मराठी गझल उमलत आहे

Submitted by बेफ़िकीर on 25 November, 2013 - 13:26

मी सच्चा आहे, पण जगाने मला जाणले नाही, हे असले जग मी तुच्छ लेखतो.

मराठी गझलने हे सांगणे केव्हाच थांबवलेले आहे.

मराठी गझलेला प्रेयसी, गमे-रोजगार, सामाजिकता, निसर्ग, जातपात, नोस्टॅल्जिया, चमत्कृती, पचण्यास सुलभ असा स्पष्टवक्तेपणा हे व इतर कित्येक असे अनेक कोन लाभलेले आहेत.

वैभव देशमुख आणि सतीश दराडे ह्यांच्या गझला माणसातील हारवलेले माणूसपण जागवत आहेत.

डॉ. अनंत ढवळेंची तर परंपराच वेगळी निघालेली आहे.

डॉ. समीर चव्हाण गझलेत सूक्ष्म भावनिक कंगोरे आणत आहेत.

डॉ. कैलास गायकवाड ह्यांची गझल परखड होत चाललेली आहे.

एकाच आकृतीबंधात इतके वैविध्य दिसणे खचितच आनंददायी आहे.

चित्तरंजन भटांची गझल लालित्य, गझलेचा बाज आणि लाज सांभाळूनही एकसे एक सरस खयाल देत आहे.

गझलेला एकच 'खरा' चेहरा आणि बाकी मुखवटे होते, आता चेहरेच चेहरे आहेत.

ढवळे म्हणतातः मी एकटाच होतो, मी एकटाच आहे

चित्तरंजन भटांमधील निरागस मुलगा म्हणतो: हुंदडावे वाटले आजन्म वार्‍यासारखे

सतीश दराडे, पुस्तके जाळून चूल पेटवणारी मुलगी बघून म्हणतातः या मुलीला कसे मी अडाणी म्हणू

लेट्स विटनेस द सेलिब्रेशन नेम्ड अ‍ॅज मराठी गझल!

आनंदयात्री म्हणतातः वाहत्या गर्दीत माझा चेहरा शोधू नको तू

विदिपा म्हणतातः इतक्या आवेगाने त्याची बंडी भिडते घामाला!

सत्यवादी वैवकु वयानुसार विठ्ठलाला विचारतो: भिजण्यास घाबरतात त्या पोरी कश्या पटवायच्या?

सुप्रिया जाधव उद्गारतातः दररोज एक वादळ दारावरून जाते

ज्येष्ठ व माझे आवडते गझलकार श्री. प्रदीप कुलकर्णी म्हणतातः

मी असा तसा काही, उन्मळायचो नाही!

लोकहो, आणखी काय हवे आहे?

या ललितलेखाचा शेवट दोन अत्यावश्यक शेरांनी करतो:

क्षणांवर काळजीपूर्वक क्षणांची चवड रचलेली
उभे आयुष्य म्हणजे एक डोलारा असू शकतो - वैभव जोशी

मला भेटायला आले, मला भेटून जाताना......
मला भेटायचे नाही असे ठरवून गेलेले - डॉ. ज्ञानेश पाटील

कृपया, मराठी गझलच्या बदलत्या रुपाला दमदार पाठिंबा द्या मित्रांनो!

घाईघाईत खरडलेल्या लेखात अनेक नामोल्लेख चुकून राहून गेलेले आहेत. ही माणसे गझलेतील जाणती माणसे असून गझलेला नवीन डायमेन्शन देऊ करणारी माणसे आहेत.

पुलस्ति

क्रांति सडेकर

अभिजीत दाते

याशिवाय, रसप, वैभव फाटक व आणखीन काही ताजेतवाने गझलकार नवनवीन खयाल देत आहेतच.

जसजशी नांवे सुचत जातील तसतशी ती शेरांसहित मूळ लेखात नोंदवली जातीलच.

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयेकर, आपण जाणताच की मराठीमध्ये जोडाक्षर हे एकच अक्षर मानले जाते व लिहितानाही तसेच लिहिले जाते कारण देवनागरी लिपी तशी आहे. त्यामुळे ध्य आणि द्य ही दोन भिन्न अक्षरेच ठरणार व त्यांच्यासाठी वेगळा नियम असावा असे जर काहींना वाटत असले तर पुन्हा त्याच्या मर्यादा ठरवाव्या लागतील. जसे:

ध्य, द्य, त्य हे चालतील असा नवीन नियम केला तर भग्न, हुस्न, रत्न हेही चालेल आणि मग शेवटी अलामतीचेही महत्व नष्ट होईल आणि गझल कुरुप होईल.

