मराठी गझल उमलत आहे

Submitted by बेफ़िकीर on 25 November, 2013 - 13:26

मी सच्चा आहे, पण जगाने मला जाणले नाही, हे असले जग मी तुच्छ लेखतो.

मराठी गझलने हे सांगणे केव्हाच थांबवलेले आहे.

मराठी गझलेला प्रेयसी, गमे-रोजगार, सामाजिकता, निसर्ग, जातपात, नोस्टॅल्जिया, चमत्कृती, पचण्यास सुलभ असा स्पष्टवक्तेपणा हे व इतर कित्येक असे अनेक कोन लाभलेले आहेत.

वैभव देशमुख आणि सतीश दराडे ह्यांच्या गझला माणसातील हारवलेले माणूसपण जागवत आहेत.

डॉ. अनंत ढवळेंची तर परंपराच वेगळी निघालेली आहे.

डॉ. समीर चव्हाण गझलेत सूक्ष्म भावनिक कंगोरे आणत आहेत.

डॉ. कैलास गायकवाड ह्यांची गझल परखड होत चाललेली आहे.

एकाच आकृतीबंधात इतके वैविध्य दिसणे खचितच आनंददायी आहे.

चित्तरंजन भटांची गझल लालित्य, गझलेचा बाज आणि लाज सांभाळूनही एकसे एक सरस खयाल देत आहे.

गझलेला एकच 'खरा' चेहरा आणि बाकी मुखवटे होते, आता चेहरेच चेहरे आहेत.

ढवळे म्हणतातः मी एकटाच होतो, मी एकटाच आहे

चित्तरंजन भटांमधील निरागस मुलगा म्हणतो: हुंदडावे वाटले आजन्म वार्‍यासारखे

सतीश दराडे, पुस्तके जाळून चूल पेटवणारी मुलगी बघून म्हणतातः या मुलीला कसे मी अडाणी म्हणू

लेट्स विटनेस द सेलिब्रेशन नेम्ड अ‍ॅज मराठी गझल!

आनंदयात्री म्हणतातः वाहत्या गर्दीत माझा चेहरा शोधू नको तू

विदिपा म्हणतातः इतक्या आवेगाने त्याची बंडी भिडते घामाला!

सत्यवादी वैवकु वयानुसार विठ्ठलाला विचारतो: भिजण्यास घाबरतात त्या पोरी कश्या पटवायच्या?

सुप्रिया जाधव उद्गारतातः दररोज एक वादळ दारावरून जाते

ज्येष्ठ व माझे आवडते गझलकार श्री. प्रदीप कुलकर्णी म्हणतातः

मी असा तसा काही, उन्मळायचो नाही!

लोकहो, आणखी काय हवे आहे?

या ललितलेखाचा शेवट दोन अत्यावश्यक शेरांनी करतो:

क्षणांवर काळजीपूर्वक क्षणांची चवड रचलेली
उभे आयुष्य म्हणजे एक डोलारा असू शकतो - वैभव जोशी

मला भेटायला आले, मला भेटून जाताना......
मला भेटायचे नाही असे ठरवून गेलेले - डॉ. ज्ञानेश पाटील

कृपया, मराठी गझलच्या बदलत्या रुपाला दमदार पाठिंबा द्या मित्रांनो!

घाईघाईत खरडलेल्या लेखात अनेक नामोल्लेख चुकून राहून गेलेले आहेत. ही माणसे गझलेतील जाणती माणसे असून गझलेला नवीन डायमेन्शन देऊ करणारी माणसे आहेत.

पुलस्ति

क्रांति सडेकर

अभिजीत दाते

याशिवाय, रसप, वैभव फाटक व आणखीन काही ताजेतवाने गझलकार नवनवीन खयाल देत आहेतच.

जसजशी नांवे सुचत जातील तसतशी ती शेरांसहित मूळ लेखात नोंदवली जातीलच.

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली किंवा गेले काही महिने गझलेतील शेराला उद्देशून काहीजण 'टाळीखाऊ, टाळीबाज, मुशायर्‍याचा शेर' अशी विशेषणे जोडतात. त्यातून बहुधा असे म्हणायचे असते की चार सामान्य रसिकांच्या टाळ्या मिळतील पण ह्या शेरात काही विशेष गांभीर्य किंवा काव्यगुण नाहीत.

