थोडी पार्श्वभूमि...........
माझ्या लहानपणापासून घरात व्यायाम आणि योग्य आहार यावरच भर असल्याने मीही साधारणपणे मुलांना याच सवयी लावल्या, किंबहुना त्या त्यांना लागल्या. जश्या आपापल्या आईच्या, घरात पूर्वापार चालत आलेल्या, बर्याचश्या गोष्टी आपण पुढे नेतो.
माझ्या मुलांना लहानपणापासून सर्दीखोकल्यावर लेंडीपिंपळी आणि इतर काही जिन्नस घालून केलेला काढा, पोट बिघडल्यावर बेलफळाचा मुरंबा, असंच काही देत आल्याने माझी लेक उसगावातही शक्यतो याचाच उपाय करते.
माझा जावई (त्याचे वडील अॅलोपॅथीचे डॉक्टर असल्याने) आधी बायकोची चेष्टा करायचा. "त्या लेंड्या बिंड्या तूच घे. मला नको ते" इ.इ. पण हळूहळू त्यालाही कधी लागलंच तर हेच उपाय सूट व्हायला लागले. आता तिकडे पाठवण्याच्या सामानाच्या लिस्टमधे "लेंडीपिंपळी" असतेच.
आता किस्सा:
माझ्या लेकीच्या ऑफिसला येण्याजाण्याच्या वेळी लिफ्टमधे एक साधारण समवयस्क मुलगी तिला बर्याच वेळा दिसायला लागली. काही महिने असेच गेल्यावर मग "हाय हॅलो" झालं. हळूहळू हसणं बोलणं सुरू झालं. एकमेकींची नावं, सेल फोन नंबर्स विचारून झालं. काधी तरी संध्याकाळी एकत्र बाहेर कॉफी झाली.
ती मुलगी इजिप्शियन होती. नाव "नोहा".
मधे २/३ दिवस काही त्या भेटल्या नाहीत. कारण नोहा कुठे दिसलीच नाही. २/३ दिवसांनी लिफ्टमधे त्या भेटल्या तर ही नोहा सर्दी खोकल्याने त्रस्त होती. लेकीने चौकशी केली.
तर म्हणाली," २/३ दिवस झोपूनच होते. आता डॉक्टरकडे जावं की काय विचार करतीये. आज ऑफिसला जायलाच पाहिजे."
संध्याकाळी परत लिफ्टमधे गाठ! पण नोहाला काही डॉक्टरकडे जायला जमलं नव्हतं.
मग लेकीचा दुसर्याला मदत करण्याचा स्वभाव अगदी उफाळून आला. तरी तिला जावई(माझा) नेहेमी म्हणायचा ,"या तुझ्या होम रेमेडीज इथे अमेरिकेत उगीच कुणाला सुचवू नकोस बरं!"
तरी ती नोहाला म्हणाली, " नोहा, माझ्या जवळ एक होम रेमेडी आहे, तुला चालणार असेल तर मी देईन तुला."
नोहा म्हणाली.........चालेल.
लेकीने लेंडीपिंपळीचा काढा केला. आणि नोहाला नेऊन दिला. मध्ये एक दिवस गेला. तिसर्या दिवशी संध्याकाळी नोहा फोन करून माझ्या लेकीकडे आली. एकदम फ्रेश दिसत होती.
हातात एक डेकोरेटेड छोटी गिफ्ट बास्केट......रिबन्स, बो, वगैरे लावलेली.
नोहा म्हणाली, "तुझी होम रेमेडी अगदी जादुई होती हं! मी एकदमच बरी झाले."
मग त्यांच्या गप्पा झाल्या. आणि तिने ती बास्केट लेकीला गिफ्ट दिली. त्यात "पम्प्किन स्पाइस"च्या कॅन्ड्लस होत्या. आणि हे ग्रीटिंग कार्ड.