गझलेचे बाह्य सौंदर्य ज्या घटकांवर अवलंबून आहे (वृत्त, अलामत, काफिया व असल्यास रदीफ) त्या घटकांना अजाणतेपणी किंवा मुद्दाम हानी पोहोचवून गझल रचण्यात काय गंमत आहे? मुळात गझल या वरील चार घटकांना पाळूनही खूप सहजपणे रचता येते हे ज्यांची वृत्तावर हुकुमत आहे त्यांना पटेलच. वरील चारही घटक अबाधित ठेवून शतकानुशतके उत्तमोत्तम गझलांची निर्मीती झालेली असताना हे कुरुपीकरण करणारे नियम असावेत अशी मागणी कोनाच्याही मनात यावी कशासाठी?

(ह्यापूर्वीही ज्येष्ठ गझलकार व कवीवर्य इलाही जमादार ह्यांनी काही प्रयोग केले. जुलकाफिया, एक ओळ मराठी एक हिंदी वगैरे! पण ते प्रचलीत झाले नाहीत कारण मूळ घटकांना हानी तरी पोचली किंवा अती कृत्रिमता तरी आली). (विथ ड्यू रिस्पेक्ट टू इलाही जमादार)

गेल्या महिन्यात मला एक फोन आला. फोन करणारे गृहस्थ गाजलेले गझलकार असून गझल वर्तुळात मोठे गझलकार म्हणून वाखाणले जातात. सासवडच्या साहित्य संमेलनात बहुधा माझा 'बेफिकीरी' हा गझलसंग्रह त्यांच्या हातात पडला होता. तो वाचून त्यांनी मला फोन केला होता. आता इष्टाईल बघा:

"कोण भूषण कटककर का?"

"हो"

"मी अमका अमका बोलतोय"

"हां नमस्कार, बोला"

"नमस्कार! काही नाही, तुमचं ते बेफिकीरी हातात पडलं. सध्या वाचत आहे"

"ओह, ओके, बाकी काय?"

"तेच म्हणालो की फोन करावा आणि कळवावं! बर्‍याच गंमतीजमती आहेत पुस्तकात"

"हं हं, बाकी काय म्हणताय?"

"नाही, वाचतोय अजुन, अनेक गंमती दिसत आहेत त्यात"

"हं हं"

"म्हंटलं फोन करून कळवावं"

"ओके, बाकी कसे काय?"

"बाकी ठीक! ओके मग"

"ओके बाय"

फोन डिसकनेक्टेड!

आता ह्याला काय म्हणावं? उगाच आपलं कैच्याकै इंप्रेशन जमवायला बघायचं का? त्यांची अपेक्षा अशी की त्यांचा फोन आला आहे हे कळल्यावर मी हुरळावे, त्यात पुन्हा माझे पुस्तक वाचत आहेत म्हंटल्यावर अभिप्राय मिळण्यासाठी धडपडावे आणि कानात प्राण आणून त्यांचे मतप्रदर्शन ऐकून घ्यावे.

सॉरी!

छान

सुशांत खुरसाले ह्यांच्या ह्या ओळी: (सुशांत खुरसालेंची परवानगी गृहीत धरून देत आहे):

तुला मान्य आहे , मला मान्य आहे ...
जरी ही कथा सर्वसामान्य आहे !

असे त्रास, अपमान पचतात हल्ली
जणू मोडलेला कणा मान्य आहे !.

तांत्रिकदृष्ट्या ह्या ओळी 'ट्रिकी' आहेत. ज्यांना तंत्राबाबत अधिक स्वारस्य आहे त्यांनी हा प्रतिसाद अवश्य वाचावा व त्याबाबत आपले मत लिहावे अशी विनंती.

