फँड्री नावाचा स्क्रू...

Submitted by सई. on 17 February, 2014 - 07:34

आयुष्यात एखादं तरी दाहक वास्तव असतं. प्रत्येकाच्या असेलच असं नाही, पण बहुतेकांच्या असतंच. हर प्रकारानं आणि निकरानं त्याला टाळण्याचा, नाकारण्याचा प्रयत्न करावा आणि कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक तीव्रतेने आयुष्यानं ते वास्तव माणुस गाफील असताना कुणीतरी तोंडावर सणसणून दगड भिरकवावा तसं फेकुन मारावं... काय अवस्था होईल? हेच जर एखाद्या अडनिड्या वयातल्या मुलासोबत घडलं तर? तोही प्रथम भेलकांडून हतबल होईल आणि आवाक्याच्या बाहेर गेल्यावर त्वेषानं चवताळून परिस्थितीवर तुटून पडेल... जमेल त्या मार्गानं!!

पण फँड्री इतकाच नाही... मी माझ्यातला माणुस शोधत जाते, माझ्यातली संवेदनशीलता तपासत जाते, माझ्यामुळे आणि माझ्यापासून सुरू होणा-या समाजाचा एक हिस्सा म्हणुन माझ्या वाट्याला भिरभिरत आलेल्या ह्या दगडाचा मी थिएटरात नेम चुकवला तरी मनावर मात्र तो येऊन आदळतोच! मंजुळेंनी नेमच इतका अचुक धरलाय... तिथे वाल्याच्या बायकोसारखं मी पाप केलं नाही म्हणत बाजूला व्हायला वावच नाही. आजही चहूबाजूंना 'ड्रायव्हर', 'कामवाली बाई' (स्वतः घाण केलेली स्वच्छतागृहं तिच्याकडून साफ करून घेणं वगैरेही आलं त्यात!), 'वॉचमन' अशा प्रकारची असंख्य 'बिरुदं' आणि वर्णभेदही येतात कानांवर.. अर्थात हा फक्त एक दाखला, असे हजारो दाखले. त्यामागे दडलेल्या माणुस नावाच्या प्राण्याचं काय? मी अडवते का कुणाला असं संबोधताना? अशी वागणुक देणा-यांना परावृत्त करते का? म्हणजे काय काय करायला लागेल? मी स्वतः खरंच पूर्णपणे माणुसकीनं वागते का? प्रश्न. अनेक प्रकारचे. नागराज मंजुळे तुम्हाला टोचत रहातात. अनेक प्रसंगांमधून. - हा फॅण्ड्री आहे. पण पुन्हा, एवढाच नाही.

हे सगळं बेमालुमपणे अगदी जाता जाता करत मंजुळे तुमचं मनोरंजनही करतात. त्यांचा चंक्या ज्या सहज आणि लिलया जत्रेच्या जल्लोषात सामील होतो त्याच सहजतेनं. कोणतीच गोष्ट कशाचपासून वेगळी करता येत नाही.

एरवी अडम तडम तडतडबाजा असलेली माझी बहिण चित्रपट पहाताना वरचेवर डोळ्यांना रुमाल लावत होती. म्हणजेच चित्रपट भिडला असं नव्हे, माहिताय. पण नि:शब्द जडत्व घेऊन घरी पोचल्यावर आपोआपच 'माणसानं माणसाशी माणुसकीनं वागणं' यावर माझा आणि तिचा रंगलेला दीर्घ परिसंवाद पार प्रत्येक कुटुंबियाची पाळंमुळं खणत गेला, मागच्या आणि आमच्या पिढीतल्या प्रत्येकाबद्दल ते येणा-या पिढीला काय पोचवायचं इथंपर्यंत. दोघीच्या दोघीच निवांत असताना, वेळेचं बंधन नसताना एरवी स्वतःचीच सालं कशाला काढत बसलो असतो? त्यापेक्षा अनुपस्थित गोतावळ्याबद्दल ही अश्शीच आणि तिचं तस्संच हा मुखवास चघळत बसणं सोप्पं नव्हतं का? वर आणि तो मंजुळेंच्या डोईजड चित्रपटावर रामबाण उताराही तर झाला असता! पण...