काढ्याची रेसिपी:
४ कप पाणी, ४/५ मिरे, ४/५ लवंगा, १ च. धणे, १/२ च. जिरे, २ वेलदोडे, १तमालपत्र, एक छोटा दालचिनीचा तुकडा, १छोटा आल्याचा तुकडा खिसून किंवा चिमूटभर सुंठ, थोडा गवती चहा(एखादा शूट) , ५/६ तुळशीची पाने, एक खारीक आणि........ ७/८ लेंडीपिंपळ्या! ( हे कसं वाटत?...परेश रावल, बिंदू, जॉनी वॉकर, प्रेम चोप्रा आणि .........................शाहरुख खान!)
हे सर्व उकळायला ठेऊन याचे साधारणपणे ४ कपाचे २ कप होईपर्यंत उकळावे. म्हणजेच निम्मे करावे.
आता या तयार २ कप काढ्यात चवीप्रमाणे गूळ घालावा.
गाळण्याने गाळून घ्या. आता हे मिश्रण दिवसात ४/५ वेळा थोडे थोडे गरम गरम घ्यावे. आवडत असल्यास घेतेवेळी थोडे दूध घालावे.
यातली शिजलेली खारीक खाऊन बघा. बाकी गाळण्यातले इन्ग्रेडियन्ट्स पुन्हा १/२दा मी उकळते. व याचाही काढा म्हणूनच वापर करते. व नंतरच गाळ टाकून देते.
शेवटचा डोस अगदी झोपायच्या आधी घ्यावा. आणि पांघरुणात गुर्गुटून झोपावे(:स्मितः). .........शक्यतो हा काढा घेतल्यावर अंगावर वारे घेऊ नये.
आणि मुख्य म्हणजे एखादा इन्ग्रेडियन्ट नसल्यास त्याव्यतिरिक्त काढा करावा.
हा काढा कुणीही वैद्यांनी वगैरे प्रिस्क्राइब केलेला नाही. पण याचा फायदा नक्कीच होतो.
एक टीपः जर हा काढा घेतल्यावर पोटात थोडं गरम वाटलं तर डोस डायल्यूट करावा.
२ चमचे डिकॉक्शनमधे अर्धा ग्लास पाणी घालून अगदी गरम गरम प्या. मी यात दूध घालत नाही.
लेंडीपिंपळीचा काढा..............एक किस्सा!(काढ्याच्या रेसिपीसह)
Submitted by मानुषी on 15 November, 2013 - 04:50
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त अनुभव. रेसिपी पण दे
मस्त अनुभव. रेसिपी पण दे प्लीज
ओ, ग्रेट.... खरंच सगळी रेसिपी
ओ, ग्रेट.... खरंच सगळी रेसिपी व्यवस्थित दे बरं इथे .....
मानुषी, अर्णवला लहानपणी
मानुषी, अर्णवला लहानपणी गुटीमध्ये हे उगाळून द्यायचे. पण उशीरा सुरूवात केली गुटी द्यायला. (साबा म्हणालेल्या असले "गावठी" उपचार नको करूस ) पुढे पुढे वेळेअभावी फारसं शक्य नाही व्हायचं गुटी देणं. त्याला वरचे वर सर्दी कफ व लो इम्युनिटीचा त्रास होतो. दूध विशेष पचत नाही सुरूवातीपासूनच. नाचणी सत्वही जास्त देता येत नाही या कफाच्या प्रॉब ने. प्रकृती तशी अगदी तोळामासा नसली तरी वरचे वर सर्दी-खोकला होतोच. वजनही कमीच आहे तुलनात्मक.
व्हेज, नॉनव्हेज सूप्स आवर्जून देतेच आहे.
सध्या सर्दी झाली की आळशीचा काढा देते. पण प्लीज जर लेंडीपिंपळीचा काढा आणि पोटदुखीवरचं औषध सविस्तर (मात्रेसह व रेसिपीसह) सांगितलंस तर खरंच खरंच खूप बरं होईल. प्लीज.
