भारतीय रेल्वे जिव्हाळ्याचा विषय

Submitted by हर्ट on 19 February, 2014 - 20:44

नमस्कार, तुम्ही आम्ही आपल्यापैकी अनेकांनी रेल्वेमधून प्रवास केलेले असतील. इथे तुम्ही तुमच्या आवडती रेल्वे , अधेमधे येणारी गावे, तालुके, जिल्हे, निसर्ग, झाडीझुडी, खा-प्यायचे पदार्थ, भेटलेले व्यक्ति आणि वल्ली, अलिकडे झालेले बदल, रेल्वेची नावे - नदीवरुन, इतिहासावरुन - ह्या सर्वांची रसभरीत चर्चा इथे करा.

पोलादी आयुष्य माझे
फिरते भारत सारा,
वाढता वाढता वाढे
माझा रुळ्-पसारा

इतिहासाची साक्ष मी,
मी 'ऑगस्ट क्रांती',
जनमाणसातील दुवा मी,
मी आहे 'संपर्क क्रांती'

टागोरांची 'गीतांजली' मी
माउलीची 'ज्ञानेश्वरी' मी
प्रेमचंदची 'गोदान' मी
नझरुलची 'अग्नीवीणा' मी

दिल्लीची 'राजधानी' मी
मी नेताजींची 'आझाद हींद'
कोल्हापुरची 'महालक्ष्मी' मी
मी गांधीजींची 'अहिंसा'

कोकणची 'कोकणकन्या' मी
सोलापुरी 'सिद्धेश्वर'
उज्जैनची 'अवंतिका' मी
एंम्.पी .यु .पी. 'फ्राँटीयर'

बोगद्यात घुसमटते जरी
तरी 'डेक्कन क्वीन'च मी
'रो-रो'कर हैराण जरी
'नेत्रावती ' अजूनही मीं

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी , मस्त धागा काढलायेस रे..

सर्वांचे अनुभव वाचायला मजा येतेय..

लहानपणी रेल्वे ने जबलपूर - मुंबई प्रवासाच्या खूप आठवणी आहेत. एम पी मधे ,' छोटी लाईन की ट्रेन.. नॅरो गेज ट्रेन ने पण प्रवास केलाय , अगदी कोळश्या चं इंजिन असलेल्या ट्रेन नी ही.

बिन गजाच्या ,मोठ्या , मोकळ्या खिडकींतून ओणवे होऊन वळण घेणार्‍या गाडीचे मागचे डबे पाहताना कित्ती गंमत यायची..

गाडीतून उतरल्यावर, कोळश्या चे कण गेल्याने हमखास डोळे चोळत घरी यावे लागे.. Happy

आता २५०० गाड्यान्मध्ये 'जैव शौचालये' बसवली आहेत. भार तीय रेल आगे बढो!
रेल्वे चालकाला 'इजीन ड्रायव्हर' म्हणत नाहीत! 'लोको पायलट' म्हणतात. तेथे 'ड्राइव्ह' असा भाग नसतो.
तसेच डब्यात येणार्या तपसनीसास 'टी,सी.' असे म्हणत नाहीत; तो 'टी.टी.ई' असतो. ( दीर्घ रूप ओळखा!)
स्टेशनातून बाहेर पडताना जो तिकीटे गोळा करतो तो टी,सी.

मंजू, आहे अजून तो स्वर्णशताब्दी. तशीच स्वर्णशताब्दी दिल्ली अमृतसर पण आहे. दोन्ही गाड्या मस्त आहेत. गेल्या दोनेक वर्षात या गाड्यांचा प्रवास झाला नाहीये. नाहीतर दोन्ही गाड्यांमधून वर्षातून किमान १-२ चकारा व्हायच्या. Happy

थोडा विषयाला सोडून प्रश्न
विचारत आहे .

कोणी सर्क्युलर जर्नी तिकीट काढून प्रवास केला असल्यास
लिहा .शक्यतो प्रत्यक्ष काय काय केले (मुंबई सुरवात शेवट असल्यास उत्तम) ते लिहा .टाईमटेबल मधली निव्वळ माहिती नको .
मुंबई -भुवनेश्वर-हावडा-अलाहाबाद-झाशी-मुंबई असा एक प्लान डोक्यात आहे .

