फँड्री नावाचा स्क्रू...

Submitted by सई. on 17 February, 2014 - 07:34

आयुष्यात एखादं तरी दाहक वास्तव असतं. प्रत्येकाच्या असेलच असं नाही, पण बहुतेकांच्या असतंच. हर प्रकारानं आणि निकरानं त्याला टाळण्याचा, नाकारण्याचा प्रयत्न करावा आणि कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक तीव्रतेने आयुष्यानं ते वास्तव माणुस गाफील असताना कुणीतरी तोंडावर सणसणून दगड भिरकवावा तसं फेकुन मारावं... काय अवस्था होईल? हेच जर एखाद्या अडनिड्या वयातल्या मुलासोबत घडलं तर? तोही प्रथम भेलकांडून हतबल होईल आणि आवाक्याच्या बाहेर गेल्यावर त्वेषानं चवताळून परिस्थितीवर तुटून पडेल... जमेल त्या मार्गानं!!

पण फँड्री इतकाच नाही... मी माझ्यातला माणुस शोधत जाते, माझ्यातली संवेदनशीलता तपासत जाते, माझ्यामुळे आणि माझ्यापासून सुरू होणा-या समाजाचा एक हिस्सा म्हणुन माझ्या वाट्याला भिरभिरत आलेल्या ह्या दगडाचा मी थिएटरात नेम चुकवला तरी मनावर मात्र तो येऊन आदळतोच! मंजुळेंनी नेमच इतका अचुक धरलाय... तिथे वाल्याच्या बायकोसारखं मी पाप केलं नाही म्हणत बाजूला व्हायला वावच नाही. आजही चहूबाजूंना 'ड्रायव्हर', 'कामवाली बाई' (स्वतः घाण केलेली स्वच्छतागृहं तिच्याकडून साफ करून घेणं वगैरेही आलं त्यात!), 'वॉचमन' अशा प्रकारची असंख्य 'बिरुदं' आणि वर्णभेदही येतात कानांवर.. अर्थात हा फक्त एक दाखला, असे हजारो दाखले. त्यामागे दडलेल्या माणुस नावाच्या प्राण्याचं काय? मी अडवते का कुणाला असं संबोधताना? अशी वागणुक देणा-यांना परावृत्त करते का? म्हणजे काय काय करायला लागेल? मी स्वतः खरंच पूर्णपणे माणुसकीनं वागते का? प्रश्न. अनेक प्रकारचे. नागराज मंजुळे तुम्हाला टोचत रहातात. अनेक प्रसंगांमधून. - हा फॅण्ड्री आहे. पण पुन्हा, एवढाच नाही.

हे सगळं बेमालुमपणे अगदी जाता जाता करत मंजुळे तुमचं मनोरंजनही करतात. त्यांचा चंक्या ज्या सहज आणि लिलया जत्रेच्या जल्लोषात सामील होतो त्याच सहजतेनं. कोणतीच गोष्ट कशाचपासून वेगळी करता येत नाही.

एरवी अडम तडम तडतडबाजा असलेली माझी बहिण चित्रपट पहाताना वरचेवर डोळ्यांना रुमाल लावत होती. म्हणजेच चित्रपट भिडला असं नव्हे, माहिताय. पण नि:शब्द जडत्व घेऊन घरी पोचल्यावर आपोआपच 'माणसानं माणसाशी माणुसकीनं वागणं' यावर माझा आणि तिचा रंगलेला दीर्घ परिसंवाद पार प्रत्येक कुटुंबियाची पाळंमुळं खणत गेला, मागच्या आणि आमच्या पिढीतल्या प्रत्येकाबद्दल ते येणा-या पिढीला काय पोचवायचं इथंपर्यंत. दोघीच्या दोघीच निवांत असताना, वेळेचं बंधन नसताना एरवी स्वतःचीच सालं कशाला काढत बसलो असतो? त्यापेक्षा अनुपस्थित गोतावळ्याबद्दल ही अश्शीच आणि तिचं तस्संच हा मुखवास चघळत बसणं सोप्पं नव्हतं का? वर आणि तो मंजुळेंच्या डोईजड चित्रपटावर रामबाण उताराही तर झाला असता! पण...

उत्खननालाच बसायचं तर अनेक गोष्टी निघतील. पण ते प्रत्येकानं आपापलं करावं. कारण मला जे सापडलं तेच बाकिच्यांना मिळेल असं नाही शिवाय असंही होऊ शकेल की मलाच शंभर गोष्टी मिळाल्या आणि कुणाला एकही नाही... तेव्हा तो शेवटी ज्याचा त्याचाच प्रश्न रहातो.