मला असे वाटते की कवी सर्व प्रकारचे शेर आपोआप करत असतो. फक्त ठरवून टाळीबाज शेर करणारे असतीलही, पण कित्येकजण असे आहेत की त्यांचे जिथे तीस एक टक्के शेर टाळीबाज, तीस एक टक्के सामान्य शेर असतात तिथेच चाळीस टक्के उत्तम काव्यगुण असलेले शेरही असतात. तेव्हा एखादी गझल समोर आली की त्यातील एक दोन शेरांना 'टाळीबाज' असे म्हणणे मला योग्य वाटत नाही.

गझल हा प्रकार त्यातील तांत्रिक बाजू व त्यातील उच्च दर्जाची आशयसंबंधित बाजू माहीत नसणार्‍यांनाही प्रिय व्हावा यासाठी टाळीबाज शेर कामही करत असतात. एक कवी म्हणून जरी प्रामाणिकपणे आपलेच काव्य आपल्याच शैलीने करत राहणे अपेक्षित असते तरी आपल्यातल्याच कवीतील एक काव्यरसिक म्हणून तो काव्यप्रकार फैलावावा यासाठीही कार्यरत असणे गैर नाही. (दुर्दैवाने, मुशायरे आयोजीत करणे, त्यात जाणे, गझल सादर करणे, तिला दाद देणे वगैरे बाबी हल्ली तुलनेने हलक्या का समजल्या जात आहेत कळत नाही).

तेव्हा, टाळीबाज शेर हे ध्येय नक्कीच नसावे, पण काही शेर टाळीबाज असले तर त्यांना हिणवणेही गैर आहे. त्यांना सरळ टाळ्याच वाजवाव्यात असे मला वाटते.

बेफिकीरच्या शेवटच्या पोस्टशी १०० टक्के सहमत!! Happy
फक्त एक वाढवू इच्छितो: टाळ्यांचे शे'र रचणे हे हीन अजिबात नाही. तीसुद्धा एक कला आहे आणि ती कला येरागबाळ्याला जमत नाही ... उत्कृष्ट कवी-कवयित्रीलच जमू शकते! Light 1

बेफि, प्रश्न शेर हलका आहे वगैरे नाहीये माझ्या दृष्टीने. ज्याच्या अंगी कौशल्य आहे तोच शायर हे करू शकतो ह्या शरदजींच्या मताशीही मी सहमत आहे.

माझे मत थोडे वेगळे आहे,

शेर रचला जात असताना असे शब्द जाणीवपूर्वक निवडल्यासारखे वाटणे की ज्यामुळे वाचकाल हे काहीतरी खूप भारी आहे असे वाटावे. माझ्या मते ज्या शब्दयोजनेत रसिकाला स्वतःला बसवता येत नाही आणि ही काहीतरी दुसर्‍या दुनियेची विद्या आहे असे वाटते तिथे केवळ नाट्यमयताच उरते असे आपले वाटते.

टीका करायची म्हणून नव्हे पण पुन्हा एकदा सतिशचाच एक शेर सहज आठवला म्हणून देत आहे,

कधी वीणेतुनी आलो कधी टाळातुनी आलो
तुकोबाची व्यथा घेउन तळागाळातुनी आलो

ह्या शेरात मी अशी अटकळ बांधीत आहे की दुसरा मिसरा सहज आलेला आहे आणि पहिल्या मिसर्‍यातले 'वीणा' आणि 'टाळ' हे शब्द खाली केवळ तुकोबा आलाय म्हणून घातलेले आहेत. नाहीतर 'वीणेतुनी येणे' ;'टाळातुनी येणे' म्हणजे नेमके काय? दोघांत फरक काय? हे काही मला समजलेले नाही.

पण शब्दांच्या वापरामुळे ह्या शेराकडे लोक आपोआप खेचले जाणारच! हे वाईट आहे म्हणण्याचा उद्देश अजिबात नाही पण प्र्स्तुत शेरातला दुसरा मिसराच पूर्ण शेराचा अर्थ सांगत आहे असे म्हणायचे आहे.

सतिश, हे वाचत असलास तर गैरसमज नसावेत ही विनंती.

तुम्ही पण वैभवचे पंखे दिसताय..! चांगलं आहे.

आपली विनोदबुध्दी मानायला हवी.

हरकत नाही. नविन आहात... जमेल हळू हळू तेही... स्मित तूर्तास, तुम्ही माझ्या चालण्याची चिंता करू नका.

