मसीहा

Submitted by बागेश्री on 5 November, 2013 - 06:38

तू माझ्यातली संवेदनशीलता
परतवून दिलीस,
जगताना हरवलेली..

जणू जत्रेतून,
वाऱ्यावर गोल फिरणारं चक्र घेऊन दिलंस,
मी धावतेय,
हात उंचावून...
आशेच्या नव्या वाऱ्यावर रंगीत चक्रही गरगरतंय..
माझ्यातला रुक्षपणा माझ्याच अनवाणी पायाखाली उडतोय,
धूळ होऊन!

कित्येक दिवसात असं मुक्त धावले नव्हते..
कपड्याचं भान नको,
रस्त्याचं नको, काट्याकुट्यांच नको...
दिशेची तमा नाही,
सुसाट धावणं...

डोळ्याच्या कडा आज जरा ओलसर,
कोरड्या गालांवर मृद्गंध फ़ुलतोय..
हृदयाची धडधड ऐकू येण्याइतपत
जिवंतपणा जाणवतोय...

गती थोडीही कमी न करता आता तुझ्या दिशेने निघालेय,
माझं असं रूप तुझ्या डोळ्यांत पहायचंय...
धाव थांबली तरी भिरभिरणारं रंगीत चक्र तुला दाखवायचंय...

जत्रा पांगली तर नसेल ना?

आता डोळ्यातनं जे खळतंय ते तुझ्यासाठीचं काही आहे....
ते न बघता जाणार नाहीस ना..

चमत्कारापूरती जीवनात येतात काही माणसं
तू त्यातला नाहीस ना

अजूनही थांबून आहेस ना?

-बागेश्री
(मराठी कविता समूहाच्या 'कविता विश्व दिवाळी विशेषांक २०१३' मध्ये प्रकाशित)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता सुंदर आहे......
चर्चा विखारी झाली नकोशीच वाटते...
पण, बागेश्री ह्यातून योग्य ते निवडेल, ह्याची खात्री वाटते.
कविता गद्याकडे जास्त झुकली आहे व बरेचदा झुकते; असं मला वाटतं आणि माझ्या मते ते स्वतः बागेश्रीलाही मान्य असावं. ही इतकीच गोष्ट प्रयोगशीलतेस आणखी चालना देण्यासाठी पुरेशी आहे, नाही का ? आता प्रयोगशीलता म्हणजे फक्त 'वृत्तात लिहिण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे'च नव्हे. तसे आनंदकाकांचे म्हणणे मला पटले नाही. आपल्या आवडीच्या आकृतीबंधातच राहून नवनवीन प्रयोग केले जाऊ शकतातच की ! आणि फॉर दॅट मॅटर, प्रयोग म्हणून वृत्तहाताळणीत काय प्रॉब्लेम आहे? इतकं काही टाकाऊ नाही ना ते ? किंवा कालबाह्य नाही ना ?
असो.. 'बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना' होतंय..

मला कविता आवडली आणि बागेश्रीच्या प्रयोगशीलतेवर विश्वास आहे... त्यामुळे मनापासून शुभेच्छा!!
Happy

चू. भू. दे. घे.

योग Lol

जत्रा पांगली तर नसेल ना?

आता डोळ्यातनं जे खळतंय ते तुझ्यासाठीचं काही आहे....
ते न बघता जाणार नाहीस ना..

इथे माझ्यासाठी ही कविता संपते, हा मला भावलेला परमबिंदू .

सुंदर लिहिले आहे बागेश्री.

वाद जुनाच .मुक्त:छंद सतत हाताळताना कवीतला नाटककार जागतो, त्याच्यातल्या कवीवर मात करतो हेही माझे अजून एक मत.

मुक्त:छंद सतत हाताळताना कवीतला नाटककार जागतो, त्याच्यातल्या कवीवर मात करतो हेही माझे अजून एक मत.<<<<< अतीशय मौलिक मत !!! पटलेच

अनेकदा चर्चिला जाणारा विषय, तोच विषय, भारत पाकिस्तान मॅच सारखा रंगतो मात्र. Happy
वृत्तबद्ध आणि मुक्तछंद अशी काव्यप्रकारात दोन भिन्न लॉबीज का पडल्यात हेच कळत नाही. काव्यातील भिन्न प्रकार म्हणून दोन्ही किती अ‍ॅडोरेबल आहेत खरं तर.
मी स्वतः वृतबद्ध लिहीत नाही परंतू वृत्तातल्या कविता, गज़ला वाचायला त्यावर मनापासून दाद द्यायला मला प्रचंडच आवडतं. शेवटी रचनेतलं काव्य महत्त्वाचं, नाही का?

भारती ताई, तुमचा मुद्दा सुंदर आहे.
तो किंचीतसा बदलून मला जे वाटतं ते असं-
कवीतला नाटककार कवीवर मात करून जातो, तेव्हा साकारतं, ते स्फुट!

