एक कातर सायंकाळ ....

Submitted by पुरंदरे शशांक on 24 March, 2014 - 07:08

एक कातर सायंकाळ ....

कामानिमित्त जेव्हाकेव्हा ऑफिसमधे सायंकाळनंतरही थांबणे होते तेव्हातेव्हा सूर्य अस्ताला जात असताना ऑफिसमधल्या बंद खोलीत मला बसवत नाही, मनाला भुरळ घालणार्‍या अशा संध्याकाळी मी जरा पाय मोकळे करायला बाहेर जातोच जातो. एकतर माझ्या ऑफिसच्या आसपासचा परिसर अनेक झाडांमुळे शोभिवंत असा आहे आणि सायंकाळी तो अगदीच वेगळा भासतो.... तिथे काही काळ घालवल्यावरच परत कामाला सुरुवात करता येते...

सूर्य अस्ताला जाताना माझ्या ऑफिसच्या परिसरात अनेक पक्षी मोठ मोठ्या थव्याने उतरत असतात. याचे साधे कारण म्हणजे तिथे असलेली उंचच उंच झाडे. या झाडांवर हे पक्षी रात्रीच्या निवार्‍यासाठी येतात. कावळे व साळुंक्या फार मोठ्या प्रमाणावर असतात. तसेच अनेक काळे-पांढरे बगळेही वसतीला असतात. इथे उतरताना त्यांचा इतका कलकलाट चालू असतो की विचारायची सोय नाही....

4_0.JPG

हे जे फोटोतले साधे कळकीचे (बांबूचे) बेट दिसते ना त्याच्या शेजारुन काल संध्याकाळी जात असताना चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू आला. बहुतेक दर सायंकाळी चिमण्या वसतीला येत असाव्यात. काल तिथून जात असताना मला अचानक एक जरासा मोठा पक्षी त्यावर दिसला. म्हणून मग मी तिथे थांबून त्या पक्ष्याचे निरीक्षण करु लागलो - तर तस्सेच अजून दोन-तीन पक्षी दिसले. या चिमण्यांचा इतका चिवचिवाट चालू होता की बस्स.... फार अंधार पडला नव्हता तरी तो मोठा पक्षी नीट पहाता येत नव्हता - पण क्षणार्धात त्याची ओळख पटली कारण तिथे निवार्‍याला येणार्‍या चिमण्यांवरच तो लक्ष ठेऊन एखादी तरी आपल्या तावडीत सापडते का हे शोधत होता ....... तो होता स्पॅरो हॉक ...टोकाला खाली वळलेली तीक्ष्ण आणि धारदार चोच, अणकुचीदार नखे आणि तेज नजर ही निसर्गदत्त साधने लाभलेला एक अस्सल जातिवंत शिकारी पक्षी .....

2_0.JPG

त्या बांबूच्या बेटाचे वैशिष्ट्य असे की साधारण १५-२० फुट उंच असलेल्या या बेटाच्या वरती वरती जरी खूप विरळ फांदोर्‍या असल्या तरी खाली खाली दाट फांदोर्‍यामुळे चिमण्यांना रात्रीच्या विसाव्यासाठी ती अगदी उत्तम जागा होती. चिमणीच्यामानाने हा हॉक मोठा पक्षी असल्याने तो त्या दाट फांदोर्‍यात शिरु शकत नव्हता. जसजशा चिमण्या थव्याने त्या बेटावर उतरत होत्या तसतश्या त्या लगेच त्या दाट फांदोर्‍यात शिरत होत्या..... आणि हे शिकारी महाशय एखादी तरी चिमणी आपल्या तावडीत पकडण्यासाठी अगदी सज्ज होऊन बसले होते. अनेक चिमण्या येत होत्या - हा हॉक त्यांना पकडण्याचा प्रयत्न करीत होता आणि तरी त्याला यश लाभत नव्हते....

......मधेच एक हॉक जरा उंचीवरच्या मोकळ्या बांबूवर जाऊन बसला.... मी त्याचे नीट निरीक्षण करावे म्हणून याबाजूने-त्याबाजूने पहात असतानाच एक कावळा येऊन त्याला हुसकावून लावण्याच्या उद्देशाने त्याच्यावर जरा चाल करुन गेला ...... त्याबरोबर तो हॉक परत खालच्या फांदीवर जाऊन बसला ....

मी भान विसरुन या सगळ्या नाट्याकडे पहात असताना कोणी एक व्यक्ति माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. ती सांगू लागली की गेले कित्येक दिवस अशाच सायंकाळच्या वेळेला ते हॉक पक्षी या बांबूच्या बेटावर येऊन बसतात आणि चिमण्यांची शिकार साधतात. आमचे बोलणे चालू असतानाच एका हॉकच्या तावडीत एक चिमणी सापडली. आपल्या मजबूत नख्यांच्या पकडीत तिला घेऊन तिथेच त्याने तिची चिरफाड सुरुही केली ...

हे सर्व चालू असताना अजूनही चिमण्या त्या बांबूच्या बेटावर उतरत होत्याच .... त्या बाकीच्या चिमण्यांच्या दृष्टीने हे सर्व त्यांच्या जीवनक्रमाचा एक भागच होता जणू.....आज असाच कुठल्यातरी चिमणीचा नंबर लागला होता... तो कलकलाट असाच १०-१५ मिनिटे चालला...अंधार जरा गडद झाल्यावर हॉक अलगद कुठेतरी निघून गेलाही .... कलकलाटही बराचसा कमी झाला आणि अजून १०-१५ मिनिटांनी ते बांबूचे बेट अगदी शांत शांत झालेले आणि त्या निद्राधीन चिमण्यांना कुशीत घेऊन स्वस्थ विसावलेले...

......एक विचित्र कातर सायंकाळ मनावर कोरली गेली .......
-----------------------------------------------------------

तो स्पॅरो हॉक असा होता (प्र चि आंतरजालावरुन साभार ....)

shikra.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम प्रभावी वर्णन केलंयत.. मला वाटलं मी पण उभी होते तिथे ते सगळं बघत Happy छानच.
तुमच्या ऑफिसचा परिसर रम्य दिसतोय एकंदरीत!

छान लिहिलेय. त्या फोटोमूळे सगळे डोळ्यासमोर उभे राहिले.

निसर्गात आपण ढ्वळाढवळ करायची नसते हे माहित असले तरी मी त्या हॅकला हाकलायचा प्रयत्न केला असता मी. चिमणीचा विचार करताना हॅक आणि त्याच्या बाळाचा विचार करायला हवा हे पण कळतेय.. तरी..

सुरेख लिहलंय Happy

हे जे फोटोतले साधे कळकीचे (बांबूचे) बेट दिसते ना त्याच्या शेजारुन काल संध्याकाळी जात असताना चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू आला.>>>>अगदी हेच आमच्याही ऑफिस परीसरातही अनुभवायला मिळते. त्या चिमण्या अगदी मिसाईल सारख्या या बेटात घुसतात. Happy

मीही जेंव्हा पहिल्यांदा कावळ्याला चिमणीची शिकार करून खाताना पाहिले तेंव्हा लहानपणी ऐकलेल्या "काऊचिऊच्या" गोष्टीच्या चिंधड्या झाल्या होत्या (माझ्या मनात). Sad (मी पहिल्यांदाच हे पाहिले होते आणि यापूर्वी कुठे वाचले/ऐकले नव्हते).

अर्थात जीवो जीवस्य जीवनम Happy

फार सुंदर लेखन शशांक, बांबूंचे फोटोही अप्रतिम...संध्याकाळच्या कातर समयाला वेढून घेतायत असं वाटतंय.