पण प्लीज जर लेंडीपिंपळीचा
पण प्लीज जर लेंडीपिंपळीचा काढा आणि पोटदुखीवरचं औषध सविस्तर (मात्रेसह व रेसिपीसह) सांगितलंस तर खरंच खरंच खूप बरं होईल. प्लीज. +१०००००००००
माझ्या लेकीला पण वरचे वर सर्दी-खोकला होतोच. प्लीज काढयाची रेसीपी द्या.
काढ्याचा किस्सा
काढ्याचा किस्सा आवडला!
ड्रीमगर्ल, तुम्ही तुमच्या मुलाबद्दल लिहीले आहे ते कमीअधिक फरकाने सगळ्याच मुलांचे असेच असते! अनेकदा सर्दी-खोकले-ताप होऊन प्रतिकारशक्ती वाढते. फार काळजी करू नका. तुमच्या साबांचे गुटीला गावठी म्हणणे हास्यास्पद आहे.
छान किस्सा आहे.
छान किस्सा आहे.
मस्त लेख! आता पब्लिक डिमांड
मस्त लेख! आता पब्लिक डिमांड नुसार हा काढा बनवण्याची साग्रसंगित माहिती लवकरात लवकर द्या बरं
मस्त किस्सा .
मस्त किस्सा .
मस्तच मानुषीताई, रेसिपी हवीच.
मस्तच मानुषीताई, रेसिपी हवीच.
इथे काढ्याची कृती दिलीत तर
इथे काढ्याची कृती दिलीत तर आरोग्य / आयुर्वेद अशी शब्दखूण टाकायला विसरु नका.
नाहीतर वेगळा धागा काढून इथे लिंक देणं बरं.
सर्वांना धन्यवाद. खास
सर्वांना धन्यवाद.
खास लोकाग्रहास्तव काढ्याची रेसिपी वरच दिली आहे.
बाकी बेलफळाचा मुरंबा मी स्वता: कधी केलेला नाही. माहेरी बेलाचे झाड आणि त्याला खूप बेलफळे येतात. आधी वडील मुरंबा करायचे. आता वहिन्या करतात. मी तिकडून आणते. पण आता नीट रेसिपी विचारून इथे देईन. पण पिकलेले बेलफळ घेऊन त्यातला गर काढून त्यात साखर मिसळून गॅसवर चांगला ढवळत ठेवावा आणि जॅम/मुरंब्यासारखा शिजवावा. अशीच काहीशी रेसिपी आहे.
मस्त आणि त्या शेजारणीचा
मस्त आणि त्या शेजारणीचा थॉटफुलनेस पण आव्डला.
(१)काढा आणि हाताचा गुण येतो .
(१)काढा आणि हाताचा गुण येतो . लेंपि चा काढा नाही जमल्यास चिमुटभर त्रिकटु (तयार मिळते)घ्यावे .धुळीच्या अॅलर्जिच्या सर्दिवर मात्र कोणतेही उष्ण औषध लागू पडत नाही (२) .बेलमुरब्बा जो औषधाच्या दुकानात मिळतो तो बहुतेक पाडाला आलेल्या (पिकायच्या अगोदर) बेलाचा असतो ।दाहक औषधांबरोबर (अॅलोपथिक सुध्दा) घेण्याचे अनुपान आहे .त्यामुळे आतड्यातील व्रण बरे होतात ,रक्तस्त्राव थांबतो .(शंकराला हालाहल विषाने दाह होऊ लागला तो बेलाने थांबला -पौराणिक संदर्भ
मस्त किस्सा. काय या
मस्त किस्सा.
काय या मायबोलीकरांना म्हणावं किस्सा लिहिला तर लगेच म्हणे रेसिपी द्या. हे द्या न ते द्या. श्या:!
मानुषी, जरा लेंडीपिंपळीचा फोटो दे बरं.
लेंडीपिंपळी म्हणजे काय ?
लेंडीपिंपळी म्हणजे काय ?
मस्त किस्सा
मस्त किस्सा मानुषीताई.
@दीपांजली Piper longum म्हणून शोध.
थँक्स तोषवी! पाहिल्या गुगल
थँक्स तोषवी!