काळ बदलला, पिढ्या उलटल्या, व्यक्त होण्याचे माध्यम बदलत गेले, पत्रापासून ते व्हॉट्स अ‍ॅप पर्यंत संवादांचीही माध्यमे बदलली, गद्य कथांमधील कथाबीजं बदलली.. पण काव्यप्रकारात व्यक्त होताना जून्या आखून दिलेल्या फॉर्मात लिहीले नाही की तो बाद आहे म्हणणे नाहीच बदलणार का. काव्यमय आशय मिळणे, तो अनुभव रसिक वाचकाला तरल करून जाणेही कविता वाटावी.

वृत्तातल्या कविता माझा प्रांत नाही, त्यावर मी वक्तव्य करणे ठार चूकीचे आहे, परंतू, कविता करणे व कविता सूचणे ह्यात फरक आहे. ती मांडताना त्या भावनेशी प्रामाणिक राहणेही महत्त्वाचे व त्यातील उत्स्फूर्तता ही महत्त्वाचीच.

राहता ताहिला कळीचा मुद्दा.. मी नेमकं काय लिहीते ह्याचा.
वैभव मला कायम म्हणतो त्याप्रमाणे.. माझं लिखाण गुणगूणण्याप्रत नसतं.. हो नसतंच.. मान्य आहे! म्हणून ते काव्यप्रकारातून बाद आहे, असं मला वाटत नाही. कविकल्पना त्यात असतात की नाही हे वाचकवर्गाकडून, रसिकांकडून, जाणकारांकडून कळतं..

मी आधीही म्हटलं होतं... यमकं घालून अधिक लयीत आणून नीटसं सजवून सादर केला तर मुक्तछंद डौलदार होईलच.. पण मला सुचणारा हा फॉर्म उंच पायर्‍यावरून धडधडत उतरत यावा असा उत्स्फूर्त उतरतो... ते लिहीताना मागची पायरी कशी होती, पुढची एक सोडावी का असे सगळे हिशोब येत नाहीत (ह्याचा अर्थ संस्करण करावे/ करू नये- हा विषय कृपया छेडू नये, कारण संस्करण हा अपरिहार्य भाग आहेच)

प्रयोगशीलतेबाबत असं वाटतं रणजित,
मी ह्याच फॉर्म मध्ये/ फ्री वर्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झाले आहे, तुझी इच्छा झालीच तर काही लिंक्स देईन.
उपलब्ध प्रत्येक वृत्तात एक कविता करून पहाणे म्हणजेही प्रयोगशीलता नसावी, असं मात्र वाटतंय बघ.

लिहीती राहत हा फॉर्म बहरेल, न जाणो पुढे जाऊन यमके येतील, लयबद्धता वाढेल वा वाढणार नाही, नेव्हर क्नो!
पण हा फॉर्म माझी ओळख होतो आहे, आपण सारे आहोतच सोबत, पुढे काही वर्षांनी पुन्हा चर्चा करू तेव्हा बोलूयाच!

सगळ्या दोस्तांचे आभार Happy
 

काव्यप्रकारात व्यक्त होताना जून्या आखून दिलेल्या फॉर्मात लिहीले नाही की तो बाद आहे म्हणणे नाहीच बदलणार का.
>> असं नको होतंस बोलायला. कदाचित मीच जास्त बोललो असेन. असो.

माहीत असलेल्या साहीत्यप्रकारांच्या व्याख्या कुणी इथे लिहू शकेल का प्लीज म्हणजे सगळ्यांनाच तपासून पहाता येईल.

किंवा शास्त्राचा संदर्भ दिल्यास उत्तम.

माझ्या मते मयेकर ह्याच्यावर चांगले भाष्य करू शकतील.

या लिखानाला कविता का म्हणायचे? निबंध किंवा ललितलेखन का म्हणू नये हे कुनी समजावून सांगेल का? किंवा कथेतील एखादा प्रसंग म्हणता येईल पायजेल तर! पण कविता? नो नो नेव्हर Angry

माहीत असलेल्या साहीत्यप्रकारांच्या व्याख्या कुणी इथे लिहू शकेल का <<< Proud

आपल्याला व्यक्त व्हायचे आहे त्याकरिता आपण लिहिले आहे आपण भावूकपणे व्यक्त झालो की काव्य झाले ...आपल्या भावना प्रकट करून झाल्या की कविता झाली .....

साफ चुकीचे विचार आहेत !!

कविता हा साहित्यप्रकार आहे त्याचे काही गुणधर्म आहेत
लोकांना भावूक व अंतर्मुख वगैरे एखद्या कादंबरीच्या एखाद्या वाक्यानही करता येतं कविताच का लिहायची किंवा लिहिलेले शब्द कविता आहेत असं का म्हणायचं?