नवीन म्हणजे काय हो. चिंता नाही म्हणून तर लिहिलं.
धन्यवाद.

एक शेर हा एक संपूर्ण कविता म्हणूनच दर्जात्मक पातळ्यांवर(व्यक्तीसापेक्ष का असेना) का तपासला जाऊ नये?

तेही कळेल ह़ळू हळू... अभ्यास सुरू ठेवा.

आपल्याला माहीत नाही, असे स्पष्ट म्हणा की राव. उगाचच ताणायचं.

धागा सध्याच्या संपूर्ण मराठी गझलेच्या प्रगती/अधोगती विषयी असावा माझ्या मते.

फक्त वैभव जोशींचा वारंवार उल्लेख करून काय साध्य होणार आहे म्हणे? स्वतः वैभव जोशी प्रत्यक्ष भेटीदरम्यान बरेच डाऊन टू अर्थ वाटले. बाकीची खडखड नेहमीच त्यांचे सो कॉल्ड भक्त करीत असतात असे दिसून आलेले आहे.

विदिपा,

तुमच्या या विधानाबाबतः

>>>शेर रचला जात असताना असे शब्द जाणीवपूर्वक निवडल्यासारखे वाटणे की ज्यामुळे वाचकाल हे काहीतरी खूप भारी आहे असे वाटावे. माझ्या मते ज्या शब्दयोजनेत रसिकाला स्वतःला बसवता येत नाही आणि ही काहीतरी दुसर्‍या दुनियेची विद्या आहे असे वाटते तिथे केवळ नाट्यमयताच उरते असे आपले वाटते.<<<

हे तुमचे व इतर काहींचे मत मला समजलेले नव्हते असे नव्हे, समजलेले होतेच, फक्त ते पटत नव्हते म्हणून आधीचा प्रतिसाद दिला होता. अजुनही पटत नाही आहे. म्हणजे हे पटत आहे की 'वाचकाला ते खूप भारी वाटावे' या उद्देशाने लिहिलेले असते (किंवा बनावट नाट्यमयता असते), पण तसे लिऊ नये असे मत असावे हे पटत नाही आहे. प्रत्येक शेर निव्वळ प्रामाणिकच व्हायला हवा असे म्हंटले तर गझल रचणे कठिण होईल. निव्वळ प्रामणिकपणा, कोणताही आव न आणता लिहिणे ही परिमाणे गझल या काव्यप्रकारासाठी योग्य आहेत हे मुळातच का आणि कोणी ठरवले? किंबहुना, निव्वळ प्रामाणिक व पावित्राहीन (पावित्रा नसलेले) लेखन करायचे असल्यास गझलेपेक्षा गद्य का लिहू नये? काव्यात तर उलट थोडेसे बहकलेले, थोडेसे चमत्कृती व वक्रोक्तीपूर्ण, नाट्यमय असे लिहिता येते हेही एक वैशिष्ट्य नाही का?

मुक्तछंद अथवा इतर छंदोबद्ध कवितेतही इमेजरीचा वापर, प्रतिमा, रुपके, अलंकार ह्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर आढळतो. तेथे आपण (म्हणजे आपण सगळे) नाट्यमयता हेच ध्येय असल्याचा किंवा टाळ्या मिळवणे हे उद्दिष्ट असल्याचा आरोप फारसा करत नाही. गझलेला एक तांत्रिक अंग (व तेही फारच बंदिस्त) असल्याने गझलेकडून अश्या इतरही अपेक्षा ठेवणे बळावले असेल का?

आता बघा:

घरी जा शांत चित्ताने कधीची भंगली कवटी
अहं असल्यामुळे मित्रा चिता माझी शमत नाही

ह्या माझ्या शेराला आपण दाद दिली होतीत हे आठवले. पण हा शेर आव आणून लिहिलेला आहे. पावित्रा घेऊन लिहिलेला आहे. पावित्रा असा की माझ्यात अतिरिक्त अहं आहे हे मला ज्ञात आहे असे दाखवणे. (मुळात हाच एक अहं आहे म्हणा). आता चिता शमत नाही म्हंटल्यावर आधी काहीतरी घ्यायल अपाहिजे म्हणून घेतले जाणे हे ह्या शेरात घडलेले आहे असे म्हणता येईलच.

