बालकवींचा श्रावणमास.. बारोमास..
मध्यावर आलेल्या शरद ऋतुच्या गुलाबी थंडीला आणि निळ्याभोर अभ्ररहीत आकाशाला खोलवर भरून आलेल्या हृदयाने निरोपाचे उसासे टाकत कसाबसा टाटा करून पहिल्यांदाच सिंगापोरला आगमन केले त्यावेळी ह्या चिमुकल्या बेटावर हिरवीकंच, पावसाने सुस्नात न्हावून निघालेली आणि शतसुर्य झळकतील अशी पानापानात चकाकणारी आकृतीबंध झाडे बघून आपण श्रावण महिन्यात पदार्पन केले की काय असे मला वाटले. त्यात ऊनपावसाची सारखी रदबदली सुरू होती. रस्ते निसरडे नव्हते हवा मात्र कुंद होती. सादळ वातावरणात देखील तांदळाचे कुरकुरीत मुरुक्कु विकणारी एक स्थानिक तमिळ कन्या भेटली. रात्रीच्या वेळी आकाशात शरदाच्या टपोर दुधाळ चांदण्या नव्हत्या.. बहुतेक ढगामागे दडल्या असतील पण नंतर कळले त्या निऑनच्या प्रकाशात लुप्त झाल्या आहेत कारण आजवर कधीच अगदी अवसेच्या रातीदेखील तारकांनी खच्चून भरलेले आकाश मी इथे पाहिले नाही. थंडीतून बाहेर पडून थेट वर्षाऋतु अनुभवत होतो. दाहक वैशाख मागे कुठे तरी हरवला अशी गमतीदार कल्पना डोक्यात येत होती. प्रवास करताना वाटेत कुठेतरी चुकार शेंगा नि चुकारच लालभडक फ़ुले वागविणारा गुलमोहोर दृष्टीस आला की ह्या गमतीदार कल्पनाचे कटू वास्तवात रुपांतर होई कारण चिनी संस्कृतीला तर दूरच पण इथल्या निसर्गालाही मी माझ्या हृदयात अजून स्थान दिले नव्हते. देशी थंडीमुळे भुरकट झालेली त्वचा, काळवंडलेले कोपर, उललेले ओठ विदेशी हवेतील ओलाव्यामुळे पुन्हा एकदा आपल्या पुर्वरुपात येत होती. अवेळीच होणारा हा बदल न्ह्याहाळताना उगाच मला धूक्याची शाल पांघरणार्या आणि कोवळ्या गव्हाळ उन्हाची ऊब देणार्या पौषाची आठवण होत होती कारण गोणपाट नाही तर पोत्यावर बसून कुडकुडणार्या देहाचे सरंक्षण करण्यासाठी ऊन खात बसण्याचा पौष हा खास महिना. दवाने भिजलेला वाळका काडीकचरा नि विझू विझू होत जाणारी धुराने डोळ्यात पाणी आणणारी त्याची शेकोटी नकोशी झालेली असते तो महिना. बाजारहाट करताना मटाराच्या शेंगा इथे मिळत नाही हे ऐकून जिभ हळहळली. इथे प्राजक्त फ़ुलत नाही.. तो दिसतही नाही ही उणिव खट्टू करून गेली. इथे काय मिळते त्यापेक्षा काय नाही मिळत ह्याची यादी तयार होत होती. मग न मिळणार्या गोष्टीवर पर्याय शोधणे, अनुभवी देशी लोकांशी ओळखी करून त्यांची जीवनशैली अंगीकारणे आणि आजवर आपण जसे जगत आलो त्या शैलीत खूपसे बदल, वर तेही मनाविरुद्ध, करून घेणे एकदमच एकाचवेळी अंगावर आले. कुठेतरी आपली संस्कृती जोपासण्याची अस्मिता दुखावल्या गेली. आगंतुक म्हणून नवखेपणा तेवढ्यापुरता बरा वाटला खरा पण चार दिनकी चांदणी म्हणतात त्याप्रमाणे नंतर काही दिवसातच आपली माती अन् आपलीच माणसं ह्यांची गरज भासू लागली. इथे आणि बारोमास पावसाळा म्हंटल्यानंतर एक छत्री घरी, एक ऑफ़ीसात आणि एक सोबत न्याव्या लागणार्या बॅगेत अशा एकूण तीन छत्र्यांचा बंदोबस्त करावा लागला. त्यात इथल्या छत्र्या दिसायला सुंदर जरी असल्या तरी वार्याच्या एका झोताने उलट्या तिलट्या होऊन मोडून पडणार्या. काही चुकुन गाडीत किंवा ट्रेनमधे विसरून राहणार्या. काही कुणी उसण्या घेऊन परत न केलेल्याही आहेतच. अर्थात कैक छत्र्यांशी माझा पाला पडला.
to be continued..