अलकनंदा दासगुप्तांचं संगीत आणि विक्रम अमलाडींचा कॅमेरा हे दोन महत्वाचे कलाकार आहेत चित्रपटात. शीर्षकापासूनच दोघंही मनाचा ठाव घेतात आणि ती पकड घट्ट घट्ट होत जाते... एकेक फ्रेम बघत रहावी अशी आणि एकेक तुकडा रिवाईंड करुन मुद्दाम ऐकण्यासारखा. किशोर कदम ह्या माणसाला मला एकदा सेटवर जाऊन निरखायचं आहे. ह्या माणसाला स्वतःला तरी कल्पना असेल का स्वतःच्या रेंजची?? स्विच ऑन्/ऑफ नावाची चीज हा करतो तरी कशी? ह्या माणसाबद्दलचं कुतूहल दिवसेंदिवस वाढतंच चाललंय. 'ल्हान हाये अजून', 'शेण घेऊ का?'तली लाचारी, गल्लीच्या वळणावरच्या त्या बेतशीर झोकांड्या, जिवाच्या आकांतानं केलेली शेवटची पळापळ.. सगळं अचंबीत करणारं.
त्याच्यासमोर त्याच ताकदीनं उभी राहिलेली जब्याची आई. यांचं नाव मला माहिती नाही पण भुमिकेचं सोनं म्हणजे काय याचा वस्तुपाठ आहे तिची भुमिका. मग जब्या आणि पि-या. तीन चतुर्थांश सिनेमा होईतोवर तर माझं ध्यान पि-याकडंच. 'आता खाली कसा उतरू'पासून ते ओशाळवाणं होऊन नवी कापडं कशी आहेत विचारणं असो... 'तुझा झगा गं झगा गं ' करत जिवलग दोस्ताला गाण्यात गुंफणारा लोभस पि-या. मी प्रेमात पडले त्याच्या. 'नायकाचे बेस्ट दोस्त' अशी काही कॅटेगरी केली तर सुरज पवारचा पि-या १००% पहिल्या पाचात!

पि-यापाठोपाठ चंक्या. अफलातून. मंजुळेंचा कलंदर चंक्या मोहवून टाकतो. 'तुझा विश्वास आहे ना, मग होईल' भिडलंच. त्याचं आणि जब्याचं नातं केवळ देखणं आहे. जब्या मात्र मला अधूनमधून आवडला आणि मग शेवटचा. त्याचं ते डोळ्यांच्या कोप-यातून शालूला निरखत रहाणं आणि ओघानंच ओठांवर उमटणारं अस्फुट स्मित लाजबाब. संवादफेक मात्र सोमनाथ अवघडेच्या मुळच्या हस-या जिवणीमुळं थोडीशी सदोष झालीये असं मला वाटलं. पण सायकलच्या आणि पेप्सीच्या प्रसंगात शिवाय जत्रेत बत्ती घेतल्यावरचा त्याचा प्रयत्न चांगला होता. राजेश्वरी खरातची शालू निरागस. ती तशीच अपेक्षितही होती. बामणीण चिमणीच्या गोष्टीसाठी ज्योती सुभाष नावाच्या देखण्या म्हातारीचं अनपेक्षित दर्शन सुखद. खरंतर अगदी एकच वाक्य बोलणा-या सुरखीपासून ते 'वढ पाच'ची म्हणणा-या न्हाव्यापर्यंत, जो तो ज्या त्या ठिकाणी एकदम फिट आहे, चपखल.

बाहेर धुमाकुळ घालणा-या आणि मलाही तेवढीच भुरळ घातलेल्या अजयच्या 'प्रितीच्या विंचू'ची अनुपस्थिती भावली. ते कुठेही आलं असतं तरी टेंपोच गेला असता. 'साजूक पोली अन म्हाव-या 'सारखं त्याचंही ठिगळच झालं असतं. त्या मोहाला बळी न पडण्याबद्दल मंजुळेंचं विशेष कौतुक.

मंजुळेंनी डोक्याला खुराक दिलाय, साखरेत घोळवलेल्या कडू गोळीच्या डोससारखा. हा स्क्रू नवं काही आदळेपर्यंत डोकं पोखरत रहाणार. भविष्यातही जेव्हा जेव्हा फॅण्ड्री बघेन तेव्हा तेव्हा तो स्क्रू पुन्हा लोहचुंबकासारखा येऊन मेंदूला चिकटेल आणि आपलं काम करत राहील हेही आत्ताच माहितीये..

पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय.. पहिलाच प्रयत्न (प्रयत्न म्हणायचं का??) इतका खणखणीत... बस्स लगे रहो!! मंजुळेंच्या पुढच्या सगळ्या दमदार वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ fakir....

"...कसाही असला तरी 'बाप' आहे तो....." : फार प्रभावी आणि अनुकरणीय असे कबुली वाक्य आहे....एका झटक्यात कुटुंबातील बापाचे स्थान ढळढळीत करणारे.

"...चित्रपटाचा शेवट पोचला पण पटला नाही!..." : याबद्दल आग्रही असणे बरोबर नाही, पण एकदोन वेळी फॅन्ड्री पाहिल्यास इच्छित शेवट मनी पोचण्यास निश्चित्तच मदत होईल. जब्याचा उद्रेक मंजुळेनी चित्रबद्ध केलाय ती त्यांची स्वतःची मतप्रणाली असू शकते. प्रत्यक्ष व्यवहारातील गावकीत असा मुलगा (एकट्याने) दगड हाती घेऊन कोणती क्रांती करू शकेल का ? हे प्रश्नचिन्ह आजही धगधगीत आहे....त्याचे उत्तर नकारार्थीच येईल.