पण माझा मुद्दाच हा आहे की असे असू नये असे का मानले जात आहे? असूदेत की काही शेर असेही? जे खोटे, मुद्दाम रचल्यासारखे वाटणारे, काफियानुसारी इत्यादी असतात. उलट काफियानुसारी पण तरीही आकर्षक, एकजिनसी, कोणाला ना कोणाला आपलासा वाटू शकेल असा, कारागिरी अधिक असलेला व तरीही त्यात आपली कोणती ना कोणती (काल्पनिक नव्हे) प्रचीती / अनुभुती गुंफलेली असलेला शेर रचणे हेही एक गोड आव्हानच आहे की?

<<<कधी वीणेतुनी आलो कधी टाळातुनी आलो
तुकोबाची व्यथा घेउन तळागाळातुनी आलो>>>>

माझ्या माहितीनुसार गझलकार श्री सतिश दराडे यांचे वडील एक नामवंत किर्तनकार, प्रवचनकार आहेत. साहजिकच लहानपणापासून याच वातावरणात वावरल्यामुळे टाळ, वीणा, तुकोबाची व्यथा हे नि असे संदर्भ त्यांच्या लेखणीतुन प्रगट होणे त्यांच्यासाठी काहीच विशेष नसावे.

ज्या अनुभुतीतून कवि जात असेल ती शेरात रिफलेक्ट होणे स्वाभाविकच आहे. प्रत्येकाचे अनुभव वेगळे म्हणून त्याची अभिव्यक्ती वेगळी फक्त आपण त्याला किती रिलेट करू शकतो हे व्यक्तीसापेक्ष असावे नि म्हणून शेरातिल सहजताही.

जे वाटले ते प्रामाणिकपणे मांडले आहे गै. नसणारच !

-सुप्रिया.

सुप्रिया,

तुमच्या ह्या वरील प्रतिसादामुळे मनातील आणखीन एक जुना मुद्दा पुन्हा सरफेसवर आल्यासारखे झाले.

एकाने केलेला शेर दुसर्‍याला काफियानुसारी किंवा अप्रामाणिक वाटणे व पहिल्यासाठी तो बर्‍यापैकी सच्चा असणे ह्या वादाला / चर्चेला / परस्परविरोधी मतांच्या साखळीला अंत नाही. यात मध्य असा गाठता येतो की अप्रामाणिकता / प्रामाणिकता हा निकष बाजूला ठेवून निव्वळ एक शेर म्हणून इतर बलस्थाने काय आहेत अथवा नाहीत यावर चर्चा सुरू करणे!

(आय अ‍ॅम नॉट शुअर की मला जे म्हणायचे आहे ते नेमक्या शब्दात म्हणता आले आहे की नाही - जमल्यास अधिक चपखलपणे किंवा अचूक लिहीन)

कधी वीणेतुनी आलो कधी टाळातुनी आलो
तुकोबाची व्यथा घेउन तळागाळातुनी आलो

मला दोन्ही मिसरे नीट रिलेट करता आले नाहीत.
इतकेच म्हणता येईल.

<<<<एकाने केलेला शेर दुसर्‍याला काफियानुसारी किंवा अप्रामाणिक वाटणे व पहिल्यासाठी तो बर्‍यापैकी सच्चा असणे ह्या वादाला / चर्चेला / परस्परविरोधी मतांच्या साखळीला अंत नाही. यात मध्य असा गाठता येतो की अप्रामाणिकता / प्रामाणिकता हा निकष बाजूला ठेवून निव्वळ एक शेर म्हणून इतर बलस्थाने काय आहेत अथवा नाहीत यावर चर्चा सुरू करणे!>>>>

पूर्णतः सहमत बेफिजी.

वरील मुद्यावर सोदाहरण, सविस्तर लिहील्यास अभ्यासक दृष्टीकोनातुन आम्हा नवशिक्यांना त्याकडे पाहता येईल.

स्वप्नाचे आयुष्य किती,पण आयुष्याचे स्वप्न किती
स्वप्नामध्ये सुटले होते आयुष्याचे प्रश्न किती

-अभिजीत दाते

या शेरावर चर्चा होवू देत का बेफिजी ? (अभिजीतच्या पूर्व परवानगीने हा शेर इथे नमुद करीत आहे. )

प्रतिक्षेत,

-सुप्रिया.

