायक यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराच्या सात मुलांपैकी नंदा सर्वात लहान अपत्य. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर नात्याने अगदी जवळचे असलेले चित्रमहर्षी व्ही.शांताराम यानी नंदाला बालकलाकार म्हणून "तुफान और दिया" मध्ये संधी दिली आणि हा चित्रपट खूपच गाजल्यामुळे नंदाचे नाव सर्वतोमुखी झाले. जरी तिची कारकिर्द तशी आघाडीची अभिनेत्री म्हणून गाजली नसली तरी ती कधीही पिछाडीला पडली नव्हती. जितके चित्रपट मिळाले तितक्यात तिने मनःपूर्वक कामे केल्याचे आढळून येईल. नंदाच्या आठवणी म्हणजे अनेक आठवणींचा गोफ आहे, ज्यात जितके सुख तितके दु:खही. पण सार्वजनिक पातळीवर विचार करताना तिच्या कौटुंबिक आयुष्याविषयी चर्चा करणेही योग्य नाही....कारण खुद्द तिने स्वतः त्या आपल्या खाजगी जीवनावरील पडदा कधी दूर केला नाही.
देव आनंदसमवेत तिने केलेले "कालाबाजार....हम दोनो....तीन देवियां" गाजलेल्या यादीत आले तर शशी कपूरची तर ती लकी हीरॉईन होती...."जब जब फूल खिले" या चित्रपटाने तर उत्पन्नाचे रेकॉर्ड निर्माण केले आणि त्यातील "परदेसियोंसे ना अंखिया मिला ना" आजही कोणत्याही प्रेमी प्रेमिकाचे आवडीचे गीत बनून राहिले आहे. ती दिसलीही होती अतिशय सुंदर या चित्रपटात. राजकपूरसमोर ती "आशिक" मध्ये चमकली तर राजेन्द्रकुमारची "कानून, धूल का फूल" मध्ये, मनोजकुमारच्या "गुमनाम" ने देखील लोकप्रियता मिळविली तर "शोर" मध्ये ती त्याची पत्नी बनली होती. राजेश खन्नाच्या "इत्तेफाक" ने त्याच्या सुपरस्टार पदावर शिक्कामोर्तब केले पण त्याच चित्रपटाची नायिका नंदा एका वेगळ्याच रुपात पुढे आली आणि लक्षातही राहिली. पुढे प्रेम रोग, आहिस्ता-आहिस्ता, मजदूर मध्ये चरित्र अभिनेत्रीच्या रुपातही ती पडद्यावर आली होती.
वहिदा रेहमान, आशा पारेख, हेलेन, जबीन यांच्याशी असलेली मैत्री हा एक खास अध्याय होता तिच्या जीवनात. विशेषतः वहिदाशी तिची असलेली मैत्री तर नंदाच्या जीवनातील एक मोठा ठेवा. आज तिचा मृत्यू झाला पण शनिवारी ती वहिदाच्या घरीच जेवणासाठी गेली होती. आज बीबीसीशी बोलताना वहिदाने ती आठवण सांगितली. त्या दोघींच्या (तसेच आशा पारेख सुद्धा) मैत्रीच्या आठवणीबाबत कधीतरी वहिदा रेहमानच लिहू शकतील. एका मुलाखतीत नंदाने स्पष्ट केले होते की त्या स्वतःच्या जीवनातील काही आठवणींना शब्दात बांधू शकणार नाही, म्हणजेच त्यावर चर्चाही त्याना नको होती. त्या क्षणांची आठवण त्याना असह्य वाटत होती....साहजिकच त्यांच्या जीवनातील तो भाग त्यांच्या दृष्टीने बंदच असणे गरजेचे वाटत होते....योग्यही असेल ते.
आपला अभिनय हेच आपले जीवन मानणार्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत शांत जीवन जगलेल्या या अभिनेत्रीच्या स्मृतीत रसिक राहील.
छान आहे लेख .. मलाही नंदा
छान आहे लेख .. मलाही नंदा म्हंटलं की "ये समाँ" आणि प्रभू तेरो नाम" ही गाणीच आठवतात ..