मुक्त म्हणजे अगदीच निर्बंध नव्हे जसे स्वस्त म्हणजे फुकट नव्हे

हा फॉर्म जो काही आहे तो कविता नाही असे माझे मत अजिबात नाही आहे कृ गै न पण हा मुक्तछंद आहे असेही मला वाटत नाही

बगेश्री तू एक काम कर
हा जो काही फॉर्म तुझ्या हाती लागला आहे त्याच्या गुणधर्मांचा तूच तपास कर हा फोर्म फार कमी जण हाताळत असावेत मी तरी तुझेच लेखन असे पाहिले आहे हे काहीतरी दुर्मीळ असे आहे असे माझे मत आहे ह्याच्या गुणवैशिष्ठ्यांच्या नेमक्या नोंदी होणे अश्यावेळी गरजेचे ठरते ...ह्या प्रकाराचे स्टँडर्डायझेशन व्हायलाच हवे ..त्याचे रिपोर्टिंग व्हायला हवे ...हे काम कोणी आधी केले असेल तर त्यचा शोध घ्यायला हवा
हा मुक्तछंद नक्कीच नाही ...त्याच्याही पुढचे काहीतरी आहे हे
पण हे अगदीच निर्बंध वगैरेही नाही इतके नक्की

बेफीजींचा एक शेर आहे

वेगळे असणे मुळीचच वेगळे नसते
बद्धतेपासून काही मोकळे नसते

ह्या काव्यबंधाचे नेमके बद्धताबिंदू काय आहेत ह्याचे संशोधन व त्यावर संस्करण व्हायलाच हवे ........हे तूच करावेस असे मला वाटते

बाकी काही मला कळत नाही पण एक नक्की की विठ्ठलाची तुझ्यावर काहीतरी खास मर्जी आहे..त्याल हे जे काही जसे म्हणून पाहिजे आहे ते तसे करणे त्याने तुझ्याकडेच सोपवलेले आहे .........
असो
मी चाललो झोपायला गुड नाईट ...........

<<<माहीत असलेल्या साहीत्यप्रकारांच्या व्याख्या कुणी इथे लिहू शकेल का>>>

एक सोपी व्याख्या नक्कीच करता येईल. जी लयबद्ध असते ती कविता किंवा पद्य; आणि इतर सर्व गद्य!!

हा नवीन काव्यप्रकार आहे, असं अनेकदा वाचलं वरील चर्चेत. मोडता घालतोय, पण क्षमा करा.... माझ्या मते हा नवीन काव्यप्रकार नाहीये. कुठलाही नवीन काव्यसंग्रह उघडून पाहिल्यास हाच आकृतिबंध आढळेल. बागेश्रीची अभिव्यक्ती निराळी आहे. एकप्रकारचा आडमुठेपणा व अकारण बंडखोरीचा आव आणणार्‍या आजच्या कवितेपासून तिची कविता वेगळी वाटते.
'फॉर्म' नवीन नाहीये, उद्गार वेगळा आहे......... असं मला वाटतं.

वैभू,

>>मुक्त म्हणजे अगदीच निर्बंध नव्हे जसे स्वस्त म्हणजे फुकट नव्हे<<

क्या बोलाय! हॅट्स ऑफ!!

हा फोर्म फार कमी जण हाताळत असावेत मी तरी तुझेच लेखन असे पाहिले आहे हे काहीतरी दुर्मीळ असे आहे असे माझे मत आहे<<<

वैवकु, तुमच्या या मताशी मी असहमत आहे.

१. बेसिकली, हा कोणताही ठराविक फॉर्म आहे असे वाटत नाही.
२. हा जो काही साचा म्हणा, शैली म्हणा, ती जवळपास ९५ % कवींच्या कवितांमध्ये आढळते.

वरील दोन्ही मुद्यांचा या पर्टिक्युलर धाग्यातील लेखनाच्या गुणवत्तेशी काही संबंध नसून निव्वळ या 'फॉर्म' (?) बाबतची ती मते आहेत.

>>>'फॉर्म' नवीन नाहीये, उद्गार वेगळा आहे......... असं मला वाटतं.<<<

रसप - फॉर्म नवीन नाहीये, याच्याशी सहमत आहे.

उद्गार वेगळा आहे - याच्याशी असहमत आहे. (पुन्हा याचाही या किंवा इतर धाग्यांमधील लेखनाच्या गुणवत्तेशी काहीही संबंध नाही, चर्चा फक्त उद्गाराच्या वेगळेपणाबाबत).

बागेश्रींच्या या अश्या प्रकारच्या लेखनप्रकारात वेगळे जर काही असेल तर 'सुगमता, संयमी अभिव्यक्ती आणि तरलता' यांचा एकत्रित परिणाम दाखवण्याची हातोटी! ही त्यांच्या लेखनात वारंवार आढळते व सरसकट सर्वजण ती तशीच वापरताना दिसत नाहीत. कोणी सुगम असतो पण तरल नसतो, कोणी संयमी लिहितो पण अद्भुत किंवा दुर्बोध लिहितो. वगैरे!

>>>मुक्त म्हणजे अगदीच निर्बंध नव्हे जसे स्वस्त म्हणजे फुकट नव्हे<<<

उत्तम विधान!

Pages