गोड गोड बोलाल जरा तर विहंग व्हाल कदाचित
सडेतोड व्यक्तीचे येथे वटवाघुळ करतो मी

-'कणखर'

प्रामाणिक चर्चेवर प्रतिक्रिया म्हणून आलेला फेसबुकवरचा थयथयाट पाहता आता कुठल्याच शेरावर मी चर्चा करणार नाही.

बेफि, आपल्याला अपेक्षित चर्चेत भाग घेऊ शकत नसल्याने क्षमस्व!

बेफि,

आपल्या वरील प्रतिसादावरचे माझे मत आपल्या विचारपूसमध्ये थोडया वेळाने देतो.

बाप रे बाप मी दोन तीन दिवस नव्हतो तर इकडे किती गम्मत घडली
आता सविस्तर वाचून काढतो मग वाटलेच बोलायला चालू करतो ...

असो

बेफीजी धन्स Happy

ह्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला काव्य प्रकार हा काही माझा प्रांत नाही अन त्या बद्दल फारसे मला कळतं असंही नाही. गद्य लेखन अन काव्य लेखनात काही सारख्या गोष्टी आढळतात, त्यापैकीच इथे एक टाळीबाज लेखन असा उल्लेख आहे.

कधी कधी लेखक सहजपणे त्याच बाजाचे लेखन करत असतो मुद्दाम टाळीखाऊ म्हणून करत नसला तरीही त्याचे लेखन बहुधा त्याच प्रकाराचे असते, कदाचित प्रयत्न करून ही वेगळा सूर सापडत नसल्या मुळेही तशाच प्रकारचे लेखन वारंवार होत राहते.

राहिला प्रश्न टाळ्या घेण्याचा फक्त त्याच मुद्द्यावर लेखनाचा दर्जा काही ठरू शकत नाही अन ठरतही नाही. त्यामुळे त्यास फारसे महत्व नसावे.

काही लेखक सुरुवातीला तशा प्रकारचे लेखन करून नंतर चांगल्या लेखन करतीलही.

कधी कधी अगदी सहज सुंदर लिहिणा-या लेखका कडूनही तसे लेखन होऊन जाते. त्याला कुणीही लेखक अपवाद असावा असे वाटत नाही.

मला स्वत:ला तरी असे वाटते की आपले किती लेखन खरोखरीच ब-या पैकी आहे अन किती लेखन नुसतंच कोरा कागद फिक्की शाई आहे ते आपल्याला स्वत:लाच कधी लगेचच नाहीतर कधी काही काळाने तरी नक्कीच जाणवते.

धागा आणि त्यावरची चर्चा खरोखर छान झाली आहे . नवनवीन शिकायला आणि वाचायला मिळेल याची खात्री आहेच ..

धागा काढल्याबद्दल मनःपूर्वक आभार बेफिजी !
मला भिडलेले काही विशेष शेर येथे जरूर टाकत राहिल .
धन्यवाद !

फेसबूक या ठिकाणी इतके काय काय प्रकार चाललेले असतात ह्याची खरंच कल्पना नव्हती. काल रात्री बरेच काहीकाही वाचले आणि असे वाटले की इमानदारीत गझलेबाबत लिहिणे, बोलणे जवळपास अशक्य होऊन बसलेले आहे. प्रत्येक प्रतिसाद एखाद्या पर्सनल पॉलिसीचा आणि स्वार्थाचा भाग वाटू लागला आहे. हे कलुषित वातावरण बहुधा इतक्या पातळीला पोचलेले असावे की भटांच्या पश्चात जणू गझलेच्या तथाकथित जाणकारपदी पोचण्याच्या स्पर्धेत गिधाडे एकमेकांचे लचके तोडत आहेत.

एकीकडे ते तसे तर एकीकडे दीपस्तंभाची, मार्गदर्शकाची, उस्तादाची भूमिका स्वतःच स्वतःकडे बळेच ओढून घेऊन कानउघाडणी वगैरे केल्याच्या थाटात काही मंडळी वाचाळत आहेत.

सध्या एका गझलेबाबत नि:पक्षपणे / प्रामाणिकपणे चांगले बोलणे हे एका कंपूत गेल्यासारखे असणे किंवा एका गझलेबाबत नि:पक्षपणे / प्रामाणिकपणे वाईट बोलणे हे एका कंपूत गेल्यासारखे असणे आहे.