काल Indian film festival Los Angeles ला फँड्री पाहिला .
नो ऑफेन्स पण अजिबातच नाही आवडला .. अत्यंत स्लो , बराच वेळ काहीच नाही घडत , काही कथानक हलतच नाही !
गावातली अस्वछता वगैरे दाखवणे कथेथी डिमांड आहे हे अगदी मान्य पण ते किती वेळ ?
बर ते दाखवताना किमान कथा पुढे सरकायला हवी कि नको ?
नुसतीच अस्वछता पाहून मळ्मळायला लागतं , घडत काहीच नाही ..
नुसती त्या गावाची लाइअफस्टाइल, लोकं चुळा भरताना , प्रतार्विधीला जाताना , , गायी म्हशी डुकरं , पक्षी हेच दिसतं आणि पोरगं गावात भटकताना दिसतं निम्म्याहून अधिक वेळ .. जे घडतं ते अगदी शेवटची २० मिनिटं !
स्लमडॉग मिलिओनर सारखा सिनेमाही अस्वच्छता , घाण , लहान मुलांच्या आयुष्यातली काळी सत्त्यं दाखवतो पण कुठेही रटाळ होत नाही , तिथे प्रत्येक प्रसंग कथा पुढे नेतो .. इथे मात्रं बराच वेळ कथा वगैरे काहीच नाही !

बाकी कलाकारांची कामं , सिनेमॅटोग्राफी , पात्श्वसंगीत उत्कृष्ट पण इतकं ऐकलं होतं सिनेमा बद्दल त्यामानाने अगदीच कंटाळवाणा !

एखादा पाठ्यपुस्तकातला धडा किंवा १५ -२० मिनिटाची शॉर्ट फिल्म असती तर कदाचित आवडल असतं , पण ऑलमोस्ट २ तास फार रटाळ वाटले .
असो, बाकी अमेरिकन क्राउड ने खूप आवडीने पाहिला आणि अफ्रिकन अमेरिकन लोकांनी विशेष अ‍ॅप्रिशिएट केला.
डिरेक्टर नागराज यांच्या बरोबर सिनेमा नंतर ऑडियन्स बरोबर प्र्श्नोत्तरांचा कार्यक्रम होता , अमेरिकन लोक फारच प्रभावित होउन , बारकईने सिनेमा पाहून विचारत होते प्रश्नं .

दीपांजली मी पण हेच म्हटलं आहे .अशा प्रकारचा आपण सिनेमा बघायला जातो तेव्हा हे माहित होत कि आपण काहीतरी श्रीमंती/झकपक बघायला जात नाही आहोत. काहीतरी कथानकाच्या स्वरुपात( कथानक मस्ट ) त्या समाजाचे प्रोब्लेम्स /जगण बघायला जात आहोत पण तरी सुद्धा त्यांचा जगण म्हणजे नायकाचा दिनक्रम नाही ना ? सकाळ झाली भैरू उठला /आन्हिक उरकली/शाळेत गेला/जाताजाता आईने सांगितल बापाला मदत करायला जा.हा नाही म्हणाला . शाळा संपल्यावर मित्राबरोबर माळावर काळी चिमणी पकडायला गेला . आईस्क्रीम विकायला गेला आणखीन दिवसभर तो काय काय करत होता ते सगळ बघितलं .पण कथानक आहे कुठे ? त्याचा दिनक्रम बघायला आलो का पैसे खर्च करून ? शेवटच्या अर्ध्या तासात जे काही घडतय ते तर सगळ्या जातीत घडत १४ /१५ वर्षाची मुल प्रेमात पडतात. जातीबाहेर प्रेमात पडतात मग पालक फटकारतात /मारतात. कोणी म्हणत आपल काम कर/कोणी म्हणत आधी शिक्षण पूर्ण कर.

त्याला त्याच्या जातीत जन्माला आला म्हणून डुकर पकडायला आवडत नाही आणि तशा अवस्थेत त्याची प्रेयसी बघते म्हणून त्याचा राग येतो . बापाचा राग येतो .त्याची टर उडवतात . आणि मग तो दगड मारतो .हा भेदक पणा ? एक तर आज काल उच्च /नीच जात असा भेदभाव कोणीच पाळत नाहीये. अशा परिस्थितीत तुम्ही पाठच्या सगळ्या विसरलेल्या गोष्टी मुद्दाम का उकरून काढता.? आणि तस बघायला गेल प्रत्येक जातीला काही ना काही कारणाने शिव्या तरी घातल्या जातात नाही तर हिणवल जात . वरण भात खाणारे लोक तुम्ही . तुम्ही कसले फुसके. काडीचा अंगात दम नाही तुमच्या. अस माझ्या जातीला हिणवल जात म्हणून मी दगड मारून लोकांची तोंड बंद करू शकते का ?. Happy

लोकहो,

बहुचर्चित फँड्री चित्रपट बघितला. हल्ली कोणी इतका भेदभाव पाळत नाही असं म्हणतात. ते खरं धरल्यास हा चित्रपट प्रतीकात्मक दृष्टीने पाहावा लागेल.

साजिरा यांनी लिहिल्याप्रमाणे ही स्वत:च्या न्यूनगंडाविरुद्धची लढाई आहे. आज हा न्यूनगंड पद्धतशीरपाने जोपासला गेलाय. उपेक्षितांमधले काही ठराविक लोक सगळ्या सोयीसुविधा उपभोगून गलेलठ्ठ झालेत. चित्रपटातले पाटीलबुवा आहेत तसेच. जब्या हा उपेक्षितांमधला सर्वसामान्य माणूस आहे. तर शालू कुणास म्हणावे? इथे शालूचे आरक्षणासंबंधी मुक्ताफळ पाहायला मिळेल!