सुरेख लेख अशोकराव.
सुरेख लेख अशोकराव. समयोचित.
मला अतिशय आवडणारे गाणे "ये समा समा है ये प्यार का" त्यानंतर मला "प्यार हुआ है जबसे" हे देखिल खुप आवडतं. त्यात लताच्या आवाजातील प्रत्येक खेळकर अदा नंदाने छान पेलली आहे. "गुलाबी आंखे" हे तर सुरेखच गाणे पण त्याच "द ट्रेन" मधील "किसलिये मैने प्यार किया" यात तिने मस्त अभिनय केला आहे. प्रियकराची आतुरतेने वाट पाहणारी प्रेयसी म्हणुन नंदा छान दिसली आहे.
http://www.youtube.com/watch?v=m9Dd1E2YKqA
बाकी तिच्या अभिनयगुणांचं चीज झालं नाही असं मात्र वाटतं.
आदरांजली.
अतुल... "...तिच्या
अतुल...
"...तिच्या अभिनयगुणांचं चीज झालं नाही असं मात्र वाटतं...."
आपल्या सिनेसृष्टीची एकूणच वाटचाल पाहाता अशी कित्येक उदाहरणे सापडतील की ज्यांच्या अभिजात कलागुणांना त्या त्या काळात योग्यरितीने जोखले गेले नाही....खूप वाटत असते आपल्याला काही दुय्यम भूमिकातच आपली कारकिर्द संपुष्टात आणलेल्या अभिनेत्रींकडे पाहून की याना योग्य संधी मिळाली नाही. उषा किरण, रागिणी, शशिकला, चांद उस्मानी, अमिता, नाझ, नाजनीन....इ. अभिनय सक्षम होता या सर्वांचा. पण ललाटी ती रेघ कधीच उमटली नाही आणि मग मिळतील ते सिनेमे घेणे आणि ते पूर्ण करणे यातच यांचे वयही संपून गेले. तुम्ही तर जाणताच की हिंदी चित्रपटसृष्टी पूर्णतया पुरुषप्रधान असल्याने कमाईवर नाव असलेल्या नायकाने वयाची पन्नाशी पार केली तरी त्याला नायिका मात्र विशीतीलच लागते. नायिकेच्याबाबतीत मात्र ते सुख नाही. पंचविशीतच त्यांचा बहर ओसरल्याचे जाहीर होते....मग उरते ती चरित्र अभिनेत्रीची जागा...तिथेही यश मिळेल याची कसलीच खात्री नाही.
नंदाच्या भाग्यातही हेच लिहिले गेले होते.
छान लेख अशोक.. माझी आई तिचा
छान लेख अशोक.. माझी आई तिचा उल्लेख नेहमी बेबी नंदा असाच करते. मी लहानपणी म्हणायचो, आणखी कुणी दुसरी नंदा आहे का ?
मराठीत "शेवग्याच्या शेंगा" मधे पण ती बहिणीच्या भुमिकेतच होती. लावणी झाली ग रागिणी हा मात्र पुर्ण झाला नाही कधी. त्या चित्रपटात लता आशाच्या गाण्याबरोबरच, मन्ना डे आणि सुलक्षणा पंडित यांनी गायलेले, " बिताई रतिया किनु संग" हे बिलासखानी तोडी मधले सुंदर गाणे आहे. तूफान और दिया मधे देखील, वसंत देसाईंनी
म्हाणे चाकर राखो, पिया ते कहा, मुरलीया बाजेगी जमुना के तीर.. अशी ३ सुंदर मीरा भजने लताकडून गाऊन घेतली
होती.
इत्तेफाक मधे तिच्या तोपर्यंत रुढ झालेल्या प्रतिमेचा मस्त उपयोग करून घेतला होता.
परदेसीयोंसे ना अखिया मिलाना, हे गाणे आधी मुबारक बेगमच्या आवाजात रेकॉर्ड झाले होते. लताने धमक्या वगैरे देऊन ते स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून घेतले असे नैरोबीच्या एफ एम रेडीओ वर सांगितले होते.