एवढे सगळे करून त्या फेसबुकावरच्या ९९% गझला बंडल आहेत आणि ऐतिहासिक मैलाच्या दगड असल्याप्रमाणे नावाजल्या जात आहेत हे आणखीन तिसरेच!

-

जयनीत ह्यांच्या प्रतिसादातले वाक्य न वाक्य पटले.

बेफि,

तेच तर!

त्या फेसबुकवर लोकांचे फॅन फॉलोईंग कसे वाढते माहीत आहे? ज्या लोकांना आपण आयुष्यात एकदाही भेटलेलो नाहीये, ज्यांचे नाव आपल्याला माहीत नाही अशा अनेक अनोळखी लोकांच्या प्रत्येक फ्रेन्ड रीक्वेस्टला अ‍ॅक्सेप्टन्स द्यायचा.

तुम्ही आम्ही ह्या भानगडीत नाही आहोत म्हणून आपल्या लिस्टमधे जेमतेम १८२ आणि २०० च्या आसपास लोक. बाकी अशा स्वंयंघोषित सम्राटांच्या लिस्टा बघाल तर ८०० नि १२००!

असो, जयनीत ह्यांनी म्हटल्याप्रमाणे मनाच्या एका कोपर्‍यात प्रत्येकाला आपली लायकी ठाऊक असते आणि नियती प्रत्येकाच्या भ्रमाचा भोपळा एकदातरी नक्कीच फोडते.

अजूनही अनेक मराट्थी रसिक इतकेच काय शायरलोकही शेराना शेर म्हणून पाहू शकत नाहीत म्हणून घोटाळा होतो सगळा बाकी काही नाही
लागेल सवय हळू हळू असो !!!

मी तर तुम्हा सगळ्या मंडळीचा पंखा आहे,मायबोलीवर फारसा लाॅगिन नसतो..पण इथलं सगळं वाचत राहतो अनाहुत पाहुण्यासारखा..इथल्या सगळ्या गजला वाचून मीही सहा महिण्यापुर्वी गजलेच्या प्रेमात पडलो..
प्रेम फुलते आहे..शिकतो आहे..चुका करतो आहे आणी तुमच्यासारख्यांच्या सांगण्यावरुन त्या निस्तरतोही आहे..तुम्हा सर्व मंडळीच योगदान मराठी गजलेला निर्विवाद आहेच..
असच लिहित रहा.. आमच्यासारख्या नव्यांनाही शिकवत रहा.. Happy

मी नविन असल्यामुळे फेसबुकवर बाकी गझलकारांचे फॅन्स फाॅलोअर कसे वाढताहेत हे कदाचित सांगु शकेल..फेसबुक हे प्रभावी माध्यम आहे मान्य..कोणीही सहज अकाऊंट उघडून आपल्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या व्यक्तींच्या संपर्कात जाण्याचा प्रयत्न करतो वा रिक्वेस्ट करतो..मायबोली तथा इतर साईटसवर दर्जेदार लेखन असते,तितकच फेसबुकवर..पण ह्या साईटस बहुंताश मोबाईलधारकांसाठी फेबुपेक्षा जिकिरीच्या... मी मायबोलीवर मागिल वर्षापासून येतोय..आणी इथल्या साहित्य वाचुनच माझंही सहा महिण्यापासून गझलेवर प्रेम बसलयं,शिकतोय,लिहितोय,चुकतोय तुमच्यासारख्यांच्या सांगण्यावरुन चुका निस्तरतोही...
नविन फेबुवर गजल लिहिणारे सर्वप्रथम नावाजलेल्या वा आपल्यापेक्षा चांगल लिहिणार्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात..यात नविन लोकांचा काय दोष??गझलेतले खाचखळगे कळायला वर्ष वर्ष जावी लागतात..आम्हाला सहा महिण्यात कसं कळेल? त्यामुळे साहजिकच कोणाचातरी हात धरावा लागतो,आधार शोधावा लागतो..मीही तेच केलं,करतोय..जवळपास इथल्या सर्व मंडळीशी फेबुवर मी कनेक्ट आहेच ...
त्यामुळे माझं प्रांजळ मत नविन लोकांना तो या कंपूत आहे किंवा त्या कंपूत आहे म्हणुन टाळू नका..तुम्हाला ज्याच्या लेखनात पोटेन्शियल आढळतं त्याला जरुर उजेड दाखवा..आम्हाला काय प्रत्येकजन हवाहवासा आहेच..साहजिकच फेबुवर आमच्यासारख्या नव्हाळीच्या लोकांमुळे कैकांची फ्रेन्डसंख्या वाढते...
काही चुकलंमाकलं असेल तर उदार मनाने क्षमा करा..

