फँड्री नावाचा स्क्रू...

Submitted by सई. on 17 February, 2014 - 07:34

आयुष्यात एखादं तरी दाहक वास्तव असतं. प्रत्येकाच्या असेलच असं नाही, पण बहुतेकांच्या असतंच. हर प्रकारानं आणि निकरानं त्याला टाळण्याचा, नाकारण्याचा प्रयत्न करावा आणि कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक तीव्रतेने आयुष्यानं ते वास्तव माणुस गाफील असताना कुणीतरी तोंडावर सणसणून दगड भिरकवावा तसं फेकुन मारावं... काय अवस्था होईल? हेच जर एखाद्या अडनिड्या वयातल्या मुलासोबत घडलं तर? तोही प्रथम भेलकांडून हतबल होईल आणि आवाक्याच्या बाहेर गेल्यावर त्वेषानं चवताळून परिस्थितीवर तुटून पडेल... जमेल त्या मार्गानं!!

पण फँड्री इतकाच नाही... मी माझ्यातला माणुस शोधत जाते, माझ्यातली संवेदनशीलता तपासत जाते, माझ्यामुळे आणि माझ्यापासून सुरू होणा-या समाजाचा एक हिस्सा म्हणुन माझ्या वाट्याला भिरभिरत आलेल्या ह्या दगडाचा मी थिएटरात नेम चुकवला तरी मनावर मात्र तो येऊन आदळतोच! मंजुळेंनी नेमच इतका अचुक धरलाय... तिथे वाल्याच्या बायकोसारखं मी पाप केलं नाही म्हणत बाजूला व्हायला वावच नाही. आजही चहूबाजूंना 'ड्रायव्हर', 'कामवाली बाई' (स्वतः घाण केलेली स्वच्छतागृहं तिच्याकडून साफ करून घेणं वगैरेही आलं त्यात!), 'वॉचमन' अशा प्रकारची असंख्य 'बिरुदं' आणि वर्णभेदही येतात कानांवर.. अर्थात हा फक्त एक दाखला, असे हजारो दाखले. त्यामागे दडलेल्या माणुस नावाच्या प्राण्याचं काय? मी अडवते का कुणाला असं संबोधताना? अशी वागणुक देणा-यांना परावृत्त करते का? म्हणजे काय काय करायला लागेल? मी स्वतः खरंच पूर्णपणे माणुसकीनं वागते का? प्रश्न. अनेक प्रकारचे. नागराज मंजुळे तुम्हाला टोचत रहातात. अनेक प्रसंगांमधून. - हा फॅण्ड्री आहे. पण पुन्हा, एवढाच नाही.

हे सगळं बेमालुमपणे अगदी जाता जाता करत मंजुळे तुमचं मनोरंजनही करतात. त्यांचा चंक्या ज्या सहज आणि लिलया जत्रेच्या जल्लोषात सामील होतो त्याच सहजतेनं. कोणतीच गोष्ट कशाचपासून वेगळी करता येत नाही.

एरवी अडम तडम तडतडबाजा असलेली माझी बहिण चित्रपट पहाताना वरचेवर डोळ्यांना रुमाल लावत होती. म्हणजेच चित्रपट भिडला असं नव्हे, माहिताय. पण नि:शब्द जडत्व घेऊन घरी पोचल्यावर आपोआपच 'माणसानं माणसाशी माणुसकीनं वागणं' यावर माझा आणि तिचा रंगलेला दीर्घ परिसंवाद पार प्रत्येक कुटुंबियाची पाळंमुळं खणत गेला, मागच्या आणि आमच्या पिढीतल्या प्रत्येकाबद्दल ते येणा-या पिढीला काय पोचवायचं इथंपर्यंत. दोघीच्या दोघीच निवांत असताना, वेळेचं बंधन नसताना एरवी स्वतःचीच सालं कशाला काढत बसलो असतो? त्यापेक्षा अनुपस्थित गोतावळ्याबद्दल ही अश्शीच आणि तिचं तस्संच हा मुखवास चघळत बसणं सोप्पं नव्हतं का? वर आणि तो मंजुळेंच्या डोईजड चित्रपटावर रामबाण उताराही तर झाला असता! पण...

उत्खननालाच बसायचं तर अनेक गोष्टी निघतील. पण ते प्रत्येकानं आपापलं करावं. कारण मला जे सापडलं तेच बाकिच्यांना मिळेल असं नाही शिवाय असंही होऊ शकेल की मलाच शंभर गोष्टी मिळाल्या आणि कुणाला एकही नाही... तेव्हा तो शेवटी ज्याचा त्याचाच प्रश्न रहातो.

अलकनंदा दासगुप्तांचं संगीत आणि विक्रम अमलाडींचा कॅमेरा हे दोन महत्वाचे कलाकार आहेत चित्रपटात. शीर्षकापासूनच दोघंही मनाचा ठाव घेतात आणि ती पकड घट्ट घट्ट होत जाते... एकेक फ्रेम बघत रहावी अशी आणि एकेक तुकडा रिवाईंड करुन मुद्दाम ऐकण्यासारखा. किशोर कदम ह्या माणसाला मला एकदा सेटवर जाऊन निरखायचं आहे. ह्या माणसाला स्वतःला तरी कल्पना असेल का स्वतःच्या रेंजची?? स्विच ऑन्/ऑफ नावाची चीज हा करतो तरी कशी? ह्या माणसाबद्दलचं कुतूहल दिवसेंदिवस वाढतंच चाललंय. 'ल्हान हाये अजून', 'शेण घेऊ का?'तली लाचारी, गल्लीच्या वळणावरच्या त्या बेतशीर झोकांड्या, जिवाच्या आकांतानं केलेली शेवटची पळापळ.. सगळं अचंबीत करणारं.
त्याच्यासमोर त्याच ताकदीनं उभी राहिलेली जब्याची आई. यांचं नाव मला माहिती नाही पण भुमिकेचं सोनं म्हणजे काय याचा वस्तुपाठ आहे तिची भुमिका. मग जब्या आणि पि-या. तीन चतुर्थांश सिनेमा होईतोवर तर माझं ध्यान पि-याकडंच. 'आता खाली कसा उतरू'पासून ते ओशाळवाणं होऊन नवी कापडं कशी आहेत विचारणं असो... 'तुझा झगा गं झगा गं ' करत जिवलग दोस्ताला गाण्यात गुंफणारा लोभस पि-या. मी प्रेमात पडले त्याच्या. 'नायकाचे बेस्ट दोस्त' अशी काही कॅटेगरी केली तर सुरज पवारचा पि-या १००% पहिल्या पाचात!

पि-यापाठोपाठ चंक्या. अफलातून. मंजुळेंचा कलंदर चंक्या मोहवून टाकतो. 'तुझा विश्वास आहे ना, मग होईल' भिडलंच. त्याचं आणि जब्याचं नातं केवळ देखणं आहे. जब्या मात्र मला अधूनमधून आवडला आणि मग शेवटचा. त्याचं ते डोळ्यांच्या कोप-यातून शालूला निरखत रहाणं आणि ओघानंच ओठांवर उमटणारं अस्फुट स्मित लाजबाब. संवादफेक मात्र सोमनाथ अवघडेच्या मुळच्या हस-या जिवणीमुळं थोडीशी सदोष झालीये असं मला वाटलं. पण सायकलच्या आणि पेप्सीच्या प्रसंगात शिवाय जत्रेत बत्ती घेतल्यावरचा त्याचा प्रयत्न चांगला होता. राजेश्वरी खरातची शालू निरागस. ती तशीच अपेक्षितही होती. बामणीण चिमणीच्या गोष्टीसाठी ज्योती सुभाष नावाच्या देखण्या म्हातारीचं अनपेक्षित दर्शन सुखद. खरंतर अगदी एकच वाक्य बोलणा-या सुरखीपासून ते 'वढ पाच'ची म्हणणा-या न्हाव्यापर्यंत, जो तो ज्या त्या ठिकाणी एकदम फिट आहे, चपखल.

बाहेर धुमाकुळ घालणा-या आणि मलाही तेवढीच भुरळ घातलेल्या अजयच्या 'प्रितीच्या विंचू'ची अनुपस्थिती भावली. ते कुठेही आलं असतं तरी टेंपोच गेला असता. 'साजूक पोली अन म्हाव-या 'सारखं त्याचंही ठिगळच झालं असतं. त्या मोहाला बळी न पडण्याबद्दल मंजुळेंचं विशेष कौतुक.

मंजुळेंनी डोक्याला खुराक दिलाय, साखरेत घोळवलेल्या कडू गोळीच्या डोससारखा. हा स्क्रू नवं काही आदळेपर्यंत डोकं पोखरत रहाणार. भविष्यातही जेव्हा जेव्हा फॅण्ड्री बघेन तेव्हा तेव्हा तो स्क्रू पुन्हा लोहचुंबकासारखा येऊन मेंदूला चिकटेल आणि आपलं काम करत राहील हेही आत्ताच माहितीये..

पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय.. पहिलाच प्रयत्न (प्रयत्न म्हणायचं का??) इतका खणखणीत... बस्स लगे रहो!! मंजुळेंच्या पुढच्या सगळ्या दमदार वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिय शाम आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींनो,

(मायबोलीचे सदस्यत्व मिळण्यास उशीर झाल्यामुळे आज ही पोस्ट टाकत आहे.)

काल अखेर बहुचर्चित 'फॅण्ड्री' पहिला. त्याआधीच येथील सर्व चर्चा वाचली होती होती पण मी स्वतः सिनेमा पहिला नसल्याने त्यावर काही काही मत व्यक्त करणे मला योग्य वाटत नव्हते.

'फॅण्ड्री' हा नागराज चा एक उत्तम प्रयत्न आहे हे मान्यच करायला हवे. अशा प्रकारचा विषय आणि धाडसी मांडणी याबद्दल त्याचे अभिनंदन करायला हवे. मनोरंजनाची एक वेगळी वाट असते आणि त्या वाटेवर प्रेक्षकांना घेऊन जाण्याची जवाबदारी दिग्दर्शकाची असते, ती जवाबदारी नागराजने घेतली आहे हे या सिनेमामधून नक्की दिसते.

पण त्यापुढे जाऊन चित्रपट म्हणून त्याची स्वतःची एक भाषा असते आणि ती नेहमीच अप्रत्यक्ष असते असे मला वाटते, ती भाषा या सिनेमात खूप कमी दिसते. आणि म्हणून सिनेमा predictable होतो. जन गण मन सारख्या सीन मधून हि अप्रत्यक्षता प्रेक्षकांना धरून ठेवते. तसेच सामाजिक मांडणी प्रेक्षकांसमोर मांडणे यापेक्षा ती मांडणी एका विशिष्ठ कथासुत्रामध्ये बसवणे हे जास्त अपेक्षित होतं, पण ते सिनेमामध्ये जाणवत नाही. म्हणूनच नागराजने साकारलेल्या पात्राचे गूढत्व, एक दिवसावर लग्न आलेलं असताना होणारी सुरेखाची घालमेल, पाटलाच्या पोराची शालूवर असणारी नजर या सर्वांचं काय झालं? असा प्रश्न राहून राहून मनात येतो.

लोकवाद्य आणि चेलो आणि गिटार आणि व्हायोलीन हे सर्व का? हे पण कोडं उलगडत नाही. ज्या पद्धतीचं visual मी पडद्यावर पाहतो त्याच पद्धतीचं संगीत मला ऐकू यावं अशी एक प्रेक्षक म्हणून माझी अपेक्षा असते. त्याच पद्धतीचं म्हणजे लोकसंगीतच पाहिजे असं नाही पण वेस्टर्न चा फील मला त्या सिनेमापासून लांब घेऊन जातो.
या सर्व गोष्टी गृहीत धरून हा एक फार चांगला आणि धाडसी प्रयत्न आहे हे मान्यच करावे लागेल. सिनेमा बघितल्यानंतर 'इथं असं करायला पाहिजे होतं', हे म्हणणं अगदी सोपं असतं पण सिनेमा बनवताना किती आणि कोणते कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव ठेऊन मी या गोष्टी मांडत आहे.

शेवटी पायताण आणि फॅण्ड्री याबद्दल इथे खूप चर्चा झाली. पायताणचा निर्माता आणि दिग्दर्शक या नात्याने मला काही गोष्टी या ठिकाणी मांडणे आवश्यक वाटते. (खासकरून चिन्मय साठी) पायताणचे शूटिंग मे २०११ मध्ये पूर्ण झाले आणि नोव्हेंबर २०११ मध्ये कलकत्ता येथे आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये हि फिल्म पहिल्यांदा दाखवली गेली. भारतातील विविध महोत्सव तसेच इटली आणि फ्रान्स येथील महोत्सवांमध्ये या फिल्मचा समावेश आहे. यु-ट्यूब वर ही फिल्म २०१३ मध्ये उपलोड केली गेली कारण ती विविध फेस्टिवल्स मध्ये पाठवण्यात आली होती. ज्यांनी पायताण ही फिल्म पहिली नसेल त्यांनी जरूर पहा -

http://www.youtube.com/watch?v=Sjjuu-Mqd88

अर्थात चित्रपट हा विषय असा आहे कि ज्यामध्ये विविध गोष्टींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अंतर्भाव असतो. मी स्वतः फॅण्ड्री पाहिल्यानंतर मला यामध्ये साधर्म्य जाणवत नाही. बऱ्याच जणांना तो भावत नाही त्याचे एक कारण पायताण आणि फॅण्ड्री हे दोन्ही सिनेमे सामाजिक विषमतेवर भाष्य करतात हे असू शकेल. दोन्हीची मांडणी, धाटणी आणि पद्धती एकमेकांपासून वेगळी आहे. पण विषयामुळे तसं वाटण्याची अगदीच शक्यता आहे. नागराजने घेतलेल्या कष्टांविषयी उगाचच शंका घेणे एक दिग्दर्शक म्हणून मला अजिबात योग्य वाटत नाही, आणि प्रेरणेचा स्त्रोत काय असावा यावर कुणाचेच कुठलेच नियंत्रण असू शकत नाही त्यामुळे सिनेमाची चर्चा करूया, तुलना नको.

माझ्या दृष्टीने दोन वेगळे दिग्दर्शक दोन वेगळ्या वेळी एकाच विषयावर दोन वेगळ्या पद्धतीने भाष्य करण्याचा प्रयत्न करतात ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे.

पुन्हा एकदा नागराज आणि त्याच्या टीमचे मनापासून अभिनंदन.

- कौस्तुभ बंकापुरे

आपल्या निखळ आणि खुल्या वॄत्तीला दाद द्यावी तितकी कमी आहे. आपल्याला सलाम! समव्यावसायिकांबद्दल इतका मोकळा आदर दिलखुलासपणे व्यक्त करणारे मोजकेच असतात.

मी अजून 'पायताण' पाहिलेला नाही, पण तो वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला जाईल आता.
शिवाय पुन्हा फँड्री आठवतानाही आपण मांडलेले मुद्दे नव्याने लक्षात येत आहेत.

मुद्दाम मायबोली सभासदत्व घेऊन इथल्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपले खुप खुप आभार.
मायबोलीवर मनःपुर्वक स्वागत Happy

कौस्तुभ जी.....

स्वागत करत असतानाच "पायताण" संदर्भात तुमची निर्मिती आणि त्या लघुपटाने मिळविलेले यश, तसेच त्यावर घडलेल्या चर्चांबद्दलही तुमचे अभिनंदन करायला मिळाले ही गोष्ट माझ्यासाठी आनंददायी आहे. "पायताण" मी पाहिला आहे.....त्याचे बरेचसे चित्रिकरण कोल्हापूर परिसरात झाले आहे....चित्रपटाची कालमर्यादा लक्षात घेता मिळालेल्या वेळेत आवश्यक त्या प्रभावाची कमाई त्याने नक्कीच केली आहे....जरी त्या मुलाची आजोबासमवेत तसेच रिक्षावाल्याबरोबर केलेल्या संवादाची धाटणी मला खटकली असली तरी.....[अर्थ असा होऊ शकतो की चर्मकारांच्या मुलांची "बाय डीफॉल्ट" तशीच भाषा असते...]

तुम्हाला "फॅन्ड्री" आणि "पायताण" मधील साम्यस्थळे शोधणार्‍या व्यक्ती आणि वृत्ती जशा दिसल्या तशा निर्मितीशी संबंध नसलेल्या माझ्यासारख्या "प्रेक्षक" भूमिकेतील लोकांना आढळल्या आहेतच. पण एका मागोमाग दोन्ही दर्जेदार चित्रपट आले इतकेच साम्य सोडले तर दोन्ही कथानकांचा दूरान्वयेही संबंध जोडण्यात अर्थ नाही. साधर्म्य असेल तर मुलाच्या मनात धुमसत असलेली संतापाची उद्रेकाची ती ज्वाली जो ती त्या दगडाच्या साहाय्याने प्रकट करू इच्छितो.

श्री.नागराज आणि तुम्ही....दोघांच्याही प्रयत्नाबद्दल जितके अभिनंदन करणे गरजेचे आहे तितकेच चित्रपटांना सर्वदूर पोहोचविण्यासाठी टीमच्या सदस्यांचेही तितकेच अभिनंदन या निमित्ताने करणे क्रमप्राप्त होते. आजकाल अशी टीम प्रत्येक निर्माता दिग्दर्शकाकडे असणे नीतांत गरजेचे आहे.

माझा हा लेख फॅण्ड्रीचे लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी त्यांच्या फेसबुक वॉलवरती प्रकाशित केला आहे. लेखावरची त्यांची प्रतिक्रिया समजली नसली तरी त्यांच्या ह्या कृतीने त्यांनी ह्या लेखाची दखल घेतली असे मात्र मी नक्की म्हणेन.

सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.

बीपी -शाळा-टीपी-सारख्या न आवडलेल्या फिल्म्स नन्तर खरोखर एक चांगली फिल्म बघायला मिळाली.

आभार आणि अभिनन्दन मंजुळे यांचे!

अतिशय चपखल लेख .... "परिक्ष"ण म्हणूच नये याला. खुप सुंदर असे आस्वादक लिखाण ! अभिनंदन, सई .. नागराज मंजुळेंच्या फेसबुक वॉलवरती आल्या बद्दल ! तुमच्या उत्कृष्ट लिखाणाची ही पावती आहे! यदाकदाचित फॅन्ड्रीला ऑस्करबिस्कर मिळालं तर त्या ट्रॉफीमध्ये तुमचाही वाटा असेल ....!:-)
बादवे, हा स्-प्रतिम सिनेमा बघाच. अगदी थेटर मधे जावून !!

सगळ्यांच्या गोडंमिट्ट प्रतिक्रिया वाचून काही लिहावसं वाटतच नाहीये. उगाच सगळ्यांच्या भावना दुखावत मी काही सविस्तर लिहिणार नाही. म्हणून थोडक्यात,

हा लेख खरंच छान आहे.

चित्रपटाबद्दल काय बोलू?

----------------------------------------------------------------------------------

अवांतर:

खरंच, टाईमपास पाहिला तेव्हा दुखलं, त्या पेक्षा जास्त डोकं दुखत होत.
( औषध म्हणून गोलमाल ३ पाहिला. )

बाकी सध्याचा एकही नवीन आलेला सिनेमा मनापासून आवडलेला नाही.

हरकत नाही मधुरा Happy तुला लिहावेसे वाटत असेल तर तू मोकळेपणाने स्पष्ट लिहू शकतेस.
काय आवडलं ते सगळ्यांनी सांगितलं, तसं तुला काय आवडलं नाही ते तूही लिही की. कुणाच्या भावना दुखावल्या तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तू त्याचा विचार करायची काहीच आवश्यकता नाही.

दिसायला अतिशय साधा दिसणारा सिनेमा इतका अन्तर्मुख करुन जातो..
छोट्या छोटया बारकाव्यातुन कथा ऊलगडत जाते... किशोर कदम ने लाजबाब काम केलय.

अवांतर लिहीत असल्याबद्दल मायबोलीकरांची क्षमा मागून

<आजच्या काळात अश्या प्रकारे खालच्या जातीच्या लोकांना चिडवलं जात नाही.>

प्रामाणिक विचारप्रदर्शनाबद्दल अभिनंदन.

लगेच लिहिण्याची घाई न करता, आज सिनेमा पाहून १० दिवस झाल्यानंतर प्रतिक्रिया देत आहे.

छोटे-छोटे अनेक प्रसंग प्रभावी पणे समोर येतात आणि छाप सोडून जातात. त्या प्रसंगा बद्द्ल इथे न लिहिता, ते पाहूनच स्वतःचं मत पाहणार्‍याने बनवावं. बर्‍याच जणांनी लिहिल्या प्रमाणे.. जब्या ने शेवटी आवेशाने फेकलेला दगड सिनेमा पाहणार्‍याच्या नकळतच कानफटात मारुन जातो.. इतक्या दिवसांनंतरही हे सगळं आपल्याला अंतर्मूख (हा शब्द चुकीचा लिहिला आहे असं वाटतंय :अओ:) करुन जातं... हेच या सिनेमाचं मोठं यश म्हणेन..

मयेकरांना अनुमोदन.

मधुरा कुलकर्णी,
असा विचार करून पहा, की जे डुकराचं मांस आणि एकंदरच चित्रपट पडद्यावर पहायला देखील आपल्याला किळसवाणं वाटतं, ते म्हणजे काही लोकांच्या आयुष्यातील अपरिहार्यता आहे. आपल्याला वाटणारी किळस, तिचं आपल्याकडून होणारं प्रकटन, प्रदर्शन हे त्या लोकांसाठी अपमानास्पद ठरू शकतं.

अंतर्मुख Happy पण भावना पोचल्यात मित.

मधुरा, बाकी सगळे मुद्दे मान्य, पण भरत मयेकरांचाही मुद्दा महत्वाचा.
भरत, या धाग्यावर ते अवांतर नाही.

एकूणच चित्रपट पाहिल्यावर किळसवाण वाटत >>> बरोबर. आपल्याच आजूबाजूला अनेकांची जगणी अशीच किळसवाणी असतात. आपल्या शांतसुखमयसुवासिक आयुष्यातून बाहेर पडून प्रत्यक्षात बघण्याची शक्यता फारच कमी आहे, असं जाणवल्याने नागराजने ते पडद्यावर दाखवलं- असंही कदाचित असू शकेल.

बाकी मुद्दे तुमचे मत म्हणून सोडून दिले, तरी तिसर्‍या मुद्द्यातल्या पहिल्या वाक्यात गंभीर आणि दुर्दैवी अंतर्विरोध आहे.

<आजच्या काळात अश्या प्रकारे खालच्या जातीच्या लोकांना चिडवलं जात नाही.<<

असं डायरेक्ट जरी म्हणत नसतिल ना तरिही किती छोट्या छोट्या वाक्यांमधुन हे सुचवलं जातं, हे हा चित्रपट पाहुन एकदम जाणवलं. उदा., ''हे' लोक शिक्षण क्षेत्रात आल्यापासुन मराठी शाळांचा दर्जा घसरला...'

हा लेख यायच्या अगोदरच बहुतेक मी फँड्री पाहिला असावा म्हणून हा लेख वाचला नसावा! तो आज वाचला.

छान लिहिलंस सई! किशोर कदम यांच्याबद्दलतर तुझ्या प्रत्येक वाक्याला अगदी अगदी..!! जब्याने संतापून शेवटी साट्कन मारलेला धोंडा चुकवला तरी तोंडासमोर झणझणत होता कितीतरी दिवस..

जब्याचा बा त्याच्या कुटूंबासकट डुकराला पकडायला जिवाच्या आकांताने पळापळ करत असतो आणि त्याचं शुटींग मोबाईल मध्ये करुन ते शेअर करण्याचा प्रसंग तर :रागः

म्हणूनच मत मांडत नव्हते. एक पोस्ट टाकली कि दहा नवीन अर्थ काढायला मायबोलीकर लगेच हजार.

जाऊन दे ना....मला नाही आवडला चित्रपट इतकचं सांगायचं आहे. बाकी सोडून द्या. मला उगाच भलत्याच वादात पडायचे नाही.

पाहीला बुआ एकदाचा फॅन्ड्री. मला तर ते जात-बित प्रकरण काही कळलं नाही.
एक प्रश्न मात्र सतावतोय तो हा की जब्या असे धोंडा मारून प्रश्न संपवू शकतो का? ते काळ्या चिमणीच्या पाठी लागणे हे हाती धोंडा येऊ नये म्हणून चंक्याचा प्रयत्न की चंक्यालाही हेच हवेय?

साजीरा, प्रत्येक वाक्याला मोदक भौ!
सईबाई तुमच्या 'स्क्रू' चे आभार.

आमचा बाप बेवडा असल्याने त्याला चारचौघात 'बाप' म्हणून ओळख द्यायची लाज वाटायची कधीकाळी. पण फार लवकरच ती न्युनगंड वृत्ती फेकून दिली. कसाही असला तरी 'बाप' आहे तो आणी आपण तसली लाज आपल्या पोरांना आणू द्यायची नाही एवढी अक्कल आली.

काही असो, चित्रपटाचा शेवट पोचला पण पटला नाही!

कौस्तुभ.. पोस्टमधील मोकळेपणा फार आवडला. इथे चित्रपटविषयक लेख्न सातत्याने करत रहा अशी विनंती आहे.
या क्षेत्रातले नवीन प्रयोग आमच्यापर्यंत फार उशीरा पोहोचतात. अधिकारी व्यक्तींचे लेखन वाचून थोडेतरी समाधान मिळते.

पण फार लवकरच ती न्युनगंड वृत्ती फेकून दिली. कसाही असला तरी 'बाप' आहे तो आणी आपण तसली लाज आपल्या पोरांना आणू द्यायची नाही एवढी अक्कल आली.>> अजून काय पाहिजे? जबरदस्त अचिव्हमेंट आहे अहो ही! आयुष्यातलं मोठ्ठं रियलायझेशन Happy

Pages