नंदा, वहिदा, हेलन आणि साधनाचा अगदी अलिकडचा फोटो मधे फेसबूकवर झळकत होता.
<<<< Saee | 25 March, 2014 -
<<<<
Saee | 25 March, 2014 - 05:04
ठहरिये होश में आ लूं तो चले जाईयेगा.. हे तिचं आणि शशी कपूरचं गाणं अप्रतिम आहे..>>>>
धन्यवाद या गाण्याची आठवण करुन दिल्याबद्दल
मामाश्री लेख चांगला आहे . मला
मामाश्री लेख चांगला आहे . मला फक्त गाणी माहिती आहेत त्यातही बरीचशी गाणी ऐकूनच माहिती आहेत . इथली नावे वाचून सिनेमे शोधते आता .
त्या मराठी(आहेत) होत्या हे मला वाचून समजले .
दिनेश., तो फोटो विकीवर
दिनेश., तो फोटो विकीवर आहे.
आ.न.,
-गा.पै.
दिनेश.... "परदेसियोंसे ना
दिनेश....
"परदेसियोंसे ना अँखिया मिलाना..." हे आणि त्याचबरोबर "काजल" मधील "अगर मुझे ना मिले तुम" ही दोन गाणी प्रथम मुबारक बेगम यांच्या आवाजात रेकॉर्ड झाली होती....पण प्रत्यक्ष त्या चित्रपटांची एल.पी. बाजारात आली होती त्यावेळी त्यातून मुबारक बेगमच्या आवाजातील गाणी लुप्त झाली होती.
मुबारक बेगम स्मरणात मात्र राहतील त्या "कभी तनहाईयो मे यूं हमारी याद आयेगी...." ह्या अमर गाण्यामुळे हे मात्र नक्की.
@ दिव्यश्री....
नंदाचे "नंदा विनायक कर्नाटकी" हे पूर्ण नाव. जन्म कोल्हापूरातील....वयाच्या ५ व्या वर्षापर्यंत कोल्हापूरात मुक्काम. नंतर मा.विनायक यांच्या चित्रपट निर्मितीचा व्याप वाढल्यावर त्यानी कुटुंबासह मुंबईला स्थलांतर केले.
मस्त लेख !!
मस्त लेख !!
अशोकजी नेहेमीप्रमाणे
अशोकजी नेहेमीप्रमाणे माहितीपुर्ण लेख !
नंदा यांनी मराठी चित्रपटात कधी काम केले नाही का ?
महेश.... बालकलाकार म्हणून
महेश....
बालकलाकार म्हणून नंदाने मराठी चित्रपटातून कामे केली होती. विशेष म्हणजे लता मंगेशकर यानी भूमिका केलेल्या "मंदार" चित्रपटात नंदा त्यांच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत होती.
नंतर दिनकर द. पाटील यांच्या "कुलदैवत" चित्रपटात तिने राजन जावळे यांच्यासोबत {राजन जावळे हा हंसा वाडकर यांच्या जीवनातील प्रियकर}. याशिवाय दिनकररावांच्याच "देव जागा आहे", राजा परांजपे यांच्या "देवघर" व यशवंत पेट्कर यांच्या "झालं गेलं विसरून जा". या चित्रपटांत नायिकेची भूमिका नंदाने केली.....
दुर्दैवाने या चित्रपटांना कोणत्याही प्रकारचे यश लाभले नसल्याने नंदाने केवळ हिंदीवरच लक्ष केन्द्रीत केले.
मस्त लेख! नंदाची एवढी माहिती
मस्त लेख! नंदाची एवढी माहिती मला नव्हती... ही ओळख करून दिल्याबदद्ल धन्यवाद.
हे मराठी चित्रपट मला माहीत
हे मराठी चित्रपट मला माहीत नव्हते. ( राजन जावळे माझ्या आत्याचा, अलका आचरेकरचा नवरा.)