चर्चा संयमाने घडते आहे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. अशीच घडावी ही अपेक्षा.

काहींनी पोटतिडिकेने मुद्दे मांडले, काहींनी त्यातील काही मुद्द्यांचे संयम राखून खंडन केले.
अशीच चर्चा व्हायला हवी. पण गेल्या काही पोस्टपासून चर्चा काहीशी विचलित (deviate) होते आहे
असे जाणवले. फेसबुक किंवा इतर संस्थाळावरील घडामोडी हा चर्चेचा मूळ विषय न राहता

१. मराठी गझलेचा कसकसा विकास होत आहे याची स्वत:ला आलेली प्रत्यंतरे, अनुभव येथे नोंदवायला लागू.

२. उत्तम शेर (मग ते कोणाचेही असोत, फक्त मराठी व तांत्रिकदृष्ट्या शुद्ध असायला हवेत) नोंदवू व ते का आवडले ते लिहू. 'का आवडले नाहीत' अश्या स्वरुपाच्या मतांचेही स्वागत पण चर्चा संयत ठेवू.

३. मराठी गझल क्षेत्रातील नवीन डेव्हलपमेंट्स (काही झाल्यास) येथे नोंदवू.

बेफिकीर यांनी सुचविलेल्या वरील मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित व्हावे असे वाटते.

======================================================================
“अजूनही अनेक मराट्थी रसिक इतकेच काय शायरलोकही शेराना शेर म्हणून पाहू शकत नाहीत म्हणून घोटाळा होतो सगळा बाकी काही नाही लागेल सवय हळू हळू असो.” >>> वैवकुंच्या प्रतिसादातलं हे वाक्य वाचल्यावर मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, जी शायरांशी संबंधित नसून रसिकांशी संबंधित आहे.

कित्येक रसिक गझला ऐकतात, आस्वाद घेतात, त्यांच्याकडे मोठमोठ्या गायकांनी गायलेल्या गझलांचे कलेक्शन देखील असते. पण त्यांच्यातील अनेकांना गझल म्हणजे काय हे माहितच नसते. बरेच रसिक, गझल म्हणजे विशिष्ट प्रकारे संगीतबद्ध केलेल गीत असेच समजत असावेत असे धाडसाने म्हणावेसे वाटते.
एक उदाहरण देतो : मासूम या सिनेमातली "तुझ से नाराज नहीं, जिंदगी हैरान हूँ मैं" ही रचना गझल आहे असे एक संगीतप्रेमी रसिक मित्र मला परवा सांगत होता.

गझलकारांनी आणि गझलेबद्दल प्राथमिक माहिती असलेल्या माझ्यासारख्या सामान्य रसिकांनी
गझल हा काव्यलेखनाचा एक विशिष्ट प्रकार आहे ही प्राथमिक माहिती सामान्य रसिकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे वाटते.

असो ..... काही चुकीचे बोललो असल्यास क्षमस्व !

गझल हा काव्यलेखनाचा एक विशिष्ट प्रकार आहे ही प्राथमिक माहिती सामान्य रसिकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे वाटते.>>>

अगदी योग्य तो मुद्दा मांडलात उल्हासजी. एनीवे, काही वर्षांपूर्वी गझल हे गझलगायकाचे माध्यम आहे असे समजले जायचे पण हल्ली हा विचार मागे पडत असून ते कवीचे माध्यम आहे हे लोकांना समजायला लागलेले आहे.

ह्या पार्श्वभूमीवर नेहमी गायक संगीतकारांपेक्षा जास्त मानधन घेणारा 'साहिर' आठवल्याशिवाय राहत नाही.

बेफिकीर, जोडाक्षरान्त(ज्यातले पहिले अर्धे व्यंजन बदलू शकते) अशा काफियाबद्दल वेगळा काही नियम नाही का? नसेल तर त्याची गरज नाही का? (जसे तिथे साध्य आणि आद्य यात य कायम आहे तर ध् आणि द् बदलत आहेत.) मायबोलीवरही अशीच एक गझल वाचल्याचे आठवते.

Pages