एरव्ही शालूला जब्या आवडतो. कारण तो धीट आहे. पण जब्यावर मानहानीकारक प्रसंग आला की तिची कलटी ठरलेली! एकंदरीत जब्याला सदैव (आरक्षणाच्या) साखळीत जखडून ठेवायला शालूला आवडतं. Sad

जब्याच्या धीटपणाला सर्वजण टरकून आहेत. सरकार सामान्य जनतेला कसं घाबरतं याची जंतरमंतरवर प्रचीती आलेलीच होती. म्हणून म्हणावंसं वाटतं की खरा चित्रपट शेवटच्या दृश्यानंतर (फ्रेम) सुरू होतो. Happy

आ.न.,
-गा.पै.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट
प्रतीकात्मक वगैरे मला माहित नाही , प्रतीकात्मक म्हंटलं तर काढु तसा शेवटच्या दृश्यातून काढता येइल !
मला लागलेला साधा सरळ अर्थ असा;
डुक्कर पकडण्याच्या झटापटीत पोराला स्वतःमधे कॉन्फिडन्स येतो , एक बेफाम जनावर जर काबुत आणु शकतो तर त्याला हिणवणार्या नुसतच चकाट्या पिटत त्याला हसणार्या माणसांनाही काबुत करायची हिंमत करणे त्याला मग अवघ्ड जात नाही , म्हणून तो दगड मारायचा सीन आणि स्क्रीन वर अंधार !
थोडक्यात जंब्या २ डुकरांची शिकार करतो !
प्रतीकात्मक दृष्टिने सांगायचं तर काळं डुक्कर हे त्या अकोळनेर खेड्यातल्या अस्पृश्य लोकांचं नाही तर स्वतःमधे हिंमत नसताना माज करणार्या , दुसर्याला हिणवणार्या बघ्यांचं प्रतीक .. समाजात खरा nuisance अशा लोकांचाच आहे ज्यांच्या माजाची जंब्या दगडाने शिकार करतो !

बाकी ती क्वचित दिसणारी आणि कधीही न पकडता येणारी काळी चिमणी आणि जंब्याचं त्या शालुला प्रेमात पाडायचे प्रयत्नं हे जुन्या लोककथे सारखी वाटलं , " ज्या घरात आजवर एकही मृत्यु झाला नाही तिथलं मूठभर धान्य घेउन ये, म्हणजे तुझ्या घरताली मृत व्यक्ती जिवंत होईल " , थोडक्यात जे कधीही शक्य नाही त्याच्या मागे धाऊ नकोस !

डुक्कर पकडण्याच्या झटापटीत पोराला स्वतःमधे कॉन्फिडन्स येतो , एक बेफाम जनावर जर काबुत आणु शकतो तर त्याला हिणवणार्या नुसतच चकाट्या पिटत त्याला हसणार्या माणसांनाही काबुत करायची हिंमत करणे त्याला मग अवघ्ड जात नाही , म्हणून तो दगड मारायचा सीन आणि स्क्रीन वर अंधार !
थोडक्यात जंब्या २ डुकरांची शिकार करतो !
प्रतीकात्मक दृष्टिने सांगायचं तर काळं डुक्कर हे त्या अकोळनेर खेड्यातल्या अस्पृश्य लोकांचं नाही तर स्वतःमधे हिंमत नसताना माज करणार्या , दुसर्याला हिणवणार्या बघ्यांचं प्रतीक .. समाजात खरा nuisance अशा लोकांचाच आहे ज्यांच्या माजाची जंब्या दगडाने शिकार करतो !>>>

इथंपर्यंतचा प्रवास म्हणजे चित्रपट... तो प्रवास कुणाला कंटाळवाणा, कुणाला नॉनहॅपनिंग, कुणाला इंटरेस्टिंग वाटेल.. ज्याच्या त्याच्या दृष्टिकोणाप्रमाणे. दीपांजली, तू मांडताना व्यवस्थित मांडलंयस. सुजा तूही नेटाने तुझं मत लिहिते आहेस. केवळ चित्रपट आवडणे, न आवडणे हे वर्गीकरण महत्वाचे नाही.

गामापै, तुम्ही दिलेल्या लिंकचा संदर्भ मात्र डोक्यावरून गेला. इथे तो कसा लागू पडतो ते अजिबातच समजलं नाही. असो.

Saee,

आरक्षण हे उपेक्षितांना दाखवायचं गाजर आहे. शालूच्या प्रेमासारखं! आरक्षणाचे फायदे एक विशिष्ट वर्गच उपटतो. वेळ येताच खऱ्या वंचितांच्या तोंडाला पाने पुसली जातात!

आ.न.,
-गा.पै.

दीपांजली,

तुमचं अर्थवहन (इंटरप्रीटेशन) आवडलं.ते डुक्कर जब्याने एकट्याने पकडलेलं नसलं तरीही! Happy जब्याचा बाप एक पकडतोय, तर जब्या दुसरं पकडू लागलाय. मस्त कल्पना! Happy

आ.न.,
-गा.पै.

गावातली अस्वछता वगैरे दाखवणे कथेथी डिमांड आहे हे अगदी मान्य पण ते किती वेळ ?
बर ते दाखवताना किमान कथा पुढे सरकायला हवी कि नको ?
नुसतीच अस्वछता पाहून मळ्मळायला लागतं , घडत काहीच नाही ..>>>>

मुख्य म्हणजे घाणेरडे रहा असे काही सो कॉल्ड जातीयवाद सांगत नाही. अश्या गोष्टींवर काहीच comment करत नाही हा सिनेमा.