हम दोनो मधले, प्रभु तेरो नाम पण नंदावरच चित्रीत झालेय. अल्ला तेरो नाम पेक्षा त्याची चाल कठीण आहे. म्हणून गुणगुणता येत नाही.
दिनेश.... राजन जावळे तुमच्या
दिनेश....
राजन जावळे तुमच्या नातेवाईकातील एक ही बातमी माझ्यासाठी नवीनच. हंसा वाडकर यांच्या "सांगत्ये ऐका" वर आधारित "भूमिका" मध्ये 'राजन' या पात्राच्या रोलमध्ये अनंत नाग यानी कामे केल्याचे मला स्मरते. राजन आणि ऊषा यांचे प्रेमप्रकरण रंगल्याचे दाखविले गेले होते.
अशोक, तुमच्याकडे एवढा जबरदस्त
अशोक, तुमच्याकडे एवढा जबरदस्त माहितीचा साठा कसा काय ?
"सांगत्ये ऐका" वर आधारित "भुमिका" चित्रपट, हे माहित नव्हते.
माझी एक आठवण म्हणजे, "सांगत्ये ऐका" मधे काम केलेले एक कलाकार "राम यादव"
आमच्या घराजवळ रहायचे, आजोबांबरोबर त्यांच्या घरी गेलो होतो एक दोनदा.
हंसाबाईंनीच माझ्या
हंसाबाईंनीच माझ्या आत्येबहिणींचा संभाळ केला. त्या हंसाबाईनाच आपली आई मानतात. ( आत्या आणि राजन नंतर विभक्त झाले होते व आत्याने पंडीतराव नगरकरांबरोबर विवाह केला होता.)
नंदाला आपण शाळेत घेऊन जात असू, अशी आठवण राजा गोसावी यांनी सांगितली होती.
दिनेश, पंडितराव नगरकर म्हणजे
दिनेश,
पंडितराव नगरकर म्हणजे "होनाजी बाळा" मधे ज्यांनी अभिनय केला आहे तेच ना ?
हो तेच.. आमच्याघरी नियमित येत
हो तेच.. आमच्याघरी नियमित येत असत. अत्यंत साधा माणूस.
त्यांनी मराठीत काही भावगीतेही गायली आहेत. ( मी गातो नाचतो आनंदे )
त्यांना संगीत कोहीनूर अशी पदवी होती.
प्रभू तेरो नाम हे कोणते
प्रभू तेरो नाम हे कोणते गाणे?
अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम
सबको सन्मती दे भगवान
असे गाणे आहे.
( No Substitute Please. )
लक्ष्मी गोडबोले... "हम दोनो"
लक्ष्मी गोडबोले...
"हम दोनो" मधील नंदावर चित्रित झालेले ते भजन म्हणजे "प्रभू तेरो नाम..."
प्रभु तेरो नाम, जो ध्याये फल पाये, सुख लाये तेरो नाम
तेरी दया हो जाये तो दाता, जीवन धन मिल जाये
~ वैशिष्ठ्य म्हणजे साहिर लुधियानवी यांच्या ह्या अगदी शुद्ध हिंदीतील दोन्ही रचना....."अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम...". दोन्हीही भजन चित्रपटाची खूप जमेची बाजू ठरली....आजही याना भजनगीतात स्थान आहे.
@ महेश ~ थॅन्क्स.
>>( No Substitute Please. )
>>( No Substitute Please. )
२ गाणी आहेत. मला एकच माहीत
२ गाणी आहेत. मला एकच माहीत होते. इंटरवलनंतर लगेच अल्ला तेरो नाम गाणे आहे. दोन तीन वर्षापूर्वी हम दोनो रंगीत होऊन पुन्हा थेटरात लागला होता. तेंव्हा पाहिल्याचे आठवते.
थोडक्यात छान आढावा घेणारा
थोडक्यात छान आढावा घेणारा लेख.
---------------------------------------------------------------------------------------------------
अशोकजी,
वरील एका पोस्टमधे 'हम दोनो' मधील संपूर्ण गाणे उद्धृत केले गेले आहे.