पहिला शेर जर 'मतला' आहे असे गृहीत धरले, तर 'आहे' ही रदीफ ठरते व मला ह्या शब्दातील 'ला' आणि सर्वसामान्य ह्या शब्दातील 'सा' ह्यांच्यातील 'आ' ही अलामत व स्वरकाफिया ठरतो. स्वरकाफिया का, तर 'मला मान्य' हे दोन वेगळे शब्द आहेत व 'सर्वसामान्य' हा एकच शब्द आहे. काफिया हा नेहमी एकच शब्द असतो, तो शब्दसमुह नसतो. (रदीफ एक अक्षर, एक शब्द किंवा शब्दसमुह ह्यापैकी काहीही असू शकते).

आता 'मला मान्य' आणि 'सर्वसामान्य' ह्या दोन्हीत समान अक्षरे आहेत 'मान्य'! त्यामुळे त्या आधीचे अक्षर ही अलामत ठरणार, जी व्यवस्थित पाळली गेलेली दिसते आहे व ती म्हणजे 'आ'! पण गंमत अशी की ही अलामत पहिल्या ओळीत एका वेगळ्याच शब्दात (मला ह्या शब्दात) पाळली गेली आहे तर दुसर्‍या ओळीत नॉर्मल गझलेप्रमाणे त्याच शब्दात (सर्वसामान्य ह्याच शब्दात 'सा'च्या रुपाने) पाळली गेलेली आहे.

त्याचमुळे ह्या मतल्याला 'आ'कारान्त स्वरकाफियाचा मतला म्हणावा लागेल.

तसेच पुढचा शेर बघितल्यावरही जाणवेल की कवीला 'आ'कारान्त स्वरकाफिया अपेक्षित आहे. त्याचबरोबर असेही जाणवेल की 'कणा मान्य आहे' हे असे रचले आहे की जणू 'मान्य आहे' ही रदीफ असावी. आता 'मान्य आहे' ही रदीफ का ठरणार नाही तर मतल्यात 'सर्वसामान्य' हा काफिया आलेला आहे. गझलेला एकवेळ रदीफ नसलेली चालेल, पण काफिया नसणे चालणार नाही. त्यामुळे 'सर्वसामान्य' ह्या शब्दाला काफियाच म्हणणे आवश्यक आहे. तसेच, काफिया व रदीफ हे वेगवेगळे शब्द असणे आवश्यक असल्याने 'सर्वसामान्य' ह्या शब्दातील 'सर्वसा' हा काफिया आणि 'मान्य' ही रदीफ असे म्हणता येणार नाही.

थोडक्यात, मतल्यातील 'सर्वसामान्य' ह्या शब्दाने एक गंमतीशीर कोडे निर्माण केलेले आहे. Happy

सुशांत खुरसाले | 9 March, 2014 - 11:17 नवीन

धन्स बेफिजी या चर्चेबद्दल . तांत्रिक गंमत आहे खरी . पण मला वाटते असे करण्यास हरकत नसावी .स्मित
<<<

छे हो, हरकत कसली! Happy

वॉव ! इंटरेस्टींग !!

सुशांत खुरसालेंच्या शेरातिल कफियांच विश्लेषण जबरी.

मुद्दा खरोखर विचारशक्तीला चालना देणारा ठरतोय .

धन्स बेफिजी.

'मराठी गझल उमलत आहे' ह्या भावनेला तडा देणारे काही शेर व गझला नुकत्याच फेसबूकावर वाचायला मिळाल्या. उदाहरणे देणे प्रशस्त नाही.

पण वेदना, आकाश व त्याचे घटक (सूर्य, चंद्र, चांदण्या इत्यादी), पौराणिक दाखले, व्यथा, काळीज वगैरे समाविष्ट करून 'इन्स्टन्ट टाळ्यांचा कडकडाट मिक्स' ची पाकिटे विकायला ठेवल्यासारखे वाटत आहे. चावून चोथा झालेले खयाल येत आहेत.

Uhoh

पण वेदना, आकाश व त्याचे घटक (सूर्य, चंद्र, चांदण्या इत्यादी), पौराणिक दाखले, व्यथा, काळीज वगैरे समाविष्ट करून 'इन्स्टन्ट टाळ्यांचा कडकडाट मिक्स' ची पाकिटे विकायला ठेवल्यासारखे वाटत आहे. चावून चोथा झालेले खयाल येत आहेत.

==>

अगदी मनापासून सहमत आहे.

Pages