नुसतीच अस्वछता पाहून मळ्मळायला लागतं , घडत काहीच नाही .<<
मळमळायला लागतं आणि तरीही घडत काही नाही असं कसं गं?
ते सगळं वास्तव अंगावर येणं किंबहुना त्यामुळे डचमळायला लागणं असंच अपेक्षित आहे. असं मला वाटलं.
ते जरासंही स्वच्छ वा चकचकीत केलं असतं सिनेमासाठी म्हणून तर सिनेमा खोटा 'दिसला' असता.

मला चित्रपट बनवण्याच्या ट्रीटमेंटमधला प्रामाणिकपणा खूप आवडला. त्यात कुठलाही आव नव्हता. हल्लीच्या सामाजिक आशयघन वगैरे म्हणल्या गेलेल्या बहुतांशी मराठी चित्रपटात हा प्रामाणिकपणा मला सापडला नव्हता.
कथा म्हणली तर आहे आणि म्हणली तर नाही. खूप सारा ठळक असा घटनाप्रवाह नाही इथे. जो बहुतेक हिंदी व मराठी सिनेमांचा आत्मा आहे. किंवा आपल्याला ओळखीच्या असलेल्या सिनेमांची तीच पठडी आहे असं म्हणायला हरकत नाही.

बाकी आजकाल एवढे जातीपातीचे नसते अशी विधाने वाचली वरती. तर माफ करा पण शहरात ठराविक पॉकेटसमधे नसते इतपतच सत्यता आहे त्या विधानामधे. अन्यथा खैरलांजी आणि तत्सम अनेक घटना घडल्या नसत्या.

एक नक्की आपल्याला इंटरेस्टिंग किंवा बघावासा वाटलेला सिनेमा गाजायला लागला तरी तो बघून होईपर्यंत एकही रिव्ह्यू वाचायचा नाही ही खुणगाठ मी बांधलेली आहे.

सिनेमा बघितलेला नाही, त्यामुळे सिनेमावर कमेन्ट करत नाही. पण मी या प्रतिसादांमधे आधीही 'सध्या जातपात फारसं काही नसतं' असं वाचलं. तेव्हाही खटकलं होतं. आत्ता परत खटकलं.
फारतरफार मध्यमवर्गीय जीवनाच्या काही पॉकेट्समधे, पुण्यामुंबईसारख्या शहरात, हे भेदाभेद वागणुकीत प्रकट होत नाहीत. पण बहुतांश पब्लिकच्या डोक्यात असतातच.

त्याच्या पल्याडही खूप मोठा महाराष्ट्र आहे, आणि जातकारण हे तिथलं अगदी रोजचं जळजळीत वास्तव आहे. खेडोपाडीच नव्हे तर तालुक्याच्या गावांत, जिल्ह्याच्या शहरांमधेही. अगदी आपल्याला शरम वाटेल अशा पद्धतीने वंचित गटाच्या लोकांना वागवलं जातं. तेव्हा कृपया आपल्या अनुभवविश्व, संवेदनशीलतेच्या पलिकडे जगात अनेक कटू वास्तवता - आपल्याला अपरिचित असतील तरी - असू शकतील याचं भान ठेवा फक्त इथे अशी असंवेदनशील, संकुचित वाक्ये लिहिण्याआधी. प्लीजच.

<<अगदी आपल्याला शरम वाटेल अशा पद्धतीने वंचित गटाच्या लोकांना वागवलं जातं. >> तसच ते अवंचित लोकांना ही वागवल जात याचीही जाणीव असू दे अगदी शरम वाटेल अशा पद्धतीने.

<<तेव्हा कृपया आपल्या अनुभवविश्व, संवेदनशीलतेच्या पलिकडे जगात अनेक कटू वास्तवता - आपल्याला अपरिचित असतील तरी - असू शकतील याचं भान ठेवा फक्त इथे अशी असंवेदनशील, संकुचित वाक्ये लिहिण्याआधी. प्लीजच.>>
म्हणजे अवंचित लोकांकडे संवेदना नसतात अस आपल्याला म्हणायचं आहे का ?
वंचित काय आणि अवंचित काय संवेदनशील मन हे प्रत्येकाकडेच असत. संवेदना हेच जिवंत माणसाच लक्षण समजल जात.( हे आधीच्या प्रतिसादामध्ये मी लिहिलेलच आहे ) जगात बरीच कटू वास्तवता असते आणि याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे .का अवंचित लोकांना याची कसलीच जाणीव नसते असा रोख आहे का ?
अवंचित लोक असंवेदनशील, संकुचित? वंचित लोकांच काय ? ती नसतात का असंवेदनशील, संकुचित?

आत्ता मी एक चित्रपट काढीन त्यात माझ्या जातीतला १३-१४ वर्षाचा मुलगा नायक असेल . तो पण गावात राहणारा आणि अत्यंत गरीब असेल . तो दिवसभर काय काय करतो त्याचा दिनक्रम दाखवीन आणि तो आमच्या जातीबाहेरच्या मुलीच्या प्रेमात पडेल .तिच्यावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस तो धीर एकवटेल आणि मी आज तिला सांगणारच अस ठरवेल पण त्याचे मित्र त्याची चेष्ठा करतील. तू कसला रे दुसर्या जातीत प्रेम करणार ? तुझ्या अंगात काही धमक आहे का ? मिळमिळीत भेंडी नुसता?. त्याचे सगळे मित्र त्याला " भेंडी " भेंडी " " मिळमिळीत भेंडी "म्हणून चिडवतील . मग त्त्याला प्रचंड राग येईल . मी मिळमिळीत भेंडी काय? माझ्या अंगात धमक नाही काय ? दाखवतोच आता माझ्या अंगातली धमक .तो तेरा -चौदा वर्षाचा असल्याने त्याला मित्रांनी आपल्याला "भेंडी" म्हणण ही असह्य शिवी वाटेल आणि तो त्वेषाने त्याला चिडवणार्या मित्रांवर दगड भिरकावेल. चित्रपटच नाव असेल "भेंडी" . ( माझ्या जाती बांधवांची क्षमा मागून )

मी खेडोपाड्यांमधे ब्राह्मणांची काय अवस्था आहे हे निदान महाराष्ट्राच्या एका कोपर्‍यात का होईना अगदी स्वच्छ पाहिलेलं आहे. मी स्वतः ब्राह्मण आहे, त्यामुळे कधीकधी हा 'उलटा/रिअ‍ॅक्शनरी' जातद्वेष, कमेन्ट्स माझ्याही वाट्याला आल्या आहेत. येतात. मी अशा व्यवसायात आहे की जिथे आरक्षणामुळे असलेल्या नोकरीच्या संधी आणखी कमी होतात. त्याने माझ्या सामाजिक आयडेन्टिटीवर काही फरक पडला आहे, अपमान झाला आहे असं कधीच वाटलेलं नाही

तरीही, मला, माझ्या जातीतल्या कुणालाही कधीही सामाजिक अस्पृश्यता, पाणवठ्याचे भेदाभेद, देवळात प्रवेशबंदी, शिक्षणाला अडथळे असं काहीही सामाजिक दृष्टीकोनामुळे सहन करावं लागलेलं नाही. गरीब, वंचित असे गट सगळ्याच जातीत असतात. पण तथाकथित 'वरच्या' जातींना शिक्षणाच्या, सुधारकी मनोवृत्तीच्या मानसिकतेची बर्‍यापैकी पार्श्वभूमी असते. त्यामुळे त्यांना प्रगती करणे थोडे सोपे जाते. सध्या गावोगावचे बहुतेक ब्राह्मण हे शहरांमधे स्थलांतरित झालेत (१९४८ नंतर या प्रक्रियेला वेग आला). जे तिथे आहेत तेही कसंही करून गावकारणात बर्‍यापैकी तग धरून आहेत.

पण तथाकथित 'खालच्या/अस्पृश्य' जातींची या वंचितांशी तुलना करणं असमान आहे असं वाटतं. ते ज्या सामाजिक आर्थिक परिस्थितीतून आणि मानसिकतेमधून येतात ती भेदून वरती येणं हेच खूप अवघड असतं. उठता बसता जातीवाचक शिव्या, अपमानास्पद वागणूक - अगदी शिक्षित दलित असला तरीही त्याच्याशी असे वागणारे खूप लोक बघितले आहेत. यातलं एक लक्षांश सुद्धा ब्राह्मणवर्गाच्या वाट्याला आलेलं नाहीये कधी. दलितांमधला अगदी एक छोटा हिस्सा आता क्रीमी लेयर मधे मोडतो. त्यांची, त्यांच्या राजकीय पक्षांची इतर शहरी गटांशी असलेली बरेच वेळा मग्रुरीची वाटणारी वागणूक म्हणजे त्या पूर्ण समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही.

वंचितांमधे संकुचितपणा नसतो वगैरे असं मी कुठे लिहिलेच नाहीये. पण मला 'सध्या जातपात वगैरे फारसं काही नसतं' हे विधान अजिबातच मान्य नाही आणि ते खूप असंवेदनशील वाटतं म्हणून लिहिलं.

ब्राह्मण/उच्चवर्गीय मुलाला मिळमिळीत भेंडी म्हणलं तर आतपर्यंत खुपतं. मग ज्या समाजाला पिढ्यानुपिढ्या शाब्दिक, मानसिक आणि शारिरिक हिंसा/दमन असंच अनुभवायला मिळालं तर त्यांच्या भावना दुखावत नसतील? त्यांना तो सामाजिक भेद जाणवत नसेल? त्यांना आपण आपल्या चष्म्यातून का जोखायचं? दिग्दर्शक स्वतः अशा एका सामाजिकतेचा प्रतिनिधी आहे आणि त्याला जे जाणवलं आहे, म्हणायचं आहे ते त्याने म्हणले आहे

खैरलांजीसारखं प्रकरण कुठल्या ब्राह्मण किंवा उच्चवर्गीय जातीतल्या कुटुम्बांविरुद्ध झालं नाही यातच मला वाटतं सगळं आलं. इतकी जर जातपात अशीच हळूहळू गेली असती तर कशाला आंबेडकरांची गरज होती?
असो.

मी सिनेमा बरावाईट काहीच म्हणत नाहीये कारण अजून बघितलेला नाही. पण तो मला आवडला नाही तरी माझी ही भूमिका ठाम अशीच आहे आणि राहील.

वरदा तू करत असलेया कामाबद्दल मला आदरच आहे त्याच्या बद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये पण आपण हे चित्रपटाच्या धाग्यावर चित्रपटाबद्दल बोलत आहोत.

चित्रपटामध्ये तेरा -चौदा वर्षाच्या मुलाला " फँड्री" "फँड्री" म्हणून चिडवलं जात तेव्हा त्याला ते कस शिविसमान वाटत आणि तो चवताळून दगड मारतो. एवढीच चित्रपटाची कथा आहे, त्यातून दिग्दर्शकाला काय सांगायचं आहे ? काय सुचवायचं आहे ? ते कळतंय का?उद्या माझ्या जातीतल्या मुलाला पण " भेंडी" "भेंडी "मिळमिळीत भेंडी" अस चिडवल गेल आणि त्याने चवताळून दगड मारला तर त्याला काय म्हणायचं आहे हे समजेल का ? एवढंच समजेल कि माझ्या जातीतल्या मुलाला भेंडी हि असह्य शिवी वाटली /वाटते. तसच त्या जातीतल्या मुलाला फँड्री हि शिवी वाटली. ठीक आहे. पण पुढे काय ? नक्की काय सांगायचं आहे दिग्दर्शकाला ? हा प्रश्न उरतोच .

रिया माझ्या मते हा चित्रपटाचा धागा आहे. त्यामुळे " अजूनही जात पात पाळली जाते का नाही ? " या विषयावर वेगळा धागा काढला गेल्यास त्यावर बोला ना प्लीज Happy

नुसतीच अस्वछता पाहून मळ्मळायला लागतं , घडत काहीच नाही .<<
मळमळायला लागतं आणि तरीही घडत काही नाही असं कसं गं?
ते सगळं वास्तव अंगावर येणं किंबहुना त्यामुळे डचमळायला लागणं असंच अपेक्षित आहे. असं मला वाटलं.
ते जरासंही स्वच्छ वा चकचकीत केलं असतं सिनेमासाठी म्हणून तर सिनेमा खोटा 'दिसला' असता.

<<<
वास्तव अंगावर येणे फिलिंग मला स्लमडॉग बघताना आलं होतं , इथे मात्रं समहाउ फिल्म्स डिविजन कि भेट बघतेय असं फिलिंग येत होतं !
बाकी सिनेमा चकाचक दिसायला हवा असं नवह्तं म्हणायचं पण आहे त्याच्या निम्म्या लेंथ चा हवा होता सिएन्मा असं मात्रं वाटलं बराच वेळ काही घडत नाही हे पाहून .
ती गावाची लाइफस्टाइल , पोराचं भटकणं आणि त्या बरोबर दिसणरे उकिरडे हे विदाउट एनी स्टोरी टेलिंग जरा जास्तच लांबलचक वाटलं मला.
असो, अर्थात हे माझं मत , ऑडीयन्स मधल्या प्रत्येकाचं वेगळं मत असु शकतं .

मी पूर्ण चित्रपट पाहिला नाही कारण पाहण्याआधीच मी बरेच सारे चांगले रिव्हु वाचले होते त्यामुळे त्यात काय घडणार याचा अंदाज होता. आणि सुजा म्हणते तसा तो थोडा संथ वाटला. पण म्हणून मला चित्रपट का बनवला किंवा काय सांगू पाहतोय असा प्रश्न पडला नाही!
सुजा, हा प्रश्न का पडावा? म्हणजे एखादया जपानी व्यक्तीने जिला भारतातील जाती व्यवस्थेचं काहीही ज्ञान नाही असं म्हणणं ठीक आहे की ही एका टीनेज मुलाची प्रेमाची/क्रशची गोष्ट आहे. ती व्यक्ती कदाचित फक्त तेवढंच रिलेट करू शकेल स्वतःला पण एक भारतीय म्हणून आपल्याला जातीव्यवस्थेचा इतिहास माहिती असताना आपण चित्रपटाचा उद्देश समजू शकत नाही? म्हणजे भेंडी म्हणून चिडवलं जाणं आणि फॅन्ड्री म्हणून चिडवलं जाणं ह्यातली सहवेदना आपण अनुभवू शकत नाही का? (अर्थात केवळ चिडवण्यापलीकडे अत्यंत माणुसकीहीन वागणूक ही फॅन्ड्री गटाला शतकानुशतकं मिळत होती आणि त्याचा विचार करताना आजही मला स्वतःला खूप शरम वाटते!)

काय सांगू पाहतोय हा चित्रपट? काय सांगण्याचा उद्देश आहे चित्रपटाचा ? चित्रपटाची जशी मांडणी आहे त्यातून तर काहीच समजत नाहीये. जास्त पद्धतीने उलगडवून दाखवलं असत तर समजल असत कदाचित. दिग्दर्शकाला काही तरी सांगायचं आहे पण काय? कथानकातून (कथानक आहे का चित्रपटाला? ) तर काहीच समजत नाहीये.

सर्व सामान्य प्रेक्षकांची हीच प्रतिक्रिया होती थियेटर बाहेर पडताना. सर्व सामान्य प्रेक्षकांकरता तुम्ही चित्रपट बनवता ना ? मग त्यांना काही तरी बोध होईल अशा कथानकात बसवा ना. आम्ही सर्वसामान्य प्रेक्षक आहोत बुवा. जे काय सांगायचं आहे ते सरळ सरळ सांगा ना . दिग्दर्शकाला काय सांगायचं आहे ते शोधायला नका लाउ. आणि सादरीकरण पण इंटरेसटींग पद्धतीने करा ना . प्रेक्षकांना अर्ध्यातून उठून जावस वाटेल अस का बर सादरीकरण असाव ? Happy

मी हा सिनेमा अजून पाहिला नाही. वर दिनेश जसे म्हणालेत तसे परदेशात राहणार्‍या मराठी लोकांपर्यंत मराठी सिनेमे हिट झाले तर तरच पोचतात. तेही उशिरा.

दीपांजली, यू लकी!!! तुला इथे हा सिनेमा पाहायला मिळाला. माझ्यामते अमेरिकन किंवा कुठल्याही परदेशीय नजरेतून हा सिनेमा बघायला छानच वाटेल. वर अज्जुकाचे मत पटले! आपल्यासाठी सिनेमा म्हणजे एक सुरुवात आणि शेवट असलेली कथा.

खूप लहानपणी मी अकोल्याला दुरदर्शन वर खंडर आणि पार असे दोन सिनेमे पाहिले होते. त्या इतकुशा वयात ते दोन्ही सिनेमे हिवाळ्यात अंग गोळा करुन .. नुसती टीव्ही नवीन आवडायला लागली होती म्हणून पाहिले होते. पण ह्या दोन सिनेमांनी माझ्यावर इतका घट्ट ठसा उमटावला होता की नवीन आलेले ताथय्या ताथय्या हो.. असे सिनेमे मला टुकार वाटायचे.

सई, अभिनंदन!!! तुझे हे पान भरभरुन वाहते आहे. मला अथपासून आत्तापर्यंत सर्वांच्या प्रतिक्रिया आवडल्यात. मी हा सिनेमा कधी पाहीन माहिती नाही पण काही सिनेमे अभ्यास करुन पहायला जावे असे मला वाटते. हा सिनेमा अगदी आधी थोडा अभ्यास करुन मग पहावा असे मला वाटते आहे. त्यामुळे वरील डिसक्लेमर नको वाटले.

चित्रपट पाहण्यापूर्वी अभ्यास वगैरेची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही बी, पण एक नक्की सांगेन की जरी माझं चित्रपटावरचं म्हणणं आणि इथले सगळे प्रतिसाद वाचले असलेस तरी चित्रपट पाहशील तेव्हा स्वच्छ नजरेने पहा. कोणतेच पुर्वग्रह मनात ठेवून नको. तो आवडो, नावडो, जे काही मत असेल ते तुझं स्वतःचं असू दे इतकंच.

मला इथे व्यक्त होणारी मतं त्यासाठीच महत्त्वाची वाटतायत की ती प्रत्येकाची वैयक्तिक आहेत.

हा प्रश्न का पडावा? म्हणजे एखादया जपानी व्यक्तीने जिला भारतातील जाती व्यवस्थेचं काहीही ज्ञान नाही असं म्हणणं ठीक आहे की ही एका टीनेज मुलाची प्रेमाची/क्रशची गोष्ट आहे. ती व्यक्ती कदाचित फक्त तेवढंच रिलेट करू शकेल स्वतःला पण एक भारतीय म्हणून आपल्याला जातीव्यवस्थेचा इतिहास माहिती असताना आपण चित्रपटाचा उद्देश समजू शकत नाही? म्हणजे भेंडी म्हणून चिडवलं जाणं आणि फॅन्ड्री म्हणून चिडवलं जाणं ह्यातली सहवेदना आपण अनुभवू शकत नाही का? (अर्थात केवळ चिडवण्यापलीकडे अत्यंत माणुसकीहीन वागणूक ही फॅन्ड्री गटाला शतकानुशतकं मिळत होती आणि त्याचा विचार करताना आजही मला स्वतःला खूप शरम वाटते!) >> जिज्ञास + १११ प्रतिसाद पटला. चित्रपटात तेव्हढंच दाखवायचं होतं, तेच दाखवलंय आणि ते पोचलंयही.

नीरजा, वरदा आणि जिज्ञासा चे प्रतिसाद पटले.
सई चित्रपट पाहीला नाही... पण भविष्यात बघायला मिळाला तर तुझ्या या धाग्यामुळे नक्कीच बघेन...

अवांतर : आजकाल जातपात मानली जात नाही >> किती फसवं वाक्य आहे हे!!!
तरीही ओबीसी, बीसी गटातील मुला/मुलींना फक्त खालच्या जातीचा आहे तो/ती असं ऐकवून लग्नासाठी नाही म्हटलं जातं... (अवांतरासाठी माफ करा पण लोकांचे कित्ती गैरसमज असतात म्हणून राहावलं नाही.)
एखाद्या व्यक्तीला त्याच्यातील गुणांची, व्यक्तीमत्वाची, शिक्षणाची, कर्तृत्वाची, स्वभावाची दखल घेण्यासाठी स्वत्वाची लढाई लढायला लागावी सतत??? ते ही फक्त कोणत्या विशिष्ट जातीत जन्म घेतला म्हणून??

सोमनाथ आणि नागराजचे अभिनंदन.

सोमनाथ अजिबात तयार नव्हता काम करायला, मंजुळे त्याच्या खूप महिने पाठीमागे लागले आणि शेवटी तो तयार झाला.

ड्रेमे , मी असचं लिहिलं होतं Happy
फक्त तू सो कॉल्ड निच्च जातीला मिळणार्‍या अनुभवाबद्दल लिहिलस आणि मी 'उच्च' जातीला मिलणार्‍या 'अपमानास्पद' वागणुकीबद्दल लिहिलं होतं Happy

आजकाल जातपात मानली जात नाही >> किती फसवं वाक्य आहे हे.मुंबई सारख्या ठिकाणी किव्वा मोठ्या शहरात हे काही नसत .कोणी सांगितलं .? तुम्हाला अनुभव आला नसेल म्हणजे अस नाहीच आहे अस कोणी म्हणू नये

सोमनाथ आणि नागनाथ यांचे अभिनंदन Happy

Pages