पाहिल्या गुगल इमेजेस..कधी ऐकलं पाहिलं नवह्तं हे इतके वर्षं भारतात राहून!
काय सांगतेस दिपांजली.माझ्या
काय सांगतेस दिपांजली.माझ्या आईने फक्त पिंपळीचा काढा देऊन लहानपणी वात आणला होता. ती थोडी चरचरीत लागते जीभेला...काश तेव्हा आईला अशी डिटेल रेसिपी मिळाली असती...
पुढच्या ट्रीपमध्ये ही आणेन बहुतेक्..अम्रेरिकेत मिळते का कुठल्या वेगळ्या नावाने?
हा काढा आई मला पण देत होती
हा काढा आई मला पण देत होती लहानपणी बहुतेक, पण कळयला लागल्यापासून त्या नावामुळं मी तो घ्यायला साफ नकार द्यायचे हे पक्कं आठवतंय. ;). मग आईने तो नाद सोडला.
याला जरा अॅट्रॅक्टीव नाव द्यायला काय झालं होतं पूर्वीच्या लोकांना.
मामे..................! यू आर
मामे..................!
यू आर म्हणजे अगदी खरंच टू मच हं!
देते हं फोटो!
अरे वा बर्याच मुलींना लहानपणी मिळालेला दिसतोय काढा.
तोषवी धन्यवाद नावाबद्दल. तुझं काय मत आहे या काढ्याबद्दल .....लिहिशील?(एक्स्पर्टस ओपिनियन!)
पोटदुखीवरचं औषध>>>>>>१)
पोटदुखीवरचं औषध>>>>>>१) ओवाअर्क म्हणून विकत मिळते.
२)आले,लिंबाचा रस सम प्रमाणात करून त्यात काळे मीठ घालून देणे.
३)आले-कांद्याचा रस सकाळी अनशापोटी घेणे (जंतासाठी)
ही घ्या लेंडी पिंपळी.
ही घ्या लेंडी पिंपळी. माझ्याकडे आहे स्टॉकमध्ये. बहुतेक आकारामुळे लेंडी नाव् पडले असेल. नुसती पिंपळी पण असते.
मानुषी, तु टाकल्यावर लगेच मी वाचलेला तुझा लेख आणि काढ्या ची रेसिपी मागायचा अग्दी मोह झालेला. पण तेव्हा तो कसाबसा आवर ला. म्हटले ललित लेखनातही कुठे जोगवा मागत बसणार...:)
माझी आईही असा काढा कराय्ची . फक्त लेंडी पिंपळी नसायची. ती त्याच्याजागी कांदा घालायची.
घरात लेकीला कायम्सर्दी झालेली असते. तिला तो कांदावाला काढा नको असतो. आता हा देऊन बघेन.
बेलफळाचा मुरब्बा, मुरांबा हे
बेलफळाचा मुरब्बा, मुरांबा हे पोटातील ( आतड्यांच्या विविध समस्यावर ) फारच परिणामकारक आहे.
मानुषी शतशः धन्यवाद
मानुषी शतशः धन्यवाद रेसिपीबद्दल योग्य वेळी मिळाली. मुंबईत थोडे थंड कोरडे वारे वाहू लागलेत आणि पिल्लूची नाकगळती ही चालू झालेय.
माझा भरवसा नेहमीच या "गावठी" उपचारांवरच असतो. कारण याचा उशीरा का होईना हमखास येणारा गूण आणि नो साईड इफेक्ट्स. आम्ही तिघंही भावंडं ३-३ वर्ष गुटीवर वाढलेली मुले आहोत (ज्यात बदाम खारके बरोबरच सागरगोटा, वेखंड, लेंडीपिंपळी, जायफळ, मायफळ, ज्येष्ठीमध, सांबारशिंग, डिकेमाळी असे सगळे प्रकार होते.)
अरे वा सगळे घटक आहेत घरात. गवतीचहा ही आणलाय ताजा.
काही शंका आहेत.