प्रताधिकाराच्या दृष्टिकोनातून हे कितपत योग्य याचा कृपया विचार व्हावा ही नम्र विनंती.
मायबोली-प्रशासन प्रताधिकाराबाबत सतर्क असते त्यामुळे मायबोली- अॅडमिन यांचा याबाबत सल्ला घेणे योग्य ठरेल असे वाटते.
चांगला लेख आहे. नेट वर
चांगला लेख आहे.
नेट वर त्यांनी त्यांच्या बालवयातील भूमिका केलेल्या चित्रपटाविषयी पाहत असताना खालील लिंक सापडली ,
http://www.youtube.com/watch?v=16POR9SZ9WY
ह्यात ४.२४ मिनिटानंतर जी बालकलाकार आहे त्या बेबी नंदाच आहेत का?
उल्हास जी.... वेळीच सूचना
उल्हास जी....
वेळीच सूचना केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.... दोन ओळी ठेवून ते भजन गीत काढून टाकतो, लागलीच.
गौरीम अगदी बरोबर. "अंगारे"
गौरीम
अगदी बरोबर. "अंगारे" चित्रपटातील ती बालकलाकर म्हणजे नंदा होय.....आणि ज्या अभिनेत्रीवर ते गाणे चित्रित झाले आहे ती अभिनेत्री म्हणजे वनमाला.....श्यामची आई मधील प्रमुख भूमिकेतील कलाकार.
अशोकजी, धन्यवाद.
अशोकजी,
धन्यवाद.
सई परांजपेंनी 'अंगूठाछाप '
सई परांजपेंनी 'अंगूठाछाप ' नावाची एक छोटी फीचर फिल्म काढली होती प्रौढ साक्षरतेच्या प्रचारासाठी .त्यात एक आजोबा मनी ऑर्डर स्वीकारताना पोस्टमनच्या रिसीटवर सहीचा निशाणी अंगठा देतात . ते पाहून शालेला जाणारी मुले कुत्सितपणे हसतात आणि आजोबाना 'अंगूठाछाप ' म्हणून हिणवतात. त्यावर आजोबा सही शिकण्याचा निश्चय करतात पण लोक हसतील म्हनून नातवाला घेऊन रोज दूर रानात जाऊन लिहावाचायला शिकतात . महिन्यानन्तर पोस्तमन आल्यावर चक्क सही ठोकून मनी ऑर्डर घेतात ! नर्मविनोदी (सईस्टाईल) आणि खूप प्रभावी फिल्म होती. त्यातील वृद्ध आजोबा म्हणजे राजन जावळे होते . बहुधा ऐशीच्या दशकात ही फिल्म आली होती. बाकी सांगत्ये ऐका मध्ये जावळेबद्दल माहिती आहेच.....
सुंदर रीतीने आठवणी जागवून खरी
सुंदर रीतीने आठवणी जागवून खरी श्रद्धांजली वाहणारा लेख .प्रतिसादही तसेच.
आपको दिलमें बसा लूँ या गाण्याची गोडी अवीट.
सई, तुला अर्धवट आठवतोय तो सिनेमा नंदा- सुनील दत्त यांचा 'आज और कल' , हा पु.ल.देशपांडे यांच्या 'सुंदर मी होणार ' या नाटकावर आधारित होता हे अशोकनी सांगितलेच ,हे नाटक एलिझाबेथ आणि रॉबर्ट ब्राऊनिंग या कवी-दाम्पत्याच्या खऱ्याखुऱ्या प्रेमजीवनावर आधारित होते अशी आणखी एक टिप्पणी ..
रॉबीनहूड... "अंगूठाछाप" विषयी
रॉबीनहूड...
"अंगूठाछाप" विषयी त्रोटक वाचायला मिळाले होते, ज्यावेळी मी कथा आणि स्पर्श निर्मिती संदर्भात वाचन करीत होतो त्यावेळी. अर्थात अंगूठाछाप मधील तो वृद्ध म्हणजे राजन जावळे हे मात्र तुमच्या प्रतिसादामुळे समजले.
Pages