उत्खननालाच बसायचं तर अनेक गोष्टी निघतील. पण ते प्रत्येकानं आपापलं करावं. कारण मला जे सापडलं तेच बाकिच्यांना मिळेल असं नाही शिवाय असंही होऊ शकेल की मलाच शंभर गोष्टी मिळाल्या आणि कुणाला एकही नाही... तेव्हा तो शेवटी ज्याचा त्याचाच प्रश्न रहातो.

अलकनंदा दासगुप्तांचं संगीत आणि विक्रम अमलाडींचा कॅमेरा हे दोन महत्वाचे कलाकार आहेत चित्रपटात. शीर्षकापासूनच दोघंही मनाचा ठाव घेतात आणि ती पकड घट्ट घट्ट होत जाते... एकेक फ्रेम बघत रहावी अशी आणि एकेक तुकडा रिवाईंड करुन मुद्दाम ऐकण्यासारखा. किशोर कदम ह्या माणसाला मला एकदा सेटवर जाऊन निरखायचं आहे. ह्या माणसाला स्वतःला तरी कल्पना असेल का स्वतःच्या रेंजची?? स्विच ऑन्/ऑफ नावाची चीज हा करतो तरी कशी? ह्या माणसाबद्दलचं कुतूहल दिवसेंदिवस वाढतंच चाललंय. 'ल्हान हाये अजून', 'शेण घेऊ का?'तली लाचारी, गल्लीच्या वळणावरच्या त्या बेतशीर झोकांड्या, जिवाच्या आकांतानं केलेली शेवटची पळापळ.. सगळं अचंबीत करणारं.
त्याच्यासमोर त्याच ताकदीनं उभी राहिलेली जब्याची आई. यांचं नाव मला माहिती नाही पण भुमिकेचं सोनं म्हणजे काय याचा वस्तुपाठ आहे तिची भुमिका. मग जब्या आणि पि-या. तीन चतुर्थांश सिनेमा होईतोवर तर माझं ध्यान पि-याकडंच. 'आता खाली कसा उतरू'पासून ते ओशाळवाणं होऊन नवी कापडं कशी आहेत विचारणं असो... 'तुझा झगा गं झगा गं ' करत जिवलग दोस्ताला गाण्यात गुंफणारा लोभस पि-या. मी प्रेमात पडले त्याच्या. 'नायकाचे बेस्ट दोस्त' अशी काही कॅटेगरी केली तर सुरज पवारचा पि-या १००% पहिल्या पाचात!

पि-यापाठोपाठ चंक्या. अफलातून. मंजुळेंचा कलंदर चंक्या मोहवून टाकतो. 'तुझा विश्वास आहे ना, मग होईल' भिडलंच. त्याचं आणि जब्याचं नातं केवळ देखणं आहे. जब्या मात्र मला अधूनमधून आवडला आणि मग शेवटचा. त्याचं ते डोळ्यांच्या कोप-यातून शालूला निरखत रहाणं आणि ओघानंच ओठांवर उमटणारं अस्फुट स्मित लाजबाब. संवादफेक मात्र सोमनाथ अवघडेच्या मुळच्या हस-या जिवणीमुळं थोडीशी सदोष झालीये असं मला वाटलं. पण सायकलच्या आणि पेप्सीच्या प्रसंगात शिवाय जत्रेत बत्ती घेतल्यावरचा त्याचा प्रयत्न चांगला होता. राजेश्वरी खरातची शालू निरागस. ती तशीच अपेक्षितही होती. बामणीण चिमणीच्या गोष्टीसाठी ज्योती सुभाष नावाच्या देखण्या म्हातारीचं अनपेक्षित दर्शन सुखद. खरंतर अगदी एकच वाक्य बोलणा-या सुरखीपासून ते 'वढ पाच'ची म्हणणा-या न्हाव्यापर्यंत, जो तो ज्या त्या ठिकाणी एकदम फिट आहे, चपखल.

बाहेर धुमाकुळ घालणा-या आणि मलाही तेवढीच भुरळ घातलेल्या अजयच्या 'प्रितीच्या विंचू'ची अनुपस्थिती भावली. ते कुठेही आलं असतं तरी टेंपोच गेला असता. 'साजूक पोली अन म्हाव-या 'सारखं त्याचंही ठिगळच झालं असतं. त्या मोहाला बळी न पडण्याबद्दल मंजुळेंचं विशेष कौतुक.