१) यात बरेच गरम मसाले वापरले आहेत. हे प्रमाण मोठ्यांच्या काढ्यासाठी आहे ना?
२) लहान मुलांनाही (२ वर्षांच्या आतील - अर्णव २२ महीन्यांचा आहे) हेच प्रमाण चालेल की घटकांचे प्रमाण वेगळे घ्यायचे?
३) की घटक तेच ठेऊन तयार काढा पाणी/दूध टाकून डायल्यूट करून द्यावा.
४) मुलांसाठी हेच सगळे घटक घ्यायचे की यापैकी कुठले बदलावे...
५) हा काढा पाण्याएवजी दूधात तयार केला तर चालू शकेल का?
६) लहान मुलांना या काढ्याचा किती डोस द्यावा आणि किती वेळा?
हा प्रकार (लेंडी पिंपळी )
हा प्रकार (लेंडी पिंपळी ) कुठे मिळतो? कधी नाव पण ऐकल नाही
शरी कुठल्याही आयुर्वेदिक
शरी कुठल्याही आयुर्वेदिक स्टोअर मध्ये मिळेल. दादरला तर कित्येक आहेत. रानडे रोडवरील भानुपद्म मध्ये किंवा अंधेरी वेस्टला स्टेशन जवळ आहेत आयुर्वेद दुकाने तिथेही मिळेल. शक्यतो बाळांच्या गुटीच्या सामानात असते.
ड्रीमगर्ल अगं मला वाटतं हे
ड्रीमगर्ल
अगं मला वाटतं हे प्रमाण तू पाणी जास्त आणि मसाल्याचे पदार्थ अगदीच कमी असं दे. सुरवातीला अगदीच डायल्यूटेड असा दे हा काढा. कारण अर्णव लहान आहे. आणि काढा दुधात करण्यापेक्षा पाण्यात करून थोडं दूध घालावं. तरी इतक्या लहान पिल्लासाठी मी काही सुचवणं ही मला रिस्क वाटते. तर तू कुणा वैद्यांचा सल्ला या काढ्यासंदर्भात घेतला तर बरं. इथेही बरेच जाणकार आहेत. असो....विपू पाहिलीस का?
साधना धन्यवाद(फोटोबद्दल).
मानुषी धन्यवाद
मानुषी धन्यवाद प्रतिसादाबद्द्ल. विपू नाही पाहीली. बघते.
सध्या तर त्याला आळशी, तुळशी, वेखंड, ज्येष्ठीमध आणि खडीसाखर यांचा काढा आणि ४-५ चमचे आलं-गवतीचहा टाकलेला चहा देतेय. त्याची प्रतिकारशक्ती खूप नाजूक असल्याने वरचेवर सर्दी कफ असतोच. वजनही कमी आहे त्यामुळे सतत टेन्शन ची टांगती तलवार. असो. माझ्या आईला विचारून बघते. गुटीचं साहित्य आणि आळशीचा काढा तीनेच सांगितलेला. मला वाटलेलं लेंडीपिंपळी पोटाच्या विकारांवर असते. म्हणजे पचनशक्ती आणि जंत व गॅसेस होऊ नये म्हणून लेंडीपिंपळी, वावडिंग देतात. असो. पण खरंच धन्स मनापासून लवकर टाकलेल्या रेसिपी आणि प्रतिसादाबद्दल. त्याला नाही तर मी करून पीत जाईन. आम्हीपण सर्दीचे भोपळे
ड्रीमगर्ल पांढरा कांदा,अळशी(
ड्रीमगर्ल
पांढरा कांदा,अळशी( भा़जून),५-६ तुळशीची पाने, १ लवंग,२ मिरी,ज्येष्ठीमध, आले ,खडीसाखर/ साखर/गूळ घालून १ ग्लासाचा अर्धा ग्लास होईपर्यंत उकळावे. दिवसातून ३-४ वेळा हा काढा घ्यावा.कणकण असेल तर पारिजातकाचे पान घालावे.
छान!
छान!
Pages