पुणे ते भुवनेश्वर असा प्रवास एकदा कोणार्क एक्स्प्रेसने कराच आणि मग तिला एक्स्प्रेस का म्हणतात ते सांगा.. तब्बल दोन दिवस लागतात... ती गाडी.. दक्षिण भारत दर्शन करत जाते.. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मग शेवटी ओडिसा... विजयवाड्याचा आसपासचा तो लांबलचक पूल पण लागतो मधे.. तो झकास आहे.. १९९२ साली केला होता हा प्रवास... नुसता धुमाकूळ घातला होता ट्रेन मध्ये... आणि ट्रेन मधून उतरल्यावर दोन दिवस नुसते हालत होते... अजूनही ट्रेन मधेच असल्यासारखे..

ट्रेकसाठी हिमालयात गेलो होतो तेव्हा पुणे दिल्ली हा झेलमने केलेला प्रवास पण भन्नाट होता.. एकतर ३५ जणांचा ग्रूप होता.. आणि त्यात ट्रेकिंगचेच दिवस असल्याने.. ट्रेन भर वेगवेगळ्या ग्रूपची भरपूर माणसे..

अगदी अलिकडचा ट्रेन प्रवास मध्यप्रदेशात केलेला.. उज्जैन, भोपाळ, जबलपूर मधला...

पुणे ते भुवनेश्वर असा प्रवास एकदा कोणार्क एक्स्प्रेसने कराच >> आम्ही मुंबई ते भुवनेश्वर हा प्रवास केला होता. तिथे विजयवाडा स्टेशनला ट्रेन उलटी जायला लागते, तेव्हा भारी मज्जा वाटली होती.

लहानपणी (८४ साली) साउथच्या ट्रीपसाठी आई-बाबांनी सर्क्युलर तिकिट काढलं होतं. (पण त्यावेळी अगदीच लहान असल्याने काहीही आठवत नाही)

हिम्सकूल आणि नंदिनी ,आमच्या ऑफिसमध्ये (ठाण्याला) कोणी पुणे नाशिकचं
रेल्वेचं पुराण (?) सांगू लागला की बंगाली ,तमिळ लोकं त्याला चूप करायची .त्यांना गावी जाऊन यायला आणि तिकिटे
मिळवायला किती त्रास पडायचा त्यावेळी त्यापुढे चार तासांचा प्रवास काहीच नव्हता .
मोठा साहेब असेलतर मागून
चेष्टा करत .

रेल्वेच्या धाग्यावर रिक्षा फिरवायचा मोह टाळता येत नाहीए! हा माझा आत्तापर्यंतचा सर्वात रोमहर्षक रेल्वे प्रवास - http://www.maayboli.com/node/25288

मुंबई -रत्नागिरी प्रवास तर नेहमीचाच ....

http://www.youtube.com/watch?v=U1H9d5FbLNM

कोकण रेल्वे ने जाताना गोवा- कारवार च्या पुढे "दूधसागर " धबधबा लागतो. अतिशय प्रेक्षणीय !

http://www.youtube.com/watch?v=BKef6NAbeYw

विशेषतः पावसाळ्यात कोकण रेल्वे प्रवास म्हणजे तर स्वर्गसुखच !

कोणी पुणे नाशिकचं
रेल्वेचं पुराण (?) सांगू लागला की बंगाली ,तमिळ लोकं त्याला चूप करायची .त्यांना गावी जाऊन यायला आणि तिकिटे मिळवायला किती त्रास पडायचा त्यावेळी त्यापुढे चार तासांचा प्रवास काहीच नव्हता .<<< आम्ही पण हल्ली असंच करतो. चेन्नईवरून रत्नागिरीला यायला एकही धड ट्रेन नाही. तीन चार ट्रेन बदलत प्रवास कोण करेल... त्यात परत टिकीटं मिळायची मारामारी. म्हणून आम्ही गोव्यापर्यंत विमानाने तिथून पुढे कारने येतो.

मंगलोर चेन्नई ट्रेन नकाशात पाहिलं तर बरोब्बर एकमेकांच्या समोर आहेत ही गावं तरी मंगलोर चेन्नई ट्रेन अर्धा केरळ तमिळनाडू फिरवत फिरवत रमत गमत घेऊन येते.

जुन्या रेल्वेच्या आठवणी व आताची रेल्वे यात जमीन आस्मानाचा फरक आहे. बाहेरून मिळणारे पदार्थ ब-यापैकी चांगले असतात. मुळात रेल्वेचे अन्न आता बेचव असते. पुणे-हैदराबाद शताब्दी मध्ये तर पनीर (एकमेव भाजी असते येता जाता : अनभिज्ञ चवीची) चावता चावत नाही. नुसताच पॅकिंगचा डामडौल.

दिल्लीला गेट २ पाशी असलेले Travelers' Executive Lounge म्हणून जे काही तीन तासाला भयंकर पैसे घेऊन लुटतात त्यात फक्त जेवण बरे असते. गरम व जराशी चव असते बरं का.

आताचे नवीन हुबळी स्टेशन इमारत ,वेटिंगरूम्स ,वेज आणि नॉनवेज दोन वेगळी किचनस ,स्वच्छता ,पदार्थ आणि किंमती केवळ अप्रतिम आहेत .

साउथ वे रेल्वेचे कामकाज फारच आवडले .फुकट्यांना हाकलतात ,पैसे देणाऱ्याला पूर्ण
मोबदला देतात . रिझव् डब्यात
पावती फाडली तरच बसू देतात .भले डबा सगळा रिकामा असो .

आत्ता एकदेम एक जुनी रेल्वे प्रवासाची आठवण आली. कॉलेजात असताना एकदा आम्ही (आख्खा क्लास) प्रोजेक्टच्या कामासाठी २०-२२ दिवसासाठी केरळला गेलो होतो. जातानाच अहमदाबाद ते कोची प्रवास छानच झाला. आम्ही ४८ जणं अधिक १ शिक्षक असल्याने फुल्ल धमाल केली. येताना अचानक कोणत्यातरी कारणाने (बहूतेक कोणत्यातरी गाडीचा अपघात झाला होता) गाडी मुंबईहून सुरत-बडोदामार्गे अहमदाबादला जायच्या ऐवजी ठाणा-नाशिक-मनमाड-जळगाव रुटला वळवली. हे मध्यरात्रीत कधीतरी झालं. आम्हाला पत्ताच नव्हता. सकाळी उठल्यावर अचानक नेहेमीचा रस्ता दिसायला लागल्यावर चक्रावलेच. काय झालं याची चौकशी करेपर्यंत मनमाडची वेळ झाली. गाडी मनमाडला थांबेल की नाही हे पँट्रीतल्या लोकांना विचारून बघितलं, पण त्यांना काही अंदाज नव्हता. मग शेवटी ठरवलं, जर गाडी स्लो झाली मनमाडला तर लगेच खाली उतरायचं, थांबायची वाट न बघता आणि सरळ औरंगाबादला जायचं. २-३ दिवस घरी राहून मग नंतर जाता येईल अहमदाबादला. लगेच कोणाकोणाला अजिंठा-वेरूळ बघायचंय म्हणून विचारून झालं आणि १५ मिनीटात बॅगा पॅक होवून मनमाड स्टेशनला गाडी स्लो झाल्याबरोबर माझ्यासकट ८ जणांनी प्लॅटफॉर्मवर उड्या मारल्या. त्यावेळी सोबतच्या सगळ्यांचे मोबाइल मेले होते. (गाडी पण बरीच लेट होती तशीही). अचानक इतक्या मित्र-मैत्रिणींना घेवून घरी आलेलं बघून आई-बाबा चकित झाले होते.

फेब्रुवारि मध्ये जबलपूर पर्यन्त वार्यावर डुलणारी गव्हाची शेते रेल्वेच्या बाजूने छान दिसतात. सुजलाम्,सुफलाम भारत असे सारखे जाणवते.

ट्रेन जेव्हा जेव्हा नदीवरच्या, खाडीवरच्या पुलावरून जाते तेव्हा लई भारी वाटते, जिकडे बघावं तिकडे पाणीचपाणी. तसेच काळोख्या बोगद्यातून जाते तेव्हापण खूप छान वाटते, दोन्ही वेळेला एक वेगळाच आवाज, लय व्यापून रहाते तेव्हा.

ह्या काही आठवणी ..

१. मिरजेला जाताना महालक्ष्मी आणि दिल्लीला जातान पश्चिम एक्स्प्रेस हवी असायची .. पण ह्या दोन ट्रेनची कन्फर्म्ड् तिकीटं कधीच मिळायची नाहीत .. सह्याद्री एक्स्प्रेस आणि मुंबई-दिल्ली राऊट वर दादर-अमृतसर, पंजाब मेल, देहराडून एक्स्प्रेस ह्या पॅसेन्जरच नशिबी यायच्या .. तसंच एकदाच जेव्हा श्रीनगरला गेलो तेव्हाही जम्मु-तावी एक्स्प्रेसचं तिकीट नाहीच मिळालं .. रेल्वे रिझर्वेशन्स् कम्प्युटराईज्ड् झाल्यानंतरही वेगळा विषय ठरावा .. मराठमोळ्या मध्यमवर्गीय अशा आमच्या घरी एजन्ट कडून तिकीटं घेणं हा बिग नो नो होता .. Happy

२. कुठल्याही स्टेशनवर उतरून ऑम्लेट खाण्यातली मजा काही औरच असायची

३. दिल्ली आधीच्या हजरत निजामुद्दीन आणि पुण्या आधीच्या शिवाजीनर स्टेशनमध्ये मला नेहेमीच खूप साम्य वाटायचं ..

४. ८४ साली ऐन ३१ ऑक्टोबरला आम्ही मुंबई-कोल्हापूर प्रवासासाठी निघालो .. व्हीटीला जायच्या हार्बरमध्येच इंदिरा गांधींची न्यूज् मिळाली .. ट्रेन सुटली वेळेवर पण दुसर्‍या दिवशी कोल्हापूरला पोचलो तोपर्यंत जवळ जवळ अख्खा भारत बंद होता .. मग तिकडे स्टेशनवरच "रिटायरींग रूम " मध्ये रहावं लागलं दोन दिवस .. सगळं नीट आठवत नाही पण डास मात्र भारी होते त्या रिटायरींग रूम मध्ये हे आठवतं पण रिकाम्या प्लॅटफॉर्म वर मनसोक्त खेळता आलं होतं तेही आठवतं ..

५. काश्मीरला जाताना आम्हाला दोन-तीन ट्रेन्स् घेऊन जायला लागलं होतं बहुतेक .. पैकी पंजाबातून जाताना आमच्या समोरच्या एका सीट (आणि बर्थ) वर एक पंजाबण आपल्या दोन मुलांनां घेऊन प्रवास करत होती .. थंडीबद्दल बोलताना सारखं "आपकी तो कुल्फी जम जायेगी इतनी ठंडी असं म्हणत होती .. ती ज्या छोट्या स्टेशनला उतरली ते नाव मात्र माझ्या कायम लक्षात राहीलंय .. "टंडा उरमुड" .. (गुगलवर काहिही मिळतं .. त्या स्टेशनचा फोटो मिळाला .. पण माझ्या आठवणीतलं मात्र अगदी साधंसुधं, अगदीच कमी उंचीचा प्लॅटफॉर्म ज्यावर उडी मारून उतरावं लागेल असं आहे ..)

बी, मस्त धागा! रेल्वे प्रवास हा अगदी जिव्हाळ्याचा विषय. ११वी पासुनच लोकल प्रवास सुरु झाला. बडा फास्ट, विरार फास्ट, तर कधी स्लो ट्रेन यात घडणारे रोज नवनविन किस्से...कोळीणींच्या टोपलीत पाय पडल्यावर मिळणारी लाखोली, गप्पा-टप्पा, गाण्याच्या भेंड्या, विरारवाल्यांच्या शिव्या, लोंबकळत केलेला प्रवास, कधीतरी अचानक भेटणार्‍या जुन्या मैत्रिणी... सगळं संपले. ईथे अमेरिकेत आल्यावर पहिली काही वर्ष खुप खुप मिस केले. आज बर्‍याच वर्षांनी या गोष्टी आठवल्या. हे झाले लोकल प्रवासाचे... मुंबईत आल्यावर अजुनही लोकल प्रवास करते पण आता दारात उभे राहायला पण घाबरते.
मुंबई- बंगलोर प्रवास ४-५ वेळा घडला. बंगलोर वरुन मुंबईला शिफ्ट झालो तेव्हा मी एकटीच सामान (१७ नग ) घेऊन आले. डब्यामधल्या सगळ्यांना कामाला लावले. कारण दादरला गाडी जास्त थांबत नाही. मजा आली. दादर-लोणावळा प्रवास तर खुप झाला आणि हा प्रवास कर्जतचा वडा खाल्याशिवाय कधीच पुर्ण झाला नाही. पण आता मात्र कर्जतला उतरुन वडा घेण्याची हिम्मत होत नाही. कारण आमच्या बिल्डींग मधल्या माझ्या बहिणीच्या मैत्रिणीचा नवरा,मुलगा हाच वडा खायला उतरले आणि दोघेही आपला जीव गमाऊन बसले. त्यामुळे आता कर्जतचा वडा म्ह्टला की ती फॅमेली आठवते. मुख्यतः तिचा तो गोंडस ४-५ वर्षाचा मुलगा.
अशा या रेल्वेच्या गोड कडु आठवणी अगदी उफाळुन आल्या.

आता जो किस्सा सांगणार आहे तो माझ्यावर आलेला
प्रसंग नाही आणि तो सांगून हसण्यासाठीही नाही .
रेल्वे प्रवास ठरवला तर किती जागरूक राहावे लागते याकरिता आहे .

या ओळखीच्या बाई मध्य
रेल्वेच्याच बोरिबंदर(मुंबई सिएसटि) कार्यालयातच
कामाला .त्यांच्या सहकर्मचारीँचा एकदा विचार
झाला इतके लोक ग्रुपने
सहलीला जातात आपण इथे
रेल्वेतच कामाला तरी कुठे
गेलो नाही . काथ्याकूट करून
दिल्ली ठरले .
एक दिवस जादा मिळावा
आणि सर्वांना सोईची
दादरहून रात्री पावणेबाराला सुटणाऱ्या
दादर अमृतसरची तिकीटे
निघाली .
ऑफिसमधून त्यादिवशी
घरी जाऊन सामान घेऊन
ठरल्याप्रमाणे जरा लवकरच
साडेदहाला दादरला एक एक येऊ लागल्या .
हमालानेच विचारले कुठे जायचे आहे ?
"अमृतसर किती वाजता लागते ?" याचे उत्तर
"आज नऊलाच गेली ."

त्यादिवशी कसाऱ्याला काम
असल्याने गाडी लवकर
सोडली होती .
पुढे कित्येक दिवस ऑफिसमध्ये
सर्वाँच्या थट्टेचा विषय होता .रेल्वेनेच रेल्वेवाल्यांना कसे
फसवले याचा .

रेल्वे प्रवास या विषयावर दूरदर्शनवर श्याम बेनेगल याची यात्रा नावाची मालिका लागत असे. खूप वर्षापूर्वी.

माझ्याही अनेक आठवणी आहेत रेल्वेच्या..आणि देशाच्या चारही कोपऱ्यात जाण्याची संधी मिळाली आहे...पठाणकोट, दिल्ली, कलकत्ता, ओरिसा, बेंगलोर, जयपूर अशा लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये जाम धमाल येते आणि मला तरी लोअर साईडबर्थ सगळ्यात जास्त आवडतो. फक्त समोरच्या सीटवर कुणी नको...मस्त पाय पसरून पुस्तक वाचा, गाणी ऐका, येणारे जाणारे लोक, स्टेशनवरची धमाल सगळे काही अनुभवता येतं...

माझी एक जीवाला त्रासदायक अशी आठवण म्हणजे दिल्लीवरून येताना...रात्री ट्रेनमध्ये बसत असताना एक मध्यमवयीन गरीब माणूस रडत भेकत टीसीच्या पाया पडत होता. बाजूला त्याची बायको, आई आणि दोन गोंडस मुले कावरीबावरी होऊन बघत होती. काय प्रकार आहे ते कळेना आणि जेव्हा कळले तेव्हा जामच वाईट वाटले...झाले होते असे की दिल्लीवरून झेलम (बहुदा तीच असावी ८ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे) सुटते १२.३० वाजता...त्यामुळे जरी तिकीटावर तारीख २२ असली तरी २१ ला रात्रीच ती पकडावी लागते. आणि त्या कुुुटुंबाचा तोच घोळ झाला होता. त्यांची ट्रेन आदले दिवशीच गेली होती आणि आत्ता ते कळल्यावर त्यांच्यावर आभाळ कोसळले होते. त्यांची आर्थिक स्थिती बघता त्यांना हा जोरदारच फटका होता हे ऊघड होते. त्यातून म्हणजे ट्रेन गेलीच होती आणि ही देखील मिळणार नव्हती..

आपल्या ऐवढ्या हवालदील झालेल्या वडीलांना पाहताना त्या पोरांना काय वाटत असेल त्याचा विचार करून अक्षरश जीव कुरतडला...माझ्याकडे तितके पैसेही नव्हते आणि तेवढी संपन्नताही नव्हती त्यांचे तिकीट काढण्याची आणि आजही आपण त्या गरीब कुुटुंबासाठी काही करू शकलो नाही याचे वाईट वाटते.

Pages