मंजुळेंनी डोक्याला खुराक दिलाय, साखरेत घोळवलेल्या कडू गोळीच्या डोससारखा. हा स्क्रू नवं काही आदळेपर्यंत डोकं पोखरत रहाणार. भविष्यातही जेव्हा जेव्हा फॅण्ड्री बघेन तेव्हा तेव्हा तो स्क्रू पुन्हा लोहचुंबकासारखा येऊन मेंदूला चिकटेल आणि आपलं काम करत राहील हेही आत्ताच माहितीये..

पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय.. पहिलाच प्रयत्न (प्रयत्न म्हणायचं का??) इतका खणखणीत... बस्स लगे रहो!! मंजुळेंच्या पुढच्या सगळ्या दमदार वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नागराज मंजुळे आणि सोमनाथ अवघडेचे मनापासून अभिनंदन Happy
योग्य त्या व्यासपीठावरून दखल घेतली जाणं आणि पाठीवर शाबासकी मिळणं यासारखी दुसरी पावती नाही.

संदीप आहेर,

बातमीबद्दल धन्यवाद! Sad ही बातमी आनंददायक खचितच नाही.

नितीनची केवळ संशयावरून हत्या झाली आहे. ती मुलगीच त्याच्या मागे होती. त्याला तिच्यात काहीच रस नव्हता. हे त्यानं आपल्या घरीही सांगितलेलं होतं. घरच्यांनीही त्याला दूर राहा म्हणून बजावलं होतंच. आणि आठच दिवसांत हा प्रकार घडला.

नितीनच्या जागी जर दुसऱ्या जातीचा मुलगा असता तर प्रकरण कदाचित सामोपचाराने मिटलं असतं. हे प्रकरण सरळसरळ जातीय हिंसेचं आहे. संशयावरून निरपराध्याची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे. त्याशिवाय कायद्याचं भय लोकांना वाटणार नाही.

नितीन वाहनदुरुस्तीशाळेत नोकरी करून स्वत:च्या शिक्षणाचा भार स्वत:च उचलत असे. त्यामानाने गुन्हेगार मात्र फुकट खाणारे दिसतात. गुन्हेगारांना भयंकर पण कायदेशीर शिक्षा झालीच पाहिजे. तशी झाली नाही तर समाजात अत्यंत चुकीचा संदेश जाईल. मेहनतीने जगणारे फुकटखाऊंच्या दहशतीखाली बेजार होतील. (खैरलांजी प्रकरणातही हाच युक्तिवाद लागू पडतो.). हे प्रकरण दाबले जाता कामा नये. अगदी गुन्हेगारांनी नितीनच्या मातापित्यांना कितीही पैसे दिले तरीही!

आ.न.,
-गा.पै.

काल फँड्री बघायचा योग आला .. फार सुरेख कलाकृती ..

पिक्चरचं एकूण टेकींग, पर्फॉर्मन्सेस् , बॅकग्राउंड स्कोअर, सिनेमॅटोग्राफी, स्टोरी, स्क्रीनप्ले .. प्रत्येक गोष्ट अगदी अफलातून!

सई सुरेख लिहीलं आहेस .. साजिराचं पोस्टही खूप आवडलं .. सगळी पोस्ट्स वाचली नाहीत .. सावकाशीने वाचून काढेन .. पण एकाच वेळी सुन्न करणारा आणि एक अतिशय सुंदर कलाकृती बघायला मिळाल्याचा आनंद देणारा सिनेमा .. Happy

'वढ पाचची' शोधताना परत ' फँड्री' सापडला.
सई खुप छान लिहिलयसं. सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या , काही प्रतिक्रियांची गंमत वाटली.

धन्यवाद श्री आणि सशल Happy तुमच्यामुळे मीसुद्धा अनेक महिन्यांनी वाचला आज लेख.

सैराटमध्ये मंजुळेंनी जे परफेक्शन आणि जो फोकस ठेवलाय तो फँड्रीतसुद्धा कुठेच हुकलेला नव्हता हे आज पुन्हा लेख वाचताना जाणवलं. स्वतःचा आवाका इतका नेमका माहिती असलेला माणूस अजून तरी प्रत्यक्ष बघण्यात नाही.
सैराट अजून बघायचाय, पण जितकं ऐकलंय आणि माबोवर वाचतेय, त्यावर आधारीत हे विधान आहे.

Pages