स्मायली

Submitted by चायवाला on 29 December, 2013 - 04:20

चेहर्‍यावरचं सहज निर्व्याज हसू
कृत्रिम होऊन स्मायली झालं
तेव्हाच मी ओळखलं
आता काही खरं नाही

संभाषणात अट्टाहासाने पेरलेले स्मायली
स्वल्पविरामांची जागा घेतल्यासारखे पसरले
तेव्हाच मी ओळखलं
आता काही खरं नाही

मग वास्तवातल्या मुखवट्यांवरही मात करण्यापर्यंत
याच स्मायलींची मजल गेली
तेव्हाच मी ओळखलं
आता खरंच काही खरं नाही

--------------------------------
२९.१२.२०१३
मार्गशीर्ष कृ. १२, भागवत एकादशी, शके १९३५

Group content visibility: 
